14 December 2017

News Flash

आपल्या हातात फक्त निवडीचं स्वातंत्र्य

इंग्रजांपासून आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे नेमकं काय मिळवलं ते आपल्याला कळलं पाहिजे.

श्रीधर तिळवे | Updated: August 11, 2017 10:04 PM

श्रीधर तिळवे

भारतीय अवकाशात जेव्हा सिंधू संस्कृती अवतरली तेव्हा तिने आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना दिल्या. त्यातली पहिली संकल्पना म्हणजे पाश. जो पाशाने बद्ध असतो तो पशू ही आपली सर्वात प्राचीन व व्याख्या आहे आणि पाशाने बद्ध होऊन केलेली कृती ती पाशवी कृती आणि आपण सर्वच जण, म्हणजे माणूसही हे पशू आहोत आणि पाशाने बद्ध आहोत आणि या पशूंचा पती तो पशुपती. पशुपती ही शैवांची सर्वात मूलभूत संकल्पना शिवाच्या संदर्भात येते. शिव हाच पशुपती. तो पाशातून सोडवतो. पाशातून सुटका झाल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते ती मुक्ती. म्हणजे पाश आणि मुक्ती यातून आपली वाटचाल सुरू होते. यात चार गोष्टी येतात. एक असते ती बद्धता. भारतीय शैव परंपरा असं सांगते की, तुम्ही जन्मता तेव्हा तुम्ही बद्धच असता. तुम्ही तुमच्या कुटुंबामुळे बद्ध झालेले असता, तुम्ही तुमच्या राष्ट्रामुळे बद्ध झालेले असता. तुमचा जन्मसुद्धा गर्भाशय नावाच्या बद्धतेमधूनच झालेला असतो आणि ही बद्धता नसेल तर तुमचं संरक्षण होणं अशक्य आहे. त्यामुळे ही बद्धता विशेषत: तुमच्या सुरुवातीच्या अवस्थेत आवश्यक आहे. गर्भाशयातील मुलाला असंच सोडलं तर ते जगूच शकणार नाही. त्याची विशिष्ट वाढ व्हावी लागते. त्यामुळे गर्भाशय नावाची बद्धता आवश्यक आहे. त्याशिवाय पुढचं निर्माणच व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यानंतर शैव दर्शन नियती सांगतं. नियतीची भारतीयांची संकल्पना अतिशय वेगळी आहे. नियती म्हणजे नियत मर्यादा. स्वत:बरोबरच तुम्ही या मर्यादा घेऊन येता. आजच्या परिभाषेत ज्याला आपण जेनेटिक मर्यादा म्हणतो, त्या जेनेटिक मर्यादा ही तुमची नियती असते. म्हणजे उदाहरणार्थ डायबेटिस हा अनेकदा आनुवंशिक असतो. तुम्हाला तो झाला तर तुमची ती नियती म्हणून तुम्हाला ती स्वीकारावी लागते. शैव सांगतात, की बद्धता ही नियती आहे. यानंतर त्यांचा विचार स्वातंत्र्याच्या अंगाने सुरू होतो. शैव दर्शन असं सांगतं की, तुम्ही बद्ध असलात तरी तुम्हाला निवड करावी लागते. या निवडीचं तुम्हाला असलेलं स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचं आहे, किंबहुना तुम्ही जगात येता तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे दुसरंतिसरं काहीही नसून निवडीचंच स्वातंत्र्य असतं आणि म्हणून शैव सांगतात की, तुम्हाला पर्याय अधिक उपलब्ध होत असतील तर तुम्ही अधिक चांगली निवड करू शकता. म्हणजे जेवढे पर्याय अधिक तेवढं निवड करण्याचं स्वातंत्र्य अधिक. म्हणजे पर्यायांच्या उपलब्धतेवर तुमचं स्वातंत्र्याचं क्षितिज, स्वातंत्र्याच्या मर्यादा हे सगळं ठरत असतं आणि म्हणूनच शैवांनी नेहमीच वर्णव्यवस्थेला आणि जातिव्यवस्थेला विरोध केला आहे, कारण या व्यवस्था तुम्हाला पर्यायच उपलब्ध करून देत नाहीत.

अशा अनेक व्यवस्था ज्या तुमच्याभोवती असतात, त्या तुम्हाला पर्याय देतात का, असा प्रश्न शैव उपस्थित करतात आणि सरकारचं जे काम आहे, त्याबद्दल शैव असं सांगतात की, जेवढे म्हणून पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देता येतील नागरिकांसाठी तेवढे उपलब्ध करून द्या. त्याऐवजी तुम्ही सरकार म्हणून फक्त नियम लागू करत बसाल तर तुमचं सरकार टिकणार नाही, असं शैव सांगतात. शैवांचं जे अर्थशास्त्र आहे, त्यात वारंवार सरकारला असं सांगण्यात आलं आहे की, कर प्रचंड वाढवू नका, तर व्यापार वाढवा. हे विशेषत: आजच्या सरकारला कुणी तरी सांगणं जास्त गरजेचं आहे. जितका राजाचा व्यापार अधिक तितके त्याला उत्पन्नाचे स्रोत अधिक, तितकं त्याला उत्पन्न अधिक म्हणून उत्पन्न वाढवण्यासाठी कर वाढवू नकोस, तर व्यापार वाढव. कर पाच टक्केच ठेव, पण व्यापार मात्र प्रचंड वाढव. हे स्वातंत्र्याचं, आर्थिक स्वातंत्र्याचं आपल्या भारतीय संकल्पनेचं फळ आहे. म्हणून तर भारतात मौर्याच्या किंवा गुप्तांच्या राजवटीत प्रचंड व्यापार होत होता. जिला आपण सोन्याची चिडिया म्हणतो ती इथे निर्माण झाली होती. इथे याचा उल्लेख करण्याचं कारण असं की, स्वातंत्र्याची मर्यादा आजच्या काळात राज्य ठरवत असतं. हा अधिकार राज्याने अत्यंत विवेकाने वापरला पाहिजे. नागरिकांना एखादं राज्य जेवढं अधिकाधिक स्वातंत्र्य देईल, जेवढे अधिकाधिक विकसित होण्याचे पर्याय उपलब्ध करून देईल तितकं ते राज्य स्वातंत्र्याच्या बाजूने उभं आहे, असं म्हटलं जाईल. हे सरकार पर्यायच उपलब्ध करून देत नसेल, पर्यायांच्या उपलब्धतेवर मर्यादा असतील तर निवडीचं स्वातंत्र्य गुदमरून जातं आणि स्वातंत्र्य हा शब्द पोकळ बनत जातो. उदा. लिखाणाच्या संदर्भात जर लेखन करण्याचं स्वातंत्र्यच दिलं नाही आणि त्याचबरोबर लेखकाला जे काही विविध पर्याय आहेत, ते वापरण्याची परवानगीच मिळणार नसेल, तर तुमची कला बहरणार नाही, असं शैव सांगतात. म्हणून नागरिकांवर आणि राज्यकर्त्यांवर अशा दोघांवरही जबाबदाऱ्या आहेत.

अधिकाधिक पर्यायांची उपलब्धता मिळवणे आणि अचूक निवड करणे, ही जशी नागरिकांची जबाबदारी आहे, तसंच इतरांना उपलब्ध असणारे पर्याय आपल्यामुळे नष्ट होणार नाहीत ना, याची काळजी घेणं हेही नागरिकांचंच कर्तव्य आहे. नाही तर मग आपलं स्वातंत्र्य साजरं करायचं आणि इतरांना मात्र ते घेऊच द्यायचं नाही अशी दुतोंडी भूमिका चालणारी नाही. स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य अशी कल्पना शैवांमध्ये नाहीच. शैव कायमच सांगतात की, स्वातंत्र्याच्या पुढे मुक्ती आहे. त्यामुळे तुम्ही या जगात जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त स्वातंत्र्याचा पुरस्कार करू शकता; पण तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं की, त्याचा अर्थ तुम्हाला मुक्ती मिळेलच असं नाही. मुक्ती ही स्वातंत्र्याच्या पुढची मोठी अवस्था आहे; पण तुम्ही जेव्हा या जगात जगत असता तेव्हा मुक्तीसाठीसुद्धा स्वातंत्र्य आवश्यक आहे. प्रत्येकाचा मार्ग खुला असेल, प्रत्येकाला स्वत:चा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य असेल तर अधिकाधिक व्यक्ती मुक्त होतील. त्यामुळे मुक्ती शक्य आहे ती स्वातंत्र्य असलेल्या देशातच. त्यामुळे शैव असं मानतात की, तुम्ही एका बाजूला पाशबद्ध आहात. तुमच्याभोवती प्रश्नांचे, वासनांचे असे अनेक प्रकारचे पाश आहेत. दुसरीकडे मुक्ती आहे. या जगात जगत असतानाची जी अवस्था आहे, तिला आवश्यक असणारी, सर्वाचे भरणपोषण करणारी जी प्रक्रिया आहे ती स्वातंत्र्याची प्रक्रिया आहे आणि हे स्वातंत्र्य एकमेकांना देऊनच साजरं होऊ शकतं. म्हणजे आपण एकमेकांना स्वातंत्र्यच देणार नसू तर सगळेच पारतंत्र्यात जातील. हे बेसिक प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिन साजरा होऊ शकतो. मात्र स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती नव्हे हे मात्र ठळकपणे लक्षात घेतलं पाहिजे.

इंग्रजांपासून आपण स्वातंत्र्य मिळवलं म्हणजे नेमकं काय मिळवलं ते आपल्याला कळलं पाहिजे. इंग्रजांमुळे आपली बद्धता गेली. आपली नियतीसुद्धा इंग्रज ठरवत होते. इंग्रजांनी आपल्या सगळ्या निवडी अत्यंत मर्यादित करून ठेवल्या होत्या. त्या मर्यादित केलेल्या निवडी आपण स्वत:ला प्रचंड प्रमाणात उपलब्ध करून घेतल्या. म्हणून तो स्वातंत्र्य दिन आहे. त्यांनी आपल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा सगळ्या निवडी मर्यादित करून टाकल्या होत्या आणि त्या निवडण्याचं स्वातंत्र्य आपण एका अर्थाने मिळवलं. तर १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो तेव्हा आपण नेमकं काय करतो हे जर प्रत्येकाने नीट लक्षात घेतलं तर सगळ्यांसाठी बरं होईल.

शैव परंपरा ही भारतीय परंपरा आहे आणि तिचा विचार पुरेशा प्रमाणात भारतीय घटनेत झालेला नाही, हे खरं आहे; किंबहुना आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं, पण इंग्रजांच्या विचारांपासून स्वातंत्र्य मिळवूच शकलो नाही. त्यामुळे आपली राज्यघटना ही पुरेशा प्रमाणात दार्शनिक नाही आणि त्याचे अनेक विपरीत परिणाम झालेले दिसतातही; पण याचा अर्थ असा नाही की, आपण आता त्या चुका दुरुस्त करू नयेत. घटनेनं आपल्याला चुका दुरुस्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलंच आहे. त्यामुळे जी काही चौकट निर्माण झाली, तिच्यातलं भारतीयत्व कमी असलं तरी ते पूर्णपणे नाहीसं झालेलं नाही. भारतीयत्वाची जाणीव काही प्रमाणात त्या सगळ्याच घटनाकारांना होती; परंतु ती प्रामुख्याने इंग्रजांच्या शिक्षणावर पोसली गेलेली असल्यामुळे वैचारिक स्वातंत्र्य मर्यादित झालं. तर याचा विचार आता आपण केला पाहिजे की आपलं वैचारिक स्वातंत्र्य पुरेसं आहे का, आपण ते खरोखर मिळवलेलं आहे का आणि आपल्याकडे अनेक पाश अत्यंत वाईट प्रथांच्या आधारे निर्माण झाले ते पाश आपण खरोखर फेकून दिले का? आपल्याकडे अनेकदा स्वातंत्र्य चळवळ लढवताना त्या काळात आपल्याला ब्रिटिशांच्या पाशापासून मुक्त व्हायला पाहिजे अशी भाषा होती. ब्रिटिश राजवटीचे पाश तोडून टाकण्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहोत, असं सांगितलं जायचं; पण त्यांचे सगळेच पाश आपल्याला उडवून लावता आले का? तर नाही. त्यांच्यापासून काही चांगल्या गोष्टी आल्या नाहीत का? तर आल्या. उदा. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आलं; पण त्याची परंपरा भारतात अजिबात नव्हती असं काही नाही, किंबहुना शैवांमध्ये तंत्रज्ञान हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, किंबहुना तंत्र मानणारा हा एकमेव धर्म आहे. दुर्दैवाने त्या शब्दाला अत्यंत घाणेरडे अर्थ प्राप्त होत गेले; पण तंत्र हा शब्द मुळात शैवांचाच आहे. तंत्राला त्यांच्यात प्रचंड महत्त्व दिलं गेलं आहे. तर विज्ञान हवं आणि तंत्रज्ञानपण हवं. गमतीची गोष्ट अशी की, शैवांनुसार प्रत्यक्ष प्रमाणच महत्त्वाचं. बाकीच्या प्रमाणांना ते फारसं महत्त्व देत नाहीत. हे अनेकांना माहीत नाही आणि प्रत्यक्ष प्रमाण मानणारं काय आहे तर विज्ञान. त्यामुळे विज्ञानाला शैवांची पूर्ण मान्यता आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जे काही आधुनिकतेचं देणं आहे ते आपण व्यवस्थित स्वीकारलं पाहिजे. त्याबद्दल मनात काही शंका असू नयेत. या संदर्भात आपल्या राज्यघटनेनं फार चांगलं काम केलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाला आपण अध्यात्माची जोड दिली तर आपली प्रचलित भारतीय ओळखही चांगल्या प्रकारे टिकू शकतो. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की, आपली जगात आध्यात्मिक ओळख आहे, धार्मिक नाही. त्याबाबतीत आपण धार्मिक हा चुकीचा शब्द वापरतो. भारतीय अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची योग्य ती सांगड घालून आपण आपल्या देशाची पुनर्रचना करू शकतो.

श्रीधर तिळवे

(शब्दांकन : वैशाली चिटणीस)

First Published on August 11, 2017 10:04 pm

Web Title: shridhar tilve special article on independence day 2017