भारत पाकिस्तानमध्ये रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल मात्र तरीही पाकिस्तानच्या तुलनेत भारताची स्थिती चांगलीच असेल. त्याचं कारण आत्तापर्यंतची भारताची वर्ल्ड कपमधली कामगिरी.

पॉइंट्स टेबलमध्ये प्रत्येकी चार सामने खेळलेला न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाचा संघ अनुक्रमे सात गुणांसह पहिल्या व सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर तिन सामने खेळलेला भारत पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत एकही सामना हरलेला नाही. त्या तुलनेत चार सामन्यातले दोन सामने हरलेला पाकिस्तान तीन गुणांसह आठव्या स्थानावर आहे. प्रत्येक संघ नऊ सामने केळणार असून सहा सामने जिंकलेल्या संघाची उपांत्यफेरीतील धडक निश्चित आहे. या दृष्टीनं विचार केला तर रविवारचा सामना पावसामुळे फुकट गेला तरी त्यानंतर भारताला बांग्लादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान या तुलनेने कमकुवत संघांशी खेळायचे आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध सामना झाला नाही तरी एकावर गुणावर भारत समाधानी राहू शकतो. मात्र, पाकिस्तानला उरलेले सर्व सामने जिंकावेच लागतील जे कठीण आहे.

तीच गत दक्षिण आफ्रिकेची आहे. चार पैकी तीन सामने हरलेल्या आफ्रिकेला प्रत्येक सामना जिंकण्याची गरज आहे. भारत व इंग्लंड या दोघांची गत जवळपास सारखीच आहे. इंग्लंडही तीनपैकी दोन सामने जिंकला असून चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर रविवारचा भारत पाकिस्तानमधला सामना जिंकणं पाकिस्तानसाठी अत्यंत आवश्यक आहे, तर सामना पावसामुळे वाहून गेला नी एक गुण मिळाला तर भारताचं फारसं नुकसान होणार नाही. अर्थात, भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही.