तरुण मुलांच्या थर्टीफर्स्टच्या पाटर्य़ा म्हणजे मित्रमैत्रिणी जमवणे, मौजमस्ती, हसणे-खिदळणे, खाणेपिणे अशी सगळी गंमतजंमत; पण ती करताना मर्यादा केव्हा ओलांडली गेली आणि आपण अमली पदार्थाच्या विळख्यात कधी सापडलो हे अनेकांना कळतसुद्धा नाही. पूर्वी तरुणांना विळखा घालणाऱ्या या अमली पदार्थाच्या रॅकेटने आता शालेय मुलांच्या विश्वात आपले हातपाय पसरले आहेत. या मुलांच्या पातळीवर नेमकेहोतेय काय आणि कसे याचा हा लेखाजोखा-

सध्या सगळीकडे नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. काहींना वेध लागलेत ते थर्टी फर्स्टच्या पार्टीत बेधुंद नाचण्याचे तर काहींना मित्रपरिवारासोबत नवीन वर्षांचे धुमधडाक्यात स्वागत करण्याचे. काहींना मात्र अशा पाटर्य़ामध्ये मिळणारे अमली पदार्थ आकर्षित करत आहेत. वर्षांखेर होणाऱ्या पाटर्य़ामध्ये अमली पदार्थाच्या विक्रीचं मुख्य टार्गेट तरुणाई आहे. त्यातही पौगंडावस्थेतील मुलं-मुली या अमली पदार्थाच्या जाळ्यात सहज ओढली जात आहेत. कुतूहल आणि नवीन काही करू पाहण्याच्या वृत्तीमुळे पौगंडावस्थेतील मुलां-मुलींना स्वस्त असेललं मेफ्रेडॉन म्हणजेच म्याँव म्याँव हा अमली पदार्थ घेण्यास प्रवृत्त केलं जातंय. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये इतर अमली पदार्थाच्या तुलनेत मेफ्रेडॉनला सर्वाधिक मागणी आहे. स्वस्त आणि एकदा सेवन केल्यानंतर दीर्घकाळ न दिसणारे परिणाम या दोन मुख्य कारणांनी या अमली पदार्थाचं सेवन केलं जातं. सेलिब्रेशनच्या ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट पार्टी या दोन मुख्य कारणांमुळे  अमली पदार्थाच्या अधीन जाणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांचं प्रमाण  वाढण्याची शक्यता आहे.

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

या वयोगटात मानसिक, शारीरिक बदल होत असतात. याच वयोगटात त्यांना बाहेरच्या जगाची ओळख होत असते, विविध गोष्टींचे आकर्षण वाटू लागते, विशिष्ट बाबींविषयी त्यांचे विचार पक्के होत असतात. याच वयात त्यांच्यासमोर स्ट्रॉबेरी क्विक, मेफ्रेडॉन हे अमली पदार्थ येत आहेत. स्ट्रॉबेरी क्विक म्हणजे गुलाबी रंग दिलेले मेफ्रेडॉनच आहे. शाळांमधल्या मुलांमध्ये सध्या या अमली पदार्थाची चलती आहे. अमली पदार्थ घेण्याचा १८ ते ३० हा वयोगट आता  अकराव्या-बाराव्या वर्षांपासून सुरू झालाय, ही चिंताजनक बाब आहे.

मेफ्रेडॉन या ड्रगचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या देहबोलीत किंवा वागणुकीत ड्रग घेतल्याचे कोणत्याही प्रकारचे चिन्ह दिसत नाही. मेफ्रेडॉन घेण्यामागचे हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. मेफ्रेडॉनचे सेवन केलेला माणूस बोलताना अडखळत नाही, त्याची जीभ सरकत नाही, त्याचा वासही येत नाही. मेफ्रेडॉनचे सेवन केल्यावर डोळ्यांच्या बाहुल्या किंचित विस्फारतात. त्यामुळे माणसाच्या चेहऱ्याला काहीसा मांजराच्या चेहऱ्यासारखा लुक येतो. म्हणून मेफ्रेडॉनला ‘म्याँव म्याँव’ या नावानेही ओळखले जाते. झोप न लागणे, भूक मरणे हे मेफ्रेडॉनचे सेवन केल्यानंतरचे परिणाम आहेत. काहींना झोपेत दात खायची म्हणजे वाजवायची सवय असते. मेफ्रेडॉनचे सेवन केल्यानंतर ते इतके वाढते की, दातांचा भुगा होईल की काय असे वाटते. मेफ्रेडॉन घेतल्यानंतर सगळे जग छान वाटू लागते. मेफ्रेडॉनची अ‍ॅडिक्टिव्ह पॉवर खूप जास्त आहे. एकदा घेतल्यानंतर ४५ मिनिटांनी त्याची नशा उतरली की, तासाभराने ते परत घ्यावेसे वाटते. नवीन वर्षांच्या पार्टीसाठी मेफ्रेडॉन आणि कोकेन यांची मागणी खूप असते, असे एक निवृत्त पोलीस अधिकारी सांगतात. मेफ्रेडॉनवर बंदी येण्यापूर्वी १ ग्रॅमची किंमत ७० ते १०० रुपये इतकी होती. बंदी आल्यावर म्हणजे फेब्रुवारी २०१५ नंतर याची किंमत १ ग्रॅमला १५०० इतकी झाली. तसेच समोरच्याची गरज पाहून ही किंमत कमी-जास्त केली जाते. शाळेतल्या मुलांना साधारण इतर लोकांपेक्षा कमी किमतीत, त्यांची गरज आणि त्यांची आíथक स्थिती पाहून विक्री केली जाते. कधीकधी श्रीमंत घरातला मुलगा असेल तर त्याला आहे त्यापेक्षा जास्त किमतीतही विकले जाते. कोकेनच्या तुलनेत मेफ्रेडॉन स्वस्त असल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मेफ्रेडॉन जास्त घेतले जाते. एक्सटसी आणि एलएसडी या दोन अमली पदार्थानाही नवीन वर्षांच्या पार्टीत भरपूर मागणी असते; पण ते प्रचंड महाग असते. उच्चभ्रू मुलांमध्ये या अमली पदार्थाचा वापर सर्वाधिक दिसतो, अशी माहितीही ते देतात. या अमली पदार्थाना पार्टी ड्रग्ज असेही म्हणतात.

२५ ते ३१ डिसेंबर या दरम्यान सर्वाधिक पार्टी होत असतात. या काळात एखाद्याने सातत्याने अमली पदार्थाचे सेवन केले तर तो व्यसनाधीन होतोच. ५० टक्के लोकांचा अमली पदार्थाचा पहिला डोस ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला किंवा ३१ डिसेंबरच्या पार्टीत असतो, असे डॉ. युसुफ र्मचट यांचे म्हणणे आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट पाटर्य़ामध्ये अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असतात. अमली पदार्थापर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे या पाटर्य़ा. म्हणूनच थर्टी फर्स्ट आणि ख्रिसमस या दिवसांमध्ये अमली पदार्थाचं सेवन करण्याची संधी सहज उपलब्ध होते.

पौगंडावस्थेत जसे कुतूहल, उत्सुकता असते तसेच मित्रांचा सहवासही अनेक गोष्टींना कारणीभूत ठरतो. मुली घेतात, मग तू का घेत नाहीस, असे हिणवून एखाद्याला अमली पदार्थ घेण्यास प्रवृत्त केले जाते. या वयोगटातील मुला-मुलींमध्ये होत असलेले शारीरिक-आंतरिक बदल हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. मुलाला मिसरूड फुटले आणि मुलीची मासिक पाळी सुरू झाली, की ते वयात आले असे म्हणतात. यामागे संप्रेरकांमधील बदल कारणीभूत असात. टेस्टेस्टेरॉन या पुरुषांमधल्या  संप्रेरकात या वयोगटात बदल होत असतात. मुले तारुण्यात येत असतात त्या वेळी टेस्टेस्टेरॉनची लेव्हल वाढते. पुरुषांच्या या संप्रेरकात होणाऱ्या बदलामुळे त्यांच्यामध्ये आक्रमकता आणि नवीन प्रयोग करण्याची इच्छा प्राप्त होते. या वयोगटात टेस्टेस्टेरॉनचा मानसिक परिणाम सर्वाधिक असतो. टेस्टेस्टेरॉन हे लैंगिक संप्रेरक (सेक्श्युअल हॉर्मोन) असल्यामुळे मुलांमध्ये साहजिकच लैंगिक आकर्षण निर्माण होते. टेस्टेस्टेरॉनची वाढ होते तसे लैंगिक आकर्षणही वाढू लागते. मुलींमधील एफएसएच आणि एनएच या संप्रेरकांमध्ये बदल होऊ लागतो. मुलींमधील ही लैंगिक संप्रेरके आहेत. त्यांच्यात शारीरिक बदलांसह मानसिक बदलही होतात. ही अवस्था पौगंडावस्थेतल्या सगळ्याच मुलांमध्ये असते. या संप्रेरकांमुळे मुलांमध्ये आलेली आक्रमकता त्यांच्या स्वभावातून, वेगवेगळे प्रयोग करण्यावरून दिसू लागते. नवीन काही तरी करून बघू या, ही वृत्ती या वयोगटातील मुलांमध्ये वाढू लागते आणि यामुळे या वयोगटातील मुले अमली पदार्थाच्या सेवनाच्या दिशेने जाऊ लागतात. या वयोगटात संप्रेरकांमध्ये बदल होत असल्यामुळे त्यांना एकमेकांविषयी आकर्षण वाटते. तसेच त्यांच्यामध्ये चिडचिड वाढणे, असुरक्षिततेची भावना निर्माण होणे असे बदलही दिसू लागतात. मुळातच पौगंडावस्थेतील मुलांमध्ये भावनिक आंदोलने खूप दिसतात. या भावनिक आंदोलनामधून व्यसनाकडे जाणे, जीवनातील विविध गोष्टींचा सामना करण्यासाठी अमली पदार्थाचा  आधार घेणे अशा गोष्टी घडतात.

नेमके याच वयात मुले अमली पदार्थाचे व्यसन करू लागले तर ते लंगिक संबंधांपर्यंतही जाऊ शकते. अमली पदार्थ आणि लंगिक संबंध हे सातत्याने होऊ लागले तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. मुले इंपोटंट म्हणजे नपुंसक होऊ शकतात, तर मुलींना शुष्क योनीचा त्रास होऊ शकतो. काही नव्या ड्रग्जमुळे लंगिक उत्तेजना प्राप्त होते. येत्या काळात फक्त ड्रग्ज घेण्याऱ्यांचे प्रमाण वाढणार नाही, तर एचआयव्हीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. असे ड्रग्ज घेतल्यावर लंगिक उत्तेजना प्राप्त झाल्यामुळे साहजिकच लंगिक संबंध ठेवले जातात. ड्रग्ज घेतल्यामुळे संबंध ठेवताना प्रोटेक्शन घेण्याचे सुचत नाही. तसेच असे संबंध वेगवेगळ्या लोकांबरोबर वारंवार होत असतात. त्यामुळे एचआयव्हीची शक्यताही दिसून येते. हा खूप मोठा धोका आहे, असे डॉ. र्मचट निदर्शनास आणून देतात.

शाळेत असताना विद्यार्थ्यांचा इतर अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क येत असतो. त्यामुळे शाळेत इतर मुले विशिष्ट गोष्ट करत असतील तर ते योग्यच आहे, अशी भावना त्यांच्यामध्ये तयार होते. इथे मित्रपरिवारांचा सहवास आणि दडपण (पीअर प्रेशर) या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. बहुतांशी मुले ही आता फक्त शाळेच्या वेळेत एकत्र नसतात, तर शिकवणी, शाळेतल्या इतर उपक्रमांसाठीही एकत्र असतात. म्हणजेच दिवसातले बरेच तास त्यांना एकमेकांचा सहवास मिळत असतो. त्यामुळे एखादा मित्र करत आलेल्या गोष्टीचे अनुकरण अगदी सहज केले जाते. तसेच अमली पदार्थाचे सेवन अनेक मुले करत असतील तर ते त्यांना योग्यच वाटते. अमली पदार्थाच्या विक्रीमध्ये पेडलर आणि ग्राहक या दोन घटकांमध्ये पुशर हाही असतो. हा पुशर शाळांमधल्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकण्याचे काम करत असतो. पुशर एका विद्यार्थ्यांला गाठतो. त्या विद्यार्थ्यांला पहिल्यांदा मोफत ड्रग दिले जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांला चटक लागली, की तो पुन्हा त्या पुशरकडे जातो. मग पुशर त्यासाठी पसे लागतील असे सांगतो. विद्यार्थी पसे आणून त्याला देतो. अशा प्रकारे पुशर त्या विद्यार्थ्यांला ड्रग्ज पुरवतो. तो विद्यार्थी त्याच्या आणखी काही मित्रांना ड्रग्जच्या मार्गी लावतो. मग त्या पुशरकडे आणखी गिऱ्हाईके येतात. पुशर त्या विद्यार्थाच्याच पशांनी स्वत:साठीही ड्रग्ज विकत घेतो. अशा प्रकारे पेडलरला त्याचे पसे मिळतात, पुशरला मोफत ड्रग्ज मिळतात; पण यात नुकसान होते ते विद्यार्थ्यांचे. या विद्यार्थ्यांच्या टोळीतलाच एखादा विद्यार्थी नंतर हळूहळू पुशर म्हणूनही काम करायला लागतो. मग तोही सगळे असेच करतो. मग पुढे त्यापकी आणखी एखादा पुशर होतो. ही साखळी मोठी होत जाते. हेच खूप धोकादायक आहे.

मेफ्रेडॉनमुळे झोप लागत नसल्यामुळे याची विक्री परीक्षांच्या काळातही मोठय़ा प्रमाणावर होते. मुले वर्षभर अभ्यास करत नाहीत. परीक्षेच्या दिवसांमध्ये मात्र रात्रभर जागत असतात. अशा वेळी ‘मेफ्रेडॉन हा अमली पदार्थ घेतल्यामुळे तुला जागरणाचा त्रास होणार नाही,’ असे सांगून त्याची विक्री केली जाते. मेफ्रेडॉन घेतलेल्या मुलाला अभ्यास केल्याचे फक्त मानसिक समाधान मिळते. वास्तविक त्याच्यासमोर पुस्तक असूनही त्याच्या डोक्यात काहीही शिरलेले नसते, अशी माहिती निवृत्त पोलीस अधिकारी देतात.

गरीब वस्ती, झोपडपट्टय़ांमधल्या मुलांमध्ये मेफ्रेडॉन घेण्याइतपत पसे नसले तरी त्यांच्यातही इतर काही गोष्टींचे व्यसन आहे. व्हाइटनर, नेलपेंट रिमुव्हर, पेट्रोल, डिझेलचा वास यांचं व्यसन त्यांना आहे. िभतीवरची पाल मारून ती जाळून त्याचा धूर हुंगण्याचे नवे व्यसन सध्या या झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये आढळून येतेय.

