विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

आकाशातील ग्रह-तारे मानवावर कितपत परिणाम करतात हा वादाचा विषय ठरू शकतो. पण त्यांच्याविषयीच्या संशोधनाने मात्र मानवी जीवन नक्कीच सुकर केले आहे. लॅपटॉपपासून वायरलेस हेडफोनपर्यंत, बुटापासून, चष्म्यापर्यंत आणि हार्टरेट मॉनिटरपासून कृत्रिम दातांपर्यंत सर्वत्र अंतराळ विज्ञान आहे. देशापुढील समस्या सोडवण्याऐवजी चांद्रमोहिमांसाठी एवढा खर्च का, हे विचारण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या आयुष्याला व्यापून उरलेल्या अवकाशात डोकावायला हवं.

चांद्रयान-२ साठी ९७८ कोटी रुपये एवढा अवाढव्य खर्च झाला! भारतासारख्या विकसनशील देशासमोर अनेक मूलभूत प्रश्न आ वासून उभे असताना चांद्रमोहिमेसाठी एवढा खर्च ओढावून घेणे कितपत व्यवहार्य आहे? याचा सर्वसामान्य भारतीयाला काय फायदा? असे प्रश्न पडणे अतिशय स्वाभाविक आहे. पण अंतराळाचा वेध घेणाऱ्या, विश्वाच्या भूत-भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या, सामान्यांच्या आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या या भव्यदिव्य मोहिमा कळत-नकळत तुम्हा आम्हालाही बरेच काही देऊन जातात. ही देणगी म्हणजे ‘स्पिन ऑफ टेक्नॉलॉजी’!

अवकाशात पाठवले जाणारे प्रत्येक उपकरण अतिशय सक्षम, वजनाला हलके आणि अचूक असणे अत्यावश्यक असते. दुरुस्ती हा पर्याय तिथे जवळपास नसतोच. भारताकडे तरी अद्याप मानवाला

अवकाशात पाठवण्याचे तंत्रज्ञान नाही आणि ज्या देशांकडे आहे, त्यांच्यासाठीही ते अतिशय खर्चीक ठरते. त्यामुळे अवकाशात पाठवला जाणारा प्रत्येक घटक अत्युच्च दर्जाचाच असावा लागतो.

तसा तो विकसित करण्यासाठी वर्षांनुवर्षे संशोधन केले जाते.

हे संशोधन अवकाश मोहिमांसाठी केले जात असले, तरी ते केवळ तेवढय़ापुरतेच सीमित राहात नाही. त्यात थोडाफार बदल करून अन्यही अनेक क्षेत्रांत त्याचा वापर केला जातो. आरोग्य, उद्योग, वाहतूक, संरक्षण, पर्यावरण, शेती, संगणक तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत त्याचे उपयोजन केले जाते.

भारतासारख्या विकसनशील देशांत जिथे अंतराळ संशोधनासाठी खूप मोठय़ा प्रमाणात अर्थसाहाय्य मिळवणे शक्य नसते, तिथे तर काही वेळा तंत्रज्ञान विकसित करण्यापूर्वीच त्याच्या अन्य उपयोगांचा अंदाज घेतला जातो आणि फायदेशीर ठरत असेल, तरच उत्पादन सुरू केले जाते. ‘नासा’, ‘इस्रो’, ‘युरोपीयन स्पेस एजन्सी’ तसेच अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील अन्य संस्थांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आज सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात पदोपदी उपयोगात येताना दिसते.

मोबाइल फोनमधील कॅमेरा

दुर्बिणी आणि कॅमेऱ्याचा वापर करून ग्रह-ताऱ्यांच्या प्रतिमा टिपण्यासाठी नासाने १९६०मध्ये डिजिटल छायाचित्रण तंत्र विकसित केले. पुढे याच तंत्राच्या साहाय्याने अवकाश यानांत वापरण्याच्या दृष्टीने अतिशय लहान आकाराच्या आणि कमी वजनाच्या कॅमेऱ्यांची निर्मिती करण्यात आली. याच तंत्राच्या आधारे नंतर मोबाइल फोनमध्ये कॅमेरा उपलब्ध करून देणे शक्य झाले.

कृत्रिम पाय

इस्रोच्या रॉकेटमध्ये वापरण्यासाठी अतिशय हलके, मजबूत, टिकाऊ  आणि आतील उपकरणांना सुरक्षित ठेवू शकणारे पॉलियुरेथन तयार करण्यात आले होते. पुढे त्याचा वापर कृत्रिम पायांच्या निर्मितीसाठी करण्यात आला. ‘जयपूर फूट’चा हा आधुनिक अवतार होता. पॉलियुरेथनमुळे अवघ्या ५०० ग्रॅम वजनाचा, नैसर्गिक पायाप्रमाणेच दिसणारा, आरामदायी आणि न घसरणारा पाय उपलब्ध झाला. थिरुवनंतपुरम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर जगभरातील २७ देशांत अपंगांना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याचे कार्य करणाऱ्या ‘भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती’ला २००२मध्ये हे तंत्रज्ञान मोफत देण्यात आले.

अग्निशमन

उपग्रहांचे प्रक्षेपण करताना आग लागल्यास तिची तीव्रता मोठी असते. ती विझवण्यासाठी ‘इस्रो’ने अतिशय उत्तम दर्जाच्या दोन पावडरी तयार केल्या होत्या. त्यातील एक पावडर ज्वलनशील द्रवांमुळे किंवा वायूंमुळे लागलेली आग विझवण्यासाठी आणि दुसरी धातूंना लागलेली आग विझवण्यासाठी वापरली जात असे. या दोन्ही पावडरी आज सरकारी अग्निशमन दलांत आणि औद्योगिक क्षेत्रांत सर्रास वापरल्या जातात.

हॉर्ट रेट मॉनिटर

अंतराळात मानवी हृदयावर काय परिणाम होतात, याचा अभ्यास करण्यासाठी आणि अंतराळवीरांच्या हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्र तयार करण्यात आले होते. सध्याचे हार्ट रेट मॉनिटर हे त्या यंत्रांतच काही बदल करून विकसित करण्यात आले आहेत. खेळाडूंच्या आणि व्यायाम करणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी ते वापरले जातात.

दंतचिकित्सा

दंतचिकित्सेत पडलेल्या दाताची जागा भरून काढण्यासाठी पूर्वी सोने किंव तत्सम मौल्यवान धातू वापरले जात. त्यासाठी किंमतही मोठी मोजावी लागत असे आणि अन्य दातांपेक्षा हा नवा दात वेगळा दिसे. ‘इस्रो’च्या लाँच व्हेइकल्ससाठी विकसित करण्यात आलेला अ‍ॅक्रामिड हा घटक दंतचिकित्सेसाठी वरदान ठरला. हलका, दीर्घकाळ टिकणारा आणि दातांच्या रंगाशी साधम्र्य असलेला हा कृत्रिम दात अतिशय कमी किमतीत उपलब्ध झाला.

उष्णता रोधक कापड

लाँच वेहिकल्सच्या टोकावरील आवरण म्हणून वापरण्यात येणारे आणि १६५० अंश सेल्शियस एवढय़ा उच्च तापमानाला वितळणारे कापड आज विविध उद्योगांत वापरले जाते. ‘इस्रो’ने १९८३मध्ये ‘इस्रोसिल’ या नावाने हे कापड उपलब्ध करून दिले. आज विविध उद्योगांतील उपकरणांचे, वाहिन्यांचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी याच कापडाचे आवरण वापरले जाते.

इन्फ्रारेड इयर थर्मोमीटर

दूरवरच्या ग्रह-ताऱ्यांचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड तंत्र वापरले जात असे. आज याच तंत्राचा वापर करून इन्फ्रारेड इयर थर्मोमीटर तयार करण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून रुग्णाचा ताप क्षणात मोजता येतो. लहान मुले फार काळ स्थिर बसत नाहीत. त्यामुळे साध्या थर्मोमीटरने त्यांचा ताप मोजणे कठीण जाते. त्यामुळे बालकांचा ताप मोजण्यासाठी हे थर्मोमीटर अतिशय उपयुक्त ठरते.

बालकांचे खाद्य

अंतराळवीरांसाठी पोषक पदार्थ विकसित करण्यासाठी काही प्रयोग करण्यात आले. त्याच प्रयोगांच्या आधारे पुढे बालकांसाठी खाद्य तयार केले गेले. आज ते खाद्य सर्वत्र वापरले जात आहे.

आपत्ती सूचक यंत्रणा

इस्रोने विकसित केलेली आपत्ती सूचक यंत्रणा भविष्यात आपत्तीविषयक माहिती बहुसंख्य लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचवण्यासाठी वापरली जाऊ  शकते. आपत्तीची माहिती मिळवण्यासाठी विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या यंत्रांकडून मिळालेल्या सूचना एका केंद्रात गोळा करून धोक्याचा इशारा अनेकांपर्यंत पोहोचवता येईल.

भूकंपरोधक तंत्र

अनेक नाजूक उपकरणे अवकाशात सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी प्रक्षेपकांवर असते. मात्र प्रक्षेपक एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना आणि पृथ्वी ते अवकाशापर्यंतच्या प्रवासादरम्यान त्यात मोठय़ा प्रमाणात कंपने निर्माण होतात. हादरे बसतात. या सर्व प्रक्रियेत आतील उपकरणे सुरक्षित ठेवण्यासाठी व्हायब्रेशन आयसोलेशन सिस्टिम हे तंत्र विकसित करण्यात आले. तेच तंत्र आता भूकंपप्रवण क्षेत्रांत इमारती बांधण्यासाठी वापरले जाते.

डॉप्लर वेदर रडार

इस्रोने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या बळावर डॉप्लर वेदर रडार तयार करण्यात आले आहे. हवामानाचा अचूक वेध घेणारे हे रडार नैसर्गिक आपत्तीचा इशारा वेळेआधीच देते. त्यामुळे जीवितहानी रोखणे शक्य होते.

जलस्रेत शोधक उपकरणे

अंतराळात ग्रहाच्या गर्भात दडलेल्या विविध खनिजांचा शोध घेण्यासाठी जे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते, ते आज भूगर्भातील पाण्याच्या साठय़ांचा शोध घेण्यासाठी वापरले जाते.

वायरलेस हेडफोन

नील आर्मस्ट्राँग यांना चंद्रावर गेल्यावर पृथ्वीवरील ‘नासा’च्या केंद्रातील शास्त्रज्ञांशी संवाद साधता यावा, यासाठी वायरलेस हेडफोनची निर्मिती करण्यात आली. त्यातूनच पुढे तंत्रज्ञानाचा विकास होत जाऊन आपण वायरलेस हेडफोन, ब्लू टूथ आणि इतर वायरलेस उपकरणांपर्यंत पोहोचलो.

चष्म्याच्या काचा

पूर्वी चष्म्याच्या भिंगांवर अल्पावधीत ओरखडे उठत आणि मग स्पष्ट दिसण्यात अडथळे येत. आज मात्र ती दीर्घकाळ टिकतात. कारण या काचांवर एका विशिष्ट द्रव्याचा थर दिलेला असतो. काचांना ओरखडय़ांपासून सुरक्षित ठेवणारा हा थर ‘नासा’ने विकसित केला होता. अंतराळात विविध प्रकारचा कचरा तरंगत असतो. त्याचे संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांशी घर्षण होऊ शकते. अशा वेळी उपकरणांच्या काचांवर ओरखडे उमटू नयेत म्हणून हा थर दिला जात असे. पुढे तेच द्रव्य चष्म्याच्या काचांसाठी वापरले जाऊ  लागले.

लॅपटॉप

कुठेही सोबत नेण्याजोगा लहान आकाराचा आणि कमी वजनाचा संगणक सर्वप्रथम अंतराळातील प्रवासासाठी तयार करण्यात आला. आज आपण जो लॅपटॉप वापरतो तो या संशोधनातूनच पुढे आला.

वेलक्रो

आज बॅगा, पडद्यांचे, बूट अशा विविध वस्तूंमध्ये वापरले जाणारे वेलक्रो ही अंतराळ संशोधनाचीच देणगी आहे. अंतराळवीरांना विविध उपकरणे वापरावी लागतात. ती मोकळी राहिल्यास निर्वात पोकळीत कुठेही तरंगत राहतात. त्यामुळे अंतराळवीरांना इजा होण्याची भीती असते. ही उपकरणे अंतराळवीरांच्या पोषाखावरच चिकटवून ठेवणे गरजेचे होते. टेपने चिकटवण्याचा पर्याय होता. मात्र, त्यामुळे उपकरण चिकट होत असे. त्यातून मार्ग काढताना वेलक्रोचा शोध लागला आणि पुढे ते सर्वत्र वापरले जाऊ लागले.

पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनर

कोणत्याही ग्रहावरील धूळ आणि दगडांच्या अभ्यासातून तिथे उपलब्ध असलेल्या विविध घटकांची माहिती मिळते. चांद्रमोहिमेत ही दगड-माती खेचून आणू शकतील अशा पोर्टेबल उपकरणांची आवश्यकता होती. एका खासगी कंपनीकडून ती तयार करून घेण्यात आली होती. पुढे तेच तंत्र पोर्टेबल व्हॅक्युम क्लिनरसाठी वापरण्यात आले.

सौर ऊर्जा

जैविक इंधने जड असतात आणि काही काळाने संपतात. त्यामुळे अवकाशात त्यांच्यावर अवलंबून राहणे शक्य नसते. त्यामुळे अवकाशातच ऊर्जा निर्माण करू शकेल, असा पर्याय शोधणे अपरिहार्य होते. या शोधातून सौर पॅनल तयार करण्यात आली. आज पृथ्वीवरही स्वच्छ तसेच अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हणून या पर्यायाकडे पाहिले जात आहे.

मेमरी फोम

अंतराळ प्रवासादरम्यान पायलट आणि अंतराळवीरांना हादरे बसू नयेत आणि त्यांचा प्रवास आरामदायी ठरावा म्हणून त्यांच्या आसनांना कुशन लावणे आवश्यक होते. त्यासाठी मेमरी फोम विकसित करण्यात आला. आज सोफा, बूट, गाद्या सर्वत्र हा फोम उपस्थित असतो.

तंत्रज्ञान हस्तांतराची प्रक्रिया

हे झाले स्पिनऑफमुळे आपल्या आयुष्यात आलेल्या विविध वस्तूंविषयी; पण हे सगळे घडते कसे? अंतराळ संशोधन संस्था कोणते तंत्र विकसित करत आहेत, त्यातले आपल्या फायद्याचे काय हे इतर उद्योगांना कसे कळते? इतर उद्योगांच्या आणि आपल्या सामाईक गरजा काय आहेत, याचा शोध अंतराळ संशोधन संस्था कसा घेतात हे जाणून घेणेही गरजेचे आहे.

‘इस्रो’ने एखादे तंत्र विकसित केले आणि त्याची उपयुक्तता सिद्ध केली, की ते तंत्र औद्योगिक क्षेत्रासाठी खुले केले जाते. मग उद्योजक त्यात गुंतवणूक करतात आणि संबंधित तंत्रावर आधारित उपकरणांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती करतात. ही उपकरणे ‘इस्रो’कडून खरेदी केली जातील असा करार होतो. त्यामुळे उत्पादन सुरू करण्यापूर्वीच कंपनीला एक प्राथमिक ग्राहक मिळालेला असतो. या पद्धतीला ‘बाय बॅक’ म्हणतात. ही उपकरणे अन्य खासगी अंतराळ मोहिमांसाठीही उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग अन्य कोणत्या ग्राहकांसाठी करता येईल, याचा अंदाजही उद्योगांना घेता येतो. ‘इस्रो’ने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता केवळ अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रापुरतीच मर्यादित नसते. अन्यही अनेक क्षेत्रांत आणि सर्वाधिक प्रमाणात आरोग्याच्या क्षेत्रात या तंत्रांचा उपयोग करता येतो. ‘इस्रो’ आपल्याकडील तंत्रज्ञान या अन्य क्षेत्रांसाठीही खुले करते. अर्थात अन्य क्षेत्रांत त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यासाठी त्यात अनेक बदल करावे लागतात.

‘इस्रो’चे जे तंत्रज्ञान पुढे अंतराळ संशोधनाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांत मोठय़ा प्रमाणात वापरले जाते त्याची माहिती ‘इस्रो’कडून वेळोवेळी जाहीर केली जाते. अंतराळ संशोधनासाठी एवढा खर्च का केला जातो, या प्रश्नाचे उत्तर सामान्यांना मिळावे आणि सरकारनेही संशोधनाच्या क्षेत्रासाठी अधिकाधिक आर्थिक साहाय्य करावे हा त्यामागचा उद्देश असतो.

तंत्रज्ञान हस्तांतरासाठी कंपनी

‘इस्रो’ने विकसित केलेले तंत्रज्ञान आजवर थेट ‘इस्रो’मार्फतच अन्य उद्योगांकडे हस्तांतरित केले जात असे. मात्र आता त्यासाठी अंतराळ विभागाअंतर्गत नवीन कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. ही बंगलोरस्थित कंपनी ‘इस्रो’ आणि औद्योगिक क्षेत्रातील दुवा म्हणून कार्य करेल. ‘इस्रो’चे तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्राला उपलब्ध करून देण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करेल, अशी घोषणा ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी फेब्रुवारीमध्ये केली होती.

अन्य देशांतील प्रयत्न

‘युरोपीयन स्पेस एजन्सी’ने (ईएसए) अशा प्रकारच्या तंत्रज्ञान हस्तांतरासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. हा विभाग बाजारात कोणत्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाची गरज आहे, मागणी आहे, याचा शोध घेत असतो. ईएसएने विकसित केलेली तंत्रे औद्योगिक क्षेत्राच्या कोणत्या गरजा भागवू शकतात हे पाहून ती संबंधित उद्योगांना उपलब्ध करून दिली जातात. हे व्यवहार घडवून आणण्याचे काम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या सल्लागार कंपन्या करतात.

‘नासा’च्या अवकाश संशोधनातून अनेक स्पिन ऑफ टेक्नॉलाजी पुढे आल्या आहेत. त्यांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी म्हणून ‘नासा’ने स्वतंत्र यू टय़ुब चॅनलच तयार केले आहे. त्यावर दरवर्षी वापरात आलेल्या स्पिन ऑफची माहिती उपलब्ध आहे. ‘अपोलो ११’च्या चांद्रवारीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘नासा’ने त्या मोहिमेमुळे सर्वसामान्यांच्या उपयोगात आलेली विविध तंत्रे आणि उपकरणांविषयी एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.

‘अंतराळात वापरली जाणारी उपकरणे कमी वजनाची आणि तरीही टिकाऊ असतात. या क्षेत्रात उपयोगात येणारे तंत्रज्ञानही अतिशय अचूक असते. त्यामुळे त्यातून पुढे आलेली उपकरणे अतिशय उत्तम दर्जाची असतात. आपल्या दैनंदिन वापरातील अनेक उपकरणे अंतराळाच्या अभ्यासातूनच पुढे आली आहेत,’ असे आयआयटी मुंबईतील सहाय्यक प्राध्यापक वरुण भालेराव सांगतात.

चांद्रयान-२ मोहिमेत सर्वसामान्यांसाठी आणि उद्योगांसह अन्यही विविध क्षेत्रांसाठी काय दडले आहे, हे येत्या काही वर्षांत स्पष्ट होईल. अंतराळ संशोधन हे कोणा एका राष्ट्राच्या, समूहाच्या नव्हे तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावे, हे सर्वच देशांनी तत्त्वत मान्य केले आहे. स्पिन ऑफ हा त्याचा त्वरित दिसणारा परिणाम आहे. कोटय़वधी मैलांवरील ग्रहताऱ्यांचा वेध घेता घेता तो दैनंदिन जीवन निर्वेध करून जातो.