18 February 2019

News Flash

सलग चौथा कडक उन्हाळा!

देशाच्या काही भागात तर तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने जास्त असेल असेही या विभागाचे भाकीत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

१९०१ पासून नोंदवलेली सर्वात जास्त उष्ण वर्षे ही गेल्या १५ वर्षांतील आहेत. तर आता सलग तीन वर्ष कडक उन्हाळा झेलल्यानंतर यावर्षीच्या तापमानात सरासरी एक अंशाने वाढ अपेक्षित आहे.

यंदाचा उन्हाळा देशामध्ये आजवरच्या सर्व उन्हाळ्यांपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने नोंदवली आहे. देशाच्या काही भागात तर तापमान सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने जास्त असेल असेही या विभागाचे भाकीत आहे. म्हणजे यंदाचा उन्हाळा यापूर्वीच्या उन्हाळ्यांपेक्षा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. पावसाचे पूर्वानुमान दिले जाते, हे आपल्याला आजपर्यंत माहीत होते. पण हवामान खात्याने आता उन्हाळ्याचेही पूर्वानुमान द्यायला सुरुवात केली आहे. उन्हाळी पिकांसाठी हे पूर्वानुमान अतिशय महत्त्वाचे ठरणार असून भारतासारख्या कृषीप्रधान देशाला त्याचा चांगलाच फायदा होऊ शकेल. त्याचबरोबर नेमक्या कोणत्या काळात उष्णता जास्त असणार आहे, त्याचा परिणाम कुठे कुठे आणि कसा जाणवणार आहे, हे आधीच माहीत झाल्यामुळे त्या त्या काळात त्या त्या परिसरात लोकांना तसंच सरकारी यंत्रणेलाही विशेष काळजी घेता येईल. हे सगळं कसं होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आधी वाढत्या हवामानाच्या प्रश्नावर जगभरात तसंच देशात काय चाललेलं आहे ते समजून घेऊ.

जगभर २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९५० या वर्षी याच दिवशी संयुक्त राष्ट्राने जागतिक हवामान संघटनेची (World Meteorological Organization-WMO) स्थापना केली. याचे मूळ उद्दिष्ट, संपूर्ण जगातील हवामानविषयक नोंदी, निरीक्षणे, अभ्यास व विश्लेषणे यामध्ये सुसूत्रता आणणे आणि त्या अनुषंगाने एकत्र येऊन हवामान विषयीची पुढच्या वाटचालीची मार्गदर्शक तत्त्वे तयार करून, जनसामान्यांत जागरूकता निर्माण करणे असे होते.

दर वर्षी जागतिक हवामान संघटना वेगवेगळ्या संकल्पना राबवते. या संकल्पना कालानुरूप असतात. संपूर्ण वर्षभर, जगात सर्वत्र या संकल्पनेवर आधारित कामे केली जातात. जेणेकरून जनसामान्यांमध्ये त्या संकल्पनेचे बीज रोवता येईल. अशीच एक कालानुरूप संकल्पना यंदाच्या वर्षी जागतिक हवामान संघटना घेऊन आलेली आहे; ‘हवामानासाठी सज्ज, हवामानासाठी अद्ययावत’ म्हणजेच वेदर रेडी, क्लायमेट रेडी (Weather Ready, Climate Smart). या संकल्पनेबद्दल आपण नंतर चर्चा करू. त्या आधी या मार्च महिन्याच्या बरोबरीने येणाऱ्या उन्हाळ्याच्या हंगामाबद्दल बोलू या.

