माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार, शिक्षणाच्या विविध संधी आणि पुण्यालगतच्या भागामध्ये आलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उद्योगांमुळे शहर व परिसरामध्ये घरांना प्रचंड मागणी निर्माण झाल्याने काही वर्षांपूर्वी बांधकाम क्षेत्रात प्रचंड तेजी होती. याच काळात शहरालगतच्या भागातही घरांच्या किमती वाढत जात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. घर खरेदीमध्ये होणारी गुंतवणूक मंदावत गेली. त्यातून तीन ते चार वर्षांपासून बांधकाम क्षेत्राला काहीशी घरघर लागली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर घर खरेदीतील ही पडझड स्पष्ट दिसू लागली आहे.

बांधकाम क्षेत्रातील मंदीची स्थिती दिवाळीमध्ये निश्चितच दूर होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण तीही फोल ठरली. ऐन मुहूर्ताच्या कालावधीत पुण्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची दिवाळीतील संधी हुकली. घरांच्या दरांवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक असलेल्या वार्षिक बाजार मूल्य (रेडी रेकनर) नव्या निर्णयानंतर आता एप्रिलपासून बदलणार आहे. त्यामुळे रेडी रेकनरच्या जुन्या दरात घर खरेदी करण्यास दिवाळीनंतर चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला.

घर खरेदीला आधीच फारशी तेजी नसताना नोटाबंदीच्या दुसऱ्याच दिवसापासून घर तसेच जमीन खरेदीतील व्यवहार आणखी मंदावले. पुण्यात दस्त नोंदणीची २५ कार्यालये आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये मंदीच्या काळातही खरेदी-विक्री व्यवहाराचे चाळीस ते पन्नास दस्त नोंदणी होत असते. मात्र नोटाबंदीनंतर ही संख्या पन्नास टक्क्यांनी घटली. नोटाबंदीच्या वीस दिवसांनंतरही त्यात कोणतीही सुधारणा होऊ शकली नाही. कर, पेट्रोल, वीजबिल आदींसाठी जुन्या नोटा स्वीकारल्या गेल्या. मात्र मुद्रांक शुल्कासाठी या नोटा बंद करण्यात आल्याने महसुलालाही मोठा फटका बसला. अशी स्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

बांधकाम क्षेत्रातील पडझडीच्या स्थितीत घरांच्या किमती कमी होतील, अशी शक्यता काहींकडून व्यक्त करण्यात येत होती. बांधकाम व्यावसायिकांनी ही शक्यता फेटाळून लावली. मात्र पाचशे व हजाराच्या नोटाबंदीमुळे गृहबांधणी व्यवसायाला ऊर्जितावस्था येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे घराच्या किमती कमी होतील, हा प्रचार खोटा आहे. घरांचे दर कमी होणार नसले, तरी गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार आहेत. आतापर्यंत बँकांमध्ये पसा न ठेवणारे सर्वसामान्य ग्राहक बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करणार असल्याने गृहकर्जास पात्र ठरतील. त्यामुळे घरखरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संघटनेचे म्हणणे आहे.

नोटाबंदीमुळे बँकांकडे मोठय़ा प्रमाणावर पसा येणार आहे. त्यामुळे कर्ज आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. मुदत ठेवींवरील व्याजदर पाच-सहा टक्क्यांवर येतील आणि गृहकर्जाचे व्याजदर सात-आठ टक्क्यांपर्यंत कमी होतील. या व्याजदर कपातीमुळे बांधकाम व्यवसायाला ऊर्जतिावस्था प्राप्त होईल, असे क्रेडाईचे मत आहे. पुढील काळात बांधकाम क्षेत्रात काय होईल, याबाबत सर्वच पातळीवर सध्या तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. मात्र, सद्य:स्थितीत या क्षेत्रातील पडझड कायम असल्याचे चित्र आहे.
पावलस मुगुटमल – response.lokprabha@expressindia.com