23 February 2019

News Flash

कुठे गेली ती तळी?

महाराष्ट्रातील काही पाणथळ जागांचा आढावा ‘लोकप्रभा’ने घेतला आहे.

मुंबई हे अति गजबजलेले शहर असले तरी या ठिकाणी जैववैविध्यतेची अनेक समृद्ध ठिकाणं आहेत. पण ज्या पद्धतीने मुंबई फुगत आहे ते पाहता ही ठिकाणे लवकरच नामशेष होतील.

शहरीकरण नियंत्रित नसेल तर त्यातून नसíगक परिसंस्था उद्ध्वस्त होण्याची शक्यता सर्वाधिक असते. बांधकाम व्यवसाय, कारखाने आणि अतिक्रमणे यातून ही उद्ध्वस्तता आणखीनच भीषण होत जाते. मग ती एखादी समृद्ध पाणथळ जागादेखील गिळंकृत करते. महाराष्ट्रातील अशाच काही पाणथळ जागांचा आढावा ‘लोकप्रभा’ने घेतला आहे.

मुंबईत घर परवडत नाही म्हणून डोंबिवलीकडे जाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढायला सुरुवात झाली तसे डोंबिवलीच्या आजूबाजूच्या गावांपर्यंत डोंबिवलीचा विस्तार होऊ लागला. कधी काळी याच डोंबिवलीच्या परिसरात आठ मोठी तळी असल्याचे सांगितले जाते. मात्र आज या शहरीकरणाच्या रेटय़ात त्यातील अनेक तळी एकतर प्रदूषित झाली किंवा काही नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. अशापकीच एक म्हणजे खोणीचा तलाव. डोंबिवली-अंबरनाथ रस्त्यावरून खोणी गावाच्या अलीकडे एक रस्ता तळोजा एमआयडीसीकडे जातो. याच वाटेवर साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर लोधा ग्रुपचा पलावा (लेकशोअर) हा गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहे. ज्या तळ्याच्या काठावर हा प्रकल्प सुरू आहे तेच तळे म्हणजे खोणीचा तलाव. २०११ साली प्रस्तुत प्रतिनिधीने या तलावाला भेट दिली असता येथे तलाव आहे असा फलक लावावा लागेल अशी परिस्थिती होती. तेव्हा येथे दूरदूपर्यंत कोणताही बांधकाम प्रकल्प नव्हता. पण या तलावाला जलपर्णीने इतके ग्रासले होते की सुमारे १७ एकरचे हे तळे पूर्णपणे झाकून गेले होते. आज येथे किमान तीन ते चार गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. त्यातच येथील वाहतूक वाढल्याने छोटीमोठी गॅरेजस व इतर कामांसाठी अनेक शेडस रस्त्यालगत झाल्या आहेत. या सर्व गदारोळातून तळ्याच्या काठाने पुढे गेलं तरी या तलावाचे अस्तित्व जाणवत नाही. या तळ्याच्या काठावर एक शंकराचे मंदिर आहे. त्याचा अलिकडेच जीर्णोद्धारदेखील झाला आहे. तलावाच्या सभोवतालच्या या सर्व परिस्थितीमुळे तलावाच्या भोवतीची हिरवाई तर नष्टच झाली आहे, पण एकूणच तलावाचे अस्तित्वच नामशेष होईल की काय अशी परिस्थिती आहे. तलावाच्या अध्र्या बाजूने लोधाचे कुंपण आहे, तर उर्वरित बाजूने मातीचे ढिगारे, बांधकामातील कचरा यांचे ढिग साचले आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस गेल्यावरच तलाव जाणवतो. जलपर्णीबरोबरच आता येथे गाळाचे प्रमाणदेखील बरेच आहे. मध्ये अध्ये थोडेफार पाणी डोकावते इतकंच काय ते खोणीच्या तलावाचे नशीब म्हणावे लागेल. कधी काळी येथे शे-दोनशे पक्षी प्रजातींच्या नोंदी झाल्या होत्या. पण आज साधा कावळादेखील येत नाही. इतकेच नाही तर नव्या पिढीतील पक्षीप्रेमींना या तलावाबद्दल कसलीच माहिती नाही. लोधाने किमान प्रकल्पाच्या नावाची लाज राखावी म्हणून का होईना या तलावाचे संवर्धन केले तरी खूप झाले.

डोंबिवलीच्या जवळचा एक तलाव बऱ्यापकी अस्तित्व टिकवून आहे तो म्हणजे निळजेचा तलाव. निळजे गावातच असलेला हा भला मोठा तलाव खूप जुना असल्याचे गावकरी सांगतात. २०११ साली हा तलावदेखील जलपर्णीने पूर्ण भरून गेला होता. त्यातच गावकरी याच पाण्यात कपडे धुणे वगरे करत असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते. मध्यंतरी त्याच्या सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली गेली. त्यातून तलावाला कठडा झाला. पण त्याच्या बंदिस्तपणामुळे पक्ष्यांवर मर्यादा आल्या.

डोंबिवलीचा विस्तार डोंबिवली पश्चिमेकडील बाजूच्याच कोपर या गावात होत गेल्यामुळे या गावातील अनेक पाणथळ जागांना सध्या फटका बसू लागला आहे. कोपर गावातील गावदेवी मंदिराला लागूनच एक भलेमोठे तळं होतं. हे असे भूतकाळात सांगावे लागते कारण आज या तलावाचा अध्र्याहून अधिक भाग भराव घालून बुजवून टाकला आहे आणि उरलेला तलाव हा जलपर्णीने व्यापला आहे. येथे नियमित येणाऱ्या पक्षी अभ्यासकांनी अगदी दोनएक वर्षांपूर्वीच मंदिराच्या कठडय़ापर्यंत असलेला तलाव पाहिला आहे. पण आज येथे रोजच्या रोज डेब्रिज आणून टाकले जाते. अगदी डंपरच्या चाकाचे ताजे व्रण त्या ड्रेबिजच्या ढिगाऱ्याजवळ दिसावेत इतके हे प्रमाण नियमित आहे. भरीस भर म्हणजे आजूबाजूच्या वस्तीतून सांडपाणी थेट येथेच येत असते. आजही काही प्रमाणात येथे पक्षी दिसतात. साधारण वर्षांपूर्वी डोंबिवलीतील पक्षीमित्र राजू कसंबे आणि मनीष केरकर या दोघांनी मिळून जकाना पक्ष्याच्या विणीचा येथे अभ्यास केला होता. जकाना हा वाहत्या पाण्यावरच घरटे करतो. पाण्यावरच ही अंडी उबवली जातात. हा कालावधी साधारण ५० दिवसांचा असतो. या दोन्ही पक्षीमित्रांनी नियमित भेट देऊन या सर्वाचे चलचित्रीकरणदेखील केले आहे. याचाच अर्थ असा होतो की ही पाणथळ जागा समृद्ध होती. पण ज्या वेगाने हे भराव घालण्याचे काम सुरू आहे ते पाहता काही दिवसांनी या तलावाचे डबक्यात रूपांतर झाले तर आश्चर्य वाटायला नको.

मुंबई हे अति गजबजलेले शहर असले तरी या ठिकाणी जैववैविध्यतेची अनेक समृद्ध ठिकाणं आहेत. पण ज्या पद्धतीने मुंबई फुगत आहे ते पाहता ही ठिकाणे लवकरच नामशेष होतील. कांदिवलीच्या सेक्टर आठमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ तलझान नावाचे एक नितांत सुंदर आणि रमणीय असे ठिकाण होते. पूर्वी येथे १३१ पक्ष्यांच्या प्रजाती, ४० फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. मात्र आज तलझान (स्थानिक याला टारझन पण म्हणतात) टेकडी आणि त्याला वेटोळे घातलेला तलझान तलाव हा दारुडय़ांचा अड्डा झाला आहे. तलावात कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य तर आहेच, तरी चक्क कमळाची अनेक झाडं दिसतात. पण आश्चर्य म्हणजे या कमळाच्या झाडातून कमळाची फुलं न उगवता चक्क बिअरच्या बाटल्याच उगवल्या आहेत. परिसरातील मुलांचा दारूचा अड्डा अशीच याची ओळख दिसते. प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली असता भरदुपारीच तिकडे दारू पार्टी सुरू होती. हा सर्व कचरा सध्या तलावाच्या प्रदुषणात भर घालत आहेच, पण बाजूच्या वस्तीतील लोकांनी भराव घालून आता काही ठिकाणी चक्क पार्किंगच केले आहे. २०११ साली येथे भेट दिली असता हे पार्किंग तेथे अस्तित्वात नव्हते. त्याच बरोबर येथे अनेक वर्षांपासून सेव्हन स्टार इस्टेट यांचा मालकी हक्क दाखवणारा फलक आहे. तलावाची ही अवस्था आहे तर दुसरीकडे समुद्राला अगदी लागूनच एक बहुमजली इमारतदेखील उभी राहली आहे. एकूणच काही वर्षांनी येथे तलाव वगर काही नव्हतेच असे सांगितले गेले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

