आता जमाना आहे डिजिटल फोटोग्राफीचा. लग्नातले भावुक, हटके, गमतीशीर असे असंख्य क्षण टिपताना कसलीही मर्यादा नसते. या सोनेरी क्षणांच्या ‘कॅण्डिड’ नजराण्यामुळे लग्नाच्या अल्बमला चार चाँद लागतात.

‘मेहंदी लगा के रखना’, ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’, ‘लाजून हासणे, हासून पाहणे’, ‘गंगाजमुना डोळ्यात उभ्या’, ‘लेक लाडकी या घरची’ ही गाणी म्हणजे फक्त गाणी नाहीत तर प्रत्येक विवाह सोहळ्याचे विविध क्षण असतात. सोहळ्याचा प्रत्येक साक्षीदार हे क्षण अनुभवतात आणि डोळ्यांद्वारे आठवणींच्या कुपीत साठवून ठेवतात. त्या चिरकाल टिकवण्याचे श्रेय जाते ते लग्नाच्या फोटो अल्बम्सना. कदाचित आपल्या आजोबांच्या विवाहावेळी फोटो हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. आधीच्या फार तर एखाद्या पिढीपासून फोटोंचे तंत्रज्ञान आले तशा आठवणी जतन करण्याची एक उत्तम सोय झाली. अजूनही जुन्या लग्न सोहळ्यांचे अल्बम कपाटातून बाहेर आले की त्याभोवती कोंडाळे करून ते आठवणींचे सुगंध मनामनांत दरवळतात. विवाहप्रसंगी केलेला सगळा दिमाख, मेकअप, आरास, जेवणावळी, मानपान हे सारे विसरून जायला होते, पण चिरकाल टिकून राहतात ते अशा प्रसंगी काढलेले अनुरूप फोटो.

02lp-marriage

काळानुरूप पिढय़ा, राहणी आणि विचारसरणी बदलली आणि फोटोची साधनेदेखील. नवनवीन तंत्रज्ञानाने फोटो अधिक देखणे करता यायला लागले. वेगवेगळे लाइट्स, कॅमेरे, प्रगत प्रोसेसिंगची सॉफ्टवेअर, छपाईचे नवनवे पर्याय यांमुळे हे अल्बम अधिकाधिक आकर्षक होऊ  लागले. आजवर अशा विवाहप्रसंगी फोटो काढून घेणे म्हणजे एक मोठा सोपस्कार असायचा. प्रत्येक विधीला पोज देऊन उभे राहणे, कॅमेऱ्याकडे पाहणे, मग फोटोग्राफर रेडी म्हणून क्लिक करणार. ग्रुप फोटोमध्ये प्रत्येकाला हाकत उभे करून ठीकसा फोटो येईल असे पाहणे आणि नंतर अल्बममध्ये फोटो पाहताना ‘आपल्या पमीच्या मावशीच्या जाऊबाई बरं का या’, ‘अरे हा तर अमुकतमुक, हा पण आला होता काय लग्नाला’, अशा कमेंट्स पास होत राहतात. अशा फोटोंमध्ये तोचतोचपणा जाणवायला लागतो. म्हणजे लग्न सोहळ्याचे बातमीपत्र किंवा माहितीपत्रक पाहतोय की काय, असा फील येत राहतो. या साऱ्यात लग्नातल्या गमतीजमती, मेंदी काढतानाचे हास्यविनोद, आदल्या रात्री संगीत सोहळ्यातले परफॉर्मन्स, वधूचे बावरणे, हसणे-खिदळणे, विविध भावभावनांची आंदोलने, नवरदेवाने हळूच कटाक्ष चोरून नववधूकडे पाहणे, ते जाणवून तिचे ते मोहक लाजून चूर होणे, नवरदेवाच्या मित्रांनी उडवलेली त्याची टर, घोडय़ावरून उतरल्यावर नवरदेवाने घेतलेल्या चार-दोन नृत्याच्या स्टेप्स, लाजलेली- बावरलेली दुल्हन, ख्रिश्चन लग्नात वराने घेतलेला नाजूक किस, शीख लग्नातले लस्सीचे ओसंडणारे ग्लास, पाठवणीच्या वेळी बहिणींच्या डोळ्यांतले पाणी, वधूपित्याने कसोशीने पापण्यांआड दडवलेले अश्रू हे सारे त्या फोटोंमध्ये कुठेच दिसत नाही. भारतीय विवाह सोहळा म्हणजे फक्त दोन मनांचे-कुटुंबांचे मीलन नसून तो एक भावनांचा, रंगांचा, व्यक्तींचा, आनंदाचा एकत्र रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप असतो. आणि हा कॅलिडोस्कोप प्रत्येक कोनातून वेगळे दृश्य दाखवतो. हे टिपायचे असेल तर पारंपरिक फोटोग्राफी प्रकाराला छेद देऊन चौकटीबाहेर जाऊन फोटो टिपण्याची गरज असते. त्या गरजेतूनच निर्माण झाली एक वेगळ्या प्रकारची छायाचित्रण शैली तिलाच आजच्या परिभाषेत कंटेम्पररी (किंवा समकालीन) वेडिंग फोटोग्राफी किंवा कॅन्डिड वेडिंग फोटोग्राफी म्हणतात.

03lp-marriageसमोर सुरू असलेला विवाहप्रसंग, विधी हा नेहमीच्या पद्धतीने छायाचित्रित न करता एखाद्या निराळ्याच अँगलने काढून त्या क्षणाचे मर्मभाव अचूक टिपून ती फ्रेम वेगळ्याच पद्धतीने पेश करणे यालाच अशा प्रकारची कंटेम्पररी वेडिंग फोटोग्राफी म्हणतात. अशा वेळी समोर चालू असलेल्या लग्नविधींना कमीत कमी अडथळा आणून ईप्सित फ्रेम मिळवणे हे त्या फोटोग्राफरचे कसब असते. वेगवेगळ्या अँगल्सने फोटो काढण्यासाठी बऱ्याच वेळा एकाहून अधिक फोटोग्राफरदेखील एका वेळी हे सारे टिपत असतात. एक संपूर्ण टीम कार्यरत असते. बऱ्याच वेळा असे सोहळे कमी प्रकाशाच्या जागी, घाईघाईत होत असतात. तेव्हा एकही फ्रेम मिस होऊ  नये म्हणून अशी टीम कायम सतर्क राहणे आवश्यकच असते. कमीत कमी वेळात, कमी प्रकाशात जलदरीत्या फ्रेम कैद व्हावी यासाठी महागडे आधुनिक कॅमेरे, महागडय़ा लेन्सेस, लाइटिंग अ‍ॅरेंजमेंट्स, रिफ्लेक्टर्स हे सारे त्या-त्या जागी चोख असावे लागते. प्रत्येक अंतरावरील फोटोसाठी वेगवेगळ्या लेन्स लावलेले गळ्यात दोन-तीन कॅमेरे, त्यावर फ्लॅशलाइट, कमरेला एखाद-दोन लेन्स पाऊचेस अशा अवतारात फोटोग्राफरचे काम सुरू असते. एखादा प्रसंग पुन्हा रिटेकची सोय नसल्याने कायम सतर्क राहून टिपलेली अचूक फ्रेम पुढे फोटो पाहणाऱ्याला एक वेगळाच आनंद देऊन जाते.

04lp-marriageलग्न ठरले आणि तारीख पक्की झाली की फोटोग्राफर शोधण्याची मोहीम सुरू होते. बऱ्याच चांगल्या फोटोग्राफर्सच्या वेबसाइट, फेसबुक प्रोफाइल, आधीचे रेफरन्स, त्याने आधी केलेले काम, बजेट, तारखा यांची सांगड जमली की शेवटी फोटोग्राफरचे बुकिंग केले जाते. फोटोग्राफर दोन्ही बाजूंच्या कुटुंबांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या अपेक्षा समजून घेतो. त्यानुसार एकूण सोहळ्याचा आराखडा समजून घेतो. वर-वधूचे लग्नाचे कपडे, मेकअप आर्टिस्ट यांच्याशी चर्चा करून एकून त्यातली थीम आणि रंगसंगती समजून घेतली जाते. दोन्हीकडील नातेवाईक मंडळी, वर-वधू यांच्या कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य, त्यांचे परस्परांशी असलेले नाते भावबंध यांचा फोटोग्राफर मनातल्या मनात अभ्यास करीत असतो. कित्येक वेळा फोटो काढताना समोरच्यांना नवखेपण जाणवू नये म्हणून फोटोग्राफी टीम त्या कुटुंबाचाच एक भाग बनून जाते. त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारून, वधूचा नव्‍‌र्हसनेस काहीसा हलका केला जातो. मग अगदी कुटुंबातील आजीच्या शेजारी बसून तिच्याशी त्यांच्या लग्नाच्या वेळची वर्णने ऐकली जातात किंवा एखाद्या काकूच्या थेट किचनमध्ये प्रवेश मिळवून त्यांच्या माहेरच्या लोकांची माहिती काढली जाते. हेतू हा की, संपूर्ण शूटचा आराखडा आधीच पुरेसा सविस्तरपणे आखता यावा, कुटुंबाची ओळख व्हावी आणि खरेखुरे कॅन्डिड फोटो मिळावेत.

