|| दीपाली पोटे-आगवणे

इंग्लंडमध्ये १९७५ मध्ये सुरू झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धानी गेल्या ४४ वर्षांमध्ये अनेक वेगवेगळी वळणं घेतली. ही स्पर्धा कशी बदलत गेली हे समजून घेणं मनोरंजक आहे.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
India's Possible Squad for World Cup 2024
T20 World Cup 2024 साठी मोहम्मद कैफने निवडला संघ, अश्विन ऐवजी ‘या’ खेळाडूला दिले स्थान, पाहा संपूर्ण संघ
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
Sunil Chhetri
भारताचे विजयाचे लक्ष्य! अफगाणिस्तानविरुद्ध ‘फिफा’ विश्वचषक पात्रता सामना आज; छेत्रीकडून अपेक्षा

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेला ४४ वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. जगात फुटबॉलला खेळांचा राजा म्हटले जाते. परंतु आशियाई देशांसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसारख्या काही देशांमध्ये क्रिकेट उत्तम रुजले आहे. क्रिकेट हाच आमुचा धर्म, असे काही देशांमध्ये गमतीने म्हटले जाते. जगात दूरचित्रवाणीवर पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धामध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अग्रेसर असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १९७३ मध्ये झाली. त्यानंतर पुरुषांच्या विश्वचषक स्पध्रेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्येच विश्वचषकाला प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत विश्वचषकाचे ११ अध्याय झाले असून, १२ वा अध्याय आता सुरू होत आहे. यंदा यजमानपद इंग्लंडलाच मिळाले असून, १० संघांमध्ये चुरस रंगणार आहे. १९८३ मध्ये कपिल देव तर २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे. परंतु सर्वाधिक विश्वविजेतेपद जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाला जातो. ऑस्ट्रेलियाने पाच, वेस्ट इंडिजने दोन, भारताने दोन तर श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांनी एकेक वेळा विश्वचषक जिंकला आहे. येत्या विश्वचषकाच्या निमित्ताने या स्पध्रेच्या इतिहासाचा आणि स्पध्रेमध्ये होत गेलेल्या घडामोडींचा आढावा घेऊ या-

पहिलावहिला विश्वचषक

  • यजमानपद : इंग्लंड
  • विजेते : वेस्ट इंडिज

क्रिकेटचा पहिला विश्वचषक १९७५ साली आयोजित करण्यात आला  होता. या विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडला मिळाले होते. याला प्रुडेन्शियल विश्वचषक या नावाने ओळखले जाते. त्यावेळी ६० षटकांचे सामने खेळले जायचे. हे क्रिकेट सामने क्रिकेटचा पारंपरिक पोशाख (पांढरा रंगाचा) घालून खेळण्यात आले. पहिल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा आठ संघांनी सहभाग घेतला होता. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. पहिल्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, भारत, पूर्व आफ्रिका तर दुसऱ्या गटात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांचा समावेश होता. या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळला गेला. वेस्ट इंडिजने या ऐतिहासिक सामन्यात कर्णधार क्लाइव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला.

दुसरा विश्वचषक

  • यजमानपद : इंग्लंड
  • विजेते : वेस्ट इंडिज

दुसऱ्या विश्वचषकाचे (१९७९) यजमानपददेखील इंग्लंडला मिळाले. या विश्वचषकात पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटचा दर्जा न मिळालेले काही संघ पात्र ठरले होते. भारतीय संघाने या विश्वचषकात विशेष अशी कामगिरी न केल्याने देशातील चाहत्यांची निराशा झाली. ईस्ट आफ्रिका संघाऐवजी कॅनडा या नवीन संघाचा समावेश करण्यात आला होता. २३ जूनला लॉर्ड्सच्या मदानावर दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला यजमान इंग्लंडशी भिडावे लागले. विवियन रिचर्ड्स आणि कॉलीस किंग यांनी उत्कृष्ट फलंदाजी करून २८६ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर उभे केले. परंतु इंग्लंडचा संघ ५१ षटकांत १९४ धावांत गारद झाला आणि पुन्हा एकदा विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकला.

