डॉ. शुभांगना अत्रे

काली हे नाव घेतल्यावर उग्र दिसणाऱ्या देवतेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहात असले तरी प्रत्यक्षात आदिमायेच्या या गुणरूपाचे भक्तांना भय वाटत नाही.

parents stand when it comes to selecting modelling career for their children
चौकट मोडताना : कचाकड्याचे जग
exam burden on children marathi news
सांदीत सापडलेले… : खरी परीक्षा!
vam fish curry recipe in marathi
कोकणी पद्धतीने बनवा ‘वाम माशाचे झणझणीत कालवण’; ही घ्या सोपी रेसिपी
Delhi crime three bike riders can be seen roaming fearlessly on the streets of delhi holding knives and liquor in their hands
एका हातात दारूची बाटली अन् दुसऱ्या हातात कोयता; दिल्लीतला धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

काली किंवा महाकालीचे नाव उच्चारले की देवीभक्तांच्या मनात तिचे उग्र रूप आपोआपच उभे राहते. तिचा उल्लेख ‘काली कराली’ असा केला जातो. तरीही तिच्या भक्तांच्या मनात तिच्याबद्दल भय निर्माण होत नाही. देवीच्या संहारिणी रूपापुढे भक्त भक्तिभावाने नतमस्तक होतात. भारतात होऊन गेलेल्या अनेक द्रष्टय़ा व्यक्तींनी आदिमायेच्या अनेक गुणरूपांचे वर्णन अत्यंत तन्मयतेने करत, तिचे स्तवन केले आहे. काली हे त्या आदिमायेचेच एक गुणरूप. काली, महाकाली, भदकाली, कालिका आदि विविध नामाभिधानांनी ओळखल्या जाणाऱ्या तिचे आदि शंकराचार्यानी कालिका अष्टकम् या स्तोत्रामध्ये केलेले ध्यानवर्णन पहा :

गलद्रक्तमुण्डावलीकण्ठमाला

महाघोररावा सुंष्ट्रा कराला।।

विवस्त्रा श्मशानालया मुक्तकेशी

महाकालकामाकुला कालिकेयम्।। १।।

भुजेवामयुग्मे शिरोऽसिं दधाना

वरं दक्षयुग्मेऽभयं वै तथव।।

सुमध्याऽपि तुङस्तना भारनम्रा

लसद्रक्तसृक्कद्वया सुस्मितास्या।। २।।

शवद्वद्वकर्णावतंसा सुकेशी

लसत्प्रेतपािण प्रयुक्तैककाञ्ची।।

शवाकारमञ्चाधिरूढा शिवाभिश्-

चतुर्दक्षिुशब्दायमानाऽभिरेजे।। ३।।

रक्त गळत आहे, गळ्यात मुण्डमाला घातलेली आहे, अत्यंत भयकारी असा आवाज ती करत आहे, अशा तिचे दात मोठाले आहेत आणि तिने विशाल जबडा वासलेला आहे, ती विवस्त्र आहे, तिचा वास स्मशानामध्ये आहे, तिचे केस मोकळे सोडलेले आहेत, अशी ती कालिका महाकालाबरोबर मिलनासाठी आतुरलेली आहे.

तिने डावीकडील एका हातात असुराचे तुटलेले शिर आणि दुसऱ्या हातात खड्ग धारण केलेले आहे. उजवे दोन हात मात्र वरद आणि अभय मुद्रेत आहेत. उत्तुंग स्तनांच्या भारामुळे ती किंचित् पुढे झुकलेली आहे. रक्ताने माखलेल्या तिच्या लाल ओठांच्या दोन्ही कडा स्मितहास्य दर्शवत आहेत.

तिच्या दोन्ही कानात प्रेतालंकार आहेत, तिचे केस लांब आहेत, तिच्या कमरेभोवती मृतांच्या लोंबकळणाऱ्या हातांनी युक्त अशी मेखला आहे, ती प्रेतरूपी मंचावर विराजमान झालेली आहे, चहूबाजूंनी कोल्हेकुईचा कल्लोळ माजलेला आहे, अशा वातावरणामध्ये तिचे अधिराज्य आहे.

मूर्तिमंत मृत्यूच जणू अशा त्या कालिकेचे दोन्ही उजवे हात मात्र वरदमुद्रेत आणि अभयमुद्रेत आहेत, शिवाय तिच्या ओठांच्या कडांवर स्मितहास्य विलसते आहे. वरवर पाहता हा विराधाभास आहे. त्या विरोधाभासाचे मूळ हेच तिच्या भक्तांच्या तिच्यावरील अगाध श्रद्धेचे उगमस्थान आहे. महाकाल म्हणजे साक्षात ‘मृत्यू’, त्या न्यायाने मृत्यूपलीकडील जगाचाही तो स्वामी आहे. महाकाली ही महाकालाची शक्तिरूपिणी, रूढार्थाने पत्नी. तिची सर्व बाह्य़लक्षणे मृत्यूची दर्शक असावीत, यात नवल नाही. आदि शंकराचार्यानी केलेल्या तिच्या ध्यानवर्णनात ठायी ठायी काली म्हणजे मृत्यू याची आठवण देणारी लक्षणे आहेत. मृत्यूवर तिचे अधिराज्य म्हणून तिचे बाह्य़रूप भयकारी, हे खरेच, परंतु ज्याला सत्याचा साक्षात्कार होऊन तिची ओळख पटली, त्या भक्ताला तिच्या रूपाचे भय वाटत नाही. याचे कारण तिचे वरद आंणि अभयमुद्रेतील उजवे हात तिच्या कल्याणकारी मातृरूपाची साक्ष देतात. आध्यात्मिकतेच्या परंपरेवर पोसलेली भारतीय जनसामान्यांची मानसिकता आदि आणि अंत, विश्वनिर्मिती आणि विश्वविलय, दिवस आणि रात्र, जन्म आणि मृत्यू यांना विलग करणाऱ्या अत्यंत तरल असणाऱ्या सीमांसंबंधीच्या तात्त्विक जंजाळात फारशी अडकलेली नाही. या सर्व घटितांमधील अपरिहार्य परस्परावलंबित्व कळतनकळत सर्व भारतीयांच्या मनात पक्के रुजलेले असते. कालचक्राच्या किंवा स्वत:चेच शेपूट गिळणाऱ्या कालसर्पाच्या आवर्ती संकल्पनेचे, पर्यायाने ‘आदि हाच अंत आणि अंत हाच आदि’ याचे भान भारतीय मनाला उपजतच असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणंप पुनरपि जननी जठरे शयनं।।’, ही धारणा ज्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे, त्यांना जन्म आणि मृत्यूही देणाऱ्या मातृतत्त्वाची  भीती न वाटता, त्याच्या महतीचा साक्षात्कार होतो. कालिका/ काली/ महाकाली/ चंडिका या उग्र मातृरूपापुढेही ते नतमस्तक होतात, कारण या रौद्ररूपिणी मातेने विश्वकल्याणासाठीच अवतार धारण केलेला आहे, याबद्दल त्यांना यित्कचितही संदेह नसतो. अनिष्ट, दुष्ट शक्तींचा संहार करणारी म्हणजे पर्यायाने जे जे इष्ट, सुष्ट त्याचे रक्षण करणारी कालिका ही अनेकांना इष्टदेवता वाटते. ती स्वयं दुर्गा किंवा दुग्रेचा अंश आहे, असे परंपरा सांगते. या परंपरेचे मूळ देवी माहात्म्यातील कथांमध्ये आहे.

काली हे नाव मुंडक उपनिषदामध्ये (१.२.४) अग्नीच्या सात जिल्ह्य़ामधील एक म्हणून केलेले आढळते.

काली कराली च मनोजवा च सुलोहिता या च सुधूम्रवर्णा।

स्फुलिङ्गिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वा:।।

काठक गृह्य़सूत्रातही (१९.७) काली हे नाव अग्नी आणि इतर देवतांच्या बरोबरीने समाविष्ट केलेले दिसते.

अग्नि सोमं वरुणं मित्रमिद्रं बृहस्पित स्कन्दं रुद्रं वात्सीपुं भगं भगनक्षत्राणि

कालीं षष्ठीं भद्रकालीं पूषणं त्वष्टारं महिषिकां च गन्धाहुतिभिर्यजेत।।

‘देवी माहात्म्य’ हे मरकडेय पुराणामध्ये काही काळाने समाविष्ट केलेला भाग आहे. अभ्यासकांच्या मते ‘मरकडेय पुराण’ हे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील असावे. देवी माहात्म्य हे साधारणपणे इसवी सनाच्या सहाव्या शतकातले असावे, असे मानले जाते. मरकडेय पुराणातेल अध्याय ८१ ते ९३ हे देवी माहात्म्य या नावाने ओळखले जातात. ‘दुर्गा सप्तशती’ आणि ‘चण्डीपाठ’ ही देवी माहात्म्याची पर्यायी नावे आहेत. देवी माहात्म्याखेरीज ‘देवी भागवतम्’ आणि ‘देवी उपनिषद’ हे ग्रंथ शाक्त उपासनेत महत्त्वाचे समजले जातात. देवी माहात्म्याचे पारायण हे देवीच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जाते. बंगालमध्ये त्याचे पारायण सर्वपित्री अमावास्येला आवर्जून केले जाते.

देवी माहाम्याच्या सातव्या अध्यायात देवी दुग्रेवर चंड आणि मुंड यांनी हल्ला केल्यावर देवीचा क्रोध अनावर होऊन तिच्या ललाटातून काली उत्पन्न झाली असे वर्णन आहे.

ते श्लोक असे :

तत: कोपं चकारोच्चरम्बिका तानरीन् प्रति

कोपेन चास्या वदनं वर्णम्भूत्तदा

भ्रुकुटी कुटिलात्तस्या ललाटफलकाद्रुतम्

काली करालवदना विनिक्रान्तासिपाशिनी

देवी माहात्म्याच्या मराठी पोथीत हे श्लोक

असे आहेत :

तेव्हा भवानी कोप करी। मारुं भावी सकळ वैरी।।

क्रोधे करूनि ते अवसरीं। तिचे मुख काळें जाहलें।।

मषीसारखे काळें वदन। भृकुटी कराल दिसे जाण।।

तेव्हां तिच्या कपाळापासून। ‘काली’ उत्पन्न जाहली।।

कालीने चंड आणि मुंड यांना मारून त्यांची मस्तके चंडिकेला (दुर्गा) अर्पण केली. त्यावर चंडिकेने तिला चंड आणि मुंड यांचे निर्दालन करणारी म्हणून तू चामुंडा या नावाने ओळखली जाशील असा वर दिला.

आठव्या अध्यायात कालीने रक्तबीजाला मारले त्याची कथा आहे. चंड आणि मुंड यांचे निर्दालन केले म्हणून चिडलेला शुंभ देवीवर चाल करून आला. दुर्गादेवी आणि तिच्याबरोबरीच्या सप्तमातृका आणि काली शुंभाच्या असुर सन्याचा समूळ विनाश करतात.  त्यापैकी रक्तबीज नावाच्या असुराशी लढत असताना मात्र त्यांना माघार घ्यावी लागते की काय असे चित्र निर्माण होते. कारण रक्तबीजाशी लढत असताना त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबागणिक एकेक नवीन रक्तबीज निर्माण होत राहतो. तेव्हा चंडिका कालीला तिचे मुख विस्तृत करण्याची आज्ञा देते. प्रचंड मोठा आ वासून उभी राहिलेली काली  रक्तबीजाच्या रक्ताच्या थेंबापासून निर्माण झालेल्या नवीन असुरांना खाऊन टाकते आणि त्याच वेळेस रक्तबीजाचे सांडणारे रक्तही तिच्या लांब जिभेने वरच्यावर पीत राहते. त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर सांडू देत नाही. शेवटी त्याचे सर्व रक्त कालीने वरच्यावर शोषल्यामुळे रक्तबीज मरण पावतो. नवव्या आणि दहाव्या अध्यायात शुंभ आणि निशुंभ यांच्या वधाची कथा आहे. त्यांच्या वधातही चंडिकेच्या साहाय्यासाठी सप्त मातृका आणि काली लढल्याचे वर्णन आहे.

काली आणि इतर सप्त मातृकांचा असुरांसोबत झालेल्या युद्धातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता, हे आपण पाहिले. या मातृदेवता देवी दुग्रेच्या साहाय्यासाठी सज्ज होत्या. त्या सर्वच देवीच्या अंशरूप मानलेल्या आहेत. त्यांमध्ये ब्रह्माणी, वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही, नारसिंही आणि चामुंडा म्हणजेच काली. पहिल्या सप्तमातृका या अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, कुमार (स्कंद), वराह आणि नरसिंह या पुरुषदेवतांच्या शक्तिरूप आहेत. त्या सर्व प्रथम दुग्रेमध्ये सामावल्या आणि नंतर दुग्रेने त्यांना स्वत:मधून पुन्हा उत्पन्न केल्या, असे देवी माहात्म्यात म्हटले आहे. चामुंडा/काली ही स्वत: दुग्रेचे शक्तिरूप आहे. या मातृकांचे गुणरूप आणि वाहने आणि आयुधे त्या ज्या देवतांचे शक्तिरूप आहेत त्या देवतांप्रमाणेच असतात. मत्स्य पुराणात अंधकासुराचा वध करण्याच्या प्रसंगी शिवाने त्या स्वत:पासून निर्माण केल्याचे म्हटले आहे. विविध ग्रंथांनुसार मातृकांच्या उत्पत्ती, नावे आणि संख्या यांमध्ये भेद आढळतात. ते लक्षात घेतले तरी मातृका या एखाद्या मुख्य देवतेच्या शक्तिरूप आहेत, हे सूत्र मातृका या संकल्पनेच्या मुळाशी असलेले दिसते. त्याचप्रमाणे स्थानिक मातृदेवतांचा समावेशही त्यांच्या यादीत होत गेल्याचे दिसते. कालीसह सर्व मातृकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या जात्याच उग्र प्रकृतीच्या, रक्तपिपासू आणि सामर्थ्यशाली आहेत. मूळ उग्र प्रकृतींच्या मातृकांचा अनिष्टाच्या विनाशासाठी उपयोग करून घेणे, हा त्यांच्या उन्नयनाचा, पुराकथांद्वारे त्यांना पौराणिक धर्मकल्पनांमध्ये सामावून घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

भारतामध्ये विविध नामरूपांनी ओळखल्या जाणाऱ्या मातृकांची उपासना खूप प्राचीन काळापासून होत होती, याबद्दल शंका नाही. परंतु त्याचा आरंभ नेमका केव्हापासून हे सांगता येणे मात्र कठीण आहे. मातृकांचे शिल्पांकन ज्यात आहेत अशा शिल्पपट्टांचा विचार केला तर किमानपक्षी सप्तमातृकांच्या संदर्भात असे म्हणता येईल की इसवी सनाच्या तिसऱ्या ते चौथ्या शतकात शाक्त संप्रदायातील त्यांचे स्थान सुप्रतिष्ठित झालेले होते. त्यापैकी कालीला ६४ योगिनींच्या तांत्रिक उपासनेतही महत्त्वाचे स्थान होते. दुग्रेला साहाय्य करणाऱ्या मातृकांच्या सन्यामध्ये ६४ योगिनीही समाविष्ट होत्या, हे या संदर्भात महत्त्वाचे आहे. सप्तमातृकांच्या शिल्पपट्टांखेरीज त्यातील प्रत्येक मातृकेच्या स्वतंत्र मूर्तीही साकारलेल्या आढळतात. अत्यंत उग्र असे रूप हे चामुंडा/कालीच्या मूर्तीच्या घडणीतील समान सूत्र गृहीत धराले तरी प्राचीन मूर्तिकारांनी तिच्या मूर्ती घडवताना लक्षणीय वैविध्य साधलेले दिसते. बौद्ध आणि जैन देवतासंकुलातही चामुंडेला गौण देवतागणांमध्ये स्थान दिलेले आहे. भारतामध्ये   हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ अशा प्रांतांमध्ये चामुंडा ही अनेक कुंटुबांची कुलदेवी आहे. विशेषत: राजस्थानमध्ये अनेक ऐतिहासिक राजघराण्यांमध्ये कुलदेवी म्हणून तिची उपासना केली जात असे.

चामुंडा/कालीसह सर्व मातृकांना मांस आणि मद्याचा नवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. परंतु जैन परंपरेनुसार चामुंडेला दाखवला जाणारा नवेद्य मात्र पूर्णपणे शाकाहारीच असतो. त्याची एक कथा सांगितली जाते. राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्य़ात ओसियां हे स्थळ तेथील प्राचीन मंदिरांच्या स्थापत्य आणि शिल्पसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे प्राचीन नाव उपकेशीपूर असे होते. हे जैनांचे, विशेषत: ओसवाल जैन समाजाचे, एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकात प्रतिहार राजा वत्सराज याने तेथील महावीर मंदिर बांधले. ओसियां येथे ओसवाल समाजाच्या कुलदेवीचे म्हणजे चामुंडा देवीचे मंदिरही आहे. या देवीला मांसाचा नवेद्य दाखवला जाई. परंतु जैन आचार्य रत्नप्रभासुरी यांनी राजा आणि प्रधान यांना सांगून ती प्रथा बंद करवली. त्यामुळे देवी चामुंडा कोपली आणि तिने आचार्याना त्रास द्यायला सुरुवात केली. परंतु त्यामुळे डगमगून न जाता आचार्यानी देवीचेच मन वळवले आणि देवीने गोडा नवेद्य स्वीकारण्याचे मान्य केले. आचार्य रत्नप्रभासुरी यांनी चामुंडा देवीला ‘सच्चीय माता’, असे नवे नाव दिले. तिने इच्छिल्यामुळे ओसियां येथे महावीरांची मूर्ती प्रकट झाली, असे मानले जाते. आचार्य रत्नप्रभासुरींनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या जागेवर नंतर मंदिर बांधले गेले. पुण्यात कात्रज येथे सच्चीय मातेचे मंदिर बांधलेले आहे.

बौद्ध देवतामंडळात, विशेषत: तिबेटी वज्रयान बौद्ध संप्रदायाच्या देवतामंडळात कालीला प्रमुख स्थान आहे. त्यामध्ये ती ‘ख्रोम नग मो’ किंवा ‘क्रोधकाली’ या नावाने ओळखली जाते. तिला ‘वज्रयोगिनी तारा’ असेही म्हटले जाते. क्रोधकाली किंवा वज्रयोगिनी ताराचेच दुसरे रूप म्हणजे ‘छिन्नमस्ता’. छिन्नमस्ताने स्वत:चेच शिर कापून हातात धरलेले असते.  तिचे उन्मादपूर्ण नृत्य हे शून्यत्वाच्या अवकाशातील परमानंदाचे निदर्शक आहे. ती रक्तवर्ण आहे. तिच्या शरीरावरील मुंडमाला आणि मानवी हाडांचे अलंकार वगळता तिने दुसरे कोणतेही वस्त्र परिधान केलेले नाही. काली आणि वज्रयोगिनी तारा, तसेच छिन्नमस्ता या तिघींचाही समावेश महाविद्यांमध्ये होतो. महाविद्या म्हणजे आदिशक्तीची काली, तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, भरवी, छिन्नमस्ता, धूमवती, बगलामुखी, मातंगी आणि कमला अशी दहा अंशरूपे होत. त्यांमध्ये काली, तारा अणि छिन्नमस्ता यांचे शाक्त उपासनेत विशेष महत्त्व आहे. त्यांचे नृत्य मायेमुळे निर्माण होणारा भ्रम आणि अहंकार यांना पायदळी तुडवून नष्ट करते.

कालीचे एक नाव भद्रकाली असे आहे. भद्रकाली म्हणजे ‘महामाया’ होय, असे मानले जाते. असे भद्रकालीची मंदिरे भारतात सर्वाधिक संख्येने केरळमध्ये आहेत. त्याखेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या प्रांतांमध्येही भद्रकालीची मंदिरे आहेत. भद्रकाली हे महामायेचे रूप मानले जाते. दारिक नावाच्या असुराचा नि:पात करण्यासाठी शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून उत्पन्न झाली म्हणून तिला शिवाची कन्या मानले जाते. केरळमधील काली मंदिरात मुडियेट्ट या लोकनृत्यनाटय़ातून दारिकाच्या वधाची कथा सादर केली जाते. या नृत्यनाटय़ाला युनेस्कोकडून अमूर्त कलेच्या जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. भद्रकाली ही केरळमधील कलरीप्पयट्ट या युद्धकलेची अधिष्ठात्री देवी आहे.

दक्षिणकाली या नावाने कालीची पूजा बंगालमध्ये अधिक प्रचलित आहे. या रूपात ती शिवाची पत्नी आहे. ती शिवाच्या छातीवर उजवा पाय देऊन उभी असते. तीच शिवाच्या छातीवर डावा पाय देऊन उभी असते तेव्हा तिला वामाकाली, असे म्हटले जाते. वामाकाली हे देवीचे अत्यंत उग्र असे रूप मानलेले आहे. तिला स्मशानकाली असेही म्हटले जाते. तिची उपासना स्मशानात केली जाते. असुरांचा वध केल्यानंतरही आदिशक्ती दुर्गा किंवा महाकाली जेव्हा शांत होईना तेव्हा शिवाने स्वत:ला तिच्या पायतळी झोकून दिले. शिवावरती पाय देऊन उभे राहिल्यानंतर आपण आपल्या पतीवर पाय देऊन उभे आहोत याचे भान येऊन ती शांत झाली, अशी कथा आहे. तिच्या भयंकर रूपाला पाहून यमदेखील भयभीत झाला. म्हणूनच तिच्या भक्तांना मृत्यूचे भय राहात नाही, असे म्हटले जाते. दक्षिणकाली आणि वामाकाली या दोन्ही रूपांत ती तांत्रिक साधनेची अधिष्ठात्री आहे. परंतु वामाकालीची उपासना संसारिक गृहस्थाने करू नये, असा संकेत आहे. ती संहारकर्ती आहे. ती योद्धय़ांची आणि तांत्रिकांची आराध्य देवी आहे. कोलकाता (कालीघाट) येथील दक्षिणकालीचे मंदिर हे ५१ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. कालिका पुराणातील परंपरेनुसार सतीचे मुख येथे पडले. सतीच्या उजव्या पायाची बोटे इथे पडली, अशीही एक परंपरा आहे.

काली उपासनेच्या संदर्भात तिच्या विविध गुणरूपांची आणि त्यासंबंधीच्या कथा-परंपरांची थोडक्यात ओळख करून घेण्याचा प्रयत्न आपण केला. सारांश रूपाने असे म्हणता येईल की काली जशी आदिशक्ती दुग्रेच्या अंशरूपाने अवतीर्ण झाल्याची कथा आहे, तसेच ती शिवकन्या असल्याची कथासुद्धा आहे. दक्षिणकाली किंवा शिवकालीच्या स्वरूपात ती शिवपत्नीही आहे. ती जशी भयकारी आहे, तशीच ती कल्याणकारी आहे. तांत्रिक साधक तिच्या साधनेद्वारे जन्म-मृत्यूच्या सीमा पार करून जाण्याचा संकल्प करतो, तर संसारिक उपासक तिला मातृरूप मानून, बालकाची भूमिका स्वीकारून, तिला पूर्णपणे शरण जातो आणि संसारिक सुख-दु:खांपासून तिने आपले रक्षण करावे, अशी आशा बाळगतो. असंसारिक साधक आणि संसारिक उपासक या दोघांसाठी ती ’भवतारिणी’ आहे. तिच्या निर्गुणत्वाचे आणि सगुणत्वाचे अनेक पदर उलगडताना ती आदिशक्ती, पराशक्ती कालीच्या रूपाने अनेक रंगरूपांमध्ये प्रकट होते. जीवन देणारीही तीच, मृत्यू देणारीही तीच आणि जीवनमृत्यूच्या सीमा ओलांडून भवापासून मुक्ती मिळवून देणारीही तीच, असा अनादिअनंताचा बोध देत, ती चिरंतनाची साक्ष होते.