आपल्या देशात साधारणत: मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याचे असतात. आपला देश विषुववृत्तीय पट्टय़ात येत असल्यामुळे देशात, बहुतांश भागात या काळात उन्हाळा असतो. लहानपणी उन्हाळा सुरू झाला की शाळेतल्या वार्षिक परीक्षा, नंतरचे निकाल, त्यावर आधारित पुढच्या सुट्टय़ा, गावी जाण्याचे बेत, घरोघरी केली जाणारी पापड- लोणची आणि दूरवर असणारी पावसाची आठवण इत्यादीमध्ये मन रमून जायचे. दिवसभर मदानात खेळूनसुद्धा त्या काळात उन्हाळा कधी जाणवला नाही. कदाचित खेळाच्या नादात हे झाले असेल, पण बहुतेक त्याची तीव्रता तेव्हा एवढी जाणवत नव्हती. पण गेल्या काही वर्षांत बऱ्याच गोष्टी बदलताना दिसत आहेत. शाळा मागे राहिली, सुट्टय़ा हरवल्या, घरामधली पापड -लोणची तर स्वप्नवत झाली. त्याच बरोबरीने ऋतूमध्येही बदल होताना जाणवायला लागले आहे. पावसाळ्यात येणारे मोठे पूर, हिवाळ्यातील तीव्र तापमानातील वाढ, उन्हाळ्यातील तापमानातील घसरण आणि इतर अनपेक्षित तीव्र बदल जसे; मोठी गारपीट, तीव्र चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, पूर, प्रखर दुष्काळ, मोठय़ा प्रमाणात होणारे भूस्खलन, उष्णतेच्या तसेच थंडीच्या तीव्र लाटा या सर्वाचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. कृषी, उद्योगधंदे, उत्पादने यांच्यावर त्याचा परिणाम जगभर दिसत आहे आणि भारतातही वेगवेगळ्या भागात, कमी-अधिक प्रमाणात याचा परिणाम दिसत आहे. महाराष्ट्रातही त्यामुळे होणारे बदल गेल्या काही वर्षांत अतिशय ठळकपणे दिसत असून, बदलते हवामान आणि त्याचा वेगवेगळ्या घटकांवर होणारा परिणाम आणि त्यापासून बचाव, हा आजच्या घडीला सर्वासमोर एक मोठा अभ्यासाचा विषय आहे.

सध्या सुरू असलेल्या २०१८ या वर्षांची सुरुवातच, २०१७ या वर्षांने आपल्याला उष्णतेच्या बाबतीत जिथे सोडले होते, तिथूनच झाली असे म्हणायला हरकत नाही. २०१७ या वर्षांची नोंद सलग तिसऱ्या वर्षी उष्ण वर्ष म्हणून झाली. तेही ते वर्ष अल-निनो वर्ष नसताना. (सजग वाचकांना अल निनोची माहिती निश्चितच असेल. अल निनो म्हणजे प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानातील अनपेक्षित वाढ आणि त्याचा संपूर्ण जगातील हवामानावर होणारा परिणाम). २०१७ या वर्षांत अमेरिकेमध्ये चक्रीवादळांनी प्रचंड प्रमाणात हानी केली. आशिया खंडात महाभंयकर पूर आले व लाखो लोकांचे प्राण गेले. तसेच वित्तहानी झाली. आफ्रिका खंडाने परत एकदा अत्यंत प्रखर दुष्काळाचा सामना केला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर घडून आले आणि गरिबीतही वाढ झाली. आणि हे सर्व होत असताना, गेल्याच आठवडय़ात नासा या संस्थेनेही एक अहवाल प्रसिद्ध केला आहे की फेब्रुवारी २०१८ महिना हा गेल्या १३८ वर्षांमधील सहावा अधिक उष्णतेचा महिना होता. २०१८ चा फेब्रुवारी महिना हा १९५१-१९८० च्या तापमानातील सरासरीपेक्षा + ०.७८ अंश सेल्सिअस अधिक उष्ण होता. या पूर्वीची वर्षे इथे दिलेली आहेत. २०१६ (+१.३४), २०१७ (+ १.१२), १९९८ (+ ०.९८), २०१५ (+ ०.८७) आणि २०१० (+ ०.७९). आधुनिक जागतिक तापमानाची निरीक्षणे १८८० सालापासून सुरु झाली. या कालावधित भारतामध्येही काही बदल दिसायला लागले.

भारतात १९०१ पासून दरवर्षी नोंदवल्या गेलेल्या उष्णतेच्या आकडेवारीनुसार जी पाच सर्वात जास्त उष्ण वर्षे नोंदवली गेली आहेत, ती गेल्या १५ वर्षांतील आहेत. त्यात आता २०१७ चीही भर पडली आहे. मुंबईच्या तापमानवाढीचा अभ्यास हेच दर्शवतो की गेल्या काही वर्षांत, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, उष्णता अधिक असलेले दिवस तसंच उष्णता अधिक असलेल्या रात्रींच्या संख्येमध्ये वाढ दिसते आहे तर थंड किंवा उबदार दिवस आणि थंड किंवा उबदार रात्रीच्या संख्येमध्ये घट दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाने (पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत ) या वाढत्या तापमानाची नोंद घेऊनच, २०१६ पासून आगामी उन्हाळा कसा असण्याची शक्यता आहे, या विषयी मार्च महिन्यातच माहिती द्यायला सुरूवात केली आहे. भारतीय हवामान विभाग संपूर्ण देशासाठी जसे पावसाचे दीर्घकालीन पूर्वानुमान देतो, त्याचप्रमाणे अलीकडे उन्हाळ्याचे पूर्वानुमान दिले जात आहे. त्यानुसार २०१८ चा उन्हाळा संपूर्ण देशातील सर्व हवामान उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक उष्ण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे महिन्यातील सरासरी तापमान वायव्य भारतात आणि मध्य भारतात, सरासरीपेक्षा ‘१ अंश सेल्सिअस’ अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच मूळ उष्ण लहरींच्या भागात (core heat wave zone) उष्ण लहरी आणि तीव्र उष्ण लहरींची लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यात देशातील इतर भागात बरोबर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भाग येतो. एकंदर यंदाचा उन्हाळा हा अधिक प्रखर असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या उष्ण लहरींचा लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लहरी सार्वजनिक आरोग्य समस्या निर्माण करणाऱ्या ठरू शकतात. या पूर्वीच्या उष्णतेच्या लाटांमुळे, उष्माघातांमुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यात ‘उष्णता अनुयोजन योजना’ (Heat action plan- HAP) सुरू केली. हवामान बदलाच्या परिस्थितीनुसार उष्मांक (Heat Index) आणि उष्ण लहरींच्या तीव्रतेत होणारी वाढ, उष्णतेची चेतावणी प्रणाली, यासाठी एक कृती कार्यक्रम असणं गरजेचं होतं. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) त्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. अर्थात हे काम या विभागाचे एकटय़ाचे काम नाही तर इतर सरकारी खात्यांच्या सहकार्याने हे काम केले जात आहे. महाराष्ट्रात अशी प्रकारची योजना भारतीय हवामान विभागाने नागपूरमध्ये स्थानिक नगरपालिकेबरोबर सुरू केली आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याचा चांगला परिणाम दिसत आहे.

आता हे तर सर्वमान्य आहे की जगाच्या तापमानामध्ये वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्नही सुरू आहेत. भारत सभासद असलेल्या पॅरिस करारामध्येही पृथ्वीच्या तापमान वाढीचा वेग कशा प्रकारे मर्यादित ठेवता येईल आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, हाच महत्वाचा मुद्दा आहे. उष्णता शोषून घेणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कसे कमी करता येईल, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि वित्त साहाय्य कसे निर्माण करता येईल याविषयी सध्या विचार केला जात आहे. वाढलेल्या तापमानाचे परिणाम हे वैश्विक असून त्याचा स्थानिक पातळीवर निर्माण होत असलेल्या हवामानाशी संबंध लावणे चुकीचे ठरू शकते. शास्त्रज्ञ वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कृषी, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या घटकांवर होणारा परिणाम याविषयी अजूनही बऱ्याच अंशी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यावरही सध्या तरी मर्यादा आहेत.

सर्व ऋतू हे एकमेकांशी निगडित असतात. सूर्याचा कर्क वृत्त ते मकर वृत्त आणि परतीचा प्रवास हा ऋतू बदलाला कारणीभूत असतो. तसेच उष्णतेमुळे बदलणारा हवेचा दाब, तापमान, विशाल पर्वतीय रांगा, महासागरातील प्रवाह असे अनेक घटक एकत्रित येऊन, एकमेकांशी संबंधित परिमाण घटक (parameters) निर्माण करतात. हवामानातील बदल कमी अधिक करण्याची या परिमाण घटकांची क्षमता असते. उदाहरणार्थ मान्सूनच्या दरम्यान जमीन आणि समुद्र यांमध्ये असणारा तापमानातील फरक (Temperature contrast between land and sea) सौम्य असेल, तर त्याचा परिणाम मान्सूनवर दिसण्याची शक्यता असते.

मे २०१६ मध्ये राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातील फालोदी या ठिकाणी ५१ अंश सेल्सिअस  तापमान नोंदवण्यात आले. त्या पूर्वी म्हणजे १९५६ मध्ये राजस्थानमध्येच अलवार या ठिकाणी ५०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते.

रेंटचिंटाला -आंध्र प्रदेश, भुवनेश्वर – ओडिसा, डाल्टनगंज – झारखंड, तिरुपती- आंध्र प्रदेश, रायगड – राजस्थान, नागपूर- महाराष्ट्र, टीटीला गड – ओडिसा, श्रीगंगानगर- राजस्थान, अहमदाबाद- गुजराथ, करनूल – आंध्र प्रदेश या तसंच आणखी काही ठिकाणी उन्हाळ्यात तापमान अतिशय वाढलेले असते. देशाच्या कोअर हीट वेव्ह झोनमध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र  आणि तटीय आंध्र प्रदेश येतात. सोबतच्या आलेख आणि नकाशात उष्ण आणि अति उष्ण लहरींचे सरासरी दिवस दर्शविले आहेत.

उन्हाळी पिकांसाठी तापमानातील वाढीचे पूर्वानुमान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानुसार हवामान विभाग कृषी विद्यापीठांना पुढच्या पाच दिवसांचे हवामानविषयक पूर्वानुमान देतो. विद्यापीठे, भारतीय हवामान विभाग मिळून शेतकऱ्यापर्यंत कृषीविषयक सल्ले पोहोचवात. हे सल्ले एसएमएस, ई-मेल, संकेतस्थळे या वरून पाठविले जातात. पाच दिवसांच्या पूर्वानुमानाबरोबरच, पुढच्या दोनचार आठवडय़ांचे पूर्वानुमानही हवामान विभाग मार्गदर्शक म्हणून तयार करतो. त्याचाही शेतकऱ्यांना उपयोग होतो. उन्हाळ्याच्या दिवसात हवामानात होणारे तीव्र बदल, त्यांची पूर्व माहिती, इशारे हे सर्व हवामान विभाग वेळेवर देतो. या ऋतूमध्ये गडगडाटासह पाऊस, विजा पडणे, गारपीट, जोरदार वारे इ, नैसर्गिक आपदांचा शेतीला धोका असू शकतो. काही दिवसांपूर्वी राज्यात झालेली प्रचंड गारपीट, आणि आता झालेला हलका/मध्यम पाऊस यांचे पूर्वानुमान अगोदरच देण्यात आले होते. चक्रीवादळेसुद्धा या दिवसात शेतीसाठी धोकादायक असू शकतात. यासाठी हवामान विभाग आणि प्रशासनामध्ये सुदृढ समन्वय असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्वरित निर्णयांची देखील गरज असते.

एकंदर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामधील दुष्काळ आणि पाणी संकट, त्याबरोबर येणारी शेतीची आव्हाने आणि राज्यावर होणारा त्याचा तीव्र परिणाम, आणि मुख्य म्हणजे त्याची वारंवारता यासाठी सखोल अभ्यास आणि योजनांची गरज आहे. त्या दिशेने पावलं उचललीही जात आहेत. प्रवास मोठा आणि बिकट असला तरी परिस्थितीत सुधारणा होण्याची खात्री आहे. भारतीय हवामान विभाग या दृष्टिकोनातून सदैव प्रयत्नशील आहे. सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे यंदाच्या वर्षी जागतिक हवामान संघटना ब्रीदवाक्य घेऊन आलेली आहे; ‘हवामानासाठी सज्ज, हवामानासाठी अद्ययावत’ (Weather Ready, Climate Smart)  म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला बदलत्या हवामानासाठी तयार आणि अद्ययावतही राहावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक संसाधनांचा पुरेपूर वापर व्हायला हवा. रीतसर संशोधन व्हायला हवे. संबंधित सर्व घटकांशी सुदृढ संबंध असायला हवेत आणि व्यापक जागतिक दृष्टिकोन हवा. याच गोष्टी आपला पुढचा मार्ग सोपा करतील.

जागतिक हवामान दिवसाच्या शुभेच्छा.

(लेखक प्रादेशिक हवामान केंद्राच्या पश्चिम विभाग, मुंबईचे उपमहासंचालक आहेत.)

First Published on March 23, 2018 2:00 am

Web Title: summer season this year is expected hotter than normal