News Flash

गरज #MeToo तळागाळात पोहोचण्याची !

आज #मीटू मोहिम सेलेब्रिटींपुरतीच असली तरी ती  समाजातल्या तळागाळातल्या स्त्रियांपर्यंतही पोहोचणं आवश्यक आहे.

सोशल मीडियावरून सुरू झालेल्या #मीटू मोहिमेने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची नव्याने चर्चा सुरू केली आहे.

वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
सोशल मीडियावरून सुरू झालेल्या #मीटू मोहिमेने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची नव्याने चर्चा सुरू केली आहे. आज ती सेलेब्रिटींपुरतीच असली तरी ती  समाजातल्या तळागाळातल्या स्त्रियांपर्यंतही पोहोचणं आवश्यक आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या लैंगिक दुर्वर्तनाच्या आरोपाचा तनुश्री दत्ताने अलीकडेच पुनरुच्चार केल्यानंतर आपल्या देशात #मीटूचं वारं वाहू लागलं. अमेरिकेत विशेषत: हॉलीवूडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वाहायला लागलेल्या या वादळाने  पुरुषांकडून होणारे लैंगिक दुर्वर्तन या विषयावर मूक राहिलेल्या जगभरातील स्त्रियांना बोलतं केलं आहे. आपल्याकडे नाना पाटेकरांवरील आरोपाची चर्चा सुरू असतानाच लेखिका, निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेते आलोकनाथ यांनी दहा वर्षांपूर्वी केलेल्या लैंगिक अत्याचारांचा पाढा वाचला. त्यांचं म्हणणं लोकांच्या पचनी पडेपर्यंत आणखीही काही स्त्रियांनी आलोकनाथ यांच्याबद्दलचे अनुभव मांडले. काही स्त्रियांनी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचारांचे आरोप करत #मीटू फक्त बॉलीवूडपुरतं नाही तर पत्रकारितेच्या क्षेत्रातही असल्याचं जगापुढे आणलं. त्यानंतर साजिद खान, रजत कपूर, विकास बहल, विनोद दुआ, सुभाष घई अशा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळ्या स्त्रियांकडून #मीटू चे आरोप व्हायला लागले आहेत.

साहजिकच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. आरोप करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणारे आणि ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांच्या बाजूने उभे राहणारे अशी लढाईची मैदानेही ज्याने त्याने आपापल्यापुरती निश्चित केली आहेत. आणि त्यानुसार भूमिका घेतल्या जात आहेत. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगांबाबत आज बोलणाऱ्या स्त्रियांवर टीका केली जात आहे. त्या वेळीच त्या का बोलल्या नाहीत, असे प्रश्न विचारून त्यांच्या हेतूंबाबत शंका घेतली आहे. असे प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यांनाच चुकीचं ठरवायचं नाहीये, पण लैंगिक दुर्वर्तन हा आपल्या समाजात तरी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमध्ये बघायचा मुद्दा नाही. त्याला वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि त्या लक्षात घेऊन या विषयाकडे संवेदनशीलतेने बघणं आवश्यक आहे. ती तेव्हाच का नाही बोलली, असं म्हणून हा विषयच उडवून लावणं किंवा बिनमहत्त्वाचा ठरवणं चुकीचं आहे.

#मीटूच्या चर्चेत खोलात शिरण्याआधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या समाजात आजही लैंगिक अत्याचारांबद्दल उघडपणे, मोकळेपणे बोलणं स्त्रियांसाठी सहजशक्य आणि साधंसोपं नाही. त्यामुळे आपल्याबाबत होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाबाबत एखादी स्त्री उठून बोलते तेव्हा तिने मोठं धाडस गोळा केलेलं असतं. कुणी तरी घाणेरडय़ा कॉमेंट्स करणं, अश्लील फोटो दाखवायचा प्रयत्न करणं ते प्रत्यक्ष शरीराला स्पर्श करणं असं कोणत्याही लैंगिक दुर्वर्तन तसंच अत्याचाराबद्दल त्या वेळी किंवा अगदी दहा वर्षांनंतरही जाहीरपणे बोलणं ही त्या स्त्रीसाठी सोपी गोष्ट कधीच नसते. दहा वर्षांनी त्याबद्दल ती बोलते तेव्हा मनाने ती ते परत परत अनुभवत असते. तो आघात ती गेल्या दहा वर्षांत कधीही विसरू शकलेली नसते. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाबाबत ती आत्ताच का बोलली, तेव्हा तिला बोलायला कुणी अडवलं होतं, या बायका हवं ते मिळवतात आणि आपला कार्यभाग साधला की मग हे असे आरोप करतात, काही स्त्रिया आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी समोरच्याला हवं ते करायला तयार असतात. आणि नंतर मग अशा पद्धतीने उलटतात, त्या तेव्हाच अशा माणसांबद्दल का बोलत नाहीत, असे मुद्दे पुढे करणं म्हणजे चर्चेला फाटे फोडणं आहे.

सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर किंवा विनता नंदाने आलोकनाथ यांच्यावर आरोप केले म्हणजे समस्त स्त्रीवर्गाने समस्त पुरुषवर्गावर आरोप केलेले आहेत, असं नाही. स्त्रिया विरुद्ध पुरुष असा हा संघर्ष नाही तर असे आरोप म्हणजे लैंगिक दुर्वर्तन केलेल्या पुरुषाविरुद्ध त्या वर्तनाला आपण बळी पडलो आहोत हे सांगू इच्छिणाऱ्या स्त्रीने केलेले आरोप आहेत. सत्तास्थानी असलेल्या पुरुषाने स्त्रियांकडे आपल्याला हवं तेव्हा उपलब्ध व्हायला तयार असलेली वस्तू, प्राणी, घटक म्हणून बघायची वृत्ती आहे. जगभरात पुरुषप्रधान समाजात सगळीकडेच ती दिसते. पुरुषप्रधानतेमुळे स्त्रिया सत्तास्थानी असण्याची उदाहरणे आजही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहेत. त्यामुळे विशेषत: आपल्याकडे तरी सगळी सत्तास्थानं पुरुषांच्याच हातात आहेत. इथे सत्तास्थानाची व्याप्ती अगदी कुटुंबापासून सुरू होते. तिथपासूनच्या कोणत्याही आस्थापनेच्या प्रमुखपदी सहसा पुरुषच असतो. त्याला हवं ते त्याच्या आसपासच्या माणसांप्रमाणेच स्त्रीनेही करणं, वागणं ही त्याची सत्ताकांक्षा असते. त्यामुळे सत्तास्थानाचा वापर करून पुरुषांनी स्त्रियांकडे लैंगिक लाभांची अपेक्षा करणं आणि स्त्रीने त्याला बळी पडणं किंवा विरोध करणं ही गोष्ट नवीन आहे, अशक्य आहे अतक्र्य आहे, असं कुणीच म्हणणार नाही. आत्ता पुढे येणारी प्रकरणं हिमनगाचे टोक असावे एवढय़ा प्रमाणात ही प्रकरणं आपल्या आसपास घडत असतात. काही प्रकरणं इतकी किरकोळ असतात की काही वेळा स्त्रियाही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. पण प्रत्येक वेळी ते शक्य असतं असं नाही आणि प्रत्येक वेळी विरोध करणं शक्य असतं असंही नाही. काही वेळा बळी पडण्याशिवाय दुसरा मार्गही तिच्यासमोर नसतो.

पण अशी प्रकरणं घडतात तेव्हा हा संघर्ष दोन माणसांमधला उरत नाही तर तो सत्ताकांक्षा असलेला पुरुष आणि त्याच्या सत्तेपुढे नमायला नकार देणारी स्त्री या दोन पूर्णत भिन्न अशा नैसर्गिक प्रवृत्तींमधला तो संघर्ष ठरतो.

त्यातल्या एका घटकाला म्हणजे स्त्रीला हजारो वर्षे दुय्यम लेखलं गेलं आहे. घर सांभाळणं, मुलांचं संगोपन ही तिचीच जबाबदारी असं ठासून सांगून तिला घरातच अडकवलं गेलं आहे. तिला सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित ठेवलं गेलं. साहजिकच सगळी सत्तास्थानं पुरुषांच्या हातात राहिली. कुटुंबात, छोटय़ाशा ऑफिसमध्ये, मोठय़ा ऑफिसमध्ये, राज्यकारभारात, देशकारभारात सगळीकडे सत्ता चालवणारा तो असल्यामुळे आपल्या समोर येणाऱ्या स्त्रीवर आपलाच अंमल आहे ही सुप्त भावना पुरुषाच्या मनात असते. हा अनुभव स्त्रियांना वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी येत असतो. (ही विधानं सरसकट सगळ्या पुरुषांसंदर्भात नाहीत तर लैंगिक गैरवर्तनाचा ज्यांच्यावर आरोप आहे, अशा पुरुषांसंदर्भात आहेत.) सत्तास्थानी असलेल्या पुरुषांनी काही कारणाने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या स्त्रीकडून लैंगिक लाभाची अपेक्षा करणं हे कुठे ना कुठे सातत्याने घडत आलेलं आहे, घडतं आहे, हे मान्य करणं आवश्यक आहे. मग प्रश्न येतो की त्या वेळी आवाज का उठवीत नाही? एक व्यक्ती कायमच प्रबळ आहे आणि दुसरी नाही अशा वेळी प्रबळ नसलेल्या व्यक्तीला उठून बेधडकपणे न्याय मागणं शक्य होतंच असं नाही. उदाहरणच द्यायचं तर फॅण्टम फिल्म्सच्या विकास बहल यांच्याविरोधात काही स्त्रियांनी लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार केली आहे. बहल यांच्याविरोधात त्यांचे भागीदार अनुराग कश्यप यांच्याकडे आम्ही तक्रारी केल्या होत्या असं यातल्या काही स्त्रियांचं म्हणणं आहे. एरवी संवेदनशील दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुराग कश्यप यांनी तेव्हा त्या प्रकरणाचं गांभीर्य आपल्याला जाणवलं नाही असं म्हटल्याचं प्रसिद्ध झालं आहे. आपण नाना पाटेकरांविरुद्ध ‘सिंटा’ (सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) तक्रार केली होती असं तनुश्री दत्ता सांगते. तिच्या तक्रारीची त्या वेळी योग्य प्रकारे दखल घेतली नाही असं म्हणत ‘सिंटा’ने आता माफीही मागितली आहे. ‘सिंटा’ तसंच अनुराग कश्यप यांच्या बाबतीत असं घडत असेल तर इतर लहान लहान ठिकाणी काय घडत असेल?

स्त्रियांनी लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार त्या त्या वेळी करावी असं कुठल्या आधारावर म्हणणार? एखाद्या पोलीस स्टेशनवर एखादी स्त्री अशी तक्रार करायला गेली तर तिला काय अनुभव येतो? तूच लवकर घरी जात जा, भावाबिवाला बरोबर घेऊन बाहेर पडत जा, दुर्लक्ष कर, शिक्षणबिक्षण सुरू असेल तर ते सोडून घरी बस, पटकन लग्न करून टाक असे सल्ले तिला दिले जातात. पण तिच्याशी लैंगिक गैरवर्तन करणाऱ्याला धाक बसेल असं काहीही केलं जात नाही. घरीदारीही तिला तुझीच काहीतरी चूक असेल, यात बदनामी झाली तर तुझं लग्न कसं होईल, तुझीच जिंदगी खराब होईल असलं काही तरी ऐकवलं जातं. तिच्यावरच जाण्या-येण्याची बंधनं येतात. पटकन तिचं लग्न करून टाकलं जातं. ती लग्न झालेली असेल, तिला नोकरीची गरज असेल तर मग तिची अवस्था याहूनही वाईट होते. आपलं ऐकून घेतलं जाणार नाही, आपल्यालाच टोकलं जाईल, घरी बसवलं जाईल, नोकरी सोडली तर दुसरी मिळणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीमुळे स्त्रिया त्या वेळी बोलत नाहीत. त्यातूनच काही तरी मार्ग काढत राहतात. एखादीला नोकरीची जीवनमरणाची गरज असेल, तिच्यावरच तिचं घर चालत असेल तर तिच्याकडे लैंगिक अत्याचारांबाबत बोलण्याची हिम्मत येऊ शकते का? त्यामुळे एरवी सातत्याने बोलण्यातून मोकळं होण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया लैंगिक गैरवर्तनांच्या अनुभवांनंतर मात्र त्याबद्दल जाहीरपणे न बोलता गप्प बसतात, एकमेकींमध्ये बोलतात आणि त्यातून होणारी घुसमट सहन करीत राहतात.

