|| ऋषिकेश बामणे

क्रिकेट विश्वचषकाचा कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कुंभमेळ्यात अनुभवी खेळाडूंबरोबरच असंख्य नवे खेळाडू आहेत. कारकीर्दीतील पहिल्याच विश्वचषकात आपापल्या संघाला जगज्जेतेपद मिळवून देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. अशाच काही नव्या दमाच्या निवडक ताऱ्यांचा हा लेखाजोखा.

जसप्रीत बुमरा

  • संघ : भारत
  • वय : २५ वर्षे
  • वैशिष्टय़ : सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज; एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान.
  • एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी : सामने-४९, बळी-८५, सर्वोत्कृष्ट-५/२७.

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) भारतीय क्रिकेटला लाभलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे हरहुन्नरी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा. २३ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराने अवघ्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत भल्याभल्या नामांकित फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आहे. इतरांपेक्षा वेगळी गोलंदाजी शैली, दमदार वेग आणि अचूक टप्प्यावर यॉर्कर टाकण्याची क्षमता यांसारख्या गोष्टींमुळे बुमरा अव्वल दर्जाचा गोलंदाज म्हणून उदयास आला. खुद्द भारतीय संघातील खेळाडूंव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटूंनीही बुमराच सध्याच्या घडीला विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, याची पोचपावती दिली आहे. २०१७ मध्ये इंग्लंडलाच झालेल्या चॅम्पियन्स करंडकातही बुमराने अप्रतिम गोलंदाजी केली होती, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम फेरीतील त्या ‘नो-बॉल’मुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर मात्र बुमराने मागे वळून न पाहता गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानाचा वेध घेतला. ४९ एकदिवसीय सामन्यांत ८५ बळी नावावर असणाऱ्या बुमराने नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या १२व्या हंगामातील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या अंतिम फेरीत दडपणाखाली सुरेख गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच या विश्वचषकात बुमरा कशी कामगिरी करतो, यावर भारताचे भवितव्य अवलंबून राहील.

यांच्यावरही असतील साऱ्यांच्या नजरा..

बुमरा, रबाडा, ख्वाजा आणि बेअरस्टो यांच्याव्यतिरिक्तही अनेक नवे खेळाडू विश्वचषकात आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहेत. भारताचा हार्दिक पंडय़ासुद्धा या विश्वचषकात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. मुख्य म्हणजे दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदीची शिक्षा भोगून परतणारा हार्दिक आता अधिक परिपक्व झाला आहे. त्यामुळे त्याच्या धडाकेबाज फलंदाजीबरोबरच कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजीचाही भारताला विश्वचषकात लाभ होऊ शकतो. वेस्ट इंडिजचे इव्हिन लेविस, शिम्रॉन हेटमायर या दोन्ही धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजांमध्ये कोणत्याही चेंडूला स्टेडियमबाहेर भिरकावण्याची क्षमता आहे. याबरोबरच अफगाणिस्तानचा १८ वर्षीय फिरकीपटू मुजीब-उर-रहमान, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी, २०१८च्या युवा विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहिन आफ्रिदी आणि एकही एकदिवसीय सामना न खेळता न्यूझीलंडच्या संघात निवड झालेला यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल अशा विविध खेळाडूंच्या कामगिरीवर तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.

कॅगिसो रबाडा

  • संघ : दक्षिण आफ्रिका
  • वय : २३ वर्षे
  • वैशिष्टय़ : ताशी १५० किलोमीटर वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता, यॉर्कर-बाउन्सर टाकण्यात पटाईत.
  • एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी : सामने-६६, बळी-१०६, सर्वोत्कृष्ट-६/१६.

२०१५मध्ये भारताविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनीसारख्या अनुभवी फलंदाजाला अखेरच्या षटकात ११ धावा करण्यापासून रोखून दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिभावान वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने संपूर्ण क्रीडाविश्वाला स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले. त्यापूर्वी म्हणजेच २०१४ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतच रबाडाने अंगी असलेले कौशल्य दाखवले. आफ्रिकेला पहिल्यांदाच युवा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात रबाडाचा सिंहाचा वाटा होता. आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’चा (दडपणाखाली ढेपाळणारे) शिक्का असला, तरी रबाडाने मात्र नेहमीच दडपणाखाली कामगिरी उंचावली आहे. मॉर्ने मॉर्कलची निवृत्ती, डेल स्टेनचे दुखापतींचे सत्र आणि व्हर्नन फिलॅण्डरचा हरवलेला सूर पाहता आगामी विश्वचषकात रबाडावरच आफ्रिकेच्या गोलंदाजीची सर्वाधिक मदार राहणार आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही रबाडाने अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करत अवघ्या १२ सामन्यांत २५ बळी मिळवले होते. परंतु पाठदुखीमुळे त्याला ऐन बाद फेरीच्या टप्प्यावर स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. आफ्रिकेने अ‍ॅलन डोनाल्ड, शॉन पोलॉक, डेल स्टेन असे एकापेक्षा एक मातबर गोलंदाज क्रीडाविश्वाला दिले. त्यांनतर आता रबाडाकडेच नव्या पिढीचा तारा म्हणून पाहिले जात आहे. जानेवारी २०१८ मध्ये एकदिवसीय आणि कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान काबीज करणारा रबाडा हा एकमेव आफ्रिकन गोलंदाज असून उंच आणि वेगवान गोलंदाजाला आवश्यक अशी शरीरयष्टी असल्यामुळे रबाडा यॉर्कर व बाऊन्सर यांसारखे चेंडू टाकण्यात कमालीचे सातत्य राखतो. ‘आयपीएल’मध्ये २७ बळी मिळवून रबाडाकडून ‘पर्पल कॅप’ हिसकावणाऱ्या आफ्रिकेच्याच अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहिरसह रबाडाची जोडी जमल्यास प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना धावा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे निश्चित.

जॉनी बेअरस्टो

  • संघ : इंग्लंड
  • वय : २९ वर्षे
  • वैशिष्टय़ : धडाकेबाज सलामीवीर आणि चपळ यष्टिरक्षक.
  • एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी : सामने-६२, धावा-२,२९७, सर्वोत्कृष्ट-१४१*

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघातील हुकमी एक्का म्हणजे जॉनी बेअरस्टो. १६ सप्टेंबर, २०११मध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बेअरस्टोला जोस बटलरचे संघातील स्थान पक्के असल्यामुळे नेहमीच राखीव यष्टिरक्षक फलंदाजाची भूमिका पार पाडावी लागली. मुख्य म्हणजे २०१७ च्या अखेपर्यंत एकदिवसीय संघातील स्थानासाठी धडपडणाऱ्या बेअरस्टोने गेल्या वर्षभरात इंग्लंडसाठी सलामीला येत धडाकेबाज कामगिरी केली. १५ डिसेंबर, २०१७ रोजी प्रथमच सलामीला येणाऱ्या बेअरस्टोने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११९ धावांची खेळी साकारली. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना बेअरस्टोने १० सामन्यांत तीन अर्धशतके आणि एका शतकासह ४४५ धावा काढल्या. त्याशिवाय गेल्या आठवडय़ात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत ३५९ धावांचे आव्हान गाठताना बेअरस्टोने ९३ चेंडूंत १२८ धावांची खेळी साकारून विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला. फलंदाजीव्यतिरिक्त यष्टिरक्षणातही बेअरस्टो तितकाच निष्णात असून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७४ सामन्यांत ४४६ झेल व २२ यष्टिचीत करण्याची किमया त्याने साधली आहे.

उस्मान ख्वाजा

  • संघ : ऑस्ट्रेलिया
  • वय : ३२ वर्षे
  • वैशिष्टय़ : तंत्रशुद्ध डावखुरा सलामीवीर तसेच मधल्या फळीतील फलंदाज
  • एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारी : सामने-३१, धावा-१,२३८, सर्वोत्कृष्ट-१०४.

वयाची तिशी ओलांडल्यानंतर विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा तंत्रशुद्ध डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाचे नाव सर्वप्रथम घेतले जाईल. वैमानिकाचे प्रशिक्षण घेणारा ख्वाजा २००५मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी क्रिकेटकडे वळला. २०११ मध्ये पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या ख्वाजाला एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागली. मात्र मार्च २०१८मध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चेंडू फेरफार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे एक वर्षांच्या निलंबनाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे ख्वाजाचे एकदिवसीय संघातील स्थान जवळपास निश्चित झाले. ख्वाजानेही या संधीचा पुरेपूर लाभ घेत मार्च महिन्यात भारताविरुद्ध त्यांच्याच भूमीत झालेल्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली. पाच सामन्यांत त्याने ५०, ३८, १०४, ९१, १०० अशा धावा काढून मालिकावीराचा पुरस्कार तर मिळवलाच, त्याशिवाय ऑस्ट्रेलियाला ०-२ अशा पिछाडीनंतरही ३-२ अशी मालिका जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. मुख्य म्हणजे स्मिथ आणि वॉर्नर यांच्या अनुपस्थितीतही ख्वाजाने संघाच्या प्रमुख फलंदाजाप्रमाणे नेटाने किल्ला लढवला. त्यामुळे आगामी विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात त्याला तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर हमखास संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे सलामीबरोबरच मधल्या फळीतही फलंदाजी करण्याचा अनुभव असल्यामुळे ख्वाजा फिरकी गोलंदाजांनासमोरही समर्थपणे खेळू शकतो.