टॅरो कार्ड या पद्धतीची सुरुवात काहींच्या मते इजिप्तमध्ये झाली, तर काहींच्या मते चीन अथवा भारतात झाली, पण टॅरो कार्डाच्या आधारे भविष्य वर्तविण्याचा सुरुवात झाली ती इटलीमध्ये. सुरुवातीला त्याला ट्रिनोफी म्हटले जात असे. सोळाव्या शतकात फ्रेंचांनी टॅरो कार्ड हा शब्द प्रचलित केला. टॅरो म्हणजे ७८ कार्डाचा सेट असतो. टॅरो कार्ड रिडींग म्हणजे केवळ त्या कार्डावरील चित्राचा अर्थ लावणे नाही तर दुसऱ्याच्या मनात डोकावणे. टॅरो रीडर उचलण्यात आलेल्या कार्डावर प्रश्नाचं उत्तर दृश्य स्वरूपात वाचतो. हे वाचन कौशल्य आणि दुसऱ्याच्या अंतर्मनात डोकावण्याच्या कौशल्याचा मिलाफ या प्रक्रियेत घडत असतो. येत्या वर्षांत बारा राशींच्या बाबतत काय घडेल हे टॅरोच्या माध्यमातून वर्तवण्यासाठी रिलेशनशिप, करिअर आणि आरोग्य यासाठी तीन कार्डाचा आधार घेण्यात आला आहे.

मेष
(२१ मार्च ते १९ एप्रिल)
रिलेशनशिप – येणाऱ्या वर्षांत रिलेशनशिपसाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत. अर्थातच २०१६ आपल्यासाठी नातेसंबंधात गुंतवणुकीसाठी उत्तम असले तरी त्यासाठी विश्वास, प्रयत्न, वेळ आणि आपली ताकद, ऊर्जा देऊन ते बळकट करावे लागतील. जे अजूनही रिलेशनशिपमध्ये नाहीत अशांसाठी हे वर्ष निर्णय घेण्यासाठी अगदी योग्य असे आहे. ज्यांच्या कठीण समयी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिला होता अशांकडून तुमच्या-बाबतीत कृतज्ञता व्यक्त होईल.
करिअर – उच्च शिक्षणासाठी येते वर्ष हे एकदम योग्य आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रमोशन मिळू शकेल. करिअरच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे परिपूर्ण ठरतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यामुळे जर काही अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर या वर्षी ही अडचण दूर होईल. अर्थात या अडचणी सोडवण्यासाठी शॉर्टकट वापरू नये, त्यासाठी योग्य तो वेळ द्यावा.
आरोग्य – आरोग्याचे प्रश्न निर्माण करणाऱ्या वाईट सवयी सोडून देण्याची ही वेळ आहे. वाईट सवयींमुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना कमी लेखू नका. चांगल्या सवयी अंगी बाणवून वाईट सवयी दूर करा. उशिरा झोपायची सवय लागली असेल तर रोज व्यायाम करा. जेणेकरून तुमच्या शरीराला लवकर चांगली झोप मिळेल.
उत्तम कालावधी – सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर

वृषभ
(२० एप्रिल ते २० मे)
रिलेशनशिप – यंदाच्या वर्षी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत भरपूर प्रवास करणार आहात. रिलेशनशिपमध्ये तुम्ही अव्यक्त राहू शकणार नाहीत. तुम्हाला मोकळेपणाने व्यक्त होण्याची हीच वेळ आहे. आणि उत्साहीदेखील असावे लागेल. नात्यातील ताजेपणा पुन्हा नव्याने आणण्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. अर्थातच हे वर्ष नातेसंबंधात सक्रीय राहण्यासाठी अनेक संधी देणार आहे. त्यामुळे सरत्या वर्षांप्रमाणे केवळ हातावर हात ठेवून वाट पाहत बसू नका. नातं टिकवण्यासाठी यंदाच्या वर्षी पैसे खर्च करावे लागणार नाहीत, तर वेळ आणि प्रयत्नांची गरज अधिक असेल.
करिअर – येणारं वर्ष हे अनेक संधी घेऊन येत आहे. तुमच्या कोशातून, भीतीतून बाहेर पडून अनेक गोष्टींत सफलता साध्य करण्याची संधी या वर्षी मिळणार आहे. नियती तुम्हाला संधी उपलब्ध करून देण्याचं काम करणार आहे, तुम्हाला पुढाकार घेऊन त्या संधीचं सोन करावं लागेल. कामच्या जागी पुढाकार घ्या, त्याचे बक्षीस नक्कीच मिळेल. तुमचा संकोच आणि भीती सोडून द्या. कामाच्या ठिकाणी नक्कीच लाभदायक घटना घडतील. तुमच्या यशाचा आनंद घ्या.
आरोग्य – तुमच्या आरोग्याबद्दल अतिविचार करण्याने कोणताही प्रश्न सुटणार नाही. आरोग्याच्या प्रश्नावर ताबडतोब तपासण्या करून घ्या. केवळ मनात ठेवण्याने नकारात्मकता मूळ धरते. संदेहकारक, भीतीदायक वातावरणात आयुष्य जगू नका. तार्किकदृष्टय़ा एकेक पाऊल टाका. आजच्या चांगल्या आरोग्याबद्दल कृतज्ञतेचा दृष्टिकोन बाळगा आणि याच दृष्टीने जगण्याचा आनंद घ्या.
उत्तम कालावधी – मे, जून, जुलै

