19 October 2019

News Flash

तुमचे टॅरो भविष्य

करिअर : २०१९ हे वर्ष आपल्यासाठी सतर्कतेचे राहणार आहे.

टॅरो कार्ड

जागृती मेहता – response.lokprabha@expressindia.com

मेष (२१ मार्च ते १९ एप्रिल)

करिअर : २०१९ हे वर्ष आपल्यासाठी सतर्कतेचे राहणार आहे. स्थिर राहणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. जेवढी बचत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. या वर्षी एकूणच संयम बाळगून काम करा.

आरोग्य : टॅरो कार्डच्या निर्देशानुसार येणारे वर्ष हे आरोग्यासाठी चांगले आहे. पण विनाकारण चिंता करून किंवा कुपथ्य करून आरोग्याच्या तक्रारी वाढवू नका आणि घाबरू नका. अति ताणामुळे मिळणारा हा इशारा खरा मानून घाबरणे व्यर्थ ठरेल आणि त्यामुळे खरोखरच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतील. अति खाणे, मीठयुक्त पदार्थाचे अतिसेवन, आळशी प्रवृत्ती अशा अंतर्गत शत्रूंमुळे तक्रारी निर्माण होऊ शकतील. नियमित आरोग्य तपासणी टाळू नका, जेणेकरून तुमच्या मनातील रोगाची भीती दूर होऊ शकेल. सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लावा.

रिलेशनशिप : २०१९ हे वर्ष रिलेशनशिपसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी आधीच आपले अभिनंदन. आपल्या सर्व मनोकामना सत्यात उतरतील. आयुष्य या वर्षी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. रिलेशनशिपसंदर्भातील मोठे अडथळे तुमच्या आयुष्यातून आपोआप दूर होतील. येत्या वर्षांत तुम्ही कोणतीही इच्छा केलीत तर ती पूर्ण होईल. रिलेशनशिपच्या सकारात्मक बाजूंचा सतत विचार करा. आपल्या जोडीदारांबरोबरच्या क्षणांचा आनंद घ्या. एकमेकांची काळजी घ्या. येत्या वर्षांत तुम्हाला साखरपुडा, विवाह, दीर्घ काळाची कमिटमेन्ट अशी भेट आयुष्याकडून मिळणार आहे. म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा.

शुभ महिना : एप्रिल : अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडतील.

मार्च : पैसे वाचवा, जेणेकरून आणखी पैसे मिळतील.

वृषभ (२० एप्रिल ते २० मे)

करिअर : वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने २०१९ हे वर्ष शानदार असणार आहे. येणारे वर्ष अनेक प्रकारचे यश मिळवून देणारे, विजयाचे आणि करिअरमध्ये मोठे फायदे मिळवून देणारे असेल. कामाच्या ठिकाणी लोक तुमची प्रशंसा करतील. दीर्घ काळ सुरू असणारे प्रकल्प या वर्षी पूर्ण होतील. करिअरच्या पातळीवर एक नवीन आणि सुंदर काळ सुरू होणार आहे.

आरोग्य : वृषभ राशींच्या लोकांसाठी आरोग्याच्या पातळीवर २०१९ हे वर्ष जागं करणारे असेल. टॅरो कार्डच्या विश्लेषणानुसार उत्तम आरोग्यासाठी शारीरिक हालचाली, व्यायाम, नियमित आरोग्य तपासणी यांसारख्या गोष्टींची योग्य ती काळजी घेण्याची गरज या वर्षी भासणार आहे. लहानपणापासून प्राप्त करावीशी वाटणारी गोष्ट करून बघायला हरकत नाही. त्यासाठी फारसा उशीर झालेला नाही. आराम करा, स्पा वगैरे गोष्टींचा आनंद घ्या. पुरेशी विश्रांती घ्या. आपल्या क्षमतांपेक्षा स्वत:वर अधिक ताण पडू देऊ नका. अंतिमत: त्याचे वाईट परिणाम होतील. शक्य असेल तर ध्यानधारणा करा.

रिलेशनशिप : वृषभ राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिपमध्ये पुनर्मूल्यांकनाची गरज आहे. आपले घाव भरून काढण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी कोणाची मदत होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला जाणवेल, दिसेल त्याबाबतीत आतून जे वाटत असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या नशिबातील बाबींबद्दल जगाला दोष देणे बंद करा. स्वत:ला ज्या चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यांचा वापर करा. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा घाव भरून येण्यासाठी योग्य ती मदत नक्कीच मिळेल. अशा मदतीसाठी तुम्ही सर्वार्थाने पात्र आहात. वृषभ राशीच्या स्वभावानुसार तुम्ही आयुष्यातील ध्येय प्राप्त करण्यासाठी दीर्घ काळ प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे आता रिलेशनशिपचा आनंद घेण्याची वेळ आहे.

शुभ महिना : मे : शांत राहा.

ऑगस्ट : स्वत:वरील प्रेम साजरे करा.

मिथुन (२१ मे २० जून)

करिअर : मिथुन राशीच्या लोकांसाठी २०१९ हे वर्ष करिअरमध्ये भाग्यशाली आहे. या वर्षी तुम्हाला आपसूकच उत्साही वाटत राहील. तुमची काम करण्याची क्षमता सुधारलेली असेल. जे जे करण्याचं तुम्ही ठरवाल ते सारं सत्यात उतरू शकतं. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे फळ बढती, पुरस्कार, बक्षीस या स्वरूपात तुम्हाला मिळेल. तुमच्यातील क्षमतांचा तुम्ही खूप हुशारीने वापर कराल.

आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने येणारे वर्ष हे खूप सकारात्मक असेल. या वर्षी तुम्हाला भटकंतीची चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून सुट्टीचा आनंद घेता येईल. दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या तक्रारींबद्दल या वर्षी काहीतरी चांगले ऐकायला मिळू शकते.

रिलेशनशिप : २०१९ हे वर्ष तुमच्यासाठी आशादायी आहे. भूतकाळातील चुकांपासून तुम्ही धडा घेतला असेल. त्यामुळे त्या चुका तुम्ही पुन्हा करणार नाही याची खात्री बाळगा. रिलेशनशिपवर तुमचे लक्ष केंद्रित करा आणि जोडीदारासोबत चांगला वेळ खर्च करा. जे तुमच्याकडे आहे त्याचा विचार करा, मागील वर्षांत तुम्ही जे गमावून बसला आहात त्याचा विचार सोडून द्या. सकारात्मक विचार ठेवा आणि पुढाकार घेऊन कामाला लागा.

शुभ महिना : फेब्रुवारी : तुमच्या सर्व योजना सांगू नका.

ऑगस्ट : स्वत:वर विश्वास ठेवा.

कर्क (२१ जून ते २० जुलै)

करिअर : येणारं वर्ष हे विश्वासाचं असेल. या काळात तुम्हाला संयम बाळगावा लागेल. कदाचित या काळात करिअरमध्ये एखादा फटका बसू शकतो, पण तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागेल. कारण येणारं वर्ष हे स्थित्यंतराचे असणार आहे. कदाचित तुम्ही आशा सोडून द्याल, पण तुमच्या हाती जे आहे त्याबद्दल विचार करा. तुमच्या आतील क्षमतांचा विकास करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. उगा काळजी करण्यात व्यर्थ वेळ खर्च करू नका, तुम्हाला सिद्ध करण्याकरता अनेक संधी आहेत हे कायम लक्षात ठेवा.

आरोग्य : येत्या वर्षांत आरोग्य उत्तम राहणार आहे. या वर्षांत तुमच्या नकारात्मकतेवर परिणाम करणाऱ्या व्यक्ती, घटकांशी जमवून घेणे गरजेचे आहे. एखाद्या माणसाबद्दल अथवा घटनेबद्दल तुमच्या डोक्यात तयार झालेले ताणतणाव, दडपण यातून बाहेर पडा. या वर्षांत कर्क राशीच्या व्यक्तींनी सुट्टी काढून भटकंतीला जाणे गरजेचे आहे. जिम अथवा योगसाधना करणे शक्य असेल तर अवश्य कराच. आध्यात्मिक बाबींशी निगडित राहिलात तर नक्कीच मानसिक शांतता लाभू शकते. स्वत:वर लक्ष केंद्रित करा आणि स्वत:ला जपा.

रिलेशनशिप : या वर्षांत कर्क राशीच्या व्यक्तींना पुढाकार घ्यावा लागेल. रिलेशनशिपमधील संरक्षणात्मक भूमिका बाजूला ठेवून, सर्व भीतीवर मात करणे गरजेचे आहे. नवीन रिलेशनशिप किंवा सध्याच्या रिलेशनशिपमध्ये सुधारणा या दोन्ही बाबी होण्याची शक्यता आपल्या टॅरो कार्डवर दिसून येते. सर्व शंका दूर सारा, पुढाकार घेऊन धोका पत्करायला हरकत नाही. येणारे वर्ष हे रिलेशनशिपसाठी अतिशय सकारात्मक असे वर्ष आहे हे लक्षात ठेवा.

शुभ महिना : ऑगस्ट : सक्रिय राहा.

सप्टेंबर : प्रार्थनेचा काळ, आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा.

सिंह (२१ जुलै ते २० ऑगस्ट)

करिअर : सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरच्या बाबतीत येणारे वर्ष लाभदायी आहे. तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी तुमच्या बाजूने पूरक वातावरण असणार आहे. या वर्षांत व्यवसाय- उद्योगात भागीदारी करायला हरकत नाही. नवीन संयुक्त प्रकल्प स्वीकारायला हरकत नाही. नवीन प्रकल्पांवर सह्य करणे हे सकारात्मक असेल. असे आपल्या टॅरो कार्डावर दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी सर्वाशी उत्तम संवाद साधणे गरजेचे आहे.

आरोग्य : २०१९ या वर्षांत आरोग्याची भीती, चिंता सोडून द्या. मात्र नियमित आणि गरजेच्या तपासण्या जमतील तशा कराव्या लागतील. द्विधा मन:स्थिती अथवा निर्णय घेण्याबाबत असमर्थ असणे अशी परिस्थिती येऊ देऊ नका. या वर्षांत कदाचित आरोग्यामुळे अडकून अथवा थांबून राहावे लागल्याची भावना होईल, पण त्यामुळे स्वत:च निर्माण केलेल्या विचारांच्या, मर्यादांच्या िपजऱ्यात अडकू नका. अडचणींवर उपाय शोधा आणि पुढील कामाच्या योजना आखून काम करा.

रिलेशनशिप : या वर्षांत रिलेशनशिपबाबत अतिशय सकारात्मक आणि आनंदी दृष्टिकोन ठेवा. हे वर्ष संयमाचे असणार आहे. रिलेशनशिपमध्ये  आत्ता विचारपूर्वक वागलात, तर त्याचे फळ २०२० मध्ये नक्की मिळेल. त्यानुसार तुमच्या भविष्याची आखणी करा. तुम्ही या वर्षी तुमच्या भावना व्यक्त करण्यात कमी पडलात, अयशस्वी झालात तर तो तुमच्यासाठी धडा असेल. त्यामुळेच चांगल्या प्रकारे व्यक्त व्हायला शिका. पुढाकाराला योग्य त्या कृतीची जोड देणे गरजेचे आहे.

शुभ महिना : जानेवारी : गरिबांना अन्नदान करा.

जून : अतिखर्च टाळा.

कन्या (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

करिअर : येत्या वर्षांत तुम्ही काय करणार आहात ते खूप सकारात्मकपणे ठरवावे लागेल. या वर्षी तुमच्या करिअरसाठी खूप पूरक असा काळ आहे. भौतिकदृष्टय़ा तुम्हाला सर्वच बाजूंनी फायदा मिळणार आहे. मागील वर्षांत केलेल्या संघर्षांचे फळ तुम्हाला मिळत असून, तुमच्या इच्छा प्रत्यक्षात साकारल्या जातील. गरजू लोकांना मदत करणे महत्त्वाचे ठरेल. त्यांचे शुभाशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. समूहांच्या प्रकल्पात तुम्हाला पुन्हा एकदा चांगली संधी मिळण्याची शक्यता दाट आहे.

आरोग्य : हे वर्ष आरोग्यासाठी खूपच सकारात्मक आहे. तुमच्यातील क्षमतांवर विश्वास ठेवा. येणारे वर्ष हे आरोग्यदायी असेल, पण त्याबरोबरच आरोग्याची काळजी, योगा, व्यायाम अशा मूलभूत बाबींमध्ये शिस्त असणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. अतिशय थकव्यामुळे कदाचित तुम्ही आदर्श आरोग्याबाबत फारसे आग्रही न राहता त्याची आशा सोडून देण्याची शक्यता निर्माण होते, पण अशा वेळी माघार न घेता नेटाने प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच चांगले आरोग्य लाभू शकेल.

रिलेशनशिप : या वर्षांत तुमच्या अंतर्मनातील जाणिवांचा विचार करून त्या दृष्टीने पावले टाकली जातील. मनाचे ऐकण्याची गरज आहे. स्वत:मध्ये डोकावून पाहा, रिलेशनशिपमध्ये तुम्ही नेमके कुठे चुकत आहात त्याचे विश्लेषण करा आणि त्यावर काम करा. तुमच्या रिलेशनशिपमधील सर्वच्या सर्व घटनांबाबत इतरांशी बोलू नका. त्यामुळे कदाचित तुमच्या मनातदेखील वाईट विचार डोकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतरांशी गुप्तता बाळगणे गरजेचे ठरेल. लग्नाचे नियोजन ठरल्या ठरल्या लगेचच इतरांशी बोलू नका.

शुभ महिना : नोव्हेंबर : भांडण टाळा

जून : आर्थिक लाभ होतील.

तूळ (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

करिअर : तूळ राशींच्या व्यक्तींसाठी हे वर्ष सामथ्र्य देणारे असेल. आपल्या पित्याकडून मिळणारी ऊर्जा, ताकद ही खूपच शक्तिशाली असल्यामुळे तुम्ही जे ठरवाल ते या वर्षी होऊ शकेल. आपल्या भविष्याचे नियोजन करा आणि ते स्वत:च घडवा. या वर्षी तुमच्या करिअरचा भरभक्कम पाया घडवू शकता. तुमच्या क्षेत्रातील व्यक्ती तुम्हाला निरपेक्षपणे मदत करतील. ही संधी सोडू नका. येणारे वर्ष हे तुमच्यासाठी लक्ष्यपूर्तीचे वर्ष असेल.

आरोग्य : २०१९ हे वर्ष अतिशय आरोग्यदायी आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगला आधार मिळणार आहे. या वर्षांत तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने नवीन ध्येय ठरवू शकता आणि त्याबद्दल आशावादी राहून त्याचा पाठपुरावादेखील कराल. नियमित केल्या जाणाऱ्या उपायांमुळे तुम्ही भविष्याची काळजीदेखील कराल. आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण किंवा तत्सम उपाययोजना तुम्ही करू शकाल. आपले कुटुंबीय, मित्रमंडळ तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी प्रेरणा देतील.

रिलेशनशिप : हे वर्ष स्थित्यंतराचे आहे. अर्थातच त्याची प्रक्रिया ही वेदनादायी असेल. सुरवंटातून फुलपाखरू होण्याची प्रक्रियादेखील वेदनादायी असली तरी त्यातून होणारी निर्मिती ही सुंदर असते, तसेच या वर्षी आपल्या रिलेशनशिपबद्दल म्हणता येईल. रिलेशनशिपमध्ये गुंतवणुकीचे हे वर्ष असून त्याचे फळ तुम्हाला आयुष्यभर मिळत राहणार आहे. उदासीनता, कंटाळा यांचा रिलेशनशिपवर परिणाम होऊ देऊ नका. तुमची काळजी व्यर्थ असून त्यातून आणखीनच शंकाकुशंकांना वाव मिळत राहील. त्यातून रिलेशनशिपमध्ये नकारात्मकता वाढीस लागेल. त्यामुळे निश्चिंत होऊन सकारात्मक व्हा.

शुभ महिना : एप्रिल : गॉसिप्सपासून

सांभाळून राहा.

जून : शुभ वार्ता समजतील.

