25 April 2019

News Flash

अध्यादेश अंमलबजावणीतील उणिवा उघड; कोकणकडा सर्वांसाठीच धडा

बचावपथकांचे होणारे सामाजिक गौरव सोडल्यास सरकारदरबारी या सर्वच संस्था उपेक्षित असतात.

डोंगरभटक्यांच्या क्षेत्रात झालेल्या वाढीबरोबरच अपघात, असे अडकण्याच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत.

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2
रॅपलिंगदरम्यान कोकणकडय़ावर साहसी पर्यटक अडकले ही अलीकडच्या काळातली घटना साहसी पर्यटनासंदर्भातली आणि गिर्यारोहण क्षेत्रातील उणिवांची पुन्हा जाणीव करून देणारी ठरली आहे. आता तरी साहसी खेळांसंदर्भातील अध्यादेशाची अंमलबजावणी करणे सरकार मनावर घेईल का?

रविवार, २५ नोव्हेंबरला अनेक वृत्तवाहिन्यांवर ‘कोकणकडय़ावर ट्रेकर अडकले’ अशी ब्रेकिंग न्यूज झळकली. त्यानंतर फक्त गिर्यारोहणाच्याच क्षेत्रात नव्हे तर सर्वसामान्यांमध्येदेखील चच्रेला उधाण आले. हरिश्चंद्रगडावरून कोकणकडय़ाच्या माथ्यावर सहज जाता येते, तेथे अडकण्याचा संभव नसतो. त्यामुळे हे ट्रेकर नेमके कुठे अडकले हे समजण्यात बराच वेळ गेला. ट्रेकर कडय़ावर अडकले नव्हते तर ते रॅपलिंग करताना अध्र्या वाटेत अंधार झाल्यामुळे मध्येच अडकले होते, असे नंतर समजले. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत ते पायथ्याशी पोहोचले.

या घटनेमुळे डोंगरात भटकंती करताना होणारे अपघात, सुरक्षा आणि बचाव या चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा एकदा सुरू झाले. याला गुऱ्हाळच म्हणावे लागणार आहे. कारण गेल्या दहा वर्षांत अनेक कारणांमुळे डोंगरभटक्यांच्या क्षेत्रात झालेल्या वाढीबरोबरच अपघात, असे अडकण्याच्या घटना वारंवार होताना दिसत आहेत. असे काही घडले की चार दिवस त्यावर चर्वतिचर्वण केले जाते आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशीच परिस्थिती असते. २०१२ मध्ये डोंगरातील एका अपघाती मृत्यूनंतर दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे साहसी खेळांसाठी मार्गदर्शक तत्त्वांची आखणी करण्याचे आणखीन एक भिजत घोंगडे घातले गेले. ते आत्ताशी कुठे जरा आकार धरू पाहात आहे, तेव्हा कोकणकडय़ाची ही बातमी आली. पण या घटना वारंवार का होतात, त्यावर ठोस उपाय का सापडत नाही आणि त्यातून एकूणच गिर्यारोहण क्षेत्राची एक विचित्र अशी बाजू वारंवार का उघडी, पडते याचा कधी तरी विचार करावाच लागेल.

गिर्यारोहण हा प्रकार रुजून आता ६८ वष्रे झाली आहेत. तरीदेखील हास्यास्पद म्हणाव्या अशा चुकांचे हे प्रकार आजही सुरूच आहेत. त्यामुळेच गिर्यारोहण नेमके रुजले आहे का, असाच प्रश्न विचारावासा वाटतो. गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार म्हणून विकसित झाला तो युरोपात. एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर त्याचा भारतात विकास होत गेला. त्यातही महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत ते अधिक रुजले. महाराष्ट्रात गिर्यारोहणाचा प्रसार झाला तो मुख्यत: संस्थांच्या माध्यमातून. पण त्याच वेळी गिर्यारोहणातील पहिली पायरी असणारी डोंगरभटकंती (हाइकिंग आणि ट्रेकिंग) ही संस्थांच्या जोडीनेच, छोटय़ा छोटय़ा वैयक्तिक चमूंच्या माध्यमातूनदेखील येथे विकसित झाली. सह्यद्रीच्या डोंगररांगांमध्ये असणारे गडकिल्ले त्यासाठी पूरक ठरले. प्रस्तरारोहण आणि पर्वतारोहण या प्रकारात तर येथील संस्थांनी अनेक भीम पराक्रम केले आहेत.

गेल्या दोन दशकांत हाईकिंग, ट्रेकिंग यामध्ये नियमित डोंगरभटक्यांच्या आणि ठरावीक मोसमात डोंगरात जाणाऱ्या हौशी डोंगरभटक्यांची संख्या भरमसाट वाढत गेली. पाठोपाठ साहसी पर्यटन या संकल्पनेने जोर पकडला. चाकोरीतल्या पर्यटनापेक्षा दोन पैसे जास्त मोजून जरा वेगळा आनंद मिळवता येतो हे एका ठरावीक वर्गाच्या लक्षात येऊ लागले. त्यातूनच जागतिकीकरणानंतरच्या नव्या पिढीचा ओढा ठरावीक मोसमात आणि ठरावीक उपक्रमापुरताच वाढू लागला. त्यातच गिर्यारोहणाचे उप उपांग असणारे रॅपिलग आणि व्हॅली क्रॉसिंग हे पैसे मिळवून देणारे प्रकार ठरू लागले. मग या उपक्रमांचे इव्हेन्ट झाले. आणि त्याचा मग धडाकाच लागला. त्यातून पैसे कमवता येतात म्हटल्यावर यासोबतच नियमित ट्रेकचेदेखील इव्हेन्ट झाले. सोयीसुविधांनी युक्त अशा इव्हेन्टला दुप्पट दाम मोजून देखील येण्याची तयारी असणाऱ्यांची संख्या वाढत गेली. हे एक प्रकारचे साहसी पर्यटकच होते. गिर्यारोहक आणि गिरिपर्यटक असे सरळसरळ विभाजनच करता येईल एवढी या पर्यटकांची संख्या आज झाली आहे. पण हा फरक आजही ना सर्वसामान्यांना कळतो, ना यंत्रणांना कळतो, ना माध्यमांना. त्यामुळेच ‘कोकणकडय़ावर ट्रेकर अडकले’ अशी ब्रेकिंग न्यूज वृत्तवाहिन्यांनी बिनधास्त ठोकून दिली.

हा फरक सांगण्याचे कारण अगदी साधे आहे. गिर्यारोहक मग तो ट्रेकर असो की प्रस्तरारोहक की पर्वतारोही असो, त्याची जडणघडण आणि साहसी पर्यटकाची जडणघडण यामध्ये खूप फरक असतो. डोंगरातील, खुल्या निसर्गातील अडीअडचणी, त्यातील संभाव्य धोके याचे धडे गिरवत एक डोंगरभटक्या तयार होतो. धोका आहे म्हणून साहस आहे हे साधे सोपे गणित असते. आणि तो धोका आपल्या प्रशिक्षणाच्या, अनुभवाच्या बळावर कसा टाळता येईल याची जाण आणि त्यातून केलेले आरोहण म्हणजेच साहसी खेळाचा आनंद असतो. ज्याला मोजूनमापून घेतलेली जोखीम-कॅलक्युलेटेड रिस्क- असे म्हटले जाते. साहसी पर्यटनामध्ये ही कॅलक्युलेटेड रिस्क घेण्याचे काम आयोजकांचे असते. साहसी पर्यटक हा पसे मोजून साहसाचा आनंद घेण्यासाठी आलेला असतो. त्याला डोंगरातील या सर्व बाबींचा अंदाज असेलच याची खात्री देता येणार नाही. पण मोजूनमापून जोखीम घेताना त्यासाठी कोणाही नेत्याला एकूण परिस्थितीचा अंदाज घेता येणे गरजेचे असते. ते कौशल्य प्रशिक्षणातून शिकता येत असले तरी अनुभवातूनच त्याची जाण येते. गेल्या काही वर्षांत व्यापारी तत्त्वावरील गिर्यारोहणातील विविध इव्हेन्ट करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. एक व्यवसाय म्हणून त्यावर आक्षेप घेण्यात हशील नाही. पण त्यालादेखील गिर्यारोहणाची मूलभूत तत्त्वे तेवढय़ाच प्रमाणात लागू होतात. (त्यामुळे गिर्यारोहणाचा विकास होतो की नाही हा वेगळाच मुद्दा असून त्यावर या लेखात चर्चा अप्रस्तुत आहे.)

