चहा विशेष
रश्मी करंदीकर – response.lokprabha@expressindia.com
चीन, जपान, तैवान, रशिया, अर्जेटिना, इंग्लंड या आणि अशा इतर देशांमध्ये चहा नुसता प्यायचा नसतो तर तो समारंभपूर्वक प्यायचा असतो. त्यांच्याकडचे त्यासाठीचे ‘टी सेरेमनी’ प्रसिद्ध आहेत.

आज सर्वसामान्य माणसांचे पेय म्हणून चहा प्रसिद्ध असला तरी चहाच्या जन्माची चित्तरकथा मात्र राजघराण्याशी जोडलेली आहे. असं सांगितलं जातं की ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये चीनचा तत्कालीन सम्राट शोन नॉग एका विस्तीर्ण जंगलात विश्रांती घेत होता. त्याचे सेवक पिण्यासाठी पाणी गरम करत होते. जंगलात ज्या झाडाखाली पाण्याचे भांडं गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्या झाडाची पानं वाऱ्याच्या झुळकीने त्या भांडय़ात पडली आणि पाण्यासोबत उकळली गेली. अशा पाण्याचा कप नकळत सेवकाने सम्राटाच्या हातात दिला आणि चहाचा जन्म झाला. तांबूस रंग तसंच वेगळ्या स्वादामुळे राजाला हे पेय फार आवडलं. ते प्यायल्यानंतर राजाला एकदम ताजंतवानं वाटलं. त्यामुळे चीनमध्ये चहा लोकप्रिय झाला. तुंग साम्राज्यात तर चहा एवढा लोकप्रिय झाली की चित्रकार, शिल्पकार, कवी यांनी चहावर चित्रं काढली, शिल्पं तयार केली, साहित्याची निर्मिती केली. ल्यू यू या चिनी तत्त्ववेत्त्याला तर चीनमध्ये ‘सेज ऑफ टी’ म्हणूनच ओळखलं जातं. चहा उकळण्याची पद्धत, चहाची पाने, ती तोडण्याची वेळ इ. अनेक बाबींचा त्यांनी सखोल अभ्यास केला. चीनच्या प्रसिद्ध गोडय़ा पाण्याच्या तळ्यातील पाण्याचा वापर करून त्याने चहा बनवला. त्या चहाची चव अतिशय वेगळी आणि चांगली होती. त्यातून ल्यूने निष्कर्ष काढला की चहा करताना वापरायचं पाणी अतिशय महत्त्वाचं आहे. हे पाणी ताजं आणि गोडं असेल तर त्या चहाची चव अधिक चांगली बनते. ल्यू यूने चहाच्या उकळण्याच्या पद्धती, त्याचे प्रकार, त्याकरिता वापरण्यात येणारे पाणी इत्यादींचा खूप सखोल अभ्यास केला.

मग त्याने ‘चाजिंग’ (classics of tea) हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये चहाच्या लागवडीपासून, तो तयार करणं पिणं इ. सर्व प्रकारांची इत्थंभूत माहिती आहे. जगभरामध्ये चहाच्या संदर्भातील महत्त्वाचा ‘संदर्भ ग्रंथ’ म्हणून आजही हे पुस्तक ओळखलं जातं.

गोन्फु सेरेमनी :

चीनमध्ये गोन्फु हा खास चहासाठी साजरा केला जाणारा उत्सव आहे. यासाठी खास ‘टी मास्टर्स’ असतात. या चहासाठी चीनमधल्या नैसर्गिक झऱ्यांचं पाणी वापरलं जातं. या टी सेरेमनीसाठी परंपरागत चहाच्या भांडय़ाचा वापर केला जातो. हा चहा सव्‍‌र्ह केल्यावर त्याचा वास घेऊन प्रत्येकाने त्याची स्तुती करून मग चहाचे घोट घेत तो संपवायचा असतो.

जपान :

जपानमध्ये चहाचं स्थलांतर झालं ते चीनमधून. सातव्या शतकात काही बौद्ध धर्मगुरू जपान चीनमध्ये अभ्यास करण्याकरिता आले. त्यापैकी ‘सैचो’ नावाच्या जपानी तत्त्ववेत्त्याने चीनमधील लोकप्रिय चहा जपानला नेला. जपानी सम्राट ‘सागा’ला हा चहा, त्याचा रंग, सुगंध खूप आवडला. त्याने त्याच्या राज्यात खास चहाची लागवड सुरू केली.

सुमारे सहा दशकं जपानमध्ये फक्त राजे, अमीर-उमराव यांचे चहा हे खानदानी पेय होतं. १४ व्या शतकातला प्रसिद्ध टी मास्टर मुरातो हा झेन  तत्त्वज्ञान मानणारा होता. मुरातोला चहामध्येदेखील झेन तत्त्वज्ञान आणि ध्यानधारणेची बीजं दिसली. सर्वसामान्य जनतेलादेखील चहा मिळावा याकरिता त्याने टी हट सुरू केली. या ठिकाणी समानता आणि साधेपणा ही झेन प्रणाली अंगीकारली जायची. भातापासून बनवलेल्या ‘ततामि’ नावाच्या खास मॅटवर सर्व लोकांना बसून चहापानाचा आस्वाद घेता येत होता. गरीब असो वा श्रीमंत, अमिर-उमराव किंवा सर्वसामान्य नागरिक, सर्व जण इथे समान आहेत हे झेन तत्त्वज्ञान मुरातोने अंगीकारलं. चहा घेतानादेखील खूप शांत आणि प्रफुल्लित वाटावं अशी खास व्यवस्था इथं केली गेली.

आता जपानध्ये जी टी सेरेमनीची परंपरा आहे, ती शुक नावाच्या जपानी चहा मास्टरने सुरू केली. अर्थात यामध्ये नेमका हवा तसा चहा बनविण्याची पद्धत शोधण्याकरिता त्याने कित्येक वर्षे अभ्यास केला. जपानी तत्त्ववेत्त्यांनी या पद्धतीमध्येदेखील दोन शाखा निर्माण केल्या आहेत. त्यातली एक आहे, इचिगो इचि, प्रत्येक मनुष्य प्रत्येक क्षणी वेगळा असतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण वेगळा असतो. त्याची पुनरावृत्ती कधीच होत नाही. आणि दुसरा आहे, वाबी. यामध्ये अपूर्णतेमध्ये असलेलं सौंदर्य अधोरेखित केलं आहे. निसर्गामध्ये असलेल्या गोष्टी, त्यातील अपूर्णता आणि त्याचे सौंदर्य या सर्वाचा मेळ झेन तत्त्वप्रणालीशी जोडून हा टी सेरेमनी साजरा केला जातो.

या सर्वामुळे जपानमध्ये चहा हा खूप पवित्र मानला जातो. माचा उत्सव (Matcha ceremony) हा टी सेरेमनी मास्टर शूने सुरू केला. याकरिता खास पारंपरिक माचा बोलमध्ये विशिष्ट तापमानाला उकळलेले तसंच त्यात चहाची पाने घालून बांबूच्या साहाय्याने ती एकत्र केली जातात. हा चहा लगेच प्यायचा असतो. याकरिता जमलेल्या प्रत्येकाकरिता वेगळा चहा बनवण्यिात येतो. प्रत्येक चहाची चव वेगळी असते. एकाच चहाच्या पानांपासून बनलेला चहा प्रत्येक वेळी वेगळा असतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण वेगळा आहे, या झेन तत्त्वज्ञानावर हा टी सेरेमनी आधारित आहे.

श्रीलंका :

श्रीलंकेमधील कॉफीचे मळे १८०० मध्ये प्लेगच्या साथीमुळे उद्ध्वस्त झाले. श्रीलंकेची अर्थव्यवस्था या कॉफी व्यापारावर अवलंबून होती. ती सावरण्यासाठी ब्रिटिशांनी स्कॉटलंडवरून जेम्स टेलर या स्कॉटिश शेतकऱ्याला पाचारण केलं. श्रीलंकेतील हवामान / माती यांचं परीक्षण करून १८७५ मध्ये त्याने चहाचा कारखाना सुरू केला. पुढे तेथील लिप्टन हा चहा जगभरात  प्रसिद्ध झाला. आजही श्रीलंकन चहा अव्वल दर्जाचा मानला जातो.

तैवान – तैवानमध्ये १६२४ ते १६६२ दरम्यान डच वसाहत होती. डच लोकांनी इथे चहाचे मळे सुरू केले. पुढे चिनी अतिक्रमणानंतर इथे चहा आणखी लोकप्रिय झाला. इथे जपान आणि चीन या दोघांच्या पारंपरिक मिश्रणातून ‘ओलांग टी’ प्रसिद्ध झाला. ऊर्जा आणि उत्साह याकरिता चहा हे अत्युत्तम पेय आहे असं तैवानी लोक मानतात. चहाशी संबंधित तैवानी दंतकथादेखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एका दंतकथेत एका चहा मळेवाल्याचं पाळलेले माकड दोरखंड तोडून जंगलात पळून जातं, खूप शोध घेऊनही ते सापडत नाही. पुढे पाच दिवसांनी ते माकड आपल्या मालकाकडे परत येतं. कारण त्या चहा मळेवाल्याने बनवलेल्या विशिष्ट चहाची त्या माकडाला एवढी सवय झालेली असते की ते चहाशिवाय राहूच शकत नाही.