सोहळ्याच्या दिवशी सहसा थेट कुटुंबासारखीच वेशभूषा करून फोटोग्राफर टीम या सोहळ्यात सामील होते, त्याचाच एक भाग बनून जाते. असे केल्याने बेमालूमपणे आपले फोटो टिपण्यास मदत होते. वर-वधूला सोहळ्याच्या आधी काही दिवस कुठे तरी बाहेर घेऊन जाऊन त्यांचे प्री-वेडिंग फोटोशूटदेखील पार पाडले जाते. या प्री-वेडिंग फोटोशूटचा हेतू हा की, विवाहाचे अत्यंत फॉर्मल वातावरण सोडून नवदाम्पत्याचे खेळीमेळीच्या वातावरणातले असे छान फोटो मिळावेत की ते फ्रेम करून किंवा कॉफीटेबल बुकसारखा एखादा अल्बम बनवता यावा, जो पुढे त्यांना आयुष्यभर या सोनेरी दिवसांची आठवण करून देईल.

अर्थात हटके फोटोग्राफीमध्ये आव्हानेही तेवढी आहेत. अशा प्रकारच्या फोटोसाठी लागणारी इक्विपमेंट्स खूपदा महागडी असतात. अनेक फोटोग्राफर या व्यवसायात उतरल्याने स्पर्धादेखील त्या प्रमाणात वाढली आहे. काही एखादी स्टाइल कॉपी करून काही दिवस तग धरतात, परंतु व्यवसायात टिकण्यासाठी प्रत्येकाला आपले वेगळेपण वेगवेगळ्या फ्रेम्समधून आणि फोटोवर केलेल्या संस्कारांतून सिद्ध करावे लागते. एका वेगळ्याच कोनातून काढलेला एखादा फोटो, वेगवेगळे फ्लॅशेस आणि प्रकाशयोजना यांची रचना करून एखादा साधलेला वेगळा इफेक्ट, एखाद्या संपूर्ण फोटोसीरिजसाठी वेगळी कलरस्कीम (रंगयोजना) अशा विविध कल्पना वापरून फोटोग्राफर आपली कला खुलवत असतो. स्पर्धेत टिकून राहायचे तर काही तरी आऊट ऑफ द बॉक्स करून दाखवावे लागते. अतिशय कलात्मक पद्धतीने काढलेला एखादा फोटो फोटोग्राफरची वेगळी ओळख बनवून जाते. या क्षेत्रातील आव्हाने, आर्थिक गणित आणि काही प्रमाणात आपल्या आवडीच्या छंदाच्या क्षेत्रातच काम करायला मिळण्याचा आनंद यामुळे नवीन पिढीतील अनेक तरुण याकडे एक करिअर ऑप्शन म्हणून पाहत आहेत. कित्येक इंजिनीअर, आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडलेले ग्रॅज्युएट्स, आर्किटेक्ट्स या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन उल्लेखनीय काम करीत आहेत. अर्थात मार्केट पोजिशन टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन कल्पना शोधणे आणि त्यांना मूर्त स्वरूप देणे, आपले ज्ञान आणि इक्विपमेंट अद्ययावत राखणे, क्लायंटच्या बजेटमध्ये पॅकेज बसवून एक्झिक्यूट करणे, इत्यादी सर्वसाधारण व्यवसायाची गणिते इथेही सोडवावी लागतातच.
06lp-marriage

प्रत्यक्ष लग्नात आणि इतर विधी-सोहळ्यांत फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरची एडिटिंग टीम संपूर्ण सोहळ्याच्या फोटोवर संस्कार करून ते छापण्यासाठी तयार करते. हे संस्कार प्रत्येक फोटोग्राफरचा युनिक सेलिंग पॉइंट (यूएसपी) असतात. काही अंशी तर तीच त्याची ओळख असते. संपूर्ण सोहळा आटोपला आणि चार-सहा दिवसांनी दोन्ही कुटुंबे निवांत झाली की एकदा छापण्यासाठीच्या फोटोंची निवड करायला एखादी बैठक होते. मग कुठला फोटो अल्बममध्ये कुठे लावायचा, कुठे कुणाचा फोटो कुठल्या साइजमध्ये बसवायचा यावर चर्चा होते. कुठल्या प्रकारच्या कागदावर छपाई, किती प्रती वगैरे सारे ठरले की फोटो प्रिंट होऊन येतात. डिलिवर केलेल्या अल्बमचे प्रकारही कित्येक. एखादा हँडमेड कागदाचा, एखादा लेदरचं कव्हर असलेला, एखादा ठेवणीतला अल्बम फक्त ब्लॅकव्हाइट फोटोंचा. नवीन अल्बमचा एक वेगळाच सुगंध घेऊन जेव्हा सारे कुटुंब फोटो पाहायला कोंडाळे करून बसते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि निरोपाच्या फोटोवर हात फिरवून आजीच्या आणि आईच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू हीच खरी फोटोग्राफरच्या कामाची पावती असते.

फिल्म ते डिजिटल :

डिजिटल कॅमेऱ्यांचे युग येण्याआधीदेखील वेडिंग फोटोग्राफी नक्कीच अस्तित्वात होती; परंतु कॅन्डिड वेडिंग फोटो नावाचा प्रकार मात्र नसावा. याचे कारण म्हणजे फिल्मवर काम करताना एवढे स्वातंत्र्य मिळत नसावे. शिवाय फिल्मच्या रोलची किंमत, त्याचा डेव्हलपिंग आणि प्रिंटिंगचा खर्च लक्षात घेता कॅन्डिड किंवा नकळत काढले जाणाऱ्या फोटोंसाठी तुलनेने फार यातायात करावी लागत असे. शिवाय एखादी फ्रेम हुकली किंवा चुकली तर डिलिट करण्याची सोयही नव्हती; त्यामुळे आहे त्या रिसोर्सेस आणि बजेटमध्ये फोटोग्राफीचे काम करून द्यायचे तर असा वेगळा काही प्रयोग करून पाहण्यासही तशा मर्यादा असणार. तेव्हा लग्नाच्या फोटोवेळी सर्वाना एकत्र बसवून आणि पोज देऊन ‘शुअर शॉट’ फोटो मिळवण्याइतपतच फोटोग्राफी मर्यादित राहिली. डिजिटल कॅमेऱ्यांचा जन्म झाला आणि मेमरी स्टोरेजच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या तेव्हा साहजिकच नवनवे प्रयोग करून पाहण्यास फोटोग्राफर्सना वाव मिळाला. या नवनव्या प्रयोगांचे आऊटपूट लोकांना आवडू लागले आणि डिजिटल युगाचा फायदा कलात्मक छायाचित्रकारांची एक नवी आणि वेगळे प्रयोग करून पाहणारी फळी तयार झाली.
05lp-marriage

प्री/पोस्ट वेडिंग कपल फोटोसेशन :

कंटेम्पररी वेिडग फोटोग्राफीमध्ये फारच कमी वेळा वधूवरांना फोटो काढण्यासाठी कॅमेराकडे पहावे लागते. सगळा भर सोहळ्याचे विविध रंग आणि पोत टिपण्यावर दिला जातो. अशा वेळी वधूवरांच्या नात्यांतील नवखेपणा, नावीन्य, एकमेकांशी मनाच्या तारा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदी चेहऱ्यावरील सुरावटी जरी दिसून येत असल्या तरी त्यात आजूबाजूच्या नातेवाईकांच्या उपस्थितीमुळे एक सहजता नसते. पूर्वी फोटोग्राफर जसे वधूवरांना घेऊन फोटो काढण्यासाठी कार्यालयाच्या बागेत घेऊन जायचे त्याचेच हे एक नवीन रूप म्हणजे प्री/पोस्ट वेिडग कपल फोटोसेशन. बरेचदा लग्नसोहळ्यात वेळ, प्रकाशयोजना, चेहऱ्यावरील हावभाव, नवदाम्पत्याची प्रायव्हसी या गोष्टी फोटोग्राफरच्या (किंबहुना कुणाच्याच) नियंत्रणात नसतात. ती उणीव दूर करण्यासाठी विवाहाच्या आधी किंवा नंतर साधारण दोन-तीन आठवडे कुठल्या तरी हटके आऊटडोअर लोकेशनला कपल शूट अरेंज केले जाते. व्यवस्थित लाइटिंग इक्विपमेंट्स, फ्लॅश, र्फ्लेिक्टर्स, फोटो खुलवण्यासाठीचे साहित्य (प्रॉप्स), मनासारखे कपडे, मेकअप आर्टस्टि असा सगळा जामानिमा घेऊन हे फोटोसेशन पार पाडले जाते. एखादी मनमोहक फुलांची बाग, रिसॉर्ट, एखादा तलाव, जंगल, एखादा किल्ला, जुना वाडा, अगदी गॅरेजसुद्धा अशा वेळी इंटरेिस्टग लोकेशनची भूमिका पार पाडते. लग्नाच्या आधी केलेले शूट हे लग्नाच्या निमंत्रणासाठी आणि सोशल मीडियावर लग्नाचे निमंत्रण पाठवण्यासाठीही काही विशेष फोटो अर्थात या शूटसाठी वधूवरांना हवी तशी प्रायव्हसी मिळत असल्याने काही इंटिमेट रोमँटिक क्षणांचेही छायाचित्रण पार पाडता येते. शेवटी एकमेकांमध्ये गुंतत जाणे हीच तर त्यांच्या सहजीवनाची, परीकथेची सुरुवात असते. फोटोग्राफी आणि त्याद्वारे येणारा सोनेरी क्षणांचा अल्बम हे त्या नवपरिणित दाम्पत्यासाठी चिरकाल टिकवून ठेवलेले स्वप्न असते.
पंकज झरेकर