lp17पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. विविध दत्तक्षेत्रांची परिक्रमा करताना विभिन्न प्रकारच्या पादुकांचे आपल्याला दर्शन होते. श्रीदत्त संप्रदायाचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये उपासना पद्धती अत्यंत सोपी आणि सहज केली आहे. खरं तर ईश्वराचे मूळ रूप निर्गुण निराकार असे आहे. त्याला कोणताही रंग, रूप, आकार नाही. मात्र ते तसे समजून घेणे अतिशय अवघड आहे. म्हणून त्याचे सोपे रूप किंवा त्याच्याकडे जाण्याचे पहिले पाऊल म्हणून सगुण उपासना सांगितली जाते. सगुण उपासनेमध्ये आपण त्या भगवंताची मूर्ती रूपाने, विविध देवतांच्या रूपाने आणि प्रतीकांच्या रूपाने पूजा करतो. आता भगवंताची मूर्ती आली म्हणजे त्याचे शास्त्र आले. त्याची पूजा, नेवैद्य, उपचार हे सर्व नियम पाळणे हे आवश्यक ठरते. श्रीदत्त संप्रदायामध्ये पादुका पूजन ही अतिशय सोपी पद्धती रूढ झाली आहे. मूर्तीरुप सगुण पूजेबरोबरच पादुकापूजन ही सगुण पूजेची एक अतिशय सोपी आणि सुलभ पद्धत दत्तसंप्रदायामध्ये दिसून येते. प्रत्येक श्रीदत्त क्षेत्री पादुका असल्याचे आपल्याला दिसते. काही ठिकाणी तर फक्त पादुकाच आहेत. कालांतराने तेथे काही मुखवटे आणि मूर्ती बसविण्यात आल्या. मधल्या मुसलमानी राजवटीमध्ये मूर्तीभंजन जोरात सुरू असताना त्यातूनही ही पादुकापूजनाची पद्धत सुरू झाली असावी, अशीही शक्यता आहे. या पादुकांचेही निरीक्षण केले तर त्यांचे वैविध्य लक्षात येते. काही ठिकाणी पादुका चल आहेत. तर काही ठिकाणी अचल आहेत. काही ठिकाणी पादुका मानवी पायांच्या आकाराच्या आहेत तर काही ठिकाणी वेगळ्याच आकाराच्या आहेत. त्यांना विशिष्ट असा पादुकांसारखा कोणताही आकार नाही. जणूकाही या पादुकाही आपल्या निर्गुण तत्त्वाचा उपदेश करीत आहेत आणि निर्गुणाकडे घेऊन जात आहेत असे दिसून येते.
विविध श्रीदत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुकांचे आपल्याला दर्शन होते.
१.    श्री विमल पादुका    – औंदुंबर
२.     श्री मनोहर पादुका    – नृसिंहवाडी
३.     श्री निर्गुण पादुका    – कारंजा
४.     श्री निर्गुण पादुका    – गाणगापूर
५.     श्री निर्गुण पादुका    – लातुर
६.     श्रीपाद श्रीवल्लभ पादुका    – कुरवपूर
७.     श्री करुणा पादुका    – कडगंची
८.     श्रीस्वामी समर्थ पादुका    – अक्कलकोट
९.     श्रीपाद श्रीवल्लभ पादुका    – पीठापूर
१०.     श्रीदत्त पादुका     – गिरनार
११.     श्रीशेषदत्त पादुका     – बसवकल्याण
१२.     अवधूत पादुका     – बाळेकुंद्री
१३.     प्रसाद पादुका     – वासुदेव निवास
याचबरोबर श्रीशंकर महाराज, श्रीचिले महाराज, प.पू. टेंबेस्वामी महाराज, पंतमहाराज, चिदंबर दीक्षित महाराज, माणिकप्रभू महाराज, श्रीधर स्वामी महाराज इ. महाराजांच्या पादुकांचेही आपल्याला दर्शन होते. याचबरोबर श्रीदत्त क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण धार्मिक परंपरा आपल्याला आढळून येतात. त्यामागचा विचार लक्षात घेतली असता आपले मन प्रसन्न होते आणि त्यामागची उदात्त आणि त्यागाची भावना पाहिली की आपण हरखून जातो.
या धार्मिक परंपरांची आता आपण माहिती करून घेऊ या.
माधुकरी मागणे – गाणगापूर येथे रोज दुपारी बारा वाजता श्रीदत्तात्रेय माधुकरी मागण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. याचबरोवर ते भक्तांना प्रसाद देतात अशा विश्वास आहे. गाणगापूर येथे गेल्यावर मध्यान्हकाळी म्हणजे दुपारच्या सुमारास माधुकरी मागण्याची पद्धत आहे. किमान पाच घरी तरी माधुकरी मागायची असते. मंदिराजवळ आपल्याला द्रोण मिळतात. ते घेऊन पाच घरी माधुकरी मागायला जायचे असते. तसेच शक्य असल्यास आपणही माधुकरी देण्याची व्यवस्था करावी. हा एक उत्कट अनुभव असून त्या माधुकरी प्रसादाचा स्वाद वेगळा असतो.
पालखी घेणे (शिबिकोत्सव): श्रीदत्त तीर्थस्थानी अनेक ठिकाणी पालखी उत्सव असतो. रोज सायंकाळी किंवा गुरुवार अशा विशिष्ट दिवशी पालखी फिरवतात. मूर्ती किंवा पादुका यांना पालखीमध्ये घालून मिरवत प्रदक्षिणा घालतात. काही ठिकाणी या पालखी अंगावरही घेता येतात. हाही एक आनंददायी अनुभव असतो. यालाच शिबिकोत्सव असेही म्हणतात.
गुरुचरित्र पारायण :- श्रीदत्त क्षेत्री गुरुचरित्र पारायण केले जाते. हे पारायण तीन दिवसांचे किंवा सात दिवसांचे केले जाते. पारायणासाठी राहण्याची आणि प्रसाद भोजनाची व्यवस्था केली जाते.
अभिषेक, सत्यदत्तपूजा, दत्तयाग,  इ. श्रीदत्त ठिकाणी विविध प्रकारचे नैमित्तिक उपक्रम सुरू असतात. दैनंदिन पूजा, काकड आरती, अभिषेक, सत्यदत्तपूजा, दत्तयाग,  प्रदक्षिणा, संगम स्नान इ. अनेक उपक्रम सुरू असतात. त्यामध्येही भाविकांना सहभागी होता येते.
नदीपूजन – श्रीदत्त क्षेत्री विविध नद्यांचे पूजन करण्याची पद्धत आहे. फूल, हळद-कुंकू, अक्षता वाहून नदीचे पूजन करणे, नदीची ओटी भरणे अशा प्रकारे नदीपूजन करता येते. याचबरोबर नदीमध्ये मनोभावे दिवे सोडले जातात. नदीतील पाण्यांच्या लहरीवर असे दिवे तरंगत जातानाचे दृष्य अत्यंत मनोहारी असते.
कन्यापूजन : नर्मदामाता ही कुमारी आहे अशी श्रद्धा आहे. यामुळे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर कन्यापूजन केले जाते. हे कन्यापूजन करताना परिसरातील आठ वर्षांखालील मुली, बालवाडी, पहिली, दुसरीच्या मुलींना बोलवून त्यांचे पूजन केले जाते. त्यांना हळद-कुंकू लावून त्या वयोगटातील मुलींना आवडणाऱ्या आणि उपयुक्त वस्तू भेट दिल्या जातात. उदा. रिबिनी, कंगवा, खेळणी, पाटी, रुमाल, टॉवेल, वह्य, पेन, खाद्यपदार्थ इ. त्यांना वस्तू देताना एकसमान दिल्या जातात. त्यांनी नाराज होऊ नये याची काळजी घेतली जाते. याचबरोबर त्यांना गोडधोड करून पोटभर जेवण दिले जाते. कन्यापूजन हा एक आगळावेगळा आनंददायी सोहळा आहे. कन्यापूजनावेळी त्या मुलींच्या डोळ्यांतील भाव, कुतूहल आणि उत्साह डोळे दिपणारा असतो.
सदावर्त / अन्नदान – श्रीदत्त क्षेत्रांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी सदावर्त चालते. तेथे अन्नदान, प्रसाद वितरण केले जाते. आपल्यालाही त्यामध्ये सहभागी होता येते. तेथे अन्नदानासाठी धान्य, साहित्य आणि रोख रकमेचे साहाय्य देता येऊ शकते.
कढाई करणे – श्रीदत्त क्षेत्री अनेक ठिकाणी आणि विशेषत: नर्मदा किनारी कढाई करणे ही पद्धत रुढ आहे. परिक्रमेसाठी भ्रमण करीत असताना अनेक परिक्रमार्थी विविध तीर्थक्षेत्री मुक्कामाला येऊन राहिलेले असतात. त्यांचेसाठी शिरा करून प्रसाद देणे याला कढाई करणे असे म्हणतात. शिऱ्याऐवजी इतर गोड पदार्थ आणि भोजन देणे असेही याचे स्वरुप असते. या परंपरामध्ये आपण मनापासून सहभागी झालो तर आपल्यालाही वेगळा अनुभव निश्चित मिळतो.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले