सुहास जोशी, जयेश सामंत – response.lokprabha@expressindia.com
गेल्या पाचेक वर्षांत मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीच्या परिणामांबाबत सजग होऊन तिशी-चाळिशीतील लोक मोठय़ा संख्येने मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत,

वेगवेगळ्या शहरांमध्ये मोसमांनुसार असणाऱ्या मॅरेथॉनमधून धावण्याचा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांमध्ये दिसू लागला आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रीकमध्ये निरोप सांगण्यासाठी धावण्याच्या घटनेला आज आरोग्य, तंदुरुस्ती, मार्केटिंग, मौजमजा असे सगळे पैलू निर्माण झाले आहेत. आपली आवड म्हणून, कुणाचं तरी बघून किंवा क्रेझ म्हणून माणसं धावताहेत. त्यातही तिशीचाळीशीतल्या लोकांची संख्या या धावणाऱ्यांमध्ये जास्त आहे.

आज ठाणे मॅरेथॉन, पुढच्या आठवडय़ात वसई मॅरेथॉन, थोडय़ाच दिवसात नाशिक मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, मुंबई टाटा मॅरेथॉन.. अशी ही वर्षभरात मॅरेथॉनची न थांबणारी धाव गेल्या काही वर्षांत जोमाने वाढत आहे. हौसे, नवसे-गवशांबरोबरच अगदी ठरवून सराव करून सगळीकडच्या मॅरेथॉन धावणाऱ्यांच्या पायाला जणू काही िभगरीच लागलेली असते. कोण पाच किमी धावतोय, कोण १०, कोण २१ किमीची अर्ध मॅरेथॉन, तर कोणी ४२ किमीची पूर्ण मॅरेथॉन धावतोय. एका आकडेवारीनुसार वर्षभरात देशभर सुमारे १५०० मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन केले जाते. काही जण अगदी परदेशातील मॅरेथॉनमध्येदेखील धावताना दिसतात. एकीकडे म्हटलं तर यात स्पर्धा आहे आणि दुसरीकडे अनेकांना ठरावीक अंतर धावून पूर्ण केल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे असा आनंद मिळवू इच्छिणाऱ्यांची संख्या सध्या वाढते आहे. रूढ क्रीडाप्रकारांपेक्षा काहीसा वेगळा असा हा क्रीडाप्रकार गेल्या काही वर्षांत चांगलाच लोकप्रिय झालेला आहे.

मॅरेथॉन म्हणजे धावण्याची स्पर्धा. त्यामुळे त्यात स्पर्धक असतातच, पण त्यांच्या कैक पटीने अधिक संख्या असते ती ठरवून विशिष्ट अंतर पूर्ण करण्यासाठी सहभागी होणाऱ्यांची. गेली दोनतीन वष्रे सातत्याने मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या काही जणांशी संवाद साधला तेव्हा त्यातील अनेक पलू लक्षात आले. पहिला प्रकार आहे तो मॅरेथॉन धावणे हेच करिअर म्हणून स्वीकारलेल्या धावपटूंचा. तर दुसरे साधारण तिशी- चाळिशी ओलांडलेले, थोडेसे स्थिरस्थावर असलेले, ठरवून धावायला सुरुवात केलेले. तर थोडाफार सराव करून सहज म्हणून आलेले तिसऱ्या प्रकारचे लोक अशी सर्वसाधारण विभागणी करता येते.

यातील दुसरा घटक सध्या वेगाने वाढतो आहे. सेवाक्षेत्रातील नोकरी, त्यातून आलेली स्थिरता, मार्गी लागलेला संसार; पण त्याच वेळी बठय़ा नोकरीमुळे व्यायामाच अभाव हे चित्र सगळीकडेच दिसतं. मग तंदुरुस्ती-फिटनेस या शब्दांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यावर त्यावर ज्यांना मॅरेथॉनचे उत्तर सापडलेले असते असे लोक या गटात येतात. तिसरा वर्ग तुलनेने फारसे सातत्य नसणारा आहे. दुसऱ्या गटात आयटी व तत्सम सेवाक्षेत्रातील लोकांचा वाढता सहभाग आहे. या लोकांचा सारा भर फिटनेसवर असला तरी त्यांनी फिटनेससाठी मॅरेथॉनचाच पर्याय का स्वीकारला हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. गेली तीन वष्रे सातत्याने मॅरेथॉन धावणारा आयटी क्षेत्रातील अमित बोरोले सांगतो, ‘फिटनेस हा मुद्दा तर असतोच, पण हल्लीच्या नोकरी व्यवसायांमध्ये असणाऱ्या ताणतणावावर उपाय म्हणून अनेकांना एखाद्या क्रीडाप्रकाराचा आधार हवा असतो. अशा वेळी धावणे ही सहज सोपी अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून निवडली जाते. एकतर त्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा अपेक्षित नसते, आणि धावण्याचे चांगले परिणाम शरीरावर लगेचच दिसू लागतात. किंबहुना अनेकांना एकाग्रता वाढणे यासारखे मानसिक लाभदेखील झाले आहेत.’ अशा गरजा आणि त्याचे लाभ यामुळे गेल्या पाचएक वर्षांत मॅरेथॉनचे वेड अनेकांना लागलेले दिसते. साधे धावायचेच आहे तर कुठेही धावता येऊच शकते. त्यासाठी मॅरेथॉनमध्येच सहभागी का होतात, याबद्दल मॅरेथॉन धावणारा आयटी क्षेत्रातील शैलेश खोंडे सांगतो, ‘स्पध्रेमुळे ध्येय निश्चित होते. सोबत सराव करणारे, धावणारे अनेकजण असतात. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावतानाचे वातावरण खूप उत्साहवर्धक असते. त्यामुळे अशा उपक्रमात भाग घेण्याकडे कल वाढतो आहे.’ काही वर्षांपूर्वी आपल्याकडे जिममध्ये जाण्याची प्रचंड लाट आली होती. तशीच आता मॅरेथॉन धावण्याची लाट आलेली दिसते. ती धावण्यासाठी तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस (एन्ड्युरन्स) लागतो. तसा कस जिममध्ये तुलनेत कमी लागतो.

मॅरेथॉनप्रेमींची ही वाढती संख्या केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित नसून महिलांचादेखील त्यात जवळपास समान सहभाग आहे. तिशी-चाळिशीत संसारात गुरफटून जाताना फिटनेस टिकवणासाठी धावणाऱ्या महिलांची संख्या मॅरेथॉनमध्ये वाढत आहे. कधी नवऱ्यामुळे बायकोला मॅरेथॉन धावायची स्फूर्ती मिळते तर कधी बायको धावते म्हणून नवरादेखील धावतो असे प्रकार होताना दिसतात. अनेक ग्रुप्समध्ये नवरा-बायको जोडीने सरावास येण्याचे प्रमाणदेखील भरपूर आहे. महिलांच्या यातील सहभागाबद्दल रश्मी शेट्टी सांगतात, ‘महिलांचे प्रमाण वाढले आहेच, यामध्ये सुमारे ८० टक्के महिला या कॉर्पोरेट क्षेत्रातील आहेत. तेथील ताणतणावापासून मुक्तता देणारा आणि तंदुरुस्तीचा नैसर्गिक उपाय म्हणून मॅरेथॉनकडे पाहतात. तर २० टक्के या गृहिणी आहेत.’ महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल निरीक्षण नोंदवताना अवंती दराडे सांगते, ‘मी नेहमीच्या मॅरेथॉन धावतेच, पण एकदा मुद्दाम फक्त महिलांच्या मॅरेथॉनमध्येदेखील भाग घेतला होता. तेव्हा तेथे सर्वच वयोगटातील महिला आल्या होत्या. स्थूल, किडकिडीत, फिटनेसवाल्या, नोकरी करणाऱ्या, गृहिणी अशा सर्वचजणी धावण्यासाठी म्हणून घराबाहेर पडणे ही खूप स्वागतार्ह बाब होती.’