३३ वर्षांपासून अमली पदार्थविरोधात काम करणारे ड्रग अब्युस इनफॉम्रेशन रिहॅबिलिटेशन अ‍ॅण्ड रीसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. युसुफ र्मचट याबद्दल सांगतात, ‘‘आमच्या केंद्रात चार-पाच वर्षांपासून टीन एज मुले म्हणजे १२ ते १८ वयोगटातील काही मुले दाखल होत आहेत. केंद्रात ३० जणांची जागा असते. त्यापकी ३० टक्के रुग्ण पौगंडावस्थेच्या वयोगटातील आहेत. हा बदल मुख्यत्वेकरून अमली पदार्थामध्ये झालेल्या बदलांमुळेच आहे. सुरुवातीला स्मोकिंग करता आले पाहिजे तरच ड्रग्ज घेऊ शकता असे होते; पण आता एक चिमूट हुंगूनही नशा येते. हे या वयोगटातल्या मुलांचे अमली पदार्थाचे सेवन करण्याचे मुख्य कारण आहे.’’

अमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीवर पोलिसांचे बारीक लक्ष असते. याआधीही यासंदर्भातील अनेक घटनांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तरुण पिढी अमली पदार्थाच्या जाळ्यात कशी अडकत जाते याची संपूर्ण माहिती त्यांना असते. त्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असतात. तरुण पिढीतल्या अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेबद्दल ते नेहमीच व्यक्त होतात; पण पौगंडावस्थेतील मुलांच्या अमली पदार्थाच्या व्यसनाबाबत त्यांचे वेगळे म्हणणे आहे. या वयोगटातील मुलांकडे त्यांच्या पालकांचे व्यवस्थित लक्ष असते. त्यांची मुले कुठे जातात, काय करतात, कोणासोबत असतात याबद्दल पालकांना संपूर्ण माहिती असते. या वयोगटातील मुलांच्या अमली पदार्थाच्या सेवनाच्या घटनांची नोंद झालेली नाही. अशा प्रकारच्या घटनांची नोंद झाल्यावर पोलीस नेहमीच त्यावर तातडीने कारवाई करतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पौगंडावस्थेतील मुलं आणि अमली पदार्थ याबाबत पुर्नवसन केंद्रातील चित्र आणि पोलिसांच्या यासंदर्भातील नोंदी यामधील ही तफावतच याबाबत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

महाराष्ट्रात फक्त महानगरातच या घटना घडतात असे नाही, तर उर्वरित ठिकाणीही असे प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे. नागपूरच्या उच्चभ्रू शाळांमधील मुलांमध्ये इलेक्ट्रॉनिक पाइप आणि व्हाइटनर यांचा वापर जास्त होताना दिसतोय. वर्षभरापूर्वी नागपूरमध्ये एक घटना घडली होती. एका अतिश्रीमंत शाळेतल्या नववीत शिकणाऱ्या ६-७ मुलांना शाळेच्या बाथरूममध्ये इलेक्ट्रॉनिक पाइपने नशा करताना पकडले होते. या घटनेनंतर या मुलांवर कारवाई करण्यात आली होती. नागपुरात खर्रा तयार केला जातो. शाळेतल्या मुलांमध्ये सध्या खर्राचा ट्रेण्ड काही प्रमाणात दिसून येतोय. खर्रा, दारू, सिगरेट ओढणारी मुले तिथल्या झोपडपट्टीमध्ये राहणारी मुले असतात. अशा प्रकारच्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलांमध्ये चोरी करण्याचे प्रकारही आढळून येत आहेत. नाशिकमध्ये झोपडपट्टी आणि रेल्वे स्थानके येथे राहत असलेली मुले व्यसनाधीन होत आहेत. रेल्वे स्थानकावरील मुलांमध्ये व्हाइटनरची नशा करण्याचे प्रमाण जास्त आहे, तर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांमध्ये सिगरेट, गुटखा खाण्याचे प्रमाण वाढतेय. रेल्वे स्थानकावरील मुलांचे शिक्षण नसते, काम नसते, त्यांचे कुटुंबही नीट नसते. अशा मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, अशी माहिती नाशिकच्या चाइल्ड लाइन संस्थेच्या शहर समन्वयक प्रणिता तपकिरे किशोरवयीनांच्या अमली पदार्थाच्या सेवनाबद्दल देतात. कोल्हापुरात मात्र हे प्रमाण अगदी नगण्य म्हणावे इतके आहे. एखाद दुसरा विद्यार्थी असा सापडलाच तर तो शिक्षणासाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये गेलेला असताना तिथे त्याला त्याचे व्यसन लागल्याचे दिसून आले आहे. कोल्हापुरात हुक्का पार्लरच्या केसेस अलीकडे घडल्या होत्या; पण आता तेही नसल्याचे आढळून आले आहे.

सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहून शिक्षण घेण्याचे प्रमाणही वाढलेय. महाराष्ट्रात मुंबई-पुणे या शहरांत अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच पुणे आता आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे पुण्यात अमली पदार्थाच्या संदर्भातील घटनांचे प्रमाण वाढतेय. पुण्यात राहणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्यांमध्ये गांजाचे प्रचंड व्यसन आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि कर्नाटकाहून गांजाचा पुरवठा केला जातो आणि तो पुण्यातील झोपडपट्टय़ांमध्ये पुरवला जातो. गांजाची एक छोटी पुडी १०० रुपयाला विकली जाते. गांजा तुलनेने अतिशय स्वस्त मिळत असल्याने ते सेवन करण्याचे प्रमाण खूप आहे. गेल्या आठवडय़ात एका उच्चभ्रू कुटुंबातील १९-२० वर्षांच्या मुलाला पुण्यातील रेसकोर्स भागात ४० हजार किमतीच्या मेफ्रेडॉनसह पकडण्यात आले. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने हे मेफ्रेडॉन आणल्याचे त्याने कबूल केले. विमान नगर येथील एका आयएफएस अधिकाऱ्याच्या २०-२२ वर्षीय मुलाकडून मेफ्रेडॉन जप्त करण्यात आले. महिन्याभरापूर्वी आणखी एक घटना घडली. मुंबईत मीरा रोड येथे अनधिकृतरीत्या राहणारा एक नायझेरिअन मुलगा गेल्या वर्षभरापासून पुण्यात राहत होता. कोरेगाव पार्क आणि कोंडवा या दोन भागांमध्ये तो अमली पदार्थाचा व्यवसाय करत होता. कोकेन आणि ब्राऊन शुगर या अमली पदार्थासह त्याला महिन्याभरापूर्वी पकडण्यात आले. अमली पदार्थ आणि नायजेरिअन लोक हे दोन्ही एकमेकांशी जोडले गेले आहेत. मुंबईत पडघा, मीरा रोड, नालासोपारा, नवी मुंबई या परिसरांमध्ये अनेक नायजेरिअन लोक अनधिकृतरीत्या आजही राहत आहेत. पुण्यातील या महत्त्वपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा नायजेरिअनांचे भारतातले वास्तव्य यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुण्यात पकडल्या गेलेल्या त्या नायजेरिअनने एका हिंदी सिनेमात स्टंटमॅन म्हणून काम केल्याची माहितीही मिळाली. पुणे-बंगळुरू महामार्गावर एका साधारण ४० वर्षीय व्यापाऱ्याला पकडण्यात आले. हा व्यापारी मूळचा सुरत येथील होता. त्याची चौकशी केल्यावर लक्षात आले की, तो टाइल्सचा व्यवसाय करत होता. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे ते भरून काढण्यासाठी त्याने मुंबईहून मेफ्रेडॉन आणले होते. ५५ लाखांचे मेफ्रेडॉन त्याच्याकडून जप्त करण्यात आले. हा व्यापारी पौगंडावस्था किंवा तरुण वयोगटात येत नसला तरी त्याचे लक्ष्य या वयोगटाकडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण स्वस्त असल्यामुळे मेफ्रेडॉनची विक्री शाळा-कॉलेजांमधील मुलांमध्ये सहज होऊ शकते. पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी हेरॉइन आणि कोकेन यांचे प्रमाण खूप होते. आता गांजा आणि मेफ्रेडॉन स्वस्त असल्यामुळे त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

शिक्षणसंबंधी संस्थांच्या परिसरात तंबाखू, सिगरेट अशा पदार्थाची दुकाने नसावीत, असा नियम आहे; पण तो किती प्रमाणात पाळला जातो, हे बघणे गरजेचे आहे. जर तो पाळला जात असेल तर शाळेच्या परिसरात अशा पदार्थाचे विक्रेते कुठून येतात, याची तपासणी करणे आवश्यक आहे. अमली पदार्थाचा पुरवठा कमी करणे हे सरकार आणि पोलीस यंत्रणांचे काम आहे; पण ‘मागणी तसा पुरवठा’ या नियमानुसार अमली पदार्थाचा पुरवठा थांबवायचा असेल तर त्याआधी त्याची मागणी बंद व्हायला हवी. ही मागणी कमी करणे किंवा थांबवणे हे पौगंडावस्थेतील मुले, तरुण पिढी यांच्या हातात आहे आणि त्यासाठी त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचा सहभाग असणे खूप आवश्यक आहे. आता बरेच पालक आपल्या पाल्याला स्पेस देतात. ‘आम्ही त्याला त्याची स्पेस देतो’ असे थाटात मिरवलेही जाते; पण तो त्या स्पेसमध्ये नेमके काय करतोय हे तपासताना काही पालक मागे पडतात.

मागणीच कमी झाली तर पुरवठा होणारच नाही. अमली पदार्थाचा एखादा माल पकडला, की तो पुन्हा तयार केला जाणारच. पुरवठय़ावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही.

