दागिन्यांचं खरं सौंदर्य पारंपरिक रूपात दिसून येत असलं तरी आता काळानुरूप दागिन्यांमध्येही बदल होताना दिसताहेत. आधुनिक पद्धतीचे, पण पारंपरिक वलय असलेले विविध स्वरूपातील दागिने तरुणींसाठी पर्वणी ठरत आहेत.

ट्रेनमध्ये हँगरवर लटकवलेले कानातले डूल, पैंजण, कडे असोत किंवा फॅशन स्ट्रीटवरच्या दुकानात मोलभाव करून घेतलेले स्टेटमेंट नेकपीस, डिझायनरचं खास हटके कलेक्शन असो किंवा सोन्याच्या दुकानात डोळे दिपवून टाकणारे दागिने.. स्वरूप काहीही असो दागिने स्त्रीच्या मनाला भुरळ घालणार नाहीत, असं होणं शक्य नाही. कपडे आणि दागिन्यांची हौस फिटत नाही असं म्हणतात ते उगाच नाही. पण, तरीही दागिन्यांवरचं तिचं प्रेम किंचित जास्त असतं. त्याला कारणच तसं असतं म्हणा ना. एखादं दिवशी काहीच पर्याय नाही म्हणून जुना, साधासा टॉप घालावा लागला, तर त्यासोबत छानसं कानातलं घातलं की दिवस मस्त जातो, मैत्रिणीला वाढदिवसाला गिफ्ट देताना कपडय़ांच्या साईझवरून गोंधळ होऊ  शकतो पण, नेकपीस, कडय़ाबद्दल हा गोंधळ कधीच होऊ  शकत नाही. जुने कपडे काळानुसार उसवले जातात, तोकडे पडतात पण, दागिने तुमची साथ क्वचित प्रसंगीच सोडतात. दागिन्यांचं महत्त्व कवींनाही पटलं आहे. त्यामुळेच तर त्यांनी झुमक्यापासून नथनीपर्यंत, बांगडय़ापासून पैंजणांपर्यंत कित्येक दागिन्यांवर कविता-गाणी करून ठेवली आहेत, नाही का..!

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..

आजची तरुणीसुद्धा कितीही मॉडर्न झाली असली तरी तिची दागिन्यांची आवड काही संपली नाही. त्यामुळेच तर आज तिच्यासाठी तिच्या मागणीनुसार दागिन्यांची एक मोठी बाजारपेठ उभी ठाकली आहे. त्यात पारंपरिकतेपासून आधुनिक पद्धतीच्या दागिन्यांपर्यंत, सोन्यापासून जडाऊ, हिरे कुंदनपर्यंत अनेक पर्याय तिच्यासमोर आहेत. अगदी आता-आतापर्यंत केवळ लग्न ठरल्यावर सोन्याच्या दुकानात पाय ठेवणारी तरुणी पहिला पगार, प्रमोशन, तर कधी सहज मनाला आलं म्हणून हिरे, सोन्याचे दागिने खरेदी करू लागली आहे. पण, म्हणूनच हे दागिने कडीकुलपात बंद करून फक्त सणांच्या वेळी काढण्याऐवजी रोज ऑफिस, पार्टी, गेटटूगेदरमध्ये मिरवणे ती अधिक पसंत करते. नवीन इंटर्न म्हणून ऑफिसला रुजू झाल्यावर फॅशन स्ट्रीटवर तिने केलेल्या बार्गेनचे किस्से रंगवणारी ती दोन-एक वर्षांत किती कॅरेटचा हिरा किती लकाकतो याच्या गप्पा रंगवायला लागते. तेव्हा तिच्यासोबत तिचे दागिनेसुद्धा कात टाकू लागले आहेत हे लक्षात यायला लागतं.

कोणताही कपडा नजरेत भरला की त्यावर फुलांची डिझाईन आहे का याची लगेचच विचारणा होते. विविध रंग आणि आकारांच्या देखण्या डिझाईन्स लक्ष वेधून घेतात. फ्लोरल म्हणजेच फुलांच्या डिझाईन्स, पॅटर्न्‍सना दागिने आणि कपडय़ांमधून कधीच मरण नव्हते. पण, यंदाच्या सीझनमध्ये स्त्रियांचे फुलांवरचे प्रेम किंचित जास्तच झालंय. त्यामुळे रॅम्पवर कपडे आणि दागिन्यांमधील फ्लोरल डिझाईन्स हा यंदाचा सर्वात मोठा ट्रेंड आहे. फुलाफुलांची मोहक दुनिया आता ज्वेलरीमध्येही बघायला मिळेल. ‘फ्लोरल आणि टेम्पल डिझाईन्स या दागिन्यांच्या बाबतीत एव्हरग्रीन असतात यात वाद नाही. पण, यंदा फ्लोरल डिझाईन्सचा झालेला वापर थक्क करणारा आहे. हे प्रमाण इतकं वाढलं की, ‘फ्लोरल ज्वेलरी’ नावाची नवी संज्ञा जन्माला आली. यात फुलांचे डिझाईन असलेले नेकलेस, कानातले डूल, बांगडय़ा असे पारंपरिक प्रकार तर आहेतच. पण, हातफूल, चोटी (केसांच्या वेणीवरचा हेडपीस) यांसारखे वापरातून मागे पडलेले जुने दागिन्यांचे प्रकार परत आले आहेत. अगदी विद्या बालन, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय-बच्चनसारख्या कित्येक बडय़ा बॉलीवूड सेलेब्रिटीजनी या फ्लोरल ज्वेलरी मिरवल्या आहेत. ‘अर्थात हे आमच्या पथ्यावर पडले. कारण फ्लोरल डिझाईन्समुळे दागिन्यांना एक नजाकत येते,’ ज्वेलरी डिझायनर आकाश बर्मेचा सांगतात. अर्थात या फ्लोरल डिझाईनला अजूनच खुलवण्याचं काम केलं आहे ते दागिन्यांना दिल्या जाणाऱ्या अनेक पदरी डिझाईनने. मागच्या वर्षीपासून थ्रीडी डिझाईन्सचा ट्रेंड दागिन्यांमध्ये रुजू झाला आहे. यामुळे दागिन्यातील फुलांमधील प्रत्येक पाकळी उलगडलेली आणि त्यातील बारीक नक्षीकाम पाहायला मिळतं. पार्टीसाठी असं फुलाचं डिझाईन असलेलं एखादं ओव्हरसाईझ कानातलं सहज घालता येतं. ते छान इंडो-वेस्टर्न, क्लासी लुक देतं. तर सणासमारंभाला त्यासोबत एखादा नेकपीस किंवा कडे घालून पारंपरिक लुकही मिळू शकतो. याखेरीज यंदा सिम्पल आणि सुटसुटीत डिझाईन्सवर जास्त भर दिला गेला आहे. दागिन्यांतील मुख्य मोटीफ किंवा खडा फोकसमध्ये येईल याची काळजी डिझायनर्स घेऊ  लागले आहेत. त्यामुळे दागिन्यांना उठाव मिळतोच, पण बदलत्या काळानुसार डिझाईन जुनी वाटत नाही.

फॅशन इंडस्ट्रीमध्ये असंख्य प्रयोग होत असतात. त्याचा अनुभव घेता येतो तो फॅशन स्ट्रीट किंवा तत्सम शॉपिंगसाठी असलेल्या लोकप्रिय ठिकाणी. हे प्रयोग बघून तरुण मुली घरच्या घरीसुद्धा त्याचं अनुकरण करतात. केवळ कपडय़ांच्या बाबतीतच हे अनुकरण न करता आता त्यांनी मोर्चा वळवलाय तो ज्वेलरीकडे. कपडय़ांमध्ये जसं एकच स्टोल किंवा स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो तसं दागिन्यांमध्ये करता येतं, याचं प्रात्याक्षिक तरुण मुली करत असतात. याचा अंदाज घेऊनच डिझायनर्सनेही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. एकच दागिना आता वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये वापरता येईल. दिवसागणिक वाढती सोन्याची किंमत भारतीयांच्या मनातील सोन्यावरचे प्रेम कमी करू शकत नाही, हे खरं आहेच. पण, एकदा विकत घेतलेला दागिना जास्तीत जास्त कसा वापरता येईल हा प्रयत्न स्त्री करतच असते. कित्येकदा लग्नात केलेले दागिने इतके मोठे असतात, की ते छोटय़ा-छोटय़ा कार्यक्रमांना घालता येत नाहीत. तर कधी तेच तेच दागिने घालून कंटाळा येतो, मग ते मोडून नवीन दागिने करायचा घाट घातला जातो. ही गैरसोय टाळण्यासाठी डिझायनर्स एकच दागिना वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरता येईल याचा विचार करू लागले आहेत. एका कलेक्शनमधील मुख्य नेकलेसपासून अलग करता येणार पेडंट एखाद्या चेनमध्ये घालून वेगळं घालता येऊ  शकतं. त्यांच्याच ‘प्लॅटर’ कलेक्शनमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या खडय़ांचे पर्याय असलेली अंगठी देण्यात आली आहे. जेणेकरून एक अंगठी तीसहून अधिक पद्धतीने वापरता येते. तुमच्या ड्रेसला मॅच होणारी अंगठी यामुळे बदलता येते. गळ्यातील नाजूक हिऱ्यांची सर वेगळी केल्यास मांगटिका किंवा ब्रेसलेट म्हणून वापरता येईल. बाजूबंद किंवा अँकलेट म्हणून वापरता येणारा कडा असे प्रयोग यामध्ये केले जात आहेत. जेणेकरून दागिन्यांचा वापर वाढवता येणं शक्य होईल.

यंदाचा सर्वात वेगळा ज्वेलरी ट्रेंड पाहायला मिळाला तो म्हणजे ‘बॉडी ज्वेलरी.’ हा नवा ट्रेंड तरुणींमध्ये हळूहळू रुजू लागलाय. एरवी खांद्यावरून रुळणारा पदर, दुपट्टा असं वर्णन केलं जायचं. पण आता हे वर्णन दागिन्यांबद्दल होण्यास सुरुवात झाली तर आश्चर्य वाटायला नको. नेकपीसला जोडून येणाऱ्या, खांद्यावरून हातावर रुळणाऱ्या मोत्यांच्या किंवा खडय़ांच्या सरी, मनगटावरील कडा आणि बोटातील अंगठय़ांना जोडणारी हातफुलाची सर, कानातल्या डुलाच्या मागून हळूच केसांना भेटणाऱ्या बारीक सरी, मांगटिका किंवा हेडपीसला पदर, केसात डुलणाऱ्या बारीक सरी हे या पद्धतीच्या ज्वेलरीचे काही प्रकार आहेत. बेली नृत्य करणाऱ्या मुलींच्या ब्लाऊजला जोडलेल्या आणि पोटापर्यंत लोंबकळणाऱ्या माळा असतात. या नृत्याचा मुख्य फोकस नृत्यांगनांच्या पोटाकडे असल्यामुळे या नृत्य सादर करताना, त्या माळांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. मध्यंतरी गळा, हात फोकसमध्ये येतील अशा प्रकारे माळा लावलेले टॉप, कुर्ते बाजारात आले होते. आता ही जागा दागिन्यांनी घेतली आहे. अशा प्रकारच्या पदरीकरणाने त्या अवयवाचे सौंदर्य खुलते. सध्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये या प्रकारांना असलेली मागणी पाहता सोन्याच्या दागिन्यांमध्येही हे प्रयोग करण्यात येत आहेत. अर्थात स्त्रियांना दागिन्यांबद्दल कुतूहल आणि प्रेम आहे, तोपर्यंत हे प्रयोग होत राहणार. त्यामुळे ही लखलखती दुनिया कायम तेवत राहणार, हे नक्की.

तसं म्हणायला सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीतही स्त्रियांना पूर्वीपासून एखाद-दुसरी डिझाइन बघून भागायचं नाहीच. त्यांना पर्याय लागायचेच. त्यात पुरुषांप्रमाणे ‘दुकानात जाऊन काही विकत न घेता बाहेर येणं विचित्र दिसतं’, याबद्दल त्यांना फारसं कधीच काही वाटलं नाही. उलट जुन्याकाळी दागिन्यांचं गाठोडं घरी घेऊन येणाऱ्या सराफालासुद्धा ‘माझ्या माहेरच्या सराफाच्या दागिन्यांची तोड नाही हो याला’ हा टोमणा चुकत नसे. पण आजच्या घडीला केवळ फॅशन ज्वेलरी आणि इमिटेशन दागिन्यांइतकीच सोने, हिऱ्याची बाजारपेठ विस्तारू पाहात आहे. कारण आजची तरुणी सोन्याचे दागिने केवळ लग्नासाठी किंवा सणांसाठी वापरण्याऐवजी रोज वापरण्यास पसंती देऊ  लागली आहे. अर्थात प्रत्येक मुलीसाठी तिचं ‘लग्न’ हा अजूनही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यावेळी खास बनविल्या जाणाऱ्या दागिन्यांचे महत्त्वही तितकंच आहे. पण असं असताना हे दागिने लग्नानंतर कितीदा आणि किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील, याचं गणितसुद्धा ती करत असते. नेमकी हीच बाब डिझायनर्सनी अचूक हेरली आहे आणि त्यामुळेच तेही आता एकच दागिना वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल अशा प्रकारचे डिझाइन्स बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. तसेच नेहमीच्या दागिन्यांच्या प्रकारांपेक्षा काही नवीन प्रकार आणण्याचे प्रयत्नही डिझायनर्सकडून करण्यात येत आहेत. पिवळं सोनं आणि सफेद हिरा यापलीकडे व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, अँटिक गोल्ड तसेच प्लॅटीनम वापरलं जाऊ  लागलं आहे. कुंदन, जडावू तसेच गोल, चौकोन, त्रिकोणी, आयताकार किंवा ओव्हल अशा विविध आकाराचे, रंगांचे खडेसुद्धा सध्या दागिन्यांमध्ये वापरले जात आहेत. मीनाकारी नक्षी, जाळी डिझाइन सध्या ट्रेंडमध्ये आहे. मंदिरांवरचं नक्षीकाम तर डिझायनर्सना दिवसेंदिवस आकर्षित करत आहे. त्यामुळे पर्याय भरपूर वाढले आहेत. आधुनिक स्टाइलचे पण पारंपरिक टच असलेले प्रयोगशील दागिन्यांचा आनंद घेता येईल.

इमिटेशन ज्वेलरीचा प्रभाव
तरुणींवर असलेला इमिटेशन किंवा फॅशन ज्वेलरीचा प्रभाव नाकारता येणार नाही. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीमध्ये इमिटेशन ज्वेलरीमधील मोटिफ, डिझाइन वापरलं जाऊ  लागलं आहे. इमिटेशन ज्वेलरीच्या स्टाइलचे हत्ती, वाघ, सिंह असे विविध मोटिफ, झुंबराकृती, एसिमेट्रिकल आकार, पठडीच्या रंगांपेक्षा वेगळे रंग असे अनेक गुण पारंपरिक सोन्याच्या आणि हिऱ्याच्या जडणघडणीत वापरत येत आहेत. हत्तीच्या छबी वापरून अंगठय़ा, पेंडेंट्स हल्ली अनेक ज्वेलर्सकडून बाजारात आणली जात आहेत.

अंगठय़ांना पहिली पसंती
कित्येकदा तरुणी त्यांच्या साठवलेल्या पैशातून अंगठी घेण्यास पसंती देतात. तसंच हल्ली लग्नानंतर मंगळसूत्र रोज वापरण्यापेक्षा सणाच्या किंवा कार्यक्रमाच्या दिवशी कपाटाबाहेर काढलं जातं. त्याऐवजी तरुणी साखरपुडय़ाची अंगठी घालण्यास पसंती देतात. त्यामुळे अशा वेळी आपली अंगठी सुंदर आणि चारचौघांत उठून दिसावी याकडे भर दिला जातो. म्हणून गेल्या दोन वर्षांत अंगठय़ांच्या डिझाइन्समध्ये भरपूर विविधता पाहायला मिळाली. यामध्ये अंगठीचा रंग, आकार, साइज यामध्ये प्रयोग करण्यात आले. सध्या थ्रीडी स्टाइल आणि दोन बोटांत घालायच्या अंगठीला पसंती मिळत आहे. प्लॅटिनमच्या अंगठय़ा तर साखरपुडय़ासाठी पहिली पसंती असते.

डिटॅचेबल ज्वेलरी 
बाजारात ‘मल्टी युझ’ ज्वेलरी, ‘डिटॅचेबल ज्वेलरी’ अशा विविध नावांनी या दागिन्यांना संबोधले जाते. मध्यंतरी दागिन्यांच्या जाहिरातींमध्ये मॉडेलच्या केसांची छानपैकी हेअरस्टाइल करून त्यात हिरे, जडाऊचे हार खोवले जायचे. जेणेकरून हाराला हेडपीसचा लुक येत असे. खास समारंभाला आवर्जून पार्लरला जाऊन तयार होणाऱ्या तरुणी हाराचा असा वापर नक्कीच करून पाहतात. यामुळे ड्रेसचा गळा हारामुळे लपला न जाता फोकसमध्ये येतो. लुकला नवेपणाही मिळतो.

सोन्यातही मिक्स मॅच
पूर्वी सोन्याचा हार घेताना कानातले डूल त्यासोबतच यायचे. बांगडय़ाही हाराला साजेशा घेतल्या जायच्या. जेणेकरून दागिन्यांचा ‘सेट’ बनत असे. पण हल्ली वेगवेगळ्या सेटमधील दागिने मिक्स मॅच करून घालण्याचा ट्रेंड सोन्याच्या दागिन्यांमध्येसुद्धा रुजू होत आहे. ‘तरुणी हल्ली कानातले डूल, हार, बांगडय़ा असं वेगवेगळं डिझाइन आणि गरजेनुसार वेगवेगळं खरेदी करतात. मग समारंभानुसार एक किंवा अनेक दागिने घातले जातात. यामुळे त्यांना निवडक दागिन्यांतही पर्याय मिळतो,’ आकाश बर्मेचा सांगतात.

सणाच्या दिवशी साडी ते पार्टीसाठी गाऊनपर्यंत आजची तरुणी प्रसंगानुसार कपडय़ांची निवड करते. त्यामुळे साडीसोबत खुलणारे कानातले हिऱ्याचे डूल गाऊनसोबत पण उठून दिसतील, याची काळजी ती खरेदी करताना घेते.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com