तैवानमध्ये सुरुवातीला चिनी ‘गुंफू’सारखा टी सेरेमनी साजरा व्हायचा. परंतु नंतर तैवानी लोकांनी त्यांचा ‘वू वू’ नावाचा वेगळा टी सेरेमनी सुरू केला. यामध्ये प्रत्येकाने आपला चहा बनविण्याची साधनसामग्री घेऊन यायची असते. वर्तुळाकार बसून प्रत्येकाने चहा बनवायचा असतो आणि जमलेल्या प्रत्येकाने तो सेवन करायचा असतो. यामध्ये कोणीही नेता नसतो. सर्व जण समान आहेत आणि प्रत्येकाला संधी मिळते, असे तत्त्व या टी सेरेमनीमध्ये अंगीकारले जाते.

दक्षिण आफ्रिका :

दक्षिण आफ्रिकेच्या घनदाट जंगलात चहा पोहोचला तो ब्रिटिश वसाहतीनंतर. १८५० मध्ये भारतातून नेऊन आसाम चहाची रोपे दक्षिण आफ्रिकेत लावण्यात आली. लवकरच चहाने आफ्रिकन संस्कृतीत प्रवेश केला. आजही केनियामधला चहा प्रसिद्ध आहे.

दक्षिण आफ्रिकेत टी सेरेमनी सुरू झाला. त्याचं नाव आहे ‘आत्तया’. या आत्तयामध्ये चहा पिण्याच्या तीन फेरी असतात. याचं तत्त्वज्ञान खूप सुंदर आहे. चहाच्या पहिल्या फेरीमध्ये चहा थोडा कडुसर असतो. ही फेरी आपल्या जीवनाची सुरुवात, त्यातील दु:खं, मोठं होताना सोसलेले घाव याचं द्योतक मानली जाते. दुसऱ्या फेरीतील चहाचा स्वाद पुदिन्याची पानं, साखर वगैरे घालून खूप छान केला जातो. ही फेरी आयुष्यातील आनंदी क्षण, प्रेमाचे क्षण, लग्न, लग्नानंतरचं प्रेमळ आयुष्य, मुलांचा जन्म अशा आनंदाचं प्रतिनिधित्व करते, तर तिसऱ्या फेरीचा चहा अतिशय फिका असतो. ही फेरी आयुष्यातील वृद्धापकाळ अधोरेखित करते. जगातील वेगवेगळे टी सेरेमनी चहामधून जीवनाचं तत्त्वज्ञान फार वेगवेगळ्या रीतीने मांडतात.

रशिया :

रशियाच्या झारला मंगोलियन राजाने चहा भेट दिला आणि त्यातून रशियामध्ये १६ व्या शतकात चहा पोहोचला. सामोवारमध्ये विशिष्ट तापमानावर उकळलेला चहा पोर्सेलिनच्या सुंदर भांडय़ातून सव्‍‌र्ह केला जातो. या चहाने रशियाला एवढी भुरळ पाडली की कारमाझिन, अलेक्झांडर ओस्ट्रोव्हस्कीसारख्या प्रसिद्ध रशियन कवींनी चहावर कविता केल्या. आजमितीस रशियातील सर्वात लोकप्रिय पेय आहे चहा. रशियन लोक थोडासा कडक चहा पसंत करतात. पुदिना पानं किंवा लिंबू तर कधी फ्रुट जॅम घालून चहाचा फ्रुटी फ्लेवरही रशियामध्ये प्रसिद्ध आहे.

अर्जेटिना :

अर्जेटिनामध्येदेखील चहा खूप प्रसिद्ध आहे. अर्जेटिनाच्या स्थानिक जमातींमध्ये चहाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. चहा ही देवाने माणसाला दिलेली देणगी आहे असं हे लोक मानतात. चहाबद्दल एक कथा सांगितली जाते की फार पूर्वी त्यांच्या मेंढपाळ जमातीमध्ये त्यांचा प्रमुख होता. काळानुसार तो म्हातारा झाला. त्याला आपल्या टोळीसोबत प्रवास झेपेना. शेवटी त्याला मागे टाकून त्याची टोळी पुढे निघून गेली. जेरी नावाची त्याची धाकटी मुलगी मात्र त्याच्या सोबतीला राहिली. बिचाऱ्या म्हाताऱ्या वडिलांना मुलीची फार काळजी वाटत होती. आपली मुलगी आपल्या टोळीसोबतच नीट आनंदाने राहू शकेल असे त्याला वाटत होतं. असं सांगतात की, त्याच्या झोपडीसमोर एक दिवस एक साधू प्रगट झाला. त्याने जेरीला एक वर मागायला सांगतिलं. जेरी काही बोलण्याआधी तिचे वृद्ध वडील म्हणाले, ‘‘मला आरोग्य द्या, म्हणजे मी माझ्या मुलीला माझ्या जमातीच्या लोकांपर्यंत सुरक्षितपणे नेऊन पोहोचवू शकेन.’’ साधूने त्याला आशीर्वाद आणि एक रोपटे दिले. ते असते चहाचे रोप. पुढे साधूने सांगितल्याप्रमाणे चहाचे सेवन करून म्हातारा मेंढपाळ ठणठणीत होतो आणि मुलीला आपल्या टोळीमध्ये नेऊन पोहोचवतो. तेव्हापासून अर्जेटिनामध्ये चहा प्रसिद्ध आहे. अर्जेटिनामध्ये स्थलांतरित झालेल्या वेल्श लोकांनी हाय टी हा चहाचा ब्रिटिश प्रकार अर्जेटिनामध्ये आणला. आजही वेल्श टी शॉप्स त्यांच्या चहासाठी प्रसिद्ध आहेत.

अर्जेटिनामध्ये ‘येरबा मेट टी सेरेमनी’ प्रसिद्ध आहे. यात यजमान व्यक्ती चहा तयार करते. चहा परफेक्ट होईपर्यंत तो स्वत: टेस्ट करत राहते. असं करत करत सर्वोत्तम चहा झाल्यावर यजमान ते चहाचे भांडं अतिथीला देतात. त्यातून अतिथीने चहाप्राशन केला की ते भांडं परत यजमानांकडे दिले जाते. मग पुन्हा एकदा यजमान त्यात चहा करून पुढील अतिथीला देतात. अशा रीतीने सर्व जण चहापान करतात.

अमेरिका :

अमेरिकेत तर चहाने इतिहास घडवला. ब्रिटिशांनी लावलेल्या करामुळे अमेरिकेमध्ये चहाचे स्मगलिंग सुरू झाले. अमेरिकन लोकांना चहावर लावलेला भरमसाट कर मान्य नव्हता. १६ डिसेंबर १७६५ ला बोस्टनमध्ये चहा घेऊन एक जहाज आलं होतं. चहाच्या गोण्यांनी भरलेल्या या जहाजावर स्थानिक अमेरिकी लोकांनी हल्ला करून ते लुटलं. चहा समुद्रात फेकून दिला. सुमारे ४५ टन चहा नष्ट केला. आजच्या काळात त्या चहाचे मूल्य एक कोटी (१,०००,०००) होते. या बोस्टन टी पार्टीमुळे चहा अमेरिकेतून मागे पडला.

व्हिएतनाम :

चहा पिण्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या देशांमध्ये व्हिएतनामदेखील आहे. फ्रेंच वसाहतीने व्हिएतनाममध्ये चहाची लागवड सुरू केली. आजही व्हिएतनामी शेतकरी कुठेही फिरताना स्वत:सोबत गरम चहाचं भांडं ठेवतो. व्हिएतनामी लग्नामधील ‘टी सेरेमनी’ अतिशय महत्त्वाचा आहे. वधू-वर स्वत: चहा तयार करून आईवडिलांना देतात. आईवडील त्यांना या चहापानादरम्यान सुखी वैवाहिक जीवनाबाबत मार्गदर्शन करतात.

व्हिएतनामी चहापानामध्ये पाणी उकळल्यानंतर ते ९० अंश सेल्सिअसपर्यंत थंड केलं जातं. ९० अंश सेल्सिअस तापमानाला त्यात चहाची पानं टाकली जातात. त्यानंतर चहाचा सुगंध पाहिला जातो. मग सर्वाना चहा सव्‍‌र्ह केला जातो. व्हिएतनामी चहाचं तत्त्वज्ञान शांती, वडीलधाऱ्यांचा आदर, समाधानी चित्तवृत्ती, आराम या चार तत्त्वांवर आधारित आहे.

युरोप :

१६५० मध्ये डच लोकांनी युरोपमध्ये चहा आयात केला आणि युरोपची अर्थव्यवस्था बदलून टाकली. चार्ल्स दुसरा याच्या कॅथरीन डे ब्रेगान्झा या पोर्तुगाल राजकन्येबरोबर झालेल्या लग्नानंतर ब्रिटिश राजघराण्यात चहाचा शिरकाव झाला. याच लग्नामध्ये मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना भेट दिलं. त्यामुळे या लग्नाचा भारताच्या इतिहासावर, ब्रिटिशांच्या भारतातील प्रवेशावर खूप मोठा प्रभाव आहे.

चहामध्ये दूध घालायची सुरुवात ब्रिटिशांनी केली. याचीही एक गमतीशीर गोष्ट आहे. पोर्सेलीनचे नाजूक भांडी त्या काळात राजघराण्यात प्रसिद्ध होती. चहाच्या तापमानामुळे या नाजूक भांडय़ांना तडे जाऊ लागले. त्या काळातील ब्रिटिश सुगृहिणींनी त्यावर उपाय म्हणून चहामध्ये थोडंसं दूध घालायला सुरुवात केली, ज्यायोगे ते तापमान नियंत्रित होऊन नाजूक भांडय़ांना तडे जाणार नाहीत. त्यांची ही युक्ती सफल झाली आणि दूध घातलेल्या चहाचा जन्म झाला.

जगात चहाचे वेगवेगळे टी सेरेमनी आहेत. ब्रिटिशांनी त्यात हाय टीची भर घातली. हाय टी अर्थात दुपारच्या चहाची सुरुवात अ‍ॅना नावाच्या डच राजकन्येने केली. पूर्वी ब्रिटनमध्ये ब्रेकफास्ट आणि रात्रीचे जेवण अशी दोन वेळा जेवण्याची पद्धत होती. अ‍ॅनाला दुपारी भूक लागत असे. तिने चहा आणि त्यासोबत बेकरीतील खास पदार्थ खाण्यास सुरुवात केली. हळूहळू तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये तिची हाय टी पार्टी प्रसिद्ध झाली आणि हाय टीचा जन्म झाला. आज हा हाय टी ब्रिटिश संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो.

भारत :

हे चहायन भारताशिवाय पूर्ण होणं शक्यच नाही. भारतात सर्वात जास्त चहाबाज लोक आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय लोक वेगवेगळ्या स्वरूपांत चहा पितात. गंमत म्हणजे भारताइतक्या चहा करण्याच्या विविध पद्धती जगात इतरत्र कुठंही पाहायला मिळत नाही. बासुंदी चहा हा प्रकार फक्त भारतातच मिळू शकतो आणि तो तितकाच लोकप्रियही होऊ शकतो. पुदिना घातलेला, आलं घातलेला, दालचिनी चहा, लवंग घातलेला चहा, मसाला चहा, वेलदोडे घातलेला चहा असा वेगवेगळ्या मसाल्यांच्या स्वरूपात चहा भारतात आपल्यासमोर येतो. अगदी उकाळा, कुल्हड चहा, केशरी, मलाई मारके, रजवाडी अगदी तंदुरी चहादेखील इथं मिळतो.

आज आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या चहाचा शोध हनुमानाने लावला असंही मानलं जातं. लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी संजीवनी ही वनस्पती हवी होती तेव्हा हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला, त्यावर चहादेखील होता अशी श्रद्धा आहे. थोडक्यात इतक्या प्राचीन महाकाव्यापासून आजतागायत चहा आपल्याला तरतरी आणतो आहे.

तुम्हाला थंडी वाजत असेल, तर चहा तुम्हाला ऊब देईल,
तुम्हाला खूप उष्णता झाली असेल तर चहा तुम्हाला थंडावा देईल,
तुम्ही उदासीन झाला असाल तर चहा तुम्हाला उत्साह देईल,
तुम्ही थकला असाल तर चहा तुम्हाला तरतरी देईल…
— विल्यम ग्लेडस्टोन

तुमच्यासाठी एक कप शोधा, चहाचं भांडं तुमच्यामागेच असेल…
चला, आता मला तुमच्या शेकडो गुजगोष्टी सांगा
— साकी

या, आपण चहा घेऊ या
माझं घर उबदार आहे आणि माझी मैत्री विनामूल्य आहे.
— एमिली बर्न्‍स

पहिला कप माझ्या ओठांना आणि घशाला ओलावा देतो
दुसरा माझा एकटेपणा
पळवून लावतो
तिसरा माझ्या आयुष्यातल्या
चुकीच्या गोष्टी
हळुवारपणे दूर सारतो
चौथा माझ्या आत्म्याची
शुद्धी करतो
पाचवा मला देवाच्या समीप घेऊन जातो.
— चिनी कविता