|| सिद्धार्थ खांडेकर

यजमान इंग्लंडला आजवर कधीही विश्वचषक मिळवता आलेला नाही. त्यामुळे घरच्या मैदानावर तो मिळवण्याची मनीषा ते बाळगून आहेत. मागील स्पर्धेत विश्वचषक मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला तर ती रास्त अपेक्षा आहे. आणि अर्थातच तमाम भारतीयांना आपल्या संघाने विश्वचषकावर आपली मोहोर उमटवावी अशी प्रबळ इच्छा आहे.

राजकारण आणि क्रिकेट या भारतीयांना जिव्हाळ्याच्या असलेल्या दोन क्षेत्रांशी संबंधित दोन सोहळे नुकतेच संपुष्टात आलेत. क्रिकेटप्रेमींना मात्र अजूनही विश्वचषक स्पर्धेची पर्वणी खुणावते आहे. टी-२० क्रिकेट विस्तारत असले आणि लोकप्रिय होत असले, तरी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही अजूनपर्यंत तरी या खेळातली सर्वाधिक रसिकप्रिय, पुरस्कर्तेप्रिय आणि क्रिकेटपटूप्रिय स्पर्धा ही बिरुदे टिकवून आहे. टी-२० क्रिकेटच्या अफाट लोकप्रियतेमुळे आणि छोटेखानी स्वरूपामुळे अलीकडे द्विराष्ट्रीय मालिकांमध्ये आणि विविध देशांमध्ये फोफावलेल्या लीगमध्ये हे क्रिकेट अधिक सातत्याने खेळले जाते. त्या तुलनेत कसोटी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेट हे दोन्ही प्रकार आपली अभिजातता टिकवून आहेत. येत्या ३० मे ते १४ जुलै दरम्यान होणारी बारावी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा त्यामुळेच रंगतदार ठरेल याविषयी शंका नाही. ही स्पर्धा २० वर्षांनी क्रिकेटच्या जन्मभूमीत म्हणजे इंग्लंडमध्ये होत आहे. यापूर्वी १९९९ मध्ये आणि त्याच्याही खूप आधी म्हणजे १९७५, १९७९, १९८३ अशा पहिल्या सलग तीन विश्वचषक स्पर्धाचे यजमानपद इंग्लंडकडे होते. त्या स्पर्धाची नवलाई होती. १९८३ मध्ये भारताने या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावल्यानंतर तर क्रिकेटचे केंद्रच जणू भारताकडे आणि आशियाकडे सरकल्यागत झाले. वेस्ट इंडिज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांनी आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील जगज्जेतेपद पटकावलेले आहे. परंतु इंग्लंडला ही किमया आजतागायत साधता आलेली नाही. इंग्लंडमध्ये यापूर्वी म्हणजे १९९९ मध्ये ही स्पर्धा झाली, त्यावेळी यजमान देशांतील लाखो नागरिकांना ती होत आहे याचा पत्ता वा फिकीर नव्हती. इंग्लिश क्रिकेट त्यावेळी पूर्णपणे अ‍ॅशेसकेंद्री (बरेचसे आजही) होते. पण तो काळ ऑस्ट्रेलियन वर्चस्वाचा होता. त्यामुळे अ‍ॅशेसमध्येही सातत्याने पराभव होत राहिल्यामुळे इंग्लंडमध्ये क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात घसरणीला लागली होती.

