दिनेश गुणे – response.lokprabha@expressindia.com

आपल्या पक्षातले निष्ठावंत काही झालं तरी बंडाचा झेंडा उभारणार नाहीत इतके संस्कारक्षम आहेत आणि भाजपामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही या दोन गोष्टी भाजपा पुरेपूर ओळखून आहे. त्या नियंत्रणात ठेवून भाजपाने सत्तेचे राजकारण स्वत:च्या खिशात घातले आहे.

नामोहरम झालेले विरोधक, लोटांगण घालून सोबत राहिलेले गलितगात्र मित्रपक्ष आणि अस्तित्वाच्या चिंतेपोटी फरफट करून घेणारे लहानमोठे सहयोगी नेते अशा विचित्र राजकीय परिस्थितीत कोंडी झाल्यामुळे यापुढे भाजपासोबत राहण्याखेरीज पर्याय नाही ही परिस्थिती जेव्हा अटळ झाली, तेव्हा, राजकारण हेच जगण्याचे व भविष्य घडविण्याचे साधन असलेल्या प्रत्येकास भाजपाच्या वळचणीस जाण्यावाचून गत्यंतरच राहिले नाही. परिणामी, भाजपा हा सत्ताधीश पक्ष आता सूज आल्यासारखा फुगला आहे. अशा परिस्थितीत, जे कोणी आपल्यासोबत राहणार नाहीत ते स्वतच नामशेष होऊन जातील असा भाजपाचा समज होणे साहजिकच आहे. भाजपाच्या उमेदवारी वाटपात याच समजुतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. ज्यांना उमेदवारी नाकारली, ते पक्षासमोर बंड करण्याचे धाडसदेखील दाखविणार नाहीत, अशी भाजपाची खात्री झालेली दिसते. याची दोन कारणे असावीत. पहिले म्हणजे, आयारामांना उमेदवारीत प्राधान्य देताना पक्षाने ज्यांना डावलले, ते सारेजण भाजपाचे निष्ठावंत, एकनिष्ठ आणि संघसंस्कारी कार्यकत्रे असल्याने, बंडासारखे विरोधाचे पाऊल उचलण्याचा त्यांच्यावर संस्कारच नाही, हे भाजपाला पक्के ठाऊक आहे. दुसरे म्हणजे, केवळ उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षाविरुद्ध बंड करून दंड थोपटायचे नाराजांनी ठरविले, तरी विजयाची हमी देणारा पर्यायी पक्ष समोर नसल्याने, थंडोबा होऊन मूग गिळणे वा पडेल ती जबाबदारी शिरावर घेऊन नाखुशीने का होईना, पक्षासोबत राहण्यातच शहाणपणा आहे, हे ओळखण्याएवढी राजकीय परिपक्वता या नाराजांमध्ये असली पाहिजे. आज आयारामांना मानाचे स्थान देण्यासाठी स्वतच्या हक्काच्या उमेदवारीवर पाणी सोडताना भाजपामधील या निष्ठावंतांचे चेहरे वरकरणी हास्य फुलवणारे भासत असले, तरी त्यांच्या मनातील खदखद त्यांच्या डोळ्यातून लपून राहात नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पािठबा व्यक्त करताना, त्यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करताना, उमेदवारी डावलल्या गेलेल्या मेधा कुलकर्णी यांचा चेहरा यापुढे नाराजांच्या फौजेचे प्रतीक ठरावा, एवढा प्रत्येकाच्याच आठवणीत राहील. पाठीत खंजीर खुपसला तरी आपला पािठबा पक्षालाच राहील आणि पक्षाने दिलेला उमेदवार विजयी करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू हे त्यांचे वाक्य वरकरणी पक्षनिष्ठा दाखविणारे असले, तरी त्यातील धारदार व्यथा नाराजी आणि संतापाच्या साऱ्या भावना त्यामध्ये ओथंबलेल्या दिसतात. तिकडे सिंधुदुर्गात राणेपुत्रास उमेदवारीचे प्राधिकारपत्र बहाल करताना प्रमोद जठार यांच्या हृदयातही त्याच व्यथांचे काहूर माजले असणार हे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांस माहीत असणार!

आजच्या राजकीय परिस्थितीत सत्तेवर येण्याची ताकद भाजपाशिवाय अन्य कोणत्या पक्षाकडे उरलेली नाही याची जाणीव झाल्यामुळे भाजपाकडे आयारामांचा ओढा सुरू झाला, हे वास्तव आहे. विरोधकांना पुरते नामोहरम करून, प्रतिस्पध्र्यास गारद करून लढतीची त्याची शक्तीच हिरावून घेऊन मदानात उतरायचे असे धोरण भाजपाने पाच वर्षांपूर्वीच आखले होते. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला, तेव्हाच भाजपाच्या वाटचालीची दिशा स्पष्ट झाली होती. या अनाकलनीय आक्रमकपणास तोंड देण्याची किंवा त्याचा प्रतिकार करण्याची सारी शक्ती भाजपाने आखणीपूर्वक खच्ची करून टाकल्याचे गेल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले, आणि काँग्रेस वा समविचारी पक्षांच्या तंबूतील अनेकांना स्वतच्या राजकीय भवितव्याच्या चिंतेने पछाडले. काँग्रेस किंवा त्या आघाडीतील पक्षांना सावरण्यासाठीदेखील अवधी उरलेला नसल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपाचा रस्ता धरला नाही, तर भवितव्य नाही हे ओळखून काँग्रेस आघाडीतील अनेकांनी भाजपाची वाट धरली. भाजपा प्रवेशासाठी मनधरणी सुरू केली, आणि खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांनी आजवर स्वतची प्रतिमा निर्माण केली होती, ते नेतेदेखील केविलवाणे होऊन भाजपच्या तंबूत प्रवेशासाठी रांगा लावून उभे राहिले.

काहीही करून सत्ता संपादन करावयाची हे भाजपाचे या निवडणुकीचे स्पष्ट धोरण आहे. कारण, राजकारणात एक नियम कठोरपणे पाळावा लागतो. तो म्हणजे, प्रतिस्पध्र्यास डोके वर काढता येणार नाही इतक्या ताकदीने त्याचे खच्चीकरण करणे.. भाजपाने त्याच नीतीचा अवलंब या निवडणुकांच्या काळात केला आहे. प्रतिस्पर्धी पक्षांची ताकद म्हणून ज्या नेत्यांना ओळखले जाते, त्याच नेत्यांना गुडघे घासत आपल्या तंबूसमोर ताटकळत ठेवून भाजपाने त्यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केली, आणि पुनर्वसन करून उपकार केल्याच्या थाटात या आयारामांना पक्षात पावन करून घेतले. आता पुढची काही वष्रे भाजपा या आयारामांची सारी शक्ती पिळून काढणार व त्यांच्या शक्तीची सारी केंद्रे नामशेष करून कायमची जायबंदी करणार हे माहीत असूनही आयारामांनी भाजपाला आपलेसे केले आहे. यामध्ये भाजपासारख्या पक्षाचे दोन फायदे झाले, स्वपक्षातील ज्या निष्ठावंतांना डावलले ते अन्यत्र जाणार नाहीत अशी परिस्थिती आखणीपूर्वक तयार केली गेली, आणि पक्षात दाखल झालेल्या आयारामांची उद्या पक्षात घुसमट झालीच, तरी त्यांचे बाहेर पडण्याचे सारे रस्ते कायमचे बंद करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सारे विरोधी पक्ष आज हतबल दिसतात. भाजपाशी दोन हात करण्याची त्यांची उमेद मंदावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याबरोबरच, भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून मिरविणारे पक्षदेखील कोणत्या तरी नाइलाजाच्या दबावापुढे झुकल्यासारखेच वावरताना दिसतात. शिवसेनेचा ताठा ज्या टप्प्याटप्प्याने संपत गेला आणि, मोठा भाऊ म्हणवून घेण्याचा हट्ट गुंडाळून ठेवून काहीही करा पण भाऊ तरी म्हणा अशा मानसिकतेचा आसरा शिवसेनेस घ्यावा लागला, ते पाहता, भाजपाने सत्तेचे राजकारण पुरते स्वतच्या खिशात घातले आहे, असेच म्हणावे लागेल. वाटय़ाला येतील तेवढय़ा जागा घेऊन भाजपाबरोबर युती करण्याची तयारी शिवसनेने दाखविली, तेव्हाच या मित्रपक्षाची हतबलता पुरेशी स्पष्ट झाली होती.

ईडीच्या कारवाईचा बागुलबुवा दाखवून भाजपाने विरोधकांना झुकविण्याचे तंत्र अवलंबिले आहे, असा आरोप उरल्यासुरल्या विरोधकांकडून होताना दिसतो. मात्र, ईडीपासून भयमुक्त असे नेते विरोधकांच्या तंबूत हाताच्या बोटावरच मोजता येतील एवढेच उरले की काय अशी शंका या आरोपामुळे मतदारांच्या मनात आपणच उभी करत आहोत, हे या आरोप करणाऱ्यांच्या लक्षातच आले नाही, आणि भाजपाच्या प्रतिमाहननाच्या कूटनीतीला ते आपणच बळी पडले आहेत. भाजपाच्या तंबूत दाखल झालेल्या आयारामांना ईडी भयमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीच, उलट, त्याच भयाच्या सावटाखाली त्यांना सत्ताधारी पक्षातही वावरण्याची वेळ आली, तर ती स्थिती अधिक बिकट असेल. राजकीय भाषेत, याला धोबीपछाड आणि कात्रजचा घाट दाखविणे असे म्हटले जाते. भाजपाने ज्यांना पावन करून घेतले आहे, त्यांना याची जाणीव झाल्याचे दिसत नाही. उद्या निष्ठावंतांनी रिकाम्या करून दिलेल्या मानाच्या आसनांवर बसतानाही या भयाची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर राहणार असेल, तर सत्तेचा उपभोग घेण्याची उमेद त्यांना असेल किंवा नाही ही शंकाच आहे. त्यामुळेच, अशा परिस्थतीत नक्की कोणती राजकीय भूमिका घ्यावी या पेचाने साऱ्यांनाच घेरले आहे. आयारामही त्यात गुरफटले आहेत, मित्रपक्षांनाही तोच पेच पडला आहे, आणि निष्ठावंत नाराजही त्याच चिंतेच्या गत्रेत अडकले आहेत. याचा तिहेरी फायदा घेण्याचा भाजपाचा डाव किती यशस्वी होतो, हे विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.