News Flash

ब्लू व्हेलनंतर मेटल म्युझिकचा घाला

मेटल म्युझिकने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

सुसंवादाच्या प्राणप्रतिष्ठेला पर्याय नाही
ब्लू व्हेल चॅलेंज स्वीकारून मृत्यूला कवटाळणाऱ्या मुलांचं धक्कादायक वास्तव ताजं असताना मेटल म्युझिकने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आपल्या तरुण पिढीचं हे काय चाललं आहे?

‘ब्लू  व्हेल’ हा शब्द एव्हाना बहुतांश भारतीयांना माहीत झाला आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातच ब्लू व्हेलवरील बंदी आणण्याचा थेट उल्लेख केल्यामुळे हा शब्द पसरायला वेळ लागला नाही. तोपर्यंत हे काय आहे हे माहीत नसलेल्यांनीदेखील उत्सुकतेपोटी त्याचा शोध घेतला असेल. ब्लू व्हेलच्या चर्चेत सध्या आपण इतके बुडालो आहोत, की त्याच जोडीने मेटल म्युझिक या संकल्पनेनेदेखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे याची फारशी जाणीव आपल्याला नाही. प्रचंड गोंगाट असलेले हे संगीत ऐकून एक तरुण मुलगा आत्महत्येला प्रवृत्त झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुदैवाने त्या मुलाने पुढे कसलेही पाऊल उचलण्यापूर्वीच पालकांना या गोष्टीची जाणीव झाल्याने हे प्रकरण तेथेच थांबले आणि त्या संबंधित मुलाचा जीव वाचला. पण त्यानिमित्ताने ८०-९० च्या दशकानंतर मेटल म्युझिकने पुन्हा एकदा आपल्यावर घाला घालायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न पडतो.

ब्लू व्हेल असो की मेटल म्युझिक इंटरनेट आणि समाजमाध्यमांतून याचा प्रसार होत असतो. विकृत मनोवृत्तीने कमकुवत मनाच्या व्यक्तींचा घेतलेला ताबा अशी त्याची मांडणी करता येईल. लोकांना अथवा एखाद्या समुदायाला स्वत:च्या विचाराने प्रभावित करायचे आणि त्यानंतर त्यांच्याकडून हवे ते काम करवून घ्यायचे. योग्य वेळी योग्य ते सावज टिपायचे, त्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करायचा, अशी सरळ थेट रचना यामध्ये दिसते. खरं पाहिलं तर अशी रचना आपल्याकडे अगदी बुवा-बाबांच्या बाबतीतदेखील  दिसते. आपल्या प्रभावाखाली एखादा समुदाय आणायचा आणि मग त्याद्वारे आपल्याला हवे ते करवून घ्यायचे. अशा बुवाबाजीमध्ये स्वत:चा फायदा (भौतिक, शारीरिक अशा सर्वच अंगाने) हे सूत्र असते. तर ब्लू व्हेलसारख्या माध्यमातून जोर असतो तो मुख्यत: विकृतीवर. पण मूळ मुद्दा तोच. मग तो ब्लू व्हेल असो शिफू सन-क्रीतीच्या नावाखाली होणारा प्रकार असो की मेटल म्यूझिक असो. अर्थात असे काही घडले की धावाधाव होते. त्यावर उपाय शोधले जातात. पण मुळात हे असे का झाले याच्या कारणमीमांसेपर्यंत तुलनेने कमी लोक जातात.

इंटरनेटच्या आगमनानंतर आजवर ज्या गोष्टी सहजसाध्य नव्हत्या त्या अगदी एका क्लिक्वर उपलब्ध होऊ लागल्या. तंत्रज्ञानाच्या न आवरणाऱ्या वेगाने जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती तर मिळालीच, पण त्यातच ओल्याबरोबर सुकेपण जळते या न्यायाने नको असलेल्या काही गोष्टीदेखील आपल्या पदरात पडू लागल्या. मोबाइलचे फायदे-तोटे यावर जगाच्या अंतापर्यंत चर्चा सुरू राहील. पण जेव्हा ब्लू व्हेल, मेटल म्युझिक, शिफू असे प्रकार वाढू लागतात तेव्हा समाजमनात डोकावणे गरजेचे असते.

