21 February 2019

News Flash

कोल्हापुरी खरेदीचा थाट!

वेगाने बदलत असलेल्या कोल्हापूरकरांची रुची लक्षात घेऊन इथे मॉल्सची संख्या वर्षांगणिक वाढतेय.

कोल्हापुरातही फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे, बॅग्स यांची दुकानं आढळून येतील.

कोल्हापूर आणि तिथल्या चपला हे समीकरण सर्वश्रुत आहे. बदलत्या काळानुसार कोल्हापुरातही फॅशनेबल, ब्रॅण्डेड कपडे, बॅग्स यांची दुकानं आढळून येतील. आता तिथेही खरेदीची विविध ठिकाणं म्हणजे तरुणाईसाठी पर्वणीच झाली आहे.

एक हौस पुरवा महाराज, मला आणा कोल्हापुरी साज’ अशा शब्दांत कोल्हापूरच्या दागिन्यांच्या आवडीचे फर्मास वर्णन चित्रगीतांमध्ये आल्याचे आणि त्याची मोहिनी तमाम मराठी महिलांना पडत असल्याचे आपण वर्षांनुवष्रे पाहात आहोत. अशा या करवीरनगरीत खरेदी करावे असे आणखी काही आहे का बरे, असा प्रश्न स्वाभाविकच उद्भवतो. त्यातही हल्लीची खरेदी म्हणजे चार पसे जादा मोजायची तयारी आणि चार हात राखून करायची अशा दोन्ही सदरातली. म्हणजे, पदरी भरपूर पसे असतील तर मनसोक्त खरेदी करायची किंवा मग खिसा चाचपडतच परवडणाऱ्या वस्तू घ्यायच्या. कोल्हापुरात अशा कमी, स्वस्त, परवडणाऱ्या किमतीतल्या पण बदलत्या फॅशनप्रमाणे लेटेस्ट असणाऱ्या वस्तूंच्या खरेदीची सोय अनेक ठिकाणी आहे. तरुणाईला नित्यनव्याने साद घालणारे कपडे, त्यांना मॅच होणारे आणि खास कोल्हापुरी टच असलेल्या चप्पल, खांदाहाताला सवय लाभलेल्या सॅक, बॅग यांच्या खरेदीची काही विशेष दुकानं, ठिकाणं कोल्हापुरात आहेत. इथे गेलात की तुमच्या बजेटनुसार हव्या असणाऱ्या वस्तू निश्चितपणे मिळणार. चला तर करू या, करवीर नगरीतील खरेदीची सर!

lp25वेगाने बदलत असलेल्या कोल्हापूरकरांची रुची लक्षात घेऊन इथे मॉल्सची संख्या वर्षांगणिक वाढतेय. बॅ्रण्डेड कपडय़ांची दुकानं, फॅशनेबल कपडे, वस्त्रप्रावरणांनी ओसंडून वाहताहेत. केवळ एकाच बॅ्रण्डची आणि सर्व ब्रॅण्ड एकाच छताखाली अशी दोन्ही प्रकारची सोय इथे आहे. इथल्या किमती ब्रॅण्डच्या दर्जानुसार चढय़ा असणार, यात दुमत असण्याचं कारण नाही. मग बजेटनुसार खरेदीचं काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा अनेक चांगले पर्यायही हमखास उपलब्ध आहेत.

करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले की समोर येतो तो महाद्वार रोड. इथे प्रत्येक शनिवारी भरणारा कपडय़ांचा बाजार म्हणजे खरेदीदारांची पर्वणी. माफक किमतीत कपडे मिळत असल्याने गरीब, मध्यमवर्गीयांची पावले या बाजाराकडे वळतात. ताराबाई रोडवरही स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे कपडे मिळतात. स्वस्ताईच्या खरेदीसाठी येथे जत्रा लोटलेली असते. कोल्हापूरच्या पूर्वेकडे असणारे गांधीनगर ही स्वस्त कपडय़ांसाठी प्रसिद्ध असणारी बाजारपेठ. शहराबाहेर असणाऱ्या या गावात टॅक्सेसचे प्रमाण नगण्य. शिवाय, मोठी खरेदी केल्याने व्यापाऱ्यांना माल स्वस्तात मिळतो. साहजिकच, ग्राहकांनाही त्यांच्या खिशाला परवडणारे फॅशनेबल कपडेही स्वस्तात मिळत असल्याने ही बाजारपेठ ग्राहकांनी बारमाही फुललेली असते. नवजात बाळापासून ते वृद्धांपर्यंतची नानारंगी कपडे खरेदी करण्यासाठी इथे अनेक दुकाने उभी आहेत. पूर्वी कोल्हापुरात कल्याणकर, कोरडे, चंद्रलोक, वालावलकर, गवळी अशा काही दुकानांत लग्नाचा जथ्था काढण्यासाठी जत्रेसारखी गर्दी लोटलेली असायची. आता यातील अनेकांनी स्वस्तातील गांधीनगरचा मार्ग धरलाय.

ब्रॅण्डेड कपडय़ांची जादू तरुणाईवर पसरलीय. अर्थात यासाठी जादा पसे मोजायची तयारी हवी. मग स्वस्त पण ब्रॅण्डेड कपडे मिळवायचे कसे? यावर उपाय म्हणजे सेल. काही विशिष्ट हॉल, हॉटेल्समध्ये ३० ते ७० टक्के सवलत देणारे सेल नेहमी सुरू असतात. पावसाळ्यात अनेक कंपन्या निम्म्या किमतीत विक्री करण्याचे ठरवतात. तेव्हा तिथे स्वताईकडे नजर लावलेला ग्राहक दिसतो. ‘द लूट’सारख्या दुकानात ब्रॅण्डेड कपडे निम्म्याहून कमी किमतीत बारमाही मिळतात.

कोल्हापुरात पोहोचलात आणि इथली चप्पल खरेदी केली नाही, असे सहसा घडत नाही. शिवाजी चौकातील चप्पल लेनमध्ये कोल्हापुरी चप्पल विक्रीची दुकाने सलगपणे उभी आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार पायताण, कापशी, पेपर कापशी, कचकडी, पुकरी, कुरुंदवाडी, शाहू, फॅशनेबल चप्पल इथे मिळतात. त्यातही रंगाचेही वैविध्य. फिका, गडद, तपकिरी, काळा, पिवळा, लाल, गुलाबी, चंदेरी असा चपलांचा रंगारंग मामला. खेरीज नवयुग, अलंकार, आदर्श, मॉडर्न अशा दुकानांमध्ये स्वस्त दरात दर्जेदार चपला मिळतात. सेनापती कापशी, गडिहग्लज, कुरुंदवाड अशा काही गावांमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार चप्पल शिवून मिळते. यासाठी किंमतही मोजून घेणारे कारागीर आहेत. बऱ्यापकी कोल्हापुरी चप्पल घेण्यासाठी चारपाचशे रुपये खर्चावे लागतील. पाच हजार रुपयांचे जोडही आता उपलब्ध आहेत. मर्दानी रुबाब वाढवणारी कोल्हापुरी चप्पल जगभर विकण्यासाठी इथले पारंपरिक विक्रेते सज्ज बनलेत. याच वेळी हलक्या चपला विकून खिसे भरणाऱ्यांकडून होणाऱ्या कोल्हापुरी चप्पलच्या विक्रीपासून सावध राहण्याचा इशाराही द्यावासा वाटतो.

कुटुंबातील कोणीही व्यक्ती असूदे घराचा उंबरठा ओलांडला की त्याच्या खांद्याहातात वाहून नेणारी एखादी वस्तू असतेच. व्यवसायक्षेत्रागणिक तिचे स्वरूप बदलते. नोकरदार बॅगला पसंती देतात. तर शालेय विद्यार्थ्यांपासून ते उच्चशिक्षित विद्याíथनींचे सॅकशिवाय पानही हलत नाही. गृहिणींच्या हाती पर्स असणारच. कोल्हापुरात कलापि हे पहिले डिपार्टमेंटल स्टोअर्स पाठोपाठ रुपम, लकी स्टोअर्स, अनुबंधन, प्रवाशी, सागर बॅग्ज, लकी बाजार अशी अनेक दुकाने थाटली गेली. मेट्रो शहरात अवतरलेली बॅगसॅकची फॅशन अल्पावधीतच इथे पोहोचते. पाठोपाठ ग्राहकांची तद्नुसार मागणी सुरू होते. टीव्हीवर आवडत्या स्टारने केलेली जाहिरात पाहून ग्राहक मॉलमध्ये पोहोचतो. पण त्याच्या किमती ऐकून वातानुकूलित स्टोअरमध्येही त्याला घाम फुटतो. मग तो वळतो बजेटनुसार मिळणाऱ्या दुकानात. ग्राहकांच्या या अनुभवाविषयी रुपमचे दर्शन गोडलिया यांनी सांगितले की, आम्हाला बॅ्रण्डेड आणि बजेट अशा दोन्ही प्रकारच्या बॅग, सॅक, पर्स ठेवाव्या लागतात. ३०० ते ६०० रुपये या परवडणाऱ्या किमतीत चांगल्या सॅक उपलब्ध आहेत. काळ्यातपकिरी रंगाला तरुणांची पसंती असते. खेरीज निऑन कलर (हिरवा, केशरी, निळा) यामध्येही त्यांची रुची आहे. कॉलेजला जाणाऱ्या तरुणींकडे गॉस बॅग, नॉर्मल बॅग, कॉलेज गोईंग सॅक याला पसंती देतात. तर महिलांना पर्सची आवड असते. ग्राहकांना आम्ही फॅशनपेक्षा वस्तू किती टिकाऊ असते हे पटवून देतो. हुशार ग्राहकाला तो सल्ला मानवतो. कमी किमतीत चांगली वस्तू ग्राहकाला दिल्याचे समाधानही आम्हाला लाभते.

First Published on October 23, 2015 1:49 am

Web Title: shopping places in kolhapur