18 November 2017

News Flash

नाशिक : कारागृहाची ‘हवा’ कैद्यांना मानवणारी

काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे नाशिकरोड कारागृह सातत्याने चर्चेत आहे.

अनिकेत साठे | Updated: July 7, 2017 1:08 AM

कधी काळी ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी धडपड करणारे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह कैद्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे इतके वादाच्या भोवऱ्यात सापडले की, ते मानांकन दूर, उलट कारागृहाची लक्तरे वारंवार वेशीवर टांगली गेली. दशकभरापूर्वी ‘आयएसओ’ दर्जा मिळविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असतानाच एका वृत्तवाहिनीने ‘स्टिंग ऑपरेशन’ करत कैद्यांना कोणत्या सुविधेसाठी किती दाम मोजावे लागतात, यावर प्रकाश टाकला. पुढील काळात कारागृहातून कैद्याने भ्रमणध्वनीवरून मुंबईतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांत कैद्यांकडे सापडलेल्या भ्रमणध्वनींची संख्या पाहता हे कारागृह आहे की भ्रमणध्वनीचे गोदाम असा प्रश्न पडतो.

काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे नाशिकरोड कारागृह सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी शिक्षा झालेले आणि कच्चे (खटले न्यायप्रविष्ट) असे एकूण ३२६० कैदी आहेत. क्षमतेच्या तुलनेत कारागृहात १०० कैदी अधिक आहेत.

कारागृहातील गैरकारभार अनेक घटनांमधून समोर आला आहे. श्रीमंत कैद्यांना राजेशाही वागणूक मिळते. कैद्यांकडून भ्रमणध्वनीचा सर्रासपणे वापर केला जातो. कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय हे अशक्य आहे. तीन वर्षांपूर्वी भ्रमणध्वनीच्या वापराचा विषय पटलावर आला होता. कारागृहातील कैद्यांनी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी भ्रमणध्वनीवरून धमकावले होते. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन कैद्यांना कारागृहातून अटक केली. कैद्यांना हव्या असलेल्या वस्तूंना कारागृहात सहजपणे प्रवेश मिळतो. भरमसाठ भ्रमणध्वनी सापडत असताना त्यांचे विनासायास ‘चार्जिग’ होत असल्याचे लक्षात येते. कारागृहात कैद्यांसाठी टीव्हीची व्यवस्था आहे. बराकीत दिवे आहेत. त्या ठिकाणी वायरची जोडतोड करून भ्रमणध्वनी चार्जिग केले गेल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे भ्रमणध्वनी चार्जिगसाठी वेगळे दाम मोजावे लागत असल्याचे बोलले जाते. कारागृहाच्या भिंतीत आतमध्ये नेमके काय घडते, हे एक कोडे आहे. भ्रमणध्वनीच्या मुद्दयावरून चार महिन्यांपूर्वी गृह विभागाला कारागृहातील अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करणे भाग पडले. नवीन अधीक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर अद्याप तरी कैद्यांकडे भ्रमणध्वनी सापडलेला नाही, हाच काय तो दिलासा. भ्रमणध्वनीच्या वापरावर पूर्णपणे र्निबध आणण्यासाठी ‘जॅमर’च्या पर्यायावर विचार झाला. अशी यंत्रणा राज्यातील काही कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर बसविली गेली. तिच्या उपयोगितेचा आढावा घेऊन ती कायमस्वरूपी कार्यान्वित करण्याच्या दिशेने पावली टाकली जाणार होती. परंतु, ही गाडी पुढे सरकल्याचे दिसले नाही.

या कारागृहात नाशिकमधील काही गुंड टोळ्यांचे म्होरके व त्यांचे साथीदार आहेत. गुंडांना कारागृहात धाडूनही शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आलेली नाही. त्यामागे कारागृहातून हे म्होरके शहरात गुन्हेगारी कारवाया घडव्ीात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे टिप्पर गँगचा म्होरक्या व साथीदारांना वेगवेगळे ठेवण्याचा तोडगा काढून काहींची इतर कारागृहात रवानगी करावी लागली. यामुळे नाशिकरोड कारागृह हे सुधारगृह आहे की गुन्हेगारांना प्रशिक्षण देणारी शाळा, असाही प्रश्न चर्चिला गेला.

काही वर्षांपूर्वी कारागृहाची अतिशय उंच तटबंदी भेदत एका कैद्याने पलायन केले होते. कारागृहाबाहेर शेतीचे काम करण्यासाठी आणलेला इम्माईल एब्रीस हा कैदी असाच गायब झाला होता. कैद्यांमधील अंतर्गत वाद चर्चेचा विषय ठरतो. त्यात एका कैद्याला जीव गमवावा लागला. या घटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणात न्यायालयीन कोठडीची हवा खाणाऱ्या डॉ. बळीराम शिंदे याचा कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला. न्यायालयीन कामकाजावरून परतताना कैद्यांनी अंमली पदार्थ कारागृहात नेण्याचे प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. अलीकडेच एका माथेफिरू कैद्याने थेट अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत मजल गाठली. कैद्यांचे भोजनही वादाचा केंद्रबिंदू ठरते. निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मध्यंतरी कैद्यांनी अन्नत्याग आंदोलन करत प्रशासनाची कोंडी केली होती.

या एकंदर स्थितीत कारागृहाची नव्याने धुरा सांभाळणारे अधीक्षक राजकुमार साळी यांनी तीन महिन्यांत अनेक बदल केल्याचा दावा केला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण स्वत: नियमांचे पालन केले, तर कोणताही गैरप्रकार घडणार नसल्याचे पटवून दिले. कैद्यांचे न्यायालयाशी संबंधित काम, पॅरोल व तत्सम कामे वेळेवर न झाल्यास त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होते. यामुळे ते हिंसक बनण्याची शक्यता बळावते. त्यांची कामे वेळेत झाल्यास ते नियमावलीचे पालन करतात. कारागृहात अकस्मात झडतीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. भोजनाचा दर्जा सुधारून कोणाची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तसेच कैद्यांना रक्ताच्या नात्यातील नातेवाईक सोडून इतर कोणी भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला. कैदी-नातेवाईकांची ज्या ठिकाणी भेट होते, तिथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहितीही साळी यांनी दिली आहे. ‘तुरुंगाची हवा खावी लागणे’ म्हणजे काहीतरी भयंकर असे सर्वसामान्यांना भासत असले तरी नाशिकरोड कारागृहातील काही दिवसांपूर्वीचे ‘मुक्त’ वातावरण पाहता कैद्यांना ही हवा चांगलीच मानवली होती. आता परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असून सुधारणांची प्रक्रिया यापुढेही कायम ठेवण्याची आवश्यकता आहे.
अनिकेत साठे – response.lokprabha@expressindia.com

First Published on July 7, 2017 1:08 am

Web Title: nashik road central jail