कोकणकडय़ावरील घटनेत या अगदी मूलभूत बाबींचा विचार केला तरी नेमके काय झाले याची कल्पना येऊ शकते. आयोजकांच्या मते रॅपिलगसाठी आधी लावलेला सेटअप बदलावा लागल्यामुळे जागा बदलात वेळ गेला. हाताशी असलेला जास्तीचा रोप कडय़ाच्या माथ्यावरच वापरावा लागला. म्हणजेच आयोजकांकडील रोपची लांबी कमी झाली आणि त्याचबरोबर रॅपिलगसाठी पहिला सहभागी उतरवण्यास उशीर झाला. जागा बदलाचे कारण असे होते की कडय़ाखाली मधमाशांचे पोळे होते. ते आयत्या वेळी कळाले म्हणजेच त्याची कल्पना आयोजकांना आधी नव्हती. कोकणकडय़ावरून सुमारे १८०० फूट रॅपिलग करताना ते सलग एकाच वेळी न करता तीन टप्प्यांत करावे लागते. सुमारे ७००-८०० फूट पहिला टप्पा, सुमारे ३०० फूट दुसरा टप्पा, त्यानंतर ५०० फूट घळीतून चाल. आणि सुमारे ३०० फुटांचा तिसरा आणि अंतिम टप्पा. त्यामुळे एकूण तीन ठिकाणी रॅपिलगचा सेटअप लावावा लागतो. पण या घटनेत असलेली रोपची कमतरता पाहता सर्व सहभागी पहिल्या टप्प्यावर उतरल्यावर तोच रोप काढून घेऊन मगच पुढील टप्प्याचा रोप लावावा लागणार होता आणि उरलेल्या तिसऱ्या टप्प्यासाठी तोच प्रकार करावा लागणार होता. हे सर्व पाहता उशिरा सुरू झालेल्या या रॅपिलगमध्ये वरील पद्धतीने सर्व सहभागी अंधार पडायच्या आत कोकणकडय़ाच्या पायथ्याला पोहचवणे शक्यच नव्हते. मात्र तरीदेखील ही जोखीम आयोजकांनी घेतली. पुढे मग संकट ठरलेलेच होते. तसेच झाले. त्यातच पुन्हा अशा प्रकारच्या रॅपिलगसाठी एक जास्तीचा सुरक्षा रोप मूळ रोपच्याच बाजूला असणे आवश्यक असते, ती तरतूददेखील त्यांच्याकडे नव्हती. (कोकणकडय़ावरील घटनाक्रमासाठी चौकट पाहावी.) म्हणजेच जोखीम घेण्याचा सुरुवातीचा निर्णयच पूर्णत: चुकीचा होता. कसलेल्या गिर्यारोहकांच्या चमूमध्येदेखील काही वेळा निर्णय चुकू शकतात. पण अशा वेळी काय करायचे हेदेखील महत्त्वाचे असते. साहसी पर्यटकांना याची कल्पना असू शकत नाही.

चमूनेत्याच्या निर्णयाशिवाय (जो बहुतांश वेळा सामूहिकपणे घेतला जातो) कोणीही पाऊल उचलत नाही. पण येथे चमूनेत्याच्या अपरोक्ष सहभागींने घाबरून, तसेच चमूनेता काही आपल्या म्हणण्याला दाद देत नाही हे पाहून इमर्जन्सी क्रमांकावर फोन केला. त्यावर आलेल्या प्रतिसादानंतरदेखील चमूनेत्याने बचावाचे सहकार्य नाकारले. तरीदेखील बचाव पथक पोहचलेच. आणि त्यांच्याकडील रोपमुळे शेवटचा टप्पा उतरेपर्यंतदेखील सायंकाळ झाली. म्हणजेच बचाव पथकाची गरजदेखील येथे अधोरेखित होते. जोखीम घेण्याचा, न घेण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला नाही तर काय होते त्याचेच हे मूíतमंत उदाहरण म्हणता येईल.

