13 July 2020

News Flash

अश्मयुग ते २१वे शतक मृत्यूविषयक श्रद्धा-परंपरांचा प्रवास

मृत्यूची भीती अश्मयुगापासूनच मानवी मनात उत्क्रांत होत आली आहे.

मृत्यूचे गूढ वाटण्यापासून ते मृत्यूनंतरच्या जगापर्यंतच्या श्रद्धा- परंपरा या अश्मयुगापासून ते २१ व्या शतकापर्यंत जगभर रूढ होत गेलेल्या दिसतात. महाश्मयुगीन स्मारक

शमिका वृषाली, twitter – @shamikavrushali / response.lokprabha@expressindia.com
मृत्यूची भीती अश्मयुगापासूनच मानवी मनात उत्क्रांत होत आली आहे. त्यामुळेच मृत्यूचे गूढ वाटण्यापासून ते मृत्यूनंतरच्या जगापर्यंतच्या श्रद्धा- परंपरा या अश्मयुगापासून ते २१ व्या शतकापर्यंत जगभर रूढ होत गेलेल्या दिसतात.

जीवसृष्टीतील माणूस या प्राण्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर प्राण्यांच्या तुलनेत स्वत:चे असे वेगळे अस्तित्व निर्माण केले. याच प्रतिभेमुळे त्याच्या महत्त्वाकांक्षाही बळावल्या, जगज्जेते होण्याची मनीषा त्याने बाळगली. असे असले तरी एका गोष्टीला त्याला जिंकता आले नाही, ती म्हणजे मृत्यू! आपल्या बुद्धीच्या जोरावर माणसाने मृत्यूशी पाठशिवणीचा खेळ नक्कीच खेळला, परंतु आपण मर्त्य आहोत हे सत्य मात्र त्याला बदलता आले नाही. किंबहुना मृत्यू किंवा तत्सम संबंधित अंत्येष्टी, पितर, श्राद्ध असे विषय निघाले तरी माणसाचे मन तसेच मेंदू अनेक भीतीयुक्त जाणिवांनी संकोचून जातो. या भीतीला आज कितीही निरनिराळे पदर असले तरी मानववंशशास्त्रानुसार मृत्यूच्या या भीतीची पाळेमुळे ही मानवी उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यावरच सापडतात. ज्याप्रमाणे ‘जन्म’ हा आदिम मानवासाठी चमत्काराचा क्षण ठरला आणि नवसृजनतेच्या त्या क्षणांमध्ये मानवाला मातृशक्तीचे दर्शन झाले, त्याचप्रमाणे ‘मृत्यू’ हीदेखील विचारक्षम मानवासाठी अभूतपूर्व घटना ठरली! याच अभूतपूर्व घटनेचे कारण शोधताना, ठोकताळे मांडताना, मागोवा घेताना न उलगडलेल्या गणिताच्या आकडेमोडीची भीती बालमनावर कोरली जावी त्याप्रमाणे मृत्यूच्या रहस्याचे गूढ, मानवी मनावर विकासाच्या प्रारंभिक टप्प्यावरच कोरले गेले. म्हणूनच प्राचीन काळापासूनच मृत्यूकडे जिज्ञासा, रहस्य, भय, आस्था आणि श्रद्धा याच दृष्टिकोनातून माणूस पाहत आला आहे. मृत्यूच्या याच रहस्यमयी अस्तित्वातून आत्मा, मृत्यूनंतरचे जग ही जाणीव पुढे आली, त्याच जाणिवेतून मृत्यूनंतरच्या प्रवासाची व त्याच्याशी संलग्न संस्कारांची सुरुवात झाली. म्हणूनच आधुनिक जगातही मरणोत्तर जगाचा अभ्यास करण्यासाठी एस्कोटोलॉजीसारखे शास्त्र विकासित झालेले दिसते.

भारतापुरता विचार करायचा तर मृत्यूनंतरचे संस्कार हे अंत्येष्टी, श्राद्ध या नामप्रयोजनांनी संबोधले जातात. मृत्यू हा अटळ आहे हे सत्य स्वीकारूनच अंत्येष्टीला भारतात १६ संस्कारांमधील अविभाज्य संस्कार मानले आहे. मृत्यू, मृत्यूनंतरचे जग, अंत्येष्टी, श्राद्ध यांचे आत्ताचे स्वरूप दहन, पिंड, तर्पण, वाडी दाखवणे यांसारख्या काही परिचित संज्ञांच्या माध्यमातून आपल्याला माहीत असते. परंतु प्राचीन भारतात या संस्कारांचे स्वरूप कसे होते? सध्या अस्तित्वात असलेल्या प्रथा परंपरांवर प्राचीन मानवाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा काही परिणाम झाला आहे का? या बद्दल विचार करणे म्हणूनच गरजेचे ठरते.

याआधी नमूद केल्याप्रमाणे श्रद्धा-अंधश्रद्धा या मानवाच्या अस्तित्वाबरोबरच उदयास आल्या. म्हणूनच मृत्यू, मृत्यूनंतरचे जग या विषयीच्या प्रथांची पाळेमुळे ही आपल्याला मानवाच्या आदिम भटक्या कालखंडापासूनच सापडतात, त्याला आपण इतिहासपूर्व कालखंड म्हणून ओळखतो. या कालखंडात मनुष्य हा विकासाच्या प्राथमिक टप्प्यावर भटके आयुष्य जगत होता. इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करत असे. याच मनुष्यप्राण्याचे नंतर नागरिकात रूपांतर होत असताना मानवी जीवनात अनेक बदल घडून आलेले दिसतात. मृत्यू व त्याच्याशी निगडित परंपरा- संकल्पना यादेखील याच परिवर्तनाचा अविभाज्य भाग आहेत. जगाच्या इतिहासात मानवाच्या मृत्यू संस्कारांची खरी सुरुवात निएण्डरथल मानवापासून झाली असे अभ्यासक मानतात. तर भारतातही प्राचीन मृत्यू संस्कारांचे पुरावे हे अश्मयुगातच सापडतात. उत्तरपुराश्मयुगीन मानवाची संस्कारित दफने मध्य प्रदेश येथील भीमबेटकासारख्या (१० हजार वर्षांपूर्वीच्या) अश्मयुगीन गुहांमध्ये सापडलेली आहेत. मुळातच अश्मयुगाचे ‘पुराश्मयुग’, ‘मध्याश्मयुग’ (१० ते १२ हजार वर्षे), ‘नवाश्मयुग’ (साधारणपणे आठ ते नऊ  हजार वर्षांपूर्वी) असे तीन भागात विभाजन केले जाते. हे केवळ तीन भाग नसून हे मानवी उत्क्रांतीच्या विकासाचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. भारतातील उत्तर पुराश्मयुगीन मानवाची दफने ही आद्य अंत्येष्टी संस्कारांची द्योतक आहेत. पुराश्मयुगाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच उत्तरपुराश्मयुगात मानवाने भटक्या आयुष्याकडून स्थिर आयुष्याकडे वाटचालीला सुरुवात केली होती. याच स्थित्यंतराच्या उंबरठय़ावर मृत्यूनंतरच्या जगताची मानवी मनाला चाहूल लागलेली दिसते. या उत्तरपुराश्मयुगीन दफनांमध्ये अंत्येष्टी सामग्रीच्या स्वरूपात दगडापासून तयार केलेली हत्यारे, प्राण्यांची हाडे, आभूषणे यांसारख्या वस्तू पुरातत्त्व अभ्यासकांना सापडलेल्या आहेत. मृत व्यक्तीसोबत त्याच्या आवडीच्या वस्तू दान करणे किंवा त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याच्या सोबत पुरणे, ही प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वात होती हे दर्शविणारे उत्तम उदाहरण भीमबेटकामध्ये पाहायला मिळते.

