भविष्य विशेष
उल्हास गुप्ते – response.lokprabha@expressindia.com
ईश्वराने माणसाला मनाबरोबरच बुद्धीही दिली आहे. तिच्या सहाय्याने जगण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनुभवांकडे तो सुख-दु:खाच्या नजरेतून पाहू लागला. मग दु:खे आणि त्यांचा परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जाऊ लागला. येणाऱ्या वर्षांत आपले आयुष्य कसे असेल याचे कुतुहल त्याच्या मनात निर्माण झाले. ग्रहताऱ्यांच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.

फलज्योतिषशास्त्र नि संख्याशास्त्र यांचा मेळ घालून फलादेशाचा विचार केला तर बरेच निष्कर्ष सत्यतेच्या जवळपास जात असल्याचे आढळते. फलज्योतिषशास्त्रात ग्रहांची आणि संख्याशास्त्रात प्रत्येक महिन्यातील सूर्यप्रवासाची मदत घेतली तर या दोन्ही शास्त्रांच्या समन्वयातून २०१९ चे भविष्य निदान विस्तृतपणे करता येईल.

२०१९ ची पूर्ण बेरीज २+०+१+९= १२ येते. यामध्ये १+२= ३ हा या वर्षांचा एकांक येतो. ३ हा गुरूचा अंक उत्तम बुद्धिमत्ता दर्शवतो. तसेच दुसऱ्या व्यक्तीला सहज समजून घेण्याची क्षमता या अंकात असते.

सध्या आपल्या देशात भावनिक राजकारण करून राम मंदिर, स्मारके या प्रश्नात लोकांना गुंतवले जात आहे.  हा उद्योग कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थात असलेल्या कर्क राशीतील राहूचे वास्तव्य पक्ष-पुढाऱ्यांच्या माध्यमातून करीत आहे. लोकांच्या भावनांना हात घालून त्यांची फसवणूक करणे हा उद्देश त्यात असतो. कर्क ही चंद्राची हळवी रास आहे. त्यात येणारा पिळदार राहू देवा-धर्माच्या नावाखाली चाललेल्या राजकारणात अधिक वादविवाद निर्माण करील. राहूच्या गारुडातून निवडून आलेल्या राजकारण्यांपैकी एक उदाहरण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. आता राहू, मिथुन या बौद्धिक राशीत येत आहे. त्यामुळे लोकांमध्ये वैचारिक प्रगल्भता वाढेल. नि:स्वार्थी, ढोंगी पुढाऱ्यांना अपयश येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जन्मतारीख १७ सप्टेंबर १९५० आहे. या तारखेचा मूल्यांक ८ येतो तर भाग्यांक ५ येतो. या वर्षांवर ३ अंकाचा प्रभाव असणार आहे. हा ३ अंक ८ अंकाचा खूप जवळचा मित्रांक आहे. त्यामुळे हे वर्ष नरेंद्र मोदींना खूप यशदायक जाईल. २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. त्यांचा भाग्यांक ५ येतो तर त्यांच्या पूर्ण नावांची बेरीजही ४१ म्हणजेच ४ +१ = ५  येते. एकूण नावाची स्पंदनेही उत्तम आली आहेत. त्यामुळे त्यांच्या जागतिक कीर्तीत अधिक भर पडेल. पण त्यांच्याच पक्षातील नेते त्यांच्या कडक शिस्तीला कंटाळून दूर होतील.

मेष २०१९ (२१ मार्च ते १९ एप्रिल)

आपला जन्म २१ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान झाला असेल तर या काळावर ९ अंकाचा प्रभाव असतो. २०१९ या वर्षांचा एकांक ३ येतो. तीन अंकावर गुरू ग्रहाचा अंमल असतो. ३ आणि ९ हे मित्रांक आहेत. गुरू नि मंगळाच्या या मैत्रीतून या राशिप्रवासाला एक वेगळी सुज्ञता प्राप्त होईल. माणुसकीचे यथार्थ दर्शन घडेल. या व्यवहारी जगात माया- प्रेम- सहानुभूती या गोष्टी विकत मिळत नाहीत, पण त्या निव्र्याजपणे वाटल्या तर नक्कीच त्यात भर पडते. एकूण मंगळाच्या या पराक्रमी मनाला हे गुरूचे अध्यात्म खूप नवीन, पण मोलाचे वाटेल.

जानेवारी २०१९ : वर्षांची सुरुवात सुखदायक ठरेल. नवीन योजना-कल्पना कृतीत येतील. मात्र आर्थिक व्यवहारात अति भावनिक राहू नका. उद्योगधंद्यात महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल. राजकारणात, सामाजिक क्षेत्रात जुने वादविवाद विसरून कामाचे स्वरूप बदला. त्यात खूपशा गोष्टी हिताच्या ठरतील.

फेब्रुवारी २०१९ : उद्योगधंद्यात-नोकरीत नवीन संधी प्राप्त होतील. मात्र मंगळ-हर्षल युतीमधून निर्माण होणारा अतिरेक टाळा. खूप संयमाने घ्या, म्हणजे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करू शकाल. बोलण्यात, कृतीत सावधपणा खूप मोलाचा ठरेल.

मार्च २०१९ : नवीन जबाबदाऱ्या वाढतील. त्यात कामाचे स्वरूप मोठे होईल नि त्यातून श्रम आणि बुद्धीचा उत्तम समन्वय साधू शकाल. त्यातूनच नावलौकिक होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल, मात्र अतिश्रम, जागरणे टाळा.

एप्रिल २०१९ : कौटुंबिक गैरसमज दूर होतील. दुरावलेली मने एकत्र येतील. उद्योगधंद्यात प्रतिस्पध्र्याना कमी लेखू नका. कोर्टकचेरीच्या कामात समजुतीने घेऊन वाद मिटवणे फायद्याचे ठरेल. कला-साहित्य क्षेत्रात विशेष मानसन्मान.

मे २०१९ : स्वराशीत रवी विशेष लाभदायक ठरेल. नवीन योजना, नवीन कामे यासाठी उत्तम काळ. मात्र देण्याघेण्यातील व्यवहारात मैत्री, नातेवाईक अशा अडचणी दूर सारून चोखपणे वागा. शिस्तीला, वक्तशीरपणाला खूप महत्त्व द्या. म्हणजे कामांना वेग येईल.

जून २०१९ : शुक्राची उत्तम साथ. शिक्षण, राजकारण, कला, बौद्धिक क्षेत्रात आपला सहभाग यशस्वी ठरेल. कामातील तडफदारपणाचे कौतुक होईल. व्यवहारात सोपे मार्ग सापडतील. समस्या दूर होऊन त्यातून घेतलेले निर्णय फलदायी ठरतील.

जुलै २०१९ : जागा खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ. त्यात आर्थिक उलाढाली फायद्याच्या ठरतील. पण खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंबात किरकोळ गोष्टीवरून होणारे वाद दुर्लक्षित करावेत. संशयी वृत्ती दूर सारा. अंदाजाने विधाने करू नका.

ऑगस्ट २०१९ : उद्योगधंद्यात-नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळा. स्वभावातला हेकेखोरपणा दूर सारून कामांना प्राधान्य द्या. शाब्दिक चकमकीतून कुणाला दुखावून शत्रूसंख्या वाढवू नका. मात्र सत्य, विश्वास, प्रामाणिकपणा ही मूल्ये जपण्याचा जरूर प्रयत्न करा.

सप्टेंबर २०१९ : गुरू-रवीच्या उत्तम सहकार्यातून नवीन परिचय, नवीन मित्रांचा लाभ होईल. विशेष मेहनतीमुळे कामांना गती येईल, उत्साह अधिक वाढेल. मान्यवरांत कामाचे तोंड भरून कौतुक होईल.

ऑक्टोबर २०१९ : बुध-शुक्राच्या सहवासातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. घरगुती वातावरण आनंदी राहील. मौल्यवान वस्तूची खरेदी, लहान लहान प्रवासात आनंद लाभेल.

नोव्हेंबर २०१९ : आर्थिक स्थिती उत्तम राहील. उद्योगधंद्यात-नोकरीत वातावरण उत्साही राहील. जुनी येणी वसूल होतील. अनपेक्षितपणे जुनी मित्रमंडळी भेटतील. मात्र खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा. जागरणे कटाक्षाने टाळा. आरोग्याची काळजी घ्या.

डिसेंबर २०१९ : काही वैचित्र्यपूर्ण अनुभव येतील. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जा. मात्र अति उत्साह आणि आततायीपणा, गोंधळ, बेपर्वाई टाळा. काही दिवसांतच वातावरण निवळेल, गैरसमज दूर होतील. मने पुन्हा जुळून येतील.

वृषभ २०१९ (२० एप्रिल ते २० मे)

जगण्यातले अर्थ शोधत न बसता चांगल्या-वाईट प्रसंगांना कवेत घेऊन त्या प्रसंगांना सहजता प्राप्त करून देणारी रास म्हणजे वृषभ. दुसऱ्याच्या दु:खात सामील होऊन त्याला आधार देणारे ममत्व या राशीकडे आहे. वृषभ ही शुक्राची रास. या राशीवर ६ अंकाचा अंमल असतो. या वर्षीचा २०१९ चा एकांक ३ आणि ६ हे एकमेकांचे उत्तम मित्रांक आहेत. या वर्ष- प्रवासात या राशीला म्हणजे ६ अंकाला ३ अंकाची उत्तम साथ लाभणार आहे. शुक्राच्या कलासक्त मनाला गुरू ग्रहाच्या बुद्धीची मदत नवीन सात्त्विकता प्राप्त करून देईल.