मुंबईजवळचा उरण आणि परिसर गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी प्रकाशझोतात राहिला आहे. पहिले कारण म्हणजे नवी मुंबई विमानतळ आणि दुसरे म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) विस्तारीकरण प्रकल्प व त्या भागातील सेझ. उरण आणि परिसर हा खरे तर वर्षांनुवष्रे तेथील पाणथळ जागांमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे नंदनवन म्हणावा असा होता. पण आज तेथे सुरू असलेल्या विकास कामांमुळे हे नंदनवन नामशेष झाले असून उरणचे मरणच ओढवले आहे असे म्हणता येईल. ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’ने उरणच्या या परिस्थितीवर यापूर्वी अनेकदा लेखमाला प्रकाशित केल्या आहेत. उरणची ही मरणगाथा सुरू होते दास्तान फाटय़ापासून. येथून पुढे साधारण दोनएक किलोमीटरच्या चार पदरी रस्त्याचे काम करण्यात आले आहे. दास्तान फाटय़ापासून उरणकडे जाताना उजवीकडे दोन किमी रस्त्याच्या समांतर साधारण अर्धा किमीचा पट्टा हा आजही पाणथळ जागा आहे. प्रदूषित असले तरी तेथे पाणी आहे, पण त्याचबरोबर अधेमध्ये भरावदेखील आहे. पण त्याच रस्त्यावरून एखाद किमी गेल्यावर मात्र ही पाणथळ जागाच दिसणेच बंद होते. कारण येथे रोजच्या रोज घातला जाणारा भराव. बुलढोझर, जेसीबी अशी मोठ मोठाली यंत्र या पट्टय़ात कार्यरत असताना दिसतात. डम्परने भरून आणलेली माती, मुरूम थेट पाणथळ जाग्यावर जेसीबीद्वारे टाकण्याचे काम अखंड सुरू असताना दिसते. त्याचे कारण म्हणजे ही जागा जेएनपीटीच्या १२.५ टक्के योजनेसाठी राखीव करण्यात आली असल्याचे अनेक फलक येथे दिसतात. रस्त्याच्या उजवीकडील बाजूस हा प्रकार तर डावीकडील बाजूस यापूर्वीच रिलायन्सच्या सेझसाठी जमीन अधिग्रहीत करून तेथील पाणथळ जागांवर भराव घालून तेथे सिमेंटचे कंपाऊंड घालण्यात आले आहे. त्यातही उर्वरित चिंचोळ्या पट्टय़ात पाणी शिल्लक असले तरी एकूणच तेथील जैववैविध्यता साखळी धोक्यात आली असल्यामुळे तेथे पक्ष्यांचे अस्तित्व फारसे दिसत नाही.

येथून पुढे गेल्यावर तर सगळाच भूलभुलैया वाटावा असा प्रकार सुरू आहे. अनेक फ्लायओव्हर्स, रस्त्यांचे रुंदीकरण, पूल यासाठी जागोजागी सुरू असलेल्या कामांनी सारे वातावरण धुळीने भरून गेलेले आहे. या परिसरात गेली दहा वष्रे पक्षी निरीक्षणासाठी नियमित येणारे पनवेलचे पक्षी अभ्यासक माधव आठवले सांगतात की दरवेळी एखादी तरी पाणथळ जागा भरावाखाली गेलेली दिसते. ते सांगतात की आता रेल्वे लाइनचे विस्तारीकरण सुरू असल्यामुळे नवघर रस्त्यावर सेझ प्रशासकीय इमारतीच्या समोरच न्हावा रेल्वे स्टेशनदेखील बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या ट्रॅकसाठी बाजूच्या तलावात भर टाकली गेली असून आता या तलावाचे अस्तित्व एक चिंचोळी पट्टी इतपतच राहिले आहे. या सर्व विस्तारीकरणाच्या कामात एका पाणथळ जागी तर आश्चर्यकारक म्हणावा असा बदल झाला आहे. न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या समोरच एक रेल्वेचा ट्रॅक जातो. तेथे एक क्रॉसिंगदेखील होते. त्या ठिकाणी विस्तीर्ण अशी पाणथळ जागादेखील होती. ही पाणथळ जागा इतकी विस्तीर्ण होती की या जागी शेकडय़ाने फ्लेिमगो पक्षी यायचे. ११ डिसेंबर २००७ रोजी याच जागी सुदीप आठवले आणि निखिल भोपळे या दोघा पक्षीमित्रांनी फ्लेिमगोच्या शिकारीचे चित्रीकरण केले होते. सदरहू शिकारी हा सराईत होता आणि येथे नियमित शिकार करायचा. आता मात्र या ठिकाणी कोणताही पक्षी येऊ शकणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे क्रॉसिंग बंद करून तेथे फ्लायओव्हर उभारला आहे तर पाणथळ जागी भराव टाकून रस्ता करण्यात आला आहे. अशा रीतीने एका समृद्ध पाणथळ जागेचा बळी दिला गेला आहे.

उरणचे हे मरण काही नवीन नाही. त्यातच अनेक जागा नवी मुंबई विमानतळाच्या विस्थापितांसाठी राखीव केल्या आहेत. त्या जागी आणि पाणथळ जागी भराव टाकण्यासाठी आजूबाजूचे डोंगर पोखरले जात आहेत. म्हणजे एकाच वेळी दोन दोन नसíगक घटकांचा हा विकास बळी घेत आहे. सरकारी कामांबरोबरच स्थानिकांचे वाढते आक्रमण देखील आहेच. हा सारा परिसर कायमच असंख्य मालवाहतूक वाहनांनी भरलेला असतो. त्यामुळे अनधिकृतरीत्या वाहनतळ करण्याचे काम स्थानिक लोकांकडून केले जाते. हे सारेच अत्यंत भयावह आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था पर्यावरण संवर्धनामध्ये कुचकामी ठरत असतील तर सर्वाधिक वाईट परिस्थिती निर्माण होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनवेल शहरातील बल्लाळेश्वर तलाव. वडाळा तलाव असे नाव असलेला हा तलाव काठावरील बल्लाळेश्वर मंदिरामुळे बल्लाळेश्वर तलाव म्हणूनदेखील ओळखला जातो. कधी काळी ३१ एकर क्षेत्रफळ असलेला हा तलाव आज १५ एकरच्या आसपास उरला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गासाठी सुरुवातीला या तळ्याचा संकोच करण्यात आला. नंतर येनकेन कारणाने हा संकोच होतच राहिला. आता या तळ्याला कठडा घालून बंदिस्त केले आहे. वीस वर्षांपूर्वी डॉ. बनसोड आणि डॉ. राहुल वारंगे यांनी येथे पक्ष्यांच्या ९८ प्रजाती नोंदवल्या होत्या. त्यात सुमारे ४० स्थलांतरीत प्रजाती होत्या. काही वर्षांपूर्वी त्यातील गाळाचे प्रमाण वाढले, नंतर त्यात जलपर्णीदेखील वाढली या सर्वामुळेच तलाव प्रदूषित तर झालाच, पण त्याच्या सौंदर्यासदेखील गालबोट लागले. आज तर तेथे तलावाऐवजी चक्क एखादे हिरवेगार लॉन असलेले भले मोठे मदानच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही ठोस आणि दूरदर्शी योजनेअभावी एका चांगल्या तलावाचे वाटोळे कसे होते याचे दुर्दैवी उदाहरण म्हणता येईल.

रामसार येथे झालेल्या करारानुसार ज्या पाणथळ जागा विशिष्ट घटकांनी युक्त असतात त्यांना रामसार साइट असा दर्जा दिला जातो. जेणेकरून त्यांच्या संरक्षण- संवर्धनाला योग्य ती दिशा मिळावी. महाराष्ट्र शासनाने अशा काही पाणथळ जागा प्रस्तावित केल्या आहेत. ठाण्याची खाडी ही त्यापकीच एक. पण ही खाडी सुधारण्याचे कसलेही चिन्ह नाही. मुंबईला पर्याय म्हणून विकसित झालेले ठाणे हे जरी एक राहण्यासाठी उत्तम पर्याय ठरत असले आणि त्यानुसार अनेकविध सुविधांनी युक्त होत असले तरी ठाणे खाडीचा प्रवास मात्र वाइटाकडून अधिक वाइटाकडे होताना दिसत आहे. आज ठाणे खाडी ही फ्लेिमगोसाठी प्रसिद्ध असली तरी पूर्वी तिची ख्याती फ्लेिमगोसाठी नव्हती. ठाण्यातील ज्येष्ठ पक्षीमित्र अनिल कुंटे सांगतात की ठाणे पूर्वेला सांडपाणी खूप मोठय़ा प्रमाणात सोडले जाते. त्याच पाण्यात शेवाळ्याची वाढदेखील झपाटय़ाने होते. फ्लेिमगोसाठी हे खाद्य पूरक ठरते. त्यामुळे येथे फ्लेिमगोचे वास्तव्य अधिक प्रमाणात वाढल्याचे ते नमूद करतात. त्याचबरोबर अशा सांडपाण्यावर जगणारा शेकटय़ा पक्षी हादेखील येथे काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात दिसत असल्याची नोंद आहे. ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक आठल्ये यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे खाडीचा ३० वष्रे अभ्यास केला आहे. येथील पाण्यात वाढलेले रासायनिक घटक, प्राणवायूची कमतरता यामुळे एकूणच येथील जैवसाखळीवर झालेले परिणाम त्यांनी पुढे आणले होते. वाढत्या झोपडपट्टया, डेब्रिजचे वाढते प्रमाण, खारफुटीची कत्तल, सांडपाण्याचे वाढते प्रमाण या सर्वानी ठाणे खाडीला वेढले आहे. पण यावर अजूनही पुरेशा गांभीर्याने हालचाल होताना दिसत नाही.

मुंबई आणि परिसरातील लहानमोठय़ा पाणथळ जागांची ही सद्यस्थिती आहे. तर राज्यातील काही  पाणथळ जागांचा आढावा घेताना तेथेदेखील कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती दिसून येते.

सोलापूर हा दुष्काळप्रवण भाग असला तरी सोलापूर आणि परिसरात काही तलावांमुळे खूप मोठय़ा प्रमाणात स्थलांतरीत तसेच स्थानिक पक्ष्यांना अधिवास लाभला आहे. मात्र अक्षम्य दुर्लक्षामुळे हे तलाव प्रदूषित होत आहेत, तर काही अतिक्रमित होऊन नामशेष होऊ लागले आहे. सोलापूरपासून पाच किमीवर असलेला हिपरग्गा तलाव हा २०० पक्षी प्रजातींचा अधिवास होता. हिवाळी डक तर तेथे लाखांच्या संख्येने यायचे असे सोलापुरातील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आणि मानद वन्यजीव संरक्षक निनाद शहा सांगतात. पण आज ही संख्या पूर्णपणे रोडावली आहे. त्याला कारण म्हणजे त्या भागातील गाळपेराच्या शेतीने केलेले अतिक्रमण आणि प्रचंड प्रमाणात केला जाणारा पाण्याचा उपसा. त्याच जोडीला तलावाला लागूनच असलेल्या हिपरग्गा गावातील सांडपाणी, कपडे धुणे आणि गाडय़ा धुणे यामुळे या तलावाचे प्रदूषणदेखील वाढले आहे. अक्कलकोटसाठी तयार केलेल्या कालव्यावर मोठय़ा प्रमाणात मोटारी लावून पाणी उपसले जात असल्याचे निनाद शहा नमूद करतात. सध्या तेथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे भराव घातल्याने अतिक्रमणाचा धोकादेखील वाढला आहे.

खुद्द सोलापूर शहराच्या विजापूर आणि होटगी या दोन नाक्यांमध्ये सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ असलेल्या कंबर तलावाची अवस्था देखील बिकट झाली आहे. इंग्रज अमदानीत सर अ‍ॅलेन ह्य़ूम हे सोलापुरात असताना ते या तलावाच्या काठी यायचे. त्यावेळी तलावात असणारी असंख्य कमळाची फुलं पाहून त्यांनी याला लिली टँक असे संबोधल्याचे उल्लेख आहेत. येथील कमळांची संख्या इतकी होती की कधी काळी एक लक्ष कमळं देवाला वाहण्याचा नवस केला जात असे. पुढे त्या कमळ तलावाचा अपभ्रंश होऊन कंबर तलाव असे म्हटले जाऊ लागले. आज त्याचे धर्मवीर संभाजी तलाव असे नामकरण झाले आहे. नावांमध्ये इतके बदल होताना मात्र मूळ तलाव कुठे आहे असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था सध्या या तलावाची झाली आहे. संपूर्ण तलाव जलपर्णीने झाकला असून त्यावरील अतिक्रमणंदेखील वाढली आहे. या प्रदूषणाच्या प्रवासाबद्दल निनाद शहा सांगतात की, साधारण १९८५ च्या आसपास या परिसरातील वस्ती वाढू लागली. त्यावेळी तेथील सांडपाणी काही प्रमाणात येथे येते होते. तसेच कमळांमुळे डासांची संख्या वाढते म्हणून एकदा चक्क सर्व कमळांचे वेलच काढून टाकण्यात आले होते. त्याच सुमारास येथे धोबीघाटाचा प्रस्ताव आला. पर्यावरणप्रेमींनी खालच्या अंगाला हा धोबीघाट करावा असे महापालिका आयुक्तांना विनवले होते. पण त्यांचे सांगणे टाळून तलावाच्या प्रभावक्षेत्रातच धोबीघाटाची जागा करण्यात आली. परिणामी प्रदूषणातून जलपर्णीची वाढ होत गेली. निनाद शहा सांगतात की या तलावातील पाणी दिसायचे नाही इतकी पक्ष्यांची संख्या त्यावेळी होती. मात्र आता पाणी दिसत नाही इतकी जलपर्णी वाढली आहे. कंबर तलावातील पाणी अगदी १९७२ च्या दुष्काळात देखील पूर्णपणे आटले नसल्याचे येथील अभ्यासक सांगतात. पण आज तर पाणीही पाहता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे. थोडक्यात काय तर एका समृद्ध पाणथळाची स्थानिक प्रशासनाने पुरती वाट लावली हेच अधोरेखित होते.

सोलापुरातील होटगी नाका परिसरात औद्योगिक क्षेत्र आहे. येथेच सिद्धेश्वर साखर कारखानादेखील आहे. याच परिसरात होटगी तलावदेखील आहे. काही वर्षांपूर्वी तेथे एक कागदाचा कारखानादेखील होता. कागद कारखान्याचे प्रदूषण पाण्यासाठी सर्वात धोकादायक असल्याचे निनाद शहा सांगतात. आज कागद कारखाना नाही, पण साखर कारखान्याचा धोका कायम आहे. तर सोलापुरात भर शहराच्या मध्यावर भुईकोट किल्ला असून त्याच्या बाजूलाच सिद्धेश्वर तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी िलगायत समाजाचे क्षेत्र आहे. धार्मिक बाबी म्हटले की आपल्याकडे इतर नियम गुंडाळून ठेवले जातात. त्याचेच प्रत्यंतर हा तलाव वर्षांनुवष्रे भोगत आहे. त्याबद्दल फारसे कोणी आवाजदेखील उठवायला तयार नसते हा भाग वेगळा.

