राज्यातील १४५ छोटय़ा-मोठय़ा कारागृहात तळोजा येथील कारागृह तसे अलीकडे उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यातील सेवासुविधाही नव्याच आहेत. कारागृह नवे असले तरी त्यातील करामती मात्र जुन्या कारागृहांना लाजवतील अशा आहेत. या कारागृहात अडीच हजारांपर्यंत विविध गुन्हय़ांतील कैदी सजा भोगत आहेत. अनेक कारागृहांत जादा झालेल्या कैद्यांना या ठिकाणी आणण्यात आले आहे. त्यातील अट्टल, कुप्रसिद्ध, श्रीमंत आणि वपर्यंत हात पोहोचलेल्या कैद्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जात आहे. या सर्व आरोपांची चौकशी होऊनदेखील स्थिती जैसे थे आहे. या कैद्यांना सर्व प्रकारची रसद येथील उपाहारगृह अर्थात कॅन्टीनच्याद्वारे पुरवली जाते अशी माहिती हाती लागली आहे.

सिडकोने राज्य शासनाला दिलेल्या ७७ एकर जमिनीवर तळोजा येथे हे इतर कारागृहांच्या तुलनेने अद्ययावत असे कारागृह उभारण्यात आलेले आहे. पाच वेगवेगळ्या इमारती, एका इमारतीत ४६५ कैदी आणि ४०० कर्मचारी निवासस्थान अशी या कारागृहाची रचना आहे. विशेष म्हणजे छोटे रुग्णालय, व्हिडीओ कॉन्फरस रूम, सी सी टीव्ही आणि उपाहारगृह अशा सुविधा या कारागृहात आहेत. त्यामुळे इतर कारागृहात असलेल्या सुविधांच्या तक्रारी तशा या कारागृहात नाहीत, पण त्यामुळे आलेली सुबत्ता गँगस्टार आबू सालेमच्या निमित्ताने समोर आली होती. त्याला या कारागृहात सर्व सुखसुविधा हात जोडून मिळत होत्या. पैसा फेको तमाशा देखो असा एक अलिखित नियम या कारागृहात आहे. सालेम तर उपाचाराच्या बहाण्याने कळंबोली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होत असे. त्यानंतर त्या ठिकाणी तो रात्री रंगीन करीत होता, असे सांगितले जाते. याच सालेमला दिल्लीला नेताना संपूर्ण रेल्वे डब्बा आरक्षित केला गेला होता. सालेमचा राजेशाही थाट मिळवण्याची क्लृप्ती नंतर अनेक नामांकित गुन्हेगारांनी आत्मसात केली होती. त्यांना वाशी येथील पालिकेचे रुग्णालय ही सेवा देत होते. अनेक गुन्हेगारांनी त्यांचे वाढदिवस या रुग्णालयामधून साजरे केल्याचे किस्से ऐकायला मिळतात.  त्यासाठी मुन्नी बदनाम हुईसारखी गाणीदेखील लावली जात होती. या कारागृहातील उपाहारगृह कैद्यांसाठी एक प्रकारचे उपहारच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, त्याने तो पैसा बाहेरच्या बाहेर उपाहारगृहद्वारे उपलब्ध करून द्यायचा. त्यानंतर त्याला हवी ती वस्तू या उपाहारगृहात उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे सरकारने आत्ता कुठे कॅशलेस व्यवहार सुरू केलेले आहेत, पण तळोजा कारागृहात हे व्यवहार गेली चार वर्षे केले जात आहेत. या कारागृहात सर्व वस्तू उपलब्ध होतात. त्या कारागृहात येणाऱ्या उपाहारगृहाच्या सामानातून. यात चांगल्या मोबाइल्सचादेखील समावेश आहे. त्यांची किंमत ५० हजारांपेक्षा जास्त आहे. नव्याने येणाऱ्या गुन्हेगाराला या ठिकाणी इतर कारागृहाप्रमाणेच चांगलेच बदडले जाते. त्यानंतर त्याचा गुन्हा, ओळख पालक आणि पैसा यावर त्यांची पुढील बडदास्त ठरवली जाते. कारागृहात सीसी टीव्ही कॅमेरे असले तरी त्यांची दिशा बदलण्याचे काम केले जाते. या कारागृहात सध्या पुजारी टोळीची चांगलीच दहशत आहे. त्यामुळे या टोळीच्या गुन्हेगारांची चलती आहे. तारखेला नामांकित गुन्हेगारांना नेण्यासाठी काही पोलिस फारच आग्रही असतात. कारण तारखेला या गुन्हेगारांकडून मलईदार वाटप होत असते. या पाश्र्वभूमीवर  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत काही गुन्हेगार शिक्षण घेतात हीच काय ती जमेची बाजू आहे.
विकास महाडिक – response.lokprabha@expressindia.com