प्रभा राघवन्

एका क्लोनपासून प्रायोगिक पातळीवर तयार करण्यात आलेले REGEN-COV2 हे प्रतिपिंड द्रावण कोविड-१९च्या संसर्गामुळे गंभीररीत्या आजारी असलेल्या काही रुग्णांसाठी जीव वाचवणारे आहे, असे निष्कर्ष इंग्लंडमध्ये घेण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये काढण्यात आले आहेत. भारतासह उर्वरित जगात कोविड-१९ च्या उपचारांच्या व्यवस्थापनात हे निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

मोनोक्लोनल प्रतिपिंडे म्हणजे काय?

करोनाच्या विषाणूच्या संसर्गाशी लढताना आपले शरीर प्रथिनांची प्रतिपिंडे तयार करते. मोनोक्लोनल प्रतिपिंडे ही कृत्रिम प्रतिपिंडे असतात. ती आपल्या प्रतिकारशक्तीच्या उपक्रमांची नक्कल करतात. माणसाच्या रक्तामधून विशिष्ट प्रतिपिंडे काढून घेऊन त्यांचे क्लोनिंग करून त्यापासून या मोनोक्लोनल प्रतिपिंडांची निर्मिती केली जाते.

विषाणू किंवा त्याचा एखादा विशिष्ट भाग लक्ष्य करण्यासाठी मोनोक्लोनल प्रतिपिंडांची निर्मिती केली जाते. उदाहरणार्थ, REGEN-COV2 हे द्रावण म्हणजे दोन मोनोक्लोनल प्रतिपिंडे एकत्र करून तयार  करण्यात आले असून SARS-CoV-2 च्या प्रोटिन उंचवटय़ाला लक्ष्य करणे हे काम त्याला नेमून देण्यात आले आहे. मोनोक्लोनल प्रतिपिंडे प्रोटिन उंचवटय़ाच्या विशिष्ट भागाशी जोडली जातात आणि निरोगी पेशींना बाधित करण्याच्या कोविड-१९ विषाणूच्या क्षमतेला रोखतात.

कोविड-१९ व्यतिरिक्त मोनोक्लोनल प्रतिपिंडे कॅन्सर, इबोला तसेच एचआयव्ही एड्सच्या उपचारात वापरली जातात.

* ती कोविड-१९च्या संसर्गावरील उपचारात किती महत्त्वाची आहेत?

‘मोनोक्लोनल प्रतिपिंडांच्या क्षमतेमुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. मोनोक्लोनल प्रतिपिंडांच्या या क्षमतेबाबतचा  आशावाद कोविड-१९च्या महासाथीच्या दरम्यानच्या काळात झालेल्या संशोधनातून वाढला आहे. काही मोनोक्लोनल प्रतिपिंडांनी तर विषाणूंच्या वेगवेगळ्या उत्परिवर्तित प्रकारांना अटकाव करण्याची क्षमता दाखवली आहे,’ असे डॉ. अँथनी फौकी सांगतात. ते अमेरिकेच्या अध्यक्षांचे प्रमुख वैद्यकीय सल्लागार असून त्याबरोबरच यूएस नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्शस डिसीज या संस्थेचे संचालक आहेत. ३ जून २०२१ रोजी व्हाइट हाऊसच्या ब्रिफिंगदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.

आजपर्यंत तरी या उपचार पद्धती कोविड-१९चा सौम्य ते मध्यम पातळीवरचा संसर्ग झालेल्या आणि अधिक धोकादायक गटामध्ये असलेल्या रुग्णांसाठी सर्वाधिक यशस्वी ठरल्या आहेत. कोविड-१९चा तीव्र संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर या उपचार पद्धतीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

‘योग्य रुग्णांना योग्य वेळी मोनोक्लोनल प्रतिपिंडे देणे महत्त्वाचे आहे. तसे केले तरच त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो,’ असे डॉ. डी. बेहरा सांगतात. ते चंडीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेतील फुप्फुसशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

‘डेल्टा प्लससारखे नव्याने निर्माण होणारे काही उत्परिवर्तक मोनोक्लोनल अ‍ॅण्टिबॉडीजना दाद देत नाहीत,’ असे डॉ. व्ही. के. पॉल सांगतात. ते निती आयोगाचे सदस्य आणि कोविड-१९च्या लस व्यवस्थापनासंदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष आहेत.

नवीन संशोधन काय दर्शवते?

गेल्याच आठवडय़ात ऑक्सफर्ड विद्यापीठाने सांगितले आहे की, त्यांच्या रिकव्हरी ट्रायल्समध्ये असे आढळले आहे की, कोविड-१९चा तीव्र संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही रुग्णांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होण्याची नैसर्गिक क्षमता नसते. ज्यांना प्रमाणित रुग्णसेवा मिळाली आहे त्यांच्या तुलनेत मोनोक्लोनल प्रतिपिंडं द्रावण या रुग्णांच्या मृत्यूची शक्यता पाचपटीने कमी करते. त्यामुळे अशा पद्धतीने प्रतिपिंड मिश्रणाचा उपचार दिलेल्या दर १०० रुग्णांपैकी सहापेक्षाही कमी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या अभ्यासात म्हटले आहे.

या उपचार पद्धतीमुळे ज्यांच्या शरीरात त्यांची स्वत:ची प्रतिपिंडे तयार करण्याची नैसर्गिक व्यवस्था नाही अशा रुग्णांचादेखील रुग्णालयात राहण्याचा अवधी चार दिवसांनी कमी झाला आहे. त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागण्याचा धोकाही कमी झाला आहे. असे असले तरी असे फायदे ज्यांचा अभ्यास केला त्या सगळ्यांमध्ये आढळले नाहीत. त्यात ज्यांच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होण्याची नैसर्गिक क्षमता आहे अशा रुग्णांचा समावेश होतो.

या  निष्कर्षांचा मूलभूत अर्थ असा की, ही उपचार पद्धत ज्यांच्या शरीरात लक्षणे दिसत आहेत, त्यामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, पण तरीही त्यांच्यामध्ये प्रतिपिंडे तयार होण्याची नैसर्गिक क्षमता नाही त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त आहे.

सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या काळात झालेल्या या चाचणीत नऊ हजार ७८५ लोकांनी भाग घेतला. कोविड-१९चा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांचे रुग्णालयामधले मृत्यू या उपचार पद्धतीमुळे कमी होतात का हे निश्चित करण्यासाठी सहभागींची संख्या पुरेशी असलेली ही पहिली मोठी चाचणी होती. सध्या ही उपचार पद्धती फक्त सौम्य तसेच मध्यम संसर्ग झालेल्या रुग्णांसाठीच वापरली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

* ही उपचार पद्धती भारतात आहे का?

स्वीस औषध कंपनी रोशे आणि भारतीय औषध कंपनी सिप्ला यांच्या संयुक्त विद्यमाने REGEN-COV2 ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध आहे. कासिरिव्हिमॅब (casirivimab) आणि इमडेव्हीमॅब (imdevimab) या मोनोक्लोनल प्रतिपिंडांच्या समन्वयातून ही उपचार पद्धती केली जाते. सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने तिच्या आपत्कालीन परिस्थितीतील मर्यादित वापराला मे महिन्यात परवानगी मिळाली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला यासारख्याच बॅम्लानिव्हिीमॅब (bamlanivimab) आणि इस्टेसीव्हिमॅब (etesevimab) या इली लीली (Eli Lilly) या औषध कंपनीच्या आणखी एका प्रतिपिंड कॉकटेल उपचार पद्धतीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

ही दोन्ही प्रतिपिंड द्रावके  कोविड-१९चा सौम्य तसेच मध्यम प्रकारचा संसर्ग झालेल्या तसेच ज्यांना ऑक्सिजन देण्याची गरज नाही अशा आणि जे धोकादायक गटामध्ये आहेत आणि ज्यांचा संसर्ग तीव्र होण्याची शक्यता आहे अशा रुग्णांसाठी वापरली जाणे अपेक्षित आहे.

जीएसके म्हणजेच ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने २६ मे रोजी जाहीर केले की, अमेरिकी एफडीएने सॉट्रीव्हीमॅब या औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ही कंपनी भारतात मोनोक्लोनल प्रतिपिंडे उपलब्ध करून देण्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत याचा शोध घेत आहे. झायडस कॅडिला ही कंपनी भारतात ZRC-330 या प्रतिपिंड द्रावकाच्या चाचण्या घेण्याचे नियोजन करते आहे.

ते खर्चीक आहे का?

या उपचार पद्धती खर्चीक आहेत. कारण त्यांची निर्मिती प्रक्रिया किचकट, अवघड असते आणि ती खूप वेळ घेणारी आहे. भारतात सिप्ला REGEN-COV2 च्या एका पॅकला अंदाजे एक कोटी २० लाख रुपये या दराने एक लाख पॅकचा पुरवठा करत आहे. एका पॅकमध्ये दोन रुग्णांवर उपचार होऊ शकतो. त्यामुळे एका रुग्णासाठी एका डोसची किंमत सर्व करांसहित ५९ हजार ७५० रुपये होते.

इली लीली ही कंपनी त्यांचे प्रतिपिंड द्रावण भारतामधल्या कोविड-१९ बाधित रुग्णांसाठी देणगीदाखल देण्यासाठी भारत सरकारबरोबर चर्चा करत आहे.

मोनोक्लोनल प्रतिपिंडे टिश्यू कल्चरमध्ये तयार करावी लागतात असे डॉ. अर्तुरो कॅसॅडेवॉल सांगतात. ते जॉन्स हॉपकीन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेमध्ये मोलिक्युलर मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड इम्युनॉलॉजी या विभागाचे प्रमुख आहेत. या पेशी तुम्हाला वाढवाव्या लागतात. या पेशींना प्रोटिनची निर्मिती करावी लागते. नंतर त्याचे शुद्धीकरण करावे लागते, असे डॉ. कॅसॅडेवॉल सांगतात.

मोनोक्लोनल प्रतिपिंडे आणि कॉनव्हालिसेंट प्लाझ्मा थेरपी यांची तुलना 

भारताने गेल्याच महिन्यात कोविड-१९च्या उपचारांच्या प्रोटोकॉलमधून कॉनव्हालिसेंट प्लाझ्मा थेरपीचा वापर रद्द केला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये केल्या गेलेल्या चाचण्यांमधून असे आढळले आहे की, या चाचणीचा रुग्णाची अवस्था सुधारण्यासाठी फायदा झालेला नाही.

प्लाझ्माच्या तुलनेत मोनोक्लोनल प्रतिपिंडांची उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरू शकते, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. दोन्ही पद्धती प्रतिपिंडांवर आधारित असून त्या करण्याच्या पद्धतीत फरक आहे.

कॉनव्हालिसेंट प्लाझ्मा थेरपीमध्ये कोविड-१९च्या संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मामधून प्रतिपिंडे घेतली जातात. याचा अर्थ या उपचार पद्धतीचा ज्याच्यावर वापर केला जातो, त्या रुग्णाला कोविडच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरामध्ये तयार झालेली सगळी प्रतिपिंडे मिळतात.

मोनोक्लोनल प्रतिपिंडे या उपचार पद्धतीमध्ये विशिष्ट प्रतिपिंडे घेऊन त्यापासून घाऊक प्रमाणात प्रतिपिंडांचे उत्पादन घेतले जाते. प्रतिपिंडे द्रावणासाठी तशा पद्धतीच्या दोन किंवा अधिक प्रतिपिंडांचे संयोजन केले जाते.

मोनोक्लोनल प्रतिपिंडे त्यांच्या एकजिनसी स्वरूपामुळे अत्यंत शुद्ध असतात, असे डॉ. फौकी सांगतात. मोनोक्लोनल प्रतिपिंडे आणि कॉनव्हालिसेंट प्लाझ्मा या दोन्ही उपचार पद्धतींमधला फरक सांगायचा तर प्लाझ्मामध्ये इतर अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अ‍ॅलर्जी किंवा त्यासारख्या इतर काही प्रतिक्रिया देऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. मोनोक्लोनल प्रतिपिंडांच्या संदर्भातल्या क्लिनिकल चाचण्या जेव्हा घेतल्या गेल्या होत्या तेव्हा कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी आणि झालाच तर त्यावरील उपचारांसाठी या चाचण्या अतिशय आश्वासक आहेत त्या संदर्भातला डाटा सांगतो, अशीही पुस्ती डॉ. फौकी जोडतात.

इंडियन एक्स्प्रेस एक्सप्लेण्डमधून

response.lokprabha@expressindia.com