ही परिस्थिती २००५मधील अ‍ॅशेस मालिकेनंतर पहिल्यांदा पालटली. त्या वर्षी इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका अनपेक्षितरीत्या जिंकताना ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाला हरवून दाखवले. त्यानंतर क्रिकेटला आणि इंग्लिश संघाला इंग्लंडमध्ये गांभीर्याने घेतले जाऊ लागले. २०१०मध्ये इंग्लंडने टी-२० विश्वचषक जिंकला. घरच्या जवळपास प्रत्येक अ‍ॅशेस मालिकेत त्यांना विजय मिळू लागला. आणि जाणकारांच्या अंदाजाच्या पूर्णपणे विपरीत मोठय़ा प्रमाणावर युवक क्रिकेटकडे वळू लागले (आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धामध्ये इंग्लंडची झालेली घसरण हेही एक कारण). दरम्यानच्या काळात टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय अशा सर्वच प्रकारांमध्ये इंग्लंडचा बऱ्यापैकी दबदबा निर्माण झाला. ज्यो रूट, जॉस बटलर, बेन स्टोक्स, टॉम करन, जेसन रॉय, अलेक्स हेल्स, जॉनी बेयरस्टो इऑन मॉर्गन असे चांगले आणि मॅचविनर क्रिकेटपटू त्यांच्याकडे विकसित झाले. एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत इंग्लंड सध्या अव्वल स्थानावर असून, या स्पर्धेचे संभाव्य विजेते म्हणून सर्वाधिक पसंती इंग्लंडलाच मिळत आहे. घरच्या मैदानांचा फायदा यजमानांना होण्याची फारशी परंपरा क्रिकेट विश्वचषकात सुरुवातीला नव्हती. पण गेल्या दोन्ही स्पर्धामध्ये (भारत २०११, ऑस्ट्रेलिया २०१५) सहयजमान संघच विजेते ठरले. यावेळी इंग्लंडही त्यांचा कित्ता गिरवू शकेल, अशी त्यांची क्षमता आहे. हल्ली एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात ३५० धावा हा नवा मानक बनला आहे. तसा तो बनण्यास सर्वाधिक कारणीभूत इंग्लंडचा संघ आहे. २०१५च्या विश्वचषक स्पर्धेनंतर या संघाने ८५ डावांमध्ये १४ वेळा ३५० किंवा अधिक धावा करून दाखवल्या! याउलट या स्पर्धेच्या आदी जवळपास ६४० डावांमध्ये त्यांना अवघ्या दोनच वेळा साडेतीनशेचा पल्ला गाठता वा ओलांडता आला होता यावरून त्यांच्या फलंदाजीच्या ताकदीची कल्पना येईल. इंग्लंडची गोलंदाजी ऑस्ट्रेलिया, भारत किंवा दक्षिण आफ्रिकेइतकी भेदक नसली, तरी प्रतिस्पध्र्याचे दहा फलंदाज गुंडाळण्याइतपत प्रभावी नक्कीच आहे.

इंग्लंडसमोर सर्वाधिक खडतर आव्हान राहील ऑस्ट्रेलिया आणि भारताचे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे मनोधैर्य नक्कीच बळावले आहे. या दोघांची उपस्थिती, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांची भेदक गोलंदाजी, अ‍ॅडम झम्पासारखा चलाख युवा लेगस्पिनर आणि ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस हे धोकादायक अष्टपैलू क्रिकेटपटू ही ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. कर्णधार आरॉन फिंच आणि शॉन मार्श यांना योग्य वेळी सूर गवसल्यास ऑस्ट्रेलियाची ताकद आणखी वाढलेली दिसून येईल. मोठय़ा स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच आत्मविश्वासाने खेळतो. भारताने मध्यंतरी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन एकदिवसीय मालिकेतही हरवले होते. पण यामुळे खचून न जाता ऑस्ट्रेलियाने भारतात येऊन त्या पराभवाची परतफेड केली होती. या स्पर्धेसाठी कुकाबुरा चेंडू वापरले जातील ही बाब ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडणारी आहे. कारण या चेंडूंची निर्मिती ऑस्ट्रेलियातच होते. वॉर्नर यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. या संघाला थोडेफार विचलित करू शकेल, अशी एकमेव बाब म्हणजे नेतृत्व. स्मिथ आणि वॉर्नर या दोघांकडेही नैसर्गिक नेतृत्वगुण आहेत. फिंचला सूर गवसला नाही, तर या दोन बडय़ा क्रिकेटपटूंसमोर त्याची अवस्था अवघडल्यासारखी होईल. ऑस्ट्रेलियाला नेहमीच प्रभावी कर्णधारांची परंपरा लाभली आहे. अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, मायकेल क्लार्क यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आजवर विश्वचषक जिंकले आहेत. हे सगळे त्या-त्या वेळच्या संघाचे प्रमुख फलंदाजही होते. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात सापडल्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर या दोघांकडेही नजीकच्या भविष्यात नेतृत्व येण्याची शक्यता नाही. आरॉन फिंच अलीकडे बऱ्यापैकी चाचपडत होता. अशा परिस्थितीत विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत फॉर्म आणि नेतृत्व या दोहोंवर पकड राखण्याचे अवघड आव्हान त्याला पेलायचे आहे.

