24 April 2018

News Flash

‘ती’चा कणखर एकटेपणा!

आजची तरुणी हवं तसं जगता यावं म्हणून ठरवून अविवाहित राहते.

एकेकाळी लग्न न झालेल्या, न होऊ शकलेल्या अविवाहित स्त्रीच्या वाटय़ाला आलेला एकटेपणा तिचं बिचारी असणं अधोरेखित करायचा. पण आता तसं राहिलेलं नाही. आजची तरुणी लग्नातून येणाऱ्या जबाबदाऱ्या नकोत, स्वातंत्र्य हवं, हवं तसं जगता यावं म्हणून ठरवून अविवाहित राहते. पूर्वीचं अविवाहित असणं ही तिची अगतिकता होती. पण आताच्या काळातला असा निर्णय म्हणजे तिचा ठामपणा असतो. तिची विकसित झालेली निर्णयक्षमता असते. यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने आजच्या स्त्रीच्या या कणखर एकटेपणाचा शोध..

‘मुलगी वयात आली’ असं म्हणण्यापासून एखाद्या स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. मग विशीत प्रवेश करण्याचा आणि त्यानंतर पंचविशी गाठण्याचा टप्पा. त्यानंतर चर्चा सुरू होते ते दोनाचे चार हात करण्याची. ते असतं लग्नाचं वय! पण आता हे लग्नाचं वय थोडं पुढे गेलंय. काही जणी तिशी आली तरी लग्नाच्या बोहोल्यावर चढू इच्छित नाहीत. तर काही जणी या बोहोल्यावर उभं राहण्यालाच ठाम नकार देतात. अर्थातच त्या लग्न न करण्याचा निर्णय घेतात आणि एकटं राहणं पसंत करतात. लग्न न करणं याकडे आपल्या समाजात आजही भुवया उंचावूनच बघितलं जातं. पण खरं तर स्त्रियांच्या वैचारिक आणि आर्थिक स्वातंत्र्यातून त्या घेत असलेल्या या निर्णयाची दखल घ्यायलाच हवी. स्त्रियांच्या या निर्णयामुळे समाजात होऊ घातलेल्या बदलांकडे लक्ष वेधायला निमित्त आहे, जागतिक महिला दिनाचं.

समाजात सतत बदल होत असतात. काळानुसार त्या-त्या वेळी ते बदल स्वीकारलेही गेले. आजही स्वीकारले जाताहेत. किंबहुना ते स्वीकारावे लागतीलच. व्यक्तिगत स्वरूपातही हे बदल झाले आणि कुटुंब म्हणूनही त्यात बदल झाले. स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेत बदल झाले. आर्थिक स्तरांच्या व्याख्या बदलल्या. स्त्रिया कमवू लागल्या. असे असंख्य बदल सांगता येतील. असाच एक बदल अलीकडच्या काळात प्रकर्षांने दिसू लागलाय. तो आहे, ठरवून, लग्न न करता, एकटय़ा राहणाऱ्या स्त्रियाचं प्रमाण जाणवण्याइतकं वाढण्याचा. आता याला ‘लाट’ असं म्हणता येत नसलं तरी ती नव्या बदलाची सुरुवात नक्कीच आहे. त्याच्या कारणमीमांसेकडे लक्ष द्यायलाच हवं.

शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन महत्त्वाच्या गोष्टींमुळे स्त्रियांच्या वैचारिक क्षमतेवर निश्चितच प्रभाव पडलेला दिसून येतो. कोणताही बदल हा उच्चभ्रू वर्गातून मध्यमवर्गाकडे येतो. ठरवून लग्न न करण्याचा निर्णयही असाच उच्चभ्रू वर्गामार्गे आलेला आहे. फरक इतकाच की आता तो वेगाने मध्यमवर्गातही पसरतोय. पण असं काय घडतंय की स्त्रियांना असा निर्णय घ्यावा लागतोय, नेमकं काय कारण असेल याचं महत्त्वाचं आणि मूळ कारण मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे समजावून सांगतात. ‘कोणतीही व्यक्ती एखादा निर्णय अचानक घेत नाही. मग ती व्यक्ती गरीब असो, पीडित असो वा दुर्बल. ती स्वत:ला मध्यबिंदू समजून विशिष्ट निर्णय घेते. या निर्णय घेण्याच्या क्षमतेला शास्त्रीय भाषेत हिडॉनिस्टिक कॅलक्युलस असं म्हणतात. हिडॉन म्हणजे प्लेझर; आनंद. कोणताही निर्णय घेताना त्या व्यक्तीने अमुक एखादी गोष्ट करायची की नाही याचा विचार त्या कॅलक्युलसमध्ये होत असतो. ती गोष्ट केली तर आणि केली नाही तर काय होईल किंवा उशिरा झाली तर काय होईल किंवा त्याचा फायदा-तोटा काय असा सगळा विचार त्या वेळी केला जातो. हिडॉनिस्टिक कॅलक्युलर त्या व्यक्तीला त्यातली सकारात्मकता आणि नकारात्मकता सांगतो. हे सगळं अतिशय गणिती पद्धतीने होत असतं. आपण घेत असलेल्या निर्णयात आपल्याला काय मिळणार, त्यात फायदा काय, कोणता आनंद मिळणार असा विचार ती व्यक्ती करत असते. पण प्रत्येक व्यक्तीची आनंदाची व्याख्या वेगळी असू शकते. दर वेळी पैसे, ऐषोआराम यातूनच आनंद मिळतो असं नाही. त्यामुळे ठरवून लग्न न करण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रियासुद्धा या हिडॉनिस्टिक कॅलक्युलसनेच निर्णय घेतात. सुशिक्षित, सबल-सक्षम स्त्रिया लग्न न करता एकटं राहण्याचा निर्णय घेतात. केवळ उच्चशिक्षित, बँकेत नोकरी करणारी, मोठय़ा कंपनीत उच्च पदावर असलेली किंवा फिल्मस्टार अशा स्त्रियाच अशा प्रकारे एकटं राहण्याचा निर्णय घेतात असं अजिबात नाही. समाजातील निम्न आर्थिक स्तरातील स्त्रियासुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतात. या स्तरातील स्त्रिया पूर्वीसुद्धा लग्नाच्या बंधनातून बाहेर पडायच्या. प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांच्या बाबतीत सांगितलं जातं की त्यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या पतीने त्यांना गाणं थांबवायला सांगितलं. तेव्हा त्यांनी   ‘गाणं सोडावं लागणार असेल तर मला लग्नात अडकायचं नाही,’ असं बजावून घटस्फोट घेतला. हेच ते हिडॉनिस्टिक कॅलक्युलस. विशिष्ट निर्णय घेतल्यानंतर काय होईल याचा त्यांनी विचार केला. संगीतात मिळणारा आनंद त्यांच्यासाठी मोठा होता. त्यामुळे पैशांसाठी नाही तर संगीतामुळे मिळणाऱ्या आनंदासाठी त्यांनी तो निर्णय घेतलेला होता.’

आपण करत असलेल्या कोणत्याही कृतीतून आपल्याला काय मिळणार, त्यात आपला काय फायदा असा विचार करणं हे मानवी स्वभावातच आहे. आता हा फायदा वेगवेगळ्या रूपांत असू शकतो. पैसे, आनंद, समाधान, करमणूक अशा कोणत्याही स्वरूपात हा फायदा असू शकतो आणि तो शोधला जातोच. त्यामुळे स्त्रियासुद्धा लग्न न करण्याचा निर्णय घेताना त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा मिळणार आहे याचा विचार आवर्जून करतात. एखादीला लग्न हे बंधन वाटत असेल आणि तिला त्या बंधनात राहायचं नसेल; तर दुसरीला लग्न झाल्यानंतरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं नको असेल; एखादीला मुक्त जगायचं असेल; तर आणखी कोणाला तरी तिच्या सोयीने हवं तिथे हवं तेव्हा फिरायचं असेल, वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव घ्यायचा असेल. असे वेगवेगळे फायदे त्यांच्या निर्णयामागे दडलेले असतात. ठरवून अविवाहित राहण्यामागे दोन भाग असल्याचं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जान्हवी केदारे सांगतात, ‘स्त्रिया आता ठरवून अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात याकडे सकारात्मकदृष्टय़ाच बघितलं जातं. स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना तसं राहावंसं वाटतं. शिवाय करिअरमध्ये विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना तिथं बराच वेळ द्यावा लागतो. आवश्यक तेवढी बुद्धी खर्च करावी लागते. अशी ध्येयं गाठताना कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्याही घ्याव्या लागतात. अशा वेळी एकटं राहिलं तर बरं होईल असा त्या विचार करतात. त्यांची काही वैयक्तिक ध्येयंही असतात. त्यात त्यांना कुटुंबाची गरज वाटत नाही. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य जपायचं असतं. कधी कधी असंही होतं की, तिचं करिअर, तिचं शिक्षण हे लक्षात घेता लग्नासाठी तिला अपेक्षित असा जोडीदार मिळत नाही. या आपसूकच मिळालेल्या स्वातंत्र्याची आवड तिच्यात निर्माण होते. त्यामुळे अविवाहित राहण्यामागे असे दोन भाग आहेत.’ याला जोडूनच एक महत्त्वाचा मुद्दा आंध्र विद्यापीठातील सामाजिक कार्य या विषयाच्या माजी प्राध्यापिका विजयालक्ष्मी सांगतात, ‘अविवाहित राहण्याचा काहींचा निर्णय ऐच्छिक असतो, तर काहींना तो नाइलाजाने घ्यावा लागतो हा महत्त्वाचा फरक इथं लक्षात घ्यायला हवा. पूर्वीच्या काळीसुद्धा अविवाहित राहण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रिया होत्या. पण त्यांना तो निर्णय नाइलाजाने घ्यावा लागायचा. घरातील वडीलधाऱ्या माणसांचं निधन झाल्यानंतर घरातल्या मोठय़ा भावंडाला इतर भावंडांची काळजी घ्यावी लागायची, त्यांचं शिक्षण पूर्ण करावं लागायचं. अशा परिस्थितीत मोठी बहीण असेल तर ती लग्न करत नसे. पण आताची परिस्थिती बदलली आहे. आता स्त्रिया त्यांच्या स्वातंत्र्यासाठी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात. त्यांना जगण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहण्याची गरजच नसते. अविवाहित राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगता येते.’ पूर्वीच्या काळीही अविवाहित राहणाऱ्या स्रियांची लग्न न करण्याची कारणं वेगळी होती हे इथं स्पष्ट होतं.

पूर्वीच्या काळात पुरुषप्रधान समाजात स्रीने ठरवून असा निर्णय घेण्याची शक्यता खूप कमी होती.  आता परिस्थिती बदलली असल्यामुळे स्त्रियांनी असे ठामपणे निर्णय घेतलेले दिसतात. लग्न न करता एकटं राहण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांचं बऱ्यापैकी सक्षमीकरण झालेलं आहे. शिवाय त्यांच्या घरातील लोक स्त्री-पुरुष समानता मानणारे असू शकतात.  पूर्वी घरकाम करणाऱ्या स्रीच्या कामाला मूल्य नव्हतं. घरातल्या पुरुषांनी जेवून झाल्यानंतर त्या स्त्रीने जेवायचं, घरातून नोकरीसाठी जाणाऱ्या प्रत्येकाला डबा द्यायचा अशा अनेक छोटय़ा छोटय़ा कामांची अपेक्षा स्त्रियांकडून केली जायची. आजच्या पुष्कळ स्त्रियांनी यातून येणारा ताण प्रत्यक्ष अनुभवलेला नसतो, पण त्यांच्या आई-बहिणीच्या आयुष्यातला ताण त्यांनी बघितलेला असतो. डॉ. देशपांडे यांनी सांगितलेल्या हिडॉनिस्टिक कॅलक्युलस संकल्पनेनुसार अशा स्त्रियांना प्रश्न पडतो की, त्यांना नेमकं काय करायचंय, त्याचे परिणाम काय आहेत आणि मग त्या त्याबद्दल प्रश्न विचारू लागतात आणि निर्णयापर्यंत पोहोचतात. एखादी स्त्री एकटी राहत असेल तर तिच्याबद्दल चर्चा होते, मात्र एखादा पुरुष एकटा राहत असेल तर त्याच्याबद्दल इतकं बोललं जात नाही. पुरुषप्रधान संस्कृतीचा हा पगडा अजूनही काही वेळा दिसून येतो.

पुरुषप्रधान समाजाविषयी डॉ. देशपांडे अधिक विस्तृतपणे सांगतात, ‘स्त्रीच्या आयुष्यात पुरुषाची साथ असणं हे पुरुषप्रधान समाजाने समाजाच्या दृष्टीने आवश्यक करून ठेवलंय. याला आता काही स्त्रिया आव्हान देताहेत. स्त्रियांच्या आयुष्यात पुरुषाची साथ आवश्यक करून त्यांच्याचकडून कामं करून घेतली जात होती. केअरटेकर म्हणजे काळजीवाहू (स्त्री) आणि प्रोव्हायडर म्हणजे प्रदाता (पुरुष) असे दोन भाग पडले. पुरूषाला म्हणजे प्रोव्हायडरला जे महत्त्व मिळतंय ते स्रीला म्हणजे केअरटेकरला मिळू नये म्हणून त्याने एक शक्कल लढवली. स्रीला पुरुषावर संपूर्णपणे अवलंबून रहायाला भाग पाडलं. म्हणूनच स्रीच्या कामाला महत्त्व नसून पुरूषाच्या कामाला महत्त्व आहे. असं हळूहळू पुरुषप्रधान समाजात स्त्रियांचं महत्त्व कमी होत गेलं. त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. त्यांना त्यांच्या कामाचं श्रेयदेखील द्यायचं नाही, असा हा प्रकार होता. केलेल्या कामाचं श्रेय मिळालं नाही की ताणतणाव जास्त निर्माण होतो. स्त्रीचं वागणं सीतेसारखं असावं असं पूर्वीपासून म्हटलं जातंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतींनी सगळ्याच संस्कृतींमध्ये स्त्रीचं वागणं कसं असायला हवं याबद्दलच्या विशिष्ट गोष्टी ठरलेल्या आहेत. पण आता स्त्रियांचं सबलीकरण झाल्यामुळे त्या याच्या विरोधात जाऊ लागल्या आहेत. आमचं आयुष्य आम्हाला जगायचंय असं त्या ठामपणे म्हणू लागल्या. म्हणूनच आता घटस्फोटाचं प्रमाणही वाढतंय. अर्थात घटस्फोटात कोणा एकाचीच नेहमी चूक असते असं म्हणायचं नाही. पण पूर्वी स्त्रीला सुरक्षिततेची भावनाच नव्हती. आता त्या सक्षम झाल्यामुळे ‘माझ्या मनासारखं होत नसेल तर मला हे लग्न नको’ असं स्पष्ट सांगतात. यात गैर काहीच नाही. पण या सगळ्यामुळे समाजाचा, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होतोय अशा प्रकारचं चित्रं रंगवलं जातंय. पण स्त्रियांचं हे धाडसी पाऊल पुरुषप्रधान समाजाला आव्हान आहे. स्त्रियांना सांस्कृतिक बाबींचं महत्त्व कितीही पटवून दिलं तरी शिक्षणामुळे त्यांच्यात येणारा आत्मविश्वास, त्यांचं होणारं सक्षमीकरण आणि त्यांना मिळणारं आर्थिक स्वातंत्र्य यांमुळे ‘मी हे का करायचं’ हा विचार त्यांच्या मनात येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे.’

अलीकडे घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय. यामागे स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण ही दोन कारणं आवर्जून दिली जातात. अर्थात प्रत्येक वेळी घटस्फोटात स्त्रीची चूक असते असं नाही. पण तरी सध्या वाढत असलेल्या घटस्फोटाच्या महत्त्वाच्या कारणांपैकी ही दोन कारणं आहेत. म्हणूनच आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण याच दोन बाबींचा विचार करत स्त्रीने लग्न न करण्याचं ठरवून एकटं राहायचं ठरवलं तर त्यांचं बदलाकडे जाणारं हे एक पाऊल म्हणावं लागेल. हा बदल सकारात्मक आहे की नकारात्मक हे आता सांगता येत नसलं तरी हा बदल पुढे वाढत जाईल एवढी शक्यता मात्र स्पष्ट दिसून येते. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन महत्त्वाच्या गोष्टी मानल्या तरी फक्त त्याच दोन गोष्टी या ट्रेण्डला कारणीभूत आहेत असं नाही, असं डॉ. केदारे स्पष्ट करतात. त्या सांगतात, ‘शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यापेक्षाही एखाद्या स्त्रीला स्वत:विषयीच्या, स्वांतत्र्याच्या, करिअरच्या आणि आयुष्य घडवण्याच्या कल्पना जास्त महत्त्वाच्या वाटतात. या सगळ्याचा एक भाग म्हणून आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण याकडे बघायला हवं. काही वेळा अविवाहित राहण्याचा निर्णय टक्केटोणपे खाऊनही घ्यावा लागतो. प्रेमभंग, योग्य जोडीदार न मिळणं आणि अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार न मिळाल्यानेही त्या स्त्रीने एकटं राहणं पसंत केलेलं असतं. पण काही वर्षांनी तिच्या लक्षात येतं की, ती तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने तिला हवं तसं ती जगू शकते. एकटं राहूनही ती घर, गाडी घेते. हळूहहळू तिला असं एकटं राहणं अधिकाधिक पसंत पडू लागतं आणि म्हणून ती स्वेच्छेने अविवाहित राहते.’

स्त्रियांच्या लग्न न करता एकटं राहणाच्या निर्णयामागे असलेल्या कारणांमागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तिची सोय. या सगळ्यात तिची सोय खूप महत्त्वाची ठरते. तिच्या सोयीला पूर्वीच्या काळी काहीच स्थान नव्हतं. ते आता मिळू लागलंय; किंबहुना ती ते मिळवतेय. पूर्वीच्या काळी स्त्रिया नऊवारी साडय़ा नेसायच्या. कालांतराने काही स्त्रिया सहावारी साडय़ांवर आल्या. सहावारी साडी नेसणाऱ्या स्त्रीवर कदाचित तेव्हा चर्चा झाली असेल. त्यानंतर साडीवरून हा बदल पंजाबी ड्रेसवर आला. तेव्हाही असंच झालं. आणि आता तर हा बदल जीन्स, कुर्ता इथवर झालेला आहे. या प्रत्येक बदलात त्या-त्या काळातल्या स्त्रीची सोय होती. तेच आता तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दलही आहे. काही स्त्रियांना आता लग्न हे सोयीचं वाटत नाही. पुरुषांना मात्र ते सोयीचं वाटतं. यांच्या सोयीला धक्का पोहोचू नये म्हणून स्त्रियांना पुरुषांची गरजच आहे, स्त्रीने एकटं राहणं कसं कठीण आहे; हे सगळं पुरुषप्रधान समाजाने तयार केलंय. स्त्रियांनी मात्र आता या सगळ्याला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे.

काही जणी मुद्दाम ठरवून अविवाहित राहण्याचा निर्णय घेत नाहीत, तर त्यांच्या रोजच्या जगण्याच्या प्रवाहात अप्रत्यक्षपणे तसा विचार रुजतो. सहाय्यक प्राध्यापक असलेल्या प्रीती पटेल सांगतात, ‘मी ठरवून अविवाहित राहयचं असं कधीच ठरवलं नाही. पंचविशीत असताना एका रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर ते पुढे जाऊ शकलं नाही. ब्रेक अप झाला त्यानंतर २७-२८ वर्षांची असताना औषधनिर्माणशास्त्रात पीएच.डी. पूर्ण करून नोकरीला लागले. ट्रेकिंग तर आधीपासून सुरु होतेच. त्याचबरोबर वाइल्ड लाइफमध्ये रस आहे हे जाणवू लागलं. लग्नानंतर एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात होणारे बदल मला माझ्या बहिणीकडे बघून समजत होते. एखाद्या स्त्रीकडून समाजाच्या आणि तिच्या घरच्यांच्या किती अपेक्षा असतात हेही कळलं. मी स्वत:ला चाचपडू लागले. मला चूल आणि मूल यात जराही रस नाही हे तर निश्चित होतं. या दोन गोष्टी सोडून मला स्वीकारणारी व्यक्ती मला भेटली असती तर कदाचित लग्नाचा विचार मी केलाही असता. पण तसं झालं नाही. तशी एखादी व्यक्ती आली असली तरी त्या व्यक्तीशी जुळलंच नाही. लग्न करायचं म्हणून करणं मला पटत नाही. भविष्यात अशा प्रकारची एखादी व्यक्ती भेटली तिच्याशी माझे विचार, स्वभाव जुळत असेल तर मी कदाचित लग्न करेनही. लग्न करायचंच नाही, असं नाही. पण करायचं म्हणून किंवा सगळेच करतात म्हणून मी करणार नाही. हा निर्णय घेताना तुमचा विचार स्पष्ट हवा. तुमची प्राधान्यं तुम्हाला कळायला हवीत. एखादी हवी असलेली गोष्ट स्वीकारताना त्यासोबत जबाबदाऱ्याही येतात. लग्न आणि मूल मनापासून हवं असेल तर त्याच्या जबाबदाऱ्याही स्वीकारायला हव्यात.’

प्रीतीच्या मुद्दय़ांना दुजोरा देत वॉटर एटीएम प्रोजेक्टवर काम करणाऱ्या प्राची पाठक सांगतात, ‘शिक्षण झाल्यानंतर लग्नाचं वय असताना लग्न करायचं की नाही याबाबत मला काहीच स्पष्टता नव्हती. ती नंतर हळूहळू येत गेली. मी नाशिकहून मुंबईला राहायला आले. तिथे मी एकटीच राहत होते. सुरुवातीच्या काळात हॉस्टेलवर राहिले. नंतर लग्नाच्या वयात स्वत:ची खोली घेऊन राहत असताना लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो हे मला जाणवलं. म्हणजे कुतुहलापोटी चौकशी केली जाते. ती सहज असली तरी या सगळ्याचा हा एक पैलू आहे, हे माझ्या लक्षात आलं. मला लग्न करायचं नाही हे स्पष्ट आहे. पण एखादा योग्य जोडीदार मिळाला तर तो माझा कम्पॅनिअन असू शकेल, पण लग्न नाही. लग्न करायचं नाही असं ठरवलेलं नसताना माझ्या आयुष्यात ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत गेल्या त्यात मी रमत गेले. माझ्या मैत्रिणींची लग्नं झाली पण माझं नाही असा माझा निराशेचा सूर कधीच नव्हता. २२-२५ वर्षांची असताना अमेरिकेत कल्चर एक्स्चेंज कार्यक्रमासाठी गेले होते. त्या वेळी परदेशी कुटुंबांमध्ये राहत असताना मूल दत्तक घेण्याचा विचार माझ्या डोक्यात आला. मी हा विचार काही लोकांशी शेअर केला. पण तेव्हा काहींनी सांगितलं की, मुलाला आई-बाप असे दोन्ही लागतात. ती एक जबाबदारी असते. असे सगळे मुद्दे कळल्यावर मूल दत्तक घेणं याबद्दल आपल्याला फक्त आकर्षण वाटत आहे हे मला पटू लागलं. आता मात्र मूल दत्तक न घेण्याचा निर्णय योग्यच होता असं वाटतंय. मुलाच्या जबाबदारीसाठी पैसे कमावणं ही गरज होते. मला ती जबाबदारी नकोय. आता मला नोकरी सोडाविशी वाटली तर मी ती लगेच सोडू शकते. मला एका शहरातून दुसरीकडे जायचं तर मी लगेच जाऊ शकते. त्यामुळे मी जे काही करेन ते माझ्या एकटीसाठी आणि माझ्या जबाबदारीवर असेल.’

