रिअल इस्टेट विशेष
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
कोणाला उंच डोंगर माथ्यावर आपलं घर दिसत असतं. तर कोणाला रात्री झोपताना खळाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचं संगीत कानी पडणं अपेक्षित असतं. कोणाला जंगलाच्या कुशीत विसावायचं असतं तर कुणाला जमिनीखाली वेगळं विश्व साकारायचं असतं. अशा जगावेगळ्या घरांची झलक..

‘घर’ म्हणजे काय? या प्रश्नाचं प्रत्येकाकडे वेगवेगळं उत्तरं असतं. कोणासाठी घर म्हणजे माणसांना जवळ आणणारी वास्तू असते, तर कोणाला दिवसभराच्या दगदगीनंतर निवांतपणे विसावण्याचा कोपरा असतो. कोणासाठी घर म्हणजे अनोळखी, अशाश्वत जगात आपल्या ओळखीचा, हक्काचा कोनाडा असतो, तर कोणासाठी ‘कोण काय म्हणेल’ याची चिंता न करता मुक्तपणे स्वतला व्यक्त करायचं व्यासपीठ असतं. प्रत्येकाचं घर सारखं नसतं. अगदी २०० चौरस फूट ते भल्या मोठय़ा महालापर्यंत प्रत्येकाच्या घराची रचना वेगवेगळी असते. पण त्या घराची ओळखही वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झटतो. या घराच्या कल्पनेबाबत काहींच्या कल्पना भन्नाट असतात. काहीशा अवघड वाटणाऱ्या ठिकाणी, एखादा प्रयोग करून जगावेगळं घर त्यांना साकारायचं असतं. मग कोणी नॉर्वेच्या वाढलेल्या हवामानाची तमा न बाळगता उभं राहणारं घर बांधतो, तर कोणी मेक्सिकोच्या वाळवंटी भागात तेथील दिवसरात्रीच्या विरुद्ध हवामानात टिकणारं घरं बांधतो, तर कोणी आजूबाजूच्या झाडांची एकही फांदी न तोडता त्यामधून जागा काढत आपलं घर उभारतो. जगभरातील अशा कल्पनेपलीकडच्या घरांची दखल जगावेगळा घरांची एक मस्त झलक आपल्याला नेटफ्लिक्सवरील ‘द वर्ल्ड्स मोस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी होम्स’ या मालिकेत पाहायला मिळते.

वास्तूरचनाकार पिअर्स टायलर आणि अभिनेत्री कॅरोलीन क्विंटीन ही दोघं जगावेगळी घरं शोधत जगाची सफर करतात. पण या कार्यक्रमाचे मुख्य नायक आहेत ती ही देखणी घरं. घराची खिडकी उघडली की बाहेरचा देखावा कसा असावा, या विचारातून घर कुठे बांधायचं याचा विचार होतो. त्यात प्रदेशाची भौगोलिक स्थितीसुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावते. कोणाला उंच डोंगर माथ्यावर आपलं घर दिसत असतं. तर कोणाला रात्री झोपताना खळाळणाऱ्या समुद्राच्या लाटांचं संगीत कानी पडणं अपेक्षित असतं. कोणाला जंगलाच्या कुशीत विसावायचं असतं तर कुणाला जमिनीखाली वेगळं विश्व साकारायचं असतं. अशा घरांना उलगडण्याचे काम हे दोघे या मालिकेत करतात.

पेशाने वाहन विक्रेती असलेल्या फ्रान्सिसला तिचं घर कॅलिफोíनयाच्या डोंगरमाथ्यावर बांधायचं असतं. पण तिची एकच अट असते, डोंगरावर तग धरेल असा दणकटपणा घराला हवाच, पण घर तितकंच लयबद्धसुद्धा हवं. तिची ही मागणी पूर्ण करण्यासाठी तिच्या वास्तुविशारदाने थेट जुन्या बोइंग ७४७ विमानाचा वापर घर बांधण्यासाठी केला. विमानाच्या पंखांचा वापर त्याने छप्पर म्हणून करत घराला कमनीयता दिली. तसंच अ‍ॅल्युमिनियममुळे घराला दणकटपणासुद्धा मिळाला. हे विमान विकत घेण्यासाठीच फ्रान्सिसला तब्बल चाळीस हजार पौंड मोजावे लागले. अ‍ॅल्युमिनियमच्या चंदेरी रंगाला साजेसी काच, स्टीलचा वापर करून घराचा उर्वरित भाग पूर्ण करण्यात आला. याच्या थेटविरुद्ध मेक्सिकोच्या एका टोकाच्या उष्ण आणि थंड वातावरणाच्या वाळवंटात तग धरणारं घर बांधायची इच्छा डेव्हिड आणि कॅरन डॉक्टर दाम्पत्याची होती. वाळवंटी प्रदेशाच्या टोकाच्या तीव्र हवामानामध्येही घरात हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील आणि विशिष्ट तापमान टिकवता येईल या दृष्टीने हे घर संपूर्णपणे मातीने बांधण्यात आले. जेणेकरून दिवसभर उन्हाचा दाहकपणा शोषून रात्रीच्या थंडीत उबदारपणा देण्याचं काम घराच्या िभती करतात. प्रत्येक खोलीला जोडणारा कॉरिडॉर न देता घराबाहेरून खोलीत जाण्याचा दरवाजा दिलेला आहे. त्यामुळे कोणत्याही खोलीत जाण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडावं लागतं.

न्यूझीलंडच्या डोंगराच्या कुशीत तळ्याच्या बाजूला घर बांधताना वास्तुविशारद गॅरी आणि नोकोलसनला ओरिगामीचा वापर वास्तुरचनेत करण्याची कल्पना सुचली. घरासमोरील उंच पर्वतरांगांशी साधम्र्य साधणाऱ्या त्रिकोणी आकाराच्या छपरामुळे घर या प्रदेशात उठून दिसण्याऐवजी प्रदेशाचा भाग म्हणून अगदी आरामात मिसळून जातं. ओरिगामीचा वापर करून वेगवेगळ्या घडय़ांमधून मिळणाऱ्या कोनाडय़ांचा वापर उगवतीची दिशा आणि घरामध्ये येणारा प्रकाश याचा सुंदर मेळ घरात साधता आलाय. तसंच क्रीम, पिवळा अशा रंगसंगतीने घर प्रकाशमान आणि उबदार ठेवलं आहे. समुद्रापासून साधारणपणे साडेपाच हजार फूट उंचीवर असलेल्या स्वीस पर्वतरांगांमध्ये आपलं पारंपरिक पद्धतीचं पण आधुनिक घर बांधण्याचा विचार अँड्रीस आणि गॅब्रिलने या वास्तुविशारद जोडीने केला. या थंड प्रदेशात बाहेरून छोटेखानी लाकडी आयताकृती पेटी वाटणारे घर उभारताना सगळ्यात मोठं आव्हान होतं ते घरातील हवामान विशिष्ट तापमानावर राखणं आणि बाहेरचं वातावरण कितीही बदलत राहिलं तरी घराचा पाया भक्कम ठेवणं. बर्फवृष्टीदरम्यान घराभोवती बर्फ साचून रस्ता बंद होऊ नये म्हणून घराचा मुख्य दरवाजासुद्धा विशिष्ट पद्धतीने बांधण्यात आला.

अशाच प्रकारे जंगलात झाडांच्या सान्निध्यात घर बांधताना एकही झाडाला न तोडता त्यांच्या आजूबाजूने घर बांधण्याची कल्पना असो किंवा टेकडीच्या खालच्या बाजूला घर बांधताना उपलब्ध दगडी रचनेचा घराची िभत म्हणून वापरणे असो. निसर्गाच भान ठेवून शक्य तितक्या टाकाऊ वस्तू सुबकतेने घरात वापरताना जुनी गाडी िभतीला उभी लावून तिचा शोभेचं कपाट म्हणून वापर करायचा प्रयोगही ऐक या वास्तुविशारद जोडप्याने केलेला आहे. स्पेनच्या अथांग समुद्रकिनारी घाटाच्या उतारावर घर बांधताना सफेद आणि फिकट निळ्या रंगाचा वापर घरासाठी करत घराचं छप्परसुद्धा लाटांच्या आकारात करण्याची कल्पना ऐक या वास्तुविशारद जोडीने प्रत्यक्षात आणली. तर दुसरीकडे जेरुसलेमसारख्या शहरात पारंपरिक अरबी वास्तुकलेच्या आधुनिकतेची जोड देऊन जुन्या आणि नव्या पिढीलाही आपलंसं वाटेल असं टुमदार घर बांधण्याचा प्रयोग असो किंवा याचं शहरात घरामध्ये चित्र किंवा कलाकुसरीच्या वस्तू लावण्याची परवानगी नसताना नियमांमध्ये बसवून घराच्या भिंतींना थर्ड डायमेन्शन देत कलात्मक झलक कायम ठेवायचा प्रयत्नही केला गेलाय. टेकडीवरील शेतकरी कुटुंबाची आपलं पारंपरिक घर आणि जमीन विकताना मनाची होणारी घालमेल लक्षात घेता या घराची मूळ रचना तशीच ठेवून त्याच्या आतून बोगदा तयार करत नव्या घरासाठी वाट तयार करणारं कुटुंबसुद्धा इथे दिसते.

या मालिकेत भारतातील घरंदेखील पाहायला मिळतात. सह्य़ाद्री पर्वतरांगेतील बॅसॉल्टचा वापर अत्यंत खुबीनं येथे केला आहे. मुंबई नजीकच्या खोपोलीला बसॉल्टचा वापर करून किल्ल्यासारखं भक्कम घर बांधले आहे. हे घर बांधताना, भारतीय घरातील मुख्य घटक म्हणजे सगळ्यांना एकत्र जोडणारा वऱ्हांडा आणि आजूबाजूच्या फुलाफळांच्या झाडांनाही घराचा मुख्य भाग करण्याचा प्रयोग वास्तुविशारदांनी केला आहे. तर दुसरीकडे लहानपण हिमालयाच्या कुशीत गेलेल्या मलिक यांनी विकएंड घर बांधताना झाडाच्या रचनेची प्रेरणा घेत फांद्या फुटलेलं, भरपूर खुली जागा असलेलं घरं मुंबईजवळ बांधलं आहे. पण हे घर बांधत असताना स्वतसाठी खुलं आकाश आणि भरपूर झाडं असलेला निवांत कोपरा, मुलांसाठी जलतरण तलाव आणि आधुनिक सोयी असलेला कोपरा त्यांनी मोठय़ा खुबीने मोकळा ठेवला आहे. नवी मुंबईच्या वर्दळीत तीन मजली घर बांधताना आधुनिक साहित्याचा वापर करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीच्या खिडक्या, शंभर वष्रे जुने लाकडी खांब, बाटिकचे टाकाऊ खाचे, जुन्या फोटोफ्रेमच्या बॉर्डर्स अशा वस्तूंचा पद्धतशीरपणे वापर, वेगवेगळ्या परंपरांचा सुंदर कोलाजसदृश्य असे घरसुद्धा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते.

अशा कित्येक प्रकारच्या भन्नाट कल्पना असलेली जगभरातील ही घरं पाहायला मिळतात. काहींना जगावेगळ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायच्या असतात, तर काहींना छोटय़ा, साध्यासोप्या गोष्टींमधूनसुद्धा सौंदर्यनिर्मिती करायची असते. भारताचा पश्चिम घाट असो किंवा मेक्सिकोमधील वाळवंट, अशा दुर्गम जागी एका कोपऱ्यात स्वतचं घर उभारण्यामागे प्रत्येकाची मानसिकता ही निसर्गाला आव्हान देणं किंवा भव्यदिव्य करावं इतकीच नाही. किंबहुना हा विचारच त्यांच्या मनाला शिवत नाही. त्यामुळे घराची रंगसंगती, बांधकामाची सामग्री निवडताना तेथील नैसर्गिक, भौगोलिक परिस्थितीचा विचार प्रामुख्याने केला जातो. हिरवा, पिवळा, क्रीम, फिकट आकाशी अशा रंगसंगतीचा वापर होतो. त्या परिसरात पूर्वीपासून राहणाऱ्या लोकांनी वापरलेली साधनसामग्री बांधकामात वापरली जाते. मग यासाठी नेहमीच्या कोलाहलापासून लांब कदाचित थोडय़ा खर्चीक ठिकाणीही घर बांधण्यासाठी त्यांची हरकत नसते. शेवटी सगळी धडपड ही हक्काच्या कोपऱ्यावर येऊन थांबते. यातील काहीजण मग आपल्या बालपणीच्या आठवणी या ठिकाणात शोधत असतात, तर काहीजण पुढच्या पिढीसाठी एक छानसा वसा ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. समुद्राच्या लाटा, वाऱ्याचं संगीत शोधण्यासाठी कोणी धडपडत असते, तर कोणी उंच टॉवर्सच्या पलीकडील उंच पर्वतरांगा, हिरवीगार वनराई पाहण्यासाठी आतुरलेले असतात. या निसर्गाला धक्का न लावता विनम्रतेने या निसर्गाचा भाग होण्याचा प्रयत्न असतो.