जानेवारी २०१९ : व्यवस्थानात हर्षल, अष्टमात शनी, गुरू-शुक्राची उत्तम साथ. त्यामुळे स्थिर राहून घेतलेले निर्णय आपल्या फायद्याचे ठरतील. गैरसमजुतीतून निर्माण झालेल्या समस्या, सार्वजनिक जीवनातले किरकोळ वाद सामोपचाराने मिटतील. त्यात बिलकूल रेंगाळत बसू नका. महिनाभर धावपळ होईल. पण त्याबरोबर समाधानही लाभेल.

फेब्रुवारी २०१९ : बुध-रवी- शुक्राची उत्तम साथ, मात्र हर्षलसोबत मंगळाचे आगमन. अति संघर्ष वादविवाद, टोकाचे निर्णय यापासून दूर राहणे हिताचे ठरेल. दु:खात नि सुखात स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या क्षेत्रात आपण खूप बाजी मारू शकाल.

मार्च २०१९ : १४ मार्चनंतर रवीचे उत्तम पाठबळ लाभेल. आधी घेतलेल्या श्रमांचे चीज होईल. नव्या योजना, नवीन कामे यांना गती प्राप्त होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मानसिक स्थिरतेतून उत्साह वाढेल. आर्थिक बाबतीत संयमाने वागणे हिताचे ठरेल.

एप्रिल २०१९ : काहीसा त्रासाचा, मनस्तापाचा काळ. महत्त्वाचे निर्णय त्वरित घेऊ नका. उद्योगधंद्यात-नोकरीत दगदग वाढेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. नवीन जागेसंबंधीच्या व्यवहारात कायद्याची चौकट सांभाळा.

मे २०१९ : १० मेपर्यंत मीन राशीतील शुक्राची मदत होईल, तेव्हा खूप महत्त्वाचे निर्णय या दिवसात घेऊ शकाल. संयमाने वागणे, बोलणे खूप हिताचे ठरेल. खूपशा गोष्टी मनाला पटणार नाहीत, पण आपले स्पष्ट मत मांडू नका. विशेषत: सामाजिक कार्यात, कामात हा कटू अनुभव दिसून येईल; तूर्त शांत राहा.

जून २०१९ : पराक्रमातील मंगळाचा मोठा आधार बऱ्याच गोष्टींना सकारात्मकता प्राप्त करून देईल. उद्योगधंद्यात-नोकरीतील वादळ शमेल, मात्र त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतील नि अडचण दूर होईल. साहस नि जिद्द यांचा वापर बौद्धिकतेतून होऊ द्या.

जुलै २०१९ : रवी-मंगळाचे उत्तम सहकार्य नि सप्तमातील गुरूचा आशीर्वाद मोलाचा ठरेल. नवीन योजना, नवीन कल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरतील. आर्थिक आवक वाढेल, पण त्याबरोबर गरजाही वाढतील. जमीन-जागा- घर घेण्यासाठी उत्तम काळ. आपण घेत असलेले निर्णय पुढील काळासाठी खूप फायद्याचे ठरतील.

ऑगस्ट २०१९ : शुक्राचा एकमेव आधार मोलाचा वाटेल, बाकी सर्व ग्रहांनी पाठ फिरवली आहे, त्यामुळे श्रम-धावपळ वाढेल. येणाऱ्या समस्या फार काळ टिकणार नाहीत. पण अनुभव खूप काही शिकवून जाईल. माणसे वाचण्याचे तंत्र जमेल.

सप्टेंबर २०१९ : खूपशा समस्यांना मार्ग सापडतील. शुक्राचा शुभसंकेत आपल्या पाठीशी आहे. नोकरी-उद्योगधंद्यातले सावट दूर होईल. आपण आखलेल्या योजना पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. केलेल्या श्रमाची दखल घेतली जाईल.

ऑक्टोबर २०१९ : मिळालेले यश कसे टिकवायचे याकडे लक्ष असू द्या. कलाशिक्षण क्षेत्रात नावलौकिक वाढेल. मानसन्मानाचे योग येतील. पण अहंकाराने टाचा उंचावू नका. पाय जमिनीवर असू द्या. म्हणजे सभोवतालच्या जगात सहजपणे वावरू शकाल.

नोव्हेंबर २०१९ : शुक्र-मंगळाचा त्रिएकादश वगळला तर ग्रहाचे फारसे पाठबळ या महिन्यात  लाभणार नाही. त्यामुळे स्वकर्तृत्वावर लक्ष ठेवून पुढील कामाची आखणी करा. आर्थिक बाबतीत हाती येणाऱ्या पैशाची वाट पाहावी लागेल. बुध, मंगळ युतीतून निर्माण होणाऱ्या समस्या काही दिवसांत दूर होतील.

डिसेंबर २०१९ : दशमातल्या शुक्राचे उत्तम साह्य़ इतर ग्रहांच्या आडमुठेपणावर मात करील. वरिष्ठांशी सहज सुसंवाद साधाल. गुप्तशत्रूंची मिरासदारी दूर करण्यात यशस्वी व्हाल. मात्र भावनिक हवळेपणातून तडजोड स्वीकारू नका. आत्मविश्वास कायम ठेवा.

मिथुन २०१९ (२१ मे २० जून)

ज्यांचा जन्म २१ मे ते २० जून दरम्यान झाला असेल अशा लोकांवर ५ अंकाचा म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव असतो. मिथुनेचा बुध हा बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. यांच्या आवाजातील चढउतार खूप उत्स्फूर्त असतात. ते उत्तम बुद्धी, उत्तम विचार देतात. यांचे छान बोलणे नेहमी ऐकावेसे वाटते. यावर्षी २०१९ चा एकांक ३ वर येतो. यावर गुरू ग्रहाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे या दोन मातबर ग्रहांच्या मित्रत्वातून होणारा जीवन संवाद खूप मोलाचा ठरेल.

जानेवारी २०१९ : ग्रहांचे सहकार्य नाही, पण तरीही तुमच्या संयमी बोलण्यातून मतभेद, गैरसमज दूर होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी होतील, पण भावनावश होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. सत्य, विश्वास, प्रामाणिकपणा ही मूल्ये जपा. त्यातूनच पुढे येणाऱ्या कामांचे मार्ग सोपे होतील.

फेब्रुवारी २०१९ : बुध, मंगळाचे उत्तम सहकार्य पण अतिसाहस, धावपळ टाळा. आपल्या निर्भय वागण्यातून आपण सहज यशाकडे वळाल. पण शब्द देणे, वचने यातून आपला तोल जाऊ देऊ नका. खूपशा जबाबदाऱ्या घेऊन स्वत:ला त्रास करून घेणे जरूर टाळा.

मार्च २०१९ : गुरू-शुक्राच्या शुभछायेत खूपसा मनाला आधार वाटेल. सदिच्छा केल्या की मार्ग सापडतो असा प्रत्यय या दिवसात येईल. आर्थिक आवक वाढेल. जमीन, जागा घेण्यासाठी उत्तम काळ. खूपशा गोष्टी मनासारख्या घडतील, प्रसन्नता वाढेल.

एप्रिल २०१९ : ग्रहांची उत्तम साथ पण व्ययातील मंगळ मात्र काही किरकोळ मानसिक त्रास देईल. बाकी अडचणींवर मात करू शकाल. उद्योगधंद्यात, नोकरीत सध्या कोणतेही बदल करू नका. नवीन परिचय ओळखीतून आनंद मिळेल.

मे २०१९ : स्वराशीत मंगळ, राहू काहीसा त्रासाचा ठरेल. पण बुध-शुक्राच्या शुभ संकेतातून कर्तृत्वाला वाव मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. सामाजिक कार्यात आपल्या कामाचे कौतुक होईल. पाहुण्यांची ये-जा चालू राहील. त्यात आनंद मिळेल.

जून २०१९ : या महिन्यात आर्थिक गणिते जमवून घेतली तर खूपशा समस्या कमी होऊ शकतील. आलेला पैसा कसा खर्च होतो त्याचा ताळमेळ जमवणे अत्यंत गरजेचे ठरेल. त्यामुळे हा काळ काहीसा परीक्षेचा ठरेल. जुनी कागदपत्रे जपा. उधार उसनवारीत गेलेला पैसा परत मिळवण्याचा प्रयत्न करा.

जुलै २०१९ : हा महिना खऱ्या अर्थाने संमिश्र स्वरूपाचा आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत आपली उपस्थिती खूप मोलाची ठरेल. एकूण आपण परिघाचा मध्यबिंदू ठराल. आपण निर्माण केलेली कामे हळूहळू मार्गी लागतील.

ऑगस्ट २०१९ : पराक्रमात रवी-मंगळ-शुक्र आहेत. खूपशा गोष्टींची उत्तरे मिळणार नाहीत पण त्रास देणाऱ्या माणसांना आपण शिताफीने दूर ठेऊ शकाल. मानसन्मानाचा योग येईल. खूपशा प्रसंगांत आपली शिष्टाई यशस्वी ठरेल.

सप्टेंबर २०१९ : ग्रहस्थिती फारशी चांगली नाही, तरीही पराक्रमातील राहू खूपशा गोष्टींना मोठा आधार ठरेल. उद्योगधंद्यात, नोकरीत नफा-तोटय़ाचे गणित सावरले जाईल. कामात बारीकसारीक अडचणी त्रास देतील, पण तितक्याच गतीने दूर होतील.

ऑक्टोबर २०१९ : या महिन्यात पंचमातील शुक्र सोडला तर बाकीच्या ग्रहांनी पाठ फिरवली आहे. भेटी संपर्क, चर्चा यामध्ये गुप्तता ठेवा. शासकीय कामातील नियम सांभाळा. सामाजिक-राजकीय क्षेत्रात वादविवाद, गैरसमज टाळा म्हणजे कार्यभाग सफल होईल नि कामांना गती येईल. सामाजिक कार्यात मानसन्मान, कला क्षेत्रात यश मिळेल.

नोव्हेंबर २०१९ : समजदार माणसेही कधी कधी टोकाचा हट्टीपणा करतात नि त्यातून संघर्ष निर्माण होतो. स्पर्धा कोणा एका व्यक्तीशी करू नका, तर स्पर्धा स्वत:शीच करा म्हणजे आपल्यातील न्यूनता शोधा. या वेळेस गुरू-मंगळाची पूर्ण साथ लाभेल. त्यातून मानसिकता बदलेल.

डिसेंबर २०१९ : शुक्र-रवीचे उत्तम सहकार्य. रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र मंगळाच्या हट्टी वागण्यातून पैशाचा व्यय टाळा. नवीन जागा खरेदी-विक्रीसाठी सध्या गप्प बसणे योग्य ठरेल. नव्या वर्षांच्या सुरुवातीला याबाबतीत जरूर विचार करा.

कर्क २०१९ (२१ जून ते २० जुलै)

आपला जन्म २१ जून ते २० जुलै दरम्यान झाला असेल तर या काळावर २ अंकाचा प्रभाव असतो. २०१९ या वर्षांचा एकांक ३ येतो. तीन अंकावर गुरू ग्रहाचा अंमल असतो. २ आणि ३ चंद्र नि गुरू एक स्वच्छ निखळ मैत्रीचा हा सुख प्रवास कर्क राशीला लाभणार आहे. अगदी साधे-सोपे अध्यात्म म्हणजे स्वत:ला समजून घेणे. राग, लोभ, स्वार्थ अशा गुणावगुणांनी युक्त असलेला माणूस हे गुण आहेत हे पूर्णपणे विसरलेला असतो पण ही जागृतता यावर्षी कर्क राशीला गुरू-चंद्राच्या सहवासातून लाभणार आहे.

जानेवारी २०१९ : रवी-गुरू-शुक्राच्या आधाराने या वर्षांचा प्रवास सुरू होईल. मानसिक स्थितीत खूप बदल दिसेल. शांत वातावरण प्रार्थना चिंतन यातून आत्मविश्वास वाढेल. एक वेगळा उत्साह तयार होईल. त्यातून महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. विशेष म्हणजे आपण बांधलेले अंदाज खरे ठरतील. स्वमनाच्या खूप जवळ जाऊ शकाल.

फेब्रुवारी २०१९ : शनीच्या उत्तम सहकार्यातून उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम गती प्राप्त होईल. खूप समस्यांवर मार्ग सापडतील. विशेषत: शुभ शुक्राच्या सहवासातून प्रवासाचे योग येतील. त्यातून आनंद मिळेल. नवीन विचार, योजनांमधून पुढील वाटचाल सोपी होईल.

मार्च २०१९ : गुरू-रवी नवपंचम योगाच्या सान्निध्यात मनाची ताकद वाढेल. मात्र या स्फूर्तीचा उपयोग करताना अति विश्वास, अति अवलंबून राहणे जरूर टाळा. विशेषत: आपले वेगळेपण जपा.

एप्रिल २०१९ : रवी-मंगळाचे उत्तम सहकार्य. षष्ठात शनी-केतू आहेत. वाईटातून चांगले घडते, याचा प्रत्यय येईल नि खूपशी रखडलेली कामे मार्गी लागतील. उद्योगधंद्यात नोकरीत तुम्हाला विरोध केला ती माणसे सशर्त माघार घेतील. कोर्ट कचेरीत, सरकारी कामात यश लाभेल.

मे २०१९ : आपल्या कामात गैरमार्गाचे प्रस्ताव पुढे आले तर ते माघारी पाठवण्याचा निर्णय निर्भयतेने घ्या. कुठल्याही भावनिक पाशात अडकू नका. मनाचे स्वास्थ्य वरखाली होईल. पण परत मागे आलेला गुरू नेपच्यूनशी नवपंचमयोग करीत आहे, तो आपले मन:स्वास्थ्य सुरक्षित ठेवील.

जून २०१९ : स्वराशीतील रवीचा शुक्राशी शुभ योग आहे. त्यातून व्यवसायात, नोकरीत उत्तम संधी प्राप्त होतील. मात्र चालढकलपणा, आळस यापासून दूर राहणे हिताचे ठरेल. नाटय़ सिनेकलाकारांना उत्तम संधी प्राप्त होतील. त्यातून आर्थिक गणिते फायद्याची ठरतील, भावनिक गुंतवणूक टाळा.

जुलै २०१९ : – राहू-शुक्र व्ययस्थानात आर्थिक समीकरणे बदलतील. उद्योगधंद्यात नवीन कामासाठी लागणारा पैसा अपुरा पडेल. पण रवी-गुरूच्या स्नेहातून मित्रवर्गाकडून पैशाची सोय होईल नि खूपशा निर्माण झालेल्या समस्या दूर होतील.

ऑगस्ट २०१९ : शुक्राचा धनस्थानातला प्रवेश आर्थिक बाबतीत मोलाचा ठरेल. पैशाची तूट भरून येईल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे नवीन योजना हाती येतील. नोकरीत वरिष्ठांशी सल्लामसलत करणे फायद्याचे ठरेल. थोडी दगदग वाढेल, तब्येतीची काळजी घ्या.

सप्टेंबर २०१९ : शुक्र-गुरूच्या स्नेहातून परिस्थितीत बदल घडेल नि आश्चर्याचा धक्का बसल्यासारखे क्षणभर वाटेल. संकटे संधीसुद्धा बरोबर घेऊन येतात असा वेगळा अनुभव येईल. राजकारण तसंच सामाजिक कामात होणारा विरोध पूर्ण मावळेल. गैरसमज दूर होतील.

ऑक्टोबर २०१९ : हा महिना फारसा चिंताजनक नाही. पण आपल्यापाशी असलेल्या सुज्ञतेचा वापर कुशलतेने करा. रवी-गुरूच्या त्रिएकादश योगातून अडचणीच्या जागा लक्षात येतील. धार्मिक कार्यातील सहभागातून आनंद लाभेल. घरातील वातावरण समाधानी राहील.

नोव्हेंबर २०१९ : शनी, नेपच्यून शुभयोगातून आपण आखलेल्या योजना मार्गी लागतील. वरिष्ठांशी उत्तम संवाद साधला जाईल. धंद्यात कामाचे स्वरूप बदलून उत्साही वातावरण निर्माण होईल. घरातील मुलांना नोकरी-धंद्यात चांगल्या संधी प्राप्त होतील. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.

डिसेंबर २०१९ : शुक्र-मंगळ शुभ योगाच्या पाठीशी षष्ठातील शनी आहे. या परिस्थितीत आपल्या विरोधात केलेल्या कारवाया पूर्णपणे फोल ठरतील. समस्यांची तीव्रता कमी होईल. विशेष म्हणजे गैरसमज दूर होतील. आर्थिक व्यवहार, महत्त्वाचे करार नव्या योजना यात विशेष प्रगती होईल.

सिंह २०१९ (२१ जुलै ते २० ऑगस्ट)

२१ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान रवी स्वत:च्या सिंह राशीत भ्रमण करीत असतो. या वर्षी २०१९ सालची बेरीज १२ येते म्हणजेच १+२= ३ येते या ३ अंकावर गुरू ग्रहाचा अंमल असतो. सिंह राशीच्या या वर्षभराच्या प्रवासात गुरू-रवी या दोन मातबगार ग्रहांचा आशीर्वाद या राशीच्या लोकांना लाभणार आहे. साहस पराक्रमाला गुरू ग्रहाच्या बौद्धिकतेचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरेल.

जानेवारी २०१९ : रवी, बुध-शुक्राचे उत्तम साह्य़ लाभेल. मात्र व्ययातील राहूच्या फसवेगिरीला फसू नका. खूप मोठी आमिषे दाखवून पैशाच्या व्यवहारात फसवणूक करण्याचा डाव हाणून पाडाल. शुक्र-रवीच्या दुर्मीळ अशा त्रिएकादश योगामुळे कामाला वेग येईल आणि आत्मविश्वास निर्माण होईल.

फेब्रुवारी २०१९ : मंगळ-रवी त्रिएकादश योगातून निर्णय ठामपणे घ्यावे लागतील. नि त्यात चर्चेपेक्षा कृती महत्त्वाची ठरेल. उद्योगधंद्यात-नोकरीत मित्र-नातेवाईक ही नाती जपा. पण त्यातले हिशेब पारदर्शक ठेवा. पैशाची गुंतवणूक करताना संस्थांची, बँकांची पात्रता शोधा. त्यातील गुणवत्ता शोधून पैसे गुंतवा.

मार्च २०१९ : राहू, शुक्र नवपंचमयोगामुळे आपल्यापाशी असलेल्या कलागुणांना नवीन संधी प्राप्त होतील. उद्योगधंद्यात-नोकरीत नवीन कामे हाती घ्याल. बुध, नेपच्यून युतीमधून सामाजिक क्षेत्रात, राजकारणात आपण आखलेले डावपेच यशस्वी ठरतील. कौटुंबिक आनंद लाभेल.

एप्रिल २०१९ : रवी, बुध शुभयोगातून प्रगतीचा आलेख निश्चित उंचावेल. उद्योगधंद्यात- नोकरीत मेहनतीचे प्रमाण वाढेल. त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामथ्र्य आपल्यापाशी येईल. कामकाजात कुठेही दिरंगाई करू नका. आपण खूप काही करू शकतो हा दृढ विश्वास कायम सोबत असू द्या.