मेटल म्युझिक हे काही नवीन नाही. हा संगीत प्रकार ६० च्या दशकात ब्रिटनमध्ये स्थिरावू लागला. पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक आशुतोष जावडेकर त्यांच्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकात मेटल म्युझिकची अगदी सविस्तर चिकित्सा करतात. त्यामध्ये ते लिहितात, ‘मेटल’ किंवा ‘हेवी मेटल’ पद्य असतंच मुळी पुष्कळदा मृत्यूविषयी भाष्य करणारं. मेटलमधलं मरण असतं साधंसुधं, बिनबुडाचं आणि म्हणूनच फसवं, घातक, धोकादायक. कोवळ्या वयातल्या टिपकागदासारखी मनं असलेल्या कुमारांसाठी तर नक्कीच. मेटलमधला मृत्यू जसा अनासक्तीचा, तसं प्रेम आणि प्रणयही निर्मोही, केवळ शारीरिक गाभ्यापुरता निर्मिलेला असा. पुष्कळदा मेटल काव्यामध्ये राजकीय विचारही असतात. पण क्रांतीची, परिवर्तनाची भाषा क्वचित असते. या जंजाळातून सुटण्याचा मार्ग हा भीषण हिंसेचा अथवा आणि आत्मघाताचा असावा असं मेटल संगीताला वाटतं का हा प्रश्न पडतो. पुष्कळ ऐकल्यावर तो हाच मुद्दा असावा असे वाटते.

एकंदरीतच ब्लू व्हेल, मेटल, शिफू या बाबतीत घडलेल्या घटना प्रामुख्याने तरुणवर्गात दिसून आल्या आहेत. त्यामुळेच या तरुणवर्गात नेमके हे बदल कसे होत आहेत हे जाणून घेताना राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे प्राध्यापक अतिशय मार्मिक मुद्दे मांडताना दिसतात. कोकणातील पाली येथील पालीवाला महाविद्यालयाचे उप-प्राचार्य सुधीर पुराणिक सांगतात, ‘‘एकूणच समाजमाध्यमांवरील वावरामुळे हल्लीची मुलं शीघ्रकोपी होताना दिसत आहेत. भावनांना आवर घालणे, संयम हे प्रकार कमी होताना दिसतात. त्यातूनच या मुलांशी एकूणच सर्वाचा संवाद कमी होत चालला आहे निश्चित. मुलं आभासी जगात वावरताना दिसतात. अतिभावूकता त्यातून वाढताना दिसते. समाजमाध्यमांवरील लाइक्स आणि कमेंट्स हे लोकप्रियतेचे लक्षण त्यातून ठरताना दिसते. मात्र हे मुलांमध्येच नाही तर ज्येष्ठांमध्येदेखील दिसून येते. त्यातूनच हळू हळू का होईना पण आपण या माध्यमांच्या आभासी जगाच्या अधीन होताना दिसत आहोत. अर्थात ग्रामीण भागात इंटरनेट आदी सुविधांसाठी तुलनेने पैसेच हातात कमी असल्यामुळे ही प्रक्रिया हळू हळू होताना दिसते.’’

याच अनुषंगाने चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सचिन वझलवार सांगतात, ‘‘मुलांमध्ये होणारे बदल पालकांना कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आज मुलांचा प्रवास हा वास्तविकतेकडून आभासी जगाकडे होताना दिसत आहे. इंटरनेटचा वापर करून कल्पनाशक्तीला चालना मिळेल अशा सकारात्मकतेने आपण त्याकडे सुरुवातीला पाहिले. पण याच जगातील गेम या प्रकाराने मुलांच्या कल्पनाशक्तीचा ताबा घेतला आहे. त्यामुळे अशा मुलांना जेव्हा एखादी प्रायोगिक गोष्ट करायला सांगितली की तो गडबडतो. तेच जीवनातील आव्हानांबाबत घडताना दिसते. प्रयोग करण्याचे मानसिक बळ तो हरवून बसलाय की काय अशी परिस्थिती त्यातून दिसून येते. त्यातच प्रत्येक गोष्ट ही क्षणिक आनंदाशी जोडली जात आहे. हे क्षणिक आनंदाचे उदाहरण कोणत्याही व्यसनाबाबतीत लागू पडते. दारू, तंबाखू, सिगारेट अशी व्यसनं करताना त्याला समाजातून बोलणी ऐकावी लागतात. पण या आभासी जगात तो काय करतोय हेच अनेक वेळा माहीत नसते. त्यामुळे गेम अथवा समाजमाध्यमांवरील त्याचे हे जगणे व्यसनाधिनतेच्या जवळ जाणारे म्हणता येईल.’’

