दिगंबर शिंदे – response.lokprabha@expressindia.com
कोयना, चांदोली धरणातून वाढलेला विसर्ग आणि अवघ्या २४ तासांत ४३० मिलिमीटर पावसाची नोंद यामुळे सांगलीत पूरस्थिती उद्भवली. संपूर्ण शहर आणि अनेक वर्षे राबून उभारलेले संसार त्यात उद्ध्वस्त झाले. अर्निबध बांधकामांमुळे ही स्थिती अधिकच गंभीर झाली.

सहा गल्ल्यांची सांगली गेला आठवडाभर महापुराच्या प्रलयाने हवालदिल झाली होती. एरवी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने आपली सीमा ओलांडून दक्षिण महाराष्ट्रातील बाजारपेठेत आठ दिवस मुक्काम ठोकला. माहेरवाशीण बनून दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन परत फिरण्याऐवजी तिने दहा दिवस मुक्काम ठोकून सांगलीकरांची दैना केली. बाजारपेठेचे शहर असलेल्या सांगलीला आता पुन्हा सावरण्यासाठी किमान काही वर्षांचा अवधी लागेल. मात्र, तोपर्यंत धर्य कायम ठेवण्याचे आव्हान या कृष्णेकाठी नांदणाऱ्यांना पेलावेच लागेल.

एरवी संथ वाहणारी कृष्णा आपली लक्ष्मण रेषा ओलांडून गावगाडय़ात घुसली. अवघा कृष्णाकाठ अस्वस्थ झाला. चांदोली अभयारण्याच्या कुशीत जन्माला येऊन हरिपूरच्या संगमावर कृष्णार्पण होणारी वारणाही पात्राबाहेर येऊन गावोगावच्या घरांत खेळत होती. जिल्ह्य़ातील १०४ गावांना आणि साडेतीन लाख लोकसंख्येला या महापूराचा प्रत्यक्ष फटका बसला. सुमारे पाच हजार कोटींचे नुकसान झाले. असंख्य घरे महापुराच्या पाण्यात बुडाली. संसारोपयोगी साहित्य टाकाऊ झाले. संगणक, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन व वातानुकूलन यंत्रे यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दुचाकी व चारचाकी वाहने या महापुराच्या पाण्यात भंगारात गेली.

सांगलीने एकविसाव्या शतकात दुसऱ्यांदा महापुराचा अनुभव घेतला. २००५ मध्ये आलेला महापूर आणि या वेळचा महापूर यामध्ये साडेचार फुटांचे अंतर आहे. कृष्णेने १४ वर्षांपूर्वी ५ ऑगस्टला सांगलीतील आयर्वनि पुलाजवळ ४५ फुटांची धोक्याची पातळी ओलांडून ५३ फुटांची पातळी गाठली होती. या वर्षी मात्र ६ ऑगस्टला ही पातळी ओलांडून तिने तीन दिवसांत ५७ फूट ५ इंच इतकी पातळी गाठून हाहाकार माजविला. मूळची सांगली अशी ओळख असलेला गावठाणचा भाग पाण्याखाली गेला. ज्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असते अशा मारुती रोड, राजवाडा चौक, स्टेशन रोड, गणपती पेठ, कापड पेठ, हरभट रोड या रस्त्यांवर वाहनांऐवजी होडय़ा चालवाव्या लागल्या. राजवाडा चौकात तर पाण्याची पातळी ९ फूटांवर गेली होती.