मे २०१९ : ग्रहांची उत्तम साथ लाभेल. आपण आखलेल्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी हा काळ खूप योग्य ठरेल. सध्या आर्थिक ताण-तणाव असला तरी जुन्या व्यवहारातून पैशाची आवक वाढेल. उद्योगधंद्यात  नोकरीत आपल्या दूरदृष्टीचा चांगला उपयोग होईल.

जून २०१९ : व्ययातील मंगळ नाहक खर्चाचे प्रमाण वाढवील. हाताखालील माणसे कामाची टाळाटाळ करतील. त्यामुळे स्वत:मधील आत्मविश्वास ढळू देऊ नका. घरातील लोकांशी संवाद साधा. महत्त्वाचे निर्णय घेताना मित्रमंडळींना विश्वासात घ्या. हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेऊ शकाल.

जुलै २०१९ : व्ययातील मंगळ अजूनही पाठ सोडत नाही. पण हळूहळू त्याच्या विरोधाची तीव्रता कमी होईल. राहू-शुक्राच्या मदतीने बऱ्याच कामांना गती प्राप्त होईल. मात्र प्रगती होत असताना लोकप्रियता, प्रसिद्धी यामध्ये जास्त वेळ गुंतून राहू नका.

ऑगस्ट २०१९ : स्वराशीत मंगळ-रवी नि शुक्र हा महिना तसा फारसा त्रासदायक ठरणार नाही. पण आपल्यापाशी असलेल्या सुज्ञतेचा उपयोग करा. अकरावा राहू हळुवारपणे संकटांना दूर सारील. संघर्षांतून यश मिळेल, पण माघार घेऊ नका. वाद कुठे करायचा नि संवाद कुठे करायचा याचे भान असू द्या. म्हणजे आपोआप प्रश्न सुटत जातील.

सप्टेंबर २०१९ : शुक्र, गुरू त्रिएकादश योग खूप लाभदायक आहे. घटनांचा पाऊस पडणार नाही, पण दोन-चारच घटनांचा शिडकावा खूपसा मनाला भिजवून जाईल. खूप काळ रखडलेल्या कामांच्या निकालाची शुभवार्ता आपल्या कानावर पडतील. उत्तम ध्येयपूर्तीचा काळ. त्या काळाचे छान स्वागत करा.

ऑक्टोबर २०१९ : पराक्रमात रवी, शुक्र धनस्थानात बुध नि अकरावा राहू आहे. एकूण प्रसन्नतेचा काळ. आनंदी मनाने जगण्याच्या काळातही खूप वेळा आपण ते सुख घेऊ शकत नाही. मनातील हुरहुर दूर करा. जीवनात येणाऱ्या सुखद क्षणांचा आनंद घ्या. काळजी, चिंता यांना काही काळ दूर ठेवा.

नोव्हेंबर २०१९ : पराक्रमात बुध-मंगळ आहेत. उद्योगधंद्यात-नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. नवीन जबाबदाऱ्या येतील. पंचमात असलेला गुरू, शुक्र आपले मंगलमय जीवन अधिक तेजोमय करील. पूर्वी कागदावर मांडलेल्या योजना आता खऱ्या मूर्त स्वरूपात पाहण्याचा सुयोग लवकरच येत आहे.

डिसेंबर २०१९ : खूप गोष्टी आयुष्यात चांगल्या घडत असताना मनात चिंतेचे सावट त्रास देऊ लागते. असाच काहीसा अनुभव या वर्षअखेर येईल. मनात सकारात्मक विचारांचे वृक्षारोपण केले तर मानसिक प्रदूषण दूर होईल.

कन्या २०१९ (२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर)

२१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल अशा लोकांवर बुधाचा प्रभाव असतो. या वर्षांचा २०१९ सालचा एकांक ३ येतो. यावर गुरूचा अंमल असतो. एकूण या कन्या राशीला ३ आणि ५ म्हणजे बुधाबरोबर गुरूसारख्या बुद्धिमान ग्रहांची साथ लाभणार आहे. एकूण या वर्षी जगण्याचे सूत्र बदलेल. जीवनात खूपसे निर्णय घेताना गुरूची साह्य़ता लाभेल. त्यामुळे व्यवहार आणि बुद्धी यांचा उत्तम समन्वय साधला जाईल नि जीवनात सहजता प्राप्त होईल.

जानेवारी २०१९ : चतुर्थातल्या शनीच्या वास्तव्यातून कौटुंबिक वादविवाद झाले तरी बुध- शुक्राच्या मध्यस्थीतून गैरसमज दूर होतील. राहू-केतूच्या सुस्थितीतून आर्थिक लाभ होतील. मात्र उद्योगधंद्यात-नोकरीत कुठलेही निर्णय तडकाफडकी घेऊ नका. सावधानता बाळगा.

फेब्रुवारी २०१९ : चतुर्थात शुक्र, षष्ठात रवी या दोन ग्रहांच्या मदतीने बरीच कामे मार्गी लागतील. नवीन योजना, नवीन कामे यात यश लाभेल. मात्र  यश टिकवणे आपली जबाबदारी असेल. अष्टमात मंगळ, हर्षल. वाहने वेगाने चालवणे तसेच प्रवासात बेसावधपणे चालणे टाळा. या महिन्यात ही विशेष काळजी घ्या.

मार्च २०१९ : रवी-बुध-शुक्राचे साहचार्य खूप महत्त्वाचे ठरेल. काहीसे संभ्रम निर्माण होणारे विचार मनात येतील. कामाचा व्याप वाढेल. समस्या वाढतील, पण त्यातून पैशाची हानी होणार नाही. मात्र वादग्रस्त भूमिका घेऊ नका. अति महत्त्वाचे निर्णय २३ मार्चला राहू बदलण्यापूर्वी घेणे हिताचे ठरेल.

एप्रिल २०१९ : हा महिना काहीसा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. व्यापार- उद्योगधंद्यात चढउतार दिसून येईल. आर्थिक देण्याघेण्यातून गैरसमज होतील. रोज समजून घेणारी परिचित माणसे शत्रूच्या भूमिकेत दिसतील, मात्र तुम्ही चांगूलपणा सोडू नका. स्वत:मधील दोष कळायला खूप वेळ लागतो. स्थिरतेतून प्रश्न सुटतील.

मे २०१९ : हळूहळू परिस्थितीत बदल दिसून येईल. प्रखर विरोधाचे प्रमाण कमी दिसू लागेल. कौटुंबिक वातावरणातला तणावही कमी होईल. मात्र अतिभावनिक राहू नका. वा अति ताणूही नका. परिस्थितीचा अंदाज घेऊन उद्योगधंद्यातील-नोकरीतील कामाचे स्वरूप बदला.

जून २०१९ : उत्तम काळ. प्रयत्नास उत्तम साथ लाभेल. नवीन योजना आकार घेतील. बोलण्या-वागण्यातील नम्रता आपल्या कामात-निर्णयात खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. एकादशातील मंगळाचे खूप छान सहकार्य लाभेल. आर्थिक बाजू हळूहळू बळकट होईल.

जुलै २०१९ : आर्थिक गणित फार खुबीने सांभाळा. फार उतावळेपणा, नाहक खर्च टाळा. एकादशााील रवी-मंगळ नेतृत्व देईल, पण ते सांभाळताना लोकांचा विश्वास कायम असू द्या. न्यायाची बाजू राखा. धावपळ, दगदग वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

ऑगस्ट २०१९ : १७ ऑगस्टपर्यंत रवी एकादश स्थानात; त्याआधी महत्त्वाची कामे, महत्त्वाचे निर्णय घ्या. व्ययातील शुक्र सोडला तर कुठलाही ग्रह आपल्याला अनुकूल नाही, तेव्हा उद्योगधंद्यात-नोकरीत अचानक जबाबदाऱ्या वाढतील. काही तातडीचे निर्णय घेताना मनावर दडपण येईल, पण धीराने पुढे गेल्याशिवाय मार्ग मोकळा होत नाही हे लक्षात असू द्यात.

सप्टेंबर २०१९ : राहू-नेपच्यून नवपंचम योगातून आर्थिक प्रगती होईल. मात्र नियोजन हा त्यातील प्रमुख भाग असेल. ते सांभाळणे खूप गरजेचे ठरेल. दशमानातील राहू अर्थार्जन उत्तम करतो. बाकी व्ययातील रवी-मंगळामुळे उद्योगधंद्यात-नोकरीत हितशत्रू वाढतील, मात्र त्यांना समर्थपणे उत्तर देण्याची हिंमत आपल्यापाशी असेल.

ऑक्टोबर २०१९ : धनस्थानात शुक्र उत्तमच, पण शुक्र-राहू नवपंचमयोगातून नवीन उत्पन्नाचे मार्ग सुचतील. त्यातील गैरमार्ग टाळावेत. उद्योगधंद्यातील नवीन प्रयोग, नवीन कल्पना यशस्वी होतील. तसेच त्यात नेपच्यूनची साथ अधिक प्रोत्साहन देईल. मंगळ-शनी केंद्रयोगातून कौटुंबिक बाबतीत गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्याल.

नोव्हेंबर २०१९ : धनस्थानातील बुध नि पराक्रमातील रवी या महिन्याचा आर्थिक आणि मानसिक समन्वय उत्तम साधतील. चतुर्थातील शुक्राचे आगमन घरातील वातावरणात आनंद निर्माण करील. प्रेमविवाह, नातीगोती अशा जिव्हाळ्याच्या प्रश्नांत खूप मदत होईल.

