lp72दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र अशा उत्सवांमध्ये झलक दाखवण्यासाठी कलाकार ठिकठिकाणी जातात. पण याच कलाकारांनी अभिनय क्षेत्रात येण्याआधी उत्सवांच्या मंडळांचे कार्यकर्ते म्हणून काम केलंय. कार्यकर्ता म्हणून वावरलेल्या या कलाकारांनी शिस्त, नियोजन, नियम, एकोपा, सहकार्य अशांची शिकवण घेतली आहे. अशा मंडळांचे कलाकारी कार्यकर्ते त्यांच्या अनुभवांविषयी सांगताहेत..
टिळकांचा उद्देश सफल – तेजस्विनी पंडित

पुण्यात आम्ही नव्या ठिकाणी राहायला गेलो होतो. ती बिल्डिंगही नवीनच होती. त्यामुळे फारशी कोणाशीच ओळख नव्हती. एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे ओळख तर व्हायलाच हवी. म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली. बिल्डिंगमध्ये गणेशोत्सव सुरू करण्याचं ठरवलं. लोकांनी एकत्र यावं, एकमेकांशी जुळवून घ्यावं हा लोकमान्य टिळकांचा उद्देश गणेशोत्सव सुरू करण्यामागे होता. तीच परंपरा आम्ही पुढे नेली. मी तेव्हा साधारण बारा-तेरा वर्षांची असेन. माझ्या वयाच्या इतर काही लहान मुलांना एकत्र करून आम्ही गणेशोत्सव सुरू केला. वर्गणी काढली. मूर्तीची निवड केली. वाजतगाजत गणपतीचं स्वागत केलं. तेव्हा ढोल-ताशा पथक घेऊन मिरवणूक काढणं शक्य नव्हतं. कारण आम्ही मुलांनीच सगळं आयोजित केल्यामुळे आम्हाला ते फारसं परवडणारं नव्हतं. काढलेल्या वर्गणीत मूर्ती, दररोजचा प्रसाद, इतर सामान असं सगळंच आणावं लागायचं. मग आम्ही खेळण्यातल्या दिमडय़ा, ताटं-चमचे, टाळ अशांनी आवाज करीत मिरवणूक काढायचो. पिपाण्या मात्र विकत घ्यायचो. त्या स्वस्तही असायच्या आणि त्याचा आवाजही दमदार असायचा. नाचत-नाचत मिरवणुकीत जल्लोष करायचो. काय मजा यायची..! आणखी एक गोष्ट विसरून कशी चालेल. ‘गणपती बाप्पा मोरया’ असं लिहिलेली केशरी रंगाची पट्टी कपाळाला बांधून धूमधडाक्यात बाप्पाचं स्वागत करायचो. मी लहानपणापासूनच टॉम बॉइश आहे. म्हणजे मुलांसारखं वावरणं मला आवडायचं. तेव्हाही मुलांसारखं कुर्ता वगैरे घालून धम्माल करायचे. मघाशी म्हटल्याप्रमाणे वर्गणीतून सगळंच विकत घेणं परवडायचं नाही. म्हणून आईच्या साडय़ा सजावटीसाठी वापरायचो. मागे नाडी बांधून वेगवेगळ्या रंगांच्या साडय़ा मस्त नक्षीदार आकाराने सजवायचो. आम्हीच मुलंच विविध कार्यक्रम करायचो. नृत्य, गायन, नाटय़ असे कार्यक्रम करायचो. ज्या दिवशी संध्याकाळी हे कार्यक्रम असतील त्या दिवशी सकाळीच घरोघरी जाऊन संध्याकाळच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देऊन यायचो. या संपूर्ण प्रक्रियेतून मी बरंच काही शिकले. नातं जपणं, समूहात राहून काम करणं, नेतृत्वकौशल्य अशांची शिकवण मिळाली. काही चुकांनीही खूप काही शिकवलं. कालांतराने बिल्डिंगमधल्या मोठय़ा लोकांनी आम्हाला मदत करायला सुरुवात केली. मग आमच्या मंडळाचं स्वरूप मोठं होत गेलं.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

lp75इव्हेंट मॅनेजमेंटचे धडे – अंगद म्हसकर
मी ठाण्यात नौपाडा इथे राहायचो त्या भागात ‘हिंदू जनजागृती मित्र मंडळ’ आहे. खरं तर मंडळाच्या नावातच सगळं आहे. देशभक्ती, समाजप्रबोधन करणाऱ्या अनेक गोष्टी तिथे व्हायच्या. दहा दिवस विविध कार्यक्रम तिथे चालायचे. माझं कॉलेज संपलं होतं आणि नुकताच मी नाटकांमधून काम करायला लागलो होतो. याच दरम्यान मी या मंडळात सक्रिय झालो. मंडळात संपूर्णत: पारंपरिक उपक्रम चालायचे. गणपतीचं स्वागत आणि विसर्जन दोन्हींच्या मिरवणुका देशभक्तीपर गाणी, टाळ, ढोल-ताशा पथक यांच्या साथीने गाजवायचो. डीजे, मोठमोठाले स्पीकर्स यांना मंडळात अजिबात स्थान नाही. आमच्या मंडळाची मिरवणूक बघायला ठाण्यात आजही ठिकठिकाणी लोक येऊन उभे राहतात. इतकी देखणी मिरवणूक असते आमची..! सांस्कृतिक कार्यक्रमांची तर रेलचेल असते. नाटकांवरील परिसंवाद, विविध विषयांवर चर्चासत्र, क्रांतिकारक-महापुरुष यांच्यावरील प्रवचन, कीर्तने असे कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांमुळे समाजप्रबोधन होतं तसंच वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते. मंडळाच्या गणपतीची सजावट हे एक महत्त्वाचं काम असतं. त्यातही शिस्त असतेच. देशभक्तीवरील प्रश्न, मुद्दे, घटना यांवर प्रकाश टाकणारी सजावट हे दरवर्षी आकर्षण असतं. मोठमोठय़ाने गाणी लावत, चकचकीत देखावे करण्यापेक्षा विशिष्ट संकल्पनेवर सजावट करण्याकडे आमचा कल असतो. गणेशोत्सवातलं जागरण हा आणखी एक जवळचा विषय. पण मंडळात जागरण करण्याचा वेगळा अर्थ घेतला जातो. जुगार, पत्ते खेळणं, नाचगाणी करणं या गोष्टींना मंडळात अजिबात थारा नाही. असे गैरप्रकार करणारा आढळला तर त्याला ताबडतोब बेदखल केलं जातं. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल काही चुकीचं पसरवलं जाणार नाही याची काळजी घ्यायचो. आम्ही आपापले नोकरी, व्यवसाय सांभाळून एकमेकांच्या सोयीनुसार मंडळात असायचो. मंडळात एकत्र आलो की नुसत्या इकडच्या-तिकडच्या गप्पा न होता विशिष्ट मुद्दय़ांवर, चालू घडामोडींवर चर्चा करायचो. त्यातून संवाद घडतो. एकमेकांची मतं कळतात. मी नुकताच नाटकात काम करायला लागलो होतो. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. तसंच कार्यक्रमांच्या आधी निवेदन करण्याचंही काम माझ्याकडेच असायचं. पण या जबाबदारीचा मला माझ्या क्षेत्रात खूप फायदा झाला. सलग दोन मिनिटं रंगमंचावर बोलायचं असेल तर ते बोलण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. दरवर्षी वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली जायची. जेणेकरून सगळ्या विभागांची माहिती, कामाचं स्वरूप आणि जबाबदारी प्रत्येकाला घेता आली पाहिजे. थोडक्यात इव्हेंट मॅनेटमेंटचं शिक्षणच या मंडळाने दिलं. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मी या मंडळात सक्रिय आहे पण, अलीकडे फार वेळ देता येत नाही. तरीही मी तिथे आवर्जून जातोच.

