16 February 2019

News Flash

आंब्यावरील प्रक्रिया उद्योगावरही मंदीचे सावट

यंदा आंब्याच्या मुख्य बाजारपेठेतच मंदीचे सावट असल्याने प्रक्रिया उद्योगालाही त्याचा फटका बसणार आहे.

आंबा प्रक्रिया उद्योग हा हंगामी उद्योग आहे. आंब्याचा मोसम सुरू झाल्यानंतर साधारण एक- दोन महिन्याने म्हणजे मेच्या सुरुवातीला प्रक्रिया व्यवसाय सुरू होतो.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2
आंब्यावरील प्रक्रिया उद्योगाला गेल्या काही वर्षांत चांगलाच वाव मिळाला आहे. पण यंदा आंब्याच्या मुख्य बाजारपेठेतच मंदीचे सावट असल्याने प्रक्रिया उद्योगालाही त्याचा फटका बसणार आहे.

ठरावीक मोसमातच मिळणारा आंबा त्याच मोसमात खाण्याकडे कल असला तरी मोसम संपल्यानंतर त्याचा आस्वाद घेण्याची इच्छा सर्वानाच असते. त्यातूनच मग मिल्क शेक, आम्रखंड, विविध शीतपेये, आइस्क्रीम अशा स्वरूपातून आंब्याचा स्वाद आपण घेतच असतो. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत आंब्यावर प्रक्रिया करून त्यापासून पल्प तयार करणे या उद्योगाने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे. मुख्यत: व्यावसायिक ठिकाणी म्हणजे हॉटेल्स, ज्यूस सेंटर, आइस्क्रीम उत्पादक, मिठाई उत्पादक आणि आंब्याशी निगडित शीतपेयांचे उत्पादक यांच्याकडे संपूर्ण वर्षभर या पल्पची मागणी असते. त्यातूनच या उद्योगाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. किंबहुना हे उद्योग नसते तर आंब्याच्या पल्पला तेवढी मागणीच मिळाली नसती; कारण वैयक्तिक स्वरूपातील ग्राहकांची मागणी (म्हणजेच किरकोळ बाजार) आजही कमीच आहे.

सर्वसाधारणपणे नेहमीच्या बाजारात ज्या आंब्याला मागणी नसते त्यांचा वापर हा पल्पसाठी केला जातो असा समज आहे. पण तो काही प्रमाणात खरा आहे असे प्रक्रिया उत्पादक सांगतात. बऱ्याच वेळा चांगल्या प्रतीचा असला तरी डाग वगरे पडलेल्या आंब्याला बाजारात मागणी नसते, त्याला पुरेशी किंमत मिळू शकत नाही. मग तो माल पल्प करण्यासाठी पाठवणे हेच सोयीचे ठरते. तसेच चांगल्या दर्जाचा आंबा हा बाजारात चांगल्याच किमतीला विकला जातो, अशा वेळी त्या किमतीत पल्प करणाऱ्या कंपन्या तो आंबा खरेदी करू शकत नाहीत. कारण पल्पची किंमत ही मूळ किमतीच्या साधारण दुप्पट होते (साधारणपणे एक किलो आंब्यापासून अर्धा किलो पल्प मिळतो). मग उत्तम प्रतीच्या आंब्याचा पल्प त्याच्या मूळ किमतीच्या दुप्पट किमतीत खरेदी केला जाईल याची खात्री आजच्या बाजारपेठेत मिळत नाही. त्यामुळे अनेक उत्पादक हे तोतापुरी, केसर वगरे प्रजातींच्या आंब्यांचे हापूसबरोबर मिश्रण करतात. तर काही उत्पादक केवळ हापूसचाच पल्प करणारेदेखील आहेत, पण हे प्रमाण कमीच आहे.

भारतात आज वर्षांला सुमारे १६ दशलक्ष टन आंब्याचे उत्पादन होते, त्यापकी सुमारे १० टक्के आंबा हा प्रक्रिया उद्योगासाठी वापरला जातो असे जैन फार्मफ्रेश या प्रक्रिया उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील देशपांडे सांगतात. आंबा आणि कोकण हे समीकरण लोकांच्या डोक्यात अगदी पक्के असले तरी केवळ कोकणच्या जिवावर आंब्याचा प्रक्रिया उद्योग विस्तारलेला नाही. जैन उद्योग समूह हा आज देशात आंबा प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे. त्यांचा एक प्रकल्प जळगाव येथे तर तीन प्रकल्प हे तामिळनाडूमध्ये आहेत. आणि सर्व मिळून वर्षांला एक लाख तीस हजार टन आंब्यावर त्यांच्याकडे प्रक्रिया केली जाते. म्हणजेच ज्या कोकणचा आंब्याबाबत लौकिक आहे तेथे त्यावर प्रक्रिया उद्योग फारसा विकसित झालेला नाही. आंबा हे नाशवंत फळ असल्यामुळे प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी ते चोवीस तासांत पोहोचले तरच पुढील प्रक्रियांसाठी त्याचा फायदा होतो, पण कोकण रेल्वेची सुविधा या कामी जळगावसाठी फारशी खात्रीशीर नसल्यामुळे रस्ते वाहतुकीचाच पर्याय अवलंबावा लागत असल्याचे सुनील देशपांडे सांगतात. रत्नागिरी जिल्ह्य़ात सध्या क्लस्टरअंतर्गत ३०-४० कॅिनग व्यावसायिक स्थिरावले आहेत. मात्र त्या सर्वाची क्षमता मर्यादितच आहे. तर कोकण मँगो प्रोसेसिंग प्रा. लि. या नावाने या क्लस्टरमधील सर्व कॅनिंग उत्पादकांची एकत्रित कंपनी या वर्षीपासून सुरू होत आहे. या कंपनीची क्षमता दिवसाला २०० मेट्रिक टन आहे.

आंबा प्रक्रिया उद्योग हा हंगामी उद्योग आहे. आंब्याचा मोसम सुरू झाल्यानंतर साधारण एक- दोन महिन्याने म्हणजे मेच्या सुरुवातीला प्रक्रिया व्यवसाय सुरू होतो. पुढे साधारण महिना-दोन महिने सुरू राहतो. त्यामुळे उर्वरित काळात ही संपूर्ण यंत्रणा बंदच ठेवावी लागते. याचसंदर्भात केळकर कॅनिंगचे सौरभ केळकर सांगतात की, हा हंगामी उद्योग असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करणे सर्वानाच शक्य होत नाही. सर्वसाधारणपणे मध्यम प्रकल्पामध्ये दिवसाला पंधरा ते वीस टन आंब्यावर प्रक्रिया करायची असेल तर किमान दोन कोटी रुपये गुंतवणूक गरजेची ठरते.

असेप्टिक आणि कॅनिंग अशा दोन पद्धतीने आंबा प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. कॅनिंग प्रक्रियेत ९० डिग्रीपर्यंत तापमान वापरले जाते व टिनच्या माध्यमातून पल्प साठवला जातो. तर असेप्टिकमध्ये १०६ डिग्रीपर्यंत तापमानाचा वापर करून तयार झालेला पल्प हा साधारण १०० किलो आकारमानाच्या मोठय़ा कॅनमध्ये साठवला जातो. असेप्टिक प्रक्रियेत दिवसाला शंभर-दोनशे टन आंब्यावर प्रक्रिया केली जाते. कोकणात बहुतांशपणे कॅनिंगचाच वापर होतो.

आंब्यावरील प्रक्रिया उद्योग हा सर्वाधिकपणे पल्प तयार करण्याशीच निगडित आहे. याशिवाय आंब्यापासून आंबापोळी, आंबावडी, लोणचं वगरे उद्योगदेखील केले जातात. पण त्याचा एकूण उद्योगातील वाटा हा अगदीच मर्यादित आहे. आणि हा व्यवसायदेखील दोन-चार अपवाद सोडता बहुतांशपणे स्थानिक पातळीवरच चालतो.

एकूण आंब्याच्या बाजारपेठेत आंबा प्रक्रिया उद्योगाचा वाटा हा साधारण १० टक्के इतकाच असल्याचे सुनील देशपांडे सांगतात. साधारणपणे जितका किलो आंबा वापरला जातो त्याच्या निम्म्या वजनाने पल्प मिळतो. म्हणजेच तसा हा उद्योग महागडाच आहे. पण वर्षभर आंब्याचा स्वाद मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग हा कोणत्याही बागायतदारासाठी उत्पन्नाचे संतुलन साधण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सुनील देशपांडे नमूद करतात. कोणताही बागायतदार सर्वच्या सर्व उत्पादन बाजारात विकू शकत नाही. अशा वेळी प्रक्रिया उद्योगामुळे त्याला एक आधार मिळतो असे ते सांगतात. पण केवळ प्रक्रिया उद्योगासाठीच बागायती करणे हे परवडणारे नाही, तर फळ विक्री आणि प्रक्रिया या दोन्हीचा समतोल साधणे गरजेचे आहे असे ते सांगतात.

आपल्याकडच्या आंबा प्रक्रिया उद्योगाचे हे सर्वसाधारण चित्र आहे. हा प्रक्रिया उद्योग साधारण मेच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होतो, पण यंदा त्याला कदाचित एखादा आठवडा उशिरा सुरू होण्याची शक्यता सुनील देशपांडे व्यक्त करतात. आज आंब्याचे उत्पादन कमी झालेले असल्यामुळे एकूणच आंबा महागला आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला मिळणारा आंबादेखील महागेल की काय अशी शंका सध्या अनेक उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र त्यावर आत्ताच भाष्य करता येणार नाही असे सुनील देशपांडे सांगतात. द्वारका फूड्स देवगड यांची आंबा उत्पादने आहेत व त्यांचा स्वत:चा आंबा प्रक्रिया उद्योगदेखील आहे. त्यांना साधारणपणे शंभर- सव्वाशे टन आंब्याची गरज असते. ‘द्वारका’चे पुष्कर पारकर सांगतात की, यंदा आंबा कमी असल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही प्रमाणात मंदीचे सावट आहे असे म्हणता येईल. त्यातच मागील वर्षीदेखील दर चढेच होते त्यामुळे त्या उत्पादनांच्या किमतीवर व विक्रीवरदेखील परिणाम झाला आहे. यंदाचे चित्र आठवडाभरात स्पष्ट होऊ शकेल. सौरभ केळकरदेखील आंब्याच्या कमतरतेमुळे पुरवठा कमी झाल्यास खर्च वाढण्याची शक्यता वर्तवत आहेत.

याचसंदर्भात कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे सांगतात की, या वर्षी एकूणच आंबा उत्पादनात घट झाली आहे. एप्रिल महिन्यात रत्नागिरीतून सुमारे लाखभर पेटय़ा जातात, ते प्रमाण जवळपास निम्म्यावर आले आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला आंबा मिळण्यावरदेखील मर्यादा येतील. कदाचित कर्नाटकातील आंबा बाजारात आल्यावर चित्र आणखीन स्पष्ट होईल.

थोडक्यात यंदाच्या वर्षी आंब्याची मुख्य बाजारपेठच आवक घटल्याने मंदीच्या सावटाखाली आली आहे. त्याचा फटका पाच हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या प्रक्रिया उद्योगाली बसण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे.

भविष्यात केवळ हापूसवरील प्रक्रियेला बाजारपेठ

आंब्यावर प्रक्रिया करून तयार केलेला पल्प किंवा अन्य उत्पादने बहुतांशी महागडी असतात. अशा वेळी मुळातच महाग असणाऱ्या हापूस आंब्यावर प्रक्रिया करून त्याचा पल्प आणखीन महाग विकणे व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारे नाही.  पण नुकतेच हापूसचे भौगोलिक निर्देशन (जीआय – जिऑग्राफिकल इंडिकेशन) हे कोकण असल्याचे कंट्रोलर जनरल ऑफ पेटंटच्या कार्यालयाने तत्त्वत: मान्य केले आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या हापूस आंब्याला हापूस हे नाव वापरता येणार नाही. त्या अनुषंगाने कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रते सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे सांगतात, ‘‘जीआयमुळे हापूसची वेगळी ओळख प्रस्थापित होईल. त्यामुळे केवळ हापूसवर प्रक्रिया करून उत्पादनं तयार केली आणि ती महाग असली तरी जीआयमुळे लॉिबग, ब्रॅिण्डग असे आधुनिक मार्केटिंगचे पर्याय वापरून वेगळ्या पद्धतीने बाजारपेठेत स्थान मिळवता येईल. परदेशी बाजारपेठांमध्ये अशा मानांकनांबात ग्राहक चोखंदळ असतो. किंबहुना जागतिक बाजारपेठेतील व्यवसायाची गणितं अशा मानांकनावरच अवलंबून असतात. त्यामुळे जीआयचा फायदा हापूसच्या प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठेत मिळू शकेल. सध्या भारतीय ग्राहकांमध्ये याबाबत विशेष जागरूकता नसली तरी भविष्यात ती होण्याची शक्यता आहे.’’

First Published on April 27, 2018 1:03 am

Web Title: recession in mango process business