याचसंदर्भातील एक महत्त्वाचा पैलू  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक दासू वैद्य मांडतात. ते सांगतात, ‘‘मुख्यत: फुकट इंटरनेट देणाऱ्या सेवांच्यामुळे विशेषत: वसतिगृहातील अनेक मुलं रात्री उशिरापर्यंत केवळ त्यावरच काही ना काही तरी करण्यात मग्न असतात. परिणामी जागरण, जोडीला आहारातील कमतरता यामुळे हे विद्यार्थी अ‍ॅडिक्ट असल्यासारखे दिसतात. किंवा खंडित व्यक्तिमत्त्व असेही म्हणता येईल. या आभासी विश्वातील गतीची अपेक्षा ते वास्तविक जगात करतात. त्यामुळे त्यांच्यामधला संयम संपत चालला आहे. ब्लू व्हेल हे केवळ एक निमित्त आहे. त्यासाठीची केवळ उपकरणंच नाही तर मानसिक तयारीदेखील आपल्याकडे झालेली आहे. बिघडण्याची प्रक्रिया ही संधी मिळण्यावर असते, हेच या ठिकाणी नमूद करावे लागेल.’’

राज्यातील या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रतिक्रिया म्हटल्या तर प्रातिनिधिक आहेत. पण त्यातून उमटणारा सूर मात्र एकच असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांत हे सारे बदल ज्या वेगाने होत आहेत, ते पाहता या सर्वाकडे मानसोपचारतज्ज्ञ काय अंगाने पाहतात हे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख, प्राध्यापिका डॉ. अनुराधा सोवनी सांगतात, ‘‘नवनवीन सुखसोयी रोज उपलब्ध होत आहेत, तसेच नवनवीन धोकेदेखील आपल्यासमोर, आपल्या मुलांसमोर उभे राहत आहेत. बदलत्या विश्वातील सुविधांचा उपभोग घेताना या धोक्यांविषयीदेखील सतर्क राहणे गरजेचे आहे. नवीन संपर्कमाध्यमांमुळे जसजसे आपण जवळ आलो, तसे दूरदेखील गेलो. ते तंत्रज्ञान आत्मसात करायची आपली इच्छा नसली, तरी संभाव्य धोके समजून घेणे मात्र अत्यावश्यक आहे. आपला तरुण मुलगा-मुलगी कोणत्या नवीन आकर्षणाच्या आहारी जात आहे हे वेळीच समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामागचे तंत्रज्ञान अवगत नसले तरी आपण लक्षपूर्वक चिन्हे शोधत असू तर त्याचे आपल्या मुलांवर होणारे परिणाम नक्कीच दिसतात. मुलं स्वाभाविकपणे कोणत्याही खेळांकडे आकर्षित होत असतात, तशी ऑनलाइन गेमकडेदेखील कुतूहलाने खेचली जातात. हे गेम्स अधिक आकर्षित करणे हेच त्या गेम डेव्हलपरचे मुख्य काम असते. आपल्यासाठी हे तांत्रिक जग ‘व्हच्र्युअल वर्ल्ड’ कितीही नवखे असले तरी तरुण मुलामुलींना ते जन्मत:च सुपरिचित असते. त्यात त्यांना काहीच आगळेवेगळे वाटत नाही. त्या निराळ्या जगात वावरत असताना समोरून येणारी आव्हाने आपली मुले अट्टहासाने झेलू पाहतात. हळूहळू तेच जग खरे भासू लागते. स्पर्धेत एकदा उडी टाकल्यावर पाऊल मागे घेववत नाही. इतर समवयस्कदेखील तितक्याच हिरिरीने भाग घेत आहेत असे दिसते. निदान तसे भासवले जाते. माघार घेणे कमीपणाचे वाटू लागते. घरातल्या मोठय़ा माणसांपासून लपूनछपून एखादे आव्हान पेलणेच श्रेयस्कर वाटू लागते. सततच्या उद्दीपनाचा मेंदूवरदेखील एखाद्या अमली पदार्थासारखाच परिणाम होतो. त्यातून निर्माण होणारे ‘स्राव’ एक प्रकारची ‘लत’ निर्माण करतात.’’

