बाजारपेठेत जाऊन होणाऱ्या दिवाळीच्या खरेदीची समीकरणं बदलली ती ऑनलाइन शॉिपगमुळे. गेल्या काही वर्षांत तर तळहातात विसावलेल्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या मोबाइलने आज गावा-शहरांना जोडायला सुरुवात केली आहे.

पूर्वी दसरा-दिवाळी आली की महिनाभर आधीपासूनच बाजारात झुंबड उडत असे. ठरलेल्या दुकानाकडे पावलं वळायची, शोभतील असे कपडे घ्यायचे, पैसे द्यायचे आणि बाहेर पडायचं. खरेदी महिनाभर आधी करायची पण ती एका दिवसात. मुंबईसारख्या शहरात राहणारे खरेदीसाठी दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी वळायचे. उर्वरित महाराष्ट्रालाही या पुण्या-मुंबईच्या खरेदीचे आकर्षण असायचे. ब्रॅण्डेड वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबई-पुणे गाठलं जायचं. उत्तम दर्जा आणि वस्तूंमधलं वैविध्य या दोन महत्त्वाच्या कारणांसाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरांचा विचार केला जायचा. गावांमध्ये तर यंदाची खरेदी मुंबई-पुण्यात असे म्हटले की, सांगणाऱ्याची कॉलर ताठ असायची. त्या खरेदीला एक वेगळी प्रतिष्ठा होती.

आताही पूर्वीसारखीच खरेदी केली जाते. पण, तिचं स्वरूप बदललंय. सातारा-सांगलीमध्येही घरबसल्या ऑनलाइनच्या माध्यमातून ब्रॅण्डेड वस्तूंची खरेदी करता येते. त्यामुळे आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासत नाही. महिनाभर आधी ऑनलाइन विश्वात चलती असते, ती विविध खरेदी योजनांची. नानाविध ऑनलाइन शॉपिंग पर्याय घरबसल्या धुंडाळायचे. अनेकांतून एकाची निवड करायची, पैसे भरण्याचा पर्याय निवडायचा आणि लॉगआऊट करून मोकळं व्हायचं. ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढतंय. शोधलं की सापडतंच असंच काहीसं या साइट्सवर सध्या आढळून येतंय. मोबाइल, कपडे, शूज, गॅजेट्स अशा नेहमीच्या वस्तू आघाडीवर आहेत. त्यात यंदाच्या वर्षी भर पडलीयं ती पूजा साहित्याची. होमकुंड, अगरबत्ती, कापूर, दिवा, पणती असे पूजेसाठी लागणारे उपयुक्त साहित्य सर्वच ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर उपलब्ध आहे.

दोन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टचा फेस्टिवल सेल म्हणजे ‘बिग बिलिअन डे’ खूप गाजला होता. याची मोठी जाहिरात झाल्यामुळे ग्राहकांना त्या सेलकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण, काही तांत्रिक कारणांमुळे फ्लिपकार्टची साइट बंद पडली आणि ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्यानंतर फ्लिपकार्टचा निषेध नोंदवत अनेकजण सोशल साइट्सवर व्यक्त झाले. या सगळ्याची नोंद घेत फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी ग्राहकांची जाहीरपणे माफीही मागितली होती. या घटनेनंतर मात्र फ्लिपकार्टने अशा सेलमध्ये नेहमी काळजी घेतली. केवळ फ्लिपकार्टचं नाही तर ई-कॉमर्स इंडस्ट्रीतील सर्वच ऑनलाइन शॉपिंग साइट्स या घटनेने अधिक दक्षता घेऊ  लागले. यासाठी नवनवीन प्रयोग, वैविध्यपूर्ण उत्पादनं, तक्रारी- सूचनांना त्वरित प्रतिसाद, सवलती अशा अनेक गोष्टींची काळजी ते घेऊ  लागले. गेल्या दोन आठवडय़ांतील अनेक ऑनलाइन विक्री व्यवहार पाहता ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते.

अ‍ॅमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडिअन फेस्टिव्हल’, स्नॅपडीलचा ‘अनबॉक्स दिवाली’, फ्लिपकार्टचा ‘बिग बिलिअन डेज सेल’, ईबेचा ‘आज दिवाली मनाओ’, क्राफ्ट्सविलाचा ‘ग्रॅण्ड दिवाली सेल’ असे अनेक ऑनलाइन शॉपिंग सेल दिवाळीदरम्यान सुरू होते. ग्राहकांसाठी अनेक पर्याय होते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्याच साइटकडे कसं वळावं यासाठी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू होती.

तयारी पाच महिने आधी

या फेस्टिव्हल सेलची तयारी जवळपास चार ते पाच महिने आधीपासून सुरू होते. आवश्यक उत्पादनं, मांडणी, कोणत्या उत्पादनांना किती सवलती अशी सगळी तयारी त्यांना करावी लागते. या सेलमध्ये अधोरेखित झालेली गोष्ट म्हणजे पूजा साहित्य आणि स्वयंपाकघरासाठी लागणाऱ्या उत्पादनं खरेदी करण्याचं प्रमाण वाढलंय.

स्नॅपडीलचे वरिष्ठ उपाध्यक्ष टोनी नवीन ‘लोकप्रभा’शी बोलताना म्हणाले,  ‘स्नॅपडीलच्या ‘अनबॉक्स दिवाली’ या सेलच्या पहिल्या टप्प्यात फॅशन, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं यांची मागणी सर्वाधिक होती. दुसऱ्या टप्प्यातही हेच चित्र कायम होते. या सेलच्या दुसऱ्या टप्प्यातच अनेक दुकानदारांनी ‘करवा चौथ’च्या वस्तू, पूजेचं साहित्य, पारंपरिक कपडे आणि फॅशन ज्वेलरी या वस्तूंसाठी मोठय़ा प्रमाणावर मागणी नोंदवली. तर तिसऱ्या टप्प्यात साइटवर लक्ष्मी यंत्रासाठी अनेकदा सर्फिग केलेलं आढळून आलं. तसंच होमकुंड, रुद्राक्ष, लक्ष्मी यंत्र यांची सर्वाधिक खरेदी करण्यात आली आहे.’

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्येही हीच गोष्ट आढळून आली. त्या सेलमध्ये स्वयंपाकघरातील उत्पादने, पूजेचं साहित्य हा महत्त्वाचा विभाग होता. दर वर्षी या विभागात सातत्याने मोठी वाढ होते आहे. दिवा, पूजा थाळी, होमाचे साहित्य, कलश, रुद्राक्ष, लक्ष्मी यंत्र, टेराकोटा दिवा, देवाला वाहायची कापसाची वस्त्रे व फुलवाती, अगरबत्ती ही लोकप्रिय उत्पादने आहेत. या उत्पादनांना या सेलमध्येही सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती अ‍ॅमेझॉन इंडियाकडून ‘लोकप्रभा’ला मिळाली. अ‍ॅमेझॉन इंडिया भारतातलं सर्वात मोठं ऑनलाइन स्टोअर आहे. यामध्ये ८० दशलक्षाहून जास्त वस्तू आहेत. या वर्षी जानेवारीपासून त्यात दर दिवशी १ लाख ५२ हजार वस्तूंची भर पडली आहे. अ‍ॅमेझॉन इंडियामध्ये आता १ लाख २५ हजार विक्रेते आहेत. त्यापैकी बरेच जण लघू व मध्यम उद्योजक आहेत.

स्नॅपडीलच्या सेलमध्ये तीन टप्पे होते. सेल फेस्टिव्हल दरम्यानची खरेदी ही केवळ दिवाळीपुरतीच मर्यादित नाही, असेही स्नॅपडीलला लक्षात आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सेलच्या तिसऱ्या टप्प्यात आगामी हिवाळ्याचा विचार करता गीझर, रूम हीटर्स खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसली. तसंच सभोवतालचं प्रदूषण बघता ‘एअर प्युरिफायर’ची खरेदी करणारे ग्राहकही बरेच होते. त्यात दिल्लीकरांचा जास्त समावेश होता, अशी माहिती स्नॅपडीलने दिली. स्नॅपडीलने ‘अनबॉक्स दिवाली’ सेलच्या जाहिरातीसाठी ३६० डिग्री कॅम्पेनवर  २०० कोटी खर्च केले आहेत. ३६० डिग्री कॅम्पेनमध्ये सर्व माध्यमांमधील प्रमोशनचा समावेश होतो. त्यात टीव्ही, रेडिओ, आऊटडोअर, डिजिटल, सोशल मीडिया अशी सगळी प्रसिद्धी माध्यमं त्यात येतात.

फ्लिपकार्टला जसा दोन वर्षांपूवी फटका जसा बसला तसाच स्नॅपडीलला मागच्या वर्षी अनुभव आला. देशातील असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरून ज्या वेळेस अभिनेता आमिर खान व त्याची बायको किरण राव वादाच्या भोवऱ्यात सापडले त्या वेळेस आमिर खान स्नॅपडीलचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर होता. या प्रकरणादरम्यान स्नॅपडीलबद्दल ग्राहकांचा नाराजीचा सूर होता. तसंच स्नॅपडीलमधून खरेदी करू नका असे संदेशही व्हायरल झाले. आमिर खान आणि स्नॅपडील दोघांचाही निषेध भारतीयांनी केला. हे प्रकरण बरंच गाजलं होतं. वेगवेगळ्या सोशल साइट्सवर ही कंपनी बंद पाडण्याचे संदेश देण्यात आले. दरम्यान ग्राहक स्नॅपडीलच्या अ‍ॅपपेक्षा अ‍ॅमेझॉन इंडियाचं अ‍ॅप डाऊनलोड करू लागले. या वर्षी फ्लिपकार्टला मागे टाकून अ‍ॅमेझॉन इंडिया सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप ठरलं. ही घटना बरोबर एक वर्षांपूर्वी घडलेली होती. त्यानंतर साधारण तीन-चार महिन्यांनी म्हणजे जानेवारी २०१६ मध्ये आमिर खानचा स्नॅपडीलशी असलेला करार संपला. स्नॅपडीलने हा करार पुढे वाढवला नाही. त्यानंतर स्नॅपडीलला यंदा  रिब्रॅण्डिंग करणं भाग पडलं. रिब्रॅण्डिंग करताना स्नॅपडीलने थेट भावनिक होत भारतीयांच्या भावनेलाच हात घालत ‘अनबॉक्सजिंदगी’ हे कॅम्पेन हाती घेतलं. तर अमेरिकी असलेल्या अ‍ॅमेझॉनला भारतीयांनी आपलंस करावं म्हणून अ‍ॅमेझॉनने ‘अपनी दुकान’ हे कॅम्पेन हाती घेऊन भारतीय ग्राहकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा शर्यतीत येण्यासाठी स्नॅपडीलला या जाहिरातींचा जोरदार फायदा झाला, असं उपलब्ध आकडेवारीवरून दिसतं आहे.

अ‍ॅमेझॉनच्या अहवालानुसार महाराष्ट्रात मुंबई खरेदीच्या बाबतीत आघाडीवर आहे. तसंच होम अ‍ॅण्ड किचन वर्गवारीतील उत्पादनांना महाराष्ट्रातून असलेल्या एकूण मागणीमध्ये मुंबईतून असलेल्या मागणीचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. मुंबईतून नोंदविलेल्या मागणीमध्ये ११० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मुंबई शहरातून किचन स्टोअरेज, कन्टेनर्स, किचन टूल्स, बेडिंग अ‍ॅण्ड लिनेन आणि स्मॉल किचन अप्लायन्सेस या उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाल्याचे चित्र दिसते. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनबद्दलच्या तक्रारींमध्येही बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसते. ईबे या ऑनलाइन शॉपिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ५६ लाख ग्राहकांपैकी १६ टक्के ग्राहक मुंबईमधील आहेत.

विविध बँकांनी दिलेल्या आकर्षक सवलतींचा वापर करत ऑनलाइन शॉपिंग करताना दिसून आला. मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. पण, दिवाळी फेस्टिव्हल सेलदरम्यान ८० टक्के ऑर्डर्स मोबाइलवरून केल्या आहेत. यंदाच्या वर्षी अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावरूनच खरेदी करावी यासाठी त्यांना भरघोस सूट तर देऊ केलीच पण त्याचबरोबर ऑनलाइन कंपन्यांशी करार करून त्याचाही फायदा ग्राहकांना दिला. ग्राहकांच्या दृष्टीने अधिक सूट आणि मोबाइलवरच खरेदीची सोय या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या.

एसबीआय पेमेंट्सवर १० टक्के सूट असल्यामुळे सेलमधील ४० टक्के विक्री एसबीआय कार्डाद्वारे झाला, अशी माहिती देऊन स्नॅपडीलच्या वतीने सांगण्यात आले की, घरगुती वस्तूंसोबत एलईडी टीव्ही, टू इन वन नोटपॅड्स आणि एअर कंडिशनर यांचीही विक्री मोठय़ा प्रमाणावर झाली. १९ ऑक्टोबरला म्हणजे तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी दोन लाखांपेक्षा जास्त सजावटीसाठी असलेले एलईडी लाइट्स आणि पणत्या खरेदी केल्या गेल्या. दिवे, सुकामेव्याचे बॉक्स, एफएमसीजी हॅम्पर्स हे खरेदी करणाऱ्यांची अक्षरश: चढाओढ होती. ८१४२ इतक्या ग्राहकांनी सेलच्या पहिल्याच दिवशी प्रवासासंबंधी साहित्य आणि सुटकेस विकत घेतल्या. चौथ्या टप्प्यात स्नॅपडीलने अमेरिकन एक्स्प्रेस कार्डावर २५ टक्के आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड कार्डावर २० टक्के त्वरित सवलत देऊ  केली होती.

ईबेच्या आज दिवाली मनाओ या सेलचा ग्राहकांनी लाभ घेतला. दागिने व मौल्यवान नाणी, कॅमेरे व ऑप्टिक्स, सुगंधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने व आरोग्यविषयक साधने, ऑडिओ व होम एन्टरटेन्मेंट, कपडे व अ‍ॅक्सेसरीज ही उत्सवी सीझनदरम्यान खरेदी करण्यात येणारी अव्वल उत्पादनं आहेत. १८ ते २९ वर्षे वयोगटातील युवा सुंगधी द्रव्ये, सौंदर्य प्रसाधने व आरोग्यविषयक साधने आणि कपडे व अ‍ॅक्सेसरीज खरेदी करतात. तर ३० ते ३९ वर्षे वयोगटातील ग्राहक दागिने व मौल्यवान नाणी आणि एलसीडी व एलईडी टेलिव्हिजनची खरेदी करतात. ४०-४९ वर्षे वयोगटातील ग्राहक ऑडिओ व होम एन्टरटेन्मेंट आणि होम लिव्हिंगची खरेदी करतात. ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ग्राहक होम अ‍ॅण्ड किचन उत्पादनांची खरेदी करतात, अशी माहिती ईबेकडून मिळते.

ऑनलाइन शॉपिंगच्या ग्राहकांमध्ये सतत वाढ होत आहे, हेच या सर्व आकडेवारीवरून जाणवते. या ग्राहकांचा वयोगटही वेगवेगळा असतो. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांमध्ये आता महिलावर्गही आघाडीवर आहे. स्नॅपडीलच्या अनबॉक्स दिवाली सेलमध्ये महिला ग्राहक वर्गामध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. फक्त महानगरांमधले ग्राहकच ऑनलाइन शॉपिंग करतात हा गैरसमजही आता दूर करायला हवा. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय गाव-शहरं ही मोबाइल सेवेने जोडली गेली आहेत. टीयर टू व टीयर थ्री या बाजारपेठांमध्ये ऑनलाइन खरेदी करण्याचं प्रमाण २० टक्क्यांनी वाढल्याचे स्नॅपडीलला आढळून आले आहे. (टीअर टू शहरं म्हणजे दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असणारी शहरं आणि टीयर थ्री म्हणजे त्यापेक्षा कमी लोकसंख्येची शहरं) तसंच मिझोरम, मेघालय, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर हा देशातील बराचसा दुर्गम मानला गेलेला भागही यंदा ऑनलाइन शॉिपगने जोडला गेला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये वाढलेली मोबाइल कनेक्टिविटी, स्मार्टफोनची चलती यामुळे भारतातील दुर्गम गावांमध्ये इंटरनेट पोहोचले ते संगणकावर मात करीत थेट मोबाइलच्या माध्यमातून. त्याचाच थेट परिणाम यंदाच्या ऑनलाइन शॉपिंगच्या गावा-शहरांतील वाढलेल्या प्रमाणामध्ये दिसतो आहे. दुर्गम भागांमधील कनेक्टिविटी सुमारे सव्वाशे टक्क्यांनी वाढली आहे.

भारतभरातील ९० टक्के पिनकोड्सवरून अनेक उत्पादनांना मागणी प्राप्त झाल्याचा अहवाल अ‍ॅमेझॉन इंडियाने दिला. ऑनलाइन शॉपिंगचं जाळं आता वेगाने वाढू लागलंय हे या माहितीवरून निश्चितपणे सांगता येईल.

ऑनलाइन शॉपिंग हा आता केवळ एक प्रयोग राहिला नाही तर हळूहळू का होईना सर्वच स्तरांतील ग्राहकांना ते आपल्या कक्षेत आणत आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एक-दोन वर्षांत हे जाळं महानगरांच्या पलीकडे जात गावा-शहरांपर्यंत पोहोचले असून तळहातावरील मोबाइलमध्ये विसावलं आहे. एकेकाळी केवळ शहरांपुरत्या मर्यादित असलेल्या बाजारपेठा त्यामुळेच आता गावा-शहरांना जोडू लागल्या आहेत आणि त्या आणखीनच विस्तारणार याचीच ही नांदी म्हणावे लागेल.

ऑनलाइन टू ऑफलाइन

भारतीयांची खरेदीपूर्वी हाताळणी करण्याची मानसिकता डोळ्यासमोर ठेवून काही पोर्टल्स नवनवीन क्लृप्त्या अवलंबताना दिसतात. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने ऑनलाइन टू ऑफलाइन ही संकल्पना अमलात आणली आहे. फ्लिपकार्टने सॅमसंगसोबत भागीदारी केली आहे. ५० स्टोअर्समध्ये असलेल्या सॅमसंगच्या उपकरणांसाठी ही भागीदारी आहे. ज्या ग्राहकांना एखादं उपकरण खरेदी करण्यापूर्वी व्यवस्थित बघायचं, तपासायचं असतं त्यांच्यासाठी हे ऑनलाइन टू ऑफलाइन चॅनल चांगलं आहे. भारतीयांच्या खरेदी करण्याच्या या मानसिकतेला ओळखूनच फ्लिपकार्टने हे पाऊल उचललंय असं म्हणावं लागेल. फ्लिपकार्टप्रमाणेच आता अ‍ॅमेझॉनही आता सॅमसंगसह भागीदार आहे. मोठे अप्लायन्सेस, स्मार्ट फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा उपकरणांसाठी जवळपास २५ शहरांमधील सॅमसंगच्या ४१ ब्रॅण्ड स्टोअर्समध्ये ही भागीदारी आहे. अ‍ॅमेझॉनने ‘ऑफलाइन शॉपिंग उडान’ या नावाने २०१४ मध्ये सुरू केलं होतं. या उपक्रमात कंपनी स्थानिक उद्योजकांना निवडते. छोटी शहरे आणि ज्या मेट्रो शहरांमध्ये इंटरनेटची चांगली सुविधा नाही, अशा शहरांमध्ये कंपनीचं उत्पादन सादर करण्यासाठी त्यांना कंपनी प्रशिक्षण देते.

अ‍ॅमेझॉन इंडियाची स्टोअरकिंगशीसुद्धा भागीदारी आहे. या उपक्रमामुळे ऑनलाइन शॉपिंग साइट्स ऑफलाइन ग्राहकांशी जोडले जातील. थोडक्यात काय तर यातून ग्राहक तर आकर्षित होतातच, पण अनेक विक्रेतेदेखील ऑनलाइन पोर्टलशी जोडले जात आहेत.

अलिबाबाची एंट्री आणि ई-कॉमर्समधील बदल

‘अलिबाबा’ ही चीनमधील ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही ऑनलाइन साइट इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स, शॉपिंग सर्च इंजिन आणि डेटा सेंट्रिक क्लाऊड कम्प्युटिंग सव्‍‌र्हिस पुरवते. जपानमधील सॉफ्टबँकची अलिबाबा आणि स्नॅपडील या दोन्हीमध्ये गुंतवणूक आहे. अलिबाबाची पेटीएममध्ये गुंतवणूक आहे. पेटीएम ही भारतातील लोकप्रिय पेमेंट सव्‍‌र्हिस फर्म आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अलिबाबा फ्लिपकार्ट विकत घेणार आणि फ्लिपकार्ट-पेटीएम एकत्र करणार अशी चर्चा होती. आता अशीच चर्चा शॉपक्लूजबद्दल होत आहे. अलिबाबा ही कंपनी फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा पेटीएम यापैकी काही तरी एक विकत घेऊन भारतात येऊ  शकते किंवा स्वत:च्या बळावर भारतात आपले स्थान प्रस्थापित करू शकते. अलिबाबा या कंपनीने जर फ्लिपकार्टशी करार केला तर अलिबाबा भारतात गुंतवणूक असणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असेल. अलिबाबा या कंपनीने भारतात प्रवेश केल्यानंतर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात झपाटय़ाने बदल होतील.

मोबाइलचा वाढता वापर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या मार्च २०१६ च्या अहवालानुसार भारतातील मोबाइल वापरकर्त्यांचा आकडा १०१.७९ कोटींवर पोहोचला आहे. तर इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार २०१५ मध्ये डिसेंबरमध्ये भारतात मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ३०६ दशलक्ष इतकी होती. जून २०१६ मध्ये ती २१ टक्क्य़ांनी वाढून ३७१ दशलक्षपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतातील अंदाजे ३७१ दशलक्ष मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ७१ टक्के वापरकर्ते शहरी भागातील आहेत. त्याचवेळी २०१४ पेक्षा २०१५ मध्ये ग्रामीण भागातील मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दुप्पट झाली आहे. याच अहवालात देशाच्या ग्रामीण भागात मोबाइल इंटरनेटचा विकास होण्याची क्षमता असल्याचे नोंदवली आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
@chaijoshi11