News Flash

Cricket World Cup 2019 : हम हो ना हो..

येणारी विश्वचषक स्पर्धा काही खेळाडूंच्या कारकीर्दीतली शेवटची स्पर्धा असणार आहे.

|| तुषार वैती

येणारी विश्वचषक स्पर्धा काही खेळाडूंच्या कारकीर्दीतली शेवटची स्पर्धा असणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने छाप पाडणाऱ्या या खेळाडूंविषयी-

विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजाने सचिनची उणीव भरून काढत भारतीय क्रिकेटला शिखरावर नेऊन पोहोचवले आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणारी २०१९ विश्वचषक स्पर्धा ही काही खेळाडूंच्या कारकीर्दीतील शेवटची असणार आहे. म्हणूनच ‘कल खेल में हम हो ना हो, गर्दिश में सितारे रहेंगे सदा..’ या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील राज कपूर यांच्या ओळी चपखल बसतात. विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या काही खेळाडूंच्या कारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा-

ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

जगातील सर्वात विध्वंसक फलंदाज अशी ख्याती मिळवलेला ख्रिस गेल बऱ्याच महिन्यांपासून वेस्ट इंडिज संघापासून दूर होता. वेस्ट इंडिजला २०१२ आणि २०१६ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या गेलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ शतकांसह १०१५१ धावा फटकावल्या असून विश्वचषकात द्विशतक झळकावणाऱ्या दोन फलंदाजांपैकी तो एक आहे. मात्र गेल आणि विंडीज संघावर २०१९च्या विश्वचषकात पात्र ठरण्याकरिता पात्रता फेरीत खेळण्याची वेळ आली होती. अखेर विंडीजने विश्वचषक स्पर्धेत तर गेलने फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिज संघात स्थान मिळवले. आता पाचव्यांदा आणि कारकीर्दीतील शेवटच्या विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या गेलने वेस्ट इंडिजला विश्वविजेतेपद मिळवून देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. ९०च्या दशकात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा तसेच १३ कर्णधारांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा आणि अजूनही क्रिकेट खेळत असलेला गेल हा एकमेव क्रिकेटपटू आहे. आता इंग्लंडमध्ये गेलवादळ धडकावे, अशीच अपेक्षा त्यांचे चाहते करत आहेत.

महेंद्रसिंह धोनी (भारत)

भारताला २००७ चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०११ सालचा आयसीसी विश्वचषक जिंकून देणारा महानायक महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीविषयी अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित होत होती. पण ‘कॅप्टन कूल’ धोनीने आपल्या बॅटनेच टीकाकारांना वेळोवेळी सणसणीत चपराक दिली आहे. २०१६ मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर तसेच एकदिवसीय कर्णधारपद सोडल्यानंतरच धोनीची यंदाची विश्वचषक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची असल्याचे संकेत दिले होते. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर असलेला धोनी हा गेल्या दशकभरापासून भारतीय एकदिवसीय संघाचा मुख्य आधारस्तंभ राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून धोनीला मोठी खेळी करता आली नसली तरी त्याची यष्टींमागील कामगिरी मात्र भारताच्या यशात मोलाची ठरत आहे. ऋषभ पंतच्या आगमनानंतर धोनीचे विश्वचषकासाठीच्या भारतीय संघातील स्थान धोक्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धोनीने आपले कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करत आपल्या निवडीवर शिक्कामोर्तब केले. ३८ वर्षांच्या धोनीची तंदुरुस्ती आजही वाखाणण्याजोगी आहे. भारताच्या यशात अनेक मानाचे तुरे रोवणाऱ्या धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत १० शतकांसह दहा हजार ५०० धावा तसेच यष्टय़ांमागे ४३४ झेल घेतले आहेत. वानखेडे स्टेडियमवरील अंतिम फेरीत शानदार खेळी करत धोनीने भारताला तब्बल २८ वर्षांनंतर २०११ मध्ये विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले होते. आता त्याच थाटात कारकीर्दीला अलविदा करण्याचा त्याचा मानस आहे. मात्र धोनीची निवृत्ती ही भारतीय क्रिकेटशौकिनांसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

लसिथ मलिंगा (श्रीलंका)

२००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि ‘यॉर्करचा बादशाह’ लसिथ मलिंगा हा विश्वचषकात दोन हॅट्ट्रिकची नोंद करणारा जगातील एकमेव गोलंदाज आहे. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन हॅट्ट्रिक आणि लागोपाठ चार चेंडूंवर चार बळी मिळवणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. मलिंगाने आपल्या भेदक यॉर्करने जगभरातील फलंदाजांचे आयुष्य खडतर बनवले आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३२२ बळी जमा आहेत. २०१४ मध्ये श्रीलंकेला ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या मलिंगाला एकदिवसीय विश्वचषकाने हुलकावणी दिली आहे. २००७ आणि २०११ मध्ये श्रीलंकेने अंतिम फेरी गाठूनही त्यांना विश्वचषक उंचावता आला नव्हता. दुखापतींनी बेजार होऊन कारकीर्दीच्या अस्ताकडे झुकलेल्या मलिंगाला मात्र विश्वचषक विजयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या डेल स्टेनने प्रतिस्पर्धी सर्व फलंदाजांवर हुकमत गाजवली आहे. डेल स्टेनचा वेग आणि स्विंग सहजपणे खेळू शकतील, असे मोजकेच फलंदाज आहेत. आपल्या कारकीर्दीच्या ऐन भरात स्टेनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेला स्टेन विकेट्स मिळवण्यासाठी धडपडत आहे. जवळपास २०१६ नंतर तो एकही एकदिवसीय सामना खेळला नाही. मात्र २०१९ विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती. वनडेत फक्त १९६ विकेट्स टिपणारा स्टेन आता दक्षिण आफ्रिकेवरील ‘चोकर्स’चा शिक्का पुसून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.

शोएब मलिक (पाकिस्तान)

कित्येक वर्षांपासून पाकिस्तानी क्रिकेट ढवळून निघाले असले तरी गेल्या दोन दशकांपासून शोएब मलिकने संघातील आपली जागा कायम राखली आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धा हीच आपल्या कारकीर्दीला अलविदा म्हणण्याची योग्य वेळ आहे, असे मलिकने याआधीच ठरवले होते. १९९९ मध्ये ऑफस्पिनर म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या मलिकने नंतर फलंदाजीतही सुधारणा केली, त्यामुळे तो पाकिस्तानच्या मधल्या फळीतील आधारस्तंभ बनला. २८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४८१ धावा फटकावणारा मलिक हा पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. गोलंदाजीतही छाप पाडत १५६ बळी मिळवणाऱ्या शोएब मलिकचा अफाट अनुभव पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरू शकतो. गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतावर मिळवलेला विजय हा मलिकच्या कारकीर्दीतील संस्मरणीय ठरला आहे.

रॉस टेलर (न्यूझीलंड)

सुरुवातीच्या काळात स्लॉग स्वीपचे फटके खेळण्यात पटाईत असलेल्या न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नंतर आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. २००६ मध्ये पदार्पण करणारा रॉस टेलर हा विशीतील खेळाडूप्रमाणे आपली तंदुरुस्ती टिकवून आहे. तो आपल्या जन्मदिवशी शतक झळकावणाऱ्या चौघांपैकी एक फलंदाज ठरला असून २०११च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ही करामत केली होती. गेल्या दशकभरापासून न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा बनलेल्या टेलरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ शतकांसह ७०८१ धावा फटकावल्या आहेत. विश्वचषकातही त्याने २३ सामन्यांमध्ये ६५२ धावा आपल्या नावावर केल्या आहेत. गेल्या वेळी अंतिम फेरीत मजल मारूनही न्यूझीलंडचे विश्वविजेतेपद हुकले होते. आता अखेरच्या प्रयत्नांत न्यूझीलंडला हे देदीप्यमान यश मिळवून देण्याचा रॉस टेलरचा मानस आहे.

त्याचबरोबर हाशिम अमला, इम्रान ताहिर, फॅफ डय़ू प्लेसिस आणि जेपी दुमिनी (दक्षिण आफ्रिका), आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), इऑन मॉर्गन (इंग्लंड), केन विल्यम्सन, टिम साऊदी (न्यूझीलंड), मोहम्मद हाफीझ आणि सर्फराझ अहमद (पाकिस्तान), अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) हे खेळाडूही आपल्या अस्ताकडे झुकले आहेत.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2019 12:07 am

Web Title: which player will retire after cricket world cup 2019
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : नवे आहेत, पण छावे आहेत!
2 Cricket World Cup 2019 : विश्वचषकातील वादळं!
3 उन्हाळ्यातही दिसा कूल कूल
Just Now!
X