सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नालासोपारा इथे ज्या पद्धतीने स्फोटके, शस्त्रे सापडली, ते पाहता कडव्या विचारांचा प्रसार आणि प्रचार कोणत्या पातळीवरून होतो आहे, हे लक्षात येते. दहशतवादाचा हा हिंदुत्ववादी चेहरा परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारा आहे.

गुरुवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने धडक कारवाई करत नालासोपारा आणि पुणे येथून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना २० गावठी बॉम्ब आणि स्फोटकांसहित अटक केली आणि पुन्हा एकदा ‘भगवा दहशतवाद’ या चर्चेला जोर आला. दहशतवादी म्हणजे मुस्लीम असेच गृहीतक असणाऱ्या देशात ‘भगवा दहशतवाद’ या संकल्पनेची चर्चा सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यावरून देशभरात बराच गदारोळ माजला होता; पण २००८ नंतरच्या काही घटना पाहता या संकल्पनेला पुन:पुन्हा बळकटीच मिळत गेली की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळेच अशा काही घटनांचा वेध घेणे क्रमप्राप्त ठरते.

फेब्रुवारी २००७ मध्ये पानिपतजवळ समझौता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या वेळी हिंदूुत्ववादी दहशतवादाची कुणकुण लागली होती. पुढे २९ सप्टेंबर २००८ साली मालेगाव येथील बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह ११ जणांना अटक झाली. या दोहोंना विद्यमान भाजपा सरकारच्या काळात जामीन मंजूर झाला आहे. मालेगाव स्फोटादरम्यान ‘अभिनव भारत’ या संस्थेवर आरोप होते. समझौता एक्स्प्रेसच्या प्रकरणामध्ये मध्य प्रदेश येथून अटक झालेल्या धन सिंग या मुख्य संशयिताचा सहभाग मालेगाव स्फोटातदेखील असल्याचा तपास यंत्रणांचा कयास होता. ३१ मे आणि ४ जून २००८ रोजी अनुक्रमे वाशी आणि ठाणे येथील नाटय़गृहांमध्ये कमी शक्तीचे बॉम्बस्फोट झाले. या दोन्ही स्फोटांमध्ये ‘सनातन संस्थे’चा सहभाग असल्याचा आरोप झाला होता. नंतर १६ ऑक्टोबर २००९ मध्ये मडगाव येथे बॉम्ब घेऊन जाताना ‘सनातन’च्या दोन साधकांचा मृत्यू झाला होता. मात्र पुराव्याअभावी सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यात भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन वर्षांनी १६ फेब्रुवारी २०१५ रोजी डाव्या चळवळीतील नेते गोविंद पानसरे यांचा कोल्हापुरात झालेल्या हल्ल्यानंतर मृत्यू झाला. कर्नाटकातील लेखक-विचारवंत एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरदेखील असेच हल्ले ऑगस्ट २०१५ तसेच सप्टेंबर २०१७ मध्ये झाले. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या सर्व हल्ल्यांमागे कडवे हिंदुत्ववादी असल्याचा संशय वारंवार व्यक्त होत आहे. गौरी लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येप्रकरणी होत असलेल्या संशयितांच्या अटकसत्रांमधून ते स्पष्टदेखील होत आहे.

या सर्व पाश्र्वभूमीवर नालासोपाऱ्यातील घटनेकडे पाहताना अनेक प्रश्न निर्माण होतात. नालासोपाऱ्यातील अटकेनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती ‘सनातन’ या संस्थेची. अटक झालेले वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांचाही ‘सनातन’, ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’, ‘हिंदू जनजागृती समिती’ अशा संस्थांशी येनकेनप्रकारेण संबंध असल्याचे दिसून आले आहे. तसेच काही ठिकाणी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेचादेखील उल्लेख आढळून येतो. वैभव राऊत याच्या अटकेनंतर ‘सनातन संस्थे’ने राऊत हा संस्थेचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण सुधन्वा गोंधळेकर याचा ‘सनातन’च्या वेबसाइटवरील अनेक वृत्तांमध्ये उल्लेख असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’चे वृत्त आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार वैभव राऊत हा स्थानिक परिसरात ‘गोरक्षा समिती’चे काम करत असे. स्थानिक तरुणांच्या मदतीने हे काम अनेक वर्षे सुरू असून २०१५ मध्ये ३०, तर २०१६ मध्ये २० घटनांमध्ये गोवंशाची हत्या रोखण्याची प्रकरणे त्याने तसेच त्याच्या सहकाऱ्यांनी दाखल केली होती. या सर्व घटनांमध्ये वैभव राऊत याचा पुढाकार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच वैभव राऊतने हा बॉम्ब व पिस्तुलांचा साठा केला असेल यावर स्थानिकांचा विश्वास बसत नाही. याच वृत्तानुसार वैभव राऊत हा गेल्या चार-पाच वर्षांत ‘हिंदू जनजागृती समिती’च्या अधिवेशनास नियमित जात असल्याचे स्पष्ट होते. वैभव राऊत याची ही संघटना थेट कोणत्याही संघटनेशी जोडलेली नसली तरी त्यातील सभासदांच्या सांगण्यानुसार ‘विश्व हिंदू परिषद’, ‘हिंदू जनजागृती समिती’, ‘बजरंग दल’, ‘सनातन’ अशा संस्थांशी संलग्नपणे ते काम करत असतात. गोवंशाचे काम हे राष्ट्रसेवा म्हणून केले जाते. यातील सदस्य पोटापाण्यासाठी इतर उद्योग करतात आणि त्याबरोबरच ही कामेदेखील करतात. हिंदुत्वाचा प्रचार हाच या समूहाचा उद्देश यातून समोर येतो. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्याऐवजी आसाराम बापूंनी मांडलेला ‘मातृ-पितृ दिन’ साजरा करणे हादेखील त्यांचा एक  मुख्य उपक्रम आहे.

या सर्वातूनच एक प्रकारचा प्रखर हिंदूुत्ववाद वाढीस लागला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याची प्रचीती ‘सनातन संस्थे’च्या वेबसाइटवरील मजकुरामध्ये अगदी ठळकपणे दिसल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. या वृत्तानुसार ७ ऑगस्ट २०१६च्या एका लेखात सुधन्वा गोंधळेकर याने म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूने कायदेशीररीत्या हत्यार बाळगायला हवे आणि वेळ येईल तेव्हा त्याचा वापरदेखील करायला हवा. तर दुसरीकडे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारीच बेळगाव येथे एकास अटक करण्यात आली. या व्यक्तीने गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी मुख्य भूमिका बजावल्याचे विशेष तपास पथकाचे म्हणणे आहे. या व्यक्तीच्या शेतावर २२ जणांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या तीन-चार वर्षांत झालेल्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या आणि त्यापूर्वीचे बॉम्बस्फोट व आत्ता नालासोपाऱ्यात मोठय़ा प्रमाणात सापडलेली स्फोटके व शस्त्रे या सर्वाकडे पाहताना काही प्रश्न निश्चितच उभे राहतात. या सर्व हालचालींमागची नेमकी भूमिका काय आहे हेदेखील पाहणे म्हणूनच गरजेचे ठरते.

साधारण २००० सालानंतर ‘सनातन संस्थे’ने आपला विस्तार करायला सुरुवात केल्याचे दिसते. त्याच वेळी हळूवारपणे पण अतिशय पद्धतशीरपणे अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा जोर वाढत गेला. या घटना देशात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार येण्यापूर्वीच्यादेखील आहेत. हिंदुत्ववादी सरकारच्या काळात काही घटना अधिक जोमाने वाढल्या का हेदेखील पाहावे लागेल. त्यात मुख्यत: गोवंश रक्षा या प्रकाराने अनेकांना मोठाच आधार दिला आहे का हादेखील प्रश्न निर्माण होतो.

एकीकडे सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत ‘सनातन’सारख्या संस्था जाऊन पोहोचल्या आहेत. त्याच वेळी अशा संस्थेशी येनकेनप्रकारेण निगडित असणारे तरुण दहशतवादी कृत्यात सामील झालेले आहेत. दुसरीकडे सर्वसामान्यांवरील हिंदुत्ववादाचा पगडा प्रबळ होत आहे.

या सर्वाला दहशतवाद म्हणायचे की नाही यावर शब्दच्छल करता येऊ शकतो. पण हा शब्दांचा खेळ सोडला तरी देशात अशाप्रकारे शस्त्रे, स्फोटके जमा होत असतील, गुप्तपणे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असेल तर ते कृत्य राष्ट्रविघातक नक्कीच म्हणावे लागेल. १९९१ साली बाबरी मशिदीच्या पतनानंतर वाढलेल्या धार्मिक उन्मादाचेच हे फलस्वरूप आहे का, यावरदेखील विचार करायला हवा. वैभव राऊत याच्याकडे सापडलेला स्फोटकांचा साठा हा स्वसंरक्षणासाठी केला असेल असे म्हणता येत नाही. गोवंश रक्षासंदर्भातील घटनांमुळे वैभव राऊतला स्थानिक कुरेशी समुदायाकडून धोका होता, असा संशयदेखील व्यक्त केला जात आहे. तसे असले तरी इतका मोठा शस्त्रसाठा, तसेच बॉम्ब तयार करण्याची माहिती देणारी कागदपत्रे हे सारेच विध्वंसक विचारांचे द्योतक ठरते का हा प्रश्नच आहे.

देशातील सध्याचे सरकार हे राष्ट्राप्रति जीवन अर्पण करणाऱ्या मातृसंस्थेशी निगडित आहे. तसेच बहुसंख्य हिंदूूंच्या थेट जवळ जाणारे आहे. अशा वेळी विखारी हिंदुत्ववादाला आणखी चेतवणाऱ्या या साऱ्या घटना राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला घातक ठरू शकतात. अनेक वर्षे चिघळलेला काश्मीर प्रश्न, त्यातून निर्माण झालेला दहशतवाद, दुसरीकडे अदिवासी भागात फोफावलेला नक्षलवाद आणि आता नव्याने वाढणारा विखारी हिंदुत्ववादी दहशतवाद अशीच आता आपल्या देशाची विभागणी झाली आहे, हेच यातून ठळकपणे अधोरेखित होते.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New face of terror nalasopara vaibhav raut
First published on: 17-08-2018 at 01:03 IST