संस्कृती
स्पृहा गानू – response.lokprabha@expressindia.com

पोटापाण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांची मातृभाषा तिथलीच असणार हे उघड आहे. पण त्यांच्या स्वीस पत्नीने मात्र आग्रह धरला की आपल्या मुलांना त्यांची पितृभाषाही यायला हवी. त्यासाठी या जोडप्याने मुंबईत येऊन आपल्या मुलांना काही महिन्यांसाठी मराठी शाळेत घातलंय. यानिमित्ताने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतला पितृभाषा हा वेगळाच पैलू समोर आला आहे.

पालकांचा, मुलांचा, शिक्षकांचा, व्यवस्थापनाचा आणि एकूण मराठी समाजाचाच मराठी भाषेकडे, महाराष्ट्राच्या मातृभाषेतल्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मराठीची गळचेपी करणारा आहे. असे असताना एक परदेशी जोडपे आपल्या दोन्ही मुलांना तीन-चार महिन्यांसाठी मुंबईतल्याच एका मराठमोळ्या शाळेत घालते. त्यामागे आपल्या मुलांना मराठीतून शिकता आले पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे हा एकमेव हेतू असतो. हे सगळं नवल वाटावं असंच आहे.

मूळचे मुंबईचे अमोल आखवे आणि स्वीस नागरिक असलेली त्यांची पत्नी कोरिना शार्कप्लाट्झ आखवे सध्या मुंबईत अमोल यांच्या मूळ घरी रहायला आलेत, तेही आपल्या आठ नि दहा वर्षांच्या दोन्ही मुलांना घेऊन. स्वित्झ फ्रॅंक्समध्ये मिळणाऱ्या भरभक्कम पगारावर चार महिन्यांसाठी पाणी सोडून हे दोघेही मुंबईत एक ध्येय घेऊन आले आहेत. मार्क आणि यान हे त्यांचे दोन्ही मुलगे सध्या दहिसरच्या शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या शाळेत अनुक्रमे तिसरीत आणि पहिलीत शिकत आहेत. मुलांना काही काळापुरतं मराठी शाळेत घालायचं ही कल्पना कोरिनाची. अमोल सांगतात, ‘आपली मुले स्वित्झर्लण्डमध्येच राहणार आहेत, तिथेच वाढणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आईची संस्कृती, तिची भाषा मुलांना समजणारच आहे. पण मुलांच्या वडिलांची मुळे असलेली भारतीय संस्कृती, मराठी भाषा मुलांना कळावी, मातृभाषेसोबतच पितृभाषाही त्यांना यावी, हा कोरिनाचा विचार मला महत्त्वाचा वाटला आणि मग इथे येण्याचा आम्ही निर्णय घेतला. परदेशी वंशाच्या आपल्या पत्नीबद्दल सांगताना अमोल यांच्या बोलण्यातून अभिमान ओसंडत होता.

गेली १६-१७ वष्रे परदेशात राहिल्यामुळे तिथले नागरिकत्व सहज मिळत असतानाही आपले मराठमोळेपण जपण्यासाठी अमोल यांनी परदेशी नागरिकत्व नाकारले. मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही त्यांच्याशी इंग्रजीतच संवाद साधणाऱ्या मराठमोळ्या पालकांचा एक मोठा वर्ग आपल्याकडे असताना, स्वित्झर्लण्डसारख्या जर्मन भाषिक बहुसंख्य असलेल्या देशात राहूनही अमोल मात्र मुलांच्या जन्मापासून त्यांच्याशी मराठीतूनच संवाद साधतात. त्यांची मुले त्यांना डॅडी किंवा पप्पा न संबोधता, बाबा म्हणतात आणि कोरिना यांना ममा किंवा इथे मुंबईत आल्यावर आई म्हणूनच हाक मारतात. हे सगळं चित्र पाहताना खरोखर अवाक होतो आपण.

‘इट्स नेव्हर टू मच व्हेन इट्स युअर ओन मदरटंग’ असं सांगताना कोरिना यांचा आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या नवऱ्याची मातृभाषा आपल्या मुलांना यावी यासाठी त्यांच्या मनात असलेली ओढ त्यांच्या बोलण्यातून सहज व्यक्त होते. तुम्ही राहत असलेला देश कोणताही असो, राज्य कोणतेही असो.. तुमची मातृभाषा, मूळ भाषा आपल्याला यायलाच हवी या मतावर कोरिना ठाम आहेत. मार्क माझ्या पोटात असल्यापासून अमोल त्याच्याशी मराठीतच बोलतो, यानचेही तसेच झाले आहे. त्यामुळे  आमच्या मुलांना मराठी खूप छान समजते. आम्ही सध्या मुंबईत आलो आहोत, त्यामुळे आमची मुले त्यांच्या बाबांच्या भाषेशीच नव्हे तर इथल्या संस्कृतीशी, इथल्या जगण्याशी स्वतला जोडून घेऊ शकणार आहेत, याचा मला फार आनंद आहे, असे सांगताना कोरिना यांच्या डोळ्यात अभिमानाची चमक दिसते. मुंबईतले त्यांचे शेजारी-पाजारी, नातेवाईक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालून घरातही इंग्रजी वा पाश्चिमात्य संस्कृती रुजवण्याचा अट्टहास धरत आहेत, याची खंत अमोल आणि कोरिना व्यक्त करतात.

मार्क आणि यान दोघेही अगदी सहज मुले मराठी बोलतात. दोघांनाही स्वित्झर्लण्डमध्ये राहूनही भारताचे राष्ट्रगीत पूर्ण तोंडपाठ आहे. मराठीतले स्वर कोणते, व्यंजने कोणती हे तिसरीतल्या मार्कला सहज सांगता येते. मराठमोळ्या घरात दिवेलागणीच्या वेळेला ‘चल बेटा, गॉडची प्रेअर म्हण’ किंवा ‘जेवताना इट बेटा, इट..’ असं इंग्रजाळलेले मराठी संवाद ऐकले की मराठी घरात मराठी भाषा कशी व्हेंटिलेटरवर आहे, याचे दुख होते. या उलट अमोल यांच्या स्वित्झ कुटुंबात वावरताना कुठेही परकेपणाचा लवलेशही नसतो. ‘शाळा आहे, लवकर आवर, अजून आंघोळ व्हायची आहे’, इतक्या सहज-सुंदर मराठीत अमोल आपल्या मुलांना धारेवर धरतात.

इथे आल्यावर सुरुवातीला मार्कला स्वित्झर्लण्डच्या शाळेची फार आठवण आली. तो अक्षरश रडायचा. तिथल्या मित्रांशी व्हीडिओ कॉलवर गप्पा मारायचा आणि तिथे परत जायचे म्हणून हट्ट करायचा. पण आता दोन्ही मुलांना आपली मुंबईची शाळा आवडली आहे. एकही दिवस दोघांनीही सुटी घेतली नाही, ११ वाजले की शाळेचे वेध दोघांना आपोआप लागतात, असे कोरिना सांगतात.

अमोल-कोरिना यांच्या निर्णयाबद्दल शैलेंद्र विद्यालयातल्या यानच्या वर्गशिक्षिका अनिता राऊत फारच कौतुकाने सांगतात. त्या म्हणतात, असे पालक मिळणे फार कठीण आहे. त्यांनी केवळ मुलांना इथल्या शाळेत घातले नाही, तर ते स्वतही या शाळेचा एक भाग झाले आहेत. यान खूप लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आहे. त्याचे पालक पहिल्यापासून त्यांच्याशी मराठीत बोलतात, हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला समजते. मुळात, या मुलांना शिकण्याची इच्छा आहे. तो वर्गात माझ्याशी मराठीतच बोलतो, काही शब्द उच्चारता येत नसतील तर प्रयत्न करतो, खुणांनी सांगतो, हे फारच कौतुकास्पद आहे.

शैलेंद्र विद्यालयाचे प्राचार्य सुदाम कुंभार म्हणतात, पूर्वी मराठी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लोक रांगा लावत असत. आता त्याच रांगा इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी लागतात. आपल्याकडे अशी परिस्थिती असताना आखवे कुटुंबीय हा आपल्यासाठी आदर्श ठरू शकतो. मुंबईतल्या काही मोजक्या मराठी शाळांमधून त्यांनी त्यांच्या मुलांसाठी शैलेंद्र विद्यालयाची निवड केली, हा आमचा बहुमान आहे. आमच्या शाळेतून या मुलांना आम्ही केवळ मराठीतून शिक्षणच देणार नाही, तर आम्ही त्यांना मराठी संस्कृती, मराठीपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचे शिक्षकही खूप मेहनत घेत आहेत.

मुलांना मुंबईतल्या शाळेचा सर्वागीण अनुभव घेता यावा, यासाठी अमोल यांनी केवळ तीन महिन्यांसाठी शाळेचा गणवेशही घेतला आहे. तीन महिन्यांसाठी गणवेश का घेता, असा प्रश्न कुणी तरी विचारल्यावर मुलांना मुंबईतल्या शाळेची आयुष्यभर आठवण देणारी ती एकच खूण मी स्वित्झर्लण्डला सोबत नेऊ शकतो, असे उत्तर अमोल यांनी दिले.

पालकत्व म्हणजे काय तर मुलांना जन्माला घालणे, त्यांना जेवू-खाऊ घालणे, गडगंज पसा कमावून वर्षांकाठी एक-दोन वेळा फिरायला नेणे, मॉलमध्ये नेऊन महागडे शॉिपग करणे आणि चांगल्या शिक्षणाच्या नावाखाली मोठमोठय़ा ब्रॅण्डेड शाळांमध्ये खोऱ्याने फी भरून अभ्यास आणि स्पध्रेचे ओझे मुलांवर टाकणे.. काही अपवाद दुर्दैवाने हेच चित्र आपल्या आजुबाजूला वगळता आजकाल दिसते. असे असताना अमोल यांचे उदाहरण कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे, यात वाद नाही.

माध्यान्हभोजन

मार्क आणि यान या दोघांनाही घरच्या डब्यापेक्षा जास्त शाळेत येणारे माध्यान्ह भोजन जास्त आवडले आहे. शाळेत येणारी खिचडी, पुलाव ही दोन्ही मुले चवीचवीने खातात. सगळ्या मुलांबरोबर बसून हाताने व्यवस्थित, न सांडवता ही मुले जे येईल ते नीट जेवतात, असे शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले. म्हणजेच, केवळ मराठमोळ्या शिक्षणातून नव्हे तर, खाद्यसंस्कृतीतूनही मराठीपण या मुलांच्या अंगात भिनेल, असे म्हणायला हरकत नाही.