News Flash

यंदाचा मान्सून फळणार!

मान्सून म्हणजे आपल्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा.

मान्सून म्हणजे आपल्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा. म्हणूनच पावसाळ्याच्या बऱ्याच आधीपासून यंदाचा मान्सून कसा असेल याचे अंदाज यायला लागतात. लोकप्रभाच्या वाचकांसाठी हे मान्सूनचे शुभवर्तमान-

आपल्या सभोवतालच्या वातावरणात सातत्याने काहीही ना काही बदल होत आहेत, हे आपल्याला जाणवायला लागले आणि म्हणून त्याचा व्यवस्थित अंदाज बांधण्याची गरज निर्माण झाली. ओडिसामध्ये १९९९ साली आलेल्या सुपर चक्रीवादळात नऊ हजार ८७७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र तिथेच २०१४ साली आलेल्या फायलीन चक्रीवादळात ५० पेक्षा कमी जण मृत्युमुखी पडले होते. १९९९ साली चक्रीवादळाचा पूर्व अंदाज वर्तवणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव होता, परंतु २०१४ मध्ये त्याच्यापेक्षा कमी तीव्रतेने आलेल्या चक्रीवादळाचे पूर्वानुमान हवामान विभागाने व्यवस्थित दिल्याने हीच संख्या ५० पेक्षा कमी झाली. यावरून दोन्ही आपत्तींमधील मृतांची संख्या लक्षात घेता भारतीय हवामान विभागामध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीचा अंदाज आपण बांधू शकतो.

हवामानात होणाऱ्या तीव्र बदलांना हवामानातील बदल किंवा वातावरणातील बदल (क्लायमेट चेंज) असे म्हटले जाते. पण ते म्हणताना काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. ज्यामध्ये त्याची वारंवारंता वाढते, त्याचे अखंडत्व टिकून राहते, त्याचे प्रभावित क्षेत्र विस्तारून त्याची व्याप्ती वाढते आणि त्याचा कालावधीही वाढतो; असे एकूण चार अंगीभूत घटक यामध्ये मोडतात. याचे  जवळचे उदाहरण म्हणजे २६ जुल २००५ रोजी मुंबईत झालेली अतिवृष्टी. त्या दिवशी हवामानतज्ज्ञांपेक्षा हवामान स्वत:च खूप काही बोलत होते. बारा तासांमध्ये ५७५ मिमी पाऊस मुंबईत पडला. मात्र कुलाबा क्षेत्र तसे शांत होते. या परिसराला पावसाचा तडाखा बसला नव्हता. सांगण्याची बाब म्हणजे, पावसाचे वितरण हे बऱ्याचदा असमान असते. एकाच क्षेत्रातील अनेक विभागांत पडण्याचे त्याचे प्रमाण हे निरनिराळे असते. काही ठिकाणी अवकाळी पाऊस नकळत जरी पडला तरी त्याला ताबडतोब ‘वातावरणात झालेला बदल’ असे बिरुद लावले जाते. पण खरं तर ‘वातावरणात झालेला  बदल’ हा काळजीपूर्वक वापरण्यात येणारा शब्द आहे.

हवामानात होणाऱ्या बदलाला नसíगक आणि मानवनिर्मित अशी दोन्ही कारणे जबाबदार आहेत. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी भूकंप होतो अथवा ज्वालामुखीचा स्फोट होतो, त्यावेळेस उठणाऱ्या धुळीच्या लोळामुळे सूर्याची किरणे झाकली जातात आणि तापमान तात्पुरते खाली उतरते. काही वेळा धुळीच्या घातक वायूंनी भरलेला लोळ वाऱ्याच्या दिशेने इतरत्र जातो आणि तिथे दूषित पाण्याचा पाऊस पडतो. तसेच सूर्यावरती असणाऱ्या डागांच्या  संख्येनुसार त्याचा परिणाम पृथ्वीच्या वातावरणावर प्रभाव पडू शकतो. ही सगळी हवामानात होणाऱ्या बदलांना बाधित होणारी नसíगक कारणे आहेत. याशिवाय हवामानात होणाऱ्या बदलांना वैज्ञानिक मिलान्कोविच यांनी मांडलेला सिद्धांत लागू होतो. यामध्ये त्यांनी तीन कारणे मांडली आहेत. पहिले म्हणजे, पृथ्वीची सूर्याभोवतीची जी कक्षा आहे ती सध्या लंबवर्तुळाकार आहे व पुढे साधारणत: एक लाख वर्षांनंतर ती जवळजवळ गोलाकार होण्याची शक्यता आहे. यामुळे पृथ्वीवरील हवामान बदलण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मुद्दय़ानुसार पृथ्वीचा स्वत:भोवती फिरायचा आस सध्या साडेतेवीस अंशाने कललेला आहे. त्यामध्ये ४१ हजार वर्षांनी बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे पृथ्वीवरील ऋतू बदलण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी मांडलेल्या तिसऱ्या मुद्दय़ानुसार साधारणत: २०-२२ हजार वर्षांच्या कालावधीमध्ये पृथ्वीचा कललेला आस दुसऱ्या ध्रुवताऱ्याकडे वळण्याची शक्यता आहे. या तिन्ही गोष्टींमुळे सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर वाढणार असून त्याचा परिणाम पृथ्वीवरील वातावरणावर पडणार आहे.

इंग्रजीमध्ये ‘वेदर’ आणि ‘क्लायमेट’ या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. ‘वेदर’ म्हणजे सध्या असणारे वातावरण आणि ‘क्लायमेट’ म्हणजे गेल्या अनेक वर्षांतील सरासरी आकडेवारी. मात्र मराठीत या दोन्ही शब्दांना आपण हवामान म्हणूनच अर्थार्थी वापरतो. पृथ्वीवर वातावरणच नसते तर सूर्यापासून मिळणारी उष्णता संपूर्णपणे परावíतत झाली असती. ज्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान उणे १८ (-१८) झाले असते. ते अनुकूल झाले नसते. सूर्यापासून येणाऱ्या किरणांना ‘शॉर्ट वेव’ तर पृथ्वीपासून  परावíतत होणाऱ्या किरणांना ‘लाँग वेव’ म्हटले जाते. या ‘लाँग वेव’ना अडवणारे वातावरण पृथ्वीभोवती असल्याने तिचे तापमान १५ अंश राहते, जे जीवसृष्टीच्या वाढीसाठी पोषक तापमान मानले जाते.

१७५०च्या आसपास इंग्लंडमध्ये जी जागतिक औद्योगिक क्रांती झाली त्या विकासाच्या बरोबरीनेच पृथ्वीच्या वातावरणातील प्रदूषणाची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. या दरम्यानच्या काळात मानवाने केलेल्या विकासाबरोबर पृथ्वीवर निर्माण होणाऱ्या घातक वातावरणाकडे वेळीच लक्ष दिले असते तर सध्या जे पृथ्वीचे तापमानवाढीचे संकट आपल्या सर्वावर घोंगावत आहे, ते टाळता आला असते. पण अजूनही जागतिक स्तरावर या संकटाची गांभीर्याने दखल घेत विचारपूर्वक व्यवस्थितपणे मार्ग काढला तर या संकटाची तीव्रता येणाऱ्या कालावधीमध्ये कमी करता येऊ शकेल. जे उष्णताशोषक वायू आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा वायू कार्बन डाय-ऑक्साइड आहे जो कारखाने, कोळशाच्या खाणी, तसेच खनिज तेलाच्या अतिवापरामुळे याचे प्रमाण २८० पीपीएम ते ४०० पीपीएमच्या वर गेले आहेत. ते अतिशय घातक आहे. या वायूबरोबर अन्य काही वायू जसे मिथेन, नायट्रोजन डाय-ऑक्साइड, सीएफसी हेही उष्णताशोषक वायू असल्याने यांच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. १८८० पासून जर तापमानाचा आलेख पाहिला तर चढत्या मार्गाने तो वर जातो. साधारण १९६० पासून माणसाने विकासासोबत केलेल्या गंमतींनी तापमानाचा आलेख उंचावला आहे.

तापमानवाढीचा नेमका परिणाम बऱ्याचदा कृष्णधवल चित्रपट पाहिल्यानंतरही लक्षात येतो. त्या काळातील चित्रपटांमध्ये हिमालयातील एखाद्या हिमनगाचे दृश्य पाहिल्यास आणि आता त्या हिमनगाचे छायाचित्र दृष्टिक्षेपात घेतल्यास तिथे निर्माण झालेली खडकाळ जमीन हे तापमानवाढीचे उत्तम उदाहरण आहे. शिवाय काही निरीक्षणे असे दर्शवतात की उत्तर ध्रुवावरील बर्फही १९५६ ते २००७ या कालावधीत मोठय़ा प्रमाणात वितळत गेल्याने आता उत्तर ध्रुवावरून कोणत्याही खंडावर थेट प्रवास करण्याची शक्यता बळावत चालली आहे. भारतातही तापमानवाढीची स्थिती इतर देशांप्रमाणेच आहे. भारतामधील २००९, २०१०, २०१५, २०१६ ही र्वष उष्ण वर्ष म्हणून घोषित झाली आहेत. त्यातही २०१६ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. तर २०१७ मधील फेब्रुवारी हा महिना सर्वात उष्ण महिना असल्याचे घोषित झाले आहे. महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ हा मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मितही आहे. लातूरला दुष्काळनिवारणासाठी रेल्वेने केलेला पाणीपुरवठा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या देशातली तापमानवाढीबद्दल जागरूकता आणि शासन स्तरावर उपयुक्त योजना करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या आतल्या भागामधले पर्जन्यमानाचे आकडे हे कोकणपेक्षा पुष्कळ कमी आहेत. आणि त्यामुळे मराठवाडा किंवा विदर्भात नसíगक कारणांमुळे पडणाऱ्या कमी पावसाचा प्रत्येक थेंब हा कसा वाचवता येईल यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे आहे. रेन वॉटर हार्वेस्टची उपाययोजना येथे लागू करणे गरजेचे आहे.

मुंबईबद्दल बोलायचे झाले तर मुंबईमधील १९६९ ते २००० या कालावधीतील तापमानाचा हवामान विभागातर्फे अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत तापमानवाढीची चिन्हं गेल्या दोन दशकांपासून दिसत आल्याचे लक्षात आले आहे. सध्या मुंबईत दिवसा गरम होते आणि रात्री तर त्याहून अधिक गरम होते. हिवाळा येऊन गेला, असे सांगेपर्यंत उन्हाळा डोकावू लागतो. गेल्या काही वर्षांत उष्ण दिवस  आणि उष्ण रात्री वाढल्या असून थंड दिवस आणि थंड रात्री कमी झाल्या आहेत, असे या अभ्यासात दिसून आले आहे. म्हणजे आपल्याला जे नेमके पाहिजे तेच उपलब्ध होत नाही. याची काही कारणं कदाचित अमर्याद शहरीकरण, जंगलाची कमी झालेली व्याप्ती आणि अतिशय जास्त लोकसंख्या ही असू शकतात. याला उपाय म्हणून हरित क्षेत्र जास्तीत जास्त वाढवण्याची गरज आहे.

साधारणत: ज्या वेळेस अरबी समुद्रावरून खारे वारे वाहणे उशिराने सुरू होते त्या वेळेस मुंबईमधील तापमान वाढते. हे असे का होते? कारण ज्या वेळी जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहणारे वारे जोरदार असतील त्या वेळेस खाऱ्या वाऱ्यांना प्रवेश करता येत नाही त्यामुळे खारे वारे उशिराने  वाहतात आणि त्यामुळे मुंबईचे तापमान वाढते. मात्र मुंबई शेजारी असणारा अरबी समुद्र हा तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम करतो. तसेच मुंबईची हवा प्रदूषणमुक्त आणि शुद्ध ठेवण्याचे कार्यही तो करतो.

भारतीय हवामान खाते हे जवळपास दीडशे वर्ष (स्थापना-१८७५ ) जुने आहे. १८७६ ते ७८ मध्ये संपूर्ण जगात अतिशय मोठा दुष्काळ पडला होता. यामध्ये भारत, चीन आणि ब्राझील हे देशही होरपळले होते. त्या वेळेस असणाऱ्या ब्रिटिश राजवटीची संपूर्ण अर्थव्यवस्था भारतीय शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना मान्सूनची पूर्वसूचना असणे गरजेचे वाटू लागले. त्या वेळेस डॉ. गिल्बर्ट वॉकर यांनी सर्वप्रथम मान्सूनचे दीर्घकालीन अंदाज देण्यास सुरुवात केली.

