News Flash

Cricket World Cup 2019 : विश्वचषकातील वादळं!

खेळाच्या मैदानावर महत्त्वाची असते ती खिलाडू वृत्ती.

|| धनंजय रिसोडकर

खेळाच्या मैदानावर महत्त्वाची असते ती खिलाडू वृत्ती. पण काही वेळा खेळाडूंचं तर काही वेळा प्रेक्षकांचं भान सुटतं आणि नवनव्या वादांचा जन्म होतो. विश्वचषक स्पर्धानी आजवर अशी बरीच वादळं पेलली आहेत.

चार भांडी एकत्र आली की आवाज होतोच. कधी जास्त, कधी कमी; पण आवाज होतो हे मात्र नक्की. विश्वचषकाच्या निमित्ताने जगभरातील नागरीसंस्कृती, क्रीडासंस्कृती आणि कार्यसंस्कृती यात वैविध्य असलेल्या देशांतील क्रिकेटपटू एकत्र येतात. जगाच्या वेगवेगळ्या भागांतील हे संघ एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वादविवाद घडण्याच्या घटना घडतात. त्यातील वैयक्तिक वाद जेव्हा संघाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो, तेव्हा वातावरण अधिकच तापते. काही वादग्रस्त घटना तर संपूर्ण सामन्याचा नूर पालटणाऱ्या ठरतात. आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील अशाच काही वादग्रस्त घटना अस्सल क्रिकेटशौकिनांच्या मनात कायम घर करून राहिल्या आहेत.

संतप्त प्रेक्षकांकडून जाळपोळ

भारताच्या दृष्टीने सर्वात मोठी वादग्रस्त घटना ही १९९६च्या विश्वचषकातील आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी या लाडक्या जोडगोळीशिवाय संजय मांजरेकर, सलील अंकोला अशा मुंबईकरांचे वर्चस्व असलेला तो एकमेव विश्वचषक आता चाळिशी पार केलेल्या प्रत्येकाच्या नक्कीच स्मरणात असेल. भारतीय संघ चांगला बहरात खेळत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. उपांत्य फेरीचा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर म्हणजेच भारतासाठी गृहमैदानावर होता. प्रतिस्पर्धी म्हणून श्रीलंकेचा संघ होता. १९९६च्या विश्वचषकातील सर्वात मोठा धमाका ठरलेली जोडी म्हणजे त्यांचे सलामीवीर सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथर्णा यांना जवागल श्रीनाथने झटपट तंबूत धाडले. त्यामुळे श्रीलंकेच्या धावसंख्येला प्रारंभीच लगाम बसला. श्रीलंकेला कशीबशी २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. पूर्वार्धात भारत बाजी मारणार असेच चित्र असताना भारताचा प्रारंभ डळमळीत झाला. सिद्धू झटपट बाद झाला, मात्र मैदानावर जोपर्यंत सचिन आहे तोपर्यंत विजय निश्चित आहे, ही समस्त भारतीय प्रेक्षकांची मानसिकता होती. सचिनचा खेळदेखील बहरला होता. त्याला दुसऱ्या बाजूने संजय मांजरेकरची साथ लाभली होती. भारत शंभरीच्या उंबरठय़ावर असतानाच जयसूर्याला फटका मारण्याच्या नादात पुढे सरसावलेल्या सचिनला कालुविथर्णाने यष्टीचीत केले. भारत १ बाद ९८ वरून २ बाद ९८ झाला. फलकावरची स्थिती फारशी वाईट नव्हती. मात्र सचिन बाद झाल्यामुळे अचानक होत्याचे नव्हते झाले. तो बाद झाल्यानंतर पुढे तर पत्त्यांचा बंगला कोसळावा, तसे फलंदाज बाद होत गेले. पुढच्या २२ धावांमध्ये भारताची स्थिती ८ बाद १२० झाली. १५ मिनिटे पूर्वीपर्यंत विजयपथावर असलेल्या सामन्यात भारतीय फलंदाज हाराकिरी करू लागल्याचे पाहताच भारतीय प्रेक्षक बिथरले. मैदानावर बाटल्या फेकू लागले. हे कमी म्हणून की काय स्टेडियममध्ये जाळपोळ करू लागले. संतप्त प्रेक्षकांमुळे परिस्थिती पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेच्या हाताबाहेर जाऊ लागल्याने अखेरीस तो सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला. विश्वचषकातील भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने तो एक काळाकुट्ट अध्याय म्हणूनच गणला गेला. त्या विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ प्रथमच विश्वविजेता ठरला.

दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले!

दुसरी मोठी वादग्रस्त घटना होती, १९९२च्या विश्वचषकातील. या दोन्ही घटनांमधील साम्य म्हणजे हे दोन्ही सामने उपांत्य फेरीतले आणि त्यात प्रतिस्पर्धी संघाने २५२ धावा केल्या होत्या. १९९२च्या विश्वचषकात बऱ्याच गोष्टींची नवलाई होती. सर्व संघ प्रथमच रंगीत कपडे घालून खेळत होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकात सहभागी होऊनदेखील  उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. इंग्लंडने २५२ धावा केल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने ६ बाद २३१ धावा केल्या होत्या. म्हणजे अखेरच्या १३ चेंडूंत २२ धावा असे समीकरण होते. मैदानावर अष्टपैलू ब्रायन मॅकमिलन आणि यष्टीरक्षक फलंदाज डेव्हिड रिचर्डसन अशी जोडी होती. म्हणजे सामना कुठेही फिरू शकेल अशी परिस्थिती असताना अचानक पाऊस पडू लागला. पंचांनी सामना रोखला. त्यानंतर सर्व काही आलबेल झाले. रिची बेनॉ यांच्या मार्गदर्शनाखालील समितीच्या पूर्वीच ठरलेल्या अनाकलनीय नियमानुसार सामन्याचे चित्रच पालटून गेले. फलंदाज मैदानावर परतले तेव्हा १३ चेंडूंत २२ धावा असे समीकरण बदलून १ चेंडूत २२ धावा असे चित्र फलकावर झळकू लागले. त्या पहिल्या विश्वचषकापासून दक्षिण आफ्रिकेवर रुसलेले दैव अद्याप त्यांच्या बाजूने वळलेले नाही. अर्थात इंग्लंडला अंतिम सामन्यात पोहोचूनही फायदा झाला नाही. त्या विश्वचषकावर पाकिस्तानने त्यांचे नाव कोरले.

सर्वाधिक धक्कादायक घटना

२००७चा कॅरेबियन बेटांवरील विश्वचषक वेगवेगळ्या कारणांनी गाजला. भारतासाठी हा विश्वचषक म्हणजे दु:स्वप्न होते. ग्रेग चॅपलच्या मार्गदर्शनाखाली विखुरलेला भारतीय संघ साखळी फेरीतच बाद झाला. पण त्यापेक्षाही अधिक धक्कादायक आणि वादग्रस्त घटना त्या विश्वचषक स्पर्धेत घडली. ती म्हणजे पाकिस्तानचे दक्षिण आफ्रिकन प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा त्यांच्या हॉटेलमधील खोलीत श्वास गुदमरून झालेला मृत्यू. पाकिस्तान आणि आर्यलडच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वूल्मर हे किंग्जस्टन येथील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शल्वविच्छेदन अहवालात हा मृत्यू गळा आवळून झाल्याचे मत तेथील पोलिसांनी नोंदवले. पाकिस्तान क्रिकेटमध्ये मुरलेली सामनानिश्चिती, निकालनिश्चिती किंवा खंडणी अशा कोणत्याही कारणास्तव ही हत्या केली गेल्याचे कयास आहेत. मात्र, अद्याप त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. संपूर्ण विश्वचषकावर या घटनेचे सावट कायम राहिले.