भारतासाठी ऐतिहासिक

  • यजमानपद : इंग्लंड
  • विजेते : भारत

तिसरा विश्वचषकदेखील इंग्लंडमध्ये (१९८३) खेळण्यात आला. यावेळी झिम्बाब्वे हा अजून एक नवीन संघ विश्वचषकात सहभागी झाला होता. तसेच श्रीलंकेलादेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पूर्ण सदस्यत्व प्राप्त झाले होते. यावेळीदेखील दोन गटांत संघांची विभागणी करण्यात आली होती. परंतु प्रत्येक संघाबरोबर एकऐवजी दोन सामने खेळण्यात आले होते. याआधीच्या विश्वचषकात केवळ तीन मदाने होती. त्यांच्या संख्येतदेखील पाच पटीने वाढ करण्यात आली होती. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने १८३ धावांचे तुटपुंजे आव्हान उभे केले. त्यानंतर मोहम्मद अमरनाथ, कपिलदेव यांच्या गोलंदाजांमुळे भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकता आला. वेस्ट इंडिजची विजेतेपदावरील मक्तेदारी प्रथमच संपुष्टात आली.

कांगारूंचा विजयध्वज

  • यजमानपद : भारत-पाकिस्तान
  • विजेते : ऑस्ट्रेलिया

१९८७ चा विश्वचषक ‘रिलायन्स विश्वचषक’ या नावाने ओळखला जातो. कारण रिलायन्स कंपनीने तो प्रायोजित केला होता. इंग्लंडबाहेरील हा पहिलाच विश्वचषक होता. त्याचे आयोजन करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानने संयुक्तपणे सांभाळली होती. या विश्वचषकात षटकांची संख्या ६० वरून ५० करण्यात आली होती. या विश्वचषकाचा अंतिम सामना भारतातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमतेच्या ईडन गार्डन्स मदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये झाला. या विश्वचषकात प्रथमच वेस्ट इंडिजला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५३ धावा उभारल्या. अवघ्या सात धावांच्या फरकाने इंग्लंडला हरवले आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले.

पाकिस्तानची मुसंडी

  • यजमानपद : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड
  • विजेते : पाकिस्तान

या विश्वचषकाचे (१९९२) यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे संयुक्तपणे  देण्यात आले होते. याआधीच्या विश्वचषकाचा अभ्यास केला तर लक्षात येते की प्रत्येक विश्वचषकादरम्यान चार वर्षांचे अंतर होते, परंतु १९८७-१९९२मधील विश्वचषकादरम्यान पाच वर्षांचे अंतर ठेवण्यात आले होते. कारण ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंडमधील ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील वातावरण सामने खेळण्यासाठी अनुकूल नसल्याने १९९१ ऐवजी १९९२मध्ये पाचवा विश्वचषक खेळण्यात आला. १९९२च्या विश्वचषकापासून खेळामधील आकर्षण वाढावे म्हणून अनेक नवीन धोरणांची अंमलबजावणी  करण्यात आली. खेळाडूंचे कपडे रंगीत होते आणि लालऐवजी सफेद रंगाचा चेंडू यावेळी वापरण्यात आला. दक्षिण आफ्रिका या नवीन संघाचा समावेश यावेळी करण्यात आला होता. उपान्त्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला तर पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. केवळ २२ धावांच्या फरकाने इंग्लंडचा पराभव करत पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक मिळवला.

श्रीलंकेचे यश

  • यजमानपद : भारत-पाकिस्तान-श्रीलंका
  • विजेते : श्रीलंका

भारत-पाकिस्तानला दुसऱ्यांदा तर श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वचषकाचे यजमानपद (१९९६) मिळाले होते. या विश्वचषकात प्रथमच दिवस-रात्र (डे -नाइट) सामने खेळवण्यात आले होते. संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, केनिया या तीन नवीन संघांचा समावेश विश्वचषकात करण्यात आला होता. या विश्वचषकापासून तिसऱ्या पंचांची संकल्पना अस्तित्वात आली. प्रत्येक संघाची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आणि प्रत्येक गटात सहा संघ होते. यावेळी उपांत्य फेरीच्या आधी उपांत्यपूर्व सामने खेळण्यात आले. या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला. केवळ चार धावांच्या फरकाने श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. भारत आणि पाकिस्ताननंतर श्रीलंका हा विश्वचषक जिंकणारा तिसरा आशियाई देश बनला.

