आनंदाच्या स्मृती खाण्यापिण्याशी जोडायची आपली भारतीय परंपरा फार जुनी. त्यामुळेच लग्न म्हणजे जेवणावळी आल्याच. जेवणाच्या किती पंगती उठल्या यावर पूर्वी लग्न किती थाटामाटात झालं याची मोजमापं ठरायची. पण बघता बघता पंक्तिप्रपंच झाला आणि जेवणावळींची जागा बुफे पद्धतीने घेतली.

‘लग्नाला नक्की यायचं हं..’

Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

असं आग्रहाचं आमंत्रण येतं. लग्न म्हणजे चांगले कपडे, दागदागिने, सजणं-धजणं आणि अर्थातच सुग्रास जेवण.. पण या आग्रहाच्या आमंत्रणावरच्या प्रतिक्रिया असतात..

‘हो मग. त्या अमक्यातमक्या कार्यालयात लग्न म्हणजे येणारच. अहो जेवण मस्तच असतं त्यांचं.’

‘काय मेन्यू ठरला की नाही.. जिलेबी की बुंदीचा लाडू? की श्रीखंड-पुरी? खरं तर आंब्याचे दिवस आहेत. तेव्हा आमरसपुरीचा बेतच हवा.’

‘काय बुफे ठेवलंत? अरे बापरे. म्हणजे हातात ती जड प्लेट घेऊन उभं राहून खायचं.. मला तर ते संकटच वाटतं नेहमी. आणि ते पदार्थ तर एवढे ठेवतात की काय खायचं ते समजतंच नाही.’

‘बुफे ठेवलंत ते उत्तमच केलंत हो. कोण आता त्या पंगतींमध्ये बसून जेवेल.. आणि तिथे काय जेवायचं ते नेहमीचं ठरलेलं.. वरणभात, मसालेभात, अळूचं फतफदं, त्या जिलेब्या आणि मठ्ठा, नाही तर बुंदीचा लाडू आणि ती ठरलेली बटाटय़ाची भाजी.. मला तर ते बघायचापण कंटाळा येतो.’

‘अहो बुफे ठेवलंत ते चांगलं केलंत, पण आपल्याकडे कुठे लोकांना कळतं बुफेत कसं खायचं असतं ते. संपल्यावर परत उठायला नको म्हणून एकाच वेळी सगळं डिशमध्ये भरून घेतात बिचारे. तेही ढीगभर. मग काय सगळे पदार्थ एकमेकांत मिसळून जातात. यांना आपलं त्याचं काही नसतं.’

‘अहो बुफे म्हणजे त्या पन्नास प्रकारांमधले तुम्हाला हवे असतील ते पदार्थ आवडीने पोटभर खा, असा त्यामागचा हेतू असतो. पण लोक बिचारे तिथे मांडलेत ते सगळेच पदार्थ खायचेच असतात असा नियम असावा असं वागतात.’

‘काय बुफे ठेवलंत..? म्हणजे त्या पंजाबी भाज्या.. ते कान्टिनेन्टल, ते लाइव्ह किचन.. काय हो लग्न मराठी माणसांचं आहे ना..? पंजाबी माणसं ठेवतील का त्यांच्या लग्नात मसालेभात आणि जिलेबी मठ्ठा असा बेत..? आपल्याच लोकांना फार घाई झालीय आपलं सगळं सोडून द्यायची..’

लग्न सोडूनच द्या, लग्नाच्या जेवणावरच एवढी चर्चा झडते सध्या. लग्नात पंगत असावी की बुफे पद्धतीचं जेवण असावं यावर तर सरळसरळ दोन गट पडलेले असतात. आणि दोन्ही गट आपापले मुद्दे हिरिरीने मांडत असतात.

एक काळ असा होता म्हणे की लग्न ठरलं की घरालाच तोरण चढायचं. दारात मांडव घातला जायचा. बडय़ा घरांमध्ये आचारी बोलावले जायचे आणि सर्वसामान्य घरात घरातल्या आणि आसपासच्या स्त्रिया मिळूनच लग्नाच्या जेवणाचा घाट उरकायचा.

शहरीकरण वाढत गेलं, कुटुंब लहान व्हायला लागलं, तसं तसं घरात लग्न उरकणं ही अशक्य गोष्ट ठरायला लागली. कार्यालयं घ्यायची पद्धत सुरू झाली. सुरुवातीला कार्यालयं म्हणजे ती जागा भाडय़ाने घ्यायची आणि जेवण बनवणारे आचारी आपले आपण न्यायचे अशी पद्धत पडली. ‘कार्यालयवाल्यांचं जेवण आम्हाला नाही आवडत, आमचा माणूसच चांगलं करतो, नेहमीचा ठरलेला आहे तो,’ असा आविर्भाव असायचा त्यात. हळूहळू कार्यालयांनी त्यांचे केटर्स नेमायला सुरुवात केली. जागा आणि जेवण दोन्ही आमच्याकडचंच घ्यावं लागेल असं सांगायला सुरुवात केली. मग ते हळूहळू अंगवळणी पडत गेलं. सगळ्या गोष्टींचं कार्यालयाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायची पद्धत सुरू झाली. शहरांमध्ये ऑफिसला जाणारी मंडळी वाढली तसं रिसेप्शनची पद्धत सुरू झाली. म्हणजे ज्यांना सकाळी लग्नाला यायला जमणार नाही, त्यांच्यासाठी रिसेप्शन. लग्नाला-जेवायला सगळी घरची, जवळची मंडळी आणि रिसेप्शनला ऑफिसची मंडळी. रिसेप्शनला दिलं जाणारं (फक्त) आईस्क्रीम आणि नवपरिणित जोडपं एकाच बाटलीत दोन स्ट्रॉ घालून गोल्डस्पॉट पितानाचा फोटो हा चाळीसेक वर्षांपूर्वी च्रचंड लोकप्रिय फोटो असायचा लग्नातला. म्हणजे असा ‘गोल्डस्पॉट’वाला फोटो नसेल तर खरंच या दोघांचं लग्न आणि नंतर रिसेप्शन झालंय की नाही असं वाटावं इतका तो फोटो हमखास असायचा.

(फक्त) आईस्क्रीमपासून सुरू झालेले रिसेप्शनचे मेनू हळूहळू वाढत गेले. दुसरीकडे दुपारी लग्नात जेवायला असणारी आणि ऑफिसला जाणारी जवळची मंडळीही संख्येने वाढायला लागली. तसतसं लग्नाच्या देवणावळींमध्ये अधिकाधिक नेमकेपणा काटेकोरपणा यायला लागला. इकडे लग्न लागलं की ताबडतोब तिकडे पंगती सुरू व्हायच्या. ‘हाफ डे’ टाकून आलेली मंडळी लग्न लागलं की पटापट जेवून ऑफिसला पळायची.

पाटावर बसवल्या जाणाऱ्या लग्नाच्या पंगतीही टेबलावर येत गेल्या. सुरवाती सुरुवातीला ज्यांना पाटावर बसून जेवायचं त्यांच्यासाठी तशी पंगत आणि ज्यांना टेबलावर हवंय त्यांच्यासाठी तशी पंगत उठायची. भराभरा ताटं मांडली जायची. मग लोणचं, चटण्या, कोशिंबिरी, भजी, भाज्या असं वाढायला सुरुवात झाली की लोक ताटावर योऊन बसायचे. मग भात-वरण-तूप फिरवलं जायचं. त्याच्या जोडीला ज्याची सर्वाधिक चेष्टा झाली, पुण्यातल्या लग्नांमधलं अळूचं फतफदं. (आता ते नसतं तेव्हाही ते मिळत नाही म्हणून त्याची आठवण काढली जाते.) मग मसालेभात, त्याच्या जोडीला गोड पदार्थ, मग पुन्हा  ताकभात.. दोन्ही बाजूंनी समोरासमोर बसून लोक जोवताहेत. घरची मंडळी ‘सावकाश होऊ द्या’ची विनंती करत गोडाच्या पदार्थाचा आग्रह करत फिरताहेत. पैजेवार बुंदीचे लाडू किंवा जिलेब्या खाल्ल्या जायच्या. आदल्या दिवशी सीमान्त पूजनाला विशेषत: पुण्यात केल्या जाणाऱ्या सुधारसाच्या जेवणाची पुण्याबाहेरून आलेल्या मंडळींकडून ‘साखरेच्या पाकात लिंबाचा रस पिळून त्याला पक्वान्न म्हणतात ही पुणेकर मंडळी’ अशी हमखास टिंगल व्हायची.

आता हळूहळू ही पंगत पद्धतही कालबाह्य़ व्हायला लागली आहे. किंवा अगदी मोजके, घरचे लोक पंगतीला आणि बाकी सरसकट सगळ्यांना बुफे पद्धतीचं जेवण हा ट्रेण्ड आता सेट व्हायला लागला आहे. त्याच्यामागे दोन-तीन कारणं दिसतात. सगळ्यात पहिलं कारण परत ऑफिसला जाणाऱ्यांचंच. पंगतीत वाढलं जाण्याची वाट बघत बसायला ज्यांना वेळ नव्हता, त्यांच्यासाठी हळूहळू बाजूला बुफेची वेगळी व्यवस्था व्हायला लागली. आधी जशी पाटावर बसणाऱ्यांची पंगत आणि टेबलावर बसणाऱ्यांची पंगत असा फरक सुरू झाला आणि हळूहळू पाटावरची पंगत पूर्ण बंद होत गेली तसंच. कारण लोकांचं घरातही पाटावर बसणं बंद होत गेलं होतं. आता तर पाटावर बसून जेवता येईल अशी मंडळी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही सापडणार नाहीत. ऑफिसला जाणाऱ्यांच्या बुफेच्या व्यवस्थेत वाढ होत होत आता सरसकटपणे सगळ्यांसाठीच बुफेची व्यवस्था व्हायला लागली आहे. तिथे आसपासच थोडय़ा टेबल-खुच्र्या ठेवलेल्या असतात. ज्यांना उभं राहून जेवणं शक्य नसतं, ते टेबलखुर्ची वापरतात आणि बाकीचे सगळे उभ्याउभ्याच जेवतात. ही पद्धत कार्यालय किंवा हॉलवाल्यांनाही सोयीची ठरली आहे. ‘तृप्ती केटर्स’चे अनंत भालेकर त्याबद्दल सांगतात की, शंभर-दोनशे माणसांची एक पंगत धरली तर ती नीट जेवून उठायला ४५ मिनिटं लागतात. १२ वाजता लग्न लागलं तर ५०० माणसं जेवून उठायला तीन-साडेतीन तास लागतात. त्यासाठी जागा लागते, वाढणारी माणसं लागतात, बुफे पद्धतीत मुळात जागा कमी लागते. लग्न वेगळ्या हॉलमध्ये, जेवण दुसऱ्या हॉलमध्ये असं कमी जागेतही मॅनेज करता येतं. आणि मुख्य म्हणजे ५०० ते हजारभर लोकांचं तासा-दीड तासात जेवण होऊनसुद्धा जातं. दुसरं म्हणजे पंगतीत जेवण कसं वाढायचं, डावीकडे-उजवीकडे काय काय वाढायचं याचे खूप काटेकोर निकष असतात आणि तसं वाढणारे ब्राह्मण जातीतले वाढपी आता मिळत नाहीत.

बुफे पद्धत रूढ होण्याचं आणखी एक कारण म्हणजे लोकांची चवीच्या पातळीवर वैविध्याची अपेक्षा वाढली आहे. लग्नाच्या सीझनमध्ये दहा दहा लग्नांना जावं लागतं तेव्हा प्रत्येक ठिकाणी तेच तेच काय खायचं, म्हणून न जेवणारेही अनेक जण असतात. त्यांना बुफे पद्धतीतून आपल्याला हवं ते खाता येतं. मुख्य म्हणजे आपण नेहमी जे पदार्थ खातो तेच काय खायचे, वैविध्य हवं या मानसिकतेतून आता संध्याकाळच्या बुफेत तर पंजाबी, साऊथ इंडियन, चायनीज, थायी, इटालियन, चाट आयटेम्स, लाइव्ह किचन असे वेगवेगळे काऊंटर्स असतात. व्हेज-नॉन व्हेज तर असतंच. शिवाय डेझर्टमध्येही दोन-तीन पर्याय उपलब्ध असतात. एक चाट प्रकार घेतला तरी त्यात पन्नास प्रकार मांडलेले असतात. लाइव्ह किचन प्रकारात मिसी रोटी, नान, दोसे असे पदार्थ तुमच्या समोरच गरमगरम तयार करून दिले जातात.

इतके सगळे पदार्थ बघून बुफेची सवय नसणाऱ्यांना खरोखरच गोंधळून जायला होतं. त्यातलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही ते खूपदा समजतच नाही. खरं तर त्यामागची कल्पना अशी असते की या पन्नास पदार्थामधले तुम्हाला आवडतात ते पाचसात पदार्थ तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पोटभर खा. पंगतीत बसल्यावर समोर वाढणारा वाढत जाईल ते खावं लागतं. तर इथे तुम्हाला जे हवं आहे तेच भरपूर खा. एकावेळी एक दोन पदार्थ घ्या, ते संपवा, पुन्हा घ्या. पण अजून या प्रकाराशी फारसे परिचित न झाल्यामुळे लोक सगळेच पदार्थ एकाच वेळी डिशमध्ये भरून घेत बसतात.

पंगतीत जेवायला बसलेला माणूस साधारणपणे साडेपाचशे किलोग्रॅम म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त जेवतो, तर बुफेत तो साडेचारशे किलोग्रॅमच्या आसपास जेवतो. बुफेत ज्यूस वगैरे ठेवले असतील तर मग ते पिऊन पोट जड झाल्यामुळे त्याला साडेतीनशे ग्रॅमच्या आसपासच जेवण जातं, असं भालेकर सांगतात. असा हिशेब केला जातो, कारण त्यानुसार माणसांचा, किती बनवायचं काय बनवायचं याचा अंदाज बांधला जातो. बुफेमध्ये साताठशे माणसांचं जेवण अवघ्या दोन-तीन तासांत होतंसुद्धा. त्यामुळे पंगतीपेक्षा ते आटोपशीर ठरतं. अर्थात पंगतीच्या जेवणापेक्षा बुफेला खर्च जास्त येतो, कारण त्यात वैविध्यही खूप असतं. पण हौसेला मोल नसल्यामुळे लग्नासाठी हात सैल सोडून खर्च करायची संबंधितांची तयारी असते.

त्यामुळे आता हळूहळू पंगतीपेक्षा बुफेची पद्धत रूढ व्हायला लागली आहे. त्यामुळे त्या पंगती, ‘सावकाश होऊ द्या’ची विनंती, पैजा, आग्रहाची वाढणी हे दिसणं हळूहळू कमी होत जाईल. पण दुसरीकडे लग्नांमध्ये वेगवेगळ्या पदार्थाचं भरपूर वैविध्यही चाखायला मिळेल. म्हणूनच पारंपरिक पंगतींमध्ये बुफेचा हा पंक्तिप्रपंच काळानुरूप हवाहवासाच आहे.
वैशाली चिटणीस