मिथुन
(२१ मे ते २० जून)
रिलेशनशिप – नातेसंबधातील नव्याने सुरुवात नजीकच्या भविष्यात दिसत आहे. तुमच्या आयुष्यात एक नवीन टप्पा येत आहे. नव्या व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध लग्नापर्यंत पोहोचतील. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय येत्या वर्षांत घेतले जातील. मात्र जुने संबंध कडवटपणा देऊन संपतील.
करिअर – या वर्षी कामाच्या ठिकाणी आणि करिअरमध्ये काहीसे गोंधळ निर्माण करणारे पर्याय उभे राहतील. अतिशय काळजीपूर्वक विचार करून, विश्लेषण करून या प्रश्नांची उकल करा आणि निर्णय घ्या. जर तुमच्या आवडीचे काम नसेल तर ते टाळण्याची किंवा सोडून देण्याची आपली वृत्ती आहे. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही सर्वोत्तम काम करू शकता, त्यामुळेच पर्याय निवडताना तार्किकदृष्टय़ा विचार करा. तुमच्या मेंदूपेक्षा मनाचा विचार करून निर्णय घेणे हे व्यावहारिकतेला छेद देणारे असले तरी त्याचाच वापर करा. कारण कधी कधी तुमच्या भावना या विचारापेक्षा अधिक लॉजिकल असतात.
आरोग्य – तुमची शारीरिक प्रकृती उत्तम असेल, मात्र ताणतणावामुळे मानसिक प्रकृती बिघडलेली असेल. म्हणूनच योगसाधना, ध्यानधारणा आणि तणाव घालवणाऱ्या अन्य व्यायामांचा वापर करा. जेणेकरून तुमचे मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहील. अर्थातच त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. स्वत:च स्वत:ला शिकवण्याचा प्रयोग करू नका.
उत्तम कालावधी – जानेवारी, फेब्रुवारी, मार्च.

कर्क
(२१ जून ते २० जुलै)
रिलेशनशिप – येणारे वर्ष नातेसंबंधांच्या दृष्टीने अत्यंत भाग्यशाली असे आहे. या वर्षांत आपले नातेसंबंध आनंददायी निर्णयाप्रत पोहोचतील. तुम्ही खूपच हळवे असल्यामुळे नातेसंबंधात तुम्हाला कायमच पुन:पुन्हा खात्री आणि सुरक्षितता हवी असते. या वर्षी वाङ्निश्चय, विवाह किंवा पुत्रप्राप्तीच्या स्वरूपात तुम्हाला हा आनंद मिळू शकेल. कुटुंबातील सर्वच प्रकारच्या नातेसंबंधांच्याबाबतीत तुम्हाला एकप्रकारचे समाधान मिळेल. आणि हा आनंद आणि सौख्य तुम्ही घरातील सर्वाच्या सोबतीने अनुभवू शकाल. तुमचे कुटुंब तुमच्या सर्वच अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला संपूर्ण पाठिंबा देईल.
करिअर – या वर्षी कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल. तुमच्या मर्यादा आणि कमतरता सर्व बाजूला ठेवून तुमच्या बुद्धिमत्तेला संपूर्ण ताकदीने काम करण्यास वाव द्या. कामामध्ये महत्त्वाची मध्यवर्ती भूमिका घ्या आणि तुमचे कर्तृत्व उजळू द्या. भरपूर काम करा आणि त्याचा आनंद घ्या. करिअरच्या आणखीन पायऱ्या चढण्यासाठी तुम्हाला स्वत: सातत्याने ताजेतवाने आणि उत्साही ठेवावे लागेल. त्यामुळेच तुमचा रिकामा वेळ पूर्णपणे योग्य रीतीने वापरण्यावर भर द्या.
आरोग्य – या वर्षी कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांच्या फिगरवर आणि दिसण्यावर लक्ष द्यावे लागेल. वजन, कोलेस्टेरॉल नियंत्रणात राखण्यासारखी आरोग्याची उद्दिष्टे तुम्ही पूर्ण कराल. मूड स्विंग्जवर नियंत्रण राखा, बाकी सर्व गोष्टी आपोआप होतील.
उत्तम कालावधी – एप्रिल, मे, जून

सिंह
(२१ जुलै ते २० ऑगस्ट)
रिलेशनशिप – २०१६ हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध जपण्याचा आणि त्यांचे संतुलन साधण्याचा संदेश देणारे आहे. आपल्या जोडीदाराला उचित न्याय देऊ शकाल यावर लक्ष केंद्रित करा. नातेसंबंधांची गरज असणारे सर्व प्रयत्न करावे लागतील. अर्थातच त्याची चांगली फळेदेखील मिळतील. आपल्या जोडीदाराबरोबर असताना तुमचा १०० टक्के वेळ त्याचाच असला पाहिजे. त्यावेळी इतर कामात अडकू नका, एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष देऊ नका.
करिअर – आपल्या करिअरला गृहीत धरू नका. तुमचा हा निष्काळजीपणा तुमच्या नोकरीत अथवा करारामध्ये तुटलेपणा आणून आकस्मिक अडथळा निर्माण करू शकतो. तुमच्या व्यावसायिक संबंधावरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. समज-गैरसमजांचा गोंधळ दूर सारून, त्वरित निर्णयावर या. तुमच्या मंद प्रतिसादामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नुकसान होऊ शकते. येणारे वर्ष हे कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी संधी निर्माण करणारे आहे. तेव्हा तयारीत राहा आणि पुढे जाण्यासाठी संधीचा लाभ उठवा.
आरोग्य – तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही आजवर केलेल्या प्रयत्नांचे दृश्य स्वरूपातील फायदे या वर्षी तुम्हाला मिळणार आहेत. ज्या व्यक्तीने तुमचे आरोग्य सुधारावे म्हणून तुम्हाला उद्युक्त केले होते, मार्गदर्शन केले होते त्याला तुमची ही तंदुरुस्ती पाहून या वर्षी जणू काही बक्षीसच मिळाल्यासारखे असेल. त्या व्यक्तीचा सल्ला पाळणे सुरू ठेवा आणि नव्या वर्षांत चांगल्या आरोग्याने उजळून निघा.
उत्तम कालावधी – सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर

कन्या
(२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)
रिलेशनशिप – येणाऱ्या वर्षांत जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हे नातेसंबंध मार्गी लागणार आहेत. नातेसंबंधातील अनिर्णितता या वर्षी संपेल. तुम्ही पुढाकार घ्याल. ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या आयुष्यात या वर्षी स्थिरता येईल. तुमच्या भोवतीचे वातावरण हे सकारात्मकतेने भारलेले असेल आणि तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबीयांमध्ये तुमची प्रतिमा उजळेल. या वर्षी जुने गैरसमज विसरले जातील आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील.
करिअर – तुमच्या करिअरमध्ये मागील वर्षांत अनेक प्रयत्न राहून गेले आहेत. या वर्षी तुम्हाला गंभीरपणे आणि लक्ष केंद्रित करून झोकून द्यावे लागेल. सर्व प्रकारच्या परिणामांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल. २०१६ हे वर्ष तुमच्यासाठी परिपक्व होण्याचे आहे. सातत्याने सकारात्मक विचारांचा, कल्पनांचा खुराक स्वत:ला द्यावा लागेल. एकदा तुम्ही सर्वोत्तम दिल्यावर, तेच तुम्हाला या वर्षांखेरीस ईप्सित वाटेवर घेऊन जाईल.
आरोग्य – येणारे वर्ष हे आरोग्याबाबत सकारात्मक संदेश देणारे आहे. तुमच्यातील आदर्शवादी आहार आणि सभोवतालच्या आरोग्यशास्त्राची काळजी घेत असतोच. तुमच्यातील ही स्वभाववैशिष्टय़े अशीच पुढेदेखील जपत राहा, जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील.
उत्तम कालावधी – ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर

तूळ
(२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)
रिलेशनशिप – परीक्षा पाहणारे अनेक प्रसंग या वर्षी आपल्या नातेसंबंधात घडण्याची शक्यता आहे. अनेक गृहीत धरलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल. तुम्हाला त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आणि जोडीदाराला तुम्ही गृहीत धरलेले नाही हे समजावून द्यावे लागेल. तुमच्या मेहनतीला फळ नक्कीच मिळेल आणि २०१६ च्या मध्यावर नातेसंबंधातील स्थिरता पुन्हा प्राप्त होऊ शकेल. वेळ जाईल तसे सर्व काही चांगले होईल असे मानून चालणार नाही, त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील.
करिअर – या वर्षी तुमच्या कार्यक्षमतेवर तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल. ‘तुम्ही हे करू शकता’ हेच तुमचे ध्येय असेल. हे वर्ष तुमच्या कर्तृत्वाला उजळून टाकणारे आहे त्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला पुरेपूर वाव द्या. तुमची प्रतिमा निर्माण करणारे हे वर्ष आहे. तुमची क्षमता आतापर्यंत फक्त तुम्हालाच माहीत आहे, पण यापुढे तुमचे ग्राहक, वरिष्ठ, सहकारी आणि सर्वोच्च अधिकाऱ्यांपुढे ही क्षमता दाखवावी लागेल. त्याच वेळी तुमचे बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि स्थावर मालमत्तेवर बारीक लक्ष ठेवा, कारण या वर्षी तुम्ही फसवले जाण्यायोग्य परिस्थिती असेल.
आरोग्य – या वर्षी तुम्ही सेंद्रिय खाद्य, नैसर्गिक फळे आणि भाजीपाला यावर भर द्या. प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् वापरलेले अथवा डबाबंद, हवाबंद खाद्यपदार्थापासून दूर राहा. कारण पचनसंस्थेचे विकार होण्याची दाट संभावना आहे. पचनसंस्थेव्यतिरिक्त इतर आरोग्याची परिमाणे उत्तम असतील. निसर्गरम्य आणि खुल्या मोकळ्या हवेत भटका.
उत्तम कालावधी – सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर

वृश्चिक
(२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)
रिलेशनशिप – या वर्षी पूर्णत: तुम्हाला आतल्या आवाजावर अवलंबून राहायचे आहे. २०१५ मध्ये ज्या गोष्टी घडू शकल्या नाहीत त्यामध्ये अचानक सकारात्मकता निर्माण होईल. जे रिलेशनशिपमध्ये नसतील आणि एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात असतील, ते अखेरीस त्या व्यक्तीला त्यांच्या नातेसंबंधाविषयी असणारा प्रामाणिक आणि गंभीर उद्दिष्ट पटवून देतील. जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत, ते जोडीदारास त्याच्या योग्य निवडीची पुन्हा एकदा खात्री पटवून देतील. नातेसंबंधात प्रामाणिक राहा.
करिअर – या वर्षी कामाच्या ठिकाणी तुम्हाला क्रिएटिव्ह राहावे लागेल. क्रिएटिव्हिटी आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांचा मिलाफ साधलात तर तुम्हाला यश मिळवून देणारा उपाय मिळेल. वेगळा विचार करा आणि प्रगती साधण्याचा मानसिक रोड मॅप तयार ठेवा. यशप्राप्तीसाठी तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला अनेक तल्लख अशा चमकदार अशा युक्ती सुचवेल. त्यासाठी आपल्या मनाची पाटी कोरी ठेवा. आणि मग तुमचे मन तुम्हाला जे काही देईल ते आश्चर्यकारक असेल.
आरोग्य – तुमच्या अनियमित जीवनशैलीचे परिणाम भोगावे लागतात. झोप घेण्याच्या सवयी बिघडल्या आहेत. तुमच्या मनाच्या आवडींसाठी शरीर झिजत असते. तुमचे सामाजिक वर्तुळ आणि वेळापत्रकावर नियंत्रण मिळवा. नियमित नियंत्रित जीवनशैली हा खूप मोठा परिणाम करणारा प्रबळ घटक आहे हे लक्षात असू द्या.
उत्तम कालावधी – एप्रिल, मे, जून

धनू
(२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)
रिलेशनशिप – २०१६ हे वर्ष नातेसंबंध बळकट आणि स्थिर करणारे आहे. आपल्या जोडीदाराबद्दलची आभासी, काल्पनिक भीती आणि असुरक्षितपणा पूर्ण निवळणार आहे. सहजपणे मोकळेपणाने व्यक्त व्हा. अतिविचार आणि विचारांचा भडिमार करू नका. मन आणि बुद्धी यामध्ये गोंधळून जाऊ नका. मन आणि आपल्या स्वाभाविक अंत:प्रेरणांच्या मार्गाने पुढे जा. जोडीदारावर विश्वास ठेवा. आपल्या नातेसंबंधातील सर्व मोठय़ा अडचणी आता भूतकाळात गेल्या आहेत. २०१६ हे वर्ष आनंद आणि उत्साहाचे वातावरण आणणार असून, नातेसंबंधात स्थिरता देणारे असेल.
करिअर – या वर्षी करिअरमध्ये आणि कामाच्या ठिकाणी खूप काही शिकायला मिळणार आहे. भावनांचे ओझे कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून जे जे काही नवीन शिकायला मिळेल ते ते सारे आत्मसात करा. २०१६ चा शेवट हा तुमच्यासाठी नवीन काही तरी सुरू करणारा असेल. आणि आजवर जे काही शिकायले मिळाले आहे ते नवीन करिअरचा पाया रचणारे ठरेल. तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या एखाद्या सामाजिक कामात सहभागी व्हा. काही गोष्टी या आपल्या कर्मानुसार कराव्याच लागतात.
आरोग्य – तुम्हाला आवडणारा आळशीपणा आता थांबवावाच लागेल. तुमचा आहार आणि वजनावर नियंत्रण मिळावावे लागेल. हे वर्ष तुमच्या अंतर्शुद्धीचे आहे. इतरांच्या वैयक्तिक अडचणींचा विचार करणे, त्यावर उपाय शोधणे आणि त्या मार्गी लावणे बंद करा. ही भावनिक गुंतवणूक आणि त्याचे ओझे या वर्षीदेखील तुम्हाला पकडून ठेवण्याची शक्यता आहे.
उत्तम कालावधी – मे, जून, जुलै

मकर
(२१ डिसेंबर ते २० जानेवारी)
रिलेशनशिप – २०१६ हे वर्ष भावनिक गरजा पूर्ण करणारे आहे. जरी तुम्ही आर्थिकदृष्टय़ा किंवा कामाच्या अनुषंगाने ताणतणावात असलात तरी तुम्ही तुमच्या जोडीदारास आनंदी ठेवू शकाल. कारण भावनिकदृष्टय़ा तुम्ही समाधानी असाल. म्हणूनच तुम्ही मानसिकदृष्टय़ादेखील स्थिर राहाल. जोडीदाराशी कमिटमेंटबाबत निर्णय घेण्यास तुमच्या मनात अनिश्चितता असेल. त्यामुळे जोडीदार चिंताक्रांत होण्याची शक्यता आहे. पण हे वर्ष कमिटमेंट देण्यास वाव देणारे आहे.
करिअर – या वर्षी करिअरबद्दल, आयुष्यातील ध्येय आणि उद्दिष्टांबद्दल स्पष्टता मिळू शकेल. यशप्राप्तीसाठीचा मेंटल रोड मॅप तुमच्या डोक्यात तयार असेल आणि आता तुम्हाला तो कार्यान्वित करावा लागेल. लोक काय म्हणताहेत, काय म्हणतील याचा विचार न करता तुमच्या योजनेवर लक्ष केंद्रित करा. योजना कार्यान्वित करण्यासाठीचे तुमच्यातील दडलेले कौशल्य तुम्हाला सापडेल आणि उद्दिष्टांना चिकटून राहण्याचा आत्मविश्वास मिळवून देईल.
आरोग्य – या वर्षी तुम्ही अचानकपणे आरोग्यावर लक्ष केंद्रित कराल. नव्याने आहारशैली ठरवाल आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योजना आखाल. तंदुरुस्त शरीरच तंदुरुस्त बुद्धीला वाव देते हे तुम्हास जाणवेल. तुमच्या सर्व योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे काम हे शरीरच करत असते. तुमच्या शरीराला पर्याय नाही. अर्थातच जिमला जाणे हा याच योजनेचा एक भाग असेल.
उत्तम कालावधी – जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर

कुंभ
(२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)
रिलेशनशिप – हे वर्ष तुमच्या प्राथमिकतांचा समतोल साधणारे आहे. संतुलन साधण्याच्या तुमच्या कौशल्याची यंदा परीक्षाच पाहिली जाणार आहे. व्यावसायिक काम आणि कुटुंब, सामाजिक जीवन आणि कुटुंब यांच्यामधील ओढाताण चरणसीमेवर पोहोचेल. सर्वाना आनंदी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वत:चे आयुष्य दु:खी करण्याचा मार्ग म्हणावा लागेल. तुमच्यासाठी नेमके काय महत्त्वाचे आहे हे निवडण्याची ही वेळ आहे. अडचणीच्या प्रसंगी आपल्या प्राथमिकतांची परीक्षा पाहिली जाते, पण तुमच्यासाठी वर्षांच्या सुरुवातीपासूनच ही परीक्षा सुरू होणार आहे.
करिअर – तुम्ही किती प्रयत्न करता यावर किती यश मिळणार हे अवलंबून असते. या वर्षी तुम्ही २०१५ मध्ये केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळणार आहे. अर्थातच यापुढे तुमच्याकडून अधिक रिझल्टस्ची अपेक्षा वाढणार आहे. २०१६ या वर्षी तुमच्या कामाच्या ठिकाणी भरपूर घडामोडी घडणार आहेत.
आरोग्य – येणाऱ्या वर्षांत तुमची प्रकृती स्थिर असेल. अर्थातच स्वनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या तुमच्या आवडीच्या धूम्रपान, जंक फूड, उशिरापर्यंत जागरण, पाटर्य़ा अशा सवयींचा आनंद घेत राहिला नाहीत तरच तुम्ही स्थिर आरोग्य टिकवू शकाल.
उत्तम कालावधी – जानेवारी, फेब्रुवारी, मार्च

मीन
(२० फेब्रुवारी ते २० मार्च)
रिलेशनशिप – २०१६ हे वर्ष नातेसंबंधांची नव्याने सुरुवात करणारे असेल. जुना पॅटर्न बदलेल आणि तुमचे नातेसंबंध नव्या पॅर्टननुसार अत्यंत योग्यरित्या हाताळण्यासारखी परिस्थिती असेल. कम्फर्ट झोन असणारी जुनी व्यवस्था सोडून बदलण्यास कायमच प्रतिरोध होत असतो. मात्र जसजसे वर्ष पुढे जाईल तसे नव्या पॅटर्नमधला उत्साह तुमच्या नातेसंबंधात ताजेपणा आणेल. या बदलाचे आनंदाने स्वागत करा.
करिअर – २०१६ हे वर्ष तुमच्यासाठी भरपूर यश देणारे असल्यामुळे कामाच्या ठिकाणी सेलिब्रेशनचा आनंद मिळेल. अर्थातच तुमच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव देऊन नवनव्या संकल्पना, युक्त्या तुम्हाला सतत प्रकाशझोतात ठेवतील. सहकाऱ्यांबरोबर मिसळून जाण्यामुळे चांगले संबंध तयार होतील.
आरोग्य – हे वर्ष तुम्हाला आणखीनच तरुण वाटणारे आहे. तुमच्या मनाला शरीराची संपूर्ण साथ मिळाल्यामुळे तुम्ही भरपूर प्रवास कराल, अनेक माणसांना भेटाल, संपर्क वाढवाल आणि अर्थातच त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकरीत्यादेखील तंदुरुस्त राहाल. योगसाधना आणि व्यायामालादेखील पुरेसा वेळ देता येईल.
उत्तम कालावधी – जानेवारी, फेब्रुवारी, मार्च
जागृती मेहता -response.lokprabha@expressindia.com