तात्पुरत्या पुनर्वसन केंद्रातून घरी परतलेल्या पूरग्रस्तांना आपल्या संसारातील किती मौलिक वस्तू महापुराने गिळंकृत केल्या आहेत, याची जाणीव हळूहळू होऊ लागली आहे. यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरणही होत आहे. अशा वेळी त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. केवळ वस्तूंचा पुरवठा करून पूरग्रस्तांच्या प्रश्नांचे निराकरण तातडीने होईल असे नाही. आज राज्याच्या विविध भागांतून मदतीची वाहने गावच्या वेशीवर येऊन धडकत आहेत. पूरग्रस्तांना मदतही मिळत आहे. शासनाच्या पातळीवरूनही मदतीचे साहित्य वाटले जात आहे. लोक मदत स्वीकारत आहेत. महापुरानंतर मदतीचा महापूर आला आहे. तो जगण्याची उमेद वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. समाजाच्या प्रगल्भतेचा आणि माणुसकीचा नवा अध्याय मांडण्यासाठी हे पुरेसे असले तरी दीर्घकालीन उपायही योजावे लागतील.

पूर ओसरण्यास विलंब का?

महापूर येण्याला कोण-कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या याचा शास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. या वेळी नदीतील पाणी पातळी तासाला फुटा-फुटांनी वाढली. मात्र पूर ओसरत असताना त्याची गती तासाला इंचा-इंचाने कमी होत होती. घरा-घरात शिरलेले महापुराचे पाणी ओसरण्यास बराच अवधी लागला. कृष्णा नदी संथ का, याचा अभ्यास करायला हवा.

कोयना धरणाची उंची समुद्र सपाटीपासून ७४६ मीटर आहे, तर कराड शहराची उंची ५६६ मीटर आहे. सांगलीची उंची ५४९ तर अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटर आहे. सांगली ते अलमट्टी धरण यांच्यातील अंतर २६५ किलोमीटर आहे. कृष्णा नदीत कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग, वारणा, पंचगंगा नदीतील पाणी आणि संततधार पाऊस असे सगळीकडून पाणी येत होते. कोयनेतून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर कराडपासून भिलवडीपर्यंत पाणी ओसरण्याचा वेग अधिक आहे. मात्र तिथून पुढे हा वेग संथ आहे. सांगलीपासून अलमट्टी धरणापर्यंतचा जमिनीचा ढाळ म्हणजेच उतार हा प्रति १८ किलोमीटरला एक मीटर आहे. याचाही परिणाम पूरस्थिती दीर्घकाळ राहण्यात झाला. याशिवाय नसíगक नाल्यांवर झालेले अतिक्रमण, नाले बुजवून उभारलेल्या टोलेजंग इमारती यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. निसर्ग आपले नियम बदलत नाही, माणूस मात्र आपल्या सोयीनुसार या निसर्ग नियमांना बदलण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळेच १० दिवसांची शिकवण देऊन कृष्णामाई पुन्हा आपल्या पात्रात विसावली आहे. यातून धडा घेतला तर ठीक अन्यथा पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी स्थिती निर्माण होईल.

चिमणी पाखरे जशी काडी-काडीने घरटे बांधतात तसा काडी-काडी जोडून उभा केलेला संसार कृष्णार्पणमस्तू झाला. पुन्हा नव्याने संसार उभारण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून मदत येत असली तरी ही मदत आज जगवू शकते, मात्र पुन्हा आवडीनिवडीनुसार संसाराचा रथ उभा करीत असताना येणारी आव्हाने मोठी आहेत. यातूनही कृष्णाकाठ पुन्हा नव्या दिमाखानं उभा राहिल यात शंका नसली तरी त्यासाठी वेळ हा लागणारच आहे. शेवटी कोणत्याही समस्येवर काळासारखे औषधच नाही.

२४ तासांत ४३० मिलिमीटर

२९ जुलपर्यंत कोयना, चांदोली धरणातील जलसाठा निम्म्याहून कमी होता. त्यानंतर सुरू झालेल्या कोसळधार पावसाने धरणातील विसर्ग वाढतच राहिला, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज या ठिकाणी २४ तासांत ४३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्य़ाची पावसाची वार्षकि सरासरी ४८० मिलिमीटर असताना एका दिवसात एवढा पाऊस पडू शकतो हा अनुभव ऐतिहासिकच ठरला. पावसाचा लहरीपणा अपेक्षित धरूनच यापुढील काळात आपत्तिव्यवस्थापन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली.