उन्हाळ्यामुळे आपण इतके हैराण होऊन जातो की ज्यांच्यावर उन्हाचा थेट परिणाम होतो, त्या त्वचा, डोळे, केस यांच्याकडे दुर्लक्ष करतो. घरच्या घरी सहजसोप्या पद्धतीने आपली काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स-

मेमहिन्याच्या कडकडीत उन्हाने सध्या सगळ्यांना ग्रासलेलं आहे. अशा वेळी त्वचेची, डोळ्यांची, केसांची काळजी कशी घ्यावी याची माहिती.

त्वचेची काळजी

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि त्यामुळे चेहरा किंवा त्वचा निस्तेज दिसू लागते. ऊर्जा कमी होते. हे टाळण्यासाठी त्वचेची काळजी घेतली पाहिजे. प्रकृतीने थंड असलेले पदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजेत. त्याने आपसूकच ऊर्जा निर्माण होऊन चेहऱ्यावर तजेला येईल. काकडी, नारळपाणी, दही, ताक, किलगड, सब्जा बी या पदार्थामुळे थंडावा मिळतो.

चेहऱ्याला किंवा त्वचेला मसाज करावा. त्यासाठी काकडीचा रस किंवा तिचा चोथा तो चेहऱ्यावर पसरा आणि डोळ्यांवर काकडीचे काप ठेवा. ते दहा मिनिटं तसेच राहू द्या आणि त्यांनतर पाण्याने हलकेच धुऊन घ्या. त्वरित उत्साही वाटेल. तसंच दही आणि डाळीच्या पिठाचा पॅक करून तो चेहऱ्यावर एकसमान पद्धतीने पसरवा. हा पॅक खरवडू नका. पॅक कोरडा पडला की पाण्याने हलकेच धुवून घ्या. चंदन आणि गुलाब पाणी यांचं मिश्रणही चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरेल.

बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावायला विसरू नका. सनस्क्रीन लावायची एक पद्धत असते. काही जणांना वाटतं ते साधंसुधं क्रीम आहे आणि नेहमीच्या क्रिमप्रमाणेच हातावर पसरवून मग ते चेहऱ्यावर लावायचं असतं. पण हा गरसमज आहे. सनस्क्रीन लोशन हे इतर क्रिम्सच्या तुलनेत काहीसं जाड असतं आणि ते आपल्या चेहऱ्यावर एक पांढरी झाक सोडतं. त्यामुळे ते लावताना आधी ते एका हातावर घ्यावं आणि दुसऱ्या हाताच्या दोन बोटांनी  हळूहळू चेहऱ्यावर पसरवावं. एकदा सनस्क्रीन पसरवलेल्या भागावर पुन्हा रगडू नये. त्याचा चेहऱ्यावर समान थर लागला गेला पाहिजे. जेणेकरून ते लोशन मास्कसारखं काम करेल. उन्हाळ्यात तुम्ही मेकअप करत असाल तर रात्री झोपताना तो पूर्णपणे पुसल्याशिवाय झोपू नये. चेहरा पूर्ण स्वच्छ करावा. तेलाच्या साहाय्याने मेकअप काढून घ्यावा. चेहरा साबणाने स्वच्छ धुवून, टॉवेलने पुसून घ्यावा आणि मग चेहऱ्यावर हलकेच गुलाब पाण्याचा हबका मारून घ्यावा. हलक्या हाताने चेहऱ्यावर सगळीकडे पसरवावा.

मेकअप न काढता झोपलात तर चेहऱ्यावर डाग, फोड किंवा रॅश येऊ शकतात. उन्हाळ्यात ही समस्या जास्त जाणवते. कारण घामामुळे त्वचेवरील उघडलेली असतात. अशात मेकअप प्रॉडक्ट्स त्वचेत खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

डोळ्यांची काळजी

उन्हाळा जसजसा जाणवायला लागलाय तसे नवनवीन ट्रेण्ड्स बाजारात डोकावायला लागले आहेत. चित्रपटांमधून नवनवीन गॉगल्सचे ट्रेण्ड्स सेट झाले आहेत. हल्ली बहुतेकांकडे गॉगल्स असतातच. गेल्या काही महिन्यांत गोल गॉगलचा ट्रेण्ड आला होता. अजूनही हा ट्रेण्ड सुरू आहे. गोल गॉगल, ब्रॉड स्क्वेअर गॉगल, कॅट्स आय गॉगल हे सध्याचे ट्रेण्डिंग गॉगल्स आहेत. त्याचबरोबर खूप फंकी लुक हवा असेल तर पंचकोनी, षटकोनी आणि अनेक आकार तुम्हाला मिळू शकतील. त्यात रेट्रो गॉगलची आता भर पडली आहे. अगदी पातळ गॉगल घालण्याची फॅशन आजकाल ट्रेण्डमध्ये आहे. पण त्याचा उन्हापासून बचाव कारण्यासाठी  फारसा उपयोग होत नाही. त्यात लाल, गुलाबी, निळा, जांभळा, केशरी, पिवळा अशा रंगांच्या काचा बघायला मिळतात. परंतु कधी कधी त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. काही वेळा आपल्याला आवडला म्हणून आपण गॉगल खरेदी करतो, पण तो आपल्या चेहऱ्याला खुलवत नाही. त्यामुळे गॉगल खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपला चेहरा खुलवतील अशाच आकाराचे गॉगल खरेदी करावेत. अंडाकृती चेहरेपट्टी असणाऱ्यांना मोठय़ा ओव्हर साइज फ्रेम्स त्याचबरोबर वाईड फ्रेम्स असलेले गॉगल शोभून दिसतात. त्याउलट गोल चेहरापट्टी असणाऱ्यांनी चौकोनी आकाराच्या फ्रेम निवडाव्यात. आपला चेहरा खुलवतील असे गोल, मध्यम गोल आकाराचे गॉगल वापरायला हरकत नाही.

हल्ली आपल्याला बाजारात अनेक स्टाइल्स बघायला मिळतात. पण आपल्या गरजेनुसार गॉगल निवडावा. गॉगल शक्यतो ब्राऊन, ब्लॅक, वाईन अशा डार्क शेड्समधील निवडावेत. हे क्लासि आणि एलीगंट गॉगल कोणत्याही कपडय़ांवर चांगले दिसतात. ब्लॅक शेड प्रत्येकालाच चांगली दिसते असं नाही, त्यामुळे शेड निवडताना काळजीपूर्वक निवडावी. आपली लाइफ स्टाइल, आपण वापरत असलेले कपडे, आपलं स्टेट्स या सगळ्याचा विचार करून आपल्या आवडीनुसार रस्त्यावरून किंवा ब्रॅण्डेड शोरूममधून तुम्ही गॉगल खरेदी करू शकता.

उन्हाळ्यात डोळ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ हे त्रास टाळायचे असतील तर दर काही तासांनी डोळ्यांवर पाण्याचे हबके मारा. रात्री आयमेकप काढून टाकायला विसरू नका. गुलाबपाण्याचे, कापसाचे बोळे डोळ्यांवर काही वेळ ठेवल्याने थंडगार वाटेल. डोळ्यांना शांतता मिळेल. मोबाइल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे आणि उन्हाळ्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. वर सांगितलेल्या काही कृती तुमचा ताण कमी करायला मदत करतील. या काही लहान लहान टिप्स लक्षात ठेवल्यात तर तुम्ही तुमच्यासाठी योग्य गॉगल्स मिळवू शकाल आणि त्याचबरोबर डोळ्यांची काळजी घेऊ शकाल.

केसांची काळजी

उन्हाळ्यात केससुद्धा खूप कोरडे होतात. त्यामुळे या काळात केसांची जास्तीत जास्त योग्य निगा राखली गेली पाहिजे. दही आणि मेथी यांचा पॅक तयार करून केसांना व्यवस्थित मसाज करावा. काही वेळ हा मास्क केसात तसाच ठेवावा आणि मग नंतर केस स्वछ धुवून घ्यावे. केस अतिशय मऊ होतात. उन्हाळ्यात केसातील आद्र्रता टिकवून ठेवली तर केस छान दिसतात.

केसांसाठी सल्फेट फ्री शाम्पू वापरावा आणि मग त्याला कंडिशिनग करावं. कंडिशनर वापरताना स्काल्पवर ते लावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. नाहीतर केस गळतात. कोमट पाण्यात शिकेकाई मिसळून त्याने केस धुवावेत म्हणजे केमिकल्समुळे केसांवर परिणाम होत असेल तर तो कमी होईल. उन्हाळ्यात कमीत कमी केमिकल्सयुक्त शाम्पू वापरा. केसात घाम खूप येत असला तरीही रोजच्या रोज केस धुवू नका. आठवडय़ातून दोन तीन वेळा केस धुवा.

कोणत्याही हीटिंग उपकरणांचा वापर केसांची स्टाईल कारण्यासाठी करू नका. आधीच उन्हाळा त्यात हीटिंग उपकरण वापरलं तर केस कोरडे पडून खूपच विचित्र आणि खराब दिसतील. केस मुलायम होण्यासाठी तेल लावावं.

बाहेर पडताना सुती ओढणी गुंडाळून, केस बांधून बाहेर पडावं. केस सुटे सोडण्यापेक्षा बांधून ठेवावेत जेणेकरून उकडणार नाही आणि उन्हामुळे येणारा कोरडेपणा कमी होईल. हल्ली बाजारात वेगवेगळे नसíगक हेयर पॅक मिळतात त्यांचा वापर करावा. केस, त्वचा, डोळे यांची योग्य काळजी राखली की उन्हाळ्यातही तुम्ही नक्कीच ताजेतवाने दिसू शकाल.