लैंगिक दुर्वर्तनाच्या आरोपांचं खंडन करणारे असा एक मुद्दा मांडताना दिसतात की स्त्रिया स्वत:च्या स्त्रीत्वाचा वापर करून स्वत:ला हवं ते मिळवतात आणि ते मिळालं की मग असे आरोप करतात. पण लैंगिक दुर्वर्तनाचा आरोप जसा सरसकट सगळ्याच पुरुषांवर केला जात नाही, कारण सगळेच पुरुष तसे नाहीत, हे अध्याहृत आहे. तसंच हे आरोप करणाऱ्या सगळ्याच स्त्रिया स्त्रीत्वाचा फायदा घेऊन काही मिळवू पाहणाऱ्या असतात असं म्हणणं चुकीचं आहे. काही स्त्रिया तसं वागल्या असतील म्हणून सरसकट सगळ्यांकडेच असंवेदनशीलपणे बघणं योग्य नाही.

तरीही #मीटू चळवळीचा मोठा फटका पुढचा काही काळ तरी बाकीच्या स्त्रियांनाच बसणार आहे. उद्या उठून #मीटूची झेंगटं नकोत, त्यापेक्षा त्यांना कामाची संधी द्यायलाच नको, असा सूर कुठे कुठे उमटायला लागला आहे. अर्थात शिक्षण, कार्यक्षमता यांच्या बळावर आज मुली-स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इतक्या मुसंडी मारत आहेत, की असं फार काळ त्यांना थोपवता येणार नाही. त्यामुळे हा तात्कालिक सूर नंतर ओसरून जाईल.

सोशल मीडियावरून लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप करणाऱ्या स्त्रिया पोलिसात का जात नाहीत, कायद्याचा आधार का घेत नाहीत, असाही आक्षेप घेतला गेला आहे; पण #मीटू चळवळीमुळे अनेक वर्षांनंतर उघडकीला आलेली लैंगिक गैरवर्तणुकीची प्रकरणे पुराव्याअभावी न्यायालयात टिकू शकणार नाहीत, असे कायदेतज्ज्ञच सांगतात. त्यांच्या मते या प्रकरणांमध्ये आपल्यावर अन्याय झाला आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारीही संबंधित महिलेवरच येते. दोन माणसांमध्ये एकांतात दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेचे पुरावे तिला काय कुणालाही सादर करता येणं शक्यच नाही. शिवाय गुन्हा घडल्यानंतर तो कधीपर्यंत दाखल करायचा याला मर्यादा असते. या सगळ्यामुळे कायद्याचा आधार घ्यायला मर्यादा येते. एखादं प्रकरण नोंदवायला गेल्यावर पोलिसांनी ते दाखल करून घ्यावं लागतं. तो एफआयआर दाखल झाला तर ती केस लढवावी लागते. त्यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ, खर्चीक आहे. हे सगळं करायची एखादीची तयारी असली तरी संबंधित पुरुषाने तिच्याकडे लैंगिक अपेक्षा व्यक्त केल्या, सूचित केल्या, प्रत्यक्ष कृती केली किंवा तिने त्या अपेक्षा नाकारल्या म्हणून तिला त्रास दिला हे ती सिद्ध कसं करणार? अशा बहुतेक प्रकरणांत पुरावे नसतातच. त्यामुळे तो मार्ग आजवर फारसा हाताळला गेलेला नाही; पण आजकाल सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. एखादी गोष्ट अनेक लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, पण पारंपरिक माध्यमं दखल घेत नाहीत. अशा वेळी लोक बेधडकपणे सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. #मीटूमध्येही तेच झालं आहे. पोलीस, न्यायव्यवस्थेकडे जाणं शक्य नाही, व्यवहार्य नाही, तर सोशल मीडियावरून संबंधित स्त्रियांनी आपल्याला जे म्हणायचं आहे ते मांडलं आहे. कोणत्याही प्रकरणाची अशी मीडिया ट्रायल होणं योग्य नाहीच, पण सोशल मीडियावरून आपल्याबद्दल अशी चर्चा होणं कुणालाही आवडणार नाही. त्यामुळे आपण असं काही वागलो तर उद्या ते सोशल मीडियावरून पसरवलं जाऊ शकतं, या भीतीने कदाचित काही प्रमाणात काही पुरुषांच्या लैंगिक दुर्वर्तनाला आळा बसू शकतो.