डिसेंबर २०१९ : १६ डिसेंबपर्यंत रवी पराक्रमात आहे. आलेल्या नवीन संधी सोडू नका. जमणार नाही, शक्य नाही असा नकारात्मक भाव मनात ठेवू नका. प्रयत्न करा. जरूर यश मिळेल. पंचमात शुक्र आहे. कलाक्षेत्रातल्या व्यक्तींना यश मिळेल. नवीन परिचयातून विवाहयोग येतील.

तूळ २०१९ (२१ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर)

या वर्षी २०१९ सालचा एकांक ३ येतो आहे. तर तूळ राशीवर शुक्राचा अंमल असतो. या शुक्राचा अंक ६, ३ आणि ६ तसे संयमी आणि स्नेहशील अंक आहेत. तूळ ही मनाचे सौंदर्य जपणारी रास आहे. या वर्षी ३ अंकाच्या रूपाने या तूळ राशीला गुरू ग्रहाची म्हणजे बुद्धीची साथ लाभणार आहे. त्यामुळे गुरू-शुक्राच्या सहवासात तूळ रास आपल्या भावनिक जगण्याला बौद्धिकतेची जोड देऊन लहान लहान प्रसंगांतही आनंद शोधण्याचा प्रयत्न करील.

जानेवारी २०१९ : धनस्थानात गुरू, शुक्र पराक्रमात शनी, चतुर्थात बुध या ग्रहांची उत्तम फौज आपल्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे उद्योगधंद्यात-नोकरीत कामाचे स्वरूप खूपच सोपे होईल. कलासाहित्य, शिक्षणक्षेत्रात आपल्या बहुमोल कामाची किंमत होईल. आर्थिक लाभाचे प्रसंग येतील.

फेब्रुवारी २०१९ : धनस्थानात गुरू पराक्रमात शुक्र-शनी आहेत. उद्योगधंद्यात-नोकरीत यशाकडे वाटचाल सुरू राहील. सप्तमात मंगळ-हर्षल नि चतुर्थात केतू असल्याने कुटुंबात होणारे गैरसमज, नातलगातून येणारे चुकीचे संदेश मनाला तापदायक ठरतील. यातून कशाला किती महत्त्व द्यायचे ते ठरवा. मात्र आपल्या रोजच्या जीवनावर यांचा परिणाम होऊ देऊ नका.

मार्च २०१९ : पराक्रमातील शनी-केतूची जोडी म्हणजे समस्यांमधून संधी चालून येईल. विशेषत: प्रॉपर्टीचे वाद संपुष्टात येऊन त्या वाटाघाटीतून फायद्याचे गणित उत्तम जमेल. घरातील संघर्ष संपेल. समझोत्यातून समाधान प्राप्त होईल. शांततेतून आत्मविश्वास प्राप्त होईल. नवीन योजना, नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची स्वप्ने दिसू लागतील.

एप्रिल २०१९ : पंचमात शुक्र, बुध नि षष्ठात रवी आहेत. १४ एप्रिलपूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करायचा प्रयत्न केले तर यश मिळेल. सप्तमातील रवीच्या आशीर्वादातून प्रवासाचे योग येतील. घरात धार्मिक कार्य होतील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. त्यातले श्रम विसरा, आनंद शोधा.

मे २०१९ : सप्तमातल्या बुध-शुक्राचा खटय़ाळपणा अंगाशी येईल. नको ती माणसे जवळ येण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याशी पैशाच्या व्यवहारातून मानसिक फसवणूक टाळा. पराक्रमातील केतू-गुरूची मदत मिळणार नाही. हिमतीने पुढे जा. महत्त्वाची कागदपत्रे जपा.

जून २०१९ : अष्टमातील शुक्र आर्थिक बाबतीत बऱ्याच गोष्टींना अनुकूलता प्राप्त करून देईल. सप्तमातील हर्षल संसारात काहीशी उदासीनता देईल. अशा वेळी हवापालट केल्याने प्रसन्नता प्राप्त होईल. नाहीच करता आले तर जवळच्या नातेवाईकांना भेटून गप्पागोष्टीत मन रमवा.

जुलै २०१९ : दशमातील रवी-मंगळामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलता प्राप्त होईल. नवमस्थानातील शुक्र-राहूच्या सान्निध्यातून कलेची आवड, साधना करण्याची इच्छा होईल. गोड गळा नसला तरी मनातील गुणगुणणारे गाणे आनंदच देते. असे सुंदर अनुभवाचे, आनंद देणारे क्षण अनुभवायला कलावंतासाठी विशेष शुभकाळ.

ऑगस्ट २०१९ : ७ ऑगस्टनंतर एकादशात येणारा रवी नि त्यासोबत असणारे मंगळ- शुक्र शुभदायक ठरतील. मात्र सुखाचे झुकते माप पदरी असताना ते शोधत राहणे, म्हणजे आपली खरीखुरी मानसिकता हरवण्यासारखे आहे. मनाची हुरहुर, सतत घरातील लोकांची काळजी यापेक्षा नवीन उपक्रमात आनंद शोधण्याकडे लक्ष असू द्या.

सप्टेंबर २०१९ : या महिन्यात सर्व ग्रहांची उत्तम कृपादृष्टी आपल्यावर आहे. नवीन विचार, नवीन कल्पना आनंदी जगण्यासाठी खूपच मदत करतील. नेहमीचा गोंधळ, चिडखोरपणा कमी होईल. दुसऱ्याच्या व्यथा, दु:खे समजून घ्या. प्रवासातील ओळखी, मैत्री यात फारसे गुंतू नका. स्थिरता बाळगा.

ऑक्टोबर २०१९ : व्ययात मंगळ-शुक्र आहेत. बऱ्याच गोष्टींना आपण स्वत:च मर्यादा घातल्या की मनाची निर्थक घोडदौड थांबते. खरंतर गरज असेल तिथेच संघर्ष करा. नाहीतर वाऱ्याशी भांडण करण्यासारखे असेल. वेळेला खूप महत्त्व द्या. स्वराशीतील शुक्रामुळे कलाकौशल्यात कौतुक होईल.

नोव्हेंबर २०१९ : उद्योगधंद्यात-नोकरीत कामाचा ताण वाढेल. मात्र या महिन्यात स्वत:ला सावरण्याचे बळ लाभेल. विशेषत: सहानुभूती मिळवून दु:खावर फुंकर मारण्यामुळे ते दु:ख अधिक वाढीस लागते तेव्हा चुकूनही सहानुभूतीची अपेक्षा करू नका. स्वमनाला बळकट करा.

डिसेंबर २०१९ : हा काळ काहीसा परीक्षेचा असल्याचे जाणवेल. जवळच्या लोकांकडून केलेल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या ते साभार परत करतील. तेव्हा कुठेही वादग्रस्त भूमिका न घेता सामोपचाराने वागा. पुढे रवी उत्साह यश देईल.

वृश्चिक २०१९ (२१ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर)

प्रामुख्याने मंगळच्या दोन राशी आहेत. त्यापैकी मेष अग्नितत्त्वाची तर वृश्चिक ही जलतत्त्वाची रास आहे. या राशीवरही ९ अंकाचा अंमल असतो. ही रास मेष राशीप्रमाणे तापट नसून अतिशय मुत्सद्देगिरीने वागून आपले हित सांभाळणारी आहे. २०१९ सालचा एकांक ३ येतो.  वृश्चिक राशीवर वर्षभर ९ आणि ३ चा अंमल असणार आहे. गुरू आणि मंगळ यांच्या मार्गदर्शनातून ही रास अधिक चाणाक्षपणे वागेल. शनी साडेसातीत ही रास यशाच्या आसपास ठामपणे उभी राहील. विशेष म्हणजे राजकारणात अशा राशीच्या लोकांचा नावलौकिक होतो.

जानेवारी २०१९ : गुरू, मंगळ नवपंचम योग आहे. स्वीकारलेली कामे चोख पाडू शकाल. पराक्रमातल्या रवीच्या सहकार्याने उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना उत्तम रीतीने पार पडतील. धार्मिक कार्यात सहभाग खूप मदतीचा ठरेल. तूर्त कौटुंबिक मतभेद गैरसमज यांना फार महत्त्व देऊ नका.

फेब्रुवारी २०१९ : लाभात शुक्र पराक्रमात केतू नि पंचमात बुध अगदी योग्य ठिकाणी ही ग्रहमंडळी आपल्या मदतीला तत्पर आहेत. षष्ठातल्या मंगळ हर्षल युतीतून अतिरेक टाळा. भावनेच्या भरात कुणाला दुखावणे, अपमान करणे योग्य ठरणार नाही. तेव्हा सतर्क राहून पुढे सरका.

मार्च २०१९ : द्वितीयेत शनी-केतू, सप्तमात मंगळ आहे. ग्रहस्थिती फारशी उत्साहवर्धक आणि सोयीस्कर वाटत नाही, पण पराक्रमातील शुक्र खूप गोष्टींना चालना देऊन महत्त्वाची कामे योजना पार पाडण्यात मदत करील. राहू-नेपच्यून नवपंचम योगातून आध्यात्मिक विचारांची ये-जा सुरू होईल नि त्यातून एक वेगळा अनुभव घ्याल.

एप्रिल २०१९ : बुध, गुरू, शुक्राचे उत्तम सहकार्य आहे. मात्र प्रवासात घाईगर्दीत चालणे, वाहन वेगाने चालवणे या गोष्टींवर नियंत्रण असू द्या. महत्त्वाची कागदपत्रे मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे. कोर्ट-कचेरीतील निकालात यश प्राप्त होईल.

मे २०१९ : आर्थिक आवक आणि होणारा खर्च यांचे गणित आखून उद्योगधंद्यातील पुढील धोरणे ठरवा. थोडय़ाशा घरगुती समस्या वाढतील. पण त्या फार काळ टिकणार नाहीत. शांत रहा. गोंधळल्याने अधिक घाबरल्यासारखे होईल. काही काळ जाऊ द्या. काळ हाच यावर उपाय आहे.

जून २०१९ : खर्चाचे प्रमाण अचानक वाढेल. नोकरी-उद्योगधंद्यात समस्या निर्माण होतील. पण गुरू-मंगळ नवपंचम योगातून सहज मार्ग निघेल. जरा धीराने घ्या. प्रतिकूल काळात संयमी माणसे हलत नाहीत. महिनाअखेर मानसिक ताण कमी होईल. उत्साह वाढेल.

जुलै २०१९ : गुरू-मंगळ नवपंचम योगातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. पण या काळात नव्या योजना, नव्या कल्पना यशस्वी ठरतील. प्रेम प्रकरणातून विवाह जमतील. त्यात अडचणी येतील. पण सर्व काही मनासारखे घडेल. नम्रतेतून यश अधिक व्यापक होईल.

ऑगस्ट २०१९ : एकादशात मंगळ, रवी, शुक्र ग्रहाचे उत्तम बळ पाठीशी आहे. या काळात महत्त्वाची कामे उरकून घ्या. लक्षात असू द्या, आजचे कठोर निर्णय उद्याच्या जगण्याचा मार्ग सोपा करतील. उद्योगधंद्यात नोकरीत श्रम आणि योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर निश्चित यश देईल.

सप्टेंबर २०१९ : व्ययातील शुक्र नि द्वितियेतील शनी आर्थिक व्यवहारात चढ-उतार ठेवील. रवी-मंगळाच्या सहकार्यातून अडचणी दूर होतील. मात्र उद्योगधंद्यात, नोकरीत सध्या बदल करू नका. नवीन कामे जरूर स्वीकारा. ती यशस्वी ठरतील. पाहुण्यांची ये-जा वाढेल. हळवेपणातून एकटेपणा येईल. पण कामात गुंतवून घ्या म्हणजे कामात आनंद मिळेल.

ऑक्टोबर २०१९ : एकादशातला मंगळ सोडला तर बाकी सर्व ग्रह विरोधात आहेत. त्यामुळे समजुतीने वागण्यातून खूपशा गोष्टींना सहजता प्राप्त होईल. सामाजिक कार्यात, राजकारणात आपण आखलेल्या योजना उत्तम पार पडतील. प्रेमप्रकरणात मनस्ताप, हुरहूर होईल पण अशा गोष्टीपासून दूर रहाणे शहाणपणाचे ठरेल.

नोव्हेंबर २०१९ : धनस्थानातील गुरू सोडला तरी उरलेल्या ग्रहांनी पाठ फिरवली आहे. खूप आशावादी रहा. पण स्वस्थ बसू नका. प्रयत्न चालू ठेवा. आपल्या मनातील विचार कृतीत उतरण्यासाठी आशावादी असणे जरुरीचे आहे. लहानसान नकारार्थी विचारांना मनांत फारसे स्थान देऊ नका. प्रेमात, मैत्रीत फार वेगळे कटू अनुभव येतील. स्थितप्रज्ञता हा उत्तम उपाय आहे.

डिसेंबर २०१९ : गुरू-शुक्र शुभस्थानात, त्यामुळे शनी-केतूच्या कपट कारस्थानाला चोख उत्तर मिळेल. कौटुंबिक वाद निर्माण होतील. पण भावनेच्या भरात टोकाचे निर्णय घेऊ नका. नोकरी-उद्योगधंद्यात नवीन जबाबदाऱ्या येतील. पण आत्मविश्वास नि परिश्रम यातून यश नक्की मिळेल.

धनू २०१९ (२१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर)

आपला जन्म २१ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान झाला असेल तर धनू राशीवर ३ अंकाचा म्हणजे गुरू ग्रहाचा प्रभाव दिसून येईल. या वर्षांचा २०१९ सालचा एकांक ३ येतो. धनू राशीवर या वर्षी गुरू ग्रहाचे वर्चस्व असेल. ज्ञानशीलता, प्रामाणिकपणा, सत्यवाद या सद्गुणांची साथ यावर्षी या राशीला लाभणार असल्याने साडेसातीचा भयगंड बाळगण्याची गरज नाही. साहस नि खंबीरतेमुळे भयही दोन पावले मागे सरते.

जानेवारी २०१९ : शनीची साडेसाती आहे. त्यात शुक्र सोडला तर बाकी ग्रहांची साथ नाही. पण रवी-मंगळ त्रिएकादश योगातून खूपशा कामांना गती प्राप्त होईल. प्रगती होईेल. उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजनांना पूर्णपणे संमती मिळेल. मात्र खिशात आलेला पैसा कसाही उधळू नका.

फेब्रुवारी २०१९ : पराक्रमातील रवी, नेपच्यूनचे उत्तम साह्य़. हळवेपणा, भावनावश होणे यापासून दूर राहा. घरातील लोकांशी संवाद साधा. जागेसंदर्भातील वादविवाद सामोपचाराने मिटतील. आपल्या बोलण्यातील आत्मविश्वास खूप चांगले काम करील. १३ फेब्रुवारीला रवी बदलण्याच्या आधी महत्त्वाची कामे उरकून घ्या.

मार्च २०१९ : शुक्र, बुधाचा उत्तम सहयोग. हा काळ काहीसा संमिश्र स्वरूपाचा असेल. त्याही स्थितीत आपण हाती घेतलेली कामे पुरी करू शकाल. आपल्या शब्दाला किंमत येईल. पण नको त्या ठिकाणी मध्यस्थी करू नका, नाही तर आपल्यावर विसंबून राहिलेली माणसे आपल्याला दोष देतील. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.

एप्रिल २०१९ : उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या योजना पुऱ्या होतील. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वावरताना बोलताना शब्द जपून वापरा. नवीन परिचय, नवीन ओळखीतून कामाची व्याप्ती वाढेल. जुनी येणी वसूल होतील. पैशाची आवक वाढेल. घरातील वातावरण आनंदी राहील.

मे २०१९ : पंचमात बुध, शुक्र, षष्ठात रवी आहे. कामात घाई गर्दी टाळा. नवीन योजना प्रत्यक्षात आकार घेतील. बोलण्याचालण्यातील नम्रता आपल्या कामात खूप मदतीची ठरेल. राजकारणापासून शक्यतो दूर राहा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि संयमाने घ्यावेत.

जून २०१९ : साहित्य- कलाक्षेत्रात, सामाजिक कार्यात मानसन्मानाचे योग येतील. बुद्धीच्या माध्यमातून पैसे जरूर कमवा पण त्यासाठी योग्य कामाची निवड करा. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल, नवीन परिचयाचे रूपांतर मैत्रीत होईल. वेळेचा अपव्यय टाळा. मन:स्वास्थ्य जपा.

जुलै २०१९ : मित्र राशीतील शनी केतूबरोबर आहे. अष्टमात रवी, मंगळ आहेत. वाहने वेगाने चालवू नका आणि रस्त्यावरून जाताना घाईगडबड करू  नका. विशेषकरून आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास जाणवेल. अर्थप्राप्ती चांगली होईल, पण तितकेच खर्चाचे प्रमाण वाढेल.

ऑगस्ट २०१९ : मंगळ – शुक्राशी होणाऱ्या हर्षलच्या नवपंचम योगामुळे अचानक विवाह जमणे, नवीन ओळखीतून प्रेम, प्रेमातून विवाह अशा घटना घडण्याची शक्यता. विशेष म्हणजे या काळात कोणतेच महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. जागेसंबंधी, घरांसंबंधीचे व्यवहार करताना कागदपत्रे तपासून घ्या. वरिष्ठांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जाणे योग्य ठरेल.

सप्टेंबर २०१९ : आर्थिक आवक नि खर्चाचे प्रमाण याचे गणित आखून उद्योगधंद्यातील रूपरेषा कायम करा. घरात किरकोळ समस्या वाढतील, पण त्या फार काळ त्रास देणार नाहीत. महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. मात्र परिस्थितीशी जुळवून घेणे शहाणपणाचे ठरेल.

ऑक्टोबर २०१९ : एकादश स्थानात रवी, शुक्र ही युती खूप छान आहे. पण कामात घाईगर्दी टाळा. अति उत्साह, उतू जाणारे प्रेम आणि साहस टाळा. नोकरी-उद्योगधंद्यात पुढे-मागे होणाऱ्या घटनांमुळे निराश होऊ नका. नवीन जागा, नवीन स्थावर खरेदी-विक्रीसाठी उत्तम काळ. पैशाची आवक वाढेल. अतिविचार श्रम टाळा.

नोव्हेंबर २०१९ : ५ नोव्हेंबरला गुरू हा धनू राशीत येत आहे. ही गोष्ट फारशी विचार करण्यासाठी नसली तरी मित्र राशीतील शनी गुरूच्या सान्निध्यात शुभ फळे देईल. त्यात एकादश स्थानात बुध, मंगळ खूप गोष्टींमध्ये सकारात्मकता प्राप्त होईल.

डिसेंबर २०१९ : धनस्थानातील मकरेचा शुक्र आपले भाग्य उजळण्याचे संकेत देत आहे. खूपशा कामात आपण दाखवलेला संयम आपल्या पुढील उद्योगधंद्यात, नोकरीत खूप मदतीचा ठरेल. आनंदाचे क्षण वेचताना मनाचा गोंधळ उडेल. जिवलगाच्या भेटीगाठीत विशेष आनंद लाभेल. पुढच्या वर्षांसाठी नवीन योजना, नव्या कल्पना तयार असू द्या.

मकर २०१९(२१ डिसेंबर ते २० जानेवारी)

आपला जन्म २१ डिसेंबर ते २० जानेवारी दरम्यान झाला असेल तर आपल्यावर कायमस्वरूपी ८ अंकाचा म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव असतो. २०१९ या वर्षांचा एकांक ३ येतो. ३ म्हणजे गुरू ग्रहाचा प्रभाव वर्षभर आपल्या राशीवर असणार आहे. मकर ही मेहनती आणि आवडत्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देण्यात आनंद मानणारी रास आहे. गुरूच्या सहवासातून नवीन कल्पना सापडतील. साडेसातीच्या खडतर काळातही आनंदाचा शोध घेणारी ही रास अखेर यशस्वी होईल.

जानेवारी २०१९ : पराक्रमात मंगळ तर एकादशात शुक्र या दोन ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभणार आहे. दुर्बल नकारात्मकता आनंदी क्षणांचा नाश करत असते. सकारात्मक असाल तर दुर्बलता आपल्या मनांत प्रवेश करू शकणार नाही. गैरसमज, निंदा, कुचेष्टा यांचा त्रास फार काळ टिकणार नाही.

फेब्रुवारी २०१९ : एकादशात गुरू, तर व्ययात शुक्र आहे. आर्थिक स्थितीला पूरक असा हा काळ आहे. पण खर्चाचे प्रमाण वाढेल. स्थावर इस्टेटीत यश लाभेल. उद्योगधंद्यात, नोकरीत कामाचे कौतुक होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. समाजकार्यात नवीन परिचय मदतीचा हात देतील.

मार्च २०१९ : स्वराशीतील शुक्र धन स्थानात वळेल. पराक्रमात रवी आहे. एकूण ग्रहांची बैठक उत्तम जमली आहे. त्यामुळे नोकरी, उद्योगधंदा, राजकारण यांतील आपले स्थान बळकट होईल. मात्र जिभेवर नियंत्रण असू द्या. कारण मनात नसतानाही एखादी व्यक्ती दुरावली जाईल. तुमच्यातील नम्रता, विनय तुमच्या यशाचा आलेख उंचावतील.

एप्रिल २०१९ : बुध, शुक्र, राहू मदतीचा हात देण्यासाठी तत्पर आहेत. त्यामुळे व्ययातील शनी, केतूच्या कटू कारवायांचा फार परिणाम होणार नाही. सहनशीलता उपयोगी पडेल. नवीन योजना, नवीन कामे आणि महत्त्वाचे निर्णय यात घाई नको. घरातील लहानसहान कुरबुरींकडे त्रयस्थपणे पाहा.

मे २०१९ : साडेसातीच्या काळातही शुक्र, नेपच्यून त्रिएकादश योग लाभदायक ठरेल. तसेच षष्ठातील मंगळ, राहूचे योगदानही तितकेच महत्त्वाचे ठरेल. शनी केतूच्यामार्फत होणारा मानसिक त्रास फार काळ टिकणार नाही. १५ जूनला षष्ठात येणारा रवी वातावरणात खूप बदल घडवून आणील. त्या काळात महत्त्वाची कामे आटोपून घ्या.

जून २०१९ : मंगळ, शनी यांना दूर ठेवले तर बाकीच्या ग्रहांकडून उत्तम प्रतिसाद लाभणार आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा योग्य काळ आहे. चतुर्थातील हर्षलच्या विक्षिप्तपणाचा अनुभव येईल. त्यातून कुटुंबात होणारे किरकोळ स्वरूपाचे मतभेद तात्पुरते असतील.

जुलै २०१९ : गुरू, मंगळ नवपंचम योगातून नवीन कामाची उत्साहात सुरुवात होईल. प्रामाणिकपणा, मेहनत आणि चिकाटी स्वप्ने पुरी करण्यास मदत करतील. कला प्रांतातील विशेष संधीचा लाभ होईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आखलेल्या कामांना गती प्राप्त होईल. पैशाची आवक वाढेल.

ऑगस्ट २०१९ : शनी, केतू व्ययात अष्टमात रवी, मंगळ एकूण ग्रहांची प्रतिकूलता वाढली आहे. पण एकादशातील गुरू नि पराक्रमातला राहू आपल्या बौद्धिकतेतून परिस्थिती आटोक्यात ठेवील. पराक्रमातील राहू उद्योगधंद्यात, राजकारणात आपले वर्चस्व ठेवील. महिनाअखेर वाढणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप ओळखून दोन पावले मागे या. काही काळातच परिस्थती बदलेल.

सप्टेंबर २०१९ : गुरू, शुक्राचे उत्तम साह्य़ लाभेल. नवीन ओळखी, नवीन परिचय यातून कामाचा वेग वाढेल. सरकारी कामे, उद्योगधंदा, राजकीय क्षेत्र यात वर्चस्व वाढेल. फार भावनिक होणे टाळा. माणसे पारखून घ्या. अष्टमातील रवी, मंगळ मानसिक अस्थिरता निर्माण करतील, पण राहूच्या उत्तम पाठबळातून खूप मोठा आधार लाभेल.

ऑक्टोबर २०१९ : १७ ऑक्टोबरनंतर रवी दशमात आहे. गुरू, शुक्राचे शुभसंकेत या महिन्यात लाभदायक ठरतील. कला साहित्य, उद्योगधंदा, राजकारण, कोर्टकचेरीची कामे यात यशदायक घटना घडतील. मात्र घरातील  प्रश्नांमध्ये समजुतीने घेणे गरजेचे ठरेल. महत्त्वाची कामे करताना उत्साहाच्या भरात गोंधळ, आततायीपणा टाळा. शांततेने, गांभीर्याने वागा.

नोव्हेंबर २०१९ : १६ नोव्हेंबरला एकादशात प्रवेश करणारा रवी कामात स्थिरता आणेल. कला प्रांतात, सामाजिक -राजकीय क्षेत्रात आपल्या कामाची दखल घेतली जाईल. आपल्या नव्या विचारांचे कौतुक होईल. त्यातूनच उत्साहाने आपली कामे पुढे सरकतील. बुद्धी आणि श्रमाच्या जोरावर आपले स्थान बळकट कराल.

डिसेंबर २०१९ : मंगळ, बुधाचे उत्तम साह्य़ तर स्वराशीत शुक्र मन:स्थिती चांगली राहील, पण आपल्या मनमोकळ्या स्वभावाचा कुणाला फायदा घेऊ देऊ नका. आपल्या अति स्नेहाशील बोलण्यातून कुणी चुकीचा अर्थ काढणार नाही. याची काळजी घ्या.  राजकारणात, सामाजिक क्षेत्रात नको ते डावपेच खेळले जातील. सावध राहा.

कुंभ २०१९ (२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी)

आपला जन्म २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान झाला असेल तर आपल्यावर ८ अंकाचा म्हणजे शनी ग्रहाचा प्रभाव असतो. २०१९ या वर्षांचा एकांक ३ येतो. त्यामुळे गुरू ग्रहाचा प्रभाव वर्षभर आपल्या राशीवर असणार आहे. कुंभ ही वायू तत्त्वाची बौद्धिक राशी आहे. गुरूच्या सहवासात तिला जीवनाविषयीची सुंदरता जवळून पाहता येईल. आपण किती जगलो यापेक्षा कसे जगतो याला खूप महत्त्व आहे, अशा आशयाचा नवीन विचार कुंभ राशीचा जीवनपरीघ खूप विशाल करील.

जानेवारी २०१९ : राहू, शनीचे उत्तम सहकार्य मिळेल. जगण्यातले सुख हे मनाच्या माध्यमातून जाणवते. एकनाथ महाराज म्हणतात- ‘चित्ती असू द्यावे समाधान’. समाधानही असेच आहे. ते जगायचे असते. तेव्हा त्यातला आनंद मिळतो, असा सुंदर अनुभव आपल्याला या महिन्यात येईल. नोकरी, धंदा, राजकारण, शिक्षण यामध्ये आपला सहभाग महत्त्वाचा ठरेल.

फेब्रुवारी २०१९ : लाभस्थानी शुक्र-शनी ग्रहांची आनंदयात्रा जमली आहे. पैशाची आवक वाढेल, पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. नोकरीधंद्यात जबाबदारीची कामे सावधानतापूर्वक करावी. आध्यात्मिकतेचा आणि मनाचा उत्तम समन्वय साधला जाईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मार्च २०१९ : २१ मार्चपर्यंत शुक्र व्ययात तर शनी, केतू एकादशात आहेत. ग्रहांचे गणित उत्तम जमले आहे. हर्षल पराक्रमात आहे. स्पर्धेमधून फारसे यश लाभणार नाही. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. मात्र कलाविश्वात आपल्या कलेचे कौतुक होईल. प्रवासाचे योग तुमची वाट पाहत आहेत.

एप्रिल २०१९ : २२ एप्रिलपर्यंत गुरू एकादश स्थानात आहे. गुरू-शुक्र त्रिएकादश योग खूप मोलाचा ठरेल. रवी मंगळाचा प्रखर विरोध मनाला तापदायक ठरेल. अतिस्पष्ट बोलणे टाळा. गुरूचा समंजसपणा खूप कामाचा ठरेल. पराक्रमात नुसतीच लढाई नसते. तुमचे प्रेमळ शब्दही माणसाला आपलेसे करू शकतात.

मे २०१९ :  मंगळ, राहू, रवी नि गुरू हे विरोधी गटांत असले तरी पराक्रमातील शुक्राचा दूरदर्शीपणा कामास येईल. त्यामुळे उद्योगधंद्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. मात्र बुध-हर्षल युतीतून पैसे मिळतील; पण खर्चही तितकाच होईल. तेव्हा काटकसरीचे धोरण ठेवा.

जून २०१९ : गुरू-मंगळ नवपंचम योग नि चतुर्थातील शुक्राचा सहवास खूप मदतीचे ठरतील. रवी, राहूचा नाराजीचा सूर फार त्रासदायक ठरणार नाही; पण संयम, धीर या सद्गुणामुळे खूपशा गोष्टींना सहजता प्राप्त होईल.  नातेवाईकांना आश्वासने देऊ नका.

जुलै २०१९ : शुक्र, मंगळ, शनी, केतू ग्रहांचे उत्तम सहकार्य आहे. त्यामुळे साहित्य, अभिनय, नाटय़, सिनेमा क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. स्थावर इस्टेटीत होणारे व्यवहार फलदायक ठरतील. उद्योगधंद्यात, नोकरीत उत्तम संधी प्राप्त होईल. स्वत:चे महत्त्व सांभाळून वेळेचे गणित सांभाळा. म्हणजे नको तिथे वेळ वाया जाणार नाही.

ऑगस्ट २०१९ : शनी-केतूची उत्तम साथ, आत्मविश्वास आणि प्रेरणा यांच्या माध्यमातून कामाचे स्वरूप बदलेल. चांगले विचार, चांगल्या अपेक्षा ठेवल्या, की यश अधिक जवळ येते हा अनुभव प्रामुख्याने या महिन्यात येईल. मात्र १७ ऑगस्टपूर्वी महत्त्वाची कामे करून घ्यावीत.

सप्टेंबर २०१९ : शुक्र अष्टमात अडचणीच्या जागी जाऊन बसला तरी तो आपला चांगुलपणा सोडत नाही. बाकी शनी – केतू सोडले तर इतर ग्रहांशी या महिन्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे कामात दिरंगाई, कंटाळा असे वातावरण तयार होईल; पण महिनाअखेर हीच मरगळ झटकून कामाला लागाल.

ऑक्टोबर २०१९ : ग्रहस्थिती फारशी चांगली नसली तरी गुरू-शुक्र त्रिएकादशातून रेंगाळलेली कामे जलद गतीने पुढे सरकतील. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम काळ. मात्र शेअर धंद्यात पैशाची जास्त हाव ठेवू नका. सावधतेने वागा. नोकरीधंद्यात, उद्योगात हळूहळू कामाचा जम बसेल.

नोव्हेंबर २०१९ : रवी, शुक्र, शनी नि गुरूचे पदार्पण एकादशात. त्यामुळे कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्या क्षेत्रात अडवणूक करणाऱ्यांना, अडचणी निर्माण करणाऱ्यांना उत्तम चाप बसेल. एकूण हा महिना खूप आनंदी, उत्साही वातावरण निर्माण करील. लहानसहान प्रवासाचे योग येतील. तो अनुभव जरूर घ्या.

डिसेंबर २०१९ : ग्रहांची उत्तम साथ, त्यामुळे वातावरणात वेगळा उत्साह दिसून येईल. फक्त दशमातील मंगळामुळे नको ते वादविवाद होतील. दुसऱ्याची निंदानालस्ती टाळा. मात्र नवीन योजना, कल्पनांना चालना मिळेल. नवीन कामांची सुरुवात उत्साहाने कराल. कलाप्रांतात, समाजसेवेत आपल्या अभ्यासू वृत्तीचा फायदा होईल.

मीन २०१९ (२० फेब्रुवारी ते २० मार्च)

प्रामुख्याने गुरू ग्रहाच्या दोन राशी आहेत. धनू आणि मीन. धनू ही अग्नी तत्त्वाची राशी आहे, तर मीन ही जलराशी आहे. २० फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान रवीचे वास्तव्य मीन राशीत असते. मीन ही गुरू तत्त्वाची राशी आहे. या गुरूचा अंक ३ आहे, तर २०१९ या सालाचा एकांक ३ येतो. एकूण या वर्षी मीन राशीवर पूर्णपणे गुरू ग्रहाचा प्रभाव असणार आहे. सात्त्विकता आणि भावनाप्रधान मन ही मीन राशीची खरी ओळख आहे. जीवनातील प्रत्येक चढउतार सांभाळून जगण्यातला प्रत्येक क्षण आनंदमय करण्याचा प्रयत्न ही रास करील.

जानेवारी २०१९ : गुरू, शुक्र, रवी, बुध, केतू यांच्याशी होणाऱ्या सुसंवादामुळे हा महिना अधिक आनंद देईल. कला, साहित्य, शिक्षण, उद्योगधंदा, नोकरीत नवीन परिचय, नवीन गाठीभेटीतून नव्या विचारांची सुरुवात होईल. शनी, नेपच्यून त्रिएकादश योगातून एक वेगळे अस्तित्व प्राप्त होईल. अध्यात्माशी पुसटसा परिचय घडेल.

फेब्रुवारी २०१९ : मंगळ-केतू केंद्रयोगामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. बुध-गुरू नवपंचम योगातून महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक नि खर्चाचे प्रमाण यांचा मेळ असू द्या. अकारण गरजा वाढवू नका. मानसन्मानात फार काळ स्वत:ला गुंतवू नका. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या दूरदृष्टीचा खूप फायदा होईल. त्यासाठी वेळ द्या.

मार्च २०१९ : मंगळ पराक्रमात शुक्र एकादशात, त्यामुळे खूप कामे मार्गी लागतील. नवीन कल्पना, नव्या योजना साकार होतील. मात्र चतुर्थात  आलेल्या राहूूमुळे घरात किरकोळ समस्या वाढतील. नात्यांमधील जुने वाद नव्याने डोके वर काढतील; पण गुरू-रवी नवपंचम योगातून ते शांत होईल. त्यामुळे काळजीचे कारण नसेल.

एप्रिल २०१९: मंगळाचा भक्कम आधार आपल्यासाठी एकमेव दुवा ठरेल. हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे. व्यापार, उद्योगधंद्यात चढउतार होईल. भागीदारीत, नोकरीत शाब्दिक वाद टाळा, गैरसमज विसरून जा. या गोष्टी मनात ठेवू नका.

मे २०१९: धनस्थानात शुक्र, बुध, पराक्रमात रवी, भाग्यात गुरू असे या ग्रहांचे उत्तम पाठबळ आपल्या पाठीशी आहे. चतुर्थात मंगळ, राहू प्रापंचिक कटकटींना खतपाणी घालेल; पण त्याकडे दुर्लक्ष करा. उद्योगधंद्यात मनातल्या सकारात्मक विचारांचे स्मरणसुद्धा ईश्वरी नामस्मरणाइतके महत्त्वाचे आहे.

जून २०१९: गुरू, शुक्राचे उत्तम सहकार्य मिळेल. मंगळ-शनी षडाष्टकातून जुने वाद, जुनी भांडणे यांचा जराही पुनरुच्चार करू नका. मात्र नातेवाईक मंडळींकडून यांचा उच्चार झाला तर त्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. तसेच घाईगर्दीत निर्णय घेऊ नका. व्यवहारात पारदर्शकता असू द्या. म्हणजे फसवणूक आदी गोष्टींना वाव मिळणार नाही.

ऑगस्ट २०१९: रवी-गुरूचे उत्तम सहकार्य लाभेल. मात्र उद्योगधंद्यात, नोकरीत सध्या बदल करू नका. नवीन कामे जरूर स्वीकारा. ती यशस्वी ठरतील. पाहुण्यांची ये-जा वाढेल. षष्ठातील शुक्रामुळे अनामिक हळवेपणातून नकारात्मक विचाराचे काहूर मनात रेंगाळत राहील. अपराधीपणाची भावना वाढीस लागेल. शक्यतो या मानसिकतेतून बाहेर पडा.

सप्टेंबर २०१९: शुक्र-गुरू त्रिएकादश योगातून आपल्या अडचणी सहज दूर होतील. मनात शक्यता ठेवून कामे करा. साशंकतेला वाव देऊ नका.  मनाच्या सकारात्मक प्रवासाला जीवनात खूप महत्त्व आहे. कामाची पूर्तता करण्याची खरी ऊर्जा मनातून प्राप्त होत असते. उद्योगधंद्यात, नोकरीत या ऊर्जेचा उपयोग करा. नक्कीच यश लाभेल.

ऑक्टोबर २०१९: एकूण ग्रहांची मदत शून्य असेल, उलट शत्रूच्या अवतारात हे ग्रह उभे राहतील. शनी-नेपच्यून त्रिएकादश योगातून मोठा आधार प्राप्त होईल. बुद्धिचातुर्य नि सामर्थ्यांतून क्षमता वाढेल. भावनिकता, हळवेपणा कमी होईल नि आत्मविश्वास, साहस वाढीला लागेल.

नोव्हेंबर २०१९: मंगळ-शुक्र त्रिएकादश योगातून खूप कामांना गती प्राप्त होईल. इतर ग्रहांनी पुकारलेला असहकारही हळूहळू बोथट होईल. विरोधात उभे राहिलेल्यांचे डावपेच त्यांच्याच अंगाशी येतील. मात्र गाफील राहणे, स्वस्थ बसणे यापासून दूर राहा. अतिविश्वास आणि अवलंबून राहणे कटाक्षाने टाळा.

डिसेंबर २०१९: बुध-शुक्राचा उत्तम सहवास वर्षांअखेरीस खूप मदतीचा ठरेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नेपच्यूनच्या सान्निध्यातून आलेली दूरदृष्टी पुढील महत्त्वाच्या कामाला मदतीची ठरेल. कोर्टकचेरीतील निर्णय, वादविवाद बाहेर मिटवणे शहाणपणाचे ठरेल. फार स्पष्ट मते मांडू नका. वाद मिटवा.