आत्माराम परब

नेहमीची लोकप्रिय ठिकाणं पाहायला जाणाऱ्या पर्यटकांकडून खूपदा ऑस्ट्रेलिया हा भटकंतीचा पर्याय बाजूला सारला जातो. खरं तर या देशात पाहण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

जगभरात भटकंती सुरू असतानाच एक खंडप्राय देश मात्र तसा लांबच राहिला होता. तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. त्यातच एके दिवशी सिडनी आकाशवाणीचे आमंत्रण आले. त्यासाठी एक मराठी गृहस्थच कारण ठरले, ते म्हणजे  डॉ. विजय जोशी. ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा तेथील सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेले ते एकमेव भारतीय. त्यांच्याच प्रयत्नांतून २० वर्षांपूर्वी सिडनी आकाशवाणीची सुरुवात झाली होती. भारतातून ुसिडनीत गेलेले राजकारणी असोत, पत्रकार असोत की कलाकार, ते विजय जोशींना भेटले नाहीत असे होतच नाही. आकाशवाणीच्या कार्यक्रमाबरोबरच मग नेहमीच्या सवयीने देश धुंडाळण्यासाठी म्हणून सात-आठ दिवस हाताशी ठेवले.

या देशातल्या वातावरणात आणि भौगोलिकतेमध्ये भारतासारखीच विविधता आहे. निसर्गाची उधळण अगदी मनसोक्त अशीच आहे. येथे हिमप्रदेश आहे, वाळवंट आहे, समुद्रकिनारे आहेत आणि रेन फॉरेस्टदेखील आहे. पण तुलनेने वाळवंटाने बराच भाग व्यापला आहे. जवळपास ३५ टक्के इतका. येथील या सर्वच वाळवंटी भागात अगदीच तुरळक म्हणावी अशी विखुरलेली थोडीफार वस्ती आहे. नियमित पर्यटकांसाठी तशा सोयीसुविधा कमीच. त्यातही ऑस्ट्रेलियन सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी बरीच मेहनत घेत असते. पण बहुतांश पर्यटनाचा ओघ हा सिडनी, मेलबर्न या भोवतीच आहे.

दक्षिणेकडील मेलबर्न ते पूर्वेच्या केन्सपर्यंत आणि पश्चिमेला पर्थ हे भाग बऱ्याच वस्तीचे आहेत. राजधानी कॅनबेरा येथे तुलनेने कमी वस्ती आहे. ऑस्ट्रेलियातील डोंगररांगा या ऑस्ट्रेलियन आल्प्स म्हणून ओळखल्या जातात. पण सर्वाधिक उंची केवळ सात हजार फूट. हा डोंगराळ भाग आणि वाळवंटी प्रदेशात जायचे तर प्रवासाचा वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. किमान दिवसभराचा प्रवास केल्याशिवाय आपण तेथे पोहोचतच नाही. पण तेथील काही ठिकाणे अनुभवणे हे निव्वळ आनंददायी प्रकरण आहे. उलुरू राष्ट्रीय अभयारण्यातील आयरस रॉक हा त्यापैकीच एक. डोंगर वाटावा असा हा प्रचंड मोठा वालुकाश्म खडक आहे. सॅण्डस्टोन मोनोलिथ अशी याची ओळख आहे. येथे जायचे तर ते केवळ सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी. त्यावेळी या मोनोलिथवर पडलेला प्रकाश आणि त्यामुळे झगमगून उठून दिसणारा तो मातकट केशरी रंग डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. किमान तीन एक किमीवरूनच हा पूर्ण फोटोफ्रेममध्ये बसतो. याशिवाय तेथे अन्य काही प्रेक्षणीय नाही. पण येथे पोहोचायला सिडनीपासून २८०० किमीचा विमान प्रवास करावा लागतो. हे ठिकाण ऑस्ट्रेलियाच्या मध्यावर आहे.

ऑस्ट्रेलियाचे शासन आणि प्रशासन हे पर्यटकांसाठी कसे लोकाभिमुख आहे याचे उत्तम उदाहरण दिसते ते कुरंडा रेनफॉरेस्ट येथे. २७१ चौरस किमीचे हे जंगल पाहण्यासाठी येथील प्रशासनाने अनेक सोयी केल्या आहेत. केवळ जीपमध्ये बसून जंगल सफारी करायची आपल्याला सवय असल्यामुळे हे जंगल पाहणं एक वेगळाच अनुभव आहे. रेल्वे, रोप वे, बोटिंग आणि पायी चालणं अशा चार प्रकारे हे जंगल आपण फिरू शकता. उत्तर क्वीन्सलॅण्डमधील केन्स या गावाजवळ हे जंगल आहे. केन्सला पोहचायचे असेल तर गोल्ड कोस्टची भटकंती झाल्यावर एक तासात विमानाने जाता येते. केन्समधून एक खास हेरिटेज रेल्वे कुरंडासाठी सोडली जाते. या रेल्वेच्या तिकिटातच (साधारण ९० ऑस्ट्रेलियन डॉलर) जंगलातील इतर प्रवासाच्या तिकिटांचा समावेश असतो. रेल्वेत बसल्यावर कॉमेंट्री सुरू होते आणि टीव्हीवर त्यानुसार जंगलाची दृश्यं. जंगलातून, डोंगरकडय़ावरून होणारा हा रेल्वे प्रवास खूपच सुखावणारा आहे. जंगलातील रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर आपल्यासाठी तीन पर्याय असतात. रोप वे, पायी चालणे किंवा बोटीतून फिरणे. पैकी रोप वे एकूण तीन टप्प्यांमध्ये आहे. तुम्हाला हवा तो पर्याय निवडून तुम्ही दिवसभरात केव्हाही भटकू शकता. पायी चालण्याचे ट्रेल सोडले तर इतर साधनांचा वापर एकदाच करण्याच्या शुल्काचा तुमच्या तिकिटात समावेश आहे. सर्व ठिकाणी मार्गदर्शक आणि दिशादर्शक फलक आहेत. रोप वे मधून जाताना मधल्या टप्प्यांवर उतरून व्ह्य़ूू पॉइंटवरून फोटोग्राफी करता येते. मात्र हे सर्व करण्यासाठी एक मर्यादित जागा आखून दिलेली असते. ती सोडून उगाच कुठेही जंगलात घुसता येत नाही.

जंगलात प्राणी फारसे नाहीत, पण पक्ष्यांची रेलचेल आहे. रंगीबेरंगी पक्षी येथे बागडत असतात. दिवसभर मनसोक्त भटकून पुन्हा सायंकाळी हेरिटेज रेल्वेने केन्सला परतायचं. जंगल पाहण्याचा हा अगदी वेगळा अनुभव आहे. पण ऑस्ट्रेलिया म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारा कांगारू मात्र येथे नाही. तो पाहायचा असेल तर मुख्य शहरांपासून आतमध्ये गवताळ जंगलाकडे जावं लागतं. आणि तेथेदेखील त्याचं दर्शन हमखास होईलच असं नाही. पण त्यासाठीच शहरांपासून दुसऱ्या शहराला जातानाच्या वाटेवर किंवा शहरांच्या जवळच कांगारू फार्म तयार केलेले आहेत. तेथे त्या कांगारूंचं प्रजननदेखील होतं. एक दोन चौरस किमी परिसरातील या फार्मवर कांगारू हमखास पाहता येतात.

केन्सला येण्यापूर्वी भेट द्यायचे ठिकाण म्हणजे गोल्ड कोस्ट. क्वीन्सलॅण्ड प्रांतातील ब्रिस्बेन या राजधानीच्या शहरापासून ६६ किमीवर असलेले हे किनाऱ्यावरील शहर. कधीकाळी अगदीच वसाहत नसलेले, ब्रिस्बेनच्या उच्चभ्रूंचे हे एकांतातील सुट्टीचं ठिकाण होतं. पण आज हे प्रचंड गर्दीचं शहर आहे. मुख्यत: विविध थीम पार्क्‍स, कॅसिनोज, बीच हॉलीडेची सुविधा असणारी ठिकाणं यामुळे हे शहर पर्यटकांच्या नकाशावर असतं. मुख्य शहरालाच सात किमीचा सरळसोट असा समुद्रकिनारा लाभल्यामुळे तर येथे गर्दी असते. हजारो लोक सनबाथ घेत असतात. ऑस्ट्रेलियाच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगाचं देखील मुख्य ठिकाण आहे. टूरमधील दोन दिवस गोल्डकोस्टला आणि दोन दिवस केन्सला असा ठेवणं इष्ट ठरतं.

ऑस्ट्रेलिया बेट असल्यामुळे तेथे समुद्री जैववैविध्य आहे. त्यातही ग्रेट बॅरिअर रिफ म्हणजे तर मरिन लाइफचा खजिनाच आहे. कैक किमीवर पसरलेले मरिन लाइफ येथे अनेक प्रकारे अनुभवता येतं. नितळ पाणी आणि त्यामध्ये असणारे कोरल्स, मासे, वनस्पती असं सारं धुंडाळण्यासाठी जगभरातील पाणबुडे येथे येत असतात. हौशी पर्यटकांसाठी स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायिव्हगची सोय आहे. पण सध्या येथे जरा जास्तच गर्दी आहे. चार पसे खर्च करायची तयारी असेल तर येथील हेलिकॉप्टर राईड नक्की घ्या. तुम्हाला या राईडमध्ये निळ्याशार नितळ समुद्राच्या तळाशी विवरसदृश तळं आणि कैक किमी पसरलेले जैववैविध्य पाहायला मिळते. ही राईड पसे वसूल करणारी आहे.

गर्दी होणारं समुद्रकिनाऱ्यावरील आणखी एक ठिकाण म्हणजे फिलिप आयलंड. शेकडोंच्या संख्येने असलेल्या पेंग्वीन्सची परेड इथे पाहायला मिळते. इथे पोहोचायला मेलबर्नहून अडीच तासांचा प्रवास करावा लागतो. त्यातच पाहण्याच्या जागेवरून पेंग्वीन खूप दूरवर असतात. समुद्राकडून पेंग्वीन परत त्यांच्या घरटय़ात जाताना सूर्यास्ताच्या वेळी तेथे हजर राहावं लागतं. त्यामुळे प्रकाशदेखील मर्यादितच असतो. येथील पेंग्वीनदेखील अगदीच छोटे आहेत. पण तीनपट प्रवेश फी भरून पेंग्वीनच्या वाटेजवळच्या ग्लास हाऊसमध्ये जाता येतं. समुद्रातून येणाऱ्या झुंडी दोन रस्त्यांकडे जाताना काचेतून पाहता येतं. मेलबर्नहून दुपारी तीन वाजता निघाले की रात्री परतायला ११ वाजतात.

ऑस्ट्रेलियात निसर्गाने साकारलेली कमाल पाहायची असेल तर मात्र ग्रेट ओशिअन रोडला अवश्य भेट द्यावी. मेलबर्नहून दोन तासांच्या प्रवासात आपण येथे पोहोचतो. हा रस्ता बांधला गेला तो पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियात परतलेल्या सनिकांकडून. समुद्रकिनाऱ्याला लागूनच लाईम स्टोनच्या छोटय़ा टेकडय़ा आहेत. पण अतिशय मऊ अशा मातीमुळे आणि समुद्राच्या लाटांमुळे इरोजन होऊन अनेक वालुकामय रचना नैसर्गिकरीत्या तयार झाल्या आहेत. कुठे कमानी आहेत, कुठे गुहा, तर कुठे एकांडा असा एक ठोकळा. असेच १२ ठोकळे मग ट्वेल्व्ह अपोस्टलेस (The Twelve Apostles) म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्याभोवती कथादेखील गुंफली गेली. सध्या या १२ ठोकळ्यांपैकी आठच शिल्लक राहिले आहेत. आणि काही नव्याने तयार होत आहेत. येथेदेखील हेलिकॉप्टर राईड आहे आणि चालत फिरायचं असेल तर दोन-तीन तास खर्ची पडतात. वाटेत व्ह्य़ूू पॉइंट तयार केले आहेत. त्यावरून या सर्व नैसर्गिक आकारचित्रांचा आनंद घेता येतो. मेलबर्नहून जाऊन येऊन दिवस जातो, पण सत्कारणी लागतो.

बाकी मेलबर्न आणि सिडनी शहरात भटकायला, पाहायला अनेक गोष्टी आहेतच. नाइट लाइफ आहे. तसंच क्रिकेटप्रेमींसाठी मेलबर्नचं क्रिकेट मदान म्हणजे बोनसच आहे. दोन तासांची मस्त गाइडेड टूर आहे.

सिडनीत गेल्यावर हार्बर ब्रीज आणि ऑपेरा हाऊस पाहिल्याशिवाय ही भटकंती पूर्ण होत नाही. १९३२ साली बांधलेला १३५ मीटर उंच असा स्टीलचा हार्बर ब्रीज खाडीवर बांधलेल्या पुलांमध्ये जगातील सर्वात उंच आहे. त्याला असलेला तो विशिष्ट आर्च आणि त्या खालून जाणारी अगदी भलीमोठी क्रूझ हे सारंच विस्मयकारी आणि प्रेक्षणीय आहे. या आर्चवरून चालत जाण्याची टूरदेखील आहे. पण ती बरीच महागडी म्हणजे जवळपास १२० डॉलर्स इतकी आहे. सर्व सुरक्षा साधने वापरून तास दीड-तासांची ही टूर करणारे अनेकजण आहेत. त्यामध्ये वाटेत लावलेल्या कॅमेऱ्यातून तुमचे फोटो काढले जातात, व्हिडीओदेखील. (त्यासाठी पुन्हा वेगळे पसे मोजावे लागतात.) पण तुम्हाला या हार्बर ब्रीजवरून चालत जायचं असेल तर रस्त्याच्या दोहोबाजूस पदपथाची सोय आहे.

हार्बर ब्रीजच्या पलीकडे लगेच ऑपेरा हाऊस आहे. ऑस्ट्रेलियाची ओळख सांगणारी ही वास्तू जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केली आहे. तशी ही वास्तू अगदी अलीकडची म्हणजे १९७३ ची, पण तिच्या वास्तू वैशिष्टय़ामुळे तिचा समावेश वारसा स्थळात झाला आहे. परफॉìमग आर्ट सेंटर असल्यामुळे सतत काही ना काही कार्यक्रम येथे सुरू असतात. ते पाहायचे असतील तर शुल्क भरून प्रवेश मिळतो. पण त्याव्यतिरिक्त ऑपेरा हाऊस पाहायला एक तासाची टूर आहे. २७०० सीट्स, १५०० सीट्स आणि ४०० सीट्स अशी अवाढव्य प्रेक्षागृह येथे आहेत. ऑपेरा हाऊसचा परिसर खूप सुंदर आहे. मोकळी जागा आहे, दुकानं आहेत, रेस्टॉरन्टस आहेत, बोटिंग आणि बरंच काही. हार्बर ब्रीजवर ३१ डिसेंबरला केली जाणारी फटाक्यांची खास आतषबाजी पाहायला प्रचंड गर्दी होते. लहान मुलांसाठी ही आतषबाजी दहा वाजतादेखील केली जाते.

संपूर्ण ऑस्ट्रेलिया पाहायचा तर खूप वेळ काढावा लागेल. इथे अंतर्गत भागात राकट पण सुंदर निसर्ग आहे. शिवाय तो पाहण्यासाठी वेळ आणि पसे दोन्ही खर्च होतात. शक्यतो न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया अशी संयुक्त टूर घेतली आणि वरील ठिकाणं पाहिली तरी बरंच काही वेगळं पाहिल्याचा आनंद मिळेल. हा देश पर्यटकस्नेही असल्यामुळे कोणत्याही अडचणी नाहीत, त्यामुळे हा देश आपल्या बकेटलिस्ट मध्ये वाढवायला हरकत नाही.