दुष्काळी भागात हे चित्र आहे तर उत्तर महाराष्ट्रातील एक समृद्ध पाणथळ जागा आजही काहीशी दुर्लक्षित म्हणावी अशीच आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या संगमानंतर तापी नदीवरील हतनुर धरणाचा जलाशय हादेखील रामसर साइट होण्याच्या दर्जाचा आहे. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर या तालुक्यांच्या सीमांपर्यंत या जलाशयाचा विस्तार आहे. हतनुर येथील पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी आजवर या परिसरात २९८ पक्षी प्रजातींच्या नोंदी केल्या आहेत. ते सांगतात की तुलनेने येथे प्रदूषणाचा धोका कमी आहे, पण आज तलावावरील ४० टक्के भागावर बेशरम वनस्पतीची वाढ झाली आहे. त्यातच या तलावाच्या काठाने मासेमारीसारखे अनेक व्यवसाय स्थिरावले असल्यामुळे या क्षेत्रावर पक्षीवैविध्य असलं तरी त्याला पक्षी अभयारण्याचा दर्जा न देण्याचे राजकारण केल्याचा अनुभव अनिल महाजन यांना आल्याचे ते नमूद करतात. अभयारण्याचा दर्जा मिळाला तर या अशा व्यवसायांवर बंधनं येतील. त्यामुळे या परिसरातील २५-३० गावांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर बेशरमच्या वाढीमुळे पक्ष्यांना नेमका काय धोका होत आहे याचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज ते मांडतात. त्याच्या निरीक्षणानुसार कॉमन फूट पक्ष्यांची संख्या पूर्वी भरपूर होती, ती सध्या कमी झाली आहे, तर रेड क्रेस्टेड पोचार्ट यांची संख्या वाढली आहे. अशा नोंदींची शास्त्रीय चिकित्सा करणे आवश्यक असल्याचे ते मांडतात. आजतरी या परिसरात  जैववैविध्याला पूरक जागरुकरता नसल्यामुळे हा भाग दुर्लक्षित राहिल्याचे दिसून येत आहे.

हातनुर जवळच हरताळा येथे हरताळा तलाव आहे. तेथे श्रावण बाळाचे मंदिर आहे. दरवर्षी भाविक येथे कावड घेऊन येत असतात. हा तलाव एकेकाळी कमळांसाठी खूप प्रसिद्ध होता, पण आज तेथे कमळांचे अस्तित्वच नाहीसे झाले आहे.

राज्यातील काही पाणथळ जागांची ही अवस्था असताना काही आशेचे किरणदेखील आपल्याला दिसून येतात. पक्ष्यांच्या वाढत्या अधिवासामुळे गोदावरीवरील नांदुर मध्यमेश्वर धरणाच्या जलाशयाला पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. पक्षीमित्र संघटनेच्या रेटय़ामुळे हे काम होऊ शकले. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य गेल्या काही वर्षांत खूप चांगल्या रीतीने जोपासले जात असल्याचे नाशिक येथील पक्षी अभ्यासक सतीश गोगटे सांगतात. या भागातदेखील अनेक अडचणी होत्या. पाणी कमी झाल्यानंतर वाळूचा उपसा, वृक्षतोड असे स्थानिक प्रश्न होते. सतीश गोगटे यांनी तर सहा वर्षांपूर्वी ‘नांदूर मध्यमेश्वरचे भयारण्य’ अशा शीर्षकाचा लेखच लिहिला होता. पण गेल्या काही वर्षांत स्थानिकांच्या सहकार्यातून वन व्यवस्थापनाचा फंडा प्रभावीरित्या राबवल्यामुळे अनेक अडचणी कमी झाल्याचे ते सांगतात. पक्षी पर्यटनालादेखील चांगलीच चालना मिळाली असल्यामुळे रोजगाराचे साधन म्हणून देखील याचे संवर्धन होताना दिसते. पक्ष्यांच्या अस्तित्वात गेल्या दहा वर्षांत फारसा फरक पडला नसल्याचे ते सांगतात, पण त्याचबरोबर गोदावरीत सोडले जाणारे नाशिकचे सांडपाणी, तसेच दारना नदीत होणारे निफाडच्या साखर कारखान्याचे प्रदूषण या दोन बाबींबद्दल ते चिंता व्यक्त करतात.

एकीकडे स्थानिकांच्या मदतीने अशी आशादायी गोष्ट घडत असताना नाशिक परिसरातील दोन तलावांना स्थानिकांच्याच कृत्यामुळे नामशेष व्हावे लागले आहे. नाशिक त्र्यंबक रस्त्यावरील खंबाळे तलाव आणि वणीच्या मार्गावरील रणथाळे तलाव हे ते दोन तलाव होत. या दोन्ही तलावावर पाच सहा वर्षांपूर्वी पक्षीनिरीक्षकांची चांगलीच गर्दी असायची. पण गावकऱ्यांनी केलेला अखंड पाणीउपसा, सांडपाणी सोडणे, मोटारींचे सतत चालणारे आवाज यामुळे आज हे तलावच कोरडेठाक पडले असून तेथे एकही पक्षी दिसत नसल्याचे सतीश गोगटे सांगतात.