आता #मीटूमुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे तर या स्त्रियाच खोटं बोलताहेत, त्यांना फायदे हवे आहेत, असे मुद्दे मांडण्यापेक्षा यापुढच्या काळात असं लैंगिक दुर्वर्तन करण्याचं इतरांचं धाडस होऊ नये, कुणी केलंच तर त्यांना आळा बसावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  आलोकनाथ, एम. जे. अकबर, साजिद खान आणि इतर सगळ्या पुरुषांवर आरोप करणाऱ्या सगळ्या स्त्रिया खोटं बोलत आहेत असं एका क्षणासाठी मान्य करू या, पण तरीही कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या प्रश्नाची व्याप्ती कमी होत नाही. विशाखा कमिटीसारखे उपाय योजूनही या प्रश्नाची तीव्रता कमी झालेली नाही. या स्त्रिया उठून उभं राहून बोलू शकल्या आहेत, पण भीतीमुळे, संकोचामुळे, अपरिहार्यतेपोटी एकही शब्द उच्चारू शकत नाहीत अशा लाखो स्त्रियांचं काय? कामाच्या ठिकाणी त्यांची लैंगिक छळणूक होत नसेल, पण घरी, दारी, वस्तीत, प्रवासात होत असेल तर त्याचं काय? शहराच्या परिघाबाहेर असणाऱ्या, ग्रामीण भागातल्या, मुख्य प्रवाहात आजही पोहोचू न शकलेल्या तळच्या स्तरातल्या स्त्रियांचा आवाज खूपदा दबलेलाच राहतो. आज या वरच्या स्तरातल्या स्त्रिया बोलू शकताहेत तर त्याचा परिणाम होऊन उद्या तळच्या स्तरातल्या स्त्रियांनाही आवाज उठवण्याचं धैर्य येणार आहे. त्यांच्यामध्ये ‘मीटू’ म्हणण्याची हिम्मत यावी यासाठी आज कुणीतरी ‘मीटू’ म्हणण्याची गरज आहे. त्यामुळे सगळे गुणदोष लक्षात घेऊनही #मीटूसारख्या मोहिमेला पाठिंबाच दिला पाहिजे. तिला नाकारून चालणार नाही.

भारतातील ‘#मीटू’ची प्रमुख प्रकरणे

भारतात #मीटू ची चर्चा सुरू झाली ती दहा वर्षांपूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉर्न ओके या चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी लैंगिक दुर्वर्तन केले या तनुश्री दत्ताच्या आरोपापासून. नाना पाटेकर यांनी सातत्याने हा आरोप फेटाळला. आरोपांना उत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे जाहीर करून नंतर ती रद्द केली.

तारा या ९० च्या दशकातील टीव्ही कार्यक्रमाच्या निर्मात्या, लेखिका विनता नंदा यांनी ‘संस्कारी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या माणसाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असं मांडलं. ‘संस्कारी’ हे बिरुद आलोकनाथ यांना लावलं जात असल्यामुळे ती व्यक्ती म्हणजे आलोकनाथ हे सगळ्यांना लगेचच समजलं. त्यानंतर आणखीही काही स्त्रिया आलोकनाथ यांच्या लैंगिक दुर्वर्तनाबद्दल बोलल्या. आलोकनाथ यांनीही मी हे आरोप मान्यही करीत नाही आणि स्वीकारतही नाही. नंदा यांच्यावर बलात्कार झालाही असेल पण तो इतर कुणी तरी केला असू शकतो. मी या प्रकरणाची जास्त चर्चा करू इच्छित नाही असं जाहीर केलं.

क्वीन सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहल याच्यावर २०१५ मध्ये गोव्यात झालेल्या फॅण्टम फिल्म्सच्या पार्टीत लैंगिक दुर्वर्तन केल्याचे आरोप झाले. त्यानंतर आठवडय़ाभरातच अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधू मंतेना यांनी विकास बहलबरोबर भागीदारीत असलेली ही कंपनी बंद करीत असल्याचे जाहीर केले.

एका महिला पत्रकाराने गायक कैलाश खेर यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप केले. कैलाश खेर यांनी हे आरोप नाकारले.

मान्सून वेडिंग या सिनेमातून लहान मुलांवर कुटुंबांतर्गत होणारा लैंगिक अत्याचार हा विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या रजत कपूर यांच्यावर एका महिला पत्रकाराने लैंगिक दुर्वर्तनाचा आरोप केला. रजत कपूर यांची तिने फोनवरून मुलाखत घेतली तेव्हा ते तिच्याशी असभ्यपणे बोलले, त्याबद्दलचे काही पुरावेच तिने ट्विटरवरून सादर केले. रजत कपूर यांनी आपल्या वागण्याची माफी मागितली.

प्रिया रामाणी हिने एम. जे अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. त्यानंतर आणखीही काहींनी एम. जे अकबर यांनी आपल्याशी दुर्वर्तन केल्याचे सांगितले. अकबर यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.

याशिवाय साजिद खान, विनोद दुआ, सुभाष घई यांच्यासह आणखी काही जणांवर #मीटू अंतर्गत आरोप झाले आहेत.

ब्लॅक रोझ इंडिया

#मीटूच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार, दुर्वर्तन यावर चर्चा सुरू झाली असली तरी हे प्रकार फक्त कामाच्या ठिकाणी होतात असं नाही. घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण मानलं जातं आणि घरातली माणसं सगळ्यात विश्वासाची मानली जातात; पण घरातच आणि जवळच्या माणसांकडून लैंगिक अत्याचार तसंच दुर्वर्तन होतं आणि त्याबद्दल कधीही कुठेही बोलता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था असते. #मीटूबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर रेणुका खोत आणि मुक्ता चैतन्य या दोन ब्लॉगर्सनी मिळून ‘ब्लॅक रोझ इंडिया’ नावाचं फेसबुक पेज सुरू केलं. घरातल्या विश्वासाच्या म्हणवल्या जाणाऱ्या माणसांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांसंदर्भात या पेजवर मुली, स्त्रिया तसंच पुरुषदेखील व्यक्त झाले आहेत. काही जणांनी नावानिशी आपले अनुभव मांडले आहेत, तर काही जणांनी निनावी राहणं पसंत केलं आहे; पण या पेजवर मांडले गेलेले अनुभव अक्षरश: अंगावर काटा आणणारे आहेत.

#मीटूची सुरुवात

#मीटूची सुरुवात झाली ती अमेरिकेत. तिथे ‘न्यूयॉर्कर’ या मासिकामध्ये रॉनन फरो या पत्रकाराने हॉलीवूडमधल्या हार्वी वाईनस्टीन या निर्मात्याने केलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात एक मालिका चालवली होती. हार्वी वाईनस्टीन हा एक मोठा निर्माता. त्याच्याविरोधात लिहिणं तसं धाडसाचंच होतं. त्याशिवाय आणखी दोन पत्रकारांनीही हार्वीच्या लैंगिक अत्याचारांविरोधात बातम्या दिल्या होत्या. हे सगळं मांडलं गेल्यावर वाईटातून चांगलं म्हणावं असं काही तरी घडलं. हार्वीच्या अत्याचारांना बळी पडलेल्या अनेक जणी एकत्र आल्या. आलिसा मिलानो नावाच्या अभिनेत्रीने हार्वीच्या अत्याचारांविरोधात सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली आणि आयुष्यात कधीही कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचारांना बळी पडावं लागलं असेल अशांनी #मीटू असं म्हणत प्रतिसाद द्या, असं ट्विटरवरून आवाहन केलं. #मीटू ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा तराना बर्क नावाच्या स्त्रीवादी कार्यकर्तीने वापरली होती. आलिसा मिलानोला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळाला. आपण सामना केलेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल स्त्री व पुरुष भरभरून बोलायला लागले. त्यामुळे हे सगळं सहन करणारे आपण एकटेच नाही, ही भावना निर्माण झाली आणि #मीटू ही सोशल मीडियावरून सुरू झालेली चळवळ जगभर पसरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:03 am

Web Title: metoo social media movement
Next Stories
1 दसरा विशेष : ट्रेण्ड  दागिन्यांचा..
2 दसरा विशेष : सोन्याचा सोस
3 देवी विशेष : नवदुर्गेची चैतन्यरूपे
Just Now!
X