lp73रुसव्यातून साजरा केला गणेशोत्सव – अदिती सारंगधर
कल्याणला राहात असताना आमच्या भागात साधारण चार-पाच गणपती मंडळं होती. यापैकी कोणत्याही मंडळाची मी कार्यकर्ती नव्हते. पण मंडळाचा गणपती आणि कार्यकर्ता याबाबतची एक गमतीशीर आठवण आजही मनात आहे. ती आठवण फारच गोड आहे. तेव्हा मी साधारण आठ-नऊ वर्षांची असेन. आमच्या भागात असलेल्या एकाही मंडळात माझ्यासारख्या लहान मुलांना येऊ द्यायचे नाहीत. म्हणजे धमाल करायला, स्पर्धामध्ये भाग घ्यायला, आरती म्हणायला वगैरे येऊ द्यायचे, पण काम करण्यासाठी ‘नो एंट्री’. कारण काय द्यायचे तर म्हणे आमची लुडबुड होते. हे कारण ऐकून मला रागच आला. मग मी माझ्या वयाच्या आणखी वीस-पंचवीस मुलांना गोळा केलं आणि आपला स्वतंत्र गणपती बसवायचं ठरवलं. दीड दिवसच होता गणपती. पण ते दीड दिवस आम्ही आमची हौस पुरवून घेतली. ते एकच वर्ष आम्ही गणपती बसवला. आपापल्या घरातून परवानगी काढून तयारीला लागलो. गणपतीची मूर्ती आणण्यापासून विसर्जन करेपर्यंत सगळं आम्हीच केलं. सगळ्या कामांमध्ये आमच्या आया आमच्यासोबत होत्या, पण फक्त निरीक्षणासाठीच. बाप्पासाठी नैवेद्य केला. मोदकही केले. आकार फारसा बरा नव्हता तरी स्वत:च्या हाताने केल्याचा आनंद होता. त्या दिवशी दोन्ही वेळा आम्ही आरत्या म्हटल्या. आम्हा मुलांपैकी कोणी मृदुंग वाजवला तर कोणी झांजा. तबला, पेटी, बासरी या वाद्यांसह आम्ही आरत्या म्हटल्या. मोठय़ा लोकांच्या मंडळात आम्ही जाऊन सांगून आलो, ‘तुम्हाला आमच्याकडे आरतीला यायचं तर या, पण आमच्या कामात लुडबुड करायची नाही.’ आता हे आठवलं की हसू येतं. जवळजवळ धमकीच होती ना ती. ‘हे करायचं नाही, ते करायचं नाही,’ मोठय़ांच्या अशा असंख्य बंधनांमध्येही आम्ही त्या वर्षीचा गणेशोत्सव उत्तमरीत्या साजरा केला. ते एकच वर्ष मंडळात काम करण्याचा अनुभव आला. खरं तर ते मंडळही नव्हतं. पण एकत्र काम करण्याचा तो अनुभव खूप काही शिकवून गेला. सोबत असलेल्याशी जमवून घेणं, मदत करणं, कुठलंही काम करण्याची तयारी असणं, जबाबदारी घेणं असं सगळं नकळतपणे शिकले. मोठय़ांवरच्या रागातून, रुसव्यातून साजरा केलेला तो आम्हा लहानग्यांचा गणेशोत्सव फारच गमतीशीर आणि खूप आनंद देणारा ठरला.

lp76कार्यकर्ता होण्याचं बाळकडू – सौरभ गोखले
नूतन मराठी विद्यालय ही माझी शाळा. आमचं शाळेचं गणपती मंडळ होतं. तिथे मी पहिली ते दहावी अशी दहा र्वष सक्रिय होतो. सात दिवसांच्या गणेशोत्सवात आम्ही कामंही करायचो आणि धमालही. मी शाळेच्या सांस्कृतिक मंडळात होतो त्यामुळे गणेशोत्सवातही माझ्यावर विशिष्ट जबाबदारी असायची. कोणाच्या हस्ते पूजा करायची, सजावट कशी करायची, कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे, मिरवणूक कशी काढायची अशा सगळ्या गोष्टी ठरवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आमच्या शिक्षकांनी दिलं होतं. कोणत्याही कामात शिस्त असणं महत्त्वाचं असतं हे या सगळ्या प्रक्रियेतून मी शिकलो. तसंच विशिष्ट उपक्रम करताना घालून दिलेले नियम, शिस्त मोडू नये हेही शिकता आलं. त्या वेळी पुण्यात मोजकीच ढोल-ताशा पथकं होती. त्यापैकी एक म्हणजे आमच्या शाळेचं म्हणजे नूतन मराठी विद्यालयाचं. हे पथक त्या वेळीही खूप लोकप्रिय होतं. मी आता कलावंत ढोल पथकात आहे. ताशा वाजवतो. पण त्या वेळी मी पथकात नव्हतो. मात्र गणपतीची मूर्ती सांभाळण्यासाठी मी तिच्याजवळ असायचो. मला तेव्हा ही मोठी जबाबदारी वाटे. आनंदही मिळायचा त्यातून. सात दिवसांमध्ये नेहमीचा ठरलेला एक कार्यक्रम म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम. रोज नियमितपणे हा कार्यक्रम पार पडे. शाळेचं मंडळ असल्यामुळे मुळातच तिथे शिस्त असायची. त्यामुळे हा पठणाचा कार्यक्रम अतिशय श्रवणीय व्हायचा. विविध विषयांवर भाषणं असायची. काही मुद्दय़ांवर आधारित चित्रांचे स्लाइड शो केले जायचे. चित्रकला, रांगोळी स्पर्धाही असायच्या. या स्पर्धाचं नियोजन करताना आम्ही त्यात सहभागही घ्यायचो. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे लोकांना सांभाळून घेणं, जोडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. समजून घेण्याचं आणि समजावण्याचं कौशल्य मंडळातील कामकाजामुळे शिकलो. बरंच काही दिलं मंडळाने. थोडक्यात काय तर, शाळेतच मंडळातल्या कामाचं बाळकडू मिळालं. ‘काय करावं’ हे तर शिकलोच, पण ‘काय करू नये’ याबाबतही समजलं. गणपतीत मी पुण्यात असतोच. त्यामुळे किमान एक फेरी तरी शाळेत असतेच. त्याशिवाय गणेशोत्सव साजरा करतो असं वाटत नाही.

lp74एकोपा, माणुसकी आणि मंडळ – सिद्धार्थ जाधव
मी मुंबईला १९८८ साली आलो. शिवडीला महात्मा गांधी स्मृती वसाहतीत बारा-तेरा र्वष राहिलो. वसाहतीत असलेलं मंडळं म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही गणेशोत्सव म्हटलं की काही विचारूच नका. आतासारखं तेव्हा कोणत्याच सणांना व्यावसायिक रूप प्राप्त झालं नव्हतं. त्यामुळे महिनाभर आधी वगैरे तयारी करणं असं पूर्वी नव्हतं. जेमतेम पंधरा दिवस आधीपासून आम्ही तयारीला लागायचो. गणपतीचं आगमन ते विसर्जन असे सगळेच दिवस आमच्यासाठी खास असायचे. सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. आम्हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम असायचा तो पडद्यावर सिनेमा दाखवण्याचा. दरवर्षी एक सिनेमा हमखास दाखवला जायचा. तो म्हणजे, ‘हमसे बढकर कौन’. मिळेल ते काम करण्याची आम्हा सगळ्यांची तयारी असायची. मी कधी प्रसाद द्यायचो, कधी माईकवर आरती म्हणायचो, सिनेमा दाखवण्याच्या साहित्याची देखभाल करायचो, चपला सांभाळायचो, गणपतीचं दर्शन घ्यायला येणाऱ्यांना शिस्तीने आत सोडायचो. विविध कार्यक्रम आयोजन करण्याच्या टीममध्येही मी होतो आणि त्यात सहभाग घेण्यामध्येही मी असायचो. या कार्यक्रमांमधूनच रंगमंचावर उभं राहून लोकांसमोर बोलायची, नाचायची भीती निघून गेली. याचा मला सिनेक्षेत्रात पदार्पण करताना खूप फायदा झाला. आता अभिनयासाठी अनेक पुरस्कार, ट्रॉफी मिळतात. पण तेव्हाच्या स्पर्धामध्ये जिंकलो की कंपास पेटी, ग्लास, रंगांची पेटी, स्केचपेन या गोष्टी बक्षीस म्हणून मिळायच्या. गंमत वाटायची. एवढय़ा लोकांसमोर जाऊन ते बक्षीस घ्यायचं स्वत:चंच फार कौतुक वाटायचं. त्याची किंमत आजही तितकीच आहे. आमचं मंडळ खूप मोठं नव्हतं. पण एकमेकांबद्दलंच प्रेम खूप होतं. एकोपा, माणुसकी, समाधानी असणं, मदत करणं, नेहमी हसतमुख राहणं हे सगळं मी तिथे शिकलो. अनुभवलंसुद्धा. आता ‘सार्वजनिक’ या शब्दाचा अर्थ शोधावाच लागेल, असं मला वाटतं. पण तेव्हा त्यांच्यासाठी ‘सार्वजनिक’ म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वाचाच असाच होता. यात सगळ्यांसाठी सगळ्यांनी मिळून काम करण्याची भावना असते. हेच मी मंडळाकडून शिकलो.

शब्दांकन : चैताली जोशी