क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांनी मुसंडी मारणे यात तसे नवीन काहीच नाही. पण गेली काही दशके केवळ पुरुषांचाच आणि पुरुषी  खेळ म्हणून  मानल्या गेलेल्या क्रीडा प्रकारात उतरून पुरुषांच्या संघात खेळून स्वत: ठसा उमटवणे मात्र क्रीडा क्षेत्रातील िलगसमानता अधोरेखित करते. अलीकडच्या दोन घटना त्याचेच प्रतीक आहेत. यातील एक घटना इंग्लंडमधील तर दुसरी भारतातील आहे. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रातील या िलगसमानतेचा ‘टीम लोकप्रभा’ने घेतलेला हा आढावा…

इंग्लंडच्या सारा टेलरचे नाव सध्या चर्चेत आहे. कारण ऑस्ट्रेलियातील एका क्रिकेट स्पध्रेत ती पुरुष क्रिकेटपटू सोबत रुबाबात खेळली. क्रिकेटमधील स्त्री-पुरुष भेद लवकरच नष्ट होऊन मिश्र स्वरूपाचे क्रिकेट अस्तित्वात येईल, याची ही नांदी म्हटल्यास मुळीच वावगे ठरणार नाही. साराने तसे गेल्याच वर्षी क्रिकेटजगताचे लक्ष वेधून घेतले होते. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला होता. पण भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजासोबतचा तिचा ‘ट्विटर’संवादही गाजला होता. टेनिस, बॅडमिंटनसारख्या खेळांमध्ये मिश्र स्वरूपाचे सामने खेळवले जातात. परंतु या खेळांमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक लोकप्रियता आहे.

२६ वर्षीय सारा ही इंग्लंडची यष्टिरक्षक फलंदाज. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या संघांमधील ती महत्त्वाची आधारस्तंभ. पण पुरुषांच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची उर्मी तिने बऱ्याच वर्षांपासून जोपासली होती. सारा त्यावेळी १७ वर्षांची होती, तर हॉली कॉलव्हिन १६ वर्षांची. या दोघींचा ब्रिटन कॉलेजच्या मुलांच्या संघात समावेश केल्यामुळे वाद उद्भवला होता. एमसीसीनेही या गोष्टीबाबत आक्षेप नोंदवला होता. परंतु या दोघींच्या गुणवत्तेला मर्यादा घालणे कठीण होते. त्या दोघींची इंग्लंडच्या महिला संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी निवड झाली. चालू वर्षांत तिनं आणखी एक ऐतिहासिक मजल मारली आहे. होव्ह येथे ब्रिटन आणि होव्ह काऊंटी क्रिकेट मैदानावर झालेल्या शानदार कार्यक्रमात साराचा ‘लेजेंड्स लेन’मध्ये (महान क्रिकेटपटूंच्या पंक्तीत) समावेश करण्यात आला. अर्थात हे यश मिळवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू.

२००८ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठणारी ती सर्वात युवा महिला क्रिकेटपटू ठरली होती. तिनं भारताविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी साकारून संघाला १० विकेट्स राखून शानदार विजय मिळवून दिला होता. ग्रामीण क्रिकेट हंगामातसुद्धा तिनं डार्टन फर्स्ट इलेव्हनचे प्रतिनिधित्व केलं. त्यावेळी ती हे धाडस करणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्या पावलांवर पाऊल टाकून कॅथरिन ब्रंटसुद्धा या स्पध्रेत खेळू लागली. आता साराच्या खात्यावर आठ कसोटी, ९८ एकदिवसीय आणि ७३ ट्वेन्टी-२० सामने जमा आहेत.

इंग्लिश महिला अग्रेसर

क्रिकेटमध्ये पुरुषांच्या सामन्यामध्ये एखाद्या महिलेने खेळण्याचं हे पहिलं उदाहरण नाही. केट क्रॉस, क्लॅरे कोनोर, अ‍ॅरन ब्रिंडले, इलिसे पेरी आणि च्लोई वॉलवर्क यांनीसुद्धा हा पराक्रम करून दाखवला आहे.

कॅट क्रॉस : इंग्लंडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कॅट क्रॉसने यंदाच्या वर्षी लँकेशायर पुरुषांच्या लीगमध्ये सर्वाचे लक्ष वेधून घेतले. वेगवान गोलंदाज कॅटने ४७ धावांत आठ बळी घेण्याची किमया साधली. त्यामुळे कॅटच्या हेवूड संघाने अन्सवर्थ संघाला १२१ धावांत गुंडाळले आणि सहा विकेट्स राखून विजय मिळवला. २३ वर्षीय कॅट लँकेशायर लीगच्या १२३ वर्षांच्या कारकीर्दीत खेळलेली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.

क्लॅरे कोनोर : इंग्लंडच्या ३९ वर्षीय क्लॅरे कोनोरने महिलांप्रमाणेच पुरुषांच्या क्रिकेटलाही फार मोठे योगदान दिले आहे. ब्रिटन महाविद्यालयाच्या पुरुषांच्या संघाकडून ती खेळायला लागली, तेव्हा क्लॅरे सर्वप्रथम प्रकाशझोतात आली. २००२मध्ये द क्रिकेटर कप स्पर्धा खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. ओल्ड ब्रिटनियन्स विरुद्ध लान्सिंग रोव्हर्स या सामन्यात ती खेळली होती. इंग्लंडमध्ये दिले जाणारे मानाचे एमबीई आणि ओबीई हे दोन पुरस्कार तिने अनुक्रमे २००४ आणि २००५मध्ये पटकावले. १९९९मध्ये क्लॅरेने भारताविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली होती. तर २००० ते २००६ या कालावधीत इंग्लंडचे नेतृत्व तिने केले होते.

अ‍ॅरन ब्रिंडले : ३३ वर्षीय अ‍ॅरन ब्रिंडले हीसुद्धा इंग्लंडची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती अल्पावधीत नावारूपास आली. अ‍ॅरनची कॅरोलिन अ‍ॅटकिन्ससोबत साकारलेली १५० धावांची विश्वविक्रमी भागीदारी अतिशय गाजली. मग कुटुंबीयांकडे लक्ष देण्यासाठी तिने २००५मध्ये निवृत्ती पत्करली. कालांतराने पुरुषांच्या क्रिकेटमध्ये तिचे नाव चर्चेत आले. स्थानिक लीगमध्ये अ‍ॅरन आपला पती जेम्ससोबत लोथ संघासाठी खेळू लागली. २०१०मध्ये तिने या संघाचे कर्णधारपदही भूषवले, तर २०११मध्ये मार्केट डिपिंग संघाविरुद्ध खेळताना तिने १२८ धावांची खेळी उभारली होती. पुरुषांच्या व्यावसायिक स्पध्रेत शतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. पुरुषांच्या क्रिकेटविषयीचे तिचे प्रेम आजही टिकून आहे. २०१०मध्ये अ‍ॅरनने इंग्लिश संघात पुनरागमन केले. ऑक्टोबर २०११मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले.

इलिसे पेरी : ऑस्ट्रेलियाच्या इलिसे पेरीचे उदाहरण मात्र यापेक्षाही दुर्मीळ आहे. २४ वर्षीय इलिसे चक्क दोन खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. क्रिकेट आणि फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. सिडनी ग्रेड क्रिकेटमध्ये खेळणारी ती महिला खेळाडू ठरली. ब्लॅकटाऊन संघाविरुद्ध तिने ४ षटकांत १४ धावांत २ बळी घेण्याची किमया साधली. ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात युवा महिला क्रिकेटपटू ठरलेल्या एलिसेने आपल्या अष्टपैलूत्वाच्या बळावर सर्वानाच थक्क केले आहे. २०१०च्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या अंतिम फेरीत एलिसेने १८ धावांत तीन बळी घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला फक्त तीन धावांनी हरवले आणि विश्वविजेतेपद काबीज केले. ती न्यू साऊथ वेल्स संघाचीही महत्त्वाची आधारस्तंभ आहे.

च्लोई वॉलवर्क : इंग्लंडची च्लोई वॉलवर्क दोन वर्षांपूर्वी चर्चेत आली. कारण १२५ वर्षांचा इतिहास असलेल्या लँकेशायर लीमध्ये खेळलेली ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. वॉलशॉ संघाकडून गोलबोर्नेविरुद्ध खेळताना तिने ११ षटकांत चार बळी घेतले होते. तर चार षटके निर्धाव टाकली होती. वॉलशॉच्या विजयात तिचा सिंहाचा वाटा होता.

वाटचाल कुर्मगतीने

lp11पुरुषांच्या क्रिकेट टीममध्ये महिला खेळल्याची ही उदाहरणे क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्येच मोठय़ा प्रमाणात आढळतात. महिला क्रिकेटला १८व्या शतकात प्रारंभ झाल्याचे काही दाखले सापडतात. मात्र महिलांचा पहिला क्रिकेट क्लब १८८७मध्ये यॉर्कशायरमधील नन अ‍ॅपलटन येथे स्थापन झाला. व्हाइट हिदर क्लब असे त्याचे नाव होते. १९२६मध्ये महिला क्रिकेट असोसिएशन स्थापन झाले. १९९८मध्ये त्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट असोसिएशनमध्ये विलिनीकरण झाले. हा संघ १९३३मध्ये लिसेस्टर येथे पहिला सामना खेळला. मग डिसेंबर १९३४मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात महिलांचा पहिलावहिला कसोटी सामना खेळला गेला. पुरुषांच्या कसोटी सामन्याच्या अनेक वर्षांनंतर महिलांचे सामने सुरू झाले. नंतर मात्र महिलांच्या क्रिकेटने पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणेच वेग घेण्याचा प्रयत्न केला. १९७३मध्ये जॅक हेवर्ड या उद्योगपतीच्या संकल्पनेतून १९७३मध्ये महिलांची पहिली विश्वचषक स्पर्धा झाली. विशेष म्हणजे त्यानंतर दोन वर्षांनी १९७५मध्ये पुरुषांच्या विश्वचषक स्पध्रेला प्रारंभ झाला. पण तरीही महिला क्रिकेटची वाटचाल कुर्मगतीने सुरू आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये काही प्रमाणात स्पर्धा होतात. ही संख्या भारत आणि अन्य आशियाई देशांमध्ये अतिशय कमी आहे. त्यांची निवड चाचणी, क्लब्स हे अत्यल्पच आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमधील आयपीएल, चॅम्पियन्स लीग आदी स्पर्धा गेली अनेक वष्रे झोकात सुरू आहेत. मात्र महिलांच्या क्रिकेटमध्ये पुढील काही वष्रे तरी फ्रेंचायझींवर आधारित स्पर्धा होण्याची सुतराम शक्यता नाही.

गेल्या काही वर्षांतच महिला क्रिकेट पुरुषांच्या क्रिकेटमध्ये विलीन झाल्याचे बऱ्याच देशांमध्ये आढळते. अन्यथा त्यांना प्रत्येक सामन्यापोटी तुलनेने अत्यंत कमी मानधन आणि व्यवस्था दिल्या जायच्या. भारतात यंदाच्या वर्षीपासून महिलांसाठीही श्रेणीनिहाय मानधनाची संकल्पना अस्तित्वात आली आहे. येत्या काही वर्षांत महिलांचे क्रिकेटही अधिक चांगली भरारी घेईल, अशी आशा सर्वाना आहे. २००९मध्ये इंग्लिश फलंदाज क्लॅरी टेलरचा ‘विस्डेन’च्या वर्षांतील पाच क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला होता. ‘विस्डेन’च्या १२० वर्षांच्या इतिहासात हा सन्मान मिळवणारी क्लॅरी ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तूर्तास, येत्या काही वर्षांत महिलांचे क्रिकेट अधिक विकसित होईल आणि पुरुषांसोबत त्या मिश्र स्वरूपाचे सामनेही खेळतील, अशी आशा करू या!

प्रशांत केणी – response.lokprabha@expressindia.com