अमली पदार्थाचा वापर करून लंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा अमली पदार्थापकी एक्स्टसी हे एक आहे. एक्स्टसी या ड्रगमुळे लंगिक उत्तेजना प्राप्त होते. या ड्रगचे सेवन केल्यानंतर त्या मुलीला त्या वेळी शारीरिक संबंधांची गरज निर्माण होते. रेव्ह पाटर्य़ामध्ये या ड्रगचे प्रमाण जास्त असते. या ड्रगचा अंमल उतरल्यानंतर त्या मुलीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची जाणीव होती. मध्यंतरी मुंबईच्या एका नामांकित रुग्णालयात या संदर्भातल्या दोन विचित्र घटनांशी संबंधित रुग्ण दाखल झाले होते. काही तरुण मुली पार्टी करत होत्या. त्यांनीही हे ड्रग घेतले होते. दुसऱ्या दिवशी त्यातल्या एका मुलीवर अत्याचार झाल्याचे कळल्यावर ती आधी दवाखान्यात आली होती. तेव्हा आणखी एक धक्कादायक सत्य तिच्या समोर आले होते. या ड्रगच्या सेवनाने निर्माण झालेल्या लंगिक उत्तेजनामुळे तिच्यासोबत अतिशय विचित्र प्रकार घडला होता. अशीच एक दुसरी घटना. आíथक परिस्थिती साधारण असलेले एक जोडपे. त्यातल्या नवऱ्याने बायकोला लंगिक संबंध ठेवताना इंटरनेटवरील एक क्लिप दाखवून अमुक एक प्रयोग करून बघू या असे सांगितले. त्यांनी तसे केलेही; पण त्याचे परिणाम नंतर त्या स्त्रीला भोगावे लागले. तिच्या नवऱ्याने तिला रुग्णालयात दाखल केले आणि तो पसार झाला. ती दगावली. नंतर चौकशी  केल्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन होते हे सत्य उघडकीस आले. त्यामुळेच तो अनेक अघोरी प्रकार बायकोकडून करून घ्यायचा, अशीही माहिती नंतर समोर आली होती. या दोन्ही उदाहरणांमधल्या व्यक्ती पौगंडावस्थेतील नसल्या तरी इथवर पोहोचायची सुरुवात आधीपासून म्हणजे बऱ्याचदा पौगंडावस्थेपासून होत असते. शिवाय आताची पिढी तंत्रज्ञानाच्या वापरात अतिशय वाक्बगार आहेत. तंत्रज्ञानात सतत येणाऱ्या नवनवीन गोष्टी ही पिढी लगेच आत्मसात करते. त्यामुळे काय बघायचे आणि किती बघायचे ही प्रगल्भता त्यांच्यात त्या वयात नसली तरी कसे बघायचे, कुठे बघायचे हे मात्र त्यांना सगळे ठाऊक असते. त्यामुळे त्यांना आताच रोखले तरच अशा गोष्टींपासून ते लांब राहतील.

तुमचा मुलगा शाळा-कॉलेजमधल्या विविध कार्यक्रमांमध्ये असल्याचे कौतुक करत असतानाच त्याच्या राहणीमानाकडे, मानसिक अवस्थेकडे आणि स्वभावबदलांकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०१६च्या अहवालानुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये २३५.८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. तसंच महाराष्ट्राची पुढची पिढी ही आतापासूनच अमली पदार्थाच्या विळख्यात अडकत जातेय, हे चित्र समोर आहे. तसेच अमली पदार्थाच्या मागे धावणारी ही पिढी ज्या कारणांमुळे त्याकडे वळतेय हेदेखील लक्षात घ्यायला हवं. त्याशिवाय त्याचे दिसून येणारे धक्कादायक परिणाम या पिढीचे संपूर्ण आयुष्य बिघडवेल, ही चिंताजनक बाब विचार करायला लावणारी आहे.

मेफ्रेडॉन म्हणजे म्याँव म्याँवचं जाळं पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्यात वेगाने पसरत आहे. अमली पदार्थामुळे या वयोगटातील मुलांना क्षणिक सुख मिळत असलं तरी त्याचा कालांतराने होणाऱ्या परिणामाकडे मात्र हीच पिढी दुर्लक्ष करताना दिसतेय. अमली पदार्थाचं सेवन करत सेलिब्रेशन करण्याच्या धुंदीची झापड त्यांच्या डोळ्यांपुढे आहे. पण ती जेव्हा त्रासदायक ठरू लागेल तेव्हा याच म्याँव म्याँवचा ओरखडा पौगंडावस्थेतील मुलांना किती वेदना देणारा आहे, हे लक्षात येईल.

(या लेखामध्ये पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या शहरांतील माहितीसाठी अनुक्रमे राहुल खळदकर, मंगेश राऊत आणि दयानंद लिपारे यांनी दिलेल्या नोंदी महत्त्वाच्या ठरल्या.)