अर्थात यामागे केवळ एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे इतपतच घटक कारणीभूत आहेत का. याबाबतीत अधिक विश्लेषण करताना ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी सांगतात, ‘‘ब्लू व्हेल हे एक आजचे उदाहरण झाले. जगात यामुळे जितक्या आत्महत्या झाल्या नसतील त्याच्या कैकपट आत्महत्या या आपल्या देशात नैराश्यामुळे झालेल्या आहेत. नैराश्यामुळे कमकुवत झालेल्या मानसिकतेचा ताबा घेतला जातो. कोणत्याही कारणाने उदासीनता आली की कोमलता, असुरक्षेची भावना (व्हल्नरेबिलिटी) वाढते. इतर मुलांच्या माध्यमातून त्यामध्ये भर पडण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर लैंगिक शोषणाचादेखील धोका निर्माण होतो. अशा वेळी घरातून प्रत्येक अपयशी घटनेचे खापर त्याच्यावर फोडले जाण्याचे प्रमाण वाढू लागते. यामुळे अशा व्यक्तीला पुन्हा नैराश्याचा झटका येऊ शकतो. उदास होताना माणूस माघार घेऊ लागतो. प्रौढ दारू वगैरे व्यसनांचा आधार घेतात. तर मुलं व्हिडीओ गेम, समाजमाध्यमांच्या आहारी जातात. किंवा काही केसेसमध्ये अमली पदार्थाचादेखील आधार घेतला जातो. त्याच्या अवतीभवतीच्या घटकांपासून, घटनांपासून दूर राहू लागतो. अशा वेळी ब्लू व्हेल आणि तत्सम गोष्टी त्याचा ताबा आरामात घेऊ शकतात. अशा घटनांचा परिणाम हा ‘स्नो बॉल इफेक्ट’प्रमाणे होतो. एखादा बर्फाचा गोळा डोंगरावरुन येताना त्याचा आकार कमी न होता तो वाढत जातो, तसे अनेक घटनांमुळे एकाच वेळी अनेक बाजूंनी एखाद्या व्यक्तीवर टीकेचा भडिमार होत असेल तर अशी व्यक्ती वारंवार नैराश्यात जाऊ शकते. आणि अशा वेळी नैराश्य हे वेदना एन्जॉय करणारे, रक्त एन्जॉय करणारे असते. नैराश्यातून आक्रमकपणा वाढीस लागतो. त्यातच जर आत्महत्येचा प्रयत्न झाला असेल तर त्याला घराचे नाव, प्रतिष्ठा, इज्जत अशी लेबलं जोडली जातात. भारतीयांमध्ये हा सर्वात मोठा धोका आहे. घराची प्रतिष्ठा धुळीस मिळवली या भावनेनेदेखील आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे.’’