मॅरेथॉनमध्ये विशीतलेदेखील अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. त्यात हौसेबरोबरच सोशल मिडियावर फिनिश लाइनवरचा सेल्फी टाकण्याचा आनंददेखील असतो. इतकेच नाहीतर काही ठिकाणी ज्युनिअरथॉन अशा नावाने छोटय़ांसाठीदेखील तुरळक अशा स्पर्धा घेतल्या जात आहेत. अनेक ठिकाणी ऑफिसमधील ग्रुपच्या सहभागामुळेही मॅरेथॉन धावणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. त्याचबरोबर तरुणपणापासूनच फिटनेसबद्दल सजग असलेला वर्ग आपल्या मित्रमंडळींबरोबर एकापाठोपाठ एक मॅरेथॉन धावण्याचा सपाटादेखील लावत असतो. पण त्यातुलनेत तिशी-चाळिशीतल्यांचा सहभाग हा काहीसा ठामपणे ठरवून होणारा आहे हे या वर्गातील लोकांशी बोलल्यानंतर लक्षात येते. ठरवून सराव करून मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या या वर्गात एक सातत्य दिसून येते.

याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या गोष्टींची दखल येथे घेणे गरजेचे ठरते. शैलेश खोंडे सांगतो, ‘या वर्गात कधीकधी थोडासा पीअर प्रेशरचाही भाग असतो. अशा वेळी दुखापतीचा संभव असतो. या वर्गातील लोकांनी थोडं सजग होणं गरजेचे आहे. जेवढे झेपेल तेवढेच धावावे. त्यामुळे जे समजून उमजून करतात तेच टिकतात.’ त्यातील व्यायाम आणि आहाराचे महत्त्व अधोरेखित करताना अमित बोरोले सांगतो, ‘अनेकजण छोटे टप्पे धावत धावत लगेचच पुढच्या मोठय़ा टप्प्यावर जाऊ पाहतात. ते चुकीचे आहे. सुरुवातीला मीदेखील प्रशिक्षण न घेता धावत होतो. पण नंतर त्यासाठी योग्य तो सल्ला घेऊ लागलो. धावायचं तर त्यासाठी पूरक व्यायाम हवा आणि त्याचबरोबर योग्य तो आहारदेखील. खूप धावले की स्नायूंची हानी होते, ती भरून काढण्यासाठी व्यायाम आणि आहाराची जोड असायलाच हवी.’ ही जाणीव वेळीच होणे गरजेचे असते. अन्यथा मॅरेथॉन धावणे हे दुखापतीला कारणीभूत ठरू शकते. सुदीप बर्वे हा पट्टीचा गिर्यारोहकदेखील सध्या अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतो तो सांगतो, ‘पूर्वी एक परीक्षा झाली मी महिनाभर सराव करायचो आणि मॅरेथॉन धावायचो. बेंगलोरला आलो तेव्हा ट्रेक कमी झाले आणि मॅरेथॉनवरचा भर वाढला. पण त्यासंदर्भातील प्रशिक्षण मिळालं तेव्हा मला यातलं विज्ञान कळत गेले. ते न कळता धावणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे याची जाणीव झाली. धावणे हा आपला अंगभूत भाग आहे. पण शालेय स्पर्धानंतर आपले धावणे कमी होते. मग मधल्या काळात अनेकांनी काहीच केलेलं नसते. तिशी-चाळिशीतले लोक याकडे फिटनेस म्हणून पाहतात तेव्हा प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. मेडल, टीशर्ट वगरे बाबीतून प्रोत्साहन मिळत असतेच, पण तेव्हाच आणखी काहीतरी करण्याकडे कल वाढू लागतो. अशा वेळी दुखापत टाळणे गरजेचे असते. मी व्यवस्थित फी भरून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. असे पसे भरून प्रशिक्षण घेतल्याने दोन्ही बाजूंनी काहीतरी बांधिलकी राखली जाते.’

प्रशिक्षण हा या मॅरेथॉनमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याबद्दल बऱ्यापकी जागरूकता दिसून येत आहे. आणि त्या अनुषंगाने अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षणाचे उपक्रम व्यावसायिक पद्धतीने कार्यरत झाले आहेत. अनेक चांगले धावपटू प्रशिक्षक होताना दिसतात. ठाण्यातील हरिदासन नायर हे सन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर अनेक मॅरेथॉन धावायचे. सध्या ते मॅरेथॉन धावणाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवतात. हरिदासन नायर सांगतात, ‘तंदुरुस्ती हा यामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमचे शरीर तंदुरुस्त असेल तर तुम्ही कोणत्याही खेळाचा आनंद घेऊ शकता. माझ्याकडे अगदी शून्य किलोमीटर धावणारे लोक येत असतात. त्यांना २१-४२ किमीसाठी तयार करायचे असते. त्यासाठी आम्ही आठवडय़ातून चार दिवसाचे प्रशिक्षण देतो. स्नायूंची बळकटी, योग्य आहाराचे गणित, वेगवेगळ्या ठिकाणी धावण्याचा सराव, श्वसनाचे गणित जमवणे, डोंगरावर धावण्याचा सराव अशा पद्धतीने हळूहळू त्यांची क्षमता वाढवत नेली जाते. कस वाढणे हा यातील एक महत्त्वाचा घटक आहे. या सर्वासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण महत्त्वाचे असते. कारण प्रशिक्षणातून तुम्हाला एक गणित बांधणे शक्य होते. तुमची क्षमता, वेळ आणि किलोमीटर यांचे सूत्र मांडले की मग पुढील गोष्टी सोप्या होतात. माझ्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये १८ ते ६५ अशा वयोगटातील लोक येत असतात, पण तिशी ओलांडलेल्यांची संख्या अधिक आहे. हल्ली विशी-पंचविशीतील तरुणांची संख्यादेखील वाढत आहे.’

व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच स्वयंसेवी सहभागदेखील त्याचबरोबर वाढत आहे. आज अशा प्रकारे मॅरेथॉनमध्ये उतरणाऱ्यांचे अनौपचारिक ग्रुप तयार झाले आहेत. ‘पुणे रनर्स’ हा त्यापकीच एक गट. यामध्ये ठरावीक भागानुसार पुणे-पाषाण, पुणे-वाकड, पुणे-बालेवाडी वगरे उपगटदेखील आहेत.  अशा ग्रुपचा एकत्रित सराव होत असतो. त्यांच्यापैकी  अनेक मॅरेथॉन धावण्याचा अनुभव असलेली अनुभवी व्यक्ती इतरांना प्रशिक्षण देते. हे प्रशिक्षण स्वयंसेवी पद्धतीने विनामूल्य सुरू आहे. तर काही लोक अनेकांना या गटांशी जोडून घेताना दिसतात. व्यावसायिक मॅरेथॉन प्रशिक्षक महिन्याला दीड-दोन हजार रुपये घेत असतात, तर अशा स्वयंसेवी समूहातून मोफत प्रशिक्षणदेखील मिळत असते. ‘पुणे रनर्स’तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.

पण प्रशिक्षणाच्या बाबतीतला हा स्वयंसेवी प्रकार किती शास्त्रशुद्ध असतो यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले जाते. किंबहुना यातील अनेकजण केवळ खूप काळ धावतात म्हणून प्रशिक्षण देण्यास पात्र ठरतीलच असे नाही. त्यासाठी शरीरशास्त्राचे योग्य ते ज्ञान आणि जाणीव असणे महत्त्वाचे असते. अन्यथा केवळ धावण्याच्या प्रशिक्षणांमुळे भविष्यातील आजारांना आमंत्रण मिळू शकते. सध्याच्या या वाढत्या मॅरेथॉनप्रेमात हे विसरून चालणार नाही.