१९८० च्या दशकात वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय हवामान खात्याने मान्सूनसाठी सुधारित दीर्घकालीन पुर्वानुमान देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये २१ व्या शतकाच्या सुरुवातीला परत एकदा काही बदल करण्यात आले आणि कमीत कमी घटक वापरून दीर्घकालीन पूर्वानुमान देण्यात येऊ लागले. भारतील पावसाचे सरासरी प्रमाण ८९ सेंटिमीटर आहे. भारतातील मान्सूनचे पूर्वानुमान हे दोन टप्प्यांत दिले जाते. यामध्ये एप्रिल तसेच जूनच्या पहिल्या आठवडय़ात पूर्वानुमान सांगितले जाते.

उत्तर अटलांटिक व उत्तर महासागरातील पाण्याच्या तापमानातील फरक, विषुववृत्तीय दक्षिण िहदी महासागरातील पाण्याचे तापमान, पूर्व आशियामधील हवेचा दाब, विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील गरम पाण्याचा साठा असे काही घटक मान्सूनवर प्रभाव पाडत असतात. तसेच इंडियन ओशन डायपोल हा घटकही मान्सूनवर प्रभाव पाडतो.

मान्सून म्हणजे काय, हे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, जे वारे एका दिशेने वाहतात त्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारे वारे म्हणजे मान्सून.

मान्सून हा शब्द अरबी भाषेच्या मौसीन या शब्दावरून आला असावा. आणखी सोप्या शब्दात सांगायचे झाले तर वर्षभर भारतीय उपखंडावर वाहणारे सर्वसाधारणत: ईशान्य वारे जून ते सप्टेंबरच्या काळात नर्ऋत्य दिशेने वाहायला सुरुवात होतात. या दिशाबदलाला मान्सून म्हणता येईल. भारतात आपल्याला पाऊस जून ते सप्टेंबरच्या काळात नर्ऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे मिळतो, ही एक मोठी प्रणाली आहे. आणि यामध्ये मिळणाऱ्या पावसावरच भारतातले बहुतांशी शेती, उद्योगधंदे, विकास आणि आíथक व्यवस्था अवलंबून आहेत. दुसरी मान्सूनची प्रणाली ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मिळते, ज्यामुळे दक्षिण भारतातल्या काही राज्यांत नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये पाऊस पडतो. प्रत्येक वर्षी येणारा मान्सून हा असा वेगळा असतो. त्याचे वितरण, त्याची तीव्रता, त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये काही अंशी बदल दिसतात आणि म्हणूनच मान्सूनचे दीर्घकालीन पूर्वानुमान हे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याचा उपयोग म्हटल्याप्रमाणे इतर उद्योगधंद्याबरोबर खासकरून कृषीला होतो. यंदा भारतीय हवामान विभागाने नर्ऋत्य मौसमी पावसाचे जे दीर्घकालीन पूर्वानुमान दिले आहे, त्यात येणारा पावसाळा हा संपूर्ण देशात सरासरी इतकाच असेल, असं म्हटलेलं आहे. २०१४-२०१५ या वर्षांमध्ये पावसाचं सरासरी प्रमाण कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती झाली होती. पण हे चित्र २०१६ च्या पावसात बदललं.

भारत देश हा विषुववृत्तीय प्रदेशातील देश असल्यामुळे येथे प्रत्येक हंगामात आंतरिक बदलाची क्षमता अतिशय जास्त असते. त्याचप्रमाणे भौगोलिक परिस्थितीच्या बदलांमुळे संपूर्ण भारतीय उपखंडात एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आणि हवामानाचे वेगवेगळे धोके सतत असतात. उदा. राजस्थानमधील वाळवंट, कोकण किनारपट्टी, उत्तर पूर्व राज्यांमधील मुसळधार पाऊस, उत्तर भारतातील बर्फवृष्टी, मराठवाडा-विदर्भ भागातील दुष्काळजन्य परिस्थिती आणि ३०० किमीपेक्षा जास्त लाभलेला किनारपट्टीचा भाग. अशी विविधता असल्यामुळे हवामानाचे पूर्वानुमान देताना वेगवेगळ्या हंगामासाठी वेगवेगळी आव्हानं आहेत. भारतात सद्य:स्थितीत असणाऱ्या हवामान केंद्रापेक्षा सर्वसाधारणत: चौपट केंद्रे निर्माण होण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून हवामानाचे अधिक चांगले पूर्वानुमान देणे शक्य होईल.

असं दिसून आलं आहे की, भारतातील नर्ऋत्य मोसमी पाऊस हा अलनिनो या घटकावर बऱ्याचदा अवलंबून असतो. अलनिनो म्हणजे विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान त्याच्या सरासरीपेक्षा वाढतं. सर्वसाधारणत: ही घटना दक्षिण अमेरिकेच्या पेरू या देशाच्या किनारपट्टीवर दिसते. यामुळे अनेकदा भारतातील पावसाळा हा कमी होतो. पण अशी अनेक वर्षे आहेत ज्या वेळी अलनिनो उद्भवला पण भारतातला पाऊस हा सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्तही होतो. त्यामुळे अलनिनो येणार आणि त्याची बाधा भारतीय पावसाळ्याला नेहमी होईल हे म्हणणे चुकीचे ठरू शकेल. त्याचप्रमाणे अलनिनोच्या विरुद्ध लानिना हा प्रकारसुद्धा दिसतो. ज्यामध्ये समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते. याचा बऱ्याचदा भारतीय पावसाळ्यावर सकारात्मक प्रभाव दिसतो. अजून एक घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह (धन) असतो तेव्हा भारतीय उपखंडामध्ये मान्सून चांगला असण्याची शक्यता असते. तर अशा विविध आणि दूरस्थ घटकांवर अवलंबून असलेल्या मान्सूनचे पूर्वानुमान हे एक मोठे आव्हान भारतासाठी तर आहेच पण जगातल्या इतर अनेक वैज्ञानिक संस्था या मान्सूनकडे अतिशय बारीक लक्ष ठेवून आहेत. सातत्याने येणारा मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार ही एक उत्सुकता मे महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात असते. केरळला भारतामध्ये मान्सूनचे प्रवेशद्वार असंही म्हणतात. त्याचेही पूर्वानुमान भारतीय हवामान विभाग २००५ पासून करत आहे. यंदाचं पूर्वानुमान ३० मे होतं आणि ३० मेला केरळमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाला. अर्थात पाऊस दाखल होण्यापूर्वी दक्षिण भारतात असणाऱ्या हवामान विभागाच्या १४ केंद्रांपकी ६० टक्के केंद्रांनी अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस दोन दिवस नोंदवला तरच पाऊस आला असं जाहीर केलं जातं. सध्या पाऊस केरळमध्ये कोचीनपर्यंत आणि काही ईशान्य पूर्व राज्यांमध्येही आलेला आहे. महाराष्ट्रात सर्वसाधारणत: मान्सून दाखल होण्याची तारीख ५ ते ७ जून आहे. आणि संपूर्ण भारत मान्सूनने व्यापण्यासाठी १५ जुल आहे. यंदाच्या पावसाची चार प्रमुख वैशिष्टय़े दिसून येतील. पहिलं म्हणजे पाऊस सरासरीइतका म्हणजे ९६ टक्के असण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे यंदाच्या पावसाचे वितरण समसमान असण्याची शक्यता आहे. तिसरं वैशिष्टय़ म्हणजे यंदा सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ही ३८ टक्के आहे. तर या वर्षी दीर्घकालीन पूर्वानुमान देण्यासाठी सांख्यिकी मॉडेल (STATISTICAL ENSEMBLED FORECAST SYSTEM) बरोबर क्लायमेट फोरकास्ट मॉडेलचाही (CFS) वापर करण्यात आलेला आहे, हे यंदाच्या पावसाचं चौथं वैशिष्टय़ आहे.

(लेखक हे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रात उपमहासंचालक म्हणून कार्यरत आहेत.)

कृष्णानंद होसाळीकर
शब्दांकन : अक्षय मांडवकर
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2017 1:05 am

Web Title: monsoon 2017
Next Stories
1 डिजिटायझेशनच्या वाटेवर आयटी ऑडिटबाबत सरकारचीच अनास्था!
2 प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षात भ्रमनिरास!
3 करिश्मा कार्यशैलीचा!
Just Now!
X