पण फक्त नैराश्यातूनच आत्महत्या होतात का? तर तसेदेखील नाही. आकस्मिकरीत्या निर्माण झालेली चिंता, खेद, शरम, भीती अशीदेखील आत्महत्येची कारणं असू शकतात असे मानसोपचारतज्ज्ञ नमूद करतात. किंबहुना लोकांच्या नजरेतून उतरल्याची भावना हा त्यामागचा महत्त्वाचा घटक असल्याचे ते सांगतात. मग आपल्या मेंदूतील हा बदल नेमका का होतो हे तपासावे लागेल. यामागे आपली गती कारणीभूत आहे; १०० वर्षांचे आयुष्य आपण दहा वर्षांत जगायचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. हरीश शेट्टी नमूद करतात. आज आपल्या मुलांच्या अवतीभवती असायला हव्या अशा तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण हरवून बसल्याचे ते सांगतात. कोणीतरी बोलायला हवे, कोणतरी सांभाळणारे हवे आणि कोणीतरी सोबत हवे. या तिन्ही बाबी पूर्णत: वेगवेगळ्या आहेत. पण त्या तिन्ही पूर्णत: हरवलेल्या आहेत. आपल्या मेंदूला टेकण्यासाठी आधार नाही, त्याची ऊर्जा कमी होत चालली आहे आणि ती ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी योग्य ती ऊर्जा पुरवणारी साधनं आपल्याकडे नसल्याचे डॉ. शेट्टी सांगतात. अशा परिस्थितीत आपला मेंदू अलग होतो. मग ब्लू व्हेलचं नाही तर तत्सम सगळ्याच गोष्टींचे आकर्षण वाटू लागते.

आजच्या वेगवान जगात अनेक गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळे नाजूक मनांची, मेंदूची गरज पूर्ण करणे केवळ आईवडिलांना शक्य नसते. त्यासाठी कुटुंब आणि शाळा हे संयुक्त कुटुंब आहे अशी संकल्पना आम्ही मांडत असतो असे डॉ. शेट्टी सांगतात. दोन्ही एकमेकांना पूरक असायला हवेत. दोन्ही स्वतंत्ररीत्या परिपूर्ण नाहीत, पण एकत्र असतील तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात असे त्यांचे मत आहे.

आपल्या मेंदूमध्ये ब्लू व्हेलसारख्या गोष्टी आव्हानं स्वीकारण्याची मानसिकता निर्माण करतात तेव्हा त्यांचा फायदा विध्वंसक वृत्ती घेऊ पाहतात. याबाबत डॉ. अनुराधा सोवनी सांगतात, ‘‘त्यातून त्या विध्वंसक वृत्तींचा फायदा होणार असतो हे निश्चित. जास्त फॉलोअर्स मिळाल्यामुळे समाजमाध्यमांवर आर्थिक फायदा, नाहीतरी गैरवापर करता येतील असे फोटो, चित्रे, पोर्नोग्राफी किंवा अगदीच काही नाही तरी हजारो मनांवर ताबा मिळवल्याचा कैफ त्यातून या वृत्ती मिळवत असतात. या जाळ्यात तरुणच नाही तर कोणतीही व्यक्ती अडकू शकते.’’

आज आपली जगण्याची पद्धतच बदलली आहे. पूर्वापार असलेला शेजार वगैरे रचना या मुलांच्या नैराश्याला आळा घालायच्या. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. संशय वाढू लागला की प्रेम आणि विश्वास कमी होतो. अशा वेळी गॅजेट हातात असते आणि त्यात हरवून जाणे सुरू होते. आईवडील उपलब्ध नसतात, आणि शिक्षक गॅजेटइतके आकर्षक नसतात. डॉ. शेट्टी याच संदर्भात सांगतात की समाजाचे भावनिक कुपोषण झाले आहे. तेव्हा ब्लू व्हेल हे तुलनेने अधिक आकर्षक वाटू शकते. आणि अशा आकर्षणाला बळी पडण्याचे प्रमाण तरुण-तरुणींमध्ये अधिक असते. यासाठीच ते गॅजेट हायजिन ही संकल्पना मांडतात. त्याचबरोबर आठवडय़ातून एकदा नो टीव्ही दिवस असावा असे सांगतात. टीव्ही/गॅजेट कमी बोलू लागले की आपोआपच कुटुंबातील संवाद वाढू लागतो. तंत्रज्ञान येतच राहणार आहे. पण त्यातून आपण आपली उत्तरं शोधावी लागणार असल्याचे ते सांगतात. केवळ अमुक एकावर बंदी घालून उत्तर सापडणार नाही.

आपलं जगणं हे प्रेशर कुकरसारखं झाल्याचं डॉ. हरीश शेट्टी सांगतात. जगण्याचा वेग आपल्याला कमी करायला हवा. आपल्या मुलांचा हॅप्पी कोशंट कसा वाढवता येईल हे खरे तर आपल्यापुढचे मोठे आव्हान असल्याचे ते नमूद करतात.

बदलणाऱ्या तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या या धोक्यांवर मात करताना खरे तर तंत्रज्ञानाची माहिती असण्याची अथवा तसे दुसरे तंत्रज्ञान वापरण्याची गरज नसल्याचे डॉ. अनुराधा सोवनी नमूद करतात. त्या सांगतात, ‘‘पालक ऑनलाइन गेमबद्दल काहीच माहिती नाही या विचारानेच हतबल होतात. मग अशा अदृश्य शक्तींबद्दल दोन हात करणार कसे हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्न असतो. तेव्हा आमचा एकच प्रश्न असतो, ‘तुम्ही तुमच्या मुलाला तरी ओळखता ना?’ तो किंवा ती अचानक गप्प राहत असेल, खूप काळ आपल्या खोलीत फोन किंवा संगणकावर काहीतरी करत असेल तर तुमची शोधक नजर या वागण्याकडे वळवावी. अमानुष खेळांचे परिणाम त्याच्या शरीरावर जखमांच्या स्वरूपात दिसतात का, त्याचे वजन घटले आहे, झोपेच्या वेळात बदल झाला आहे का, किंवा त्याच्यामधील एकंदरच रागीटपणा, तऱ्हेवाईकपणा वाढतोय का हे सारं तुम्ही पालक म्हणून सतर्कतेने पाहू शकता आणि त्यासाठी तांत्रिक ज्ञानाची नाही, तर सुसंवादाची गरज आहे.’’

तंत्रज्ञान हे चांगले की वाईट ही चर्चा करण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो त्यावर ते अवलंबून असते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग आपण थांबवू शकत नाही, की त्यातून निर्माण होणारे असे गेम. मग आपल्या हाती उरते ते इतकेच की त्याला समर्थपणे तोंड देण्याची मानसिकता वाढवणे. कारण समाजात अपप्रवृत्ती असणारच आहेत. त्या काही संपणार नाहीत. त्यांचे विसर्जन होणे गरजेचे असेल तर सुसंवादाची प्राणप्रतिष्ठापना हाच काय तो एकमेव उपाय असल्याचेच या निमित्ताने वारंवार अधोरेखित होताना दिसते.

मेटल म्यूझिकचा धोका

पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक आशुतोष जावडेकर यांच्या लयपश्चिमा पुस्तकात मेटल संगीताची सविस्तर चिकित्सा केलेली आहेत. ते लिहितात, मेटल नावाला जागून टणटण वाजणारं हे संगीत आहे. भरजरी ‘बेस’, त्याला आवश्यक तितका ‘हेवी’नेस देतो. गिटार्सही प्रचंड तीव्रतेने वाजत असतात. भावनांचं रोखठोक आणि कर्कश प्रदर्शन मेटल संगीतात केलं जातं. या ठणठणात आणि गोंगाटात कविता ऐकूच कशी येते हा प्रश्न पडतो. मेटलसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो ठेका. अतिद्रुतगतीमधला ड्रम्सचा ठणठणाट हे मेटलचं प्रमुख लक्षण आहे. जेफ्री अर्नेट या मानसतज्ज्ञाने त्याच्या मेटलहेड्स या पुस्तकात मेटल संगीताला युद्धाचं श्रवण रूप असं म्हटलं आहे.

मेटलचे श्रोतेदेखील एकूणच त्या गर्दीत धक्काबुक्की, ढकलाढकली करत असतात. मेटलच्या व्यासपीठावरील दोन कृती प्रसिद्ध आहेत. पहिली म्हणजे ‘हेडबँगिंग’. तालात डोकं खटाखट पुढे आपटायचा अभिनय – कधी कधी खरोखरचं आपटवणं. दुसरं म्हणजे हाताची दोनच बोटं उंचावून दाखवलेल्या सैतानाचे चिन्ह. सैतानाचा जोर या संगीतामध्ये विशेष आहे. ख्रिस्ती मूल्यांपूर्वीच्या काळातील आदिम संस्कृतीकडे मेटल वळतं. ख्रिस्ती पाद्री मंडळींचं सगळ्यात नावडतं संगीत म्हणजे मेटल.