ऑस्ट्रेलिया गवसणी

  • यजमानपद : इंग्लंड
  • विजेते : ऑस्ट्रेलिया

इंग्लंडला यावेळी चौथ्यांदा विश्वचषकाचे (१९९९) यजमानपद मिळाले होते. परंतु काही सामने स्कॉटलंड, आयर्लंड, नेदरलॅण्ड्समध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. पण प्रत्येक गटाच्या अव्वल तीन संघांमधून फक्त सहा संघांना (सुपर सिक्स) पुढील फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका, भारत, झिम्बाम्ब्वे, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ सुपर सिक्स फेरीत पात्र ठरले. लॉर्ड्समध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव फक्त १३२ धावांत संपुष्टात आला. मग ऑस्ट्रेलियाने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पेलले आणि दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

पुन्हा ऑस्ट्रेलिया

  • यजमानपद : दक्षिण आफ्रिका-केनिया-झिम्बाब्वे
  • विजेते : ऑस्ट्रेलिया

२००३ च्या विश्वचषकाचे यजमानपद प्रथम आफ्रिका खंडाकडे गेले. दक्षिण आफ्रिका, केनिया आणि झिम्बाब्वे यांनी संयुक्तपणे यजमानपद सांभाळले होते. पहिल्यांदाच १४ संघांनी या विश्वचषकात सहभाग घेतला होता. सात-सात संघांना दोन गटांत विभागण्यात आले. भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, श्रीलंका, केनिया, न्यूझीलंड असे सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले. २० वर्षांनंतर भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३५९ धावांचा डोंगर उभारला. परंतु २३४ धावांत भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १२५ धावांच्या फरकाने भारताला हरवून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची किमया साधली.

ऑस्ट्रेलियाची हॅट्ट्रिक

  • यजमानपद – वेस्ट इंडिज,
  • विजेते : ऑस्ट्रेलिया

२००७ चा विश्वचषक कॅरेबियन बेटांवर झाला. या विश्वचषकात १६ संघ सहभागी झाले होते. बम्र्युडा, कॅनडा, हॉलंड, आयर्लंड, केनिया, स्कॉटलंड या संघांचाही समावेश होता. यावेळी संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली होती आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांना सुपर आठ टप्प्यांमध्ये प्रवेश मिळणार होता. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आर्यलड संघांचा सहभाग होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. पावसामुळे ३८ षटकांचा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २८१ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने ३६ षटकांत फक्त २१५ धावाच केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने जगज्जेतेपदाची हॅट्ट्रिक साकारली. हा त्यांच्या खात्यावरील चौथा विश्वचषक ठरला.

भारताचे वर्चस्व

  • यजमानपद : भारत-श्रीलंका-बांगलादेश
  • विजेते : भारत

२०११ च्या विश्वचषकाचे यजमानपद संयुक्तपणे भारत, श्रीलंका यांच्यासह पहिल्यांदाच बांगलादेशला मिळाले होते. पाकिस्तानचासुद्धा सहयजमान म्हणून समावेश होता. परंतु २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्यांना सहयजमान राष्ट्रांमधून वगळण्यात आले होते. पाकिस्तान संघाचे फक्त अंतिम सामना सोडला तर सर्व सामने भारताबाहेर ठेवण्यात आले होते. भारताने पाकिस्तानला तर श्रीलंकेने न्यूझीलंडला उपांत्य फेरीमध्ये हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. मुंबईमधील वानखेडे मदानावर अंतिम सामना रंगला होता. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन्ही आशियाई संघ अंतिम सामना खेळले होते. हा सामना सहा गडी राखून भारताने जिंकला आणि दुसऱ्यांदा विश्वचषकावर वर्चस्व गाजवले.

पाचव्यांदा ऑस्ट्रेलिया

  • यजमानपद : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड
  • विजेते : ऑस्ट्रेलिया

२०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन देशांना ११व्या विश्वचषकाचे यजमानपद सोपवण्यात आले. या स्पध्रेत १४ संघांनी सहभाग घेतला. सर्व संघांचे दोन गटांमध्ये विभाजन करून प्रत्येक गटात सात-सात संघ विभागण्यात आले होते. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला तर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. २०१५चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न मदानावर झाला. या सामन्याला ९३ हजार १३ प्रेक्षक उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील क्रिकेटच्या इतिहासातील चाहत्यांच्या गर्दीने हा विक्रम केला. ऑस्ट्रलियाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला १८३ धावांत गुंडाळले. मग ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून आरामात विजय संपादन केला. ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा जगज्जेतेपद प्राप्त केले.