शहरांमध्ये असणारे तलाव अर्थात पाणथळ जागा या अनेक वेळा शहरीकरणाचा बळी तर ठरतातच, पण संवर्धनाच्या नावाखाली होणारे सुशोभीकरणामुळे त्यातील नसíगक अधिवासांना धोका पोहोचतो. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध शहर एकेकाळी २४ तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. पण आज येथे मोजकेच तलाव उरले आहेत. रंकाळा, कळंबा ह्य़ा काही महत्त्वाच्या पाणथळ जागा अस्तित्वात असल्याचे येथील पर्यावरण अभ्यासक सुहास वायंगणकर सांगतात. त्यातदेखील यांना सुशोभीकरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येते. अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास, ओपन बिल्ड स्टोर्कसारख्या पक्ष्यांची कॉलनी अशा अनेक नोंदी येथील पक्षीमित्रांनी केल्या आहेत. पण त्याचबरोबर प्रदूषणाचे निदर्शक असलेला शेकाटय़ाही येथे सापडल्याचे नोंदवल्याचे दिसून येते. त्याचबरोबर सभोवतालच्या वाढत्या वसाहतींच्या सांडपाण्याचा फटका हमखास बसल्याचे उदाहरण म्हणजे रंकाळ्याचाच भाग असणारा परताळा असल्याचे सुहास वायंगणकर सांगतात. ते सांगतात की परताळा हे रंकाळ्याचे फुफ्फुसासारखे काम करते. पण आज त्यावरच घाला घातला जात आहे. सांडपाणी, भराव यामुळे येथील माशांचे प्रजोत्पादन थांबल्यातच जमा झाल्याचे सांगतात. मागील वर्षीच्या दुष्काळात कळंब तलाव पूर्णपणे आटून गेल्यामुळे तेथील जैवसाखळीच नष्ट होऊन गेल्याचे ते नोंदवतात. स्थानिक प्रशासनाच्या अनास्थेचेच हे सारे प्रतीक म्हणता येईल.

मराठवाडा म्हटल्यावर आपल्याला दुष्काळच आठवतो. पण गोदावरीवरील औरंगाबाद नजिकचे जायकवाडी धरणाचा जलाशय हादेखील पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो. मात्र उन्हाळ्यात पाणी कमी होताना येथे अवैध वाळू उपशाच्या अनेक घटना घडतात, तसेच वीटभट्टी, मोटार वापरून बेदम पाणी उपसा, गाळपेराच्या शेतांचे अतिक्रमण अशा घटना घडत असल्याचे औरंगाबाद येथील पर्यावरण अभ्यासक किशोर गठोडिया सांगतात. त्याचबरोबर वाळुंज एमआयडीसीतील प्रदूषणाचा धोकादेखील तेवढाच गंभीर असल्याचे ते नमूद करतात. औरंगाबाद शहरातच असणारे सलीम अली सरोवर हेदेखील एकेकाळी पक्ष्यांसाठी नंदनवन होते. पण आज हे सरोवर पूर्णत: जलपर्णीने भरून गेले असल्यामुळे येथे पूर्वीच्या तुलनेत १० टक्के इतपतच पक्षी पाहायला मिळत असल्याचे किशोर गठोडिया नमूद करतात.

राज्यभरातील काही मोजक्या पाणथळ जागांचा हा लेखाजोखा आहे. याशिवाय विदर्भाचा स्वतंत्र आढावा याच अंकात आम्ही घेतला आहे. कुठे सुधारणा आहेत, कुठे अगदीच दुरवस्था. थोडक्यात काय तर प्रशासनाच्या लेखी या पाणथळ जागांना कोणी वालीच नाही हे मात्र वारंवार अधोरेखित होताना दिसते.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2

First Published on February 2, 2018 1:07 am

Web Title: maharashtra lakes area is shrinking special article in marathi