आयपीएलमुळे भारतीय क्रिकेटपटूंची दमछाक होईल, अशी भीती सुरुवातीला व्यक्त झाली होती. केदार जाधव वगळता कोणत्याही क्रिकेटपटूला दुखापतीची झळ पोहोचलेली दिसत नाही. उलट भारताचे बहुतेक महत्त्वाचे क्रिकेटपटू काही अपवाद वगळता सर्वच सामन्यांत खेळले. त्यांच्याकडे जवळपास दोन आठवडय़ांचा ‘बफर’ आहे. आयपीएल आधीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंचे ‘वर्कलोड’ बऱ्यापैकी हाताळलेले दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिटनेसची समस्या ज्यांना सर्वाधिक सतावते असे तेज आणि मध्यम तेज गोलंदाज – जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर – यांच्या सध्या तरी दुखापतीच्या तक्रारी नाहीत. यापलीकडे आयपीएलमधील कामगिरीवरून विश्वचषकातील कामगिरीविषयी फार आडाखे बांधणे योग्य ठरणार नाही. हार्दिक पंडय़ा आणि के. एल. राहुल आयपीएल सुरू होण्यापूर्वी वादात सापडले होते. त्यांना आयपीएलमध्ये सूर गवसला. हार्दिकने तर फलंदाजीमध्येही विलक्षण चमक दाखवली. मात्र रोहित शर्मा किंवा शिखर धवन यांना म्हणावा तसा सूर गवसला नाही. कर्णधार विराट कोहलीची कामगिरी त्याच्या प्रतिमेला साजेशी (फलंदाजी आणि नेतृत्व) झाली नाही. जसप्रीत बुमरा यशस्वी ठरला, पण भुवनेश्वर आणि शमी उल्लेखनीय सातत्य दाखवू शकले नाहीत. विजय शंकर आणि कुलदीप यादव पूर्णत: अपयशी ठरले. केदार जाधव, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, दिनेश कार्तिक यांची कामगिरी यथातथा झाली. यष्टिरक्षण, फलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही आघाडय़ांवर महेंद्रसिंग धोनी मात्र यशस्वी ठरला असे आकडेवारी सांगते. आयपीएलमुळे मानसिकदृष्टय़ा आणि शारीरिकदृष्टय़ा तयारी करण्याची संधी भारतीय संघाला लाभली किंवा भारतीय संघाने याचा सर्वाधिक उपयोग करून घेतला. बाकीच्या संघांना तो फायदा तितक्या प्रमाणात मिळू शकला नाही असे म्हणता येईल.

यावेळी केवळ दहाच संघ खेळत असून, प्रत्येक संघाला इतर नऊ संघांशी खेळण्याची संधी मिळणार आहे. हा फॉरमॅट यापूर्वी १९९२मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत वापरला गेला होता. त्यावेळी अर्थातच नऊच संघ होते. या प्रकारामध्ये फार कमकुवत संघांशी खेळण्याची वेळ येत नाही. जवळपास प्रत्येक संघच तयारीत असल्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सातत्याने चांगले खेळत राहावे लागते. त्यामुळे गट प्रकारांपेक्षा हा फॉरमॅट अधिक खडतर आणि म्हणून रंजकही आहे. यावेळी अफगाणिस्तानचा संघ सहभागी होत आहे. १९९६मधील केनिया आणि काही विश्वचषक स्पर्धामध्ये बडय़ा संघांना धक्का देणाऱ्या झिम्बाब्वेप्रमाणेच हा संघ धोकादायक मानला जातो. इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघ ‘डार्क हॉर्स’ म्हणजे छुपे रुस्तम ठरू शकतात. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांकडे गुणवत्ता असली, तरी मोक्याच्या सामन्यांमध्ये ते कच खातात हा आजवरचा अनुभव आहे. पाकिस्तानने इंग्लंडमध्ये अलीकडे झालेली चँपियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. शिवाय वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानसाठी महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही संघ सध्या अनुक्रमे आर्यलड आणि इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे वातावरण आणि खेळपट्टय़ा (आर्यलडमधील वातावरण इंग्लंडसारखेच) यांच्याशी लवकर जुळवून घेण्याचा सर्वाधिक फायदा त्यांनाच होऊ शकेल. पाकिस्तानचा संघ नेहमीच बेभरवशाचा असतो. पण त्यामुळे त्यांच्या हरण्याचाही भरवसा देता येत नाही! टी-२० क्रिकेटवर ‘पोसलेले’ अनेक तगडे क्रिकेटपटू ही वेस्ट इंडिजची ताकद आहे. मात्र हे दोन्ही संघ क्वचितच एकसंघ होऊन खेळताना दिसतात. त्यामुळे संभाव्य विजेत्यांमध्ये त्यांना फार वरचे स्थान देता येत नाही.

३६ वर्षांपूर्वीच्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाची गणना भारतासह जगभरातील क्रिकेट विश्लेषकांनी दुय्यम अशीच केली असणार. मग पहिल्या साखळी सामन्यात भारताने त्यावेळच्या संभाव्य विजेत्या वेस्ट इंडिजला हरवले आणि हा दृष्टिकोनच बदलून टाकला. त्यानंतरच्या प्रत्येक स्पर्धेत भारतीयांच्या दृष्टीने भारत संभाव्य विजेता म्हणूनच प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतो. ही स्पर्धादेखील त्याला अपवाद नाही. स्वतला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असलेला यजमान संघ, विजेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेला आणखी एक संघ आणि या खेळाचा खऱ्या अर्थाने सूत्रधार बनलेल्या देशाचा संघ अशी ही लढत उत्तरोत्तर रंगत जावी, हीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

response.lokprabha@expressindia.com