कोकणकडा ही अगदी आत्ताची घटना म्हणून त्याची इतकी चर्चा केली आहे. पण मुळातच डोंगरात भटकंती, प्रस्तरारोहण किंवा पर्वतारोहण करताना ज्या मूलभूत बाबींची काळजी घ्यायचीच असते ती घेतली नाही तर संकटाचा सामना हा ठरलेलाच असतो. एखाद्या किल्ल्याच्या डोंगरावर जात असू तर वाट कशी आहे, वाटेवर, किल्ल्यावर पाणी आहे का, निवारा आहे का, धोकादायक जागा कोणत्या आहेत, चढायला आणि पुन्हा उतरायला किती वेळ लागणार आहे अशी किमान माहिती तरी असणे अपेक्षित असते. ती नसेल तर साध्या डोंगरावरदेखील वाट चुकणे, अडकून पडणे, चुकीच्या वाटेने गेल्याने घसरणे असे प्रकार घडतात. दहा वर्षांपूर्वी तोरणा किल्ल्यावर जाताना दोन ट्रेकर पर्यटक वाट चुकून मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे डोंगर किती छोटा आहे, सोपा आहे यापेक्षा आपण किती सजग आहोत हेच कायम महत्त्वाचे असते. पण आज नेमकी त्याच बाबींची उणीव वारंवार दिसून येते.

मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरात पावसाळ्यात आणि डिसेंबर-जानेवारीत हल्ली डोंगर अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. अपघात झाले, वाट चुकली की मग बचाव पथकांची आठवण येते. आपल्याकडील अनेक गिर्यारोहण संस्था याच बचाव पथकाची भूमिका निभावतात. ‘निसर्गमित्र पनवेल’ या संस्थेचे विश्व्ोश महाजन सांगतात, ‘‘गेल्या वर्षभरातील रेस्क्यू कॉलचा आढावा घेतल्यास स्वनियोजन करून भटकण्यास गेलेल्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्या खालोखाल छोटय़ा प्रमाणात यंत्रणा असणाऱ्या साहसी पर्यटन व्यावसायिकांचे प्रमाण आहे. तर स्वयंसेवी संस्थांचे प्रमाण अगदी कमी आहे.’’ काहीसा असाच अनुभव नाशिक परिसरातील गिर्यारोहण संस्थांना आलेला आहे. नाशिकच्या ‘वैनतेय’ संस्थेचे प्रशांत परदेशी सांगतात, नाशिक भागात बहुतांश रेस्क्यू कॉल हे साहसी पर्यटकांचेच अधिक आहेत. रेस्क्यू कॉलनुसार रेस्क्यु टिमबरोर समन्वय साधण्याचे काम करणारे ‘ट्रेक क्षितिज’ संस्थेचे राहुल मेश्राम आणि ओंकार ओक सांगतात की, हल्ली छोटय़ा चमूने स्वनियोजन करून जाणाऱ्यांची रेस्क्यू कॉलची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर व्यापारी तत्त्वावरील आयोजकांची संख्या देखील वाढणारी आहे.

एकंदरीतच रेस्क्यूच्या माहितीचे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, स्वनियोजन करून डोंगरभटकंती करणाऱ्यांच्या रेस्क्यू कॉलची संख्या अधिक आहे, तर त्या खालोखाल साहसी पर्यटकांचा नंबर लागतो. पहिल्या प्रकारात जोखमीची जाणीव काही प्रमाणात झालेली असते, पण ती घेण्याचा अनुभव कमी असतो, तर दुसऱ्या प्रकारात जोखमी घेण्यात साहसी पर्यटकांचा व्यक्तिश: काहीही संबंध नसतो.

पहिल्या प्रकारातील भटक्यांच्या नियोजनातील एक उणीव अनेकांच्या बोलण्यातून अगदी ठळकपणे जाणवते ती म्हणजे मार्गदर्शक सोबत न घेण्याची सवय. नुकतीच बदलापूरजवळ एक घटना घडली होती. इंटरनेटवरील माहिती वाचून एक डोंगरभटका एकटाच चंदेरी किल्ल्यावर निघाला होता. पण वाट चुकल्याने तो डोंगरात भलतीकडेच अडनिडय़ा ठिकाणी जाऊन पोहचला. महत्त्वाचे म्हणजे त्याला आपण कुठे अडकलो आहोत हे ठामपणे सांगतादेखील येत नव्हते. अशा वेळेस बचाव पथकाचे काम आणखीनच कठीण होते. असे प्रकार गेल्या काही वर्षांत खूप मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसतात. त्याचबरोबरीने व्यापारी तत्त्वावरील म्हणजेच साहसी पर्यटन क्षेत्रातील अपघात, पर्यटक अडकणे या घटनांचे प्रमाण वाढले आहे. साहसी पर्यटनामध्ये हल्ली मुख्यत: नियमित ट्रेकची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली असते. आणि त्यामध्ये अगदीच मर्यादित प्रमाणात डोंगरातील साहाय्य उपलब्ध असते.

हे पाहता महाराष्ट्रातील गिर्यारोहणाच्या आजवरच्या वाटचालीतील हा एक अवघड टप्पा आहे. एकीकडे उत्तम प्रकारे गिर्यारोहणातील सर्वच उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्थांची संख्या रोडावत आहे. छोटय़ा प्रमाणात ट्रेक आणि मुख्यत: गडकिल्ले भ्रमंती आयोजन करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण त्याचबरोबर स्वनियोजन करून जाणाऱ्यांची संख्या आणि साहसी पर्यटन संस्थांबरोबर जाणारे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. गिर्यारोहणातील आजवरचा प्रवास संस्थात्मक पातळीवर अधिक झाला असला तरी तो ट्रेण्ड आता पूर्णपणे बदलला आहे. संस्थात्मक पद्धतीतून घडणारा डोंगरभटका हा अनेक पातळ्यांवर काम करत, चुकत, अनुभवातून शिकत काम करत जातो. त्याच वेळी तो संस्थेची म्हणून एक चौकटदेखील पाळत असतो. कदाचित संस्थांच्या माध्यमातून जाताना येणारी बंधने पाळण्याची मानसिकता रुचत नसल्याने संस्थाबाह्य़ डोंगरभटकंतीचे प्रमाण वाढले असावे. पण मग आपल्याच क्षेत्राची वाढ निकोप प्रकारे होत नसेल तर त्याचे उत्तरदायित्वदेखील या क्षेत्राचे अध्याहृत पालकत्व असलेल्या संस्थांच्या डोक्यावर येते. केवळ संख्यात्मक वाढ होताना गुणात्मक वाढ होत नसेल तर त्या वाढीला सूज असे म्हणतात याची गिर्यारोहण क्षेत्राला जाणीव करून देण्याची गरज आहे. डोंगरातील वाढत्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर या सर्वाचा मुळापासून विचार करायला हवा असेच या निमित्ताने जाणवते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बचाव पथकांची गरज. डोंगरात वाट चुकण्याच्या, अपघाताच्या घटना घडल्या की दरवेळी बचाव पथक या विषयावर चर्चा होते. आज ज्या काही संस्था, व्यक्ती बचाव पथकाचे काम करतात त्या पूर्णपणे एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच करत असतात. कोणत्याही बचावाच्या कामासाठी त्या कधीच पसे आकारत नाहीत. काही संस्था कोणी मदत, देणगी, साधनसामग्री दिली तरच त्याचा स्वीकार करतात पण काही संस्था तर तीदेखील स्वीकारत नाहीत. मग अशा वेळी या बचाव पथकांच्या होत असलेल्या खर्चाचे गणित तरी कसे लावायचे? सामाजिक बांधिलकी म्हणून जरी हे सर्वजण गिर्यारोहणाच्या कौशल्याचा वापर करत असले तरी आíथक बाबीचा मुद्दा दुर्लक्षितच राहतो. गिर्यारोहण संस्थांचे बचाव पथक हे केवळ गिर्यारोहणातील रेस्क्यूच नाही तर घाटातील अपघात, पूर परिस्थिती वगरे प्रसंगीदेखील धावून जातात. लोणावळा येथील ‘शिवदुर्ग’ संस्थेचे सुनील गायकवाड सांगतात की, त्यांच्या संस्थेने गेल्या दहा वर्षांत ७५ हून अधिक प्रसंगी बचावाचे काम केले आहे. केवळ गिर्यारोहणातीलच नाही तर पूर परिस्थितीत रेस्क्यू करणे, धबधब्यांच्या ठिकाणी रेस्क्यू करणे आणि खून करून दरीत टाकलेला मृतदेह बाहेर काढण्याचे कामदेखील स्थानिक पोलिसांच्या विनंतीवरून करत असतात. हे सर्वच काम केवळ सामाजिक बांधिलकी म्हणूनच केले जाते.

या बचावपथकांचे होणारे सामाजिक गौरव सोडल्यास सरकारदरबारी या सर्वच संस्था उपेक्षित असतात. यावर्षी जुलमध्ये महाबळेश्वरच्या घाटात झालेल्या बस अपघाताच्या वेळी स्थानिक गिर्यारोहण संस्थांचे कार्यकत्रे अत्यंत विक्रमी वेळात घटनास्थळी पोहचले होते. एनडीआरएफची टीम पोहोचण्यापूर्वी त्यांनी दरीतून मृतदेह काढायला सुरुवात केली होती. त्यानंतर जरा कुठे सरकारदरबारी गिर्यारोहकांच्या बचाव पथकांची कदर केली गेली.

पण येथे एका मूलभूत प्रश्नाला हात घालावा लागेल. रस्त्यावरील, घाटातील, पर्यटन स्थळावरील अपघाताच्या प्रसंगी सरकारी मदत धावून येत असेल तर डोंगरभटक्यांच्या अपघाताच्या प्रसंगीदेखील सरकारी यंत्रणा सक्रीय व्हायला काय हरकत आहे? तेथे मात्र केवळ गिर्यारोहकांचेच बचाव पथक सक्रिय असते. तेदेखील स्वखर्चाने. महाबळेश्वरच्या घाटातील अपघातानंतर क्रीडा व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंत्रालयातील बठकीत या अनुषंगाने एनडीआरएफशी गिर्यारोहण संस्थांच्या बचाव पथकांना जोडून घेण्याचा विचार करता येईल असे सांगितले होते. तसेच बचाव पथकांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आश्वासन दिले होते. गिर्यारोहकांचे बचाव पथक हे कोणत्याही संकटप्रसंगी धावून जाताना दिसते. मग अशा कौशल्यपूर्ण बचाव पथकाचा उपयोग सरकारी यंत्रणांनी करून घेतला तर त्याचे समन्वय करणे सोपे होऊ शकते. त्याचा बचाव पथकांनादेखील फायदादेखील होईल, आíथक आधारदेखील राहील आणि महत्त्वाचे म्हणजे एक शिस्त लागेल. कारण आज अनेकांच्या माध्यमातून बचाव पथकांचे समन्वयन केले जाते. त्यातच सक्षम नसलेले देखील बचाव पथक घेऊन जाताना दिसतात. या सर्वाचे जर सुसूत्रीकरण झाले तर गिर्यारोहण संस्थांसाठी आणि शासनासाठीदेखील उपयुक्त ठरू शकेल.

२०१२ सालच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेनंतर सहा वर्षांनी सुधारणा होऊन दुसऱ्यांदा साहसी खेळांच्या बाबतीतील मार्गदर्शक तत्त्वे मांडणारा सरकारी अध्यादेश यावर्षीच्या जुलमध्ये लागू झाला आहे. पण त्याची अंमलबजावणी अजूनही पुरेशा सक्रियपणे होताना दिसत नाही. याच अध्यादेशानुसार बचाव पथकाची निर्मिती, नियंत्रण आणि समन्वय करण्याचे उद्दिष्टदेखील ठेवले आहे. पण त्याची शासनाला अजून पुरेशी जाणीव झालेली दिसत नाही. इतकेच नाही तर अध्यादेशातील उणिवांसंदर्भात काही तक्रारी असतील तर त्यात योग्य ते बदल करून त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे काम शासनाचे आहे. पण यापैकी कोणत्याच पातळीवर फारशी हालचाल होताना दिसत नाही.

कोकणकडय़ाची घटना हे तर केवळ एक निमित्त आहे. त्यापासून धडा घेत गिर्यारोहण क्षेत्राने आणि शासनानेदेखील या साऱ्या बाजू विचारात घेऊन काही हालचाल केली तर भविष्यातील अशा घटनांना काही प्रमाणात तरी आळा बसू शकेल हीच वाईटातून चांगल्याची अपेक्षा करायला हरकत नाही.

कोकणकडय़ावर काय घडले?

तीन हजार रुपयांमध्ये कोकणकडय़ावरील रॅपिलगचा थरारक अनुभव, या ‘वेस्टर्न ट्रेकर्स’च्या समाजमाध्यमांवरील जाहिरातीमुळे सुमारे तीस सहभागी यामध्ये सहभागी झाले होते. या इव्हेन्टचे आयोजक ‘वेस्टर्न ट्रेकर्स’चे राज पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबरला सकाळी कोकणकडय़ावर रॅपिलगचा सेटअप लावण्यात आला. पण रोप ज्या ठिकाणाहून जात होते तेथे कडय़ाखाली मधमाशांचे पोळे लटकले असल्याने पुन्हा सेटअप बदलावा लागला. त्यात वेळ तर गेलाच, पण सुरक्षा रोप म्हणून असलेला एक हजार फुटाचा जास्तीचा रोप नव्या सेटअपसाठी कडय़ाच्या माथ्यावरच वापरावा लागला. त्यामुळे दोन हजार फुटांच्या रोपवरच रॅपिलग करावे लागणार होते. आयोजकांनी दिलेल्या  माहितीनुसार पहिला सहभागी साडेनऊ वाजता रॅपिलग करू लागला. एकूण १८ जण पहिल्या ८०० फुटांचे रॅपिलग करून तेथील लेजवर पोहचण्यास पाच-साडेपाच वाजले होते. त्यातच हा भाग मावळतीचा असल्यामुळे पाच वाजून ५० मिनिटांनीच अंधार झाला. त्यामुळे एका सहभागीने इमर्जन्सी क्रमांकावर संपर्क साधला. राज पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर आलेल्या एनडीआरएफ, तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस यांच्या फोनवर, आम्ही सुरक्षित आहोत, रात्री उतरणार नसून येथेच थांबणार आहोत आणि बचाव पथक पाठवण्याची गरज नसल्याचे सांगितले गेले. ‘सकाळी आम्ही सर्व चमूला उतरवण्यास सुरुवात केली’ असे राज पारकर यांनी सांगितले.

या इव्हेन्टमधील एक सहभागी डॉ. हितेश अडवाणी यांनीच अंधार पडल्यावर इतर सहकाऱ्यांशी बोलून इमर्जन्सी क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, कोकणकडय़ावरून पहिल्या सहभागीने दुपारी १२ च्या आसपास रॅपल करण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले. त्यानंतर रॅपलिंग करण्यास होत असलेला उशिर पाहून अडवाणी यांनी आयोजकांना इतरांना परत पाठवून जे सहभागी पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत तेवढय़ांनाच कडय़ाच्या पायथ्यापर्यंत पोहोचावे असे सुचवले होते. जेणेकरुन वेळ वाचेल आणि सर्वजण सुरक्षित राहतील. पण त्याकडे आयोजकांनी दुर्लक्ष केले असे डॉ. अडवाणी यांनी सांगितले.

एनएडीआरएफ व इतर यंत्रणांबरोबरच एक संदेश ‘ट्रेललिड्स महाराष्ट्र’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरदेखील गेला होता. त्यानुसार गणेश गीध हे बचावासाठी जायच्या तयारीत होते. गणेश गीध यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी राज पारकर यांच्याशी संपर्क साधला असता, पारकर यांनी बचाव पथकाची गरज नसल्याचे सांगितले. पण दरम्यान मुरबाडचे तहसीलदार यांनी गणेश गीध यांच्यांशी संपर्क साधून बचाव पथक पाठवण्यास सांगितले होते. त्यामुळे नाशिक येथील ‘वैनतेय’ संस्थेचे कार्यकत्रे आणि ‘शिवदुर्ग’ लोणावळा येथील कार्यकत्रे व गणेश गीध कोकणकडय़ाच्या पायथ्याला पहाटेपर्यंत जाऊन पोहोचले. पायथ्याच्या गावातून आरोहणाच्या सुरुवातीला पोहोचेपर्यंत साडेआठ वाजले होते. गणेश गीध यांनी नऊच्या आसपास कोकणकडय़ाचे सुरुवातीचे ३०० फूट प्रस्तरारोहण केले. तेव्हा सकाळचे ११ वाजले होते. त्यावेळी रॅपिलगच्या दुसऱ्या टप्प्याचे रॅपिलग सुरू झालेले दिसले. रॅपिलगचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा यामध्ये सुमारे ५०० फुटांच्या घळीतून चालत जावे लागते. गणेश गीध यांनी दिलेल्या माहितीनुसार सहभागींकडील पाणी संपले होते. त्यांना पाणी देण्यात आले. खालून पुन्हा पाणी ओढून घेऊन तेदेखील देण्यात आले. त्यानंतर सुमारे ५०० फुटांची घळ आयोजकांच्या खराब रोपच्या व गणेश गीध यांच्याकडील रोपच्या आधारे उतरून शेवटच्या ३०० फुटांच्या रॅपिलगला साडेबारा वाजता सुरुवात झाली. येथे बचाव पथकाचा रोप लावलेला होता. सर्व सहभागी व आयोजक रॅपल करून झाल्यानंतर तेथील सेटअप गुंडाळेपर्यंत सायंकाळचे साडेपाच वाजले होते असे गणेश गीध सांगतात.

First Published on December 7, 2018 1:04 am

Web Title: stuck trekkers rescued from harishchandragarh kokan kada