मेटलचे अनेक उपपंथ आहेत. थ्रश मेटल, डार्क मेटल (हार्डकोअर आणि हेवी मेटलचं मिश्रण, वगैरे. तर त्यांच्या बॅण्डची नावंदेखील सुइसायडल टेन्डन्सीज अशी खतरनाक आहेत. डेथ मेटल हा मृत्यूचं गुणगान करणारा उपपंथ आहे. तर गॉथिक किंवा डार्क मेटलमध्ये प्रेम, अमली पदार्थ आणि स्वप्नांचे विषय असतात.

व्हिपलॅश या गाण्यातून एकूणच मेटलच्या हिंस्रतेची झलक दिसून येते.

‘Bang your head.

Make it rain, Make it bleed

Make it really sore

We are gathered here to maim and kill

For this is what we choose.’

मेटलविरुद्धचा लढा

मेटलविरुद्ध अनेक वादविवाद जगभरात झाले आहेत. त्यापैकी १९८५ साली अमेरिकेतील वाद विशेष गाजला. यामध्ये सिनेटमध्ये मेटलचे दुष्परिणाम दाखवणारे थेट पुरावेच सादर करण्यात आले. पाश्चात्त्य संगीताचे अभ्यासक आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकात याचे साद्यंत वर्णन आले आहे.

१९९९ साली कोलरॅडोमधील दोन शाळकरी मुलांनी बंदुकीच्या फैरी झाडून शालेय विद्यार्थ्यांचा बळी घेतला आणि स्वत:लाही संपवले. रॉक संगीताचा आणि विशेषत: ८०च्या दशकात आलेल्या मेटल किंवा हेवी मेटल या उपपंथाचा त्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होता. त्याआधी टिप्पर गोर (अल गोर यांच्या पत्नी) यांनी त्याच्या संस्थेमार्फत १९८५ मध्ये रॉक आणि मेटल विरोधात देशभर वातावरण पेटवले. त्यावर सिनेट कमिटीसमोर भरपूर अभ्यासपूर्ण साक्षी झाल्या. संगीताच्या सामाजिक परिणामांची दखल घेतल्याचे उदाहरण तसे दुर्मीळच म्हणावे लागेल. टिप्पर गोर यांनी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर सेन्सॉरशिप आणण्याचा हेतू नसल्याचे सांगत रेकॉर्ड कंपन्यांनी स्वेच्छेने लेबलिंग करावे अशी भूमिका मांडली. (चित्रपटासाठी जसे यू, यू/ए, ए असते तसे.)

दुसरे एक कार्यकर्ते लिंग यांनी ‘वास्प’ या बॅण्डने व्यासपीठावर कच्चं मांस कापलं, त्याचे तुकडे श्रोत्यांमध्ये भिरकावले, एका कवटीतून रक्त पिण्याचा अभिनय केला, तसेच डमी अर्धअनावृत स्त्री-प्रतिमेवर सिम्युलेटेड बलात्कार व तिचा खून लोकांसमोर सादर केला याचे पुरावे सादर केले. यावर साऱ्या सभागृहात सन्नाटा पसरला.

हेवी मेटल हा काही केवळ लोकप्रिय असाच प्रकार नाही. तर ‘मेटॅलिका’ या जगप्रसिद्ध रॉकमेटल बॅण्डला तब्बल सात ग्रॅमी पुरस्कारही मिळालेले आहेत. या मेटॅलिकाचे एक गाणं त्यातील नैराश्याचे व मृत्यूचे भाव मांडते.

‘I have lost the will to live

Simply nothing more to give

Death greets me warm

I’ll just say good bye’

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 1:05 am

Web Title: metal music blue wheal
Next Stories
1 स्वातंत्र्याचे भूत
2 स्वातंत्र्य आणि समता : एक तत्त्वचिंतन
3 प्रवास स्वातंत्र्याच्या परिपक्वतेकडे
Just Now!
X