या शिवाय अनेक पुरातत्त्वीय स्थळांवर अशाच स्वरूपाची काही उल्लेखनीय उदाहरणे सापडतात. राजस्थानमधील बागोर येथे मध्याश्मयुगीन मृतदेह उत्तर-दक्षिण पुरल्याचे दफनांमध्ये पाहायला मिळते. तर गुजरातमधील लांघनाज या ठिकाणी मध्याश्मयुगीन १४ संस्कारित मानवी सांगाडे उत्खननात सापडले. त्यातील १३ सांगाडे हे पूर्व-पश्चिम डाव्या कुशीवर पोटाजवळ पाय दुमडून झोपवलेल्या स्थितीत सापडले तर एक सांगाडा सरळ पाय असलेल्या स्थितीत सापडला आहे. येथेही मृतांसोबत दगडी हत्यारे तसेच इतर वस्तू मिळालेल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे लांघानाज येथे मृतासोबत कुत्रा पुरलेला सापडतो. बघहीखोर, लेखहिया, चोपणीमाण्डो, सराई नाहर राय, महादहा, दमदमा यांसारख्या उत्तर प्रदेशातील मध्याश्मयुगीन स्थळांवर अनेक संस्कारित दफने मिळाली आहेत. येथील दफने ही बहुतांश उत्तर-दक्षिण पुरलेल्या स्थितीत सापडतात तर काही पश्चिम-पूर्व अशी सापडतात. या दफनांसोबत आभूषणे (कर्णकुंडले, हरिणाच्या शिंगापासून तयार केलेल्या माळा), शस्त्रे-हत्यारे यांसारख्या वस्तू पुरलेल्या सापडल्या आहेत. मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात मृत्यू तसेच तत्संबंधी प्रथा- परंपरांचा मागोवा घेताना प्रकर्षांने जाणवणारी गोष्ट म्हणजे मृत्यूची भीती मानवी अस्तित्वाबरोबरच उदयास आलेली असली तरी मृत्यूनंतरचे संस्कार हे मानवी विकासासोबतच टप्प्याटप्प्याने विकसित होताना दिसतात.

उत्तरपुराश्मयुग व मध्याश्मयुग हे भारतीय इतिहासात मानवाला स्थैर्य प्रदान करणारे आहे, या काळात मानवाने नैसर्गिक गुहांचा वापर राहण्यासाठी केला, शेती केली नाही परंतु निसर्गात उपलब्ध असणाऱ्या रानटी धान्याचा मानवाने आहारात समावेश केला. पुढच्या प्रगतीच्या टप्प्यात मानवाने शेती करायला सुरुवात केली, हा काळ नवाश्मयुग म्हणून ओळखला जातो. शेतीच्या आगमनाने अश्मयुगीन भटका मनुष्य स्थिरावला. दगडच सर्वस्व असणाऱ्या मानवाने याच कालखंडात कच्च्या मातीच्या भांडय़ांचा वापर सुरू केला. या वापरातून धान्य साठवण्यासारख्या गरजा तो भागवत असे. याच टप्प्यावर अंत्येष्टी विधींमध्येही काळाचे हे परिवर्तन जाणवते. काश्मीरस्थित बुर्झाहोमसारख्या नवाश्मयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर अंडाकृती दफने सापडलेली आहेत. येथे मृतासोबत कुत्रा, बकरी यांसारखे प्राणी पुरलेले दिसतात, तर मृताच्या अंगावर गेरूचा वापर केल्याचे पुरावे मिळतात, ही गोष्ट विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. याशिवाय नवाश्मयुगीन दफनात कच्च्या मातीच्या भांडय़ात धान्यं, आभूषणे ठेवलेली सापडतात. या पुराव्यांमुळे मृत्यूनंतरचे जग ही संकल्पना अधिक दृढ होत असल्याचे या काळात लक्षात येते. पुढच्या टप्प्यात माणूस नागरीकरणाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला. मानवाला धातूचे वेध लागले. तांब्याच्या वापरासोबत त्याने ताम्रपाषणयुगात प्रवेश केला. या काळी सापडणारी दफने ही उत्तर दक्षिण किंवा पश्चिम-पूर्व सापडतात तर मृतांसोबत भाजलेल्या मातीच्या मडक्यात आभूषण, खाद्यपदार्थ पुरलेले सापडतात. महाराष्ट्रातील जोर्वे येथे याच काळातली दफने सापडलेली आहेत. या काळातील काही दफने ही घरातच फरशीच्या आत किंवा अंगणात पुरलेली आहेत. तर काही ठिकाणी लहान मुलांची शरीरे ही गर्भातील बाळाप्रमाणे मातीच्या मडक्यात पोटाजवळ पाय दुमडलेल्या स्थितीत जमिनीत पुरलेली होती. मातीच्या कुंभाचा गर्भाशी, सृजनतेशी, मृत्यूशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी हे उदाहरण महत्त्वाचे ठरते. मातीच्या कुंभाला गर्भाचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच नवरात्रीच्या नऊ  दिवसांत याच गर्भस्वरूपी मातीच्या कुंभात धान्य रोपण करून धरणीच्या सृजनाची-मातृशक्तीची पूजा मांडली जाते. तर अंत्येष्टीमध्ये या सृजनाच्या विरुद्ध अंत्यसंस्कारानंतर दहन किंवा दफन केल्यानंतर आजही २१व्या शतकात हातात मातीचे मडके घेऊन प्रदक्षिणा घालून अखेरीस ते फोडले जाते. जिवाची या जन्मातील मुक्तताच त्यातून सूचित केली जाते. म्हणूनच बहुधा मानवाने प्राचीन काळात मातीच्या मडक्याचा गर्भाप्रमाणे वापर केलेला दिसतो. आईच्या गर्भातून परत एकदा त्या मुलाने जन्म घ्यावा याच कल्पनेतून ही प्रथा त्या काळी अस्तित्वात आली असावी.