मुलींची पसंती :

अमली पदार्थाचे सेवन करण्यामध्ये अलीकडे मुलींचे प्रमाणही वाढतेय; पण साधारणपणे त्या स्मोक करणारे अमली पदार्थ घेत  नाहीत. मेफ्रेडॉन, क्रिस्टल मेथ, कोकेन हे अमली पदार्थ मुलींच्या यादीत सर्वाधिक आढळून येतात. अमली पदार्थाना दिलेल्या ग्लॅमरस नावांमुळेही मुली त्याकडे आकर्षल्यिा जातात. ‘‘पूर्वी हेरॉइन घेणाऱ्या ३०-४० जणांमध्ये एक मुलगी, कोकेन घेणाऱ्या पाच जणांमध्ये एक मुलगी असे चित्र होते; पण आता म्यावम्याव म्हणजे मेफ्रेडॉन, क्रिस्टल मेथ घेणाऱ्या तीन जणांमध्ये एक मुलगी असे प्रमाण आहे. पौगंडावस्थेतील अमली पदार्थाच्या अधीन गेलेल्या ७५ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आलेय की, त्यांना वडिलांचा सहवास लाभत नाही. म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय किंवा घटस्फोट झालाय किंवा ते नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाहीयेत. ज्या विद्यार्थ्यांला पॉकेटमनी म्हणून प्रत्येक दिवशी ५० रुपये मिळतात तो या अमली पदार्थाच्या चक्रात नक्कीच अडकणार,’’ अशी भीतीही डॉ. र्मचट व्यक्त करतात.

पार्टीत जाताय?

या पिढीचे मित्रांचे वर्तुळ मोठे असते. कुठे कोणती पार्टी आहे, तिथे काय असणार आहे, कोणते ड्रग्ज उपलब्ध असतील या  सगळ्याची माहिती त्यांना मिळत असते. शिवाय इंटरनेटवरूनही ही माहिती मिळत असतेच. काही जण अशा पार्टीना फक्त म्युझिकसाठी जात असतात. मग सहज कोणी तरी सिगरेट पास करते. त्या व्यक्तीला त्यात काय आहे हे माहीतही नसते. दुसऱ्याने पास केल्यामुळे ती ओढली जाते. म्युझिकच्या नादात त्यात काय आहे हे लक्षातही येत नाही; पण नंतर जेव्हा अशा पार्टीमधल्या लोकांना पकडले जाते, चाचणी केली जाते तेव्हा त्या सिगरेटमध्ये ड्रग्ज असल्याचे आढळून येते. हे कळेस्तोवर ते ड्रग्ज त्या व्यक्तीच्याही रक्तात मिसळलेले असते. असेच एखाद्या िड्रक्सबद्दलही होते. सहज कोणी तरी एखादा घोट घ्यायला सांगते. फक्त म्युझिकसाठी आलेली व्यक्ती एकच घोट घ्यायचा म्हणून आढेवेढे घेत नाही; पण त्या िड्रकमध्ये नेमकेकाय आहे याची शहानिशा केली जात नसल्यामुळे त्याची लागण अमली पदार्थ सेवन न करणाऱ्या व्यक्तीलाही लागते. ड्रग्ज आणि संगीत हे एकमेकांशी जोडले गेले आहे, असे म्हणतात. ड्रग्ज घेतल्यानंतर म्युझिक अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येते असा समज आहे. ईडीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक आणि ट्रान्स म्युझिक हे म्युझिक ड्रग्ज घेतल्याशिवाय आनंदाने  अनुभवताच येणार नाहीत, असाच समज या वयोगटातील मुलांमध्ये पसरलेला आहे. रेव्ह पाटर्य़ामध्ये याचे प्रमाण जास्त असते.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून…

05-lp-shilpaपौगंडावस्थेतील मुलांच्या अमली पदार्थाचे सेवन करण्यामागे तीन प्रमुख कारणे असतात. जैविक, मानसिक आणि सामाजिक. या तीन कारणांमध्ये पुन्हा उपकारणे आहेत. जैविक कारणामध्ये आनुवंशिक, शरीरातील रसायनांची कमतरता, प्लेजर  हॉर्मोन्सची कमतरता ही कारणे आहेत, तर मानसिक कारणांमध्ये स्वभावदोष, चंचलता, तापट वृत्ती, मनाविरुद्ध काही सहन न होणारी वृत्ती अशा अनेक बाबींचा समावेश होतो, तर अभ्यास, काम, नातेसंबंध यांमधल्या तणावाचा सामना करण्यासाठी काही मुले अमली पदार्थाचा मार्ग स्वीकारतात. काहींना मुळातच एखादा मानसिक आजार असू शकतो. अमली पदार्थाची असलेली उपलब्धता हे एक महत्त्वाचे सामाजिक कारण आहे. काही अमली पदार्थ समाज आणि संस्कृतिमान्य आहेत. त्यामुळे ते घेतल्याने काही होत नाही, असा समज रूढ झाला आहे; पण तंबाखू, विडी, गुटखा, मावा, सिगरेट हे सगळे गेटवे ड्रग्ज आहेत. म्हणजे अमली पदार्थाच्या दुनियेत शिरतानाची ही सुरुवात असते. सामाजिक कारणांमध्ये प्रसारमाध्यम महत्त्वाचे ठरते. त्यामध्ये जाहिराती, सिनेमे यांना अनेकदा फॉलो केले जाते. त्यात दाखवल्या जाणाऱ्या काही चुकीच्या गोष्टींचे अनुकरण केले जाते. उच्च वर्गातल्या लोकांसारखे बनायचे असेल तर अमली पदार्थाचे सेवन करावेच लागते हा आणखी एक चुकीचा समज मुलांमध्ये रूढ होताना दिसतो. कुतूहल आणि उत्सुकतेपोटी अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे पौगंडावस्थेतील मुलांमध्ये मानसिक आणि शारीरिक आजार मोठय़ा प्रमाणावर पसरू लागले आहेत. तोंडाचे विकार, भूक कमी लागणे, झोप न येणे, वजन कमी होणे, फुप्फुसाचे आजार, अ‍ॅसिडिटी, कावीळ, लिव्हर खराब होणे असे अनेक आजार उद्भवतात. अमली पदार्थाचा परिणाम थेट मेंदूवर होतो. चरस, गांजा घेतल्यामुळे स्क्रिझोफ्रेनियासारखी लक्षणे आढळून येतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या पदार्थामुळे झोप लागत नाही; पण सकाळी शाळेत जाताना नेमकी झोप येते. त्याचा अभ्यासावर परिणाम होतो. अमली पदार्थाचे सेवन सिल्वर फॉइलने केल्याने ते थेट फुप्फुसात जाते आणि त्यामुळे टीबीसारखे आजार होऊ शकतात. काही पदार्थ इंजेक्शनमार्फत सेवन केले जातात. त्यामुळे नस फाटून रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होऊ शकते. त्याचा परिणाम हृदयावर होतो. कफ सिरपमध्ये कोडीन आणि काही प्रमाणात अल्कोहोलही असते. कफ सिरपच्या सततच्या सेवनामुळे पोटाचे आजारही होतात. कोडीन मिळेनासे झाले की, त्याचा त्रास जाणवू लागतो. हातपाय दुखणे, नाका-डोळ्यांतून पाणी येणे, अतिसार, अंग दुखणे असे प्रकार होतात. त्या क्षणी त्यांना कोडीन मिळाले नाही तर ते मरून जातील, असे त्यांना वाटू लागते. म्हणून ते मिळवण्यासाठी ते चोऱ्यासुद्धा करायला लागतात. तो मुलगा किंवा मुलगी घरच्यांपासून मनाने लांब जाते. शाळेतल्या ग्रुपमध्ये पसे असणारा एक जण असतो. तो इतरांना हे अमली पदार्थ फुकटातही देतो. या सगळ्यामुळे तो घरच्यांशी खोटे बोलू लागतो आणि पर्यायाने तो कुटुंबीयांपासून दूर जातो. पूर्वी व्यसनाधीन गट साधारण २०-२५ वर्षांपासून सुरू व्हायचा. आता मात्र १५ ते २० वयोगटातील मुलेही उपचारांसाठी येऊ लागली आहेत. एखाद्या रुग्णावर उपचार करताना त्याची पाश्र्वभूमी समजून घ्यावी लागते. त्यांच्या सुधारण्याच्या होण्याच्या इच्छेवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. एखाद्याची इच्छा नसली तरी ती आणण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत असतो. औषधोपचार, स्वास्थ्य, योगा, कुटुंबाशी चर्चा, शाळा-कॉलेज-ऑफिस या ठिकाणच्या सहकाऱ्यांशी बोलणे अशा अनेक बाबी उपचारांमध्ये आवश्यकतेनुसार केल्या जातात. रुग्ण एखाद्या कामात गुंततोय, घरच्यांसोबत त्याचे संबंध सुधारले आहेत, चांगल्या मित्रपरिवाराशी जोडला गेलाय असे लक्षात आले की, त्याच्या उपचारांमध्ये बदल केले जातात.
– डॉ. शिल्पा अडारकर
सहयोगी प्राध्यापिका, मनोविकृतीशास्त्र विभाग आणि व्यसनमुक्ती केंद्र, केईएम रुग्णालय

पौगंडावस्थेत अमली पदार्थ घेतल्याचे गंभीर परिणाम :

  • पौगंडावस्थेत अमली पदार्थाचे सेवन केल्यास मुले नपुंसक (इंपोटंट) होण्याची शक्यता जास्त असते. या पदार्थाच्या  सेवनामुळे त्यांच्यातली लंगिक संबंध ठेवण्याची क्षमता, सामथ्र्य खूप कमी होते.
  • मुलींना शुष्क योनीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे लंगिक उत्तेजना प्राप्त होते. अमली पदार्थाच्या नशेत लंगिक संबंध ठेवताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. त्यामुळे एचआयव्ही रुग्णांची संख्याही वाढू शकते.
  • लंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत जाईल.
  • अमली पदार्थ विकत घेण्यासाठी या वयोगटातील मुले प्रसंगी चोऱ्याही करू लागली आहेत. त्यामुळे बालगुन्हेगारीचे प्रमाणही  वाढतेय.
    चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
    @chaijoshi11