प्रिया निकुम

देवी म्हणजे शक्ती ! ही शक्ती स्वयंभू असल्यामुळे तिला ‘आदिशक्ती’ म्हणतात. या आदिशक्तीची अनेक रूपे आहेत. नवरात्रीमध्ये त्यातल्या नऊ रूपांची आराधना होते, ज्यांना त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे ‘नवदुर्गा’ म्हणून संबोधतात. या नवदुर्गाची प्रत्येकीची उत्पत्तीकथा, उपासनापद्धत, उपासनामंत्र, पूजाविधी वेगवेगळे आहेत. त्यांच्या या सर्व वैविध्यांचा सचित्र आढावा-

देवी शैलपुत्री

देवीच्या नऊ रूपांपैकी नवरात्रीच्या पहिल्या रूपात ती ‘शैलपुत्री’च्या नावाने ओळखली जाते. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. पर्वताचा राजा हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म झाल्यामुळे या देवीला शैलपुत्री हे नाव पडले आहे. हिचे वाहन (वृषभ) म्हणजेच बल आहे. ती त्यावरच विराजमान आहे. तिच्या डाव्या हातात त्रिशूल व उजव्या हातात कमळाचे फूल असते. असे मानले जाते की, प्रजापती राजा दक्षाच्या घरात तिने जन्म घेतला, तेव्हा ती सती या नावाने ओळखली जात होती. तिचे लग्न भगवान शंकरांसोबत झालेले होते. एकदा प्रजापती दक्षाने खूप मोठय़ा यज्ञाचे आयोजन केले होते. परंतु सतीला तसेच भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण नव्हते. तरीही सती या यज्ञासाठी पित्याच्या घरी पोहोचली, तेव्हा कोणीही तिच्याशी नीट वागले बोलले नाही. त्यामुळे अपमान झाल्याच्या भावनेने सतीने संतापाने आपला देह यज्ञात समर्पित केला. तिने पुढच्या जन्मी शैलराजाच्या घरात हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला आणि ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली. ‘पार्वती’, ‘हैमवती’ हीपण तिचीच नावे आहेत. एका कथेनुसार तिने हैमवती रूपात देवतांचे गर्वहरण केले होते. या शैलपुत्रीचा विवाह शंकराशीच परत झाला. म्हणून नवदुर्गामध्ये शैलपुत्रीला प्रथम स्थान असून तिचे महत्त्व, शक्ती अनन्य आहे.

पूजाविधी : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आंघोळ करून शुचिर्भूत व्हावे. चौरंगावर लाल कापड घालून देवीचा फोटो ठेवावा. ‘शं’ हे अक्षर केशराने लिहावे. नंतर गणपती, कुबेर या मूर्तीसोबत कलश स्थापन करून घ्यावा. त्यानंतर आपल्या मनोकामनेच्या पूर्तीसाठी ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे!’ हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. देवीला एक लाल फूल अर्पण करावे आणि पुढील स्तोत्र पठण करावे.

ऐश्र्वय यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पद:। शत्रुहानि परो मोक्ष स्तूयते सा न किं जन:॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे। नापदं तस्य पश्यामि शोकदु:खभयं न हि।

पूजेचे महत्त्व : या देवीची पूजा करून, साधकांना दुष्ट, दुराचारी आणि क्रूर अनुष्ठानांशी लढण्यासाठी शक्ती मिळते. ही देवी शक्ती, समर्थन आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. तिच्या मंत्राच्या जपामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होते, तिच्या भक्तीपूजेमुळे मनुष्य रोगांपासून मुक्त होतो, असे मानले जाते.

देवी ब्रह्मचारिणी

देवीच्या नऊ शक्तींपैकी ब्रह्मचारिणी हे दुग्रेचे दुसरं रूप आहे. देवीच्या या रूपाची आराधना करताना ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे अनंताचा अनुभव घेऊ लागते. आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रह्माचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘स्वाधिष्ठान’ चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्या वेळी नारदमुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती, असे सांगितले जाते. या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात. एक हजार वर्षांपर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चय्रेनंतर तिने तीन हजार वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले. अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून ‘हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर तुला पतीरूपात प्राप्त होतील. आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील.’ असा वर दिला. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी मानली जाते. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. या देवीला विद्यांची जननी मानले जाते. माता ब्रह्मचारिणीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात असे म्हणतात. नेहमी हातात असलेल्या जपमाळ आणि कमंडलूमुळे ती ज्ञान आणि तंत्र मंत्राने संयुक्त आहे. आपल्या भक्तांना याच गोष्टीच्या आधारावर ती नेहमी विजय मिळवून देते. ज्यांना आपल्या बुद्धीमध्ये वाढ करून उचित ज्ञानाने समृद्ध व्हायचं असेल त्या प्रत्येकाने या देवीची पूजा केली पाहिजे असे मानतात. कारण, यामुळे आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते. यासाठी आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा मोजलेला एक अखंड धागा घ्यावा. ‘या देवी सर्वभूतेषु विद्यारुपेण संस्थिता नमस्तस्य, नमस्तस्य, नमस्तस्य नमो नम:’ या मंत्राचा जप करत त्या दोऱ्याला ५४ गाठी माराव्यात. तो धागा देवीला अर्पण करून रोज या मंत्राचा जप करून नवव्या दिवशी हा धागा वाहत्या पाण्यात विसर्जन करावा. त्यामुळे बुद्धीत वाढ होऊन मनुष्य हुशार होतो, असे मानतात. ब्राह्मी ही या देवीची औषधी असल्याने तिची पूजा केल्याने चांगली बुद्धी मिळते. अशा प्रकारे हे दुग्रेचे दुसरे रूप आहे.

पूजाविधी : एका चौरंगावर कापड घालून त्यावर देवीचा फोटो ठेवावा. नंतर कलशामध्ये फुले, अक्षत, कुंकू, चंदन घालून त्याची पूजा करावी. त्यावर कुंकवाने पाच उभ्या रेषा काढून घ्या. नंतर सुपारीरूपी गणपतीला पंचामृताने न्हाऊ घालावे आणि विडय़ाच्या पानावर ठेवावे. देवीची पूजा करण्याच्या आधी आवाहन करण्यासाठी एका हातात फुलं घेऊन ‘दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू. देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा’ या मंत्राचा उच्चार करून ती फुलं देवीला वहावीत. नंतर देवीला पंचामृताने स्नान घालून तिला हळद, कुंकू, फुलं, अक्षता वहावीत. असल्यास अत्तर लावावे. त्यानंतर आचमन करून संकल्प सोडून देवीला प्रसाद दाखवावा आणि देवीचे हे स्तोत्र वाचावे.

तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।

ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्

शंकरप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।

शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणीप्रणमाम्यहम्

‘‘मां ब्रह्मचारिणी का कवच’’

त्रिपुरा में हृदयं पातु ललाटे पातु शंकरभामिनी।

अर्पण सदापातु नेत्रो,अर्धरी च कपोलो

पंचदशी कण्ठे पातुमध्यदेशे पातुमहेश्वरी

षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।

अंग प्रत्यंग सतत पातु ब्रह्मचारिणी।

पूजेचे महत्त्व : ब्रह्मचारिणी देवीची पूजा करून, सद्गुण, त्याग, मृत्यभाव, गुण आणि मनुष्यामध्ये संयम वाढतो. आयुष्यातील कठीण परिस्थितीतदेखील भक्ताचे मन कर्तव्याच्या मार्गावर विचलित होत नाही. देवी नैतिकता, भ्रष्टाचार आणि त्याच्या साधकांचे दोष दूर करते. तिच्या कृपेने, यश आणि विजय सर्वत्र मिळते, अशी मान्यता आहे.

देवी चंद्रघण्टा

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघण्टा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे. घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. या देवीची कथा अशी सांगितली जाते की, देव-दानवात घनघोर युद्ध सुरू होते. त्यात बऱ्याच वेळेला दानवांकडून देवांची सेना पराजित होत होती. तेव्हा एक वेळ अशी आली की, दानवांनी देवांवर विजय मिळवून इंद्रलोक काजीब केला. युद्ध हरल्यामुळे निराश होऊन सगळे देव ब्रह्मदेवाकडे साहाय्य मागण्यासाठी गेले. त्यांनी भगवान विष्णू आणि शंकराची मदत घ्या असे सांगितले म्हणून त्यांच्याकडे गेले. दानव पंचमहाभूतांना बंदी बनवून भू-लोकी अत्याचार माजवत आहेत, हे सर्व ऐकून या तीन देवांना संताप आला. या क्रोधामुळे त्यांच्या तोंडून एक महान प्रकाशाचा गोळा प्रकट झाला. आणि त्यातून चंद्रघण्टा देवीचा उगम झाला, असे मानले जाते. विष्णूंनी तिला आपल्याकडील चक्र, शाकारणी त्रिशूल दिले. प्रत्येक देवाने आपल्याकडील अशी काहीना काही वस्तू देवीला दिली. सर्वात शेवटी इंद्राने आपल्या ऐरावतावरून उतरून आपल्याकडील घंटा दिली. त्यामुळेच, या देवीच्या हातात खूप शस्त्रं दिसतात. मग ती त्या राक्षसांशी युद्ध करायला निघून गेली. हे युद्ध देखील बराच काळ चाललं. या देवीचे वाहन असलेल्या सिंहाने आपले रूप प्रकट करून तो त्या सर्वावर चालून गेला. अशा प्रकारे देवीने त्या दुष्टांचा संहार करून इंद्राला त्याचे लोक पुन्हा परत मिळवून दिले. तिच्या पूजनाने सर्व कष्टांना मुक्ती मिळते असे मानतात. तिचं रूप परम शांतीदायक व कल्याणकारी मानलं जात. तिच्या मस्तकावर शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. त्यामुळेच या देवीला चंद्रघण्टा म्हटले जाते. हिच्या शरीराचा रंग अगदी सोन्यासारखा चमकदार असतो. तिला दहा हात असून त्या हातात खड्ग, शस्त्रे, बाण, अस्त्र इ. विराजमान आहे. देवीच्या चेहऱ्यावर सतत युद्धासाठी तयार असा भाव आहे. तिच्या याच क्रोधामुळे अनेक अत्याचारी दानव, दैत्य, राक्षस, तिला नेहमी घाबरून असतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी साधना करणाऱ्यांचं मन ‘मणिपूर’ चक्रामध्ये प्रविष्ट होत असतं, असं मानतात. देवी चंद्रघण्टेमुळे त्या व्यक्तीला अलौकिक दर्शन होतं, दिव्य सुगंधाचा अनुभव येतो. तसेच विविध प्रकारचे भव्य-दिव्य आवाज देखील ऐकायला येतात, असं मानतात. त्यामुळे हे क्षण तपश्चर्या करणाऱ्या त्या व्यक्तीला अत्यंत सावधान राहावे लागते. या देवीच्या कृपेने ही साधना करणाऱ्या लोकांच्या सगळ्या अडचणी दूर होतात. तिची आराधना अतिशय फलदायी असते, असे मानतात. तिच्या सतत युद्धासाठी तयार असलेल्या मुद्रेमुळे भक्तांच्या अडचणी निवारण करायला ती लवकर येते. तिचे वाहन सिंह असल्यामुळे उपासक सुद्धा सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतात. तिच्या मस्तकी असलेल्या घण्टेच्या नादाने भक्तांचे रक्षण होते. तिचं ध्यान मनापासून करणाऱ्या भक्ताने केलेला घंटानाद ऐकून ती त्याच्या मदतीसाठी जाते. दुष्टाचे दमन आणि विनाश करण्यात ती सदैव तप्तर असते. दर्शनासाठी आलेल्या तसंच आराधना करणाऱ्यासाठी तिचं रूप अत्यंत सौम्य असते. हिच्या आराधनेमुळे सद्गुण प्राप्त होऊन सौम्यता, विनम्रता यांचा विकास होत असतो. सदा मुखातून, डोळ्यातून, गुणांची, कांतीची वृद्धी होत असते. तिच्या आवाजात दिव्य अलौकिक माधुर्याचा समावेश होतो. तिच्या दर्शनाने उपासकांना शांती आणि सुखाचा अनुभव येतो. देवीच्या या स्तोत्राचे पठण करावे.

आपदुद्धारिणी त्वंहि आद्या शक्ति शुभपराम्।

अणिमादि सिद्धिदात्री चंद्रघंटा प्रणमाभ्यम्

चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टं मन्त्र स्वरूपणीम्।

धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघंटे प्रणमाभ्यहम्

नानारूपधारिणी इच्छानयी ऐश्वर्यदायनीम्।

सौभाग्यारोग्यदायिनी चंद्रघंटप्रणमाभ्यहम्

पूजा विधी : चौरंगावर कापड घालून चांदीचा किंवा मातीचा कलश पाणी भरून ठेवावा. त्यानंतर संकल्प सोडून तांब्याला कुंकवाची पाच बोटे लावून त्यावर विडय़ाची पाच पाने ठेवून नारळ ठेवावा. त्यामध्ये फुलं, अक्षदा, हळद-कुंकू, सुपारी, रुपया, चंदन, दुर्वा घालून वर नारळ ठेवावा. नंतर देवीला नवेद्य दाखवून आरती करावी.

देवीचे पूजा महत्त्व : देवी चंद्रघण्टाच्या कृपेने साधकाचे सगळे अडथळे दूर होतात. तिच्या कृपेने साधक पराक्रमी आणि निडर बनतो. चंद्रघण्टाची पूजा करून मनुष्याला सर्व प्रकारच्या दुखांपासून मुक्तता मिळते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघण्टा देवीची पूजा केली जाते. चंद्रघण्टा देवीची आराधना केल्याने भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांती मिळते. देवीच्या उपासनेने कुंटुंबातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

देवी कुष्मांडा

दुग्रेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. दुग्रेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा असे नाव पडले. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रात स्थिर झालेले असते. दुग्रेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘अनाहत’ चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. या देवीला आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचे आजार बरे होतात, असे मानले जाते. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते. कुष्मांडाची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे. मनुष्य नेहमी स्वत:मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कधी नकारात्मक विचार, इष्र्या, घृणा त्याच्या मनात सुरू राहते. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळतं. म्हणून ही पूजा करतात.

पूजाविधी : एका चौरंगावर कापड घालून त्यावर देवीचा फोटो ठेवावा. नंतर कलशामध्ये फुले, अक्षता, कुंकू, चंदन घालून त्याची पूजा करा. त्यावर कुंकवाने पाच उभ्या रेषा काढून घ्या. नंतर गणपतीला पंचामृताने न्हाऊ घाला. विडय़ाच्या पानावर सुपारी ठेवा. त्यानंतर ‘या देवी सर्वभूतेषु माँ कुष्मांडा रूपेण संस्थिता। नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम:॥’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा आणि आजच्या दिवशी पुढील स्तोत्र वाचा.

दुर्गतिनाशिनी त्वंहि दरिद्रादि विनाशनीम्।

जयंदा धनदा कुष्मांडे प्रणमाम्यहम्

जगतमाता जगतकत्री जगदाधार रूपणीम्।

चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम्

त्रलोक्यसुन्दरी त्वंहिदु:ख शोक निवारिणीम्।

परमानन्दमयी, कुष्मांडे प्रणमाभ्यहम्

पूजेचे महत्त्व : या देवीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व रोग नष्ट होतात, असे मानतात. देवी जन्म, आरोग्य, शक्ती आणि आरोग्य देते. तिच्या कृपेने व्यवसायात वाढ आणि कामात प्रगती, नवीन उत्पन्न प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

देवी स्कंदमाता

दुग्रेचे पाचवे रूप स्कंदमातेचे आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ज्ञ, निष्णात. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. यावेळी विशुद्ध चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. या दरम्यान साधकाने पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे. स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्युलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते, असे मानतात. भक्ताने एकाग्र मनाने तिला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही, अशी श्रद्धा आहे. या देवीमागे अशी कथा आहे की, भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. त्यामुळे भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावाने देखील ही देवी ओळखली जाते. ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णिला केला आहे. भगवान स्कंदाची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला ‘स्कंदमाता’ म्हणून ओळखले जाऊ लागले. स्कंदमाता चार भुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील हात वर उचललेला आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वर मुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचलली आहे. त्यामध्ये कमळाचे फूल आहे. या देवीचा रंग पूर्णत शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असल्याने तिला पद्मासना असेही म्हटले जाते. ती शौर्याचे प्रतीक मानली जात असल्याने तिचे वाहन सिंह आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रांत विशेष महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे हिची पूजा अतिशय शुद्ध भावना ठेवून करायला पाहिजे. नवरात्रीच्या दिवसात या दिवशी अलसी म्हणजेच जवस हे औषधाच्या रूपात वाहून हिची पूजा करतात. जवस वात, कफ, पित्त यावर उपचार आहे. त्यामुळे हे तिला या दिवशी वाहतात.  स्कंदमातेच्या उपासनेमुळे मनाला शांती प्राप्त होते.

पूजा विधी : चौरंगावर कलश भरून तो स्थापित करून घ्यावा आणि त्यावर देवीचा फोटो ठेवा. त्यासोबत गणपती, नवग्रह यांच्या मूर्ती असल्यास त्यांची स्थापना करावी. नंतर संकल्प सोडून, आचमन करून देवीला स्नान घालून हळद-कुंकू, अत्तर, आभूषण, फूल, धूप, दीप दाखवावं. त्यानंतर ‘या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम:॥’ या मंत्राचा जप करावा.

देवीचे पूजा महत्त्व : नवरात्रीच्या पंचमी तारखेला स्कंदमाताची पूजा ही विशेषत फलदायी आहे. तिच्या पूजेमुळे सर्व भक्तांना, परिपूर्ण शांतता मिळते. आनंदाचा अनुभव मिळतो. मोक्ष प्राप्त होतो. सूर्य मंदिराच्या देवीमुळे, त्यांचा उपासक तेजस्वी होतो. साधकाला कठोर तपस्ये शिवाय फलप्राप्ती होऊन शक्ती, परिपूर्ण शांतता आणि आनंदाचा अनुभव येतो. या दिवशी देवीचे पुढील स्तोत्र वाचावे.

नमामि स्कन्दमाता स्कन्दधारिणीम्।

समग्रतत्वसागरमपारपार गहराम्

शिवाप्रभा समुज्वलां स्फुच्छशागशेखराम्।

ललाटरत्नभास्करां जगत्प्रीन्तिभास्कराम्

महेन्द्रकश्यपार्चिता सनंतकुमाररसस्तुताम्।

सुरासुरेन्द्रवन्दिता यथार्थनिर्मलादभुताम्

अतक्र्यरोचिरूविजां विकार दोषवर्जतिाम्।

मुमुक्षुभिर्वििचन्तता विशेषतत्वमुचिताम्

नानालंकार भूषितां मृगेन्द्रवाहनाग्रजाम्।

सुशुध्दतत्वतोषणां त्रिवेन्दमारभुषताम्

सुधार्मिकौपकारिणी सुरेन्द्रकौरिघातिनीम्।

शुभां पुष्पमालिनी सुकर्णकल्पशाखिनीम्

तमोन्धकारयामिनी शिवस्वभाव कामिनीम्।

सहस्रसूर्यराजिका धनज्ज्योगकारिकाम्

सुशुद्ध काल कन्दला सुभडवृन्दमजुल्लाम्।

प्रजायिनी प्रजावति नमामि मातरं सतीम्

स्वकर्मकारिणी गति हरिप्रयाच पार्वतीम्।

अनन्तशक्ति कान्तिदां यशोअर्थभुक्तिमुक्तिदाम्

पुनपुनर्जगद्वितां नमाम्यहं सुरार्चिताम्।

जयेश्वरि त्रिलोचने प्रसीद देवीपाहिमाम्।

देवी कात्यायनी

कात्यायनी हे देवीचे मातृत्वाचे वैशिष्टय़ दर्शवणारे हे रूप आहे. देवीच्या या रूपामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत, असे मानले जाते. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी कात्यायनी देवीची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. या सगळ्याला साजेसा वर या देवीच्या आराधनेतून मिळतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे ही देवी नातेसंबंधामधील उच्च गुणांची प्रतीक मानली जाते. आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय. तो कात्यायनी देवीशी जोडला गेला आहे, हे तिचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. दुग्रेचे हे आगळेवेगळे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘आज्ञा’ या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनी देवीच्या चरणी आपले सर्वस्व वाहतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते, अशी श्रद्धा आहे. दुग्रेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक कथा सांगितली जाते. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनांचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात प्रसिद्ध आहे. कात्यायनी अमाप फलदायक मानली जाते. कािलदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज गोपींनी या देवीची पूजा केली होती, असे मानतात. ही देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते. इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. तिची मनापासून पूजा करणाऱ्याला रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्ती मिळते. सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी कात्यायिनी देवीची उपासना करणे आवश्यक मानले जाते.

पूजा विधी :  सर्वात प्रथम पूजेचा संकल्प सोडावा. त्यानंतर एक फूल हातात घेऊन पूजेच्या साहित्यावर थोडं पाणी िशपडून तोंडाने ‘ॐ अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा।

य: स्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्यभ्यन्तर: शुचि:॥’ हा मंत्र म्हणावा. नंतर दिवा लावून त्याला कुंकू-हळद, फुलं अक्षता वाहाव्यात. अगरबत्ती लावून घ्यावी. नंतर चौरंग ठेवून त्यावर कलश स्थापन करून घ्यावा. त्याला देखील कुंकू-हळद, फुलं, अक्षता वाहावे. आणि विडय़ाची पाने लावून नारळ ठेवावा. मग फुलं वाहून गणेशाची पूजा करून घ्यावी. त्यानंतर फुलं वाहून दुग्रेची पूजा करावी. तिला पंचामृताने स्नान घालावे. कुंकू-हळद, फुलं अक्षता वाहावे. धूप, दीप नवेद्य दाखवून आरती करावी.

देवीचे पुढील स्तोत्र पठण करावे.

कंचनाभा वराभयं पद्मधरा मुकटोज्जवलां।

स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनेसुते नमोअस्तुते

पटाम्बर परिधानां नानालंकार भूषितां।

सिंहस्थितां पदमहस्तां कात्यायनसुते नमोअस्तुते

परमांवदमयी देवि परब्रह्म परमात्मा।

परमशक्ति, परमभक्ति, कात्यायनसुते नमोअस्तुते

आजच्या पूजेचे महत्त्व : देवी कात्यायनीची आज पूजा केल्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे फळ मिळते, अशी श्रद्धा आहे. तिच्या सहवासात राहिल्याने साधक दुख, राग, भय यातून मुक्त होतो. कामाच्या समस्या सोडविल्या जातात. उत्पन्न वाढते आणि बेरोजगारांना रोजगार मिळतो, असे मानले जाते.

देवी कालरात्री

काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती. शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती असते. देवीचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन ‘सहार’ चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षति झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते, असे मानतात. या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत. कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वाना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कटय़ार) आहे. कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयकारी आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’सुद्धा आहे. देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी आहे, असे मानतात. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात. कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे. मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.

पूजा विधी : सर्वात प्रथम संकल्प सोडावा. त्यानंतर एक फुल हातात घेऊन पूजेच्या साहित्यावर थोडं पाणी िशपडून तोंडाने  मंत्र म्हणावा. नंतर दिवा लावून त्याला कुंकू- हळद, फुलं अक्षदा वाहावे. चौरंग ठेवून त्यावर कलश स्थापन करून घ्यावा. त्यालादेखील कुंकू- हळद, फुलं अक्षता वाहाव्यात आणि विडय़ाची पाने लावून नारळ ठेवावा. मग गणेशाची, दुग्रेची पूजा करावी. कुंकू- हळद, फूल, अक्षता वाहावे. धूप-दीप-नवेद्य दाखवून आरती करणे. खालील दिलेल्या मंत्राचा जप करावा, जेणेकरून कालरात्री देवीची पूजा संपन्न होईल.

१.     ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी।

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते॥

जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि।

जय सर्वगते देवि कालरात्रि नमोस्तु ते॥

२.     धां धीं धूं धूर्जटे: पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी

क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥

बीज मंत्र : ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे।  हे स्तोत्र म्हणावे.

आजच्या पूजेचे महत्त्व : माता कात्यायनीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मोक्ष मिळतो, शत्रूंचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. देवी भक्तांना  दुख आणि भीतीतून मुक्त करते आणि उदय आणि बुद्धी देते.

देवी महागौरी

गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप आहे. माता गौरीला शिवाची अर्धागिनी आणि गणेशाच्या आईच्या रूपातदेखील ओळखले जाते. महागौरी अमाप शक्ती आणि पुष्कळ फळ देणारी आहे. मनात असलेले सगळे किल्मिष तिच्यामुळे दूर होतात. महागौरीच्या आराधनेने जीवनाबाबतचे उच्च ज्ञान मिळते, असे मानतात. दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो, असे मानतात. या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. ही गोरेपणाची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलांपासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षां भवेद् गौरी।’ तिचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्यावरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे. आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्याअनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-जन्म कोटि लगि रगर हमारी। बरँ संभु न त रहँ कुँआरी॥ या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते.

पूजा विधी : नवरात्रींच्या अष्टमींच्या दिवशी पूजेचे विशेष महत्त्व असते. या दिवशीची देवी गौरीची पूजा  भक्तीने भरलेली असते. तिला पंचामृताने स्नान घालावं. या दिवशी कुमारिकांचे खूप महत्त्व असते. त्यामुळे कमीत कमी नऊ मुलींना बोलावून त्यांची पूजा करावी, असे सांगितले जाते. या मुलींचे वय शक्यतो दोन ते दहा वर्षांच्या आतील असू द्यावे. त्यांना बसायला आसन देऊन पायांवर कूंकुवाने स्वस्तिक काढावे. नंतर त्यांना हळद-कुंकू लावावे. त्यांना एकतर जेवण किंवा खीर खाण्यास द्यावी. त्याचप्रमाणे काही दक्षिणा आणि शक्य असल्यास एखादी वस्तू देऊन त्यांचा नमस्कार करावा. देवी भागवत पुराणानुसार, कन्या पूजेमध्ये केवळ दोन वर्षांच्या मुली आणि दहा किंवा दहा वर्षांपेक्षा लहान मुलींचा समावेश करतात. तो एवढय़ासाठी की, दोन वर्षीय कन्या कुमारी, तीन वर्षीय कन्या त्रिमूर्ती, चार वर्षीय कन्या कल्याणी, पाच वर्षीय रोहिणी, सहा वर्षीय कलिका, सात वर्षीय चांदिका, आठ वर्षीय शंभवी, नऊ वर्षीय दुर्गा आणि दहा वर्षीय मुलगी सुभद्रा या रूपांमध्ये त्या असतात. कन्यांची पूजा करताना देवी या स्वरूपात असते म्हणून मुलींसाठी ही वर्ष नेमून दिली आहेत. तसेच मुलीसोबत सुवासिनींनादेखील हळदीकुंकूला बोलवून त्यांनादेखील यथोचित काही वाण द्यावे, अशी श्रद्धा आहे.

या दिवशी देवीसमोर बसून पुढील स्तोत्राचे पठण करावे.

सर्वसंकट हंत्री त्वंहि धन ऐश्वर्य प्रदायनीम्।

ज्ञानदा चतुर्वेदमयी महागौरी प्रणमाभ्यहम्

सुख शान्तिदात्री धन धान्य प्रदीयनीम्।

डमरूवाद्य प्रिया अद्या महागौरी प्रणमाभ्यहम्

त्रलोक्यमंगल त्वंहि तापत्रय हारिणीम्।

वददं चतन्यमयी महागौरी प्रणमाम्यहम्।

आजच्या पूजेचे महत्त्व : असं मानतात की नवरात्रामध्ये कन्या पूजन केल्याशिवाय व्रत अपूर्ण राहते. शेवटच्या राहिलेल्या या दिवसात जे हे व्रत श्रद्धेने करतात त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. काही जण या नऊ मुलींसोबत भरव बाबा म्हणून काही मुलांनादेखील जेवायला बोलावतात. माता महागौरीच्या कृपेने त्यांना अलौकिक सिद्धी प्राप्त होते. माता भक्तांना दु:खापासून मुक्त करते. देवीच्या पूजेचे शुभ फल दररोज मिळते. या पूजेमुळे भक्तांचे पाप नष्ट होते.

देवी सिद्धिदात्री

सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री. जे जे हवे आहे, गरजेचे आहे त्याची इच्छा होण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे ‘सिद्धी’. स्व मध्ये स्थिर असणाऱ्यालाच सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होते. तेव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असते. गुरुपरंपरेला येथे खूप महत्त्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या मार्गानेच वाटचाल करावी. सिद्धिदात्री सर्व इच्छापूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते, असे मानतात. गुरुकृपेमुळे ‘प्रावीण्य आणि मुक्ती’ या सिद्धिदात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. दुर्गामातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे, अशी श्रद्धा आहे. दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धिदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अध्रे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात. देवी सिद्धिदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धिदात्री शेवटची देवी आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानतात. या देवीचे व्रत सूर आणि असुर या दोन्हीसाठी पूजनीय असते. ही देवी भक्ताला प्रसन्न झालीच तर त्या भक्ताला २६ वेगवेगळी वरदानं मिळतात, अशी श्रद्धा आहे. हिमालयाच्या नंदा पर्वतावर तिचे तीर्थस्थान आहे.

पूजाविधी : आजच्या दिवशी या देवीची पूजा केल्याने विद्या, विजय, राजयोगाची प्राप्ती होते. देवीला नऊ वेगवेगळ्या रसांचा प्रसाद दाखवणं, आणि फुलं-फळं दाखवणं श्रेष्ठ समजलं जातं. दुर्गा पूजेच्या या दिवशी विशेष हवन तयार केला जातो. हा नवदुर्गाचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच, या दिवशी माता सिद्धिदात्री नंतर इतर देवतांची (म्हणजे जे आपण घटी बसवले असतात) त्यांचीदेखील पूजा केली जाते. त्यानंतर सर्वप्रथम चौरंगावर तिची मूर्ती ठेवून तिचे पूजन, दुर्गा सप्तशतीचे सर्व श्लोक स्वरूप मंत्र म्हणून हवनांमध्ये आहुती दिली जाते.  ‘ओ ह्री खेहीन चामुंडैयी विच नमो नम’ हा बीज मंत्र १०८ वेळा  म्हटला जातो. भगवान शंकर आणि ब्रह्मा यांची पूजा केल्यानंतर या खालील दिलेल्या स्तोत्राचे पठण करून शेवटी सर्व देवांची आरती केली पाहिजे.

‘कंचनाभा शखचक्रगदापद्मधरा मुकुटोज्वलो।

स्मेरमुखी शिवपत्नी सिद्धिदात्री नमोअस्तुते.

पटाम्बर परिधानां नानालंकारं भूषिता।

नलिस्थितां नलनाक्र्षी सिद्धीदात्री नमोस्तुते. परमानंदमयी देवी परब्रह्म परमात्मा परमशक्ति,

परमभक्ति, सिद्धिदात्री नमोअस्तुते

विश्वकर्ती, विश्वभती, विश्वहर्ती, विश्वप्रीता।

विश्व वार्चिता विश्वातीता सिद्धिदात्री नमोअस्तुते

भुक्तिमुक्तिकारिणी भक्तकष्ट निवारिणी।

भवसागर तारिणी सिद्धिदात्री नमोअस्तुते

धर्मार्थकाम प्रदायिनी महामोह विनाशिनी।

मोक्षदायिनी सिद्धीदायिनी सिद्धिदात्री नमोअस्तुते।

या स्तोत्राचे पठण करावे. आणि शेवटी हवनामध्ये अर्पण केलेला प्रसाद वाटावा.

आजच्या पूजेचे महत्त्व : देवी सिद्धिदात्रीची पूजा करून, माणसाला सर्व सिद्धी आणि नवनिधी, वैभव, वैभव, प्राप्ती, प्रकाश, प्रतिष्ठा, नम्रता, भक्ती आणि व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. तिच्या उपासनेमुळे, अशक्य कार्यदेखील शक्य होते. म्हणून तिचा आश्रय घेण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला पाहिजे. देवीच्या मदतीमुळे मोक्ष मिळू शकतो, अशी श्रद्धा आहे.

response.lokprabha@expressindia.com