News Flash

आयटी उद्योगात त्सुनामी! डिजिटल घडा‘मोडी’तच नवीन संधी

मोबाइलमधील एसएमएसने पेजरचा गळा घोटला.

गेल्या काही वर्षांमध्ये विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरलेल्या आयटी उद्योगाला आता डिजिटल त्सुनामीमुळे क्रांतिकारक बदलांना सामोरं जावं लागत आहे. या बदलांची दखल घेणाऱ्यांना, त्यांच्याशी जुळवून घेणाऱ्यांनाच नव्या व्यवस्थेत नव्या संधी मिळणार आहेत.

जगातील प्रख्यात कार निर्मिती करणारी कंपनी. सारे काही डिजिटल होते आहे, याची चाहूल त्यांना चार वर्षांपूर्वीच लागली होती. म्हणूनच त्यांनी जगातील प्रमुख शहरांमध्ये असणारे चांगले मेकॅनिक शोधून काढले. त्यांना प्रशिक्षण दिले, नवीन तंत्रज्ञान समजावून सांगितले आणि ‘डिजिटल अद्ययावत गॅरेज’ची मुहूर्तमेढ रोवली.

भारतातील प्रख्यात रंग निर्मिती करणाऱ्या कंपनीने गेल्या तीन वर्षांत त्यांच्या अनेक विक्री प्रतिनिधींना घरी पाठवले आहे. आजपर्यंत या कंपनीचे सारे कामकाज, खास करून मिळणारा महसूल हा या विक्री खात्यावरच अवलंबून होता. मग असे काय झाले की, त्यांना विक्री खात्यातील कर्मचाऱ्यांना घरी पाठवावे लागले. त्याच्या पलीकडे त्यांच्या महसुलावर फार परिणामही झाला नाही. भविष्याची पावले त्यांनी वेळीच ओळखली होती. पूर्वी त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुकानदारांकडे जाऊन त्याचे उत्पादन विकावे लागे. आता डिजिटल युगामुळे ग्राहक थेट कंपनीपर्यंत किंवा कंपनी ग्राहकांपर्यंत पोहोचणार हे कंपनीला वेळीच लक्षात आले होते.

तिसरे उदाहरण आहे ओला आणि उबेरचे. गर्दीच्या वेळेस टॅक्सीभाडय़ासाठी अधिक पसे कोण कशाला मोजेल, असा प्रश्न पूर्वी लोकांना पडत होता. पण या दोन्ही सेवांनी लोकांच्या मनातील समज खोटा ठरवला आणि त्यामुळे टॅक्सी-रिक्षांवर शहरांमध्ये गंडांतर आले आहे. लोक मोबाइल अ‍ॅपवरून टॅक्सी बुक करतात आणि प्रसंगी स्वस्तात चांगली सफर करतात, या तिन्ही उदाहरणांमध्ये एक समान मुद्दा आहे, तो डिसर्पशनचा. नेहमीच्या यंत्रणा किंवा प्रक्रियेत आलेली विस्कळीतता किंवा विस्कळीतपणा म्हणजे डिसर्पशन. ओला- उबेरने काळ्या पिवळ्या टॅक्सीचे भाडेपत्रक हा प्रकारच मोडीत काढला. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे मोडीत काढला की, त्यांच्या व्यवसायावरच गंडांतर यावे. सर्वत्र सारे काही डिजिटल झाल्यामुळे बरेच बदल झाले आहेत. आता पूर्वीसारखे कुणी टेलििपट्ररवर तार करत नाही. त्यामुळे तार यंत्रणाच मोडीत निघाली आणि ते खाते बंद झाले. मोबाइलमध्ये आलेला कॅमेरा आणि ई-मेल यांनी फॅक्स नावाचे तंत्रज्ञान बाद ठरवले. मोबाइलमधील एसएमएसने पेजरचा गळा घोटला. मोबाइलमध्ये आलेल्या व स्थिरावलेल्या कॅमेऱ्यांनी पॉइंट अ‍ॅण्ड शूट मालिकेतील डिजिटल कॅमेरेच बाद ठरवले. हे सर्व बदल आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या दुप्पट वेगाने होत आहेत. यातील या ‘डिजिटल’चाच धसका आता देशाला सर्वाधिक परकीय चलन देणाऱ्या आयटी उद्योगाने घेतला आहे. साहजिकच आहे की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि विकासदरामध्ये मोठी भूमिका बजावणाऱ्या आयटी उद्योगावर मळभ आले असेल तर त्याची चिंता अर्थव्यवस्थेला करावीच लागणार. पण हे काही एकदम अचानक, काही क्षणांत झालेले नाही. २०१५ साली फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या माहिती तंत्रज्ञान उद्योगाची शिखर संस्था असलेल्या नासकॉमच्या अधिवेशनात सर्वप्रथम या डिसर्पशनची चर्चा झाली होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाला आता कूस बदलावी लागणार हे तेव्हाच पुरते स्पष्ट झाले होते. २०१६ मध्ये आपण त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक होते. मात्र तंत्रज्ञानाच्या झपाटय़ाचा अंदाज उद्योगाला नेमका आला नाही. आणि मग २०१७ येऊन ठेपले तेव्हा सारे प्रकरण थेट गळ्याशीच आले होते. मग यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या नासकॉमच्या अधिवेशनात त्याचे थेट परिणामच पाहायला मिळाले. डिजिटल बदलांना जे सामावून घेणार नाहीत अशांच्या म्हणजेच, कदाचित ५० टक्क्यांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या असतील हे त्यांचे विधान आयटी उद्योगातील कर्मचाऱ्यांच्या काळजात चिंतेचा ओरखडा उमटवणारे होते.

हे सारे होईपर्यंत जागतिक स्तरावरील परिस्थितीही बदललेली होती. २०१६च्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली होती. अमेरिकनांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ देणार नाही, अशी हाकाटी देत सत्तारूढ झालेले ट्रम्प एचवनबी व्हिसाच्या संदर्भात र्निबध आणतील अशी शक्यता निर्माण झाली होती. ती अखेरीस खरी ठरली. दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या झपाटय़ामुळे जगभरात गोष्टी अतिशय वेगात स्वयंचलित पद्धतीने कार्यरत होत आहेत. हाही बदल खूप मोठा होता. म्हणजेच दही आणि दह्य़ाशी संबंधित पदार्थाची विक्री करणाऱ्या कंपनीने हे जाहीर केले की, त्यांच्या प्रकल्पात तयार झालेल्या या उत्पादनांना मानवी स्पर्श झालेला नाही, तेव्हा अनेकांचा त्यावर विश्वास नव्हता. पण आज दह्य़ासाठीचे दूध कंपनीत येण्यापासून ते ऑर्डरनुसार उत्पादन गरजेच्या ठिकाणी पोहोचवण्यापर्यंत सारे काही डिजिटल आहे, यात मानवी स्पर्श खरोखरच नाही.

हा डिजिटल झपाटा लक्षात आल्यानंतर मात्र आयटी उद्योगाची झोप उडाली.  स्वयंचलितता अर्थात ऑटोमेशन, बोट्स, रोबो यांनी मानवी अस्तित्वालाच आव्हान दिल्यासारखी स्थिती आहे. त्यातही कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (आर्टििफशनल इंटेलिजन्स) संगणकांच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी असे मानले जात होते की, स्वशिक्षणाची क्षमता संगणकामध्ये नाही. मात्र आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यापुढील पायरी कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग. यामुळे संगणकांना (खरेतर महासंगणक) स्वशिक्षणाची, स्वतहून एखादी गोष्ट मानवी मेंदूप्रमाणे समजून घेण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. खास करून बिग डेटा अ‍ॅनालेटिक्समध्ये त्याचा वापर होतो आहे.

या सर्व घडा‘मोडीं’मुळे पारंपरिक आयटी रोजगाराच्या क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. आणि  भारतीय आयटी कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नासकॉमचीही झोप उडाली आणि त्यांनी गेल्या २० वर्षांत प्रथमच यंदाचा आर्थिक अंदाज व्यक्त करणे एक महिना पुढे ढकलले. अन्यथा फेब्रुवारी महिन्यात प्रतिवर्षी होणाऱ्या परिषदेमध्ये ते पुढील आíथक वर्षांसाठीचा अंदाज आगाऊ जाहीर करतात. डिजिटल त्सुनामी ही भारतासह सर्वत्र जगभरात आली होती. स्वयंचलितता अर्थात ऑटोमेशन हे त्याचे आणखी एक दुसरे रूप होते. ज्या ज्या ठिकाणी मानवाची जागा यंत्रांनी घेतली त्या त्या ठिकाणी यशाचे प्रमाण वाढतेच होते. म्हणूनच आता वेळीच या उद्योगातील बदलांचे वारे लक्षात घेऊन कंपन्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वत:मध्ये बदल केले नाहीत तर रोजगार गमावणाऱ्यांची संख्याही अधिक असेल, असा इशाराही नासकॉमने फेब्रुवारीतच दिला. त्याबाबत नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर म्हणतात, डिजिटलला पर्याय नाही. त्यामुळे या स्पध्रेत टिकायचे तर माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्यांना डिजिटल तर व्हावेच लागेल. केवळ तेवढेच करून भागणार नाही तर कंपन्यांना त्यांचे आजवरचे वापरलेले आराखडे आणि धोरणेही बदलावी लागतील. नव्या डिजिटल बदलांमुळे प्रत्यक्षात कंपन्यांची खूप अडचण झालेली असली तरी नवीन डिजिटल संधीही उपलब्ध होतील, त्याकडे लक्ष ठेवावे लागेल. बदलांना जे आपलेसे करतील,  त्यांच्याचसाठी या संधी असतील. गेल्या वर्षांत अनेकांनी रोजगार गमावलेला आहे. तो गमवायचा नसेल तर डिजिटलची कास धरणे हाच एकमात्र उपाय आहे.

माहिती तंत्रज्ञान उद्योग हा देशाला सर्वाधिक परकीय चलन देणारा व्यवसाय असल्याने त्याला धक्का बसल्यास तो अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असेल असे सांगून नासकॉमचे सरचिटणीस सी. पी. गुरनानी म्हणतात, गेल्या आíथक वर्षांत डिजिटलमुळे आलेल्या महसुलाचा वाटा १४ टक्के होता. येणाऱ्या काळात तो उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. चालू आíथक वर्षांत या क्षेत्राचा विकास दर ८.६ च्या आसपास असणे ही दिलासादायकच बाब आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्यातीतून देशाला ११८ दशकोटी अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळेल. सध्या जागतिक स्तरावरची स्थिती काहीशी चिंताजनक वाटत असली तरी देशांतर्गत स्थिती मात्र डिजिटल भारतासारख्या उपक्रमांमुळे चांगली आहे. बाहेरच्या संधी कमी होतील असे आपल्याला वाटत नाही. पण अगदी तसे झालेच तरी देशांतर्गत बाजारपेठ हा त्याच्यावरचा उतारा ठरू शकतो. प्रतिवर्षी ही देशांतर्गत बाजारपेठ १२ टक्क्यांनी वाढत आहे. सध्या या उद्योगामध्ये ३० लाख ८६ हजार कर्मचारी कार्यरत असून त्यात गेल्या वर्षी १० लाख ७० हजारांची भर पडली आहे.  कर्मचारी वाढ सुमारे पाच टक्क्यांच्या आसपास आहे. आधीच्या अंदाजानुसार ती अधिक असणे अपेक्षित होते. पण डिजिटल त्सुनामीमुळे परिस्थिती बदलली आहे. उद्योगावर होणारा हा परिणाम लक्षात घेऊनच नासकॉमने चांगली पावले उचलली असून कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी खास करून डिजिटल कौशल्य विकासासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आता आयटी कर्मचाऱ्यांचे पुनप्र्रशिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा असेल. या संदर्भात जेनपॅक्टचे एन. व्ही. त्यागराजन म्हणतात, सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात डिजिटल गोष्टींशी झटपट जुळवून घेणारे, त्यासंदर्भात नवोन्वेषणाची क्षमता सिद्ध करणारे कर्मचारी आणि कंपन्याच या नव्या डिजिटल त्सुनामीमध्ये टिकतील. डिजिटल गोष्टींशी जुळवून घेणे आणि नवोन्वेषण हे दोन गेम चेंजर ठरणारे मुद्दे असतील. या त्सुनामीत टिकायचे असेल तर कर्मचाऱ्यांचे पुनप्र्रशिक्षण देऊन डिजिटल युगासाठी तयार करणे हाच पर्याय आहे.

केपजेमिनीचे प्रमुख श्रीनिवासन कांदुला मात्र भारतीय आयटी कंपन्यांनाच सध्याच्या या स्थितीसाठी जबाबदार धरतात. आयटी उद्योगाला गेल्या १०-१५ वर्षांत चांगले दिवस आले त्याला आपण बाळसे म्हटले मात्र प्रत्यक्षात त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक सूज असावी. कारण या वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. सध्या ३.९० दशकोटी कर्मचारी असा भला मोठा आकडा या उद्योगामध्ये दिसतो. यातील अध्रे कर्मचारी तरी याच वर्गात मोडणारे आहेत. कमअस्सल असतानाही त्यांना चांगली संधी, चांगले पसे मिळाले. मात्र आता कठीण समय आला असून जे कमअस्सल असतील त्यांच्यावर रोजगार गमावण्याची वेळ येईल, असे ते ठामपणे सांगतात.

डिजिटल आव्हानावर या क्षेत्रातील कंपन्यांना यशस्वीरित्या मात करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांना डिजिटल कौशल्यांसाठी वेगात प्रशिक्षित करणे महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी वेगवान पुनकरशल्य मोहीम हाती घ्यावी लागेल,  असे सिस्कोचे अध्यक्ष दिनेश मलकानी सांगतात. ते म्हणतात, डिजिटल युगात एकच एक कंपनी यशस्वी होण्यापेक्षा विविध सामथ्य्रे असलेल्या दोन कंपन्यांनी एकत्र येण्यातून दोघांचेही भविष्य अधिक सुरक्षित आणि सुकर होऊ शकते. म्हणूनच फिलिप्स या नामवंत कंपनीशी सिस्कोने सहकार्याचा हात पुढे केला. यामध्ये दोघांचीही नेहमीची बाजारपेठ तर सुरक्षित आहेच. पण त्याचबरोबर या दोघांच्याही एकत्र येण्यातून नवीन बाजारपेठ विकसित झाली आहे.

आयटी कंपन्यांनाही या लाटेवर आरूढ होताना डिजिटल परिवर्तनावर गुंतवणूक करावी लागणार आहे, याकडे मॅकेन्झीचे नोशिर लक्ष वेधतात. ते म्हणतात, डिजिटल परिवर्तनावर खर्च होणाऱ्या पशांच्या ५० टक्क्यांएवढाही परतावा मिळत नाही असे लक्षात आल्याने कंपन्या कचरतात. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे बदल करावे लागतील. त्यासाठी पूर्वीची कोणतीही गोष्ट मग ती मोच्रेबांधणी असेल किंवा आणखी आता कामी येणार नाही. सर्व गोष्टींकडे मुळातून नव्याने बदल करावे लागतील.

या डिजिटल त्सुनामीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अंतर्बाह्य़ ढवळून तर निघालेच आहे, पण नव्या बदलांना सामोरे जाताना कंपन्यांना खूप वेगळ्या नव्या गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या रचना व प्रक्रियेमध्येच होणारा महत्त्वपूर्ण बदल. पूर्वी या कंपन्यांमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) किंवा मुख्य माहिती (तंत्रज्ञान) अधिकारी असे महत्त्वाचे पद असायचे. आता नव्या जमान्यात हे पद कालबाह्य़ झाले असून, यापुढे आयटी क्षेत्रातील कंपन्यांसाठी डिजिटल मुख्याधिकारी हे पद गरजेचे ठरले आहे.

डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगभरातील आयटी कंपन्यांना वेगळ्या क्रांतिकारक बदलांना सामोरे जावे लागते आहे. त्या क्रांतीमुळे जगभरात झालेले बदल आणि त्याचा आयटी कंपन्यांवर झालेला परिणाम त्यांची आजवरची कार्यपद्धती पूर्णपणे विस्कळीत करणारा आहे. आगामी काळात आयटी कंपन्यांमधील ‘डिजिटल अधिकारी’ हा किती नावीन्यपूर्ण विचार करणारा आणि दूरदृष्टी असलेला आहे, यावरच भविष्यात आयटी कंपन्यांची प्रगती कशी होणार ते ठरेल. या डिजिटल अधिकाऱ्यांना आयटी कंपन्यांमधील ‘डिजिटल कर्मचाऱ्यां’च्या बदललेल्या भूमिका लक्षात घ्याव्या लागणार आहेत. या डिजिटल घडा‘मोडीं’मध्येच नव्या संधींचे बिजारोपणही झालेले आहे. डिजिटल बाबींमध्ये नवीन संधी आणि नवीन रोजगार दडलेला आहे. पूर्वी संगणक आले त्यावेळेस अनेकांना वाटले की आता कर्मचारी कपात होणार. पण संगणक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. ही नवीन संधी होती. संगणक हाताळणी जे शिकले नाहीत तेच फक्त कालबाह्य़ ठरले. तसेच आता डिजिटल हाताळणी ही गरज असणार आहे. उदाहरणार्थ ड्रोन तंत्रज्ञान हे नवीन आहे. पूर्वी एखाद्या एअरलाइनच्या विमानोड्डाणापूर्वी कर्मचारी विमानाची प्रत्यक्ष तपासणी करायचे आता ड्रोन तपासणी करणार असल्याने माणसे बाद झाली, असे नाही. तर ड्रोन चालविणाऱ्या ते हाताळणाऱ्या, दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. काम कमीत कमी वेळेत होऊ लागले. सुरक्षेची आणखी एक पातळी वाढणे हे प्रवाशांसाठी अधिक विश्वास देणारे ठरले, त्यामुळे त्या विमान कंपनीकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. ज्यांनी ड्रोन हाताळणी शिकण्यास नकार दिला तेच कालबाह्य़ ठरले. त्यामुळेच येणारा बदल हाच स्थायीभाव असणार आहे. तंत्रज्ञान सतत बदलत राहणार आहे. मानवी उत्क्रांतीला लागू असलेले एक महत्त्वाचे तत्त्व बदल पचविणारे पुढे जाणार तेच इथेही तेवढेच लागू आहे!

03-lp-kesav-murugeडिजिटल लाटेवर आरूढ व्हा – केशव मुरुगेश

सध्याचे वातावरण हे मंदीसदृश आहे हे अमान्यच आहे, असे सांगून डब्लूएनएस या जगातील सर्वात मोठय़ा बीपीएम उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नासकॉमच्या बीपीएम कौन्सिलचे अध्यक्ष केशव मुरुगेश म्हणतात, आजही भारतीय उद्योग जगभरातील तेवढाच बलशाली आहे आणि भविष्यातही राहणार. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे असलेली बौद्धिक संपत्ती. आज आयटीतील भारतीय तरुण हे संपूर्ण जगभरातील सर्वच कंपन्यांसाठी प्रमुख आकर्षण असून त्यांना ते महत्त्वाचे भांडवल किंवा गुंतवणूक वाटतात.

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घातलेल्या र्निबधांबाबत ते म्हणतात, आजही सर्वाधिक बौद्धिक क्षमता भारतीयांकडेच आहे. त्यामुळे एचवनबी व्हिसाचा कोटा जाहीर झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत तो पूर्ण झाला आणि त्यात भारतीयांचीच संख्या सर्वाधिक होती. अमेरिकन कंपन्यांनाही याची जाण आहे. याचाच अप्रत्यय अलीकडे अमेरिकेमध्ये नासकॉमतर्फे आयोजिक परिषदेमध्ये आला. यंदा अमेरिकेत प्रथमच नासकॉमने अशा प्रकारची परिषद आयोजित केली होती. अमेरिकेतील सुमारे दीडशे प्रमुख आयटी कंपन्यांचे त्यात सहभागी झाले होते. भारतीय कंपन्यांकडे असलेल्या बौद्धिक क्षमतेची जाण असल्याने त्याचे महत्त्व ते जाणतात, अशी जाहीर भूमिका जवळपास सर्वानीच व्यासपीठावरून व्यक्त केली. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. त्याचप्रमाणे अमेरिकन कंपन्यांशी सहयोगी करार करत अनेक कंपन्यांनी अमेरिकन उद्योगांमध्येही रोजगार निर्माण होईल, याची काळजी घेतलेली आहे. शिवाय भविष्यात अमेरिकेला त्यांचे साम्राज्य कायम राखायचे असेल तर आयटीची कास सोडून चालणार नाही. आणि कास धरायची तर आज भारताला जागतिक बाजारपेठेत दुसरा पर्याय नाही.

हे खरे आहे की, आयटी उद्योग एका मोठय़ा संक्रमणावस्थेतून जात आहे. ही संक्रमणावस्था पचविणे तेवढे सोपे निश्चितच नाही. पण आजवर या उद्योगाने अनेक अडथळे यशस्वीरीत्या पार केले आहेत. त्यामुळे हाही टप्पा पार होईल. त्यासाठी फक्त गरज आहे ती काळानुसार बदलण्याची. आताचा जमाना डिजिटायझेशनचा आहे. यामध्ये रोजगार असलेल्यांची संख्या काहीशी कमी होण्याची भीती असली तरी नव्या आलेल्या विषयामुळे खूप मोठय़ा प्रमाणावर नवीन संधीही उपलब्ध होणार आहेत. भविष्यामध्ये अनेक गोष्टींसाठी ड्रोन्स वापरले जाणार असतील तर तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणावर ते हाताळणाऱ्यांची गरजही भासणार आहे. त्याची दुरुस्ती, देखभाल, ऑपरेशन्स, त्यांची आखणी यातील प्रत्येकासाठी तज्ज्ञांची गरज भासणार आहे. अर्थात यात जे डिजिटल परिवर्तनाशी जुळवून घेणार नाहीत त्यांच्यावर नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नसेल. नासकॉमने येणाऱ्या २०२५ पर्यंत ३०० दशकोटी अमेरिकन डॉलर्सच्या महसुलाचे उद्दिष्ट आयटी- बीपीएम उद्योगांसाठी ठेवले आहे. या कौन्सिलचा अध्यक्ष या नात्याने हे लक्ष्य गाठण्यात कोणती अडचण आहे, असे मला वाटत नाही.

किंबहुना आता कधी नव्हे एवढे चांगले वातावरण आहे, असे वाटते असे सांगून मुरुगेश म्हणतात, देशांतर्गत बाजारपेठेबद्दल तर आपण बोलतच नाही आहोत. सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमामुळे भविष्यातील पाच वष्रे तरी सरकार हे सर्व पातळ्यांवर डिजिटलसाठी सर्वाधिक खर्च करणारे असेल. त्यामुळे सर्व कंपन्यांना देशांतर्गतच मोठय़ा संधी उपलब्ध आहेत. त्यासाठीची पायाभूत रचना आता अंतिम टप्प्यात आकारास येते आहे. नासकॉम त्यासाठी सरकारला मदत करते आहे. एकदा हे क्षेत्र खुले झाले की, चांगला महसूल तर इथेच उपलब्ध असेल. सध्या मंदीसदृश अवस्था असल्याचे मान्यच नाही, असे म्हणत केशव मुरुगेश सांगतात, आयटीबीपीएम उद्योगामध्ये केवळ रोजगार निर्मितीचे प्रमाण अवघ्या काही टक्क्यांनी कमी आहे. ते थांबलेले नाही. शिवाय येत्या वर्षभरात ते निश्चितच वाढेल, याची खात्री आहे. फक्त त्यासाठी डिजिटल लाटेवर आरूढ व्हावे लागेल इतकेच. अर्थात त्याला पर्याय नाही.
विनायक परब – @vinayakparab, vinayak.parab@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:06 am

Web Title: tsunami in it industry
Next Stories
1 आयटी उद्योगाला इशारा
2 यंदाचा मान्सून फळणार!
3 डिजिटायझेशनच्या वाटेवर आयटी ऑडिटबाबत सरकारचीच अनास्था!
Just Now!
X