ताम्रपाषाणयुगात मात्र भारतीय मानव हा नागरी जीवन अनुभवू लागला. या नागरी जीवनाला आज आपण सिंधू संस्कृती या नावाने ओळखतो. पूर्वीचा भटका आणि त्यानंतरचा ग्राम्य मानव आता पूर्ण नागरिक झाला होता. हा बदलाचा, नागरीकरणाचा टप्पा अंत्येष्टी विधींमध्येही स्पष्ट दिसतो. या काळात व्यवस्थित अंत्यसंस्कार केलेली दफने संशोधकांना सापडली आहेत. सिंधू संस्कृतीकालीन दफने मुख्यत: चार भागांत विभागली गेली होती. विस्तीर्ण समाधीकरण, आंशिक समाधीकरण, अस्थिकलश आणि दाह संस्कार.

विस्तीर्ण समाधीकरणात मृत माणसाचे संपूर्ण शरीर विधिवत त्याच्या आवडत्या वस्तूंसोबत पुरले जात होते, तर आंशिक समाधीकरणात मृत व्यक्तीचा मृतदेह न मिळाल्यास मृत व्यक्तीची आवडती किंवा वापरलेली वस्तू प्रतीकात्मक स्वरूपात विधिवत दफन केली जात असे, तर अस्थिकलश या प्रकारात ताम्रपाषण युगाप्रमाणे लहान मुलांचे मृतदेह कलशासकट पुरले जात. ज्या प्रौढ व्यक्तींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळत त्यांच्या अस्थी कलशात जमवून त्यांचे विधिवत दफन केले जाई. चौथ्या दाहसंस्काराचेही पुरावे सिंधू संस्कृतीच्या काही स्थळांवर सापडले आहेत; परंतु याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. आजही थोडय़ाफार फरकाने अशाच स्वरूपाचे अंत्येष्टी विधी अस्तित्वात आहेत, हे आपल्याला समाजात आजूबाजूला पाहिल्यानंतर लक्षात येते.

प्राचीन भारतात मोठय़ा प्रमाणात दफन विधी आढळून येतो, तर अर्वाचीन भारतात दहन विधी. असे असले तरी हिंदू धर्मातील काही जातींमध्ये आजही दफन परंपरा अस्तित्वात आहे, तर उर्वरित जगात बऱ्याच संस्कृतींमध्ये दफनाला प्राधान्य दिलेले आहे. दफन आणि दहन या दोन्ही पद्धती भारतासारख्या एकाच प्रांतात अस्तित्वात असल्याने आजतागायत या बदलाचे समाधानकारक उत्तर अभ्यासकांना देता आलेले नाही. सिंधू संस्कृतीतील मृत शरीरांसोबत मातीची भांडी, आभूषणे, दीप, प्राण्यांची हाडे मिळालेली आहेत, तर काही ठिकाणी मृतासोबत कुत्रा पुरल्याचे पुरावे मिळतात. मृतासोबत मिळालेल्या मातीच्या भांडय़ांवर काही आकृत्या, पक्ष्यांची चित्रे दिसतात.

सिंधू संस्कृतीनंतर मानवाने लोखंडाचा वापर मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली. या लोहयुगाशी संबंधित एक संस्कृती भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ती म्हणजे महाश्मयुगीन संस्कृती. मूलत: या संस्कृतीचे वैशिष्टय़ हे दफन पद्धतींशी संबंधित आहे. महा म्हणजेच मोठा आणि अश्म म्हणजे दगड. या संस्कृतीत बऱ्याच मृत व्यक्तींच्या (समाजातील प्रमुख व्यक्ती) दफनावर मोठे दगड उभारले जात म्हणून या संस्कृतीस महाश्मयुगीन संस्कृती म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात या संस्कृतीच्या सर्वच स्थळांवर मोठे दगड सापडले असून दफनाच्या विविध पद्धतींची नोंद करण्यात आलेली आहे.

मराठी विश्वकोशात पुरातत्त्वज्ञ शां. भा. देव यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘भारतातील महाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने आणि मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात व दक्षिण भारतात उपलब्ध झाले आहेत. दक्षिण भारतातील केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या भागांत महाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांनी उभारलेली दफने मोठय़ा प्रमाणावर आजही पाहावयास मिळतात. दक्षिण भारत सोडून ती दवसा (जयपूर, जिल्हा- राजस्थान), खेरी, देवधूरा, तसेच अलाहाबाद, मिर्झापूर, बनारस या जिल्ह्य़ांत (उत्तर प्रदेश), लेह (काश्मीर) तसेच सिंगभूम जिल्हा (बिहार) येथेही अस्तित्वात आहेत. बलुचिस्तान आणि मकरान, वाघोदूर, मुराद मेमन (वायव्य सरहद्द प्रांत) या प्रदेशांतही महाश्मयुगीन अवशेष उपलब्ध झाले आहेत. याशिवाय पूर्व भारतात बस्तरपासून आसामपर्यंत महाश्मयुगीन दफने वा दफन पद्धती अस्तित्वात आहेत.’

या संस्कृतीत आढळणाऱ्या दफनांच्या प्रकारात विविधता आढळते. केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल स्टोन, रॉक कट केव्ह, पिट बरीअल्स इत्यादी अनेक प्रकारची दफने आजही अस्तित्वात आहेत. सिस्ट सर्कल या प्रकारात मृताला दफन केल्यानंतर भूभागावर दफनाभोवती गोलाकार रचनेत दगड ठेवलेले सापडतात. मृताला जमिनीत दगडाच्या शवपेटीत पुरले जाते आणि शवपेटीला एका बाजूने लहानशी खिडकी ठेवली जाते. मृताच्या आवडत्या वस्तू दर खेपेस त्याला देता येतील अशी रचना केलेली असते. डोलमन या प्रकारातही मृताच्या आवडीच्या वस्तूंसोबत मृताला जमिनीत पुरून भूभागावर चार बाजूंनी दगडाच्या भिंती उभारून त्या दगडाच्याच फरशीने आच्छादित केल्या जातात. काही ठिकाणी केवळ दोनच बाजूंना दगडी फरशांच्या मदतीने भिंती उभारलेल्या आहेत. ज्या ठिकाणी चारही बाजूंनी भिंती आहेत तेथे एका बाजूच्या फरशीवर छोटय़ा खिडकीची सोय करण्यात आली आहे. अशा प्रकारे मृत व्यक्तीला अंत्येष्टीनंतरही त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेळोवेळी आवडीच्या वस्तू देण्याची सोय केलेली दिसते. आकार-प्रकार भिन्न असले तरी इतर महाश्मयुगीन (सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी) दफनांमध्येही मृताला वेळोवेळी स्मृतिप्रीत्यर्थ वस्तू देता याव्यात अशीच सोय केलेली दिसते.

आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणे हे पितृपक्षातील श्राद्धपरंपरेतील तत्त्वाचे मूळ अशा प्रकारे महाश्मयुगीन संस्कृतीत सापडते. श्राद्ध हा शब्द मुळातच श्रद्धा (श्रत् + धा = धारण करणे किंवा ठेवणे) या शब्दापासून तयार झालेला आहे. श्रद्धेने आपल्या पूर्वजांचे केलेले कार्य म्हणजे श्राद्ध. श्राद्धक्रिया प्रथम मनूने सुरू केली, असे ब्रह्मांडपुराणात नमूद केले आहे. म्हणूनच विष्णू व वायू या पुराणांमध्ये मनूला ‘श्राद्धदेव’ म्हटले आहे. प्राचीन काळी श्राद्धाला पिंडपितृयज्ञ हे नाव होते, तर श्राद्ध हा शब्द कठोपनिषदात प्रथम आढळतो. ब्रह्मपुराणात श्राद्धाची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली सापडते –

देशे काले च पात्रे च श्रद्धयाविधिनाचयत्’

पितृनुद्दिष्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृत्’’ (ब्रह्मपुराण)

अर्थ:देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा व विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे दिले जाते, त्याला श्राद्ध म्हणावे.

‘‘दद्यदहरह:श्राद्धंमन्नाद्य्ोनोकदेनवा’

पयोमूलफलैर्वाऽपि  पितृभ्य: प्रीतिमावहन्’’ (मनुस्मृती)

अर्थ: मनुस्मृतीनुसार पाणी, कंदमुळे, फळे, अन्न यांनी श्राद्ध करून पितरांचे समाधान करावे.

म्हणजेच पितरांना अर्पण केलेल्या गोष्टींचा समावेश पितृपक्षातील श्राद्ध यामध्ये होतो. सध्याच्या याच अर्पणाचे (तर्पणाचे) मूळ महाश्मयुगीन प्राचीन भारतीय संस्कृतीतच सापडते. फरक इतकाच, दफन विधीचे दहनात परिवर्तन झाल्यावर अर्पण करावयाच्या वस्तू या देहाला न करता, शरीर अस्तित्वात नसल्यामुळे पिंडस्वरूपी लिंगदेहाला अर्पण केल्या जातात.

महाश्मयुगीन दफनांमध्येही अनेक वस्तू मृतासोबत दफन केलेल्या सापडतात त्यात शस्त्रांमध्ये लोखंडी छिन्नी, भाले, चपटय़ा कुऱ्हाडी, तलवारी, कटय़ारी इत्यादींचा समावेश होतो, तर आभूषणांमध्ये बांगडय़ा, सोन्याची कर्णफुले, कंठमाला इत्यादी वस्तूंचाही समावेश होतो. महाश्मयुगीन संस्कृतीतही मृतांसोबत पुरलेली मातीची भांडी सापडतात. त्यावर पक्षी रेखाटलेले असतात. तर काही भांडय़ांच्या झाकणांवर मातीचे मोर आढळतात, तर काही ठिकाणी झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोटय़ा आकारात करून त्या झाकणांच्या शीर्षांवर बसवल्याचे आढळून आलेले आहे.

विशेष बाब म्हणजे मृतासोबत घोडा व घोडय़ाचे अलंकारही दफन केलेले सापडले आहेत. याशिवाय या काळातही मृतासोबत कुत्रा पुरण्याची पद्धत अस्तित्वात होती असे दिसून येते. विशेष बाब म्हणजे प्रत्येक काळात मृतासोबत कुत्रा पुरलेला दिसतो. भारतीय संस्कृतीत कुत्रा आणि मृत्यू यांचा संबंध जवळचा आढळतो. ऋग्वेदात कुत्र्याचा संबंध यमाशी जोडलेला दिसतो. ऋग्वेदानुसार सरमा नावाची इंद्राची कुत्री होती. तिच्या मुलांचा संबंध यमाशी असल्याचे सापडते. त्यांना चार डोळे असून ते यमदूत म्हणून कार्यरत असतात. अशाच प्रकारचा कुत्र्याचा संबंध पारशी धर्मातही मिळतो, तर इजिप्तमधील त्यांची मृत्युदेवता अनुबिस ही श्वानमुखी आहे. इजिप्तिशिअन फेरोंच्या दफनाच्या रक्षणाचे काम ही देवता करत असते. भारतात आजही काही ठिकाणी श्राद्धाच्या वेळेस कावळ्यानंतर कुत्र्याचे पान काढले जाते, तर काही ठिकाणी मृत्यूशी संबंध जोडला गेल्याने कुत्रा आजही निषिद्धही मानला जातो.

महाश्मयुगीन काळानंतर मानव हा ऐतिहासिक काळात प्रवेश करतो. या काळापासून लिखित पुराव्यांच्या माध्यमातून अंत्येष्टी, श्राद्ध यांचा शोध घ्यावा लागतो. वैदिक काळापासूनच भारतात देवऋण, पितृऋण, ऋषीऋण या त्रि-ऋणांना विशेष महत्त्व दिलेले आहे. प्राचीन भारतीय समाजव्यवस्था, आश्रमव्यवस्था याच ऋणांच्या पूर्ततेच्या हेतूने नियोजित करण्यात आलेली आहे. याच त्रि-ऋणातील पितृऋण फेडण्यासाठी विधिवत अंत्येष्टी, श्राद्ध, पितृपक्ष यांची योजना केलेली दिसते. ऋग्वेद काळात समिधा आणि पिंड यांची आहुती देऊन पितृपूजा केली जात असे, तर यजुर्वेद, ब्राह्मणे, शौत व गृह्य़ सूत्रे यांत पिंडदानाचे विधान आहे. गृह्य़ सूत्रे, श्रुती स्मृती यांच्या काळात ब्राह्मण भोजन महत्त्वाचे मानले गेले, तर या त्रयींच्या समीकरणातून सध्याच्या पितृपक्ष, श्राद्ध यांच्या स्वरूपाला आकार आल्याचे लक्षात येते. एकुणात मृत्यूनंतरच्या प्रथा-परंपरा आणि श्रद्धा यांचा प्रवास इतिहासपूर्व कालखंडापासून सुरू होतो आणि प्रागैतिहासिक कालखंडामध्ये तो अधिक विकसित होत, आता २१ व्या शतकातही पोहोचलेला दिसतो. माणसाच्या मनात मृत्यूविषयी असलेली भीती आणि मृत्यूनंतरच्या त्या त्या धर्मातील श्रद्धा यांनी त्याच्या संस्कृतीला त्या त्या कालखंडात आकार देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यामुळेच या मृत्यूच्या श्रद्धा-परंपरा हा जगभरात सर्वत्र मानवी इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग ठरल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 1:04 am

Web Title: truth of death
Next Stories
1 हुकले ‘विक्रम’ तरीही…
2 कृत्रिम पाय, हॉर्ट रेट मॉनिटर, वायरलेस हेडफोन इत्यादी अंतराळ विज्ञानामुळे शक्य
3 नोटाबंदी आणि जीएसटीने वाढवला मंदीचा दाह
Just Now!
X