21 February 2019

News Flash

खासगी मराठी वाहिन्यांची २० वर्षे प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी रस्सीखेच

झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, झी युवा अशा वेगवेगळ्या वाहिन्यांसमोर मात्र प्रेक्षकसंख्या मिळवण्याचं, टिकवण्याचं आणि वाढवण्याचं मोठं आव्हान आहे.

मराठी वाहिन्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. येत्या काळात ती आणखी वाढेल. त्यामुळे हिंदी वाहिन्यांमध्ये होत असलेली स्पर्धा आता मराठी वाहिन्यांमध्ये दिसून येतेय.

झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, झी युवा अशा वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांमुळे प्रेक्षकांना टीव्हीवर काय बघायचं याचे पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यामुळेच या वाहिन्यांसमोर मात्र प्रेक्षकसंख्या मिळवण्याचं, टिकवण्याचं आणि वाढवण्याचं मोठं आव्हान आहे.

चित्रपट, नाटक आणि टीव्ही ही तिन्ही माध्यमं आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत. त्यांचा आवाका आणि क्षमतेनुसार प्रेक्षकांपर्यंत ती योग्य त्या पद्धतीने पोहोचत असतात. सिनेमा आणि नाटक या दोन माध्यमांमध्ये एक साम्य आहे; दोन्हीसाठी प्रेक्षागृहात जावं लागतं. तर टीव्ही हे माध्यम घरी बसून बघता येतं. टीव्ही हे माध्यम अधिकाधिक प्रभावी होत आहे. म्हणूनच चित्रपट, नाटकांमधील कलाकार, तंत्रज्ञ टीव्हीकडे वळू लागले. हिंदी वाहिन्यांची संख्या तर वाढता वाढे अशीच आहे. त्यात भर पडत गेली मराठी वाहिन्यांची. आता मराठी वाहिन्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. येत्या काळात ती आणखी वाढेल. त्यामुळे हिंदी वाहिन्यांमध्ये होत असलेली स्पर्धा आता मराठी वाहिन्यांमध्ये दिसून येतेय. मराठी खासगी वाहिन्या सुरू होऊन आता जवळपास २० र्वष झाली. या २० वर्षांत मराठी मनोरंजन क्षेत्रात टीव्ही या माध्यमामुळे बराच बदल झाला. मराठी वाहिन्यांची संख्या आता चारवर आहे. त्यातच आणखी दोन मराठी वाहिन्यांची भर पडणार असल्याची माहिती मिळते. या नव्या वाहिन्यांमुळे मराठी टीव्ही क्षेत्रातली स्पर्धा वाढण्याची चिन्हं हळूहळू दिसू लागली आहेत. खासगी मराठी वाहिन्यांना सुरू होऊन जवळपास २० र्वष होण्याच्या निमित्ताने मराठी टीव्ही क्षेत्राचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं.

१९९९ साली अल्फा मराठी (आताचं झी मराठी) ही पहिली खासगी मराठी वाहिनी सुरू झाली. त्यानंतर वर्षभरात म्हणजे २००० साली ई टीव्ही मराठीचा (आताचं कलर्स मराठी) जन्म झाला. त्यानंतर साधारण आठ वर्षांनी स्टार प्रवाह सुरू झालं. २००७ मध्ये झी टॉकीज या खास मराठी सिनेमांसाठीच्या वाहिनीची निर्मिती झाली. २००४ मध्ये अल्फा मराठीचं झी मराठी झालं आणि २०१५ मध्ये ई टीव्ही मराठीचं कलर्स मराठी झालं. वीस वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे मराठी खासगी वाहिन्यांचं जाळं हळूहळू मोठं होत गेलं. झी मराठी ही पहिली वाहिनी असल्यामुळे तिला एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग खेचण्यात यश मिळाले. वर्षभरात ई टीव्ही मराठी आलं आणि त्या वाहिनीने ग्रामीण भागात स्थान प्रस्थापित करायला सुरुवात केली. या दोन्ही वाहिन्या प्रस्थापित झालेल्या असतानाच स्टार प्रवाह या वाहिनीने या वर्तुळात उडी घेतली आणि एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागली. मी मराठीसारखी एक वाहिनी मधल्या काळात या वर्तुळात डोकावून गेली. पण तिला फारसं स्थिरावता आलं नाही. आता या वर्तुळात या तीन वाहिन्या होत्या. प्रत्येक जण आपापला बाज, पठडी सांभाळत होते. चित्रपट, नाटक आणि टीव्ही या माध्यमांमधली दरी हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे टीव्हीला आक्रमक व्हावंच लागलं. किंबहुना इतर क्षेत्रांनी त्याला तसं होण्यास भाग पाडलं. तिन्ही क्षेत्र एकमेकांना पूरक असल्याचा साक्षात्कार झाला. ही आक्रमकता तोवर हिंदीत रुळली होती. तिथे स्पर्धा दिसू लागली होती. आता हीच स्पर्धा मराठी वाहिन्यांमध्ये प्रकर्षांने दिसून येतेय. त्यात भर पडली आहे ती आणखी एका वाहिनीची; झी युवाची. दीड वर्षांपूर्वी आलेली झी युवा ही वाहिनी सुरुवातीच्या काळात चाचपडत असली तरी आता ती चांगली रुळतेय. ई टीव्ही मराठी ही वाहिनी कलर्स मराठी या नावारूपास आल्यापासून प्रेक्षकांना वेगळ्या रूपात भेटू लागली आहे. स्टार प्रवाह वाहिनी विविध विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. तर झी मराठी तिचा बराचसा अनुभव आणि मोठा प्रेक्षकवर्ग याच्या जोरावर नवनवीन प्रयोग करतेय. एकुणात, सगळ्या वाहिन्या आपापल्या वाटेने योग्य पद्धतीने जात आहेत. पण या प्रवासात वेग खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक वाहिनी व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती करीत असली तरी ती इतर वाहिन्यांसाठी आव्हान ठरतेय. आणि हे आव्हान स्वीकारून दुसरी वाहिनी तिचा वेग आणखी वाढवतेय. पुन्हा तिसरीसुद्धा तिचा वेग आणखी वाढवतेय. असं करतच ही स्पर्धा वाढतेय आणि त्यांच्यातली आक्रमकताही दिसून येतेय.

असं म्हटलं जातं की क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तीन विषयांवर माणूस कधीही, कुठेही आणि कितीही बोलू शकतो. पण आता या तीन विषयांमध्ये टीव्ही मालिकांची भर पडली आहे. समाजमाध्यमांवर अनेकदा मालिका, कलाकार यांच्याबद्दल काही ना काही वाचायला मिळत असतं. झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह, झी युवा अशा सगळ्या वाहिन्यांचे मिळून एकूण साधारण ५० च्या आसपास कार्यक्रम सध्या सुरू आहेत. ही संख्या दखल घेण्यासारखीच आहे. पण सगळ्या वाहिन्यांनी या संख्येकडे सकारात्मकदृष्टय़ा बघण्याचं मत व्यक्त केलं. कारण प्रेक्षकांना कार्यक्रमांचे बरेच पर्याय मिळतील, असं त्यांचं मत आहे.

झी युवा आणि झी टॉकीजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर सांगतात, ‘महाराष्ट्रातील मराठी वाहिन्यांचा प्रेक्षक वाढावा यासाठी मराठी वाहिन्यांमध्ये स्पर्धा असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मराठी प्रेक्षकांवर आजही हिंदी मालिकांचा पगडा दिसून येतो. पण त्यांना मराठी वाहिन्यांकडे वळवणं, ही आता वाहिन्यांची मुख्य जबाबदारी आहे.’ मराठी प्रेक्षकांवर आजही हिंदी वाहिन्यांचा पगडा दिसून येतो. हिंदी मालिकांची भव्यता, सादरीकरण याला प्रेक्षक आजही भुलतात. पण मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यांवरून हिंदीची ही झापडं काढायची असतील तर मराठी वाहिन्यांना त्यांचा आशयविषय जबरदस्त करायलाच हवा. कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांचंही असंच मत आहे, ‘मराठी वाहिन्यांमधल्या स्पर्धेमुळे मराठी वाहिन्यांचं दालन समृद्ध होतंय, असा सकारात्मक  दृष्टिकोन ठेवायला हवा. मराठीतील कलाकारांची गुणवत्ता प्रेक्षकांसमोर यावी हा नवनवीन गोष्टी करण्यामागचा मुख्य हेतू असतो. तसेच या स्पर्धेमुळे प्रेक्षकांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील. असं असलं तरी महाराष्ट्रात हिंदी वाहिन्या बघणारा प्रेक्षकवर्ग जास्त आहे. हे बदलायला हवं. मराठी वाहिन्यांची खरी स्पर्धा हिंदीशी आहे.’

मालिकांमध्ये जसं काही ना काही ‘घडणं’ महत्त्वाचं असतं तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी वाहिन्यांमध्ये बरंच काही ‘घडलं’ आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीचा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम काही महिने विश्रांती घेऊन परदेश दौऱ्यावर गेला होता. दरम्यान, ‘सारेगमप’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्याच वेळी कलर्स मराठीवर ‘सूर नवा, ध्यास नवा’ हा संगीतमय रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला. वेगवेगळ्या कार्यक्रमांतून नावारूपाला आलेले तरुण गायक यात स्पर्धक म्हणून होते. दोन्ही कार्यक्रमांचा साचा सारखा असला तरी आशय वेगळा होता. कलर्स मराठीने आणखी दोन कथाबाह्य़ कार्यक्रम सुरू केले; ‘नवरा असावा तर असा’ आणि ‘तुमच्यासाठी काय पन’. या दोन्ही कार्यक्रमांनी झी मराठीच्या अनुक्रमे ‘होम मिनिस्टर’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमांचे अनुकरण केलेले आहे, अशी टीका प्रेक्षकांनी केली होती. यावर झी मराठीचे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर त्यांचं मत व्यक्त करतात, ‘मोठमोठय़ा व्यक्तींचं अनुकरण केलं जातं. पण त्यांचं अनुकरण कोणी करू नये किंवा कोणी करावं हे त्यांनी का सांगावं? ते त्याची दखल घेत नाहीत. ते फक्त त्याचं काम करत असतात. झी मराठीच्या काही कार्यक्रमांचं अनुकरण दुसऱ्या वाहिनीवर बघायला मिळालं, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंतसुद्धा पोहोचली. पण आम्ही आमचं काम करत राहिलो आणि तेच करत राहणार. प्रेक्षकांना चांगला कार्यक्रम देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. आम्ही स्पर्धेच्या मागे लागलो तर आम्ही फक्त स्पर्धेकडे लक्ष देऊ; जे आमच्यासाठी फार महत्त्वाचं नाही. प्रेक्षकांकडे लक्ष देणं हे आमचं मुख्य काम आहे.’ याच मुद्दय़ावर कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख निखिल साने त्यांचं मत मांडतात, ‘इतर वाहिनीवरील काही कार्यक्रमांचं अनुकरण आमच्या वाहिनीने केलं अशी तुलना प्रेक्षकांनी केली आणि ती आमच्यापर्यंत आली. प्रेक्षकांनी केलेली ही तुलना अगदी साहजिक आहे. पण इथे कार्यक्रमाच्या फॉरमॅटच्या मुद्दय़ाचा विसर पडतोय. एखादा गप्पांचा कार्यक्रम करायचा असेल तर त्याचा फॉरमॅट तोच असणार. त्यातला फक्त आशय बदलणार. त्याचा विचार, दृष्टिकोन वेगळाच असणार. शेवटी त्यातली गुणवत्ता, दर्जा, वेगळेपण ओळखून प्रेक्षक चांगल्याचीच निवड करतात हे लक्षात घ्यायला हवं. मराठी प्रेक्षक प्रगल्भ आहे. वैचारिक आणि करमणूक करणारा सिनेमा असे दोन्ही सिनेमे बघणारा असा प्रगल्भ मराठी प्रेक्षक आपल्याला लाभलेला आहे. मालिका हाही एक फॉरमॅटच आहे. मग त्याचं अनुकरण केलं असं म्हटलं जात नाही. कारण मालिकेचे विषय, कथा वेगळ्या असतात.’

झी मराठीचा ‘सारेगमप’ हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्या जागी ‘जगभर चला..’ सुरू झालं. पण या दोन्ही कार्यक्रमांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्ग कलर्स मराठीच्या दोन कार्यक्रमांकडे वळला. समाजमाध्यमांमध्ये कोणी ‘सारेगमप’विषयी नाराजी व्यक्त करत असेल तर ‘त्यापेक्षा सूर नवा बघ’ असे सल्लेही दिले गेले. ‘जगभर चला..’ या कार्यक्रमावर झालेल्या टीकेबद्दल नीलेश मयेकर सांगतात, ‘जगभर चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचे सुरुवातीचे भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. त्याबाबत त्यांनी त्यांची नाराजीही व्यक्त केली. आम्ही ती नाराजी, टीका स्वीकारली आणि मान्यही केली. आवश्यक त्या सुधारणाही केल्या. प्रेक्षक कधीच चुकीचा नसतो. त्याला जे वाटतं ते तो मनापासून बोलत असतो. त्यामुळे त्यांना गृहीत धरून चालत नाही.’ पण ज्यांना ‘जगभर..’ आणि ‘सूर नवा..’ हे दोन्ही कार्यक्रम आवडले नाहीत ते झी युवाच्या ‘गुलमोहर’ या मालिकेत रमले. आठवडय़ातून दोन दिवस असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडली. दोन भाग एक कथा या सूत्राने मालिकेने हळूहळू पकड घेतली. अर्थात त्यातल्या कथांचा दर्जा वरखाली होत असतो. पण दोन भागांत एक गोष्ट संपते ही भावना प्रेक्षकांना सुखावणारी वाटली.

झी मराठीच्या ‘ग्रहण’च्या निमित्ताने मराठी मालिकांमध्ये आणखी एक महत्त्वाचं वळण दिसून आलं. ‘ग्रहण’ या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमधलं कुतूहल वाढतच गेलं; पण मालिकेचे काही भाग झाल्यानंतर अनेकांचा त्यातला उत्साह कमी झाला. ‘रुद्रम’ ही मालिका झी युवाला एक नवी ओळख मिळवून देणारी ठरली. ‘ग्रहण’ची तुलना अनेकांनी ‘रुद्रम’ या मालिकेशी केली. ‘रुद्रम’ आणि स्टार प्रवाहची ‘दुहेरी’ या दोन मालिका त्या वेळी रहस्य या धाटणीच्या होत्या. ‘दुहेरी’ला थोडी कौटुंबिक पाश्र्वभूमी होती, पण तरी तिने काही काळ त्यातलं रहस्य उत्तमरीत्या टिकवून ठेवलं होतं. ‘जय मल्हार’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ही मालिका सुरू असेपर्यंत त्या वेळेत असणाऱ्या मालिकांच्या रेटिंगमध्ये नेहमीच पहिला क्रमांक ‘जय मल्हार’ या मालिकेचाच असायचा. ही मालिका संपल्यानंतर ‘लागिरं झालं जी’ या नव्या मालिकेलाही तितकाच प्रतिसाद मिळाला, पण जेव्हा स्टार प्रवाहवर ‘विठु माऊली’ ही मालिका सुरू झाली तेव्हा ‘लागिरं..’चा काही प्रेक्षक ‘विठु माऊली’कडे वळला. रेटिंगमध्ये ‘विठु..’ आजही ‘लागिरं..’पेक्षा मागे असलं तरी एखाद्या मालिकेचा प्रेक्षक दुसऱ्या मालिकेकडे वळणं हा प्रकार अलीकडे खूपदा दिसला आहे.

टीव्ही बघणं हा काहींचा सवयीचा भागही असतो. म्हणजे एखाद्या घरी वर्षांनुर्वष विशिष्ट वाहिनी बघितली जात असेल तर तिथे आजही तेच बघितलं जात असणार. मग त्यावरची एखादी मालिका संपली की त्या जागी सुरू झालेली नवी मालिका आवडो अगर न आवडो बघण्याच्या सवयीने ते प्रेक्षक वाहिनी बदलणार नाहीत. याची दुसरी बाजू अलीकडे बघायला मिळाली. प्रेक्षक ‘सारेगमप’ न बघता ‘सूर नवा..’कडे वळले; पण तो कार्यक्रम संपल्यानंतर रात्री १०.३० वाजता त्यांनी पुन्हा वाहिनी बदलली नाही तर ते त्याच वाहिनीवर टिकून राहिले. मग तिथे १०.३० वाजता जो कार्यक्रम लागायचा तो बघितला जायचा. असं सातत्याने होत गेल्यावर प्रेक्षकांच्या सवयीचा तो भाग झाला आणि म्हणून कित्येक प्रेक्षक १०.३० वाजता कलर्स मराठीच्या ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेचं पुन:प्रक्षेपण बघत असतात. थोडक्यात काय, तर टीव्ही बघण्याची सवय बदलली जाऊ शकते.

पूर्वी कलर्स मराठीचा प्रेक्षक हा ग्रामीण भागातील सर्वाधिक होता. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये ग्रामीण-शहरी असं मिश्रण असायचं. तर झी मराठीचा प्रेक्षक बहुतांशी शहरी मध्यमवर्गात मोडणारा असायचा, पण आता कलर्स मराठी वाहिनी स्वत:मध्ये बदल करत असून शहरी प्रेक्षकांच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय, तर झी मराठीच्या काही मालिका या ग्रामीण भागातल्या आहेत. शिवाय त्या मालिकांची भाषाही तशीच आहे. इतर वाहिन्यांच्या तुलनेत झी मराठीचा प्रवास उलट दिशेने सुरू आहे का, यावर झी मराठीचे नीलेश मयेकर सांगतात, ‘शहरी साहित्य-ग्रामीण साहित्य असं काही नसतं. ते साहित्य म्हणून उत्तम आहे की नाही, हे महत्त्वाचं असतं. तसंच मनोरंजन हे मनोरंजन असतं. त्यावर शहरी किंवा ग्रामीण असा कोणताच शिक्का नसतो. आतापर्यंत मनोरंजन फक्त प्रमाणभाषेत व्हायचं. महाराष्ट्रातील अनेक भाषांवर वेगवेगळे संस्कार झाले आहेत. त्या भाषेतल्या म्हणी, वाक्प्रचार असे अलंकार आपण मालिकांना कधी वापरूच दिले नाहीत. ते आम्ही आमच्या काही मालिकांवर चढवले. यात उद्देश ग्रामीण करणं असा मुळीच नाही; तर महाराष्ट्रात जे चांगलं आहे ते प्रेक्षकांना देण्याचा आहे.’’ तर स्टार प्रवाह आजवर मालिकांमध्ये जास्त रमलंय. या वाहिनीने सुरुवातीच्या काळात काही कथाबाह्य़ कार्यक्रम, रिअ‍ॅलिटी शो केले, पण मालिकांइतके ते यशस्वी झाले नाहीत. ही गोष्ट वाहिनीच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यासुद्धा मान्य करतात. ‘‘कथाबाह्य़ आणि रिअ‍ॅलिटी शो या पठडीत स्टार प्रवाह काहीसं मागे पडतंय, हे अगदी खरंय; पण आम्ही त्यावरही काम करायला सुरुवात केली आहे. येत्या जून-जुलै महिन्यांत त्या पठडीतले काही कार्यक्रम नक्की बघायला मिळतील. हे कार्यक्रम नेहमीसारखे नृत्य-गायनाचे कार्यक्रम नसतील. तर वेगळ्या स्वरूपाचं काही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच नवीन मराठी चॅनल्स येताहेत याचा खरंच आनंद आहे. स्पर्धा वाढली की मराठी आशयाचा दर्जाही वाढेल. रविवार संध्याकाळ हा आपल्याकडे एक महत्त्वाचा स्लॉट मानला जातो. त्या स्लॉटचा विचार आम्ही आतापर्यंत फारसा कधी केला नाही, पण आता त्यावरही काम सुरू आहे. कदाचित लवकरात लवकर त्या वेळेत संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकेल असा कार्यक्रम आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’

मालिकांच्या रेटिंग्सच्या आकडेवारीत सध्या झी मराठी पुढे आहे हे मान्य असलं तरी एखाद्या वाहिनीचा प्रेक्षकवर्ग दुसरीकडे वळणं हे त्या-त्या वाहिनीसाठी दखल घेण्याजोगी बाब आहे. हे फक्त एका वाहिनीबाबत घडतंय किंवा घडलं नाही. तर सद्य:स्थितीतील स्पर्धा बघता येणाऱ्या काळात हे कोणत्याही वाहिनीबाबत घडू शकतं. झी मराठी ही पहिली खासगी मराठी वाहिनी आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात त्या वाहिनीने दर्जेदार मालिकांची निर्मिती केली होती. त्यामुळे साहजिकच त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आणि खऱ्या अर्थाने रसिक आहे. पण आता प्रेक्षकांच्या हाती विविध पर्याय असल्यामुळे ते एका वाहिनीकडून दुसऱ्या वाहिनीकडे सहज वळू शकतात. प्रेक्षकांची अभिरुची बदलतेय हे वाक्य मराठी सिनेमांबाबत असलेल्या चर्चेत सातत्याने ऐकायला मिळतं. पण तेच आता टीव्ही माध्यमासाठीही म्हणावं लागेल. प्रेक्षकांना आपल्याकडे खेचायच्या उद्देशाने प्रत्येक वाहिनी सतत काही तरी करू पाहतेय. यात प्रेक्षकांना कार्यक्रमांचे अनेक पर्याय मिळतील हे आहेच पण त्याचं प्रमाण आणि दर्जा कसा टिकून राहील हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

या स्पर्धेचा आणखी एक फायदा कलाकारांनादेखील होणार आहे. प्रस्थापित लोकप्रिय कलाकारांनी आपल्या वाहिनीवर काम करावं म्हणून अनेक वाहिन्या पुढे सरसावतील. किंबहुना हे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसूनही आलं आहे. तेजश्री प्रधान हा लोकप्रिय चेहरा झी मराठीपासून प्रेक्षकांच्या ओळखीचा झाला. पण ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेनंतर तेजश्री छोटय़ा पडद्यावर दिसली ते ‘सूर नवा, ध्यास नवा’ च्या मंचावर सूत्रसंचालकाच्या रूपात. सुकन्या कुलकर्णी झी मराठीच्या सलग दोन मालिकांमध्ये दिसल्यानंतर माईच्या भूमिकेतून त्या ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. नम्रता आवटे सुंभेराव कलर्स मराठीच्या ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमानंतर झी युवाच्या ‘बापमाणूस’ या मालिकेत दिसली. कलर्स मराठीची ‘कमला’ ही मालिका संपल्यानंतर अक्षर कोठारी स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत मुख्य भूमिका करतोय. स्टार प्रवाहच्या बरीच र्वष चाललेल्या ‘पुढचं पाऊल’ या लोकप्रिय मालिकेतली अक्कासाहेब म्हणजे हर्षदा खानविलकर कलर्स मराठीच्या ‘नवरा असावा तर असा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताहेत. कलाकार एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीत जाणं हे चुकीचं नाहीच. हे आधीही होत आलंय. पण त्यांच्याकडे आता पूर्वीपेक्षा जास्त पर्याय असणार आहेत. पूर्वी एका वाहिनीचा चेहरा म्हणून अनेक कलाकारांची अनेक र्वष ओळख असायची. पण आता तसं राहिलं नाही. आता कलाकारही वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये काम करण्याची संधी शोधत असतात आणि वाहिन्याही लोकप्रिय चेहरा त्यांच्या वाहिन्यांवर दाखवण्यासाठी उत्सुक असतो. तसंच नव्या कलाकारांसाठीही ही एक उत्तम संधी असणार आहे.

मराठी वाहिन्यांचं बजेट कमी असतं असं नेहमी म्हटलं जातं. ती परिस्थिती हळूहळू सुधारतेय. ‘बिग बॉस’सारखा मोठय़ा बजेटचा कार्यक्रम कलर्स मराठीवर सुरू होतोय. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रति आठवडा मानधन दिलं जातं. आणि ते लाखांमध्ये आहे. झी मराठी दोन मालिकांचं वेगवेगळ्या गावांमध्ये शूटिंग करतात. अशा प्रकारे शूटिंग करताना आवश्यक ते आर्थिक गणित मोठं करावं लागतं. झी मराठीने ते पेललं. दहा तास लाइव्ह सारेगमपची अंतिम फेरी करण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडला. त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ मिळवणं आव्हानात्मक होतं. हिंदी मालिकांची निर्मिती करणाऱ्या काही निर्मिती संस्था मराठी मालिकांची निर्मिती करू लागल्या. त्यामुळेही काही मालिकांचं बजेट वाढलं. मोठय़ा पडद्यावरचे कलाकार छोटय़ा पडद्यावर आले की त्यांचं मानधन इतरांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. ‘ग्रहण’ मालिकेच्या निमित्ताने पल्लवी जोशी बऱ्याच वर्षांनी मराठी मालिकेत दिसताहेत. महेश मांजरेकर हा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतला प्रस्थापित चेहरा. ते ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताहेत. ‘शतदा प्रेम करावे’ या स्टार प्रवाहच्या मालिकेत मराठी सिनेमा, नाटक निर्माते अभिजीत साटम मुख्य भूमिकेत दिसताहेत. स्टार प्रवाहच्याच ‘गोठ’ या मालिकेत नीलकांती पाटेकर यादेखील बऱ्याच वर्षांनी मालिकेत दिसत आहेत. सोनी आणि सन टीव्ही नेटवर्क या दोन समूहांची मराठी वाहिनी येत आहे, अशी चर्चा सगळीकडे आहे. त्यामुळे या दोन्ही समूहाच्या हिंदी वाहिन्यांमध्ये असलेले मोठय़ा बजेटचे कार्यक्रम नव्या मराठी वाहिन्यांवर दिसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

खासगी मराठी वाहिन्यांच्या क्षेत्रात गेल्या २० वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या. प्रेक्षकांची करमणूक हा एकमेव उद्देश असणाऱ्या वाहिन्या आता बिझनेसच्या दृष्टीनेही त्याकडे बघू लागल्या आहेत. आणि म्हणूनच वाहिन्यांची आणि मालिकांची संख्यादेखील वाढताना दिसून येतेय. या चढाओढीत प्रेक्षकांसाठी कार्यक्रमांचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ही चांगली बाब असल्याचं सगळ्याच वाहिन्या कबूलही करतात पण त्याच वेळी त्याच प्रेक्षकांसमोर ओटीटी प्लॅटफॉर्म (ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म) म्हणजे ऑनलाइन कण्टेटसुद्धा बराच आहे. वेब सीरिजचं जाळं जलदगतीने वाढतंय. त्यामुळे प्रेक्षकांना तिथेही अनेक पर्याय आहेत. शिवाय ते कधी, कुठे आणि कसं बघायचं हे त्यांच्याच हातात आहे. वाहिन्यांचे पर्याय बरेच असल्यामुळे एका वाहिनीचा कंटाळा आला तर ते जसे दुसऱ्या वाहिनीकडे वळू शकतात तसंच त्यांना जर सगळ्या वाहिन्यांचा कंटाळा आला तर ते या ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळू शकतात. म्हणूनच यापुढच्या काळात प्रेक्षक मिळवणं, ते टिकवून ठेवणं आणि वाढवणं हे वाहिन्यांपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे.

प्रभाव पाडणं महत्त्वाचं

प्रेक्षकांना हवं ते बघायला मिळालं नाही तर ते दुसरा पर्याय शोधणार हे साहजिक आहे. वेगवेगळ्या कथा, कार्यक्रम, तरुणाईसंबंधित उपक्रम, शॉर्ट सिरीज असे प्रयोग व्हायला हवेत. करमणुकीसह प्रेक्षकांवर प्रभाव पडेल असे कार्यक्रम करण्याचा झी युवाचा हेतू आहे. झी युवासह झी टॉकीजमध्येही वैविध्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. झी टॉकीज फक्त मराठी चित्रपटांसाठीची वाहिनी आहे, हा खूप मर्यादित विचार झाला. कारण ती चित्रपटांसाठी वाहिनी असल्यामुळे त्याचं मूळ सिनेमाच असणार आहे हे निश्चित आहे. पण त्यातही काही वेगळं देण्याच्या हेतूने आम्ही ‘टॉकीज लाइट हाऊस’ हा शॉर्ट फिल्म्सचा कार्यक्रम केला होता. ‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या कीर्तनाच्या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळतोय. झी टॉकीजच्या प्रेक्षकवर्गाचा गाभा ग्रामीण भागातला आहे. त्या अनुषंगाने कीर्तनाचा कार्यक्रम सुरू केला. चित्रपटांच्या प्रचारासाठी एक व्यासपीठ मिळावं म्हणून ‘न.स.ते. उद्योग’ हा कार्यक्रम सुरू केला. चित्रपट लावणं आणि बसून राहणं हे सोपं असतं. पण त्यासाठी काही कार्यक्रम, प्रयोग करावे लागतात.  बवेश जानवलेकर, व्यवसाय प्रमुख, झी युवा आणि झी टॉकीज.

भरारी घेण्यास सज्ज

स्टार प्रवाहसाठी मराठी वाहिन्यांचं हे युद्ध नसून त्यांच्यात निकोप स्पर्धा आहे. प्रतिस्पर्धी वाहिनी आणि स्पर्धा यापलीकडेही स्टार प्रवाहचं इतर वाहिन्यांसोबत एक नातं आहे. आम्ही सगळेच एकमेकांचा आदर करतो. एकमेकांचं सामथ्र्य आम्ही जाणून आहोत. या स्पर्धेमुळे सगळेच उत्तमोत्तम कलाकृती आणण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे साहजिकच मराठी कलाकृतींचा दर्जा उंचावेल. शिवाय प्रेक्षकांनाही कार्यक्रमांचे भरपूर पर्याय मिळणार आहेत. ही चांगली बाब आहे. येत्या काळात अनेक नवीन कार्यक्रम स्टार प्रवाहवर बघायला मिळतील. मधल्या काही काळात स्टार प्रवाह थोडं उतरत्या क्रमाने जात होतं. पण आता पुन्हा आम्ही चढत्या क्रमाने वाटचाल करत आहोत. पुन्हा एकदा भरारी घेण्यास सज्ज झालो आहोत. अधिकाधिक चांगले तंत्रज्ञ वाहिनीमध्ये कसे येतील याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. मालिकांच्या आशयावरही आणखी मेहनत घेतली जाईल. श्रावणी देवधर, कार्यक्रम प्रमुख, स्टार प्रवाह.

आमची स्वत:शीच स्पर्धा

झी मराठी कधीच स्पर्धेचा विचार करत नाही. झी मराठीने नेहमीच स्वत:शी स्पर्धा केली आहे. खरं तर ती स्वत:शीच करावी. आम्ही आमच्याशीच करत असलेल्या स्पर्धेचा परिणाम आमच्या मालिकांच्या रेटिंग्सच्या आकडय़ांमधून दिसून येतोच. ‘जय मल्हार’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ यांसारख्या लोकप्रिय आणि यशस्वी कार्यक्रमांसारखे आणखी कार्यक्रम आम्ही नंतर आणलेच नाहीत. त्यांची कॉपी बनवून रेटिंग मिळवण्यात आम्हाला मुळीच रस नाही. हिंदी मालिकांचं अनुकरण करण्याचं चित्र पाच-दहा वर्षांपूर्वी होतं. पण आता तसं अजिबातच नाही. आम्ही मालवण, सातारा किंवा कोल्हापूरमध्ये जाऊन तिथल्याच कलाकारांना घेऊन मालिका करू शकलो, कारण आम्ही स्वत:शीच स्पर्धा केली. स्वत:लाच आव्हान दिलं. आम्ही स्पर्धेत पळत नाही. कारण आमचा उद्देश प्रेक्षकांना मनोरंजन आणि नावीन्य देणं हा आहे. प्रेक्षकांना स्पर्धेशी घेणंदेणं नसतं. त्यांना तुम्ही चांगली कलाकृती दाखवा; त्यांना तेच हवं असतं. आणि हे करण्यासाठी स्वत:लाच आव्हान द्यावं लागतं. आम्ही तेच करतोय. निलेश मयेकर, व्यवसाय प्रमुख, झी मराठी

मराठीचं दालन समृद्ध

मराठी वाहिन्यांवर नवनवीन कार्यक्रम येतच राहणार. कारण मराठी लोकांमध्ये मुळातच प्रयोगशीलता आहे. त्यामुळे त्यात सतत नावीन्य दिसतच राहणार. सतत नवनवीन काही देण्याचं आव्हान मराठी वाहिन्या खूप चांगल्या प्रकारे पेलतील. कलर्स मराठी वाहिनीला कोणताही कार्यक्रम साचेबद्ध न करता प्रयोगशीलतेचा वापर करून नवनवीन कार्यक्रम आणायचे आहेत. या प्रक्रियेत आव्हानं असतील, पण त्या आव्हानांपुढे समृद्धपणे उभं राहण्याची ताकदही मराठीमध्ये आहे. चांगल्या खेळाडूंमुळेच विशिष्ट खेळ समृद्ध होतो. तसंच मराठी वाहिनी आणि मराठी टीव्ही क्षेत्राचं आहे. चांगल्या मराठी वाहिन्यांमुळे मराठी टीव्ही क्षेत्र समृद्ध होतंय. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून मराठीचं दालन समृद्ध केलं पाहिजे. जेणेकरून त्याचा आनंद आम्हीही घेऊ आणि प्रेक्षकांनाही देऊ.निखिल साने, व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी.

मालिका कितीही वेगळी असली तरी प्रेक्षकांना ती आवडली तरच ते बघतात. त्यांना मालिकांचा रटाळपणा आणि लांबणही आवडत नाही. ते त्यांना हवं तेच बघतात. मालिकांबाबत प्रेक्षकांनी त्यांची मतं स्पष्टपणे व्यक्त केली आहेत.

आता बदल होऊ शकतो

झी मराठीचा प्रेक्षकवर्ग आता कलर्स मराठीकडे वळतोय असं वाटतंय. एकेकाळी झी मराठीचे पुरस्कार सोहळे, काही कार्यक्रम बघण्याची उत्सुकता असायची. पण आता त्यात काहीच रस उरलेला नाही. सध्या कलर्स मराठीवरील अनेक कार्यक्रम मला उजवे वाटतात. कलर्स मराठीचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम आवडीने बघतो. त्या कार्यक्रमात परीक्षकांचं मार्गदर्शन, स्पर्धकांची गायकी, सेट हे सारंच चांगल्या गुणवत्तेचं वाटलं. कलर्स मराठीवरच ‘नंबर वन यारी’ हा शोसुद्धा मी बघतो. कलर्स मराठीवर आता ‘बिग बॉस’ सुरू होतंय. मी हा कार्यक्रम आवर्जून बघणार. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, सोशल मीडियावर मराठी मालिकांबद्दल जी काही चर्चा केली जाते त्यात आजही झी मराठी हे चॅनल आघाडीवर दिसतं. पण कलर्स मराठीच्या बिग बॉस या कार्यक्रमामुळे कदाचित यात बदल होऊ शकतो. संदेश सामंत, मुंबई

विषय भावला पाहिजे

झी मराठीची ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘संभाजी’ या दोन मालिका मी आवर्जून बघते. झी युवा या वाहिनीवरील ‘कट्टी बट्टी’ ही मालिका बघते. या मालिकेचा विषय मला भावला. काही मुलींच्या आयुष्यात शिक्षण की लग्न असा एक क्षण येतो. हाच विषय मालिकेत दाखवला आहे. मालिकेच्या नायिकेपुढेही असाच प्रश्न पडतो. पण ती त्यातून कसा मार्ग काढते यावर ती मालिका बेतली आहे. कोणत्याही मुलीच्या अगदी जवळचा विषय आहे. त्यामुळे मी स्वत: त्याच्याशी रिलेट करू शकते. झी मराठीची ‘गाव गाता गजाली’ ही मालिकासुद्धा मला आवडायची. त्यात कोणतंही कारस्थान नसायचं. आजूबाजूला घडणारे प्रसंग त्या मालिकेत दिसायचे. छोटय़ा कथा असायच्या. त्यामुळे ही मालिका माझ्या घरी सगळ्यांनाच आवडायची. कलर्स मराठीची ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका मी पूर्वी बघायचे. मालिकेची नायिका नेहमी काहीतरी करून दाखवायची. लग्न झाल्यानंतर आणि तिचा नवरा गेल्यानंतरही ती अनेक संकटांना सामोरी गेलेली दाखवली आहे. पण नंतर ही मालिका कंटाळवाणी वाटू लागली. त्यामुळे मी ही मालिका बघणं बंद केलं. वृषाली केसरकर, कोल्हापूर.

मनोरंजक मालिकांना प्राधान्य

झी मराठीच्या लागिर झालं जी, संभाजी या मालिका मी आवडीने बघते. झी युवाची ‘गुलमोहर’ ही मालिकाही आता आवडू लागली आहे. आधी ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम बघायचो. आता मात्र तो कंटाळवाणा वाटू लागला आहे. त्यामुळे आता मी गुलमोहर पाहू लागले. मर्यादित भाग, छोटी गोष्ट यांमुळे ती मालिका बघावीशी वाटते. स्टार प्रवाहच्या मालिका फारशा बघत नाही. झी मराठीची नुकतीच सुरू झालेली ‘ग्रहण’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करणारी ठरली. पण त्या मालिकेची जाहिरात बघूनही लहान मुलं खूप घाबरतात. ज्या मालिकांमधून निखळ मनोरंजन होतं आणि काही शिकायला मिळतं अशा मालिका बघायला आवडतात. सीमा देशमुख, ठाणे

लेखन आवडलं

‘सूर नवा ध्यास नवा’ आणि ‘राधा प्रेम रंगी रंगली’ कलर्स मराठीच्या या दोन मालिका मी बघते. ‘राधा प्रेम..’ या मालिकेतला कलाकारांचा अभिनय आणि त्यातली मराठी भाषा मला आवडते. या मालिकेचं लेखन मला भावलं. झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी आधी बघायचे. पण नंतर त्यातला बाष्कळपणा वाढत गेला आणि मी तो कार्यक्रम बघणं थांबवलं. ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ ही मालिकासुद्धा नियमित बघायचे. ‘सारेगमप’ सुरुवातीला काही भाग बघितले. पण ते फारसे आवडले नाहीत. म्हणून ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम बघायला लागले. हा कार्यक्रम तुलनेने जास्त सरस ठरला. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका मला अजिबात आवडत नाही. त्या मालिकेचा विषयच न पटण्यासारखा आहे.   मेघना जोशी, मालवण.

दुसरा पर्याय शोधतो

झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी आवर्जून बघायचो. पण मध्यंतरी थोडा वेळ विश्रांती घेऊन तो कार्यक्रम पुन्हा सुरू झाला त्या वेळी मात्र त्यातली सगळी मजा निघून गेली. त्यामुळे मी कलर्स मराठीचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम बघू लागलो. पण आता हा कार्यक्रमही संपणार आहे. त्या वेळेत आता ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम बघणार आहे. म्हणजेच आवडीचा एक कार्यक्रम संपला की दुसरा पर्याय मी शोधतो. याशिवाय कलर्सवरील ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ आणि ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या दोन मालिका मला खूप आवडतात. ‘घाडगे..’मधल्या अक्षय ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिन्मयचं आणि ‘राधा..’मधल्या राधाची भूमिका करणाऱ्या वीणाचं काम मला आवडतं. दोन्ही मालिकांचे विषय भावल्यामुळे मी त्या मालिका वेळ मिळेल तशा बघत असतो. ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या झी मराठीच्या या दोनच मालिका सध्या चांगल्या वाटताहेत. गिरीश कुलकर्णी, बदलापूर

सुरुवातीला सगळेच चांगले

मालिकांचे सुरुवातीचे काही भाग बघते, पण नंतर त्या एकसूरी व्हायला लागल्या की बघणं सोडून देते. ‘चला हवा येऊ द्या’चे परदेशी दौरे सुरू झाल्यापासून ते बघणं बंद केलं. त्याऐवजी ‘सूर नवा ध्यास नवा’ बघायला लागले. कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ ही मालिका बघते. इतर मालिकांपेक्षा ती मालिका मला उजवी वाटते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आजही बघते. त्यातली शनाया ही व्यक्तिरेखा खलनायिकेची असली तरीही मला ती आवडते. कलर्स मराठीची ‘सरस्वती’ ही मालिका बघायचे, पण नंतर त्यात मालिकेची नायिका मरते; मग दुर्गा येते हे सगळं कंटाळवाणं वाटायला लागलं. तसंच स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ या मालिकेचं झालं. सुरुवातीचे काही भाग मी पाहिले. पण त्यात मालिकेच्या नायिकेचं म्हणजे राधाचं लग्न झाल्यानंतर कारस्थानं, कुरघोडी सुरू झाल्या आणि मी ती मालिका बघणं थांबवलं. सध्या सगळ्याच मालिकांचं तसंच होतं. सुरुवातीला चांगल्या वाटतात, नंतर त्यात काहीच राम राहत नाही. पूजा वैद्य, अलिबाग

जे आवडेल तेच बघते

जसा वेळ मिळेल तसं मी मराठी मालिका बघते. घरातली कामं करता करता मालिका बघते. रोज रात्री कामं आटोपल्यानंतर १०.३० वाजता कधी झी मराठीची ‘ग्रहण’ बघते तर कधी कलर्स मराठीची ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ ही मालिका बघते. कलर्सवरचा ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम संपल्यानंतर त्याच चॅनलवर लगेच ‘घाडगे..’ ही मालिका लागते. त्यामुळे सलग हे दोन्ही कार्यक्रम बघितले जातात. याशिवाय सकाळी १०.३० वाजता ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिकाही बघते. यातली नंदिनी वहिनी ही खलनायिका मला खूप आवडते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधली शनायासुद्धा मला आवडते. दोघी जणी मालिकेत जी धमाल करत असतात ती करमणूक करणारी असते. रूपा भगत, मुंबई

मालिका आटोपशीर असाव्यात

झी मराठीच्या सगळ्या मालिका बघतो. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत नागपुरी बोली आहे त्यामुळे ती ऐकताना मजा येते. ‘संभाजी’ ही मालिकादेखील आवडीने बघतो. ‘चला हवा येऊ द्या’चे परदेशी दौऱ्याचे भाग कंटाळवाणे वाटू लागले. मी मराठी मालिका बघत असलो तरी मालिकांचं उगाचचं लांबवणं हे मला खटकतं. मराठीमध्ये खूप गुणी कलाकार आहेत, लेखक-दिग्दर्शकही चांगले आहेत; फक्त मालिका लांबवल्या जातात हे पटत नाही. त्या कमी भागांच्या केल्या तर त्याचा एक वेगळा प्रभाव पडू शकतो. मालिकांचे काही भाग अनावश्यक वाटतात. मालिका अशा प्रकारे रेंगाळल्या तर त्यातली मजा निघून जाते. निर्माता, कलाकार, दिग्दर्शक, चॅनल या सगळ्यांची यामागची भूमिका वेगळी असेल आणि ती त्यांच्या जागी बरोबरही असेल, पण तरी मालिका आटोपशीर असायला हव्यात, हे मला नेहमीच वाटतं. अनेकदा मालिका एकमेकांचं अनुकरण करताहेत की काय असं वाटू लागतं. म्हणजे एका मालिकेत लग्न झालं की दुसऱ्या मालिकेतही होतं. असं खरंतर व्हायला नको. सतीश वझलवार, नागपूर.

प्रेक्षकांना गृहीत धरणं चुकीचं

घरात ज्या मालिका बघत असतील त्या मी बघतो. ठरवून कोणतीही मालिका बघत नाही. पण मालिकांचे अमर्यादित भाग ही गोष्ट खटकते. ठरावीक भागांनतर मालिका उगाचच भरकटत असतात. गोष्ट कुठेतरी संपायला पाहिजे. ‘लेक माझी लाडकी’, ही मालिका किती काळ सुरू आहे असं वाटतं. तसंच त्या ‘गोठ’ या मालिकेचंही आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सुरुवातीला बरी चालली होती. पण तीही भरकटली. लेखणी इतकी बोथट झाली आहे का? लिखाण कमी पडतंय असं वाटतंय. सादरीकरण त्याच्या नंतर येतं. सध्या तरी कोणतीच मालिका मला तरी चांगली वाटत नाही. प्रेक्षक बघतीलच असं म्हणून त्यांना गृहीत धरलं जातं. अतक्र्य गोष्टींमधून वाढवलेल्या मालिका रटाळच वाटतात. त्या थांबायला हव्यात. शिरीष घाटे, पुणे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11

First Published on April 13, 2018 1:05 am

Web Title: permitted private marathi satellite tv channel