दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका म्हणजे मनोरंजनाचा पंचवार्षिक नाटय़ महोत्सवच. या नाटकातल्या पात्रांनीच आपण आणि प्रतिस्पध्र्यानी कोणत्या भूमिका करायच्या हे ठरवून टाकलं आहे. आता वेळ आली आहे प्रेक्षकांनी आपली भूमिका वठवण्याची..

राजकारणात काहीही घडू शकते, आणि राजकारणात जे घडते ते सारेच माफ असते असे म्हणतात. हे  खरे मानले, तर राजकारण हा गांभीर्याने पाहावयाचा विषयच राहात नाही. गांभीर्याने पाहावयाचे थांबविले की एकूणच त्यातील विनोद लक्षात येऊ  लागतो, आणि राजकारण हा गंमत म्हणून, वेळ घालविण्याचे साधन म्हणून, केवळ दुरून न्याहाळण्याचा करमणुकीचा प्रकार आहे हे लक्षात येते. कधी कधी हे लक्षात यायला वेळ लागतो. काहींच्या मात्र ते लगेचच लक्षात येते. पण केव्हा लक्षात येते ते महत्त्वाचे नसते. कारण, त्यातून निघणारा निष्कर्ष तोच असतो, आणि तो अधिक ठाम झालेला असतो.

सध्या मुंबई-ठाणे महापालिकांसह राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून शिवसेना-भाजपमध्ये जे काही सुरू आहे, ते पाहता, या राजकारणात करमणुकीचा मसाला ठासून भरलेला असल्याची खात्री होऊ  लागली आहे. निवडणुका हा मनोरंजनाचा पंचवार्षिक नाटय़ महोत्सव वाटावा आणि राजकीय नेते हे विनोदी अभिनेते वाटावेत अशा रीतीने या दोनही पक्षांनी आपल्या आपल्या प्रेक्षकांच्या करमणुकीचा जणू चंग बांधला आहे. साहजिकच निवडणूक प्रचाराची मैदाने ही राजकीय रंगभूमी बनली आहेत. या रंगभूमीवर रोज या एकाच नाटकाचे वेगवेगळ्या ढंगांतील प्रवेश सुरू आहेत, आणि सध्या तरी या नाटकाचे कथासूत्र ‘तुझे माझे जमेना’ हेच आहे. पंचवीस वर्षे परस्परांसोबत गळ्यात गळे घालून वावरल्याचे नाटक करताना, युतीला सैद्धान्तिक विचाराचा मुलामा देणाऱ्या या दोन्ही पक्षांना, आता आपले एकमेकांशी जमत नसल्याचे नवे साक्षात्कार होऊ  लागल्याचे या नाटकाच्या पहिल्या अंकातील प्रत्येक प्रवेशात दिसते, आणि प्रेक्षक काहीसा गोंधळात पडतो. प्रेक्षकास गोंधळातच ठेवून पुढचे कथासूत्र गुंफावयाचे असल्यामुळे, पहिल्या अंकाचे कथानक केवळ एकमेकांना दूषणे देण्याच्या स्पर्धेभोवती गुरफटलेले असेच आहे. हा अंक आपल्या आपल्या मंचावर सज्जडपणे वठविण्यासाठी दोन्ही नायक अभिनेते बाह्य सरसावून उतरले आहेत, त्यामुळे एकाच वेळी, किंवा आलटूनपालटूनही, शिवसेना आणि भाजपच्या मंचांवरील प्रयोगाचे तुकडे घरबसल्या दूरचित्रवाणी पडद्यांवरून न्याहाळताना, गोंधळलेल्या अवस्थेतही करमणुकीचा अभूतपूर्व आनंद उपभोगणे प्रेक्षकास आवडू लागलेले आहे. या नाटय़संहितेत इतिहास आहे, भूगोल आहे आणि पुराणातील कथानकांचाही मनसोक्त वापर केलेला आहे. साहजिकच, कधी एखाद्या प्रयोगातून कुणी स्वत:च पांडवांची भूमिका बजावून प्रतिस्पध्र्याला कौरवांच्या भूमिकेत नेऊन ठेवतो, तर कधी एखादा अभिनेता ऐतिहासिक कथाबाजाच्या अभिनिवेशातून हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या धर्मकार्यातील मावळ्याचा मक्ता स्वत:कडे घेऊन प्रतिस्पध्र्याला औरंगजेब, मोगल, अफझलखानादी खलनायकांच्या भूमिका बहाल करून टाकतो.. हाच तो मनोरंजनाचा मसाला! गंमत म्हणजे, या महानाटय़ाला लेखनाचा असा सलग असा धागा नाही. समोरच्या पात्राच्या तोंडून फेकल्या गेलेल्या संवादाची पुरेपूर परतफेड करणे व त्यातून मनोरंजनाचा निखळ आनंद प्रेक्षकास देणे एवढाच त्याचा उद्देश असल्याने, सारे काही नायकाच्या जबाबीपणावरच अवलंबून ठेवले गेले आहे. एका बाजूला एवढय़ा भव्य रंगमंचांवर असे प्रदीर्घ महानाटय़ सुरू झालेले असताना, काँग्रेसने मात्र या नाटय़महोत्सवात आपल्यापुरत्या पथनाटय़ांचे प्रयोजन आखले. घरबसल्या टीव्हीवरून करमणुकीची महासुविधा उपलब्ध झालेली असताना, रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यातील किरकोळ पथनाटय़े पाहण्यासाठी कुणीच घराबाहेर उतरणार नाही, हे लक्षात येताच पथनाटय़ांचे हे प्रयोग बारगळले आहेत, आणि निवडणूक आयोगाने- म्हणजे, राजकीय करमणुकीच्या प्रयोगांचे सेन्सॉर बोर्ड असलेल्या यंत्रणेने- त्या पथनाटय़ांना परवानगीच नाकारून या प्रयोगांच्या यशाची झाकली मूठही कायम राखण्यास मदत केली.

त्यामुळे शिवसेना-भाजपच्या रंगमंचांवरील करमणूक महानाटय़ांचा प्रयोग तसा गेल्या महिनाभरापासून जोरात आहे. मुळातच, हे एक दीर्घनाटय़ असल्याने, अजूनही या करमणूक नाटय़ाचा केवळ पहिलाच अंक सुरू आहे. या अंकात एका मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेची नांदी गाताना दिसतात. त्यांच्या डाव्या बाजूला किरीट सोमय्या तर उजव्या हाताशी आशीष शेलार असे दोघेच शिलेदार मंचावर दिसतात. विनोद तावडे, पूनम महाजन, प्रकाश मेहता, इतकेच काय, खुद्द रावसाहेब दानवेदेखील पडद्याआड, विंगेतच आहेत. अजूनही ते त्यांच्या भूमिकांचे संवाद पाठ करण्यातच दंग आहेत. किरीट सोमय्या यांनी पडदा उघडण्याआधीच माफियाराज अशा पोटमथळ्याखाली आपला प्रवेश सादर करून टाकल्याने, नाटकाची सुरुवात दमदार झाली असली, तरी त्यामुळेच शिवसेनेच्या मंचावर प्रत्युत्तराची कथासंहिता सोपी झाली अशी चर्चा आहे. भाजपच्या नाटय़मंचावर जसे सोमय्या दिसतात, तसे शिवसेनेच्या मंचावर दोन प्रवेशांमध्ये करावयाच्या सेटिंगच्या अदलाबदलीच्या वेळी आमदार अनिल परब व खासदार अनिल देसाई वावरताना दिसतात. तेथे महानाटय़ाचा पसारा असला, तरी त्यांच्या संचातील प्रभावी अभिनयगुण असलेल्या इतर पात्रांना फारशी संधी मिळालेली दिसत नाही. संजय राऊत केवळ दिग्दर्शनाचे काम करत असावेत, अशी शक्यता आहे. आणि मुळातच, नाटकाचे कथानक केवळ नायककेंद्री असल्याने नाटक वठविण्याची सारी जबाबदारी नायकावर, म्हणजेच उद्धव ठाकरेंवरच असून अभिनयापेक्षा संवादफेकीवर भर देऊन नाटक वठविण्यावर त्यांचा भर दिसतो. म्हणूनच, खणखणीत संवादाची संहिता त्यांनी तयार केली असून पहिल्याच प्रवेशात भाजपच्या नायकावरच प्रहार करून त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. त्यासाठी त्यांनी खिसेकापू, बदमाश, चोर अशा शेलक्या शब्दांची पखरण करीत संवादफेकीची धार वाढविली आहे. ‘पंचवीस वर्षे यांच्यासोबत राहून आमचा पक्ष सडला’, असे सांगत त्यांनी आपल्या संवादफेकीची सुरुवात केली, आता, ‘तुमच्यासारख्यांसोबत राहिलो याची आम्हाला लाज वाटते’, अशा संकल्पनेवर पहिल्या अंकातील ताजा प्रवेश संपविण्यात आला आहे. त्याच्या तोडीस तोड संवादफेक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घशाला कोरड पडते की काय असे सुरुवातीस काही वेळा प्रेक्षकांनाही वाटून गेले, आणि नाटय़प्रवेशातील प्रसंगांनाही कलाटणी मिळाली. देशाच्या सीमेवरील जवान, नोटाबंदी, नरेंद्र मोदी आदी मुद्दय़ांवर यथेच्छ टीकाझोड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळविला, आणि ‘आमचे पाणी पिऊन आमच्यावरच डाफरता?’ असा सणसणीत संवादही फेकला. काहीही झाले तरी निवडणुकीच्या महानाटय़ाचे कथानक मूळ मुद्दय़ावर येऊच द्यायचे नाही, असाच जणू चंग कथासूत्र विणतानाच उभयपक्षी परस्पर सामंजस्याने बांधला गेला असावा, असे प्रथमदर्शनी वाटत असले, तरी आहे त्या परिस्थितीतही जे काही वळण त्या कथासूत्रास मिळत आहे, त्यातही करमणुकीचा मसाला ठायीठायी ठासून भरलेलाच असल्याने. प्रेक्षकवर्ग या नाटय़ानुभवात मनोभावे रंगून गेला आहे. त्यातही विशेष म्हणजे, या दोन्ही महानाटय़ांचा नारळ वाढविण्यासाठी राजकीय रंगभूमीवरील ख्यातनाम व अनुभवसिद्ध अभिनेते शरद पवार यांनी पडदा उघडण्याआधीच प्रवेश केल्याने प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपच्या पहिल्या अंकाचा प्रारंभ होणार हे अनुभवी पवारांनी आधीच ओळखले असल्याने, त्यांनी प्रयोगाचा नारळ वाढवितानाच या भ्रष्टाचारात भाजपही वाटेकरी असल्याचा फटाका लावून दिला, आणि नाटकाची पहिली घंटा वाजविली. पहिल्याच प्रवेशात नाशिकमधील ‘लक्ष्मीदर्शना’चा एक रम्य प्रसंग पडद्यावर सादर झाल्याने, पडद्याआडची पारदर्शकता चव्हाटय़ावर आल्याच्या आनंदाने सेनेच्या मंचावर आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि पडदा उघडल्यानंतर हे नाटक कमालीचे रंगणार, हे त्यामुळेच स्पष्ट झाले. साहजिकच, दोन्ही नाटय़संचांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

‘भाजपसोबतची युती करून पंचवीस वर्षे शिवसेना सडली’.. असे सांगत, ‘युतीच्या भिकेचा कटोरा’ फेकून दिल्याच्या प्रभावी अभिनयातून शिवसेनेच्या महानायकाने आपल्या मंचावरील प्रवेश सुरू केला, आणि भाजपला रंगमंचाची रचनाच बदलावी लागली. शिवसेनेच्या सोयीचे उमेदवार देऊन काँग्रेसने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप करीत भाजपचे आशीष शेलार यांनी सेनेच्या नाटय़मंचावर काँग्रेसी पात्रे घुसविण्याचा एक प्रयत्न केला, पण या पात्रांना प्रवेश दिल्यास नाटक पडेल या भीतीने सेनेच्या मंचावरून त्या पात्रांना परतावे लागले व प्रवेश पुढे सुरू झाला. मग मुंबईला महाराष्ट्रातून तोडण्याचा, मुंबईतील मराठी माणसाला बाहेर घालविण्याचा डाव असल्याचे संवाद सुरू होताच, प्रेक्षकांमध्ये मरगळ आल्याचे भासू लागल्याने ते संवाद बाजूला ठेवून सेनानायकाने थेट मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाण रोखले, आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन भाजपीय मंचावर फडणवीस लढाईच्या आविर्भावात उभे राहिले. आता पुढचे नाटय़ रंगणार असा अंदाज आल्याने प्रेक्षकांचे लक्ष दोन्ही मंचांकडे लागले आहे. परस्परांच्या नावाने बोटे मोडण्याचा अभिनय तसा सोपा नसतो. त्यासाठी कसदार सरावाची गरज असते. त्यातही, हे नाटकच मुळात अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत बसवावे लागल्याने, त्याची संहिता, रंगमंच व्यवस्था, पात्र रचना, प्रकाश योजना सारे अचानक ठरवूनही नाटक वठत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना येतो.

विशेष म्हणजे, गरीब सामान्य माणसाची उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नाची पूर्ती हेच दोन्ही नाटकांच्या संहितेचे लक्ष्य असल्याची जाहिरात केली गेल्याने, दोन्ही मंचांवरील संवादफेकीत अधूनमधून सामान्य मुंबईकर असा शब्द जोरकसपणे घुमताना ऐकू येतो. आपले नैमित्तिक कार्यबाहुल्य बाजूला सारून केवळ सामान्य माणसासाठीच हा करमणूकप्रधान कार्यक्रम आखल्याचा अभिनयही संबंधितांनी फार चांगल्या रीतीने सादर केला आहे, त्याबद्दल प्रेक्षकांची पहिल्या अंकातील प्रत्येकाच्याच प्रवेशास पुरेशी दादही मिळत आहे.

आता एकूण तीन अंकांचे हे करमणूकप्रधान नाटक, पुढे कोणती वळणे घेणार याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेली आहे. कोणत्याही चांगल्या नाटकाचे हेच गमक असते. प्रेक्षकांना पुढच्या वळणाचे तर्क करावयास लावणे हे नाटय़कृतीच्या प्रत्येक प्रवेशाच्या प्रभावीपणाचे लक्षण असते. राजकीय रंगमंचावरील या नाटकाचा पहिला अंक संपत आला आहे, आणि आता पडदा न पाडताच दुसऱ्या अंकाची थेट तिसरी घंटा वाजेल व दुसऱ्या अंकातील प्रवेश सुरू होतील, तेव्हाही रंगमंचावर महानायकांच्याच अभिनयाची कसोटी लागणार आहे. दुसऱ्या अंकातही तुझे माझे जमेना या संकल्पनेवर आधारित संवादांचीच रेलचेल असेल, असे प्रेक्षकांना कळून चुकले आहे. त्यानुसार, आता थेट चिखलफेकीचा एक शानदार सोहळा दुसऱ्या अंकातील एका खास प्रवेशात असेल, असाही अंदाज आहे. एका बाजूने चिखलफेक सुरू झाल्यावर त्याचे शिंतोडे अंगावर उडणार नाहीत याची काळजी घेत प्रतिपक्षाच्या बाजूने सुरू होणारी रंगपंचमी न्याहाळणे, हा प्रेक्षकांच्या करमणुकीच्या अपेक्षेचा परमोच्च बिंदू असेल, व मोफत असली तरी ही करमणूक न्याहाळण्यासाठी वेळ द्यावा लागलेला असल्याने वाया गेलेल्या वेळेची किंमत पुरेपूर वसूल होत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळेल. तिसऱ्या अंकात प्रेक्षकांनाही काही भूमिका बजावावी लागणार आहे. अर्थात, त्यासाठी प्रेक्षकांना फारसा सराव करावा लागणार नाही. दर पाच वर्षांंनी हा मनोरंजन नाटय़महोत्सव साजरा होत असल्याने, आपल्या भूमिकेविषयी प्रेक्षक पुरते सजग आहेत.

असा हा नाटय़ोत्सव तीन अंकानंतर संपेल, तरीही पडदा मात्र पडणार नाही. शिवाय, तिसऱ्या अंकात तरी कथानकाचा शेवट पाहायला मिळेल अशी सवयीनुसार प्रेक्षकांकडून केली जाणारी अपेक्षाही या नाटय़प्रयोगात फोल ठरणार आहे. कारण हेच तर या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. नाटक संपल्यानंतरच, प्रेक्षकांकरिता सुरू असलेला प्रयोग थांबेल व पडद्याआडचे खरे नाटक सुरू होईल. त्यामध्ये साऱ्या कथानकाला कलाटणी मिळेल, अशी शक्यता या राजमंचीय नाटय़सृष्टीच्या समीक्षकांकडून वर्तविली जात आहे. कारण अशाच प्रकारचे नाटक याच संचाने याआधीही एकदा सादर केलेले असल्याने, त्या अंदाजावरच या समीक्षकांचा भर आहे. नाही तरी, शेवटी सारे काही अभिनयावरच वठवून न्यायचे असल्याने, कथानकाला फारसे महत्त्व उरतेच कोठे?…
दिनेश गुणे – response.lokprabha@expressindia.com