अंधाराचे राज्य

२००७च्या त्या विश्वचषकातील डकवर्थ-लुईसचा अनाकलनीय नियमदेखील अनेक संघांना फटका देणारा ठरला. या विश्वचषकातील अंतिम सामनादेखील बराचसा वादग्रस्त ठरला. या सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टने फटकावलेल्या तुफानी १४९ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३८ षटकांतच २८३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेकडून सनथ जयसूर्या आणि कुमार संगकाराने तडाखेबंद खेळी करीत सामना टप्प्यात आणला. मात्र, अचानकपणे आभाळ दाटून आले आणि मैदानावर अंधार पडला. हा अंधार इतका होता की प्रेक्षकांनाच नव्हे तर सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांनादेखील खेळपट्टीवर काय सुरू आहे, ते दिसेनासे झाले. मात्र, अंतिम सामना पुन्हा खेळवला जाणार नसल्याने अखेरची तीन षटके फिरकीपटूंकडून टाकून घेण्याची श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धनेची विनंती ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने मान्य केली. मात्र, तोपर्यंत श्रीलंकेच्या हातून सामना निसटला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाला गवसणी घातली.

असली की नकली?

१९८३ नंतर सातत्याने दावेदार या श्रेणीत गणल्या जाणाऱ्या भारतासाठी २०११चा विश्वचषक हा सर्वार्थाने खास होता. सहावा विश्वचषक खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील ही अखेरची विश्वचषक स्पर्धा होती. त्यामुळे किमान एकदा तरी विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न त्या वर्षी क्रिकेटप्रेमींना पडलेले होते. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाला, उपांत्य सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत भारताने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या ९७ धावांच्या अफलातून खेळीसह कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या षटकाराने भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला. पण पुरस्कार वितरण सोहळ्यात भारताकडे सोपवलेला विश्वचषक हा खरा विश्वचषक नसून त्याची प्रतिकृती असल्याचा वाद बराच काळ रंगला. त्यानंतर विश्वचषकाचे प्रमुख हारुन लॉर्गाट यांना हस्तक्षेप करून तो विश्वचषक खराच असल्याचा खुलासा करावा लागला. मात्र, जुन्या खऱ्या विश्वचषकाच्या तळाशी त्यापूर्वीच्या विजेत्या संघांची असलेली नामावली या विश्वचषकावर का नाही याचे उत्तर लॉगार्ट यांना अखेपर्यंत देता आले नाही. अर्थात असली असो की नकली विश्वचषकावर नाव कोरण्यात भारत दुसऱ्यांदा यशस्वी ठरला होता, हे महत्त्वाचं.

अन्य विश्वचषकांतील स्मृती

  • १९९६च्या विश्वचषकापूर्वी श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स या दहशतवादी संघटनेकडून बॉम्बस्फोटांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वेच्या संघाने साखळी सामन्यासाठी श्रीलंकेत जाण्यास नकार दिला. त्यामुळे ते सामने लंकेला बहाल केल्याने त्यांचा बाद फेरीतील प्रवेश सोपा झाला होता.
  • २००३च्या विश्वचषकाला प्रारंभ होण्याच्या आदल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फिरकीपटू शेन वॉर्न याच्या चाचणीत उत्तेजक आढळून आल्याने त्याला विश्वचषकातून माघारी धाडण्यात आले होते.
  • २००७च्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडचा अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिंटॉफने मद्यसेवन करून धिंगाणा घातल्याने संघाने त्याचे उपकर्णधारपद काढून घेतले, तसेच त्याला एका सामन्यात खेळू देण्यात आले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 12:05 am

Web Title: controversy in cricket world cup
Next Stories
1 उन्हाळ्यातही दिसा कूल कूल
2 इंग्लिश फुटबॉलची हुकमत
3 Cricket World Cup 2019 : धोकादायक अफगाणिस्तान!
Just Now!
X