लग्न करून संसाराचं ओझं घ्यायला आजच्या काही स्त्रिया तयार नाहीत. पण त्यांना मातृत्व हवंय. अशा निर्णयांमध्ये मानसिक बळ प्रचंड लागते. अमेरिकेत काही स्त्रियांना वाटतं की लग्न न करता मातृत्वाचा आनंद घेऊ म्हणून त्या मूल दत्तक घेतात. तर काही स्त्रिया म्हणतात की लग्न नको, पण लिव्ह इन रिलेशनशिप चालेल. तर काही म्हणतात लग्न करू पण पटलं नाही तर घटस्फोट घेऊ. असा वेगवेगळा विचार करणाऱ्या स्त्रिया तिथे आहेत. हे आता आपल्याकडे हळूहळू येतेय. आपल्याकडेही लग्न न केलेल्या स्त्रियांचा मूल दत्तक घेण्याचा कल वाढतोय. मूल दत्तक घेताना ती व्यक्ती वेगवेगळा विचार करत असते. सोबत हवी म्हणून दत्तक घ्यावं किंवा कोणीतरी आई म्हणावं म्हणून दत्तक घ्यावं असे वेगवेगळे विचार असतात. डॉ. देशपांडे हे आणखी विस्तृतपणे सांगतात, ‘प्रत्येक निर्णयाचं आपण समर्पक कारण देऊ शकत नाही. बऱ्याचशा गोष्टी अवचेतन (सबकॉन्शिअस) पातळीवर असतात. एखाद्या व्यक्तीच्या मनातला हिडॉनिस्टिक कॅलक्युलस त्याला काय करायला हवं हे सुचवतो. त्याविषयी त्याला कोणी विचारलं की तुम्ही असं का केलंत तेव्हा तो एक उत्तर देतो आणि ते लोकांनी स्वीकारावं असं त्याला वाटत असतं. त्यात स्वत:चं उदात्तीकरण असतं. फार कमी वेळा ती व्यक्ती त्याची निर्णय घेण्याची प्रक्रिया समोरच्या व्यक्तीला समजावून देऊ शकते. आपले विचार आणि आपल्या मनात होत असलेल्या अनंत गोष्टी या वेगळ्या असू शकतात. आपल्या मनात होणाऱ्या विचारांची रस्सीखेच बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही. पण आपला निर्णय समाजात कसा दिसेल यासाठी आपण आपल्या वर्तणुकीला कारण देत असतो. याला सुसूत्रीकरण म्हटलं जातं. सिगमंड फ्रॉइडने मांडलेला सिद्धांत इथे सांगता येईल. इड, इगो आणि सुपरइगो असे आपल्या मनाचे तीन भाग असतात असं फ्रॉइडने त्याच्या सिद्धांतात म्हटलंय. इड म्हणजे आपला बेसिक ड्राइव्ह (मूलभूत गरजा), सुपरइगो म्हणजे पॅरेंटल प्रोव्हिबिशन्स. हा सुपरइगो आपल्याला समाजात कसं वागायचं हे सांगतो. इगो म्हणजे आपल्या बेसिक ड्राइव्हसुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि त्या समाजाभिमुखही असायला हव्यात. यामध्ये डिफेन्स मेकॅनिझम (संरक्षण यंत्रणा) असतात. त्यांच्या मदतीने आपल्या मनातल्या बेसिक ड्राइव्ह्ज समाजामध्ये पूर्ण केल्या जातात. या पद्धतीला इगो म्हणतात आणि त्या पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. एखादी व्यक्ती एखादे वर्तन करते तेव्हा त्यामागची कारणमीमांसा देताना तिने ती तिची बेसिक ड्राइव्ह म्हणून केली असं सांगते. पण त्याचबरोबर त्यावर समाज आक्षेप घेणार नाही असंही बघावं लागतं. त्यामध्ये मनात जे होतं त्याला सुसूत्रीकरण (रॅशनलायझेशन) असं म्हणतात.’