मॅरेथॉनच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे गेल्या काही वर्षांत महानगरातच नाही तर अनेक छोटय़ामोठय़ा शहरांतदेखील मॅरेथॉनच्या आयोजनाचे जणू काही पेवच फुटले आहे. मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला (पूर्वीची स्टॅन्डर्ड चार्टड मुंबई मॅरेथॉन) सुरुवातीपासूनच वलय आहे. सुरुवातीला हजारोंच्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होत असत. सध्या अंतरांच्या टप्प्यानुसार वेगवेगळ्या टप्प्याच्या सहभागासाठी पात्रता चाचणी घेतली जाते आणि मगच पुढील सहभाग नक्की होतो. ठाणे महापौर मॅरेथॉन (अर्ध मॅरेथॉन) ही सर्वात जुनी अशी मॅरेथॉन आजही आपली प्रतिष्ठा टिकवून आहे. विशेषत: ठाण्याच्या ग्रामीण भागातील तरुणांचा सहभाग यात हमखास दिसून येतो. सरकारी नोकरी, पोलीस भरतीत मिळणारे प्राधान्य हे त्यामागील आणखी एक कारण असावे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मॅरेथॉन म्हणजे सातारा हिल मॅरेथॉन. डोंगराळ भागातूनच पण डांबरी सडकेवरून होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी सर्वच ठिकाणाहून गर्दी होत असते. डोंगरातील रस्त्यांवर एकाच वेळी मोठय़ा संख्येने धावणारे धावपटू हे याचे वैशिष्टय़. मॅरेथॉनच्या वाढत्या लोकप्रियतेचा वापर युनेस्कोच्या वारसास्थळांसाठी देखील सध्या केला जात आहे. लोकांनी ही वारसास्थळं पाहावीत हा यामागचा उद्देश. यात वेळ-अंतराचे बंधन नसते. ‘हेरिटेज रिनग’ या नावाने हे उपक्रम होतात. सहभागींना स्थानिकांनी तयार केलेली मेडल्स दिली जातात. ४२ किमीपेक्षादेखील मोठय़ा अंतराच्या अल्ट्रा मॅरेथॉनदेखील सध्या आपले स्थान निर्माण करत आहेत. अल्ट्राच्या धर्तीवर मुंबईतील ‘शिवाजी पार्क रनर्स’तर्फे मुंबई अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. ही मॅरेथॉन निशुल्क असते. १२ तास शिवाजी पार्क ते वरळी धावायचे, यात पहिला-दुसरा क्रमांक, वेगाचे गणित नसते. धावणे महत्त्वाचे असते.

बहुतांश मॅरेथॉनमधील सशुल्क सहभाग, धावण्यासाठी किमान वैयक्तिक साधनसामग्री (बूट, योग्य कपडे) आणि प्रशिक्षणाचा खर्च पाहता हे प्रकरण सोपे असले तरी खर्चीकदेखील आहे. बाहेरगावच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचे असेल तर प्रवासखर्च व राहण्याचा खर्चदेखील वाढतो. या सर्वामुळे कदाचित मॅरेथॉन सहभागींचा दुसरा वर्ग यात अधिक प्रमाणात दिसून येतो. या गटातील लोकांबद्दल एक नवी संकल्पनादेखी सध्या प्रचलित आहे. ती म्हणजे मामील- मिडल एज मेन इन लायक्रा. लायक्रा हा ताणल्या जाणाऱ्या कापडाचा प्रकार आहे. या वयोगटातील काही माणसं मस्ती मजेत या मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात, त्यावरून ही संकल्पना वापरली जाते.

थोडक्यात काय तर लोकांच्या वाढत्या सहभागातून मॅरेथॉन आयोजन हा एक व्यवसायही झाला आहे. सशुल्क असल्या तरी मॅरेथॉन काळातील सुविधा वगरेंसाठी अनेक प्रायोजकांकडून आयोजकांना अर्थप्राप्ती होत असते. काही ठिकाणी मिळणाऱ्या पशांचा योग्य तो विनियोग करून ठरावीक अंतरावर उत्साहवर्धक पेयं, मदतनीस, मार्गदर्शक, वैद्यकीय मदत, उत्तम आणि योग्य असा नाश्ता, मेडल्स, टीशर्ट वगरे सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तर काही ठिकाणी त्याबाबत अगदीच आनंद असतो. काही आयोजक केवळ यातील अर्थप्राप्तीवरच डोळा ठेवून असतात, मग अशा ठिकाणी सहभागींच्या संख्येवर पुढील वेळी आपोआपच परिणाम होतो.

अर्थात मॅरेथॉनची ही संख्या वाढता वाढता वाढे अशीच होताना दिसत आहे. त्यातील चांगला भाग सोडला तर ते अजीर्ण होणार नाही याकडे पण लक्ष द्यावे लागेल. पण ही एक न संपणारी बाजारपेठ आहे याची जाणीव अनेकांना झाली आहे. १००-२०० टक्के वाढ असणारी बाजारपेठ यातून तयार झाली आहे. जगभरात यापूर्वीच मॅरेथॉनसंदर्भातील यंत्रणा चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत. अ‍ॅमस्टरडॅम, टोकियो, बíलन, लंडन आणि बोस्टन येथील मॅरेथॉन या आज जगातील मेगा मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जातात. तेथील सार्वजनिक स्वराज्य संस्थादेखील यांच्या आयोजनात सक्रिय असतात. किंबहुना मॅरेथॉन आणि समाजाची तंदुरुस्ती हे गणित या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुरेपूर ओळखले आहे. त्यामुळेच अशा यंत्रणेसाठी त्यांच्याकडून पुरेपूर सहाय्य केले जाते. आपल्याकडील या वाढता वाढे स्पध्रेतून अशीच तंदुरुस्त यंत्रणा आणि समाज उभा राहील ही किमान अपेक्षा यानिमित्ताने करायला हरकत नाही.

४२ किमीचं गणित

मॅरेथॉन हे ग्रीसमधील एका गावाचं नाव. कधीकाळी इतिहासात एका दूताने पळत जाऊन येथे संदेश पोहोचवला. तो ज्या ठिकाणाहून निघाला तेथून ते मॅरेथॉन गावाचे अंतर ४१.१९५ किमी होते. त्यावरून मॅरेथॉन आणि ४२ किमीचं गणित पक्क झाले असल्याचे सांगितले जाते. ख्रिस्तोफर मॅकडगल या लेखकाने त्याच्या ‘बॉर्न टू रन’ या पुस्तकात हे ४२ किमीचं गणित आणखीन विस्तृतपणे मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याशिवाय लेखकाने धावण्याची प्रेरणा, जैविक गणित यासाठी प्रयोगदेखील करून पाहिले. धावण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तारा हुमारा या मेक्सिकोतील जमातीचा त्याने अभ्यास केला. या जमातीतील लोक अनवाणी धावतात. हेच लोक का उत्तम धावतात हे तपासण्यासाठी त्यांनी चारजणांची विशेष चाचणी धाव आयोजित केली होती. पायात अगदी पातळसा चामडी सॅण्डलसदृश्य वहाण घालून तारा हुमारा सुसाट धावतात. तारा हुमारा तशी नागरीकरणाचा फारसा स्पर्श न झालेली जमात आहे. या चाचणी धावेनंतर लेखक अनवाणी धावण्याचा पुरस्कार करतो.

पुस्तकाच्या पुढच्या टप्प्यात ४२ किमीचं गणित मांडताना लेखक आणखी एका आदिम जमातीचा संदर्भ घेतो. दक्षिण आफ्रिकेतील ही जमात काही प्रमाणात अजूनही शिकारी टोळ्यांच्या पद्धतीने जगणारी आहे. या जमातीतील हरणाची शिकार करण्याची पद्धत लेखकाने अभ्यासली. शिकारी जमाव मागे लागल्यानंतर अशक्त हरीण मागे पडते. त्या हरणाबरोबर दोन जण त्याबरोबर धावू लागतात. मात्र ते त्या हरणाला पकडत नाहीत, पण त्याचा पाठलाग करून त्याला पळायला प्रवृत्त करत राहतात. अखेरीस ते हरीण जेव्हा दमून जमिनीवर पडते तेव्हा जमावातील इतर जण येऊन त्या हरिणाची शिकार करतात. हरीण पळायला लागल्यापासून दमून ते पडते आणि त्याबरोबर धावणारेदेखील दमून थांबतात ते अंतर साधारणपणे ४२ किमी असते. या आधारे लेखक जनुकीय अभियांत्रिकी (जेनिटिक इंजिनीअिरग) आणि ४२ किमीचा एकमेकांशी संबंध असावा असा मुद्दा उपस्थित करतो.

ट्रायथलॉन, ट्रेल रिनग ते ला अल्ट्रा

मॅरेथॉनचा पुढचा टप्पा म्हणजे ट्रायथलॉन. धावणे, सायकिलग आणि पोहणे अशा तिन्ही गोष्टी एकत्र असणारा हा प्रकारदेखील सध्या लोकप्रिय होत आहे. त्यातील सहभागींची संख्या मर्यादित असली तरी त्यात वाढ होत आहे. तर दुसरीकडे ट्रेल रिनग हा दुसरा प्रकार चांगलाच जोर पकडताना दिसतो. डोंगरातील वाटांवरून आखलेली मॅरेथॉन असे याचे वर्णन करता येईल. यामध्ये तीस किमीपासून १०० किमीपर्यंत अंतर असू शकते. हिमालयाच्या पायथ्याशी या स्पर्धा बऱ्याच आधीपासून होत आहेत. अगदी एव्हरेस्टच्या तळछावणी (बेसकॅम्प) पर्यंतचे ट्रेल रिनग प्रसिद्ध आहे. आपल्या देशातदेखील केरळ (मलनाड),  महाराष्ट्र (कल्याणजवळ रायता), कर्नाटक अशा ठिकाणी ट्रेल रिनग आयोजित केले जाते. नुकतीच सिंहगड-राजगड-तोरणा ट्रेल मॅरेथॉन झाली होती आणि तिला चांगला प्रतिसाद होता.

डोंगराळ भागातील लोकप्रिय होत असलेली मॅरेथॉन म्हणजे लडाख मॅरेथॉन. ही मॅरेथॉन २१, ४२ आणि ७२ किमीची असते. ७२ किमीच्या रुटमध्ये मॅरेथॉन नुंब्रा व्हॅलीतील खारदुंग गावातून सुरू होऊन खारदुंग ला ही १८ हजार ३८० फूट उंचीवरील िखड पार करून लेहला संपते. ४२ किमीची मॅरेथॉन यशस्वी केली असली तरच ७२ किमीच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेता येतो. यावर्षी या मॅरेथॉनमध्ये ७२ किमी अंतर यशस्वी पार करणारा सुदीप बर्वे सांगतो, ‘यासाठी भरपूर सराव अपेक्षित आहे. नेहमीच्या मॅरेथॉनमध्ये फिटनेससाठी धावणे हा उद्देश असला तरी येथे मात्र त्यापलीकडे जाऊन विचार होतो. केवळ फिटनेसपेक्षा काहीतरी मिळवणे हे उद्दिष्ट असते. महत्त्वाचे म्हणजे यावर्षीच्या लडाख अल्ट्रामध्ये परदेशी नागरिकांची संख्या तुलनेत कमी होती आणि भारतीयांची संख्या वाढलेली होती.

या सर्वातील कठीण प्रकार म्हणजे ला अल्ट्रा मॅरेथॉन. लडाखमध्ये घेतल्या जाणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये मोठय़ा िखडीचे अंतर धावत चढणे आणि उतरणे अपेक्षित असते. १११, २२२ आणि ३३३ किमी असे तीन टप्पे यामध्ये असतात. या ठिकाणी मात्र पात्रतेनुसारच प्रवेश दिला जातो.