16 February 2019

News Flash

वाढत्या उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..

मुलांना बंद तसंच पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये. ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.

प्रतिनिधिक छायाचित्र

उन्हाळा म्हणजे आंबे, सुट्टय़ा, थंड हवेच्या ठिकाणांना भेटी.. याबरोबरच उन्हाळा म्हणजे भयंकर उष्मा. त्यामुळे होणारा त्रास. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी काही टिप्स-

उन्हाळा म्हणजे..आंबे, पन्हे, आंब्याची वाटली डाळ. गावात ठिकठिकाणी उभारलेली रसवंतीगृहे. वाटसरूंना रांजणातील गार पिण्याचे पाणी मोफत पुरवणारी सेवाभावी संस्थांची पाणपोई. हायवेकडेला लक्ष वेधून घेणारे किलगडाचे ढीग. शीतपेयांच्या खास उन्हाळी जाहिराती.

उन्हाळा म्हणजे..  नो शाळा, नो अभ्यास, नो होमवर्क म्हणजे मुलांची मज्जा. (आईबाप मात्र आपल्या  मुलांना कुठल्या छंद वर्गात घालावे या विवंचनेत) उन्हाळा म्हणजे.. हिलस्टेशनची कौटुंबिक सहल. आजोळी किंवा गावी आंबे खायला जाणं. उन्हाळ्यात कुठेही न जाणारी मंडळी वाळ्याचे पडदे, कुलरची थंडगार हवा, आमरसाचे आकंठ जेवण आणि दुपारची निवांत वामकुक्षी असे संन्यस्ताला संसाराचा मोह पडावा असे जगणे अनुभवत असतात.

उन्हाळ्याच्या बाबतीत वरील सगळ्या गोष्टी मनाला भावणाऱ्या असल्या तरीही उन्हाळा ऋतू म्हणून जरा त्रासदायकच आहे.

दाहक परी संजीवक असा लौकिक असलेल्या सूर्याचा पारा जेव्हा ४० चा आकडा ओलांडतो, तेव्हा मात्र ही दाहकता आरोग्यासाठी फारच तापदायक होऊ शकते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात सकाळचे जेमतेम १० वाजले की समस्त आया मदानात वा अंगणात खेळणाऱ्या आपल्या मुलांना ‘सावलीत खेळा रे’, ‘उन्हाचं जास्त वेळ बाहेर नका रे राहू’, ‘घरात खेळा नाहीतर ऊन लागेल’ अशी आर्जवं करीत असतात. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना टोपी घाल, रुमाल बांध अशी आठवण घरची मंडळी करीत असतात.

उन्हाळ्याच्या दिवसात अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, जळगाव, भुसावळ ही नावं सर्वाधिक तापमानाची नोंद या तप्तनाटय़ात आलटून पालटून मुख्य पात्राच्या भूमिकेत असतात. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर विक्रमी तापमानाची नोंद अशा बातम्यांबरोबरच उष्माघाताच्या बळींची बातमी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. वाळ्याचे पडदे लावून बसणाऱ्या किंवा एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नशीबवान माणसांची संख्या आपल्या देशात अगदीच नगण्य आहे. बहुसंख्य लोक तापमान ४० असो, नाहीतर ४८, त्या रणरणत्या उन्हात अविश्रांत काम करत असतात. उन्हाच्या झळा त्यांनाच जास्त जाणवतात. अर्थात उन्हात काम करणाऱ्या प्रत्येकाला उष्माघाताचा त्रास होत नाही, कारण बाहेरचे तापमान वाढले तरी शरीराचे अंतर्गत तापमान वाढू न देण्याची अप्रतिम यंत्रणा मानवी शरीरात आहे. शरीराचे तापमान एका डिग्रीने वाढले तरी ही वार्ता समजताच शरीरातील तापमान नियंत्रण कक्ष लगेच तापशमन यंत्रणा कार्यान्वित करतो. त्यायोगे नाडीचा वेग वाढतो. लहान रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्वचेचा रक्तप्रवाह वाढतो. स्वेदग्रंथी घाम वाढवतात आणि अनावश्यक उष्णता बाहेर फेकली जाते. तापमान नियंत्रणात घाम महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु दमट हवामानात वातावरणातील आद्र्रता जास्त असेल तर घामाचे बाष्पीभवन नीट होत नाही. कोरडय़ा हवामानात घाम चटकन वाळून जातो. दमट हवामानात मात्र घाम वाळत नाही. त्यामुळे घामाचा चिकचिकाट होतो. वातावरणातील आद्र्रता खूप जास्त असते तेव्हा घामाच्या धारा वाहू लागतात. अशा वेळी तासाभरात दोन लिटर घाम शरीराबाहेर पडू शकतो. शरीरातून पाणी आणि क्षार मोठय़ा प्रमाणात कमी झाल्यास ताप फार नसतो, पण थकवा जाणवायला लागतो. मन अस्वस्थ होतं. मळमळू लागतं. रक्तदाब कमी होतो. घेरी येते. अशा प्रकारे उष्म्यामुळे आपल्या शरीराची दमणूक होते.

उष्माघातामध्ये मात्र शरीराचे तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते. त्वचा शुष्क आणि तापलेली असते. रुग्णाला थकवा तसंच डोकेदुखीचा त्रास होतो. रुग्ण  बेशुद्ध होऊ शकतो. काही वेळा तापाबरोबर भ्रमिष्टावस्था निर्माण होते. उष्माघात हा अत्यंत गंभीर आजार आहे. त्यावर योग्य वेळी उपचार न मिळाल्यास शरीरातील अनेक अवयव निकामी होऊ लागतात आणि रुग्ण दगावतो. त्यामुळे उष्माघाताची शंका आली तरी त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा.

९ प्रतिबंधक उपाय

* शक्यतो उन्हाळ्यात दहा ते पाच या कालावधीत बाहेर जाणे टाळावे. बाहेर जाणे गरजेचे असल्यास हॅट, टोपी किंवा छत्री वापरा. पाण्याची बाटली जवळ ठेवा.

* पांढरे वा फिक्कट रंगाचे, ढगळ, सुती कपडे वापरा.

* दर अर्ध्या तासाला ग्लासभर/ भांडभर  पाणी प्या. (साधारण २५० ते ३०० मिली) तहान लागण्याची वाट पाहू नका.

* घाम खूप येत असल्यास पाणी भरपूर प्या. लिंबाचे सरबत प्या, रसाळ फळे खा.

* पाच वर्षांखालील तसंच ६५ वर्षांहून जास्त वयोगटातील व्यक्तींना आणि गरोदर स्त्रियांना या काळात जपले पाहिजे. त्यांना बाहेर नेणे टाळावे.

* मुलांना बंद तसंच पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये. ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.

* उन्हात काम करण्याची सवय नसल्यास प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी दररोज दोन-तीन तास असा सराव १०-१२ दिवस करावा.

* काम करताना दमल्यासारखं होत असल्यास, खूप तहान लागत असल्यास, विस्मरण होत असल्यास ताबडतोब सावलीत येऊन बसावे आणि सहकाऱ्याला आपल्याला होत असलेल्या त्रासाची जाणीव करून द्यावी.

* ताप असल्यास नळाच्या पाण्याने संपूर्ण शरीर पुन:पुन्हा पुसून घ्यावे. डोक्यावर फक्त गार पाण्याच्या पट्टय़ा ठेवून भागणार नाही.

* मला उन्हाची सवय आहे, मला काही त्रास होणार नाही, अशा वल्गना करणे टाळा. काळजी घ्या. फाजील आत्मविश्वास नको.

* शरीराला पाण्याची कमतरता पडू देऊ नका.  पाणी हे तापशमन यंत्रणेचे प्रभावी अस्र आहे.

* पाण्याला पर्याय म्हणून शीतपेये पिऊ नका.

* नियमित आंघोळ करा. शक्य असल्यास दिवसात दोन वेळा आंघोळ करा.

* आपल्याला उन्हाची झळ लागणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या.

डॉ. राजेंद्र आगरकर response.lokprabha@expressindia.com

First Published on March 23, 2018 1:55 am

Web Title: steps for healthy living in summer