कोणत्याही वर्तणुकीमागे अनेक कारणं असतात. मूल दत्तक घेण्यामागे मातृत्वाची भावना हे दर्शनीय कारण असू शकतं. पण खरंतर त्यामागे आणखी अनेक कारणं असू शकतात. मूल दत्तक घेण्यामागचं जे कारण त्या स्त्रीला द्यावंसं वाटत असेल तेच ती देणार आणि तेच इतरांना समजणार. त्या स्त्रीच्या मनात जे विचार येतात, त्यांची सगळी प्रक्रिया ती तुम्हाला समजावून सांगणार नाही. कारण तो तिचा आंतरिक भाव असतो. इतर लोक तिला कारण विचारतात तेव्हा ती तुम्हाला तिचा दर्शनीय भाव सांगते, असं डॉ. देशपांडे सांगतात. ‘मूल दत्तक घेण्यामागे विविध कारणं असू शकतात या मुद्दय़ाला डॉ. केदारे दुजोरा देत सांगतात, ‘मूल दत्तक घेताना वेगवेगळे विचार असतात. काही स्त्रियांना त्यांची पुढची पिढी घडवण्यामागे त्यांचा काहीतरी सहभाग हवा असं वाटत असतं म्हणून त्या दत्तक घेतात. तसंच त्यांची मायेची तहान भागवण्यासाठीही मूल दत्तक घेण्याचा त्या विचार करतात. मातृत्वाची ओढ हेसुद्धा त्यांचं एक महत्त्वाचं कारण असतं.’

लग्न न करता एकटं राहणाऱ्या स्त्रियांच्या भविष्यातल्या समस्यांबाबतही विचार होणं तितकंच गरजेचं आहे. खरं तर स्त्रियांच्या समस्या आधीच बऱ्याच आहेत. खूपदा लग्न करताना स्रीचं वय कमी आणि पुरुषांचं जास्त असतं. त्यामुळे अनेकदा पुरुष आधी आणि स्त्रिया नंतर मृत्युमुखी पडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त असते. स्त्रियाचं नैसर्गिक आयुर्मान जास्त असतं. त्यामुळे त्यांच्यापुढे येणाऱ्या समस्यांची दखल घ्यायला हवी. डॉ. देशपांडे सांगतात, ‘समाजात मॅटर्नल मोर्टलिटी (मातेचा मृत्युदर) कमी व्हायला लागतो; तसतसं ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढत जातं. पूर्वीच्या काळात स्त्रियांचं सक्षमीकरण झालं नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधील स्त्रियांची घरच्यांकडून किंवा बाहेरच्यांकडून फसवणूक होत असे. त्यांना त्यांच्या मालमत्तेविषयी, हक्कांविषयी माहिती नसे. पण आता ठरवून लग्न न करता एकटं राहण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्रियांचं स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने सक्षमीकरण झालेलं आहे. त्या आता त्याबद्दल प्रश्न उठवताहेत. पण समाजात एकटं राहण्यासाठी फक्त स्त्री-पुरुष समानतेबद्दल विचार प्रगल्भ असून चालत नाही; तर त्यात व्यावहारिकता, आर्थिक नियोजन या सगळ्याचा विचार होणं गरजेचं असतं. नैसर्गिकदृष्टय़ा स्त्रियांचं आयुर्मान जास्त असलं तरी त्यांच्या व्याधी जास्त आहेत. मेनोपॉझसारख्या (रजोनिवृत्ती) गोष्टी स्त्रियांना जास्त त्रासदायक ठरतात. या सगळ्याचा विचार त्यांनी केला आहे की नाही हे माहिती नाही. स्त्रियांची एकटं राहण्याची प्रक्रिया जितकी वाढत जाईल तितक्या त्या संदर्भातल्या अधिकाधिक सेवांची गरज भासू लागेल. या सगळ्याचा फक्त दुष्परिणामच विचारात घेणं चुकीचं आहे. हा सामाजिक बदल आहे. या बदलाला समाज कसं तोंड देतो; हे महत्त्वाचं आहे. एकटं राहण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रीला वीस वर्षांनंतरही तिचा निर्णय बरोबर वाटेल का, हा विचार तेव्हाच होईल. कुठल्याही निर्णयात एक प्रकारचा धोका असतो. लग्न केल्यानंतर घेतलेल्या निर्णयांमध्ये असलेला धोका दोघांमध्ये विभागला जातो. पण स्त्री एकटी असेल तर तो धोका पूर्णपणे तिलाच हाताळावा लागतो. आता विधवा स्त्रियांना ज्या समस्या आहेत तशाच समस्यांना ठरवून अविवाहित राहणाऱ्या स्त्रियांनाही सामोरं जावं लागेल, अशी शक्यता आहे.’

साधारण २५ वर्षांपूर्वीही स्त्रिया अविवाहित राहण्याचा निर्णय घेत होत्या. पण त्यांच्या त्या निर्णयात असहायता असायची. नाइलाजाने त्यांना तो निर्णय स्वीकारावा लागायचा. पण आताच्या स्त्रिया शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वत:चं आयुष्य मनाप्रमाणे जगण्याची कल्पना यांमुळे ठरवून लग्न न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या स्त्रियांच्या निर्णयात कणखरपणा दिसून येतो; जो पूर्वीच्या स्त्रियांच्या निर्णयात नव्हता. आजच्या स्त्रीचा हा कणखर एकटेपणा म्हणजे आर्थिक, मानसिक, वैचारिक सक्षमतेकडे जाणारं महत्त्वाचं पाऊलच ठरलं आहे. आताच्या स्त्रीमध्ये तिला तिच्या आयुष्यात पुरुष हवा की नको हा निर्णय घेण्याची ताकद आहे. पुरुषप्रधानतेला तिने दिलेलं हे मोठं आव्हान आहे असं म्हणता येईल!

एकटेपणातही नियोजन हवं

विशिष्ट वयानंतर विशेषत: म्हातारपणी आयुष्यात एकटेपणा जाणवतो. त्या वेळी करिअरचं ओझं संपलेलं असतं. असा एकटेपणा कोणाच्याही बाबतीत येऊ शकतो. एकटेपणा येणं, निराश वाटणं, चिंता वाटणं अशा भावना मनात येतात. सभोवताली असलेल्या इतरांची कुटुंब आहेत. माझं नाही; माझं कसं होणार अशी चिंता वाटू लागते. नोकरी-व्यवसाय नसताना एखाद्या स्त्रीने एकटेपणा कसा घालवायचा याचं व्यवस्थित नियोजन करायला हवं. अशा प्रकारचं नियोजन नसेल तर मात्र त्या स्त्रीला निश्चितच अडचणी येऊ शकतात.
– डॉ. जान्हवी केदारे, मानसोपचारतज्ज्ञ

मानसिकदृष्टय़ा स्वतंत्र

एखादी स्त्री ज्या भावंडांमुळे अविवाहित राहते तीच भावंडं मोठी झाल्यावर आपापल्या कामात व्यग्र होतात. त्यांच्या नोकरी-व्यवसायात गुंतलेली असतात. अशा वेळी त्या अविवाहित राहिलेल्या स्त्रीकडे लक्ष दिलं जात नाही. तिची काळजी घेतली जात नाही. अशा वेळी तिला एकटेपणा जाणवू लागतो. तेव्हा ती एखाद्या सोबतीचा विचार करू लागते. तिच्या मनात वेगवेगळे विचार येतात. पण आताच्या स्त्रियांचं असं नाही. पूर्वीच्या काळी त्यागाची वृत्ती होती. आता ती दिसत नाही. आताच्या स्त्रियांना त्यांचं आयुष्य त्यांना हवं तसं जगता यायला हवं असं वाटतं. पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की, आताच्या स्त्रिया अविवाहित राहिल्या तरी त्या पूर्वीच्या काळातल्या स्त्रियांपेक्षा स्वत:ची काळजी स्वत: घेऊ शकतात. कारण आताच्या स्त्रियांकडे शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, मानसिकदृष्टय़ा स्वातंत्र्य अशा सगळ्या गोष्टी आहेत.
– विजयालक्ष्मी, समाजकार्य विषयाच्या माजी प्राध्यापक, आंध्र विद्यापीठ
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11

First Published on March 2, 2018 1:09 am

Web Title: modern days single woman
 1. Shashi Sat Ram
  Mar 9, 2018 at 3:04 pm
  चाहत्यांनी पात्रांना डोक्यावर घेतलेले असते कलाकाराला नाही,पण कलाकार यातच अडकतात वय वाढतं सौंदर्य लयास जातं याचा स्विकार ते करू शकत नाही. मग निराशेपोटी व्यसनी होतात.
  Reply
  1. Anand Kadam
   Mar 2, 2018 at 12:05 pm
   Kitihi swatantryachya thapa marlya tari vastusthithi courtat gelyavar Samjel. Shiklelya kamavnarya baika pan potgi chi bhik magat bastat. Navryavar khotya cases taktat tyache paise uklayla. Lagnat astana kontich jababdari ghet nahit ka tar MI swatantra ahe mi ka karu ghar Kaam. Ka tujha ani tujhya aai vadilancha aiku. Pan paise kharchayche astil tar ti purushachi jababdari ahe. Aaj vivahit purushanchi atmahatya chi rate vivahit mahilanpeksha jast ahe. Pan social media madhye hi khari baju konich sangat nahi. It's better that these type of girls shall remain unmarried rather then to spoil life of boys. Thanks.
   Reply