वृश्चिक (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

करिअर : टॅरो कार्डच्या निर्देशानुसार तुम्ही तुमच्यातली जुनी ऊर्जा दूर सारून नवीन काहीतरी निवडण्याची गरज आहे. करिअरची नवी वाट, नवी नोकरी, नवी संधी मिळण्याची शक्यता येत्या वर्षांत दिसून येते. जुन्या पठडीबद्ध मार्गावरून जाणे सोडून द्यावे लागेल, जेणेकरून नवीन संधी प्राप्त होईल. एखादे चांगले पद मिळू शकते. भूतकाळ मागे सारा. तक्रारी, नकारात्मक भावना यांना दूर सारून नवीन काहीतरी अंगीकारा. जुन्या, नकोशा गोष्टी काढून टाकल्या तर नवीन गोष्टी नक्कीच सापडतील.

आरोग्य : हे वर्ष तुमच्यासाठी खूप काही साध्य करणारे आहे. तुमच्यातील सकारात्मकता आणि आत्मविश्वास या काळात खूप उंचावलेला असेल. तुमच्या नियोजनावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवा, त्यातून फळं आपोआप मिळत जातील. भविष्यातील मोठय़ा घटनांवर, मोठय़ा परिप्रेक्ष्यावर लक्ष केंद्रित करा. जेणेकरून जे तुम्ही मिळवू पाहता ते नक्कीच मिळेल.

रिलेशनशिप : २०१९ हे वर्ष रिलेशनशिपसाठी खूप सकारात्मक आहे. तुमची रिलेशनशिप आता प्रगती करत असून, वाङ्निश्चय, विवाह किंवा सीरियस कमिटमेन्ट या टप्प्यावर जाणार आहे. तुम्ही तुमच्या तत्त्वांवर टिकून राहणे गरजेचे आहे. टॅरो कार्डानुसार सर्व संधी तुमच्याकडेच येताना दिसत आहेत. भूतकाळात पाहिलेली स्वप्नं आता प्रत्यक्षात उतरतील. तुमच्या वाढदिवसाला मित्रमंडळी, कुटुंबीय आणि जोडीदाराकडून मिळालेली भेट तुमच्यासाठी अतिशय आश्चर्यकारक असेल आणि त्यातूनच तुम्हाला मस्त सुट्टी मिळू शकते. वृश्चिक राशीसाठी आयुष्यातील आनंद घेण्याचे हे दिवस आहेत.

शुभ महिना : एप्रिल : तुमच्या निर्णयावर ठाम राहा

सप्टेंबर : व्यक्त व्हा.

धनू (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

करिअर : हे वर्ष सावधानता बाळगण्याचे आहे. या वर्षांत अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात करावी लागेल. तसेच स्वत:शी खरेपणाने वागावे लागेल. कामाच्या ठिकाणी आपल्या कल्पना इतरांना सांगा, त्याचा तुम्हास फायदा होईल. तुम्ही उदास व्हाल तेव्हा तुमच्या नकारात्मक भावना किंवा भीती इतरांना सांगा. सर्व काही स्वत:च्या जिवावर पूर्ण होईल, यशस्वी होईल असे समजू नका. कधी कधी लोकांनी दिलेल्या छोटय़ा छोटय़ा सल्ल्यांनीदेखील तुमच्या अडचणी सुटू शकतात. नशिबाचे संकेत दुर्लक्षू नका. तुमच्या टॅरो कार्डनुसार जागा बदल, नोकरी बदल यांच्या शक्यता दिसून येतात.

आरोग्य : २०१९ हे वर्ष आरोग्यासाठी खूपच नशिबाचा हात देणारे आहे. आरोग्याबाबत तुम्ही अधिक दक्ष राहाल. एका वेगळ्या मार्गाने तुम्ही तरुण झाल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्हाला आवेडल असे काहीतरी सर्जनशील तुम्ही या वर्षी कराल आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद आणि समाधान मिळेल. टॅरो कार्डानुसार तुम्हाला प्रवासाचे योग आहेत. आरोग्यविषयक सुवार्ता मिळतील.

रिलेशनशिप : हे वर्ष रिलेशनशिपसाठी पुनर्जन्म ठरणार आहे. एखादी गोष्ट संपणे म्हणजे सर्व संपले असे नाही, तर त्यातून पुढे जात नवीन काही तरी घडवता येते. पुढील तीन महिन्यांत तुम्ही पूर्वीप्रमाणे ताजेतवाने नसलात तरी त्यानंतर मात्र तुम्ही नव्या ऊर्जेने, उत्साहाने सुरुवात कराल. तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक लोकांचा सहवास हा संपलेला असेल. ते तुमच्या भल्यासाठीच असेल. आणि तुम्ही नव्याने कामाला लागू शकाल. एखाद्या घटनेबाबत उगाच मनाला अपराधी वाटून देऊ नका, आनंदाने जबाबदारी स्वीकारा. तुमच्या पाठीमागे बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा.

शुभ महिना : जून : आíथक लाभ होतील.

जुल : गरिबांना मदत करा.

मकर (२१ डिसेंबर ते २० जानेवारी)

करिअर : या वर्षांशी संबंधित टॅरो कार्ड्स हे खूपच सकारात्मक लाभ दर्शविणारे आहेत. हा काळ तुमचा असणार आहे. सत्य आणि मनातले बोलण्याचा हा काळ असेल. हे वर्ष तुमच्या वाढीचे आणि शिकण्याचेदेखील आहे. दुसऱ्यांना तुमच्याकडून एखाद्याबाबतीत काही तरी कृती अपेक्षित असेल, पण कोणाच्याही दबावास बळी पडू नका. तुम्हाला  योग्य वाटेल तेच करा. सत्याची कास सोडू नका. खरे तेच बोला. त्याचे चांगले परिणाम होतील. दुसऱ्यांना तुमचे म्हणणे पटत नसले तरी तुम्ही अधिक व्यक्त होणे गरजेचे आहे. या वर्षांत तुमच्या कार्डानुसार तुम्हाला चांगल्या संधी मिळणार आहेत.

आरोग्य : येत्या वर्षांत आरोग्यात नव्याने सुधारणा घडविण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आपल्या आरोग्याबद्दलची भीती आणि शंका पूर्णत: दूर साराव्यात. तुम्ही निश्चित केलेले ध्येय गाठण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. पुढाकार घ्या आणि त्या दृष्टीने पहिले पाऊल उचला. नशीब तुमच्यासाठी संधी घेऊन येईल. आपल्या घराशेजारच्याच योगा वर्गात जावे, असे तुम्हाला वाटेल आणि असा वर्ग तुमचे नातेवाईक अथवा मित्रच सुरू करतील. आरोग्यदायी नवीन वर्षांचा आनंद घ्या.

रिलेशनशिप : २०१९ या वर्षांत रिलेशनशिपबद्दल तुम्ही अधिक संवेदनशील होणार आहात. तुम्ही तुमचा जोडीदार, नातेवाईक आणि मित्रांकडून अधिक अपेक्षा कराल. तुमच्या अंतर्मनाची साद ऐका. स्वत:ची काळजी घेण्यासाठी लाडकोड करायला हरकत नाही. वेळ येईल तेव्हा रिलेशनशिपला प्राथमिकता देण्याकडे कल ठेवा. स्वभावात थोडा मृदूपणा आणायला हवा. या वर्षी तुमच्या जोडीदाराचे मत तुम्ही बदलू शकता.

शुभ महिना : फेब्रुवारी : वाट पाहा आणि लक्ष द्या.

मे : रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

करिअर : करिअरच्या दृष्टीने तुम्ही वाट पाहात होता तो आनंदाचा काळ आता आलेला आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अनपेक्षित पण सुंदर अशा आश्चर्याचा अनुभव येई. तुमचा स्वत:चा व्यवसाय असेल तर एखाद्या चांगल्या आणि लाभदायी कराराचा लाभ होईल. स्त्रीकडून मिळणारी ऊर्जा (आई किंवा पत्नी) तुमच्यासाठी भाग्यकारक असेल. जुन्या सहकाऱ्यांशी, महाविद्यालयीन मित्रांशी भेट होईल. तुम्ही कामाच्या जागी जेवढा वेळ सहकाऱ्यांबरोबर घालवता तेवढाच, तसाच वेळ कुटुंबीयांबरोबरदेखील घालवणे या वर्षी गरजेचे आहे.

आरोग्य : येणारे वर्ष हे तुमच्यासाठी आरोग्यदायी वर्ष आहे. आरोग्यदायी असे निर्णय या वर्षी घ्या. तुमचे शरीर अधिक उत्तम, आरोग्यदायी होईल तेव्हा तुमचे आयुष्यदेखील नक्कीच बदलेल. तुम्ही एखाद्याकडून प्रेरणा घेऊन आरोग्यदायी दिनचर्या पाळण्यास सुरुवात कराल. चालण्याचा व्यायाम केलात तरी नसíगकरीत्या तुम्हाला बराच फायदा होईल. आरोग्यविषयक प्रश्नांबाबत कठोर, आडमुठे होऊ नका. मित्रांच्या संगतीत तुम्ही उत्तम आरोग्यदायी जीवनशैलीचा आनंद घ्याल.

रिलेशनशिप : या वर्षी रिलेशनशिपमध्ये स्पष्टता येईल. तुम्ही निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत असाल तर सर्व शंका दूर होणे गरजे आहे. अतिशय हुशारीने निर्णय घ्या. कोणत्याही क्षणी तुम्ही विचलित अथवा गोंधळून जाणे योग्य ठरणार नाही. वादविवाद टाळा. तुमच्या वाद घालण्याच्या स्वभावामुळे वातावरण दूषित होऊन लोक तुमच्यापासून दूर जातील. जवळच्या नातेसंबंधात तर वाद दूर ठेवणेच उत्तम. तुम्हाला उपाय शोधायचा असेल तर सौम्य दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तुमची शक्ती चांगल्या प्रकारे वापरली जाणे गरजेचे आहे.

शुभ महिना : जून : आíथक लाभ होतील.

ऑगस्ट : धर्याने सामोरे जा, संकटापासून

पळू नका.

 मीन (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

करिअर : मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अनेक गोष्टी साध्य करणारं असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची दखल घेतली जाईल. एखादी परीक्षा, नवीन नोकरी किंवा स्वप्नातील प्रकल्पाचे नेतृत्व यामुळे तुम्हाला अंतिमत: काहीतरी मिळवल्याचे, साध्य केल्याचे समाधान नक्की लाभेल. या वर्षांत तुमच्याकडे दांडगा आत्मविश्वास असेल. तुम्हाला या वर्षी एखादा पुरस्कार नक्कीच मिळेल.

आरोग्य : मीन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीनेदेखील फलदायी आहे. तुम्हाला खूप सकारात्मक आणि वेगवान फळ, मर्यादित परिश्रमात मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी हे वर्ष समाधानकारक आहे. या वर्षांत सर्व समाधानकारक गोष्टी घडतील जेणेकरून आयुष्यातील संतुलन पुन्हा साधले जाईल. आरोग्याच्या बाबतीत लोक तुमचा आदर्श स्वीकारतील, तुमच्याकडून सल्लादेखील घेतील. तुम्ही लोकांसाठी एक उत्तम आणि चांगले उदाहरण घालून द्याल. या आरोग्यदायी वर्षांचा आनंद घ्या.

रिलेशनशिप : येणारे वर्ष हे जुळवून घेण्याचे वर्ष असेल. तुम्ही आजवर रिलेशनशिपमध्ये घेतलेल्या मेहनतीचे फळ देणारे हे वर्ष असेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांकडून, मित्रमंडळींकडून चांगला आधार मिळेल. हा आधार विनाव्यत्यय असल्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणे गरजेचे आहे. तुमचे जवळचे मित्र, कुटुंबीय यांच्याबरोबर असताना त्यांना सहन करण्याचे कौशल्य तुम्हाला विकसित करावे लागेल. हे सर्व रिलेशनशिपच्या दृष्टीने गरजेचे आहे.

शुभ महिना : ऑगस्ट : अंतर्मनाचा विचार स्वीकारा

सप्टेंबर : स्वत:बरोबर टिकून राहावे लागेल.

First Published on January 4, 2019 1:04 am

Web Title: tarot astrology