response.lokprabha@expressindia.com

घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयांत आजूबाजूचे जग विसरून ऑनलाइन गेम्सच्या आभासी जगात मग्न झालेले अनेक जण दिसतात. केवळ वेळ वाया जातो एवढय़ापुरतीच मर्यादित असलेली ही समस्या आज आत्महत्येपर्यंत पोहोचली आहे. आयुष्याशी ‘खेळ’ होण्यापूर्वी यावर नियंत्रण मिळवायला हवे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच ‘गेमिंग डिसऑर्डर’ला गंभीर आजार अशी मान्यता दिल्यामुळे डिजिटल जगात वावरणाऱ्या व्यक्तीचे वर्तन आता अधिकृतपणे आरोग्य तसेच मानसशास्त्राच्या कक्षेत आले आहे. गेमिंग डिसऑर्डर आरोग्याच्या कक्षेत येण्याची सुरूवात झाली गेल्या वर्षी ‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’ने (आयसीडी) ‘गेमिंग डिसऑर्डर’ची नोंद घेतल्यामुळे. आता त्याला आजार म्हणून मान्यता मिळाल्यामुळे या गंभीर आजाराच्या समाजातील दुष्परिणामांची थेट चर्चा होऊ शकेल हे महत्त्वाचे आहे.

प्रत्येक सेकंदाला नवीन व्हिडीओ व डिजिटल गेम्स सहजपणे उपलब्ध होत आहेत. सुरुवातीला ब्ल्यू व्हेल आणि आता पबजी (प्लेअर अननोन बॅटलग्राऊंड) गेमने तरुणवर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. मध्यप्रदेशात फुरकान कुरैशी नावाच्या १६ वर्षीय मुलाचा सलग सहा तास पबजी गेम खेळल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेम खेळत असताना ‘ब्लास्ट कर.. ब्लास्ट कर’ असे फुरकान ओरडत होता. गेममधील पात्र मेल्याने त्याने रागाने मोबाइल फेकून दिला आणि तो रडायला लागला. त्यानंतर तो कोसळला आणि बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

अशीच एक घटना नागपूरमधील उमरेड येथे घडली. एका मुलाला सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे ‘सायकोसिस’ झाला. त्याला दररोज पाच-सहा तास गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याच्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि नंतर डोळे अचानक बंद झाले. मेंदूला अंतर्गत गंभीर दुखापत झाल्यामुळे ‘सायकोसिस’ नावाचा मानसिक आजार झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. गेिमगसंदर्भातील एका प्रकरणात १८ वर्षांचा उंच, धिप्पाड तरुण मुलगा १५ तास मोबाइल गेम खेळत होता. त्याच्याकडून आईने मोबाइल काढून घेतला. त्याने आईला मारण्याचा प्रयत्न केला. नववीच्या वर्गातील एक मुलगी पबजी खेळत असताना ‘आय एम शूट.. आय एम शूट’ म्हणून जोरजोरात ओरडत होती. त्याबद्दल विचारले असता ‘वडील, भाऊ सगळे बाहेर जण खेळायला जात असतील, तर मी का खेळू नये,’ असा तिचा प्रश्न होता. एका प्रकरणात तर असे लक्षात आले की, वडील प्रथम श्रेणीचे सरकारी अधिकारी होते. त्यांच्या तरुण मुलाला मोबाइल गेम्स खेळण्याची सवय लागली. गेम्सच्या माध्यमातून तो अनेक व्यसनी मुलांच्या संपर्कात आला. त्याला ड्रग्ज, गांजा ओढण्याची सवय लागली. आपल्या मुलाचे वाईट वर्तन आणि समाजात ढासळत चाललेली प्रतिष्ठा पाहून संवेदनशील वडिलांनी आत्महत्या केली, अशी अनेक उदाहरणे व्यसनमुक्ती केंद्रमध्ये ऐकायला मिळतात.

या संदर्भात डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयाचे मनोचिकित्सक डॉ. हरीश शेट्टी म्हणतात की, ‘एकत्रित कुटुंबपद्धती नष्ट होणे, नोकरदार आई-वडिलांकडे मुलांसाठी वेळ नसणे, स्वस्त व सहज उपलब्ध झालेली तांत्रिक साधने, संवाद कंटाळवाणा होणे आदी कारणांमुळे मुलं एकटी पडायला लागतात. परिणामी, ती संगणक किंवा मोबाइलवर उपलब्ध आभासी जगाकडे आकर्षित होतात. एकटेपणा घालवण्यासाठी ती गेम खेळायला लागतात. नंतर हीच मुले गेम खेळण्यासाठी एकांत मिळावा किंवा शांतपणे गेम खेळता यावा म्हणून आपली खोली बंद करून घेतात. त्यात त्यांना समजत नाही की, गेममध्ये किती वेळ जातो. एकलकोंडय़ा आणि उदास मुलांना गेम जास्त आवडू लागतात. सुरुवातीला एक तास गेम खेळणारी मुले नंतर तब्बल १० तास गेम खेळण्यात गुंतलेली असतात. त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख खाली येतो. त्यांना अनेक शारीरिक व्याधी जडतात. ज्याप्रमाणे दारूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीला वेळत दारू मिळाली नाही, तर त्याचे हात थरथरतात. अगदी तसेच गेमची सवय असणाऱ्या मुलांना मोबाइल दिला नाही तर, मुले अस्वस्थ होतात.

मुलांना गेमच्या सवयी लावण्यामध्ये काही अंशी पालक देखील जबाबदार असतात. मुलांसमोर स्वत: मोबाइलमध्ये व्यग्र असणे, वारंवार व्हिडिओ पाहणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर तत्सम गोष्टींमध्ये गुंतून राहणे, अशा सवयी असणाऱ्या पालकांना मुलांच्या गेम खेळण्याच्या सवयी बदलणे शक्य होत नाही. कारण, मुले पालकांना त्यांच्याच सवयी  ब्लॅकमेल करतात. मुलाने चांगले गुण मिळवावेत म्हणून पालकच त्यांना नवीन मोबाइल, लॅपटॉप किंवा व्हिडीओ गेम्स देण्याचे अमिष दाखवितात. लहान मूल रडत असेल, जेवत नसेल तर आई त्याच्या हातात मोबाइल देते, नकळत मुलांना त्याचीच सवय लागून जाते. पालकांनी प्रथम स्वत:च्या सवयी बदलल्या पाहिजेत. मोबाइल वापरण्याच्या वेळा ठरवून घेतल्या पाहिजेत. घरामध्ये जास्तीत जास्त संवाद साधला जाईल, यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करायला हवेत. आठवडय़ातून एकदा ‘नो फोन डे’ प्रत्येकाकडून पाळला गेला पाहिजे. मुलांना गिफ्ट म्हणून मोबाइल फोन किंवा व्हिडीओ गेम देणे टाळले पाहिजे.’

येत्या काळात आणखी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल आणि हा आजार वेगळे रूप धारण करेल. नेमका हा आजार काय आहे, त्याचे स्वरूप काय, त्याचे परिणाम काय असू शकतील याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता परिवर्तन संस्थेचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर सांगतात, ‘गेमिंग डिसऑर्डर आणि गेमिंग बिहेविअर यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन गेम खूप जण खेळतात, याला गेिमग बिहेविअर म्हणतात. गेम्स खेळल्याचे त्या व्यक्तीच्या शारीरिक, कौटुंबिक, मानसिक स्तरांवर दुष्परिणाम व्हायला लागतात. त्याची जाणीव होऊनदेखील ती व्यक्ती सातत्याने गेम खेळत राहते, तेव्हा त्याला गेिमग डिसऑर्डर म्हणता येईल. व्यसन लागू शकेल अशा पदार्थाचे सेवन करणे आणि प्रत्यक्षात व्यसनाधीन होणे, यात जो फरक आहे तोच गेमिंग डिसऑर्डर आणि गेमिंग बिहेविअरमध्ये आहे. गेमिंग बिहेविअर ही नॉर्मल गोष्ट असते. मात्र संबंधित व्यक्ती मर्यादेच्या पलीकडे गेम खेळू लागल्यास तिची वाटचाल गेमिंग डिसऑर्डरकडे होते. या आजारासंदर्भात संशोधन होईल तसेतसे त्याचे वेगवेगळे प्रकार समोर येतील. विविध गेम्स असणारी तांत्रिक साधने सहजरित्या उपलब्ध होणे, मुलांवर शैक्षणिक गुणांचा ताण असणे, आनंदाच्या व संवादाच्या जागा कमी होणे, कुटुंबाचे बदलेले स्वरूप, पाल्यांसाठी पालकांकडे वेळ नसणे, अशी या आजाराची कारणे दिसतात. सर्वात गंभीर बाब अशी की, या गेम्समध्ये प्रचंड हिंसा असते. त्यातून मुलांची चिडचिड वाढते. त्याचा परिणाम शालेय वर्तनात, मित्रांबरोबरच्या वागण्यात दिसून येतो. सध्या आपल्याला सर्वसाधारणपणे दिसते ते गेमिंग बिहेविअर. पण काही माणसे गेमिंगचा अतिरेक करू लागली आहेत. त्यातून येत्या काळात ‘प्रॉब्लेमॅटिक गेमिंग बिहेविअर’ नावाची संकल्पना निर्माण होईल आणि ती गेमिंग डिसॉर्डर व गेमिंग बिहेविअरच्या मध्ये असेल. व्यसनाधीनतेच्या उपचारांमध्ये जसे संपूर्ण कुटुंबाला सहभागी करून घ्यावे लागते, त्याचप्रकारे या आजारावरील उपचारांतही संपूर्ण कुटुंबाने सहभागी होणे आवश्यक असते. कारण, तंत्रज्ञानाच्या हाताळणीमध्ये पालक आणि मुले या दोन पिढय़ांमध्ये खूप अंतर असते. मुलाला वाटते की, गेमिंग ही माझी गरज आहे आणि पालकांना वाटते की, मुलाला गेमिंगची सवय झाली आहे. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये मतभेद निर्माण होतात. त्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे. पालकांनी मुलाला आणि मुलाने पालकांना समजून घेण्याची गरज आहे.’

सध्या बाजारात गरजेच्या वस्तू महाग होत आहेत आणि चैनीच्या वस्तू स्वस्त होत आहे. चैनीच्या वस्तूंमध्ये मोबाइल, लॅपटॉप, व्हिडीओ आणि डिजिटल गेम्सचा संच यांचाही सामावेश होतो. तो परवडणाऱ्या किमतीत  सहज उपलब्ध झाल्याने त्या वस्तू जास्त प्रमाणात विकल्या जाऊ लागल्या आहेत. ‘कोणत्याही गोष्टीची सहज उपलब्धता’ ही माणसाच्या व्यसनाला कारणीभूत ठरते. पूर्वी आवाक्यात नसणारे मोबाइल आता स्वस्त झाले आहेत. कालांतराने टू-जी, थ्री-जीचा प्रवास फोर-जीपर्यंत झाला. त्यातून इंटरनेट डेटाही सहज आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा आहे. परिणामी, इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळी गेिमग अ‍ॅप्स मोफत उपलब्ध आहे. साहजिकच मोबाइल, इंटरनेट आणि गेम्सचे व्यसन सुरू झाले. विविध गेम्स सातत्याने खेळल्यामुळे नेमके कोणते शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात, याबद्दल ‘मनप्रवाह’ संस्थेचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. सुकुमार मुंंजे म्हणतात की, ‘बऱ्याचदा व्हिडीओ आणि डिजिटल गेममधून समोरच्या व्यक्तीला टार्गेट करून मारणे, हा नियम असतो. त्यातून गेम खेळणाऱ्याचा आक्रमकपणा वाढतो. ती व्यक्ती िहसक होते. ती व्यक्ती शाळा, कॉलेज, ऑफिस, घर आदी ठिकाणीसुद्धा ती गेम्सची गाठलेली पातळी, ठरवलेले टार्गेट याचीच कल्पना करू लागते. गेम खेळताना मध्ये कोणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर प्रतिसाद देण्याऐवजी आक्रमक होऊ लागते. तिच्या वागण्यात फरक दिसू लागतो. विविध प्रकारच्या गेम्समुळे स्क्रिझोफ्रेनिया, ओसीडी, बायपोलर पर्सनालिटी असे मानसिक आजार जडतात.’

गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुले तब्बल १६-१६ तास आपल्या खोलीच्या बाहेरच येत नाहीत. त्यांना वास्तव जगापेक्षा हे आभासी जगच आपले वाटू लागते. गेममधील पात्रे त्यांना जवळची वाटू लागतात. याबाबत नायर रुग्णालयामधील मनोविकृतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. जान्हवी केदारे म्हणतात की, ‘पौगंडावस्थेतील मुले याला सर्वात जास्त बळी पडतात. इतर व्यसनांबाबत जसा आपण विचार करतो तसाच विचार गेमिंग डिसऑर्डरकडे पाहताना केला पाहिजे. आपल्या वागण्यावरचे नियंत्रण सुटणे, दैनंदिन महत्त्वाची कामे सोडून सतत गेम खेळणे, गेम वगळता दुसऱ्या कशातही मन न लागणे ही प्रमुख कारणे आपल्याला या आजारात दिसून येतात. सध्या शहर, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, विविध शासकीय व खासगी संस्था या ठिकाणी ‘मोफत वाय-फाय’ची सोय, फोर-जी डेटाचा प्लॅन परवडणाऱ्या किमती उपलब्ध असल्यामुळे ही मुले त्याचा उपयोग गेम खेळण्यासाठी नक्की करून घेतात. यातून गेमची सवय वाढू लागते. परिणामी, या मुलांच्या वागणूकीत बदल होतात. सहजासहजी कोणाशी संवाद साधत नाहीत. ते स्वत:ला गेममध्ये गुंतवून ठेवतात. त्यांना एकांत जास्त प्रिय वाटतो. यासाठी पालकांनी सजग असणे गरजेचे आहे. आपल्या पाल्याबरोबर पालकांनी देखील वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. तो आपला वेळ कशात घालवतो, यावरदेखील पालकांनी नजर ठेवावी.’

आजची पिढी तंत्रज्ञान हाताळण्यामध्ये आघाडीवर असली तरी त्या तंत्रज्ञानाचा दुष्परिणाम आपल्या जगण्यावर होऊ नये याची खबरदारी घ्यायला हवी. कारण हाती असलेल्या मोबाइलचा अतिरेक मुलांना आत्महत्या करण्यास, आई-वडिलांवर हात उगारण्यास प्रवृत्त करत आहे. गेम खेळू दिला नाही तर इमारतीवरून उडी मारेन, असे म्हणत मुलगा पालकांना धमकी देत आहे. या घटना आपल्यापासून दूर आहेत, अशा भ्रमात न राहता वेळीच सावध होऊन आपल्या पाल्याला जागृत केले पाहिजे. नाहीतर आधी ब्ल्यू व्हेल गेम, नंतर पबजी त्यानंतर आता आणखी कोणता तरी गेम येईल आणि मुले त्याच्या तावडीत सापडतील. एखाद्या गेममुळे आपल्या पाल्याची कधीही भरून न निघणारी हानी होण्यापूर्वी वेळीच सावध व्हा!

तुम्हीसुद्धा?

तुम्ही सतत ऑनलाइन चॅटिंग करता का? तुम्हाला सतत फोटो किंवा सेल्फी सोशल मीडियावर अपलोड करावा, असे वाटते का? तुम्हाला युटय़ूब किंवा सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहण्यात आनंद वाटतो का? तुम्ही गरज नसताना तीन तासांहून अधिक वेळ इंटरनेटवर घालवता का? विविध सोशल नेटवर्किंग साइट्सची सातत्याने पाहणी करता का? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर तुम्ही ‘इंटरनेट व्यसनाधीनते’च्या जाळ्यात अडकले आहात. राज्यातील पहिलेच ‘इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र’ पुण्यात स्थापन झाले आहे. या केंद्रात पुढे आलेल्या प्रकरणांनुसार सोशल मीडियावर वेडेवाकडे फोटो टाकले गेल्यामुळे मोडलेली लग्नं,  चॅटिंगच्या संशयावरून उद्ध्वस्त झालेले  संसार, व्हॉट्स अ‍ॅपवर अश्लील चित्रफिती, भरमसाट ऑनलाइन शॉपिंग ही सर्व लक्षणे ‘इंटरनेट व्यसनाधीनते’ची आहेत. या संदर्भात आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे म्हणतात की, ‘सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सबरोबरच रोज नव्याने दाखल होणाऱ्या विविध अ‍ॅप्सचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे लोक इंटरनेट व्यसनाधीनतेच्या जाळ्यात नकळत ओढले जात आहेत. खरेतर इंटरनेट वापरणे वाईट नाही. मात्र, त्यासाठी ठराविक आणि मर्यादित वेळ देणे आवश्यक आहे.

शारीरिक, मानसिक दुष्परिणाम

सतत गेम खेळण्याचा अट्टहास.

फक्त आभासी जगात रमणे.

सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे.

गेममध्ये हरल्यामुळे चिडचिड होणे. आक्रमक पवित्रा घेणे.

एकाच जागी तासन्तास बसल्यामुळे सांधेदुखी, डोकेदुखी, पोटदुखीचे विकार निर्माण होणे.

आप्तस्वकीयांसोबतच्या वर्तवणुकीत नकारात्मक (हिंसक) बदल होणे.

स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होणे

शैक्षणिक प्रगती कमी होत जाणे.

वेळेचा अपव्यय होणे.

सतत चिंता आणि भीती वाटत राहणे.

उपाय 

पालकांनी मुलांसहित स्वत:च्याही मोबाइल वापरावर मर्यादा आणणे.

मुलांशी जास्तीतजास्त संवाद साधणे.

मुलांचे छंद ओळखून प्रोत्साहन देणे.

वास्तव जग आणि आभासी जग यांमधील फरक समजावून सांगणे.

स्क्रीन टाइम कमीतकमी ठेवणे.

मैदानी खेळ, योग, व्यायाम, संगीत ध्यानधारणा यासाठी वेळ काढणे.

गरज नसताना मुलांना मोबाइल भेट म्हणून देण्याचे टाळणे.

सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणे.

मुलांचे कॉल्स, सोशल मीडिया, इतर अ‍ॅप्स वापरावर लक्ष ठेवणे.

वेळेप्रसंगी विनासंकोच मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे.