16 December 2017

News Flash

सज्ज झाली स्टेडियम्स…

एके काळी फुटबॉलमध्ये भारताचा दबदबा होता.

मिलिंद ढमढेरे | Updated: September 22, 2017 1:04 AM

आपल्या देशात होऊ घातलेल्या फुटबॉलच्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक सामन्यांसाठी नवी दिल्ली, नवी मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, गोवा आणि कोचीमधली स्टेडियम्स सज्ज झाली आहेत.

फुटबॉलची जागतिक स्तरावरील स्पर्धा भारतात कधी आयोजित केली जाईल असे स्वप्नही कोणी पाहिले नसेल. तथापि यंदा सतरा वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याची संधी भारताला मिळाली आहे. हे सामने ऑक्टोबर महिन्यात नवी दिल्ली, नवी मुंबई, कोलकाता, गुवाहाटी, गोवा व कोचीमध्ये होणार आहेत. हे सामने कनिष्ठ गटाचे असले तरीही भावी काळातील रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्यासारखे खेळाडू याच खेळाडूंमधून घडणार आहेत. त्यामुळेच या स्पर्धेस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एके काळी फुटबॉलमध्ये भारताचा दबदबा होता. भारताने १९५६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेतील फुटबॉलमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास अपेक्षेइतके यश मिळत नसले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने यशस्वीरीत्या आयोजित करण्याबाबत भारताची ख्याती आहे. त्यामुळेच भारताला कनिष्ठ विश्वचषकाची संधी लाभली. ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली तर भविष्यात वरिष्ठ विश्वचषक स्पर्धाही आयोजित करण्याची संधी भारताला मिळण्याची शक्यता आहे.

फुटबॉलची मक्का- कोलकाता

कोलकाता म्हणजे फुटबॉलचा श्वास आहे असे म्हटले जाते. तेथील लोकांमध्ये सतत फुटबॉलचीच चर्चा असते. फुटबॉलची मक्का मानल्या गेलेल्या या शहरास या स्पर्धेचा अंतिम सामना आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. त्याखेरीज अन्य साखळी सामनेही येथे होणार आहेत. या सामन्यांसाठी सॉल्ट लेक स्टेडियम सज्ज झाले आहे. विवेकानंद युवा भारती क्रीडांगण म्हणून त्याची ओळख आहे. प्रेक्षकांच्या क्षमतेबाबत हे जगातील द्वितीय क्रमांकाचे व आपल्या देशातील अव्वल क्रमांकाचे स्टेडियम आहे. एक लाख २० हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. या स्टेडियमच्या सर्व गॅलऱ्या आच्छादित केल्या असल्यामुळे चाहत्यांना अतिशय आरामशीर व आल्हाददायक वातावरणात येथील सामने पाहण्याचा आनंद घेता येतो. १९९७ मध्ये फेडरेशन चषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत ईस्ट बंगाल व मोहन बागान या दोन्ही स्थानिक संघांमध्ये लढत झाली होती. ही लढत पाहण्यासाठी एक लाख ३१ हजार प्रेक्षक उपस्थित होते. हा या स्टेडियमवरील आजपर्यंतचा उच्चांक आहे. यावरून येथे फुटबॉलचे किती प्रेम आहे याची कल्पना येऊ शकते. १९८४ मध्ये हे स्टेडियम येथे बांधण्यात आले. २०११ मध्ये या स्टेडियमचे नूतनीकरण झाले. त्यानंतर यंदा विश्वचषकासाठी या स्टेडियममध्ये पुन्हा काही बदल करण्यात आले आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकरिता वातानुकूलित कक्ष व आरामव्यवस्था, दोन इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड्स, पत्रकार परिषदांकरिता विशेष कक्ष, समालोचन व थेट प्रक्षेपणाकरिता विशेष खोल्या, प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यांसाठी व्यासपीठे आदी अनेक सुविधा तेथे निर्माण करण्यात आल्या आहेत.

स्टेडियमला सहा प्रवेशद्वारे असून त्यापैकी एक प्रवेशद्वार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. स्टेडियमवर भरपूर प्रकाश मिळेल अशी विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्यास सामन्यात कोणताही विलंब न होता सामना सुरू राहील अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला येथे कृत्रिम गवत बसविण्यात आले होते, मात्र विश्वचषकासाठी नैसर्गिक गवताच्या मैदानास प्राधान्य देण्यात आले आहे.

या स्टेडियममुळे येथील चाहत्यांना लिओनेल मेस्सी, बेबेटो, ऑलिव्हर कान, बेटो आदी अनेक कीर्तिमान खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी लाभली आहे. दिएगो मॅराडोना यांनीही येथील चाहत्यांविषयी नेहमंीच कौतुकास्पद उद्गार काढले आहेत. अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा घेण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक बसविण्यात आला आहे. त्यामुळेच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्पर्धाबरोबरच आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईचा नजराणा- पाटील स्टेडियम

मुंबईत ब्रेबॉर्न व वानखेडे ही दोन्ही क्रिकेटकरिता बलाढय़ स्टेडियम्स असली तरीही अनेक वेळा ही स्टेडियम्सही क्रिकेटकरिता अपुरी पडतात. त्यातही उपनगरांत राहणाऱ्यांना तेथे जाण्यासाठी येणारी समस्या लक्षात घेऊन नवी मुंबईतील नेरुळ येथे डी.वाय.पाटील विद्यापीठ परिसरात २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्टेडियम बांधण्यात आले. क्रिकेट व फुटबॉल या खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने घेण्याची संधी तेथे उपलब्ध झाली. या स्टेडियमच्या आवारातच ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, नऊ टेनिस कोर्ट्स, चार बॅडिमटन कोर्ट्स आदी सुविधाही असल्यामुळे खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण क्रीडा संकुलाचा आनंद तेथे मिळू शकतो.

मुंबई फुटबॉल क्लबचे हे घरचे मैदान असल्यामुळे येथे अखिल भारतीय स्तरावरील अनेक व्यावसायिक सामने झाले आहेत. या स्टेडियमवर इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेचाही अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. स्टेडियमच्या सर्व गॅलऱ्या पूर्णपणे आच्छादित असल्यामुळे व खांबांचा अडथळा नसल्यामुळे प्रेक्षकांना सामन्यांचा अव्याहतपणे आनंद घेता येतो. सामन्यातील विविध क्षणांचा पुनर्प्रक्षेपणाद्वारे लाभ घेण्यासाठी तेथे दोन भव्य पडदे बसविण्यात आले आहेत. प्रेक्षकांच्या गॅलरीत अनेक ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे स्टेडियममधील प्रत्येक प्रेक्षकाची हालचाल बारकाईने पाहण्याची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. साहजिकच सुरक्षा व्यवस्थापकांना त्याद्वारे योग्य नियंत्रण करता येते.

या स्टेडियममधील मैदानाकरिता दक्षिण आफ्रिकेहून दोनशे टन माती आयात करण्यात आली होती. पावसामुळे हे मैदान चिकट किंवा घसरडे होऊ नये या दृष्टीने तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोठा भूकंप झाला तरी स्टेडियमचे काहीही नुकसान होणार नाही अशी तेथे व्यवस्था आहे. अखंड विद्युतप्रकाशात सामने आयोजित करण्यासाठी सर्व सुविधा तेथे आहेत. त्यामुळे विद्युतप्रकाशात हे स्टेडियम खूपच सुंदर दिसते.

गुवाहाटी स्टेडियम

फुटबॉल, बॉक्सिंग, ज्युदो आदी अनेक क्रीडाप्रकारांचे विपुल नैपुण्य पूर्वाचलातील राज्यांमध्ये आहे. या राज्यांमधील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने पाहण्याची संधी मिळावी व अनुभव घेता यावा या दृष्टीने गुवाहाटी येथे अव्वल दर्जाचे इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक्स स्टेडियम बांधण्यात आले. २००७ मध्ये तेथे ३३ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. साधारणपणे ३५ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी तेथे व्यवस्था आहे.

भारत व मलेशिया यांच्यात येथे २०११ मध्ये प्रदर्शनीय फुटबॉलचा सामना घेण्यात आला होता. २०१५ मध्ये नेपाळबरोबरचा विश्वचषक पात्रता फेरीचा सामनाही तेथे घेण्यात आला होता. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धाचेही तेथे गतवर्षी आयोजन करण्यात आले होते. फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्सबरोबरच अन्य काही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्याची तेथे सुविधा आहे. इंडियन सुपरलीगसाठी नव्याने स्थापन केलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबसाठी हे घरचे मैदान आहे. साहजिकच तेथे आयएसएलचेही काही सामने झाले आहेत. आसामबरोबरच अन्य पूर्वाचल राज्यांमधील अनेक खेळाडूंसाठी येथे सराव शिबिरेही आयोजित केली जातात. नवी दिल्ली किंवा कोलकाता येथे येण्याऐवजी गुवाहाटी हे या खेळाडूंसाठी अत्यंत सोयीचे क्रीडा केंद्र झाले आहे.

केरळचे वैशिष्टय़पूर्ण स्टेडियम

केरळमध्ये क्रिकेट, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स आदी खेळांची भरपूर लोकप्रियता आहे. या प्रदेशातील चाहत्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची सुविधा मिळावी या दृष्टीनेच कलूर (कोची ) येथे जागतिक दर्जाचे स्टेडियम बांधण्यात आले आहे. १९९६ मध्ये फुटबॉलकरिता हे स्टेडियम तयार झाले. जगातील अनेक मोठय़ा स्टेडियममध्ये त्याची गणना केली जाते. साधारणपणे पाऊण लाख प्रेक्षक बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. त्यामुळेच की काय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंचांना या प्रेक्षकांच्या आवाजाचा अनेक वेळा त्रास होतो व प्रेक्षकांना शांत बसण्याचे आवाहन करावे लागते.

फुटबॉलबरोबरच येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही आयोजित करण्यात आले आहेत. १९९८ मध्ये येथे ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामना झाला होता. २००५ मध्ये येथे भारत व पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला होता. या सामन्यांसह आतापर्यंत क्रिकेटचे अनेक अव्वल दर्जाचे सामने येथे झाले आहेत आणि प्रत्येक वेळी सामने हाऊसफुल ठरले आहेत. आयपीएलमधील कोची टस्कर्सचे हे घरचे मैदान होते. सचिन तेंडुलकरविषयी येथे कमालीचा आदर असून स्टेडियमच्या एका गॅलरीस त्याचे नावही देण्यात आले आहे.

फुटबॉलच्या व्यावसायिक लीग सामन्यांकरिता साधारणपणे सरासरी ४० हजार प्रेक्षकांची उपस्थिती असते. चिराग युनायटेड व केरळा ब्लास्टर्स या संघांकरिता हे घरचे मैदान आहे. केरळा ब्लास्टर्समध्ये सचिनची भागीदारी असल्यामुळे येथील व्यावसायिक लीग सामन्यांना त्याची उपस्थिती असते व त्याच्या चाहत्यांसाठी ही उपस्थिती प्रेरणादायकच असते. इंडियन सुपरलीगमधील उद्घाटनाचा सामना येथेच आयोजित करण्यात आला होता.

राजधानीचे स्टेडियम

भारतात प्रथमच कनिष्ठ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होत असल्यामुळे यजमान देशाचे सामने राजधानीतच आयोजित केले जावेत असा आग्रह झाल्यामुळे भारताचे सर्व साखळी सामने मुंबईतील पाटील स्टेडियमऐवजी नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नेहरू स्टेडियमवर १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १९८९ मध्ये तेथे आशियाई मैदानी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याकरिता या स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. या स्पर्धेचे ते मुख्य केंद्र असल्यामुळे या स्टेडियमला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्या वेळी घाईघाईने या स्टेडियमचे बांधकाम करण्यात आल्यामुळे काही प्रमाणात खेळाडू, संघटक व प्रेक्षकांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले होते.

अ‍ॅथलेटिक्स, क्रिकेट, फुटबॉलसहित अनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा तेथे आयोजित करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर अनेक नामवंत गायक व वादकांचेही तेथे कार्यक्रम झाले आहेत. खऱ्या अर्थाने विविधता लाभलेल्या या स्टेडियमवर पाऊण लाख प्रेक्षक बसू शकतील एवढी व्यवस्था आहे. अर्थात फुटबॉलसाठी हे स्टेडियम नेहमीच सोयीस्कर ठरले आहे. येथे दक्षिण आशियाई फुटबॉल अिजक्यपद स्पर्धा घेण्यात आली आहे. जर्मनीच्या बेयर्न म्युनिच क्लब व भारतीय संघ यांच्यात येथे प्रदर्शनीय सामनाही घेण्यात आला होता. २०१४ पासून दिल्ली डायनामोज फुटबॉल क्लबसाठी हे घरचे मैदान झाले आहे.

प्रामुख्याने राष्ट्रकुल स्पर्धासाठी हे स्टेडियम आहे. साहजिकच परदेशातील अतिशय ख्यातनाम तंत्रज्ञांची मदत येथील सर्व सुविधांसाठी घेण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित कक्ष व आरामव्यवस्था,  इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड्स, पत्रकार परिषदांकरिता विशेष कक्ष, समालोचन व थेट प्रक्षेपणाकरिता विशेष खोल्या, खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांयुक्त व्यायामशाळा, प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यांसाठी व्यासपीठे आदी अनेक सुविधा तेथे निर्माण करण्यात आल्या आहेत. या स्टेडियमचे आच्छादनही लंडन येथील ऑलिम्पिक स्टेडियमसारखे असल्यामुळे प्रेक्षकांना निधरेकपणे विविध स्पर्धाचा आनंद घेता येतो.

गोव्याचे वैशिष्टय़पूर्ण क्रीडा संकुल

गोवा व फुटबॉल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे नेहमी म्हटले जाते. जागतिक स्तरावरील ख्यातनाम पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यातील लोकांचे जीवन फुटबॉलखेरीज परिपूर्ण होत नाही. मडगाव येथे असलेल्या फाटरेडा स्टेडियमला नेहरू स्टेडियमही म्हटले जाते. गोवा हे छोटे राज्य असले तरी चर्चिल ब्रदर्स, साळगांवकर स्पोर्ट्स क्लब, गोवा स्पोर्टिग क्लब, डेम्पो क्लब या चारही क्लबची केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता आहे.

या स्टेडियमवर क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करण्यात आले आहेत. तरीही येथील फुटबॉलची लोकप्रियता कमी झालेली नाही. जेव्हा भारतात कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित झाले तेव्हाच येथील स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने होणार हे अधोरेखित होते. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता जेमतेम २० हजार असली तरीही येथे खेळाडू व अन्य चाहत्यांनी फुटबॉलबरोबरच पर्यटनाचाही आनंद घ्यावा अशीच अपेक्षा आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित कक्ष व आरामव्यवस्था, इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्ड्स, पत्रकार परिषदांकरिता विशेष कक्ष, समालोचन व थेट प्रक्षेपणाकरिता विशेष खोल्या, खेळाडूंसाठी आधुनिक सुविधांयुक्त व्यायामशाळा, प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यांसाठी व्यासपीठे आदी अनेक सुविधा तेथे निर्माण करण्यात आल्या आहेत. येथे उत्तेजक प्रतिबंधक चाचणीचीही सुविधा बसविण्यात आली आहे. खेळाडू व प्रेक्षकांसाठीही वैद्यकीय मदत केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. पूर्णपणे आच्छादित गॅलऱ्या व आरामदायक आसनव्यवस्था यामुळे प्रेक्षकांना येथे मनमोकळेपणाने सामने पाहता येतात.

विश्वचषक स्पर्धेनिमित्त ही सर्व केंद्रे फुटबॉल चाहत्यांसाठी महोत्सवाची केंद्रे असणार आहेत. तेथील सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या जगातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंचे कौशल्य पाहताना भारताच्या नव्या फुटबॉल पिढीने त्यांच्याकडून काही मौलिक टिप्स मिळविल्या पाहिजेत तरच ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश सफल होईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com 

First Published on September 22, 2017 1:04